आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२६ मे, दिवस १४६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ४७६ ते ५०० सार्थ तुकाराम गाथा अभंग १७४१ ते १७५२
“२६ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २६ May
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २६ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १७४१ ते १७५२ चे पारायण आपण करणार आहोत.
२६ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ४७६ ते ५००,
476-11
जेव्हा तुवा देखिले । हे माझिया वदनी पडिले । तेव्हाचि यांचे आयुष्य सरले । आता रिती सोपे ॥476॥
जेव्हा तू हे सर्व माझ्या तोंडात पाहिलेस, तेव्क्षांच त्याचे आयुष्य संपलें. ही आता रिकामी सोपटी आहे.
477-11
म्हणौनि वहिला उठी । मिया मारिले तू निवटी । न रिगे शोकसंकटी । नाथिलिया ॥477॥
म्हणून लवकर उठ. मी मारलेल्यांना तू नाहीसे कर आणि व्यर्थ शोकसंकटांत पडू नकोस.
478-11
आपणचि आडखिळा कीजे । तो कौतुके जैसा विंधोनि पाडिजे । तैसे देखे गा तुझे । निमित्त आहे ॥478॥
आपणच एखादे निशान उभे करावे आणि कौतुकाने त्याला बाण मारून पाडावे, त्याप्रमाणे यांच्या नाशाला तुझे नुसते निमित्त आहे, पहा !
479-11
बापा विरुद्ध जे जाहले । ते उपजताचि वाघे नेले । आता राज्येशी संचले । यश तू भोगी ॥479॥
बा अर्जुना ! जे तुझे वैरी जन्मास आले, ते जन्मल्याबरोबर वाघाने नेले (असे समज) आता राज्यांसह मिळविलेल्या यशाचा तू उपभोग घे.
480-11
सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगी दुर्मद । ते वधिले विशद । सायासु न लागता ॥480॥
खरोखरच, हे तुझे भाऊबंद अत्यंत उन्मत्त, मदांध व जगामध्ये जे बलवान झाले आहेत, ते तू काही श्रम न पडता सहज मारलेस.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
481-11
ऐसिया इया गोष्टी । विश्वाच्या वाक्पटी । लिहूनि घाली किरीटी । जगामाजी ॥481॥
अशा प्रकारच्या गोष्टी जगामध्ये सर्व लोकांच्या मुखरूपी पटावर, अर्जुना ! तू लिहून ठेव-म्हणजे सर्व लोकांच्या तोंडी होऊ दे व विजयी हो.
संजय उवाच
। एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य
कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी॥
नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं
सगद्गदं भीतभीतः प्रणम्य ॥11. 35॥
अर्थ. संजय म्हणाला, श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकून भयाने कापत असलेला व हात जोडलेला अर्जुन भयभीत होत्साता साष्टांग नमस्कार घालून पुन्हा श्रीकृष्णाला सगद्गदित वाणीने म्हणाला॥-35॥
482-11
ऐसी आघवीचि हे कथा । तया अपूर्ण मनोरथा । संजयो सांगे कुरुनाथा । ज्ञानदेवो म्हणे ॥482॥
श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे संपूर्ण वर्तमान ज्याचे मनोरथ पूर्ण झाले नाहीत, अशा कुरुराज धृतराष्ट्राला संजय सांगू लागला.
483-11
मग सत्यलोकौनि गंगाजळ । सुटलिया वाजत खळाळ । तैशी वाचा विशाळ । बोलता तया ॥483॥
मग ज्याप्रमाणे सत्यलोकापासून उगम पावलेल्या गंगाजळाचा खळाळ वाजतो, तशी अर्जुनाशी बोलतांना भगवंताची वाणी गंभीर होती.
484-11
नातरी महामेघांचे उमाळे । घडघडीत एके वेळे । का घुमघुमिला मंदराचळे । क्षीराब्धी जैसा ॥484॥
किंवा आकाशात महामेघाचे उमाळे उठले असता एकदम घडघड असा अवाज होतो किंवा क्षीरसमुद्राच्या मंथनाचे वेळी मंदराचलाच्या मंथनाचा आवाज घुमुं लागला.
