आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२६ जून, दिवस १७७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ३०१ ते ३२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २११३ ते २१२४
“26 जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 26 June
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक 26 जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २११३ ते २१२४ चे पारायण आपण करणार आहोत.
26 जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ३०१ ते ३२५,
301-13
म्हणौनि मनपण जै मोडे । तै इंद्रिय आधीचि उबडे । सूत्रधारेवीण साइखडे । वावो जैसे ॥13-301॥
म्हणून (ज्यावेळी) मनाचा मनपणा नाहीसा होईल त्यावेळी अगोदरच इंद्रियांची कर्मे रहातात. (म्हणजे इंद्रियांची कर्मे करण्याची शक्ती बंद पडते). ज्याप्रमाणे सुताच्या दोरीने हालणारी बाहुली सूत्रधाराशिवाय व्यर्थ असते
302-13
उगमीचि वाळूनि जाये । ते वोघी कैचे वाहे । जीवु गेलिया आहे । चेष्टा देही ? ॥13-302॥
हे पाणी उगमाच्या ठिकाणीच वाळून गेले आहे ते (नदीच्या) ओघामधे कोठून वाहील ? (शरीरातून) जीव गेल्यानंतर त्या देहाच्या ठिकाणी हालचाल आहे काय ?
303-13
तैसे मन हे पांडवा । मूळ या इंद्रियभावा । हेचि राहटे आघवा । द्वारी इही ॥13-303॥
अर्जुना, त्याप्रमाणे मन हे सर्व या इंद्रियांच्या व्यापारात मूळ आहे व हेच या सर्व इंद्रियांच्या द्वाराने वागत असते.
304-13
परी जिये वेळी जैसे । जे होऊनि आंतु असे । बाहेरी ये तैसे । व्यापाररूपे ॥13-304॥
परंतु ज्यावेळेला जसे ज्या वासनेच्या रूपाने मन आत होऊन असते, तसेच ते इंद्रियांच्या व्यापाररूपाने बाहेर येते.
305-13
यालागी साचोकारे । मनी अहिंसा थांवे थोरे । पिकली द्रुती आदरे । बोभात निघे ॥13-305॥
ज्याप्रमाणे पक्व झालेला सुगंध मोठ्या उत्साहाने गाजावाजा करीत बाहेर येतो, त्याप्रमाणे मनात अहिंसा चांगली बळावली म्हणजे तीच इंद्रियव्यापारातून दिसून येते.
306-13
म्हणौनि इंद्रिये तेचि संपदा । वेचिता ही उदावादा । अहिंसेचा धंदा । करिते आहाती ॥13-306॥
म्हणून (ही सर्व) इंद्रिये (मनात) असलेल्या त्याच अहिंसारूप संपत्तीच्या भांडवलाचा खर्च करीत असतात. (म्हणजे अहिंसेचा इंद्रियाकडून अव्याहत खर्च होऊन सुद्धा अहिंसारूप भांडवल संपत नाही).
307-13
समुद्री दाटे भरिते । तै समुद्रचि भरी तरियाते । तैसे स्वसंपत्ती चित्ते । इंद्रिया केले ॥13-307॥
समुद्रास पूर्ण भरती आली म्हणजे जसा तो समुद्रच आपल्या भरतीच्या पाण्याने खाड्या भरून टाकतो त्याप्रमाणे (चित्तात अहिंसेची दाट भरती झाली म्हणजे) चित्तच या सर्व इंद्रियांना आपल्या अहिंसारूप जलसंपत्तीने भरून टाकते.
308-13
हे बहु असो पंडितु । धरुनि बाळकाचा हातु । वोळी लिही व्यक्तु । आपणचि ॥13-308॥
फार बोलणे राहू दे. पंतोजी आपणच स्पष्ट अक्षरांच्या ओळी लिहितो.
309-13
तैसे दयाळुत्व आपुले । मने हातापाया आणिले । मग तेथ उपजविले । अहिंसेते ॥13-309॥
त्याप्रमाणे मनाने आपले दयालुत्व हातापायास आणिले व मग तेथे (म्हणजे हातापायांचे ठिकाणी) मनानेच अहिंसेला उत्पन्न केले.
