१ मार्च, दिवस ६० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी १५१ ते १७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ७०९ ते ७२०

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१ मार्च” दिवस ६० वा, सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 1 March
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक 1 मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ७०९ ते ७२० चे पारायण आपण करणार आहोत.


1 मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी 151 ते 175,

151-6
म्हणे जे जे हा अधिष्ठील । ते आरंभीच यया फळेल । म्हणौनि सांगितला न वचेल । अभ्यासु वाया ॥151॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हा अर्जुन ज्या ज्या साधनांचे आचरण करेल, ते ते साधन त्याला प्रारंभी फळ देईल; म्हणून याला सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही.
152-6
ऐसे विवरोनिया श्रीहरी । म्हणितले तिये अवसरी । अर्जुना हा अवधारी । पंथराजु ॥152॥
असा विचार करून त्या वेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! तुला आता योगमार्ग सांगणार आहे. तो सर्व मार्गांचा राजमार्ग आहे, त्याचे तू श्रवण कर.
153-6
तेथ प्रवृत्तितरुच्या बुडी । दिसती निवृत्तिफळाचिया कोडी । जिये मार्गीचा कापडी । महेशु आझुनि ॥153॥
या मार्गामध्ये प्रवृत्तीरूप झाडाच्या बुडलाच निवृत्तीरूप कोट्यवधी मोक्षफळे दृष्टीस पडतात. या मार्गाचे भगवान श्रीशंकर आजही यात्रेकरू आहेत.
154-6
पै योगवृंदे वहिली । आडवी आकाशी निघाली । की तेथ अनुभवाच्या पाउली । धोरणु पडिला ॥154॥
योगीजन प्रारंभी हृदय – आकाशात आडव्या मार्गाने वाटचाल करू लागले. नंतर अनुभवाच्या आधारे त्यांना परब्रम्हप्राप्तीचा मार्ग सुलभ झाला.
155-6
तिही आत्मबोधाचेनि उजुकारे । धाव घेतली एकसरे । की येर सकळ मार्ग निदसुरे । सांडुनिया ॥155॥
तेंव्हा इतर सर्व अज्ञानरुप मार्गाचा त्याग करून योगी पुरुषांनी आत्मबोधाच्या सरळ मार्गाने धाव घेतली.


156-6
पाठी महर्षी येणे आले । साधकांचे सिध्द जाहाले । आत्मविद थोरावले । येणेचि पंथे ॥156॥
नंतर त्यांच्या मार्गाने महर्षी आले आणि साधकांचे सिद्ध झाले. आत्मज्ञानीसुद्धा याच मार्गाने महान झाले.
157-6
हा मार्गु जै देखिजे । तै तहान भूक विसरिजे । रात्रिदिवसु नेणिजे । वाटे इये ॥157॥
या मार्गाने वाटचाल करताना अनुभव येऊ लागला की, तहान भूक यांची आठवणही होत नाही. या वाटेने चालताना रात्र कळत नाही, दिवस कळत नाही.
158-6
चालता पाऊल जेथ पडे । तेथ अपवर्गाची खाणी उघडे । आव्हाटलिया तरी जोडे । स्वर्गसुख ॥158॥
या मार्गाने चालताना जेथे पाऊल पडेल, तेथे मोक्षाची खाणच उघडते. कदाचित आडमार्गाने जरी पाऊल पडले, तरी स्वर्गसुख लाभते.
159-6
निगिजे पूर्वींलिया मोहरा । की येइजे पश्चिमेचिया घरा । निश्चळपणे धनुर्धरा । चालणे येथिंचे ॥159॥
पूर्व दिशेच्या मार्गाने चालावे आणि पश्चिम दिशेच्या घरात यावे, असे आहे. हे धनुर्धर ! मन स्थिर ठेवणे, हेच या मार्गाचे चालणे आहे.
160-6
येणे मार्गे जया ठाया जाइजे । तो गावो आपणचि होइजे । हे सांगो काय सहजे । जाणसी तू ॥160॥
या मार्गाने ज्या ठिकाणी जावयाचे, तो इश्वररूपी गाव आपणच होतो, हे काय सांगावे ? पुढे तुला ते सहजच कळेल.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


