आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१ जुलै, दिवस १८२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ४२६ ते ४५० सार्थ तुकाराम गाथा अभंग २१७३ ते २१८४
“१ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १ July
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २१७६ ते २१८४ चे पारायण आपण करणार आहोत.
१ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ४२६ ते ४५०,
426-13
श्रीगुरुंचे मन । जया देईल अवधान । ते मी पुढा होईन । चमत्कारु ॥426॥
श्रीगुरूंचे मन जिकडे लक्ष देईल ती वस्तू मीच होईन, असा चमत्कार करीन.
427-13
तया श्रवणाचे आंगणी । होईन शब्दांचिया आक्षौहिणी । स्पर्श होईन घसणी । आंगाचिया ॥427॥
श्रीगुरूंच्या श्रवणरूपी अंगणात असंख्य शब्द मी होईन, त्यांचे अंग ज्याला घासेल तो स्पर्शविषय मी होईन.
428-13
श्रीगुरूंचे डोळे । अवलोकने स्नेहाळे । पाहाती तिये सकळे । होईन रूपे ॥428॥
श्रीगुरूंचे डोळे कृपादृष्टीने ज्या ज्या वस्तू पहातील त्या सर्व मीच होईन.
429-13
तिये रसने जो जो रुचेल । तो तो रसु म्या होईजैल । गंधरूपे कीजेल । घ्राणसेवा ॥429॥
त्यांच्या जिव्हेला जो जो रस आवडेल तो तो रस मी होईन आणि मी गंधरूप होऊन त्यांच्या घ्राणांची सेवा करीन.
430-13
एवं बाह्यमनोगत । श्रीगुरुसेवा समस्त । वेटाळीन वस्तुजात । होऊनिया ॥430॥
याप्रमाणे सर्व वस्तूमात्र मी होऊन श्रीगुरूंची सर्व बाह्य सेवा करीन. असे त्याचे मनोगत असते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
431-13
जव देह हे असेल । तव वोळगी ऐसी कीजेल मग देहाती नवल । बुद्धि आहे ॥431॥
हा देह जेथपर्यंत उभा आहे तेथपर्यंत माझ्याकडून अशी सेवा केली जाईल व देह पडल्यानंतरही सेवा करण्याची आश्चर्यकारक आवड मी बुद्धीमधे धरीन. (ती अशी)
432-13
इये शरीरीची माती । मेळवीन तिये क्षिती । जेथ श्रीचरण उभे ठाती । आराध्याचे ॥432॥
जेथे पूजनीय श्रीगुरूंचे चरण उभे रहातील, त्या जागी या (माझ्या) शरीराची माती मिळवीन.
433-13
माझा स्वामी कवतिके । स्पर्शीजति जिये उदके । तेथ लया नेईन निके । आपी आप ॥433॥
माझे स्वामी ज्या पाण्याला सहज स्पर्श करतील त्या पाण्यात माझ्या शरीरातील पाणी मी लयाला नेईन.
434-13
श्रीगुरु वोवाळिजती । का भुवनी जे उजळिजती । तया दीपांचिया दीप्ती । ठेवीन तेज ॥434॥
ज्या दिव्यांनी गुरूस ओवाळतात अथवा जे दिवे श्रीगुरूंच्या मंदिरात लावतात, त्या दिव्यांच्या तेजात मी आपल्या शरीरातील तेज मिसळीन.
435-13
चवरी हन विंजणा । तेथ लयो करीन प्राणा । मग आंगाचा वोळंगणा । होईन मी ॥435॥
श्रीगुरूंची चवरी व पंखा जो असेल तेथे त्या चवरीत व पंख्यात मी माझ्या प्राणांचा लय करीन. व मग त्यांच्या शरीराची सेवा करणारा वारा मी होईन.
436-13
जिये जिये अवकाशी । श्रीगुरु असती परिवारेसी । आकाश लया आकाशी । नेईन तिये ॥436॥
ज्या ज्या पोकळीत गुरू आपल्या परिवारासह असतील त्या पोकळीत मी आपल्या शरीरातील आकाश लयाला नेईन.
437-13
परी जीतु मेला न संडी । निमेषु लोका न धडी । ऐसेनि गणाविया कोडी । कल्पांचिया ॥437॥
परंतु जिवंत असतांना अथवा मेल्यावर श्रीगुरूंची सेवा सोडणार नाही व एक निमिषही (एक निमिषभर गुरूंची सेवा) लोकांवर सोपवणार नाही व अशी ही सेवा कोट्यवधी कल्पनांचा काल मोजला तरी ती चालू राहील.