310-13
याकारणे किरीटी । इंद्रियांचिया गोठी । मनाचिये राहाटी । रूप केले ॥13-310॥
म्हणून अर्जुना, इंद्रियांच्या अहिंसेच्या वर्णनाने मनाच्याच अहिंसेच्या वागणूकीचे स्पष्ट वर्णन केले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
311-13
ऐसा मने देहे वाचा । सर्व संन्यासु दंडाचा । जाहला ठायी जयाचा । देखशील ॥13-311॥
याप्रमाणे मनाने, देहाने, वाचेने सर्व हिंसेचा त्याग झालेला ज्याच्या ठिकाणी तुला दिसेल
312-13
तो जाण वेल्हाळ । ज्ञानाचे वेळाउळ । हे असो निखळ । ज्ञानचि तो ॥13-312॥
तो पुरुष ज्ञानाचे विस्तृत मंदिर आहे असे समज. हे राहू दे. तो पुरुष म्हणजे केवळ ज्ञानाची मूर्ती होय.
313-13
जे अहिंसा काने ऐकिजे । ग्रंथाधारे निरूपिजे । ते पाहावी हे उपजे । तै तोचि पाहावा ॥13-313॥
जी अहिंसा आपण कानाने ऐकतो अथवा ज्या ग्रंथाचा आधार घेऊन आपण निरूपण (वर्णन) करतो, ती अहिंसा पहावी अशी इच्छा जेव्हा उत्पन्न होईल, तेव्हा त्या पुरुषालाच पहावे.
314-13
ऐसे म्हणितले देवे । ते बोले एके सांगावे । परी फांकला हे उपसाहावे । तुम्ही मज ॥13-314॥
व्याख्यान लांबल्याबद्दल परिहार =
(ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांच्या जवळ परिहार देतात) असे जे देव म्हणाले ते मी वास्तविक एका शब्दाने सांगावे, परंतु माझ्या सांगण्याचा फार विस्तार झाला, याबद्दल मला आपण क्षमा करावी.
315-13
म्हणाल हिरवे चारी गुरू । विसरे मागील मोहर धरू । का वारेलगे पांखिरू । गगनी भरे ॥13-315॥
कदाचित आपण असे म्हणाल की हिरव्या चार्यात (गाय, म्हैस वगैरे) जनावर सुटले असता ते जसे चार्याच्या लोभाने पुन्हा मागे घराच्या वाटेस लागण्याचे विसरते अथवा वार्याच्या वेगाने पक्षी जसा आकाशात आपल्या घरट्यापासून दूर दूर उडत जातो.
316-13
तैसिया प्रेमाचिया स्फूर्ती । फावलिया रसवृत्ती । वाहविला मती । आकळेना ॥13-316॥
त्याप्रमाणे आवडीच्या योगाने स्फुरण येऊन वेगवेगळ्या रसांचा स्वाद मिळाल्याने माझी बुद्धी वहावत गेली, ती आवरत नाही.
317-13
तरि तैसे नोहे अवधारा । कारण असे विस्तारा । एऱ्हवी पद तरी अक्षरा । तिहीचेचि ॥13-317॥
विस्तार का केला ?
तर ऐका, महाराज, तसे नाही विस्तार करण्याला कारण आहे. नाही तर अहिंसा हे पद तीन अक्षरांचेच आहे.
318-13
अहिंसा म्हणता थोडी । परी ते तैचि होय उघडी । जै लोटिजती कोडी । मताचिया ॥13-318॥
अहिंसा म्हणावयास थोडी आहे. परंतु जेव्हा कोट्यवधी मतांचा विचार करून त्यांचे खंडण करावे तेव्हा महाराज ती स्पष्ट होते.
319-13
एऱ्हवी प्राप्ते मतांतरे । थातंबूनि आंगभरे । बोलिजैल ते न सरे । तुम्हापाशी ॥13-319॥
एरवी प्राप्त झालेल्या अन्य मतांचे निरसन न करता अंगच्या जोराने तुमच्या पुढे बोललो तर ते चालणार नाही.
320-13
रत्नपारखियांच्या गावी । जाईल गंडकी तरी सोडावी । काश्मीरी न करावी । मिडगण जेवी ॥13-320॥
रत्न पारखणार्या लोकांच्या गावात (गंडकी कसोटीचा शालिग्रामासारखा दगड) रत्न म्हणून विकली जाईल असे वाटत असेल तर ती गाठोड्यातून सोडून बाहेर काढावी व सरस्वतीची स्तुती कितीही केली तरी ती पुरी होणार नाही म्हणून तिची स्तुती करू नये.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
321-13
काइसा वासु कापुरा । मंद जेथ अवधारा । पिठाचा विकरा । तिये साते ? ॥13-321॥
ऐका जेथे (ज्या बाजारात) कापराला वास मंद आहे असे म्हणतात त्या बाजारात (कापूर म्हणून) पिठाची विक्री कशी होईल ?