161-6
तेथ म्हणितले देवा । तरी तेचि मग केव्हा । का आर्तीसमुद्रौनि न काढावा । बुडतु जी मी ॥161॥
तेंव्हा अर्जुन म्हणाला, हे देवा ! असे जर आहे, तर तू योगमार्ग केंव्हा सांगणार ? मी उत्सुकतेचा सागरात बुडत असताना तुम्ही मला बाहेर काढू नये काय ?
162-6
तव श्रीकृष्ण म्हणती ऐसे । हे उत्संखळ बोलणे कायसे । आम्ही सांगतसो आपैसे । वरि पुशिले तुवा ॥162॥
तेंव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, असे उतावीळपणाचे बोलणे कशासाठी ? आम्ही आपणहुन सांगत आहोत, त्याशिवाय तुही विचारले आहेस.

शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः ।
नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ॥6. 11॥
भावार्थ :-

शुद्धस्थानी, अति उंच नाही, अति सखल नाही असे, दर्भावर मृगदिकांचे चर्म व त्यांवर वस्त्र ठेवलेले, असे आपले स्थिर आसन स्थापन करून,
163-6
तरी विशेषे आताचि बोलिजेल । परि ते अनुभवे उपेगा जाईल । म्हणौनि तैसे एक लागेल । स्थान पहावे ॥163॥
तरी आत्ताच तुला सविस्तर सांगण्यात येईल, प्रत्येक्ष साधना करून अनुभव घेतला, तर उपयोगी होईल. यासाठी साधनेला योग्य असे स्थान पाहणे आवश्यक आहे.
164-6
जेथ आराणुकेचेनि कोडे । बैसलिया उठो नावडे । वैराग्यासी दुणीव चढे । देखलिया जे ॥164॥
ज्या पवित्र स्थानावर सुख – शांती मिळविण्यासाठी बसल्यानंतर तेथून उठावेसे वाटू नये आणि ते स्थान पाहताक्षणी वैराग्य दुप्पट वाढावे.


165-6
जो संती वसविला ठावो । संतोषासि सावावो । मना होय उत्सावो । धैर्याचा ॥165॥
जेथे संतांनी वास्तव्य केले आहे, जेथे संतोष वाढण्यास मदत होते, जेथे मनाला धैर्याचा उत्साह प्राप्त होतो,
166-6
अभ्यासुचि आपणयाते करी । हृदयाते अनुभव वरि । ऐसी रम्यपणाची थोरी । अखंड जेथ ॥166॥
जेथील पवित्र वातावरण आपणाकडून साधना करून घेते, अनुभव हृदयाला माळ घालतो, अशी रम्यपणाची थोरवी ज्या ठिकाणी अखंड आहे.
167-6
जया आड जाता पार्था । तपश्चर्या मनोरथा । पाखांडियाही आस्था । समूळ होय ॥167॥
हे अर्जुना ! ज्या स्थानाजवळ सहज जरी गेला असता, नास्तिकालादेखील तपश्चर्या करावी, अशी मनापासून आस्था वाटते.
168-6
स्वभावे वाटे येता । जरी वरपडा जाहला अवचिता । तरी सकामुही परि माघौता । निघो विसरे ॥168॥
सहज वाटेने येत असता जर कोणी अकस्मात त्याठिकाणी (रमणीय ठिकाणी) आला व तो जरी विषयासक्त असला, तरीहि तो परत फिरण्याचे विसरतो.
169-6
ऐसेनि न राहतयाते राहावी । भ्रमतयाते बैसवी । थापटुनि चेववी । विरक्तीते ॥169॥
असे पवित्र रमणीय स्थान न राहणाऱ्यास देखील राहावयास लावते, भटकंती करणाऱ्यास एके ठिकाणी बसवते आणि वैराग्याला थापटी मारून जागृत करते.
170-6
हे राज्य वर सांडिजे । मग निवांता एथ ेचि असिजे । ऐसे शृंगारियांहि उपजे । देखतखेवो ॥170॥
हे पवित्र रमणीय स्थान पाहिल्यावर आपल्या राज्याचा त्याग करावा, येथे निवांत राहावे, असे श्रुंगारप्रिय विलासी राजालादेखील वाटावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