438-13
येतुलेवरी धिंवसा । जयाचिया मानसा । आणि करूनियाहि तैसा । अपारु जो ॥438॥
येथपर्यंत ज्याच्या मनाला गुरुसेवेविषयी उत्कट इच्छा असते आणि त्याचप्रमाणे तो सेवा करूनही अपारच असतो. (म्हणजे गुरुसेवेविषयी त्याची उत्कट इच्छा राहिलेलीच असते).
439-13
रात्री देवो नेणे । थोडे बहु न म्हणे । म्हणियाचेनि दाटपणे । साजा होय ॥439॥
(गुरुसेवेपुढे) तो रात्रंदिवस जाणत नाही, थोडेफार म्हणत नाही आणि सेवेची गर्दी असली म्हणजे तो प्रसन्न असतो.
440-13
तो व्यापारु येणे नांवे । गगनाहूनि थोरावे । एकला करी आघवे । एकेचि काळी ॥440॥
गुरुसेवा करावयाची म्हटले म्हणजे तो आकाशाहून मोठा होतो व तो एकटा गुरूची सर्व सेवा एकाच काळी करतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
441-13
हृदयवृत्ती पुढा । आंगचि घे दवडा । काज करी होडा । मानसेशी ॥441॥
त्याच्या अंत:करणाच्या वृत्तीपुढे शरीरच धाव घेते, त्याची प्रत्यक्ष कृती मनाशी सेवेच्या कामात चढाओढीची प्रतिज्ञा करते.
442-13
एकादिया आळामाळा । श्रीगुरुचिया खेळा । लोण करी सकळा । जीविताचे ॥442॥
श्रीगुरूंच्या एखाद्या जराशा लीलेला आपल्या सर्व जीविताचे लोण करतो (म्हणजे आपले सर्व जीवित त्यांच्या थोड्याशा खेळावरून ओवाळून टाकतो).
443-13
जो गुरुदास्ये कृशु । जो गुरुप्रेमे सपोषु । गुरुआज्ञे निजवासु । आपणचि जो ॥443॥
जो गुरुसेवेच्या योगाने रोडका झालेला असतो, जो गुरुप्रेमाने पुष्ट झालेला असतो व जो आपण स्वत: श्रीगुरूच्या आज्ञेचे स्वत:च्या रहाण्याचे ठिकाण असतो,
444-13
जो गुरु कुळे सुकुलीनु । जो गुरुबंधुसौजन्ये सुजनु । जो गुरुसेवाव्यसने सव्यसनु । निरंतर ॥444॥
जो श्रीगुरूच्या कुळामुळे चांगला कुलीन असतो, जो आपल्या गुरुबंधुवरील स्नेहाचे योगाने भला मनुष्य ठरलेला असतो व जो नेहेमी गुरुसेवेच्या छंदामुळे व्यसनी असतो.
445-13
गुरुसंप्रदायधर्म । तेचि जयाचे वर्णाश्रम । गुरुपरिचर्या नित्यकर्म । जयाचे गा ॥445॥
गुरुसंप्रदायाचे जे आचार असतात, ते ज्याचे वर्णाश्रम विहितकर्मे असतात, अरे गुरुसेवा हे ज्याचे नित्यकर्म असते.
446-13
गुरु क्षेत्र गुरु देवता । गुरु माय गुरु पिता । जो गुरुसेवेपरौता । मार्ग नेणे ॥446॥
गुरू हेच क्षेत्र, गुरू हीच देवता, गुरूच माता, गुरूच पिता, तो गुरुपूजेपलीकडील दुसरा मार्ग जाणत नाही.
447-13
श्रीगुरूचे द्वार । ते जयाचे सर्वस्व सार । गुरुसेवका सहोदर । प्रेमे भजे ॥447॥
श्रीगुरूचे द्वार हेच ज्याचे सर्वस्व सार आहे व गुरुसेवकांना तो सख्या भावाच्या प्रेमाने भजतो.