485-11
तैसे गंभीरे महानादे । हे वाक्य विश्वकंदे । बोलिले अगाधे । अनंतरूपे ॥485॥
त्याप्रमाणे विश्वरूप धारण करणार्या व विश्वाचे कारण असणार्या अगाध भगवंताने गंभीर व थोर नाद करणार्या वाणीने हे वाक्य उच्चारिलें.
486-11
ते अर्जुने मोटके ऐकिले । आणि सुख की भय दुणावले । हे नेणो परि कांपिन्नले । सर्वाग तयाचे ॥486॥
ते वाक्य अर्जुनाने केवळ ऐकले मात्र आणि त्याच्या मनात सुख झाले की भीति दुप्पट वाढली. हे आम्ही जाणत नाही; पण त्याचे सर्वाग मात्र कापू लागले.
487-11
सखोलपणे वळली मोट । आणि तैसेचि जोडले करसंपुट । वेळोवेळा ललाट । चरणी ठेवी ॥487॥
त्याचा शब्द खोल जाऊन मुरकुंडी वळली व तशा स्थितींतच त्याने हात जोडले व वारंवार चरणावर मस्तक ठेऊ लागला.
488-11
तेवीचि काही बोलो जाये । तव गळा बुजालाचि ठाये । हे सुख की भय होये । हे विचारा तुम्ही ॥488॥
त्याचप्रमाणे काही बोलण्याचा प्रयत्न करू लागता त्याचा कंठ भरून येई. हे सुखाचे लक्षण आहे की भीतिचे लक्षण होय याचा तुम्हीच विचार करा.
489-11
परि तेव्हा देवाचेनि बोले । अर्जुना हे ऐसे जाहले । मिया पदांवरूनि देखिले । श्लोकींचिया ॥489॥
पण तेव्हा देवाच्या बोलण्याने अर्जुनाची अशी स्थिती झाली की श्लोकातील पदांवरून मी जाणली आहे.
490-11
मग तैसाचि भेणभेण । पुढती जोहारूनि चरण । मग म्हणे जी आपण । ऐसे बोलिलेती ॥490॥
मग तसाच भीत भीत पुनः भगवंताच्या चरणांना नमस्कार करून अर्जुन म्हणतो, अहो जी भगवंता ! आपण असे बोललात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
अर्जुन उवाच
। स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या
जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च॥
रक्षांसि भीतानि दिशो द्रवंति
सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः ॥11. 36॥
अर्थ हे हृषीकेशा, तुझ्या महात्म्याने जग हर्ष व प्रेम पावते हे योग्यच आहे. भयभीत राक्षस दशदिशा पळत आहेत. सर्व सिद्धांचे समुदाय तुला वंदन करत आहेत. ॥11-36॥
491-11
ना तरी अर्जुना मी काळु । आणि ग्रासिजे तो माझा खेळु । हा बोलु तुझा कीर अढळु । मानू आम्ही ॥491॥
नाही तरी अर्जुना ! मी काळ आहे आणि सृष्टिचा संहार करणे हा माझा खेळ आहे, असे जे भगवंता ! तू बोललास, ते निश्चयाने आम्ही खरे मानतो.
492-11
परि तुवा जी काळे । आजि स्थितीचिये वेळे । ग्रासिजे हे न मिळे । विचारासी ॥492॥
पण देवा ! तू काळ असलास तरी आज जगताचे पालन करण्याचा समय असतांना, काळरूपी त्वां सर्व जगताचा संहार करावा, हे विचार करून पाहता विसंगत दिसतें.
493-11
कैसेनि आंगीचे तारुण्य काढावे ? । कैचे नव्हे ते वार्धक्य आणावे ? । म्हणौनि करू म्हणसी ते नव्हे । बहुतकरुनी 493॥
तारूण्यपणात आंगचे तारूण्य काढून, नसलेले वार्धक्य कसे आणता येईल ? म्हणून तू जो संहार करू म्हणतोस, तो बहुतकरून होऊ नये.