171-6
जे येणे माने बरवंट । आणि तैसेच अतिचोखट । जेथ अधिष्ठान प्रगट । डोळा दिसे ॥171॥
जे स्थान इतके सुंदर आणि तसेच अतिशय पवित्र असून जेथे डोळ्याला ब्रम्ह स्पष्ट दिसते;
172-6
आणिकही एक पहावे । साधकी वसते होआवे । आणि जनाचेनि पायरवे । रुळेचिना ॥172॥
या स्थानाचे आणखी एक लक्षण पाहावे. त्या स्थानी साधकाने साधना केलेली असावी. फक्त प्रपंचात रममाण झालेल्या लोकांची येथे ये-जा नसावी.
173-6
जेथ अमृताचेनि पाडे । मुळेहीसकट गोडे । जोडती दाटे झाडे । सदा फळती ॥173॥
या स्थानात अमृतासमान मुळासह गोड असणारी फळे देणारी दाट झाडे पसरलेली आहेत.
174-6
पाउला पाउला उदके । वर्षाकाळेही अतिचोखे । निर्झरे का विशेखे । सुलभे जेथ ॥174॥
या स्थानात पावला-पावलावर जल आहे. ते पावसाळ्यात देखील शुद्ध असते, असे शुद्ध पाण्याचे झरे, विशेष करून पाणी काढण्यास सुलभ असावेत.
175-6
हा आतपुही अळुमाळु । जाणिजे तरी शीतळु । पवन अति निश्चळु । मंद झुळके ॥175॥
जेथे सूर्याचे उनदेखील शीतल, सौम्य असावे, कदाचित स्वच्छ ऊन पडले, तरी त्यापासून ताप होऊ नये. वारादेखील शांत असून मंद झुळका असाव्यात.

दिवस ६० वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ७०९ ते ७२०
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. ७०९
बोलिलेचि बोले पडपडताळूनि । उपजत मनी नाही शंका ॥१॥
बहुतांची माय बहुत कृपाळ । साहोनि कोल्हाळ बुझाविसी ॥धृपद॥
बहुतांच्या भावे वाटिसी भातुके । बहु कवतुके खेळविसी ॥२॥
तुका म्हणे ऐसे जाणतसो वर्म । करणे तो श्रम न वजे वाया ॥३
अर्थ

देवाविषयी आत्तापर्यंत मी जे काही बोल बोललो आहे जे काही सांगितले आहे, ते बोल पडताळून पाहिले आता माझ्या मनात कोणतीच शंका राहिली नाही. हे भगवंता तू अनेकांची माय म्हणजे आई आहेस तू कृपाळू आहेस भक्तांच्या मागण्याची कटकट सहन करून तू त्याची आस पुरवितो. तू बहुतांच्या मनातील जाणून त्यांचा भाव जाणून त्यांना तू मोक्ष देतोस. आणि त्यांच्या संगे तू कवतुकाने खेळतोस. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला तुझे हे वर्म ठाऊक आहे, त्यासाठी आम्ही पाहिजे ते श्रम घेऊ आम्हाला माहित आहे कि ते श्रम वाया जाणार नाही.
अभंग क्र. ७१०
कोठे भोग उरला आता । आठविता तुज मज ॥१॥
आड काही नये दुजे । फळ बीजे आणिले ॥धृपद॥
उद्वेग ते वायाविण । कैचा सीण चिंतने ॥२॥
तुका म्हणे गेला भ्रम । तुमच्या धर्म पायाचा ॥३॥
अर्थ