448-13
जयाचे वक्त्र । वाहे गुरुनामाचे मंत्र । गुरुवाक्यावाचूनि शास्त्र । हाती न शिवे ॥448॥
ज्याचे मुख गुरुनामाचा मंत्र धारण करते, व गुरुवाक्यावाचून दुसर्या शास्त्राला हात लावत नाही,
449-13
शिवतले गुरुचरणी । भलते जे पाणी । तया तीर्थयाञे आणी । तीर्थे त्रैलोक्यींची ॥449॥
ज्या कोणत्याही पाण्याला श्रीगुरुचरणांचा स्पर्श झाला आहे, त्या पाण्याला तीर्थे समजून त्या तीर्थाच्या यात्रेला त्रैलोक्यातील तीर्थे आणतो म्हणजे त्रैलोक्यातील तीर्थे त्या पाण्यात आली आहेत असे समजतो.
450-13
श्रीगुरूचे उशिटे । लाहे जै अवचटे । तै तेणे लाभे विटे । समाधीसी ॥450॥
त्याला जेव्हा श्रीगुरूंचे उच्छिष्ट अकस्मात प्राप्त होते, तेव्हा त्या लाभाने तो समाधीस विटतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १८२ वा. १, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २१७३ ते २१८४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २१७३
कीर्तन ऐकावया भुलले श्रवण । श्रीमुख लोचन देखावया ॥१॥
उदित हे भाग्य होईल कोणे काळी । चित्त तळमळी म्हणऊनि ॥धृपद॥
उतावीळ बाह्या भेटिलागी दंड । लोटांगणी धड जावयासी ॥२॥
तुका म्हणे माथा ठेवीन चरणी । होतील पारणी इंद्रियांची ॥३॥
अर्थ
हरी चे कीर्तन ऐकण्यासाठी आणि श्रीमुख बघण्यासाठी माझे कान व डोळे भुलले आहेत. केंव्हा माझ्या भाग्याचा उदय होईल यासाठी माझे चित्त तळमळत आहे. हरीला आलिंगन देण्यासाठी माझे बाहु दंड आणि त्याच्या कडे लोटांगण घालीत जाण्यासाठी माझे देह हे दोन्ही ही उतावीळ झाले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात मी हरी च्या चरणावर माझा माथा ठेवीन त्यामुळे माझ्या सर्व इंद्रियांचे पारणे फिटतील म्हणजे माझ्या इंद्रियांची तृप्ती होईल.
अभंग क्र. २१७४
नाम घेता कंठ शीतळ शरीर । इंद्रिया व्यापार नाठवती ॥१॥
गोड गोमटे हे अमृतासी वाड । केला कइवाड माझ्या चित्ते ॥धृपद॥
प्रेमरसे जाली पुष्ट अंगकांति । त्रिविध नसती ताप क्षणे ॥२॥
तुका म्हणे तेथे विकाराची मात । बोलो नये हित सकळाचे ॥३॥
अर्थ
एकदा की हरीचे नाम कंठाने घेतले तर शरीर आणि कंठ दोन्ही शितळ होतात आणि इंद्रियांना स्वत: व्यवहार करण्याची आठवण राहत नाही. असे हे हरीचे नाम गोड गोमटे आणि अमृतापेक्षाही वरचढ आहे म्हणूनच तर माझ्या चित्ताने ते हरीचे नाम घेण्याचा दृढ निश्चय केला आहे. हरी च्या नामाने व त्याच्या प्रेमरसाने माझे शरीर तेजस्वी पुष्ट झाले आहे. आणि नाम उच्चारताच त्रिविध पाप क्षणांमध्ये नाश पावतात. तुकाराम महाराज म्हणतात जे भक्त नाम घेतात त्यांच्या ठिकाणी विकाराच्या गोष्टी तर बोलुच नये परंतु जे कोणी नांव घेतात त्या सर्वाचे हितच होते.
अभंग क्र. २१७५
स्वामिकाज गुरुभक्ती । पितृवचन सेवा पति ॥१॥
हेचि विष्णूची महापूजा । अनुभव नाही दुजा ॥धृपद॥
सत्य बोले मुखे । दुखवे आणिकाच्या दुःखे ॥२॥
निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेचि फळ ॥३॥
अर्थ
स्वामी चे काम, गुरुभक्ती, थोर व्यक्तींनी सांगितलेली आज्ञा आणि पतीची सेवा ही यथा योग्य केली पाहिजे. हीच खरी विष्णूची महा पूजा आहे यात काहीच संदेह नाही. नेहमी मुखाने सत्य बोलावे आणि दुसऱ्यांच्या दुःखात दुःख मानत जावे. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ करण्याविषयी आणि इतर चांगल्या गोष्टी करण्या विषयी दृढनिश्चय असावा मग निश्चयाचे बळ दृढ असेल तर कोणतेही फळ ते देणारे असते.
अभंग क्र. २१७६
चित्त घेऊनिया तू काय देसी । ऐसे मजपासी सांग आधी ॥१॥
तरि च पंढरिराया करिन साटोवाटी । नेघें जया तुटी येईल ते ॥धृपद॥
रिद्धिसिद्धि काही दाविसी अभिळास । नाही मज आस मुक्तीची ही ॥२॥
तुका म्हणे तुझे माझे घडे तर । भक्तीचा भाव रे देणे घेणे ॥३॥
अर्थ
देवा तु माझे चित्त घेऊन त्या बदल्यात मला काय देशील ते आधी सांग. हे पंढरीराया तरच आपल्या मध्ये व्यवहार होईल आणि एक लक्षात ठेव जे घेण्यापासून माझे नुसकान होणार आहे ते मी घेणार नाही. देवा मला रिद्धी सिद्धी अशी काही अभिलाषा दाखवू नको आणि मला मुक्तीची ही अपेक्षा नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा जर तुझ्यात आणि माझ्यात घेण्या देण्याविषयी काही करायचेच असेल तर माझे चित्त तु घे आणि तुझा भक्तिभाव मला दे एवढेच कर.
अभंग क्र. २१७७
तुझा संग पुरे संग पुरे । संगति पुरे विठोबा ॥१॥
आपल्या सारिखे करिसी दासा । भिकारिसा जग जाणे ॥धृपद॥
रूपा नाही ठाव नावा । तैसे आमुचे करिसी देवा ॥२॥
तुका म्हणे तोये आपुले भेंडोळे । करिसी वाटोळे माझे तैसे ॥३॥
अर्थ
हे विठोबा तुझी संगती आता पुरी झाली हे मी तुला त्रिवार सांगत आहे. कारण हे विठोबा तु आपल्या दासाला ही आपल्यासारखा भिकारी करतो हे सर्व जगाला माहित आहे. अरे तुला रुप नाही नांव नाही तसेच आमचेही करशील रे देवा. तुकाराम महाराज म्हणतात अरे देवा तु क्षिरसागरामध्ये बुडालेला आहेस तसे तुझ्यासारखे माझे वाटोळे करशील.
अभंग क्र. २१७८
आता मज तारी । वचन हे साच करी ॥१॥
तुझे नाम दिनानाथ । ब्रिदावळी जगविख्यात ॥धृपद॥
कोण लेखी माझ्या दोषा । तुझा त्रिभुवनी ठसा ॥२॥
वाया जाता मज । तुका म्हणे तुम्हा लाज ॥३॥
अर्थ
देवा तु आता मला या भावनातून तार आणि मी भक्तांना तारणारा आहे हे तुझे वचन सत्य कर. देवा तुझे नाम दीनानाथ आहे ही तुझी ब्रिदावळी सर्व जगविख्यात आहे. अरे देवा तु महादोष नाहीसे करणारा आहेस असा ठसा त्रिभुवनात गाजलेला आहे मग त्या महादोषा पुढे माझे दोष तरी किती आहेत ? तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुझा भक्त असूनही वाया गेलो तर त्याची लाच तुम्हालाच.
अभंग क्र. २१७९
विठ्ठल आमुचा निजांचा । सज्जन सोयरा जीवाचा ॥१॥
मायबाप चुलता बंधु । अवघा तुजशी संबंधु ॥धृपद॥
उभयकुळींसाक्ष । तू चि माझा मातुळपक्ष ॥२॥
समर्पीली काया । तुका म्हणे पंढरिराया ॥३॥
अर्थ
विठ्ठला तुच आमचा जिवाचा सज्जन सोयरा आहेस. हे विठ्ठला तुच आमचा मायबाप चुलता बंधू आहेस आणि आमचे जे काही संबंध आहेत ते तुझ्याशीच आहेत. तुच माझ्या माता व पिता यांच्या उभय कुळाचा पक्ष आहे आणि या विषयी वेद ही साक्षी आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरीराया ही माझी काया म्हणजे शरीर मी तुला समर्पित केले आहे.
अभंग क्र. २१८०
वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा ॥१॥
खादल्याची गोडी देखिल्यासी नाही । भार धन वाही मजुरीचे ॥धृपद॥
उत्पित्त पाळण संहाराचे निज । जेणे नेले बीज त्याचे हाती ॥२॥
तुका म्हणे आम्हा सापडले मूळ । आपणची फळ आले हाती ॥३॥
अर्थ
वेदांचा खरा अर्थ आम्हालाच माहित आहे इतरांनी केवळ शब्दांचा आणि अहंकार व वेद पठणाचा भार माथ्यावर व्हावा एवढेच. अन्न खाल्याची गोडी अन्न खाणाऱ्यालाच समजते केवळ पाहणाऱ्यांला नाही आणि धन वाहून नेले तरी ते पैसे मजुराचे नसतात तो केवळ भार वाहत असतो. जगाची उत्पत्ती पालन संहार करणारा हरी त्याचे नीज स्वरूपाचे बीज जो आपल्या हातामध्ये ठेवतो त्यालाच वेदाचा खरा अर्थ समजत असतो. तुकाराम महाराज म्हणतात सर्व साधनाचे मूळ बीज म्हणजे हा हरी आहे आणि तोच आम्हाला सापडला आहे त्यामुळे सर्व वेदार्थ रुपी फळ आमच्या हाती आपण होऊनच आले आहेत.
अभंग क्र. २१८१
आमचा तू ॠणी ठायीचाचि देवा । मागावया ठेवा आलो दारा ॥१॥
वर्म तुझे आम्हा सापडले हाती । धरियेले चित्ती दृढ पाय ॥धृपद॥
बैसलो धरणे कोंडोनिया द्वारी । आतूनि बाहेरी येओं नेदी ॥२॥
तुज मज सरी होईल या विचारे । जळो भांडखोरे निलाजिरी ॥३॥
भांडवल माझे मिरविसी जनी । सहस्त्र वोवनी नाममाळा ॥४॥
तुका म्हणे आम्ही केली जिवे साटी । तुम्हा आम्हा तुटी घालू आता ॥५॥
अर्थ
देवा आमचे सेवा रुपी ऋण तुझ्याकडे आहे आणि त्यामुळे तु आमचा ऋणी आहेस आणि आमचा ठेवाच आम्ही मागण्यासाठी तुझ्याकडे आलो आहे. देवा तुझे खरे वर्म आता आम्हाला सापडले आहे. त्यामुळेच आता तुझ्या प्राप्तीचे खरे वर्म म्हणजे तुझे पाय आहे आणि तेच आम्ही आमच्या चित्तात दृढ धरले आहे. देवा आता तुला आत मध्ये कोंडून तुझ्या दारातच मी धरणे धरून बसलो आहे, तुला आता आम्ही आतून बाहेर येऊ देणार नाही. देवा तुझी आणि माझी बरोबरी होईल आणि आपण दोघंही एकसमान होऊ आपले एक्य होईल या विचारांनेच तु माझा ठेवा मला देत नाहीस ना अशा या भांडखोर आणि निर्लज्ज विचाराला आग लागो. देवा तुझ्या सहस्रनामांची माळ हेच माझे खरे भांडवल आहे आणि त्याच सहाय्याने मी तुझे महत्त्व सगळ्या लोकांमध्ये मिरवित आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता मी तुला माझा जीव अर्पण केला आहे त्यामुळे तुम्ही व मी वेगळे आहोत हा भेदच मी तोडून टाकला आहे.
अभंग क्र. २१८२
काय धोविले बाहेरी मन मळले अंतरी । गादले जन्मवरी असत्यकाटे काटले ॥१॥
सांडी व्यापार दंभाचा शुद्ध करी रे मन वाचा । तुझिया चित्ताचा तू च ग्वाही आपुला ॥धृपद॥
पापपुण्यविटाळ देही भरिता न विचारिसी काही । काय चाचपसी मही जी अखंड सोंवळी ॥२॥
कामक्रोधा वेगळा ऐसा होई का सोवळा । तुका म्हणे कळा गुंडुन ठेवी कुसरी ॥३॥
अर्थ
मन हे आत मधून षडविकारणे मळालेले आहे आणि वर वरचे शरीर काय धुतले आहे ? हे मन आत मधून जन्मभर केलेल्या पापाने षडविकाराने गांधलेले आहे ते असत्यरूपी व्यवहार दोषानी भरलेले आहे. त्यामुळे दंभाचा व्यापार टाकून दे आणि अंतकरणापासून मन आणि वाचा शुद्ध कर. मग तुझी वाणी व मन शुद्ध झाले की नाही याला तुझे चित्तच तुला आपण होऊन साक्ष देईल. देह तर मुळातच पाप पुण्य या विटाळाने भरलेला आहे परंतु त्याचा देखील तु कधीही विचार करत नाही. मग हरिनाम घेण्यासाठी तु जी अखंड सोवळी आहे अशी पृथ्वी तीच्यातही दोष काढतोस येथे अशुद्ध आहे तिथे अशुद्ध आहे कोठेही हरिनाम घे तरी चालेल. तुकाराम महाराज म्हणतात अरे तु ही अखंड सोवळा होण्याकरता आपल्या देहाला काम क्रोधापासून वेगळे कर. तुकाराम महाराज म्हणतात तु तुझ्या देहातील कलाकौशल्य आणि शाब्दिक अभिमान गुंडाळून ठेव म्हणजे तु अखंड सोवळा होशील.