322-13
म्हणौनि इये सभे । बोलकेपणाचेनि क्षोभे । लाग सरू न लभे । बोला प्रभु ॥13-322॥
म्हणून महाराज या सभेमधे (नुसत्या) बोलकेपणाच्या आवेशाने बोलण्याला जवळीक (पसंती) मिळणार नाही.
323-13
सामान्या आणि विशेषा । सकळै कीजेल देखा । तरी कानाचेया मुखा- । कडे न्याल ना तुम्ही ॥13-323॥
सर्व साधारण अशी अहिंसेची कल्पना व निरनिराळ्या मतांप्रमाणे अहिंसेसंबंधी विशेष कल्पना, यांचा कालवा करून जर मी बोललो तर ते व्याख्यान आपल्या कानाच्या मुखाकडे नेणार नाही.
324-13
शंकेचेनि गदळे । जै शुद्ध प्रमेय मैळे । तै मागुतिया पाउली पळे । अवधान येते ॥13-324॥
शंकारूपी कचर्याने जेव्हा स्वच्छ सिद्धांत मळला जातो, तेव्हा त्या सिद्धांताकडे येत असलेले तुमचे लक्ष मागल्या पाऊलीच पळेल.
325-13
का करूनि बाबुळियेची बुंथी । जळे जिये ठाती । तयांची वास पाहाती । हंसु काई ? ॥13-325॥
किंवा ज्या पाण्यात शेवाळाच्या गुंडाळ्या (दाठ शेवाळें) झाल्या आहेत त्या पाण्याकडे हंस कधी दृष्टी देतात काय ?
दिवस १७७ वा, २६, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २११३ ते २१२४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २११३
का जी वाढविले । न लगता हे उगले ॥१॥
आता मानिता काटाळा । भोवती मिळालिया बाळा ॥धृपद॥
लावूनिया सवे । पळता दिसाल बरवे ॥२॥
तुका म्हणे बापा । येता न कळा चि रूपा ॥३॥
अर्थ
देवा तुम्हाला सगुण रूपाचा खेळ नको होता तर का वाढविला तुमच्या सगुण रुपाच्या मोहाने आम्ही सर्व लहान लहान बाळे तुमच्या भोवती गोळा झालोत आणि तुम्ही आता त्याचा कंटाळा धरता. देवा तुम्ही आम्हाला सगुण रुपाची सवय लावली आणि आता निर्गुण निराकारा कडे पळून जाता, हे तुम्हाला बरे दिसते काय ? तुकाराम महाराज म्हणतात हे बापा तुम्हाला नाम रूपाला येण्याच्या अगोदरच या गोष्टी कळत नव्हत्या काय ?
अभंग क्र. २११४
क्षुधेलिया अन्न । द्यावे पात्र न विचारून ॥१॥
धर्म आहे वर्मा अंगी । कळले पाहिजे प्रसंगी ॥धृपद॥
द्रव्य आणि कन्या । येथे कुळ कर्म शोधण्या ॥२॥
तुका म्हणे पुण्य गाठी । तरिच उचिताची भेटी ॥३॥
अर्थ
भुकेल्या माणसाला अन्न देताना त्याची पात्रता आहे की नाही हे ध्यानात घेऊ नये, त्याची क्षुधा भागून पोटाची आग शांत होईल व त्याचे चित्त समाधानी होईल हे पाहावे. परंतु द्रव्यदान आणि कन्यादान करताना जे समोर येईल त्याला सर्वकाही देणे हे बरोबर नाही, दिलेल्या द्रव्याचा तो गैरवापर करणार नाही किंवा तो त्याचा कसा वापर करेल आणि इतरांना कसा त्याचा फायदा होईल हे लक्षात घ्यावे तसेच कन्यादान करताना देखील वराची सर्व ती माहिती काढावी आणि तिला तो साजेसा आहे की नाही, तिची त्याला हरकत आहे की नाही ह्या सर्व गोष्टी अभ्यासूनच मग हे कार्य करावे. कोणत्या प्रसंगी कसे वागायचे हे खरे धर्म कळल्याचे वर्म आहे, सर्वठिकाणी एकच नियम जोडू नये.
तुकाराम महाराज म्हणतात की त्याप्रमाणेच ज्या व्यक्तीच्या गाठी पुण्य असते, संचित असते त्याचीच शेवटी स्वतःच्या हिताशी गाठ पडते, म्हणजेच मनुष्याच्या अंगी त्यासाठीची असलेली सर्व पात्रता असेल तर त्यावर देवाची कृपा होऊन त्याचा उद्धार होतो अन्यथा नाही.
अभंग क्र. २११५
वेचावे ते जीवे । पूजा घडे ऐशा नावे ॥१॥
बिगारीची ते बिगारी । साक्षी अंतरीचा हरी ॥धृपद॥
फळ बीजाऐसे । कार्यकारणासरिसे ॥२॥
तुका म्हणे मान । लवणासारिखे लवण ॥३॥
अर्थ
देवाला जिव अर्पण करावा हीच खरी देवपूजा आहे. यावाचून सर्व क्रिया म्हणजे बिगारी पणाचे आहे आणि याला साक्ष म्हणजे आपल्या अंतरंगातील हरीच आहे. जसे बीज असेल तसेच फळ असते, जसे कारण असेल तसेच कार्य असते. तुकाराम महाराज म्हणतात मिठाचे खरे स्वरूप म्हणजे खारटपणा आहे आणि त्याचे कार्य खारट असते त्याप्रमाणे मनुष्या तू असे समज जशी पुजा तू करशील तसेच तुला फळ मिळेल.
अभंग क्र. २११६
मज नाही धीर । तुम्ही न करा अंगीकार ॥१॥
ऐसे पडिले विषम । बळी देवाहूनि कर्म ॥धृपद॥
चालो नेणे वाट । केल्या न पवाची बोभाट ॥२॥
वेचो नेणे जीवे । तुका उदास धरिला देवे ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही आज पर्यंत माझा अंगिकार केला नाही त्यामुळे आता मला धीर धरवत नाही. मला एक गोष्ट कळत नाही की देवापेक्षा बलवान माझे संचित कर्म झाले आहे की काय हेच मला समजत नाही. मी या परमार्था च्या मार्गने व्यवस्थित चालू शकत नाही आणि तुमच्या नावाने मोठ्याने आरोळ्या जरी दिल्या तरी तुम्ही माझ्याकडे धाव घेत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवाचा उपयोग देवाच्या कार्यासाठी कसा करावा हेच मला समजत नाही आणि त्यामुळेच देवाने माझ्या विषयी उदासीनता धरली आहे असे मला वाटते आहे.
अभंग क्र. २११७
तळमळी चित्त दर्शनाची आशा । बहु जगदीशा करुणा केली ॥१॥
वचनी च संत पावले स्वरूप । माझे नेदी पाप योगा येऊ ॥धृपद॥
वेठीऐसा करी भक्तीवेवसाय । न पवे चि जीव समाधान ॥२॥
तुका म्हणे कई देसील विसावा । पांडुरंगे धावा घेते मन ॥३॥
अर्थ
हे जगदीशा तुझ्या दर्शनाची आशा माझ्या चित्ता मध्ये खूप आहे त्यामुळेच मी एवढ्या तळमळीने तुला करूणा भाकली आहे. देवा संतांनी करूना वचन तुला भाकली आणि त्यामुळेच ते तुझ्या स्वरूपाला प्राप्त ही झाले परंतु माझे पापच असे आहे की ते तुझ्या स्वरूपाच्या दर्शनाच्या आड येत आहेत. ते तुझ्या स्वरूपाचा दर्शनाचा योग येऊ देत नाहीत. एखादा मजूर जसा फक्त दिवस काढावा त्याप्रमाणे काम करत असतो त्याप्रमाणेच माझी भक्ती चालू आहे आणि या कारणाने माझ्या जीवाला समाधान प्राप्त होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा माझे मन सतत तुझ्याकडे धाव घेत आहे तरी तू याला कधी विश्रांती, शांतता, विसावा देशील ?
अभंग क्र. २११८
हागता ही खोडी । चळण मोडविते काडी ॥१॥
ऐसे अनावर गुण । आवरावे काय ह्मुण ॥धृपद॥
नाही जरी संग । तरी बडबडविती रंग ॥२॥
तुका म्हणे देवा । तुमची न घडे चि सेवा ॥३॥
अर्थ
काही मनुष्यांना शौचाला गेले तरीही शांत बसवत नाही काहीतरी चाळा ती करतच असतात, एखादी काडी हातात घेऊन ते उगीच मोडत बसतात. असे अनेक प्रकारचे दुर्गुण अनेक मनुष्याच्या अंगी आहेत ते किती म्हणून आवरावेत ? एखाद्या मनुष्याबरोबर कोणीही जरी नसले तरी तो त्याच्याच रंगांमध्ये रंगतो आणि स्वतःशी बडबड करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा बसल्या जागी तुमचे नामस्मरण केले तरी एक प्रकारची सेवाच आहे परंतु असे दुर्गुण असल्यामुळे तुमची सेवा घडतच नाही.
अभंग क्र. २११९
देह निरसे तरी । बोलावया नुरे उरी ॥१॥
येर वाचेचे वाग्जाळ । अळंकारापुरते बोल ॥धृपद॥
काचे तरी कढे । जाती ऐसे चित्त ओढे ॥२॥
विष्णुदास तुका । पूर्व धनी जाणे चुका ॥३॥
अर्थ
देहाविषयी अहंकाराचा निरास झाला तर बोलण्यासाठी काही शिल्लक राहत नाही. जर देहाविषयी अहंकार ठेवून ज्ञानाच्या गोष्टी केल्या तर ते केवळ शब्द जाळ आणि शब्दालंकापुर तेच बोल होतात. लोण्याचे कढणे कुठ पर्यंत असते तर केवळ तुप होईपर्यंतच त्याप्रमाणेच काही मनुष्य आपल्या जातीला अनुसरून असणाऱ्या विषयाकडेच ओढ घेत असतात. तात्पर्य असे की लोन्याचे कढणे कुठ पर्यंत केवळ तूप होई पर्यंत त्याप्रमाणे एकदा की या देहातील अभिमान नाहीसा झाला तर आपले चित्त हे जातीकडे व जातीला अनुसरून विषयाकडे कधीही जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी विष्णुदास आहे त्यामुळे माझा धनी तो विठ्ठलच माझ्या सर्व चुका जाणत आहे.
अभंग क्र. २१२०
खोटयाचा विकरा । येथे नव्हे कांच हिरा ॥१॥
काय दावायाचे काम । उगा च वाढवावा श्रम ॥धृपद॥
परीक्षकाविण । मिरवो जाणो ते ते हीण ॥२॥
तुका पाया पडे । वाद पुरे हे झगडे ॥३॥ ॥२॥
अर्थ
आमच्या जवळ खोट्याची विक्री होत नाही जर बाजारात कोणी काच म्हणून हिरा विकण्यास आणला तर त्याची परीक्षा केल्याशिवाय कोणीही तो घेत नाही. तर मग आमच्या पुढे परमार्था विषयी सोंग दाखवण्याचे काय काम आहे आणि उगाचच आमच्यापुढे असे सोंग दाखवून श्रम का वाढवून घ्यावे. परीक्षा केल्याशिवाय कोणताही सामान्य अलंकार जर आपण अंगावर मिरवत बसलो तर ज्याला त्या अलंकारा विषयी ज्ञान असते ते अलंकार त्याच्या नजरेत हिनच असतात. तुकाराम महाराज म्हणतात मी खोटे वागणाऱ्या, सोंग दाखवणाऱ्या लोकांच्या देखील पाया पडतो कारण त्यांच्याशी उगाच वाद आणि त्यांच्याशी उगाचच झगडा करणे नको म्हणून पाया पडून त्यांच्याशी पासून सुटका करून घ्यावी म्हणून.
अभंग क्र. २१२१
पंढरीस घडे अतित्याये मृत्य । तो जाय पतित अधःपाता ॥१॥
दुराचार्या मोक्ष सुखाचे वसति । भोळी बाळमूर्ती पांडुरंग ॥धृपद॥
कालियापे भेद मानिता निवडे । श्रोत्रियांसी जोडे आतेजेता ॥३॥
माहेरी सलज्ज ते जाणा सिंदळी । काळिमा काजळी पावविते ॥४॥
केला न सहावे तीर्थउपवास । कथेविण दोषसाधन ते ॥२॥
तुका म्हणे तेथे विश्वास जतन । पुरे भीमास्नान सम पाय ॥५॥
अर्थ
एखाद्या आतताई मनुष्याने पंढरीत जावून मृत्यू ओढवून घेतला म्हणजे जीव जर दिला तर त्या पतीताचा अध:पातच होतो. पंढरी मध्ये दुराचारी मनुष्याला देखील मोक्ष मिळतो कारण पंढरी ही सुखाची वस्ती आहे व तेथे भोळी बालरुपात पांडुरंगाची मूर्ती आहे. पंढरीमध्ये हरी काला करताना उच्च-नीच असा जर भेद केला तर मग तो कोणीही असो वैयक्तिक ब्राम्हण जरी असला तरी त्याला अत्यंजता प्राप्त होते. एखादी स्त्री जर माहेरी जाऊन आई वडिलांच्या समोर येण्यास लाजत असेल तर ती सींदळीच आहे असे समजावे कारण तिच्या वाईट कृत्याने तिला काजळाप्रमाणे काळीमा प्राप्त होते. पंढरी या तीर्थामध्ये हरिकथा सोडली तर कोणत्याही प्रकारचे उपवास केले तर ते देवाला सहन होत नाही कारण हरिकथा हे एकच साधन देवाला आवडते व त्या साधना वाचून सर्व साधने हे दोषास्पदच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात या पंढरीमध्ये येऊन सांप्रदाय प्रमाणे वागावे व त्याविषयी विश्वास जतन करावा आणि चंद्रभागेत स्नान करून हरीच्या विटेवर असलेल्या सम चरणावर डोके टेकवावे एवढेच पुरे.
अभंग क्र. २१२२
चातुर्याच्या अनंतकळा । सत्या विरळा जाणत ॥१॥
हासत्यासवे हासे जन । रडता भिन्न पालटे ॥धृपद॥
जळो ऐसे वांजट बोल । गुणा मोल भूस मिथ्या ॥२॥
तुका म्हणे अंधळ्याऐसे । वोंगळ पिसे कौतुक ॥३॥
अर्थ
चातुर्य करण्याच्या अनेक प्रकारच्या लीला आहेत परंतु त्यामध्ये खरी कोणती आहे हे जाणनारा सगळ्यापेक्षा वेगळा असतो. काही माणसे असे असतात की लोक हसू लागले म्हणून ते ही हसू लागतात आणि काही लोक रडू लागले की त्यांच्याकडे बघून ते ही रडू लागतात. काही काही लोक वरवर केवळ परमार्थिक बोल बोलतात परंतु अशा वांजट बोलाला आग लागो कारण सद्गुणा शिवाय कोणालाही किंमत नसते जसे धान्य बाजूला काढले की भुस मिथ्या ठरते अगदी त्याप्रमाणे. तुकाराम महाराज म्हणतात जे लोक वेडे आहेत ते डोळ्याला काहीतरी बांधतात आणि उगाचच आंधळ्यासारखे चालतात व हसत असतात.
अभंग क्र. २१२३
नयो वाचे अनुचित वाणी । नसो मनी कुडी बुद्धि ॥१॥
ऐसे मागा अरे जना । नारायणा विनवूनि ॥धृपद॥
कामक्रोधां पडो चिरा । ऐसा बरा सायास ॥२॥
तुका म्हणे नानाछंदे । या विनोदे न पडावे ॥३॥
अर्थ
वाचे द्वारे अनुचित वाईट बोलू नये आणि मनामध्ये वाईट कुढित बुद्धी चा निश्चय येऊ नये. अरे जना तू असेच काहीतरी चांगले नारायणाला विनंती करून माघ. काम क्रोध आपल्या मधून नाहीसा होईल असाच काहीतरी प्रयत्न केलेला चांगला. तुकाराम महाराज म्हणतात अहो तुम्ही चेष्टा म्हणून देखील कोणत्याही विषयाच्या छंदात पडू नका.
अभंग क्र. २१२४
माझिया देहाची मज नाही चाड । कोठे करू कोड आणिकाचे ॥१॥
इच्छता ते मान मागा देवापासी । आसा संचितासी गुंतले हो ॥धृपद॥
देह आम्ही केला भोगाचे सांभाळी । राहिलो निराळी मानामाना ॥२॥
तुका म्हणे कोणे वेचावे वचन । नसता तो सीण वाढवावा ॥३॥
अर्थ
अहो मला माझ्या देहाची आवड नाही तर इतरांचे कोडकौतुक का बरे मी करत बसू. ज्या कोणाला मान मर्यादा सन्मान याची इच्छा असेल त्याने तो देवाशी मागावा आमच्याकडे त्याची अपेक्षा धरू नये खरे तर तुम्ही संचिताच्या भोगात गुंतलेले आहात त्यामुळे तुम्हाला ही इच्छा होत आहे. आम्ही आमचा देह हा भोगाच्या स्वाधीन केला आहे त्यामुळे आम्ही मान अपमान यापेक्षा वेगळे होऊन राहिलो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात अहो लोकांची स्तुती मान-सन्मान करण्याकरता आपले शब्द व्यर्थ खर्च का करावेत आणि नुसता शिण तरी का बरे वाढवावा.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