हे देवा तुझे स्मरण केल्यावर आता माझ्या प्रारब्धाचा भोग कोठे उरेल ? तुझ्या आणि माझ्या मध्ये आता काहीच येणार नाही कारण नामस्मरणाचे बीज चांगल्या प्रकारे फळास आले आहे. तुझ्या चिंतनाने मनातील सारा उद्वेग नाहीसा होऊन गेला. तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या पावन चरणाने माझा सारा भ्रम नाहीसा झाला आहे.
अभंग क्र. ७११
संसार तो कोण लेखे । आम्हा सखे हरीजन ॥१॥
काळ ब्रह्मानंदे सरे । आवडी उरे संचली ॥धृपद॥
स्वप्नी ते ही नाही चिंता । रात्री जाता दिवस ॥२॥
तुका म्हणे ब्रम्हरसे । होय सरिसे भोजन ॥३॥
अर्थ

आम्हाला हरिजना सारखे सखे आहेत, म्हणून संसाराकडे कोण लक्ष देतो ? आमचा संपूर्ण काळ हा ब्रम्हानंदात जात आहे, त्यामुळे आमच्या हृदयात हरी भक्तीची आवड पूर्ण पणे भरली आहे. स्वप्नातही आम्हाला कसल्याही प्रकारची चिंता नाही. रात्रंदिवस आम्ही सुखी समाधानी आहो. तुकाराम महाराज म्हणतात या हरी भक्तांच्या संगतीने आम्हाला ब्रम्हा रसाचे भोजन दररोज मिळत आहे.
अभंग क्र. ७१२
येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला । प्राण हा फुटला आळविता ॥१॥
पडियेलो वनी थोर चिंतवनी । उशीर का अझूनि लावियेला ॥धृपद॥
काय तुज नाही लौकिकाची शंका । आपुल्या बाळका मोकलिता ॥२॥
तुका म्हणे बहु खंती वाटे जीवा । धरियेले देवा दुरी दिसे ॥३॥
अर्थ

हे विठ्ठला तू लवकर ये लवकर ये, तुला आळवताना माझा हा प्राण फुटू पाहत आहे म्हणजे प्राण शरीरातून निघू पाहत आहे. मी मोठ्या संसाररूपी अरण्यात पडलो आहे, तू लवकर ये अजून का उशीर तू लावतोस. तुला या लौकिकाची शंका येत नाही का, आपल्या बालकाला सोडून देताना ? तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तू आम्हाला तुझ्या पासून फार दूर ठेवले आहे यांची खंत आम्हाला वाटत आहे.
अभंग क्र. ७१३
आपुले गावीचे न देखेसे जाले । परदेसी एकले किती कंठू ॥१॥
म्हणऊनि पाहे मूळ येता वाटे । जीवलग भेटे कोणी तरी ॥धृपद॥
पाहाता अवघ्या दिसतील दिशा । सकळ ही वोसा दृष्टीपुढे ॥२॥
तुका म्हणे कोणी न सांगे वारता । तुझी वाटे चिंता पांडुरंगा ॥३॥
अर्थ
या प्रदेशात (पृथ्वीवर) आपल्या गावाचे (पंढरी क्षेत्रातील वैष्णव) कोणीही मला न दिसेसे झाले, त्यामुळे मी या प्रदेशात एकट्याने किती दिवस काढू ? देवा मला तुमचे प्रेमाचे बोलावणे केंव्हा येईल असे झाले आहे. येथे कोणी तरी प्रेमाचा जिवलग भेटेल अशी आशा आहे. मी आता पाहले आहे की, या साऱ्यादिशा ओस पडल्या आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा मला तुझी वार्ता कोणीही सांगत नाही त्यामुळे मला तुझी चिंता वाटत आहे.
अभंग क्र. ७१४
जन तरी देखे गुंतले प्रपंचे । स्मरण ते त्याचे त्यासी नाही ॥१॥
म्हणऊनि मागे परतले मन । घालणीचे रान देखोनिया ॥धृपद॥
इंद्रियांचा गाजे गोंधळ ये ठायी । फोडीतसे डोई अहंकार ॥२॥
तुका म्हणे देवा वासनेच्या आटे । केली तळपटे बहुतांची ॥३॥
अर्थ