अभंग क्र. २१८३
सत्यकर्म आचरे रे । बापा सत्यकर्म आचरे रे ॥१॥
सत्यकर्म आचरे होईल हित । वाढेल दुःख असत्याचे ॥धृपद॥
ऊस वाढविता वाटली गोडी । गुळ साकर हे त्याची परवडी ॥२॥
साकरेच्या आळा लाविला कांदा । सुळसानापरि वाढे दुर्गंधा ॥३॥
सत्य असत्य हे ऐसिया परी । तुका म्हणे याचा विचार करी ॥४॥
अर्थ
अरे बाबा सत्य कर्म कर सत्य कर्म आचारण कर सत्य कर्माचे आचरण कर त्यामुळे तुझे हित होईल जर तू असत्याने वागलास तर तुला दुःख होईल आणि त्यामुळे तुला त्रास होईल परंतु तू सत्य कर्माचे आचरण केले तर खोट्या कर्मा पासून होणारे दुःख नाहीसे होईल. ऊसला खत पाणी देऊन चांगला वाढविला तर त्याची गोडी वाढते आणि त्या उसापासून गूळ आणि साखर हे प्रकार तयार होतात. साखरेच्या आळ्यामध्ये जरी कांदा लावला मग तो कांदा लहान असो किंवा मोठा असो त्याला साखरेच्या आळ्यात लावले तरी साखरेच्या आळ्याचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही त्याची दुर्गंधी वाढतच जाते. तुकाराम महाराज म्हणतात सत्य आणि असत्य हे अगदी कांदा आणि उस याप्रमाणे आहे आता यामध्ये योग्य कोणत व अयोग्य काय याचा विचार कर.
अभंग क्र. २१८४
पाषाण देव पाषाण पायरी । पूजा एकावरी पाय ठेवी ॥१॥
सार तो भाव सार तो भाव । अनुभवी देव ते चि जाले॥धृपद॥
उदका भिन्न पालट काई । गंगा गोड येरा चवी काय नाही ॥२॥
तुका म्हणे हे भाविकांचे वर्म । येरी धर्माधर्म विचारावे ॥३॥
अर्थ
देव देखील पाषाणाचा आणि पायरी देखील पाषाणाची असते परंतु एकाची पूजा करतात आणि एका वर पाय ठेवतात. कारण एका पाषाणाची मूर्ती केलेली असते व त्याची प्राणप्रतिष्ठा करून शास्त्रशुद्ध भक्तीने त्याची स्थापना केलेली असते त्यामुळे त्या ठिकाणी श्रद्धायुक्त भाव उत्पन्न होऊन तेथे देव आहे आशीच भावना होते आणि यामागे संतांनी ही याचा अनुभव घेतला आहे आणि जो याचा अनुभव घेतात तेही देव रूपच होतात. या पृथ्वीवर पाणी सर्वत्र सारखेच असते परंतु लोक असे म्हणतात गंगेला चव आहे गंगा गोड आहे मग इतर पाण्यात चव नाही काय यामागील खरे कारण असे शास्त्रात गंगेला पवित्र स्थान मिळालेले आहे व इतर पाण्याला ते पवित्र स्थान नाही. तुकाराम महाराज म्हणतात यातील खरे वर्म केवळ खऱ्या श्रद्धायुक्त भाविकाला कळते इतरांनी केवळ धर्म काय आहे कर्मकांड काय आहे याचाच विचार करत बसावा.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