494-11
हा जी चौपाहारी न भरता । कोणेही वेळे श्रीअनंता । काय माध्यान्ही सविता । मावळतु आहे ? ॥494॥
अहो जी देवा ! दिवसाचे चार प्रहर न संपतांच, कोणतेहि वेळी माध्यान्हकाळींच सूर्य मावळतो काय ?
495-11
पै तुज अखंडिता काळा । तिन्ही आहाती जी वेळा । त्या तिन्ही परी सबळा । आपुलालिया समयी ॥495॥
तू जरी अखंड काळस्वरूप असलास, तरी तुला तीन वेळा आहेत. त्या तिन्ही आपआपल्या काळी बलवान असतात.
496-11
जे वेळी हो लागे उत्पत्ती । ते वेळी स्थिति प्रळयो हारपती । आणि स्थितिकाळी न मिरविती । उत्पत्ति प्रळयो ॥496॥
जेव्हा विश्वाची उत्पत्ति होऊ लागते, तेव्हा स्थिती व प्रलय राहत नाहीत आणि स्थिती काळी उत्पत्ति प्रलय दिसत नाहीत.
467-11
पाठी प्रळयाचिये वेळे । उत्पत्ति स्थिति मावळे । हे कायसेनही न ढळे । अनादि ऐसे ॥497॥
नंतर प्रलयाचे वेळी उत्पत्ति स्थिति नसतात. हा प्रवाह अनादि असून, तो कधींहि बदलत नाही.
498-11
म्हणौनि आजि तव भरे भोगे । स्थिति वर्तिजत आहे जगे । एथ ग्रसिसी तू हे न लगे । माझ्या जीवी ॥498॥
म्हणून आज हे सर्व भोगाने संपन्न असलेले जग स्थिति अवस्थेत आहे. अशा स्थितीत तू ग्रासतोस हे म्हणणे माझ्या मनाला पटत नाही.
499-11
तव संकेते देव बोले । अगा या दोन्ही सैन्यांसीचि मरण पुरले । ते प्रत्यक्षचि तुज दाविले । येर यथाकाळे जाण ॥499॥
तेव्हा भगवान म्हणाले बा अर्जुना ! संकेतदृष्टिने पाहता या दोन्ही सैन्याचा माझा पालनकाल संपला आहे हे तुला मी प्रत्यक्षच दाखवीलें. बाकी प्रत्यक्ष संहार कालानुसारच होणार, हे जाण.
500-11
हा संकेतु जव अनंता । वेळु लागला बोलता । तव अर्जुने लोकु मागुता । देखिला यथास्थिति ॥500॥
हा संकेत सांगत असतांना जो थोडा वेळ लागला, तितक्या वेळांत, पूर्वी लोक जशा स्थितीत होते तशा स्थितींतच, अर्जुनाने सर्व लोक पाहिले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १४६ वा, २६, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १७४१ ते १७५२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. १७४१
असो खळ ऐसे फार । आम्हा त्यांचे उपकार ॥१॥
करिती पातकांची धुनी । मोल न घेता साबनी ॥धृपद॥
फुकाचे मजुर । ओझे वागविती भार ॥२॥
पार उतरुन म्हणे तुका । आम्हा आपण जाती नरका ॥३॥
अर्थ
जगामध्ये खल दुष्ट व्यक्ती फार आहेत ते असू दयावे असायलाच पाहिजेत कारण त्यांचे तर खरे आमच्यावर उपकार आहेत. कारण या दुष्ट लोकांनी कोणत्याही प्रकारचे मोल न घेता कोणत्याही प्रकारचे साबण न घेता आमची निंदा करुन आमचे सर्व पातक धुवून टाकले आहेत. संत सज्जनांची निंदा करुन संत सज्जनाकडून चुकून झालेल्या पातकांचे ओझे हे दुष्ट आपल्या पाठीवर वाहातात कारण दुष्ट लोक म्हणजे फुकटचे मजूर आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “हे दुष्ट लोक आमची निंदा करुन आम्हाला भवनदीच्या पार उतरुन देतात परंतू ते मात्र स्वत: नरकाला जातात. ”
अभंग क्र. १७४२
संत पंढरीस जाती । निरोप धाडी तया हाती ॥१॥
माझा न पडावा विसर । तुका विनवितो किंकर ॥धृपद॥
केरसुणी महाद्वारी । ते मी असे निरंतरी ॥२॥
तुमचे पायी पायतान । मोचे माझे तन मन ॥३॥
तांबुलाची पिकधरणी । ते मी असे मुख पसरूनि ॥४॥
तुमची इष्टा पंढरीराया । ते सारसुबी माझी काया ॥५॥
लागती पादुका । ते मी तळील मृत्तिका ॥६॥
तुका म्हणे पंढरिनाथा । दुजे न धरावे सर्वथा ॥७॥
अर्थ
जे संत पंढरीला जात आहेत त्यांच्या हाती मी माझा निरोप पाडूरंगाला पाठवित आहे. ती विनंती म्हणजे अशी की, हे देवा मी तुकाराम तुमचा अनन्यसेवक आहे तरी तुम्हाला माझा विसर पडू देवू नये. देवा तुमच्या महाद्वारामध्ये जी निरंतर केरसुणी आहे ती मीच आहे असे तुम्ही समजावे. देवा तुमच्या पायातील पायताण म्हणजे माझे शरीर आणि माझे मन आहे. देवा तुम्ही जो विडा खाऊन ज्या पीकदाणीत थुंकणार आहात तेथे मी माझे मुख पसरुन बसतो मग तुम्ही त्यालाच पीकदाणी समजा. देवा हे पंढरीराया तुमची विष्ठा म्हणजे माझ्या शरीराला चंदनलेपच आहे व तेच लेप मी माझ्या शरीराला लावीन. देवा तुमचे पाय जेथून जातात तेथे तुमच्या पादुकाच्या तळाखाली जी माती लागते ती माती म्हणजे मीच आहे असे तुम्हाला वाटू दया. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पंढरीनाथा मला तुमच्यापेक्षा वेगळे कधीही समजू नका. ”
अभंग क्र. १७४३
इच्छेचे पाहिले । डोळी अंती मोकलिले ॥१॥
यांचा विश्वास तो काई । ऐसे विचारूनि पाही ॥धृपद॥
सुगंध अभ्यंगे पाळिता । केश फिरले जाणता ॥२॥
पिंड पाळिता ओसरे । अवघी घेऊनि मागे सरे ॥३॥
करिता उपचार । कोणा नाही उपकार ॥४॥
अल्प जीवन करी । तुका म्हणे साधे हरी ॥५॥
अर्थ
माझ्या डोळयांनी आजपर्यंत इच्छेप्रमाणे पुष्कळ खूप पदार्थ पाहिले परंतू माझ्या डोळयांनी मला आता सोडले. मग याचाच तुम्ही विचार करुन पहा या इंद्रियांवर कसा विश्वास ठेवावा ? आपण आपल्या केसांना आजपर्यंत सुगंधी साबणाने अभ्यंग स्नानाने आंघोळ घालून पाळत आलो परंतू शेवटी शेवटी ते केस पाढरे झाले. या देहाला आतापर्यंत आपण खूप पाळले पोसले त्याचे खूप लाड केले परंतू आता त्याने या मृत्यूलोकातून माघार घेतली आहे. या शरीराला आपण आतापर्यंत खूप प्रकारचे उपचार खूप प्रकारचे भोग भोगायला दिले परंतू तरीही त्या शरीराला त्याचे उपकार नाही व शेवटी ते आपल्याला सोडून देतात. तुकाराम महाराज म्हणतात, “आपल्याला जीवन फार थोडे आहे तरी या जन्मातील जो मुख्य प्राप्ती करण्याचे म्हणजे ज्याची मुख्यत्वाने प्राप्ती करुन घ्यायची आहे तो हरी प्राप्त करुन घ्यावा. ”
अभंग क्र. १७४४
यज्ञनिमित्त ते शरिरासी बंधन । का रे तृष्णा वायाविण वाढविली ॥१॥
नव्हे ते भक्ती परलोकसाधन । विषयांनी बंधन केले तुज ॥धृपद॥
आशा धरूनि फळाची । तीर्थी व्रती मुक्ती कैंचि ॥२॥
तुका म्हणे सिणसी वाया । शरण न वजता पंढरिराया ॥३॥
अर्थ
अरे यज्ञादी कर्मे करुन पुन्हा शरीरच प्राप्त होते मग तू विनाकारणच भोग तृष्णा का बरे वाढवतोस ? अरे हे साधन म्हणजे हे यज्त्रयादी कर्मे म्हणजे परलोकीचे साधन नाही त्यामुळे तुला हरीभक्ती करता येत नाही खरे तर ते कर्म तुला विषयात बांधून टाकतात. फळाची अपेक्षा धरुन तू जर तीर्थ व्रत केले तर तुला मुक्ती कशी प्राप्त होईल ? तुकाराम महाराज म्हणतात, “अरे तू फक्त पंढरीरायाला शरण जा इतर व्यर्थ कर्म करुन का श्रम करुन घेतोस ? ”
अभंग क्र. १७४५
संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान । अवघे जोडे नाम उच्चारिता ।
न वेचे मोल काही लागती न सायास । तरी का आळस करिसी झणी ॥१॥
ऐसे हे सार का नेघेसी फुकाचे । काय तुझे वेचे मोल तया ॥धृपद॥
पुत्रस्नेहे शोक करी अजामेळ । तव तो कृपाळ जवळी उभा ।
अनाथांच्या नाथे घातला विमानी । नेला उचलूनि परलोका ॥२॥
अंतकाळ गणिका पक्षियाच्या छंदे । राम राम पद उच्चारिले ।
तव त्या दिनानाथा कृपा आली कैसी । त्याने तियेसी वैकुंठासी नेले ॥३॥
अवचिता नाम आलिया हे गती । चिंतिता चित्ती जवळी असे ।
तुका म्हणे भावे स्मरा राम राम । कोण जाणे तये देशे ॥४॥
अर्थ
हरीचे नाम श्रध्दायुक्त भक्तीभावाने उच्चार केले तर सर्व प्रकारचे संध्या कर्म, ध्यान, जप, तप, अनुष्ठान केल्यासारखेच होते. अरे असे हरीनाम उच्चारण्याकरता कोणत्याही प्रकारचे मोल लागत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे कष्ट लागत नाही असे असून देखील तू हरीनाम घेण्यास आळस का करत आहेस. अरे मग हे असे सर्व साराचेही सार फुकटचे हरीनाम तू का घेत नाहीस हे हरीनाम घेण्याकरता तुला काही मोल दयावे लागणार आहे काय ? अजामिळ सारखा पापी अंत:काळी पुत्रमोहाने केवळ नारायण नाम उच्चारण केल्यामुळे तो कृपाळू हरी त्याच्याजवळ त्याच्या मदतीला येऊन उभा राहीला. आणि मग अनाथाचा नाथ जो हरी त्याने त्या अजामिळाला आपल्या विमानात घेतले आणि त्याला परलोकी घेऊन गेला. गणिका नावाची वेश्या तिला पोपट पक्षाचा फार छंद होता व तिने आपल्या पोपटाचे नांव “राघोबा” असे ठेवले व अंत:काळी तिने त्या पोपटाच्या छंदाने केवळ राम राम असे नाम उच्चारले. मग त्या दीनानाथ हरीला तिची कशी कृपा आली बघा त्याने लगेच तिला वैकुंठास नेले. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो केवळ अवचित प्रकारे या लोकांनी मोहापायी या हरीचे नाम घेतले तरीही त्यांचा या हरीने उध्दार केला मग खरोखर श्रध्दायुक्त चित्तामध्ये जर हरीचे चिंतन केले तर हा हरी नेहमी आपल्याजवळ राहील. जेव्हा श्रध्दायुक्त भक्तीभावपूर्वक जो कोणी रामनाम उच्चारण करेल मग त्याची उच्चपदाची गती कोणाला कळणार आहे ? ”
अभंग क्र. १७४६
दुष्टाचे चिंतन भिन्ने अंतरी । जरी जन्मवरी उपदेशिला ।
पालथे घागरी घातले जीवन । न धरीच जाण ते ही त्याला ॥१॥
जन्मा येउनि तेणे पतनचि साधिले । तमोगुणे व्यापिले जया नरा ।
जळो जळो हे त्याचे ज्यालेपण । कासया हे आले संवसारा ॥धृपद॥
पाषाण जीवनी असता कल्पवरी । पाहाता अंतरी कोरडा तो ।
कुचर मुग नयेचि पाका । पाहाता सारिखा होता तैसा ॥२॥
तुका म्हणे असे उपाय सकळा । न चले या खळा प्रेत्न काही ।
म्हणऊनि संग न करिता भला । धरिता अबोला सर्व हित ॥३॥
अर्थ
दुष्टाला जन्मभर जरी उपदेश केला तरी त्याच्या अंतरंगात वेगळेच चिंतन चालू असते. पालथ्या घागरीवर कितीही पाणी घातले तरी ती घागर कधीच भरणार नाही त्याप्रमाणे या दुष्टाला कितीही उपदेश केला तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. जो मनुष्य जन्माला येऊन केवळ तमोगुणानेच व्यापला आहे त्याने केवळ स्वत:चे पतनच करुन घेतले आहे. अशा मनुष्यांच्या जगण्याला आग लागो हे असे जन्मालाच का बरे आले असतील या संसारातच का बरे आले असतील ? एखादा दगड कल्पांतापर्यंत पाण्यात जरी ठेवला आणि त्याला शेवटी फोडून पाहिले तरीही तो ज्याप्रमाणे कोरडाच असतो. किंवा कुचर मूग स्वयंपाकासाठी घेतला त्याला शिजवले तर तो न शिजता तसाच राहातो. तुकाराम महाराज म्हणतात, “सगळया गोष्टींना उपाय आहेत परंतू दुष्ट लोकांना चांगले करण्याचा प्रयत्न केला तरीही काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे या दुष्टांची संगती न करणे हेच भले आहे आणि यांच्याशी अबोला धरणे यातच आपले सर्व हित आहे. ”
अभंग क्र. १७४७
कासियाने पूजा करू केशीराजा । हाचि संदेह माझा फेडी आता ॥१॥
उदके न्हाणू तरी स्वरूप तुझे । तेथे काय माझे वेचे देवा ॥धृपद॥
गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ । तेथे मी दुर्बळ काय करू ॥२॥
फळदाता तूच तांबूल अक्षता । तेथे काय आता वाहो तुज ॥३॥
वाहू दक्षिणा तरी धातु नारायण । ब्रम्ह ते चि अन्न दुजे काई ॥४॥
गाता तू ॐकार टाळी नादेश्वर । नाचावया थार नाही कोठे ॥५॥
तुका म्हणे मज अवघे तुझे नाम । धूप दीप राम कृष्ण हरी ॥६॥
अर्थ
हे केशीराजा मी तुझी पूजा कशाने करु हा माझा संदेह आता तू फेड. तुम्हाला जर पाण्याने स्नान घालावे तर ते तुमचे स्वरुप आहे मग तेथे माझे काय खर्च होणार आहे देवा ? देवा गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ तूच आहेस मग मी दुर्बळाने तुला काय अर्पण करावे ? हे अनंता, फळदाता तूच आहेस तांबूल, अक्षदा तूच निर्माण केलेल्या आहेस मग मी तुला काय वाहू देवा ? देवा तुला दक्षिणा किंवा सुवर्णरुपी धातू वाहावे तर ते तुझेच रुप आहे आणि अन्नरुपी नैवेदय तुला समर्पण करावा तर अन्न म्हणजे ब्रम्ह व ब्रम्ह म्हणजे तेही तूच आहेस. देवा तुला ओंकारस्वरुपाने आळवावा तर ते तूच आहेस आणि टाळी वाजवून तुझे भजन करावे तर सर्व नादाचाही तू नादेश्वर आहेस आणि तुझ्या भजनास नाचावयास कोठे गेले तर सर्व चरचरामध्ये तूच भरुन उरला आहेस त्यामुळे कोठे नाचावा हाही प्रश्नच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता माझ्याजवळ केवळ एकच भांडवल आहे ते म्हणजे तुझे नाम “रामकृष्ण हरी” आता तेच नाम मीधुप दीप म्हणून तुलाच अर्पण करीत आहे. ”
अभंग क्र. १७४८
गाता ऐकता काटाळा जो करी । वास त्या अघोरी कुंभपाकी ॥१॥
रागे यमधर्म जाचविती तया । तु दिले कासया मुख कान ॥धृपद॥
विषयांच्या सुखे अखंड जगासी । न वजे एकादशी जागरणा ॥२॥
वेचूनिया द्रव्य सेवी मद्यपान । नाही दिले अन्न अतीतासी ॥३॥
तीर्थाटण नाही केले उपकार । पाळिले शरीर पुष्ट लोभे ॥४॥
तुका म्हणे मग केला साहे दंड । नाइकती लंड सांगितले ॥५॥
अर्थ
हरीचे कीर्तन भजन करण्यासाठी गाण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी जो कंटाळा करतो तो अघोरी अशा कुंभपाकी नरकामध्ये वास करतो. मग यम त्याच्यावर रागावतो त्याचा छळ करतो आणि त्याला विचारतो अरे नालायका तुला देवाने मुख आणि कान कशासाठी दिले तर केवळ हरीचे गुणगान गाण्यासाठी व ऐकण्यासाठीच. विषयाच्या सुखाकरता तू अखंडपणे जागतोस परंतू कधी एकादशीच्या दिवशी हरी जागरण करण्यासाठी तू कधीही जागला नाहीस. अरे तू पैसे कमवून केवळ मद्यपान सेवन केलेस परंतू घरी आलेल्या देवरुपी अतिथ्याला कधीही अन्नदान केले नाहीस. तू केव्हाही तीर्थाटन केले नाहीस केव्हाही कोणावरही परोपकार केले नाहीस केवळ शरीराच्या लोभाने तू निषिध्द अन्न खावून त्याला पाळले आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा निर्लज्ज लोकांना संतांनी कितीही चांगले वचने सांगितले तरीही ते ऐकत नाहीत मग पुढे यांना यमाने केलेला दंड सहन करावा लागतो. ”
अभंग क्र. १७४९
तुझे म्हणविता काय नास जाला । ऐके बा विठ्ठला कीर्ती तुझी ॥१॥
परी तुज नाही आमचे उपकार । नामरूपा थार केलियाचे ॥धृपद॥
समूळी संसार केला देशधडी । सांडिली आवडी ममतेची ॥२॥
लोभ दंभ काम क्रोध अहंकार । यांसी नाही थार ऐसे केले ॥३॥
मृत्तिका पाषाण तैसे केले धन । आपले ते कोण पर नेणो ॥४॥
तुका म्हणे जालो देहासी उदार । आणीक विचार काय तेथे ॥५॥
अर्थ
अरे विठ्ठला आम्ही स्वत:ला तुझे म्हणवून घेतले त्यामुळे आमचा काय नाश झाला काय तुझी किर्ती तेवढी ऐक. देवा तू पहिला निर्गुण होतास परंतू आम्ही तुझी भक्ती करुन तुला नामरुपाला आणले परंतू तुला आता आमचे उपकार राहिलेच नाहीत. आम्ही तुझ्यासाठी संसार समूळ देशोधडीला पाठवून दिला आणि त्यामधील आवड ममता सर्व टाकून दिली. अरे आम्ही आमच्या अंत:करणामध्ये लोभ, दंभ, काम, क्रोध, अहंकार याचा भारच राहाणार नाही असे केले. जशी माती पाषाण आहे तसेच आम्ही धन मानले आहे आणि आपले कोण आणि परके कोण हा भेदभावच आम्ही जाणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आम्ही तुझी प्राप्तीसाठी आमच्या देहावर उदार झालो मग याच्यापेक्षा आणखी दुसरा कोणता विचार केला पाहिजे ? ”
अभंग क्र. १७५०
जाऊनिया तीर्था काय तुवा केले । चर्म प्रक्षाळिले वरी वरी ॥१॥
अंतरीचे शुद्ध कासयाने जाले । भूषण तो केले आपणया ॥धृपद॥
वृंदावन फळ घोळले साकरा । भीतरील थारा मोडेचि ना ॥२॥
तुका म्हणे नाही शांति क्षमा दया । तोवरी कसाय फुंदा तुम्ही ॥३॥
अर्थ
अरे तू तीर्थयात्रेला जाऊन विशेष कार्य काय केले आहेस केवळ पवित्र नद्यांमध्ये स्नान करून वर वर देहाची कातडी धुतली. अरे पण तुझे अंतकरण अजुन शुद्ध कुठे झाले ? केवळ स्वतःकरता तीर्थयात्रा केली व याचे भूषण तू प्राप्त केले आहे. कडू वृंदावन फळ कितीही साखरेत घोळले तरी त्याच्या आतील कडूपणा केव्हाच जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात तीर्थयात्रा केल्याची व्यर्थ बडबड का करता जोपर्यंत तुमच्या अंतकरणात शांति, क्षमा, दया येत नाही तोपर्यंत याचा काहीच उपयोग होणार नाही.
अभंग क्र. १७५१
बैसोनि निवांत शुद्ध करी चित्त । तया सुखा अंतपार नाही ॥१॥
येऊनि अंतरी राहील गोपाळ । सायासाचे फळ बैसलिया ॥धृपद॥
राम कृष्ण हरी मुकुंद मुरारि । मंत्र हा उच्चारी वेळोवेळा ॥२॥
तुका म्हणे ऐसे देईन मी दिव्य । जरी होईल भाव एकविध ॥३॥
अर्थ
अरे तुम्ही एकातात बसुन प्रथम चित्त शुद्ध करा आणि ज्या वेळेस तुमचे चित्त शुद्ध होईल मग त्या सुखाला अंतपार नाही. एकदा की तुमचे अंतकरण शुद्ध झाले मग तो गोपाळ तुमच्या अंतकरणात येऊन राहिल आणि कष्टाने जे फळ प्राप्त होणार आहे ते फळ तुम्हाला बसल्या जागीच प्राप्त होईल. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी या मंत्राचा चा उच्चार तु वेळोवेळी करत राहा. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या मनामध्ये हरी विषयी एकनिष्ठ भक्ती भाव जर होईल तर मग मी तुला दिव्य प्रकारच्या अनुभवाचा साक्षात्कार घडुन देईल.
अभंग क्र. १७५२
धन्य पुंडलिका बहु बरे केले । निधान आणिले पंढरिये ॥१॥
न करी आळस आलिया संसारी । पाहे पा पंढरी भूवैकुंठ ॥धृपद॥
न पवीजे केल्या तपाचिया रासी । ते जनलोकासी दाखविले ॥२॥
सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव । शास्त्रांनी हा भाव निवडिला ॥३॥
विष्णुपद गया रामनाम काशी । अवघी पायापाशी विठोबाच्या ॥४॥
तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस । तात्काळ या नाश अहंकाराचा ॥५॥
अर्थ
हे पुंडलिका तु धन्य आहेस तु एक फार चांगले काम केले आहे ते म्हणजे विठ्ठल रुपी निधान तु पंढरपुला आणले आहेस. अरे मानवा तू या संसारात जन्माला आला आहेस त्यामुळे तु आळस करू नकोस तु भूवैकुंठ अशा पंढरीचे दर्शन नक्की घे. तपाच्या राशी करून देखील जे ब्रम्ह प्राप्त होत नाही ते ब्रम्ह या पुंडलिकाने सामान्य जन लोकांना दाखवले आहे. जिथे तीर्थक्षेत्र, देव एकत्र असतात ते स्थान प्रवित्र आहे. विष्णुपद, गया, रामनाम आणि काशी ही सर्व विठुरायाच्या पायापाशी आहेत. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या श्रद्धावान भक्ताने विठोबाच्या राऊळाचा कळस जरी पाहिला तरी त्याचा तत्काळ अहंकार नाश पावतो व त्याला मोक्ष प्राप्त होते.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