हे सारे लोक प्रपंचाच्या भोवऱ्यात गुंतले आहेत, हरी भजन करावे याचे देखील त्यांना स्मरण नाही. या संसारात मोठे दुख आहे हे ओळखले आहे म्हणून या संसाररूपी वनातून माझे मन बाहेर काढले आहे ते पुन्हा या संसारात पडणार नाही. या प्रपंचात इंद्रीयांपासून सुख मिळते हा गोंधळ आहे. अहंकार हा सर्वाचे डोके फोड करत आहे. तुकाराम महाराज म्हणतात वासंनाच्यामुळे बऱ्याच जणांचा नाश झाला आहे.
अभंग क्र. ७१५
धावे त्यासी फावे । दुजे उगवूनि गोवे ॥१॥
घ्यावे भरूनिया घर । मग नाही येरझार ॥धृपद॥
धणी उभे केले । पुंडलिके या उगले ॥२॥
तुका म्हणे ठसा । गेला पडोनिया ऐसा ॥३॥
अर्थ

सर्व द्वैत जाणून जो हरी कडे धाव घेतो तोच मोक्षाचा अधिकारी. आपल्या अंतःकरणरुपी घर देवाच्या प्रेमाने परिपूर्ण भरावे, म्हणजे जन्म मरणाची चिंता येर झाराची चिंताच राहणार नाही. प्रेमानेच जगाच्या मालकाला पुंडलीकाने याठिकाणी विटेवर उभे केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात असा उमटला आहे कि तो संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.
अभंग क्र. ७१६
लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥धृपद॥
ज्याचे अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥२॥
तुका म्हणे जाण । व्हावे लहनाहुनि लहान ॥३॥
अर्थ

हे देवा तू मला लहान पण म्हणजे मला उच्च पद किंवा मोठेपणा ते काही देऊ नकोस. मुंगी लहान असल्यामुळे तिला साखर खायला मिळते. क्षीरसागरात निघालेला ऐरावत हा हत्ती एक थोर रत्न आहे पण त्याला देखिल अंकुशाचा मार खावा लागतो. ज्याचा अंगात मोठेपण आहे त्यांना यातना हि तेवढ्याच मोठ्या असतात. तुकाराम महाराज म्हणतात हे सर्व जाणून घेऊन आपण लहानाहुनही लहान व्हावे.
अभंग क्र. ७१७
नीचपण बरवे देवा । न चले कोणाचाही दावा ॥१॥
महा पुरे झाडे जाती । तेथे लव्हाळे राहाती ॥धृपद॥
येता सिंधूच्या लहरी । नम्र होता जाती वरी ॥२॥
तुका म्हणे कळ । पाय धरिल्या न चले बळ ॥३॥
अर्थ

नीचपण म्हणजे सामान्यपण हेच बरे आहे देवा, कारण त्याच्या कडे कोणीही महत्वाने पाहत नाही किंवा त्याच्या कडे कोणी हि अपेक्षा करत नाही या कारणाने त्याचा कोणाला रागी येत नाही व त्याचे कोणी वैरही धरीत नाही. महापूर जरी आला तर त्या महापुरात मोठ मोठे झाड वाहून जातात, पण अतिशय लहान असलेले लव्हाळे तसेच राहतात कारण ते पाण्यासमोर वाकतात. समुद्रात पोहताना मोठी लाट आल्यावर जो नम्र होतो म्हणजे खाली वाकतो, त्याच्या पाठीवरून लाट जाते व त्याचे रक्षण होते. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या बलवान व्यक्तीचे पाय जर धरले तरत्यापुढे ते बलवान व्यक्तीचे आपल्यावर मात्र काही चालत नाही.
अभंग क्र. ७१८
उष्ट्या पत्रावळी करूनिया गोळा । दाखविती कळा कवित्वाची ॥१॥
ऐसे जे पातकी ते नरकी पचती । जोवरी भ्रमती चंद्रसूर्य ॥२॥
तुका म्हणे एका नारायणा घ्याई । वरकडा वाही शोक असे ॥३॥
अर्थ

एखाद्याच्या कवितेतील चोरून शब्द गोळा करून ते सादर करून त्याचे अलंकार गोळा करून आपले कव्य आहे असे काही कवी करतात व आपला मोठेपणा सिध्द करण्याचा प्रयत्न करतात. असे हे पातकी कवी जो पर्यंत चंद्र सूर्य आहेत तो पर्यंत नरकात खितपत पडतात. तुकाराम महाराज म्हणतात एका नारायणाचे ध्यान करावे, इतर मार्गाला जर आपण लागलो तर शोक करावा लागेल हे खरे.
अभंग क्र. ७१९
आवडीच्या मते करिती भोजना । भोग नारायणा म्हणती केला ॥१॥
अवघा देव म्हणे वेगळे ते काई । अर्थासाठी डोय फोडू पाहे ॥धृपद॥
लाजे कमंडलु धरिता भोपळा । आणीक थिगळा प्रावरणासी ॥२॥
शाला गडवे धातुद्रव्यइच्छा चित्ती । नैश्वर्य बोलती अवघे मुखे ॥३॥
तुका म्हणे त्यास देवा नाही भेटी । ऐसे कल्पकोटि जन्म घेता ॥४॥
अर्थ

ढोंगी जे साधू असतात ते त्यांच्या आवडीचे इतरांना भोजन करायला लावतात आणि म्हणतात कि, भोजनाचा भोग नारायणाने केला आहे म्हणजे नारायणानेच भोजन सेवन केले आहे. सर्वत्र हरीच आहे असे सांगून थोड्याश्या पैशासाठी एकमेकांचे डोके फोडायला पाहतात. आम्ही साधू आहोत असे सांगणारे लोक हातात कमंडलू अथवा भोपळा धरायला व थिगळ असलेले वस्त्र पाघरण्यास लाजतात. हे सर्व जग मिथ्या आहे असे वर तोंड करून हे ढोंगी लोक सांगतात, मात्र हेच लोक भरजरी कपडे, चांदीचे गडवे आणि धनाची अपेक्षा करतात. तुकाराम महाराज म्हणतात अश्या प्रकारच्या ढोंगी साधूंनी कोट्यावधी जन्म जरी घेतले तरी त्यांना भगवंत प्राप्ती होत नाही.
अभंग क्र. ७२०
म्हणविता हरीदास का रे नाही लाज । दीनासी महाराज म्हणसी हीना ॥१॥
काय ऐसे पोट न भरेसे जाले । हालविसी कुले सभेमाजी ॥२॥
तुका म्हणे पोटे केली विटंबना । दीन जाला जना कीव भाकी ॥३॥
अर्थ

हे ढोंगी माणसा तू स्वतःला हरिदास म्हणवितोस संसारा ने दिन असलेल्या लोकांकडून स्वतःला महाराज म्हणवितोस असे करताना तुला लाज नाही का वाटत ? त्यांच्या पद्धतीने नाचतोस. तुझे पोट भारत नाही, म्हणून तू हे करतोस काय ? तुकाराम महाराज म्हणतात पोट भरण्यासाठी याने स्वतःची विटंबना करून घेतली आहे दिन होऊन तु लोकांना भिक मागत आहे.

मार्च नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading