आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२९ जून, दिवस १८० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ३७६ ते ४०० सार्थ तुकाराम गाथा अभंग २१४९ ते २१६०
“29 जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 29 June
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक 29 जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २१४९ ते २१६० चे पारायण आपण करणार आहोत.
29 जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ३७६ ते ४००,
376-13
तियेकडोनि येतसे वारा । देखोनि धावे सामोरा । आड पडे म्हणे घरा । बीजे कीजो ॥376॥
गुरूच्या देशाकडून जो वारा येत असेल, त्या वार्याला पाहून त्याला सामोरा धावून जातो व त्याच्या मार्गात आडवा पडून म्हणतो, “आपण माझ्या घरी यावे”.
377-13
साचा प्रेमाचिया भुली । तया दिशेसीचि आवडे बोली । जीवु थानपती करूनि घाली । गुरुगृही जो ॥377॥
सद्गुरूविषयीच्या खर्या प्रेमाने जो वेडा झाल्यामुळे ज्याला त्या दिशेशीच बोलणे आवडते व जो आपल्या जीवाला गुरूच्या घरात मिरासदार करून ठेवतो.
378-13
परी गुरुआज्ञा धरिले । देह गावी असे एकले । वासरुवा लाविले । दावे जैसे ॥378॥
परंतु वासरास दोरीने बांधून ठेवल्यामुळे त्यास गाईकडे जाण्याची इच्छा असूनही जसे हलता येत नाही, त्याप्रमाणे गुरूची आज्ञा हेच कोणी एक दावे, त्याने देहास बांधून टाकल्यामुळे, त्याला एकट्याला आपल्या गावी राहाणे पडून गुरूच्या गावाकडे धाव घेता येत नाही.
379-13
म्हणे कै हे बिरडे फिटेल । कै तो स्वामी भेटेल । युगाहूनि वडील । निमिष मानी ॥379॥
जो म्हणतो, ही गुरुआज्ञारूपी दाव्याची गाठ केव्हा सुटेल व केव्हा तो गुरु भेटेल ? तो (गुरूच्या वियोगात जाणार्या) निमिषाला युगाहून मोठे मानतो.
380-13
ऐसेया गुरुग्रामीचे आले । का स्वये गुरूंनीचि धाडिले । तरी गतायुष्या जोडले । आयुष्य जैसे ॥380॥
अशात जर कोणी गुरूच्या गावचे आले अथवा स्वत: गुरूनेच पाठवले तर जसे मरावयास टेकलेल्या पुरुषास आयुष्य प्राप्त व्हावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
381-13
का सुकतया अंकुरा- । वरी पडलिया पीयूषधारा । नाना अल्पोदकीचा सागरा । आला मासा ॥381॥
अथवा सुकणार्या अंकुरावर जशा अमृताच्या धारा पडाव्यात अथवा थोड्याशा पाण्यातला मासा जसा समुद्रात यावा.
382-13
नातरी रंके निधान देखिले । का आंधळिया डोळे उघडले । भणंगाचिया आंगा आले । इंद्रपद ॥382॥
अथवा दरिद्री पुरुषाला जसा द्रव्याचा ठेवा सापडावा किंवा आंधळ्याला जशी पुन्हा दृष्टी यावी, अथवा भिकार्याला जसे इंद्रपद मिळावे.
383-13
तैसे गुरुकुळाचेनि नांवे । महासुखे अति थोरावे । जे कोडेंही पोटाळवे । आकाश का ॥383॥
त्याप्रमाणे गुरुकुळाच्या निमित्ताने मोठा आनंद झाल्यामुळे ज्याला आपण इतके वाढलो असे वाटते की आकाशाला आपण सहजच कवटाळू.
384-13
पै गुरुकुळी ऐसी । आवडी जया देखसी । जाण ज्ञान तयापासी । पाइकी करी ॥384॥
ज्या पुरुषाच्या ठिकाणी गुरुकुळासंबंधाने असे प्रेम तू पहाशील त्याच्यापाशी ज्ञान चाकरी करते असे समज.
385-13
आणि अभ्यंतरीलियेकडे । प्रेमाचेनि पवाडे । श्रीगुरूंचे रूपडे । उपासी ध्यानी ॥385॥
आणि आतल्या बाजूकडे (अंत:करणात) प्रेमाच्या जोराने श्रीगुरुमूर्तीची ध्यानाने उपासना करतो.
386-13
हृदयशुद्धीचिया आवारी । आराध्यु तो निश्चल ध्रुव करी । मग सर्व भावेसी परिवारी । आपण होय ॥386॥
अंत:करणाची शुद्धता हेच कोणी एक आवार, त्या आवारामधे आराधना करण्याला योग्य जो गुरू, त्याची प्राणप्रतिष्ठा करतो व मग काया, वाचा, मनाने श्रीगुरूचा लवाजमा आपण बनतो.
387-13
का चैतन्यांचिये पोवळी- माजी आनंदाचिया राउळी । श्रीगुरुलिंगा ढाळी । ध्यानामृत ॥387॥
अथवा ज्ञानाच्या आवारात असणार्या आनंदाच्या देवळामधे गुरुरूपी लिंगाला ध्यानरूपी अमृताचा अभिषेक करतो.
388-13
उदयिजता बोधार्का । बुद्धीची डाल सात्त्विका । भरोनिया त्र्यंबका । लाखोली वाहे ॥388॥
बोधरूपी सूर्य उगवताच बुद्धिरूपी टोपलीत अष्टसात्विकभाव भरून तो त्यांची लाखोली श्रीगुरुरूपी शंकराला वहातो.
389-13
काळशुद्धी त्रिकाळी । जीवदशा धूप जाळी । न्यानदीपे वोवाळी । निरंतर ॥389॥
पवित्र काल ह्याच कोणी शिवपूजनाच्या तीन वेळा, त्यात जीवपणरूपी धूप जाळून ज्ञानरूपी दिव्याने निरंतर ओवाळतो.
390-13
सामरस्याची रससोय । अखंड अर्पितु जाय । आपण भराडा होय । गुरु तो लिंग ॥390॥
गुरूला ऐक्यभावरूपी नैवेद्य नेहेमी अर्पित रहातो व आपण पूजा करणारा गोसावी होऊन गुरूला शंकराची पिंडी करतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
391-13
नातरी जीवाचिये सेजे । गुरु कांतु करूनि भुंजे । ऐसी प्रेमाचेनि भोजे । बुद्धी वाहे ॥391॥
अथवा जीवरूपी शय्येवर गुरूला पती करून भोगतो, अशी प्रेमाची आवड त्याची बुद्धी बाळगते.
392-13
कोणेएके अवसरी । अनुरागु भरे अंतरी । की तया नाम करी । क्षीराब्धी ॥392॥
कोणा एका वेळी मनात गुरूविषयी प्रेम भरले की त्याला (त्या प्रेमाला) क्षीरसमुद्र असे नाव देतो.
393-13
तेथ ध्येयध्यान बहु सुख । तेचि शेषतुका निर्दोख । वरी जलशयन देख । भावी गुरु ॥393॥
त्या प्रेमरूपी क्षीरसागरामधे ध्येय जे गुरू, त्यांच्या ध्यानापासून होणारे जे अपार सुख, ते (सुखच) शेषरूपी शुद्ध गादी समजतो व त्यावर (श्रीविष्णूप्रमाणे) जलशयन करणारे श्रीगुरू आहेत असे समजतो.
394-13
मग वोळगती पाय । ते लक्ष्मी आपण होय । गरुड होऊनि उभा राहे । आपणचि ॥394॥
श्रीगुरूरूपी विष्णूच्या पायांची सेवा करणारी लक्ष्मी आपणच होतो व आपणच गरुड होऊन पुढे उभा रहातो.
395-13
नाभीं आपणचि जन्मे । ऐसे गुरुमूर्तिप्रेमे । अनुभवी मनोधर्मे । ध्यानसुख ॥395॥
आपणच श्रीगुरुरूपी विष्णूच्या नाभीकमळात जन्म घेतो म्हणजे ब्रह्मदेव होतो. गुरुमूर्तीच्या प्रेमाने असे ध्यानसुख अंत:करणात अनुभवतो.
396-13
एखादेनि वेळे । गुरु माय करी भावबळे । मग स्तन्यसुखे लोळे । अंकावरी ॥396॥
एखादेवेळी आपल्या भावाच्या बळाने गुरूला आई मानतो व मग आपण त्या आईच्या मांडीवर स्तनपानाच्या सुखाने लोळतो.
397-13
नातरी गा किरीटी । चैतन्यतरुतळवटी । गुरु धेनु आपण पाठी । वत्स होय ॥397॥
अथवा अर्जुना, चैतन्यरूपी झाडाच्या खाली गुरूला गाय कल्पून आपण तिच्या पाठीमागे असणारे वासरू होतो.
398-13
गुरुकृपास्नेहसलिली । आपण होय मासोळी । कोणे एके वेळी । हेचि भावी ॥398॥
गुरूच्या प्रेमरूपी जळात आपण मासोळी बनतो. कोणा एका वेळेला हीच कल्पना करतो.
399-13
गुरुकृपामृताचे वडप । आपण सेवावृत्तीचे होय रोप । ऐसेसे संकल्प । विये मन ॥399॥
माझे श्रीगुरू कृपारूप अमृताची दृष्टी असून त्याखाली मी, सेवावृत्तिरूप रोप आहे; याप्रमाणे त्याचे मन अनेक प्रकारचे संकल्प करीत असते.
400-13
चक्षुपक्षेवीण । पिलू होय आपण । कैसे पै अपारपण । आवडीचे ॥400॥
डोळे उघडले नाहीत व पंख फुटले नाहीत असे (पक्ष्याचे) पिल्लू आपणच होतो. त्याच्या प्रेमाचे अमर्यादपण असे आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १८० वा, २९, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २१४९ ते २१६०
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २१४९
बहु वाटे भये । माझे उडी घाला दये ॥१॥
फासा गुंतलो लिगाडी । न चले बळ चरफडी ॥धृपद॥
कुंटित चि युक्ती । माझ्या जाल्या सर्व शक्ती ॥२॥
तुका म्हणे देवा । काममोहे केला गोवा ॥३॥
अर्थ
देवा मला या प्रपंचाची फार भीती वाटते त्यामुळे माझ्यावर दया करा आणि माझ्या रक्षणासाठी तुम्ही उडी घाला. मी या उपाधीच्या पाशा मध्ये गुंतलो आहे तिथे माझे काहीच बळ चालत नाहीये त्यामुळे मी चरफडत आहे. माझी सर्व प्रकारची युक्ती आणि शक्ती खुंटीत झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला काम आणि मोहाने विषयांमध्ये बांधून टाकले आहे.
अभंग क्र. २१५०
विष्ठा भक्षी तया अमृत पारिखे । वोंगळसी सखे वोंगळाची ॥१॥
नये पाहो काही गोहवाडीचा अंत । झणी ठाका संत दुर्जनापे ॥धृपद॥
भेंसळीच्या बीजा अमंगळ गुण । उपजवी सीण दरुषणे ॥२॥
तुका म्हणे छी थूं जया घरी धन । तेथे ते कारण कासयाचे ॥३॥
अर्थ
विष्टा खाणाऱ्याला अमृत फार परके असते त्याप्रमाणे वाईट माणसांची संगती हे वाईटच माणसे करतात. ज्याप्रमाणे गुखाडीचा अंत पाहू नये त्याप्रमाणे संत लोकांनी दुर्जनाला जवळ देखील उभा करू नये. जे भेसळ युक्त बीजाने उत्पन्न झालेले जे प्राणी आहेत त्यांच्या अंगी अमंगळ गुणच असतात आणि त्यांच्या दर्शनाने देखील शीनच उत्पन्न होत राहतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या घरी लोकांची छि थू हेच धन आहे मग तेथे जाण्याचे कारणच काय, कारण तेथे जाऊन कोणालाच काहीच फायदा होत नाही.
अभंग क्र. २१५१
चळले काय न करी बडबड । न म्हणे फिके गोड भुकेले ते ॥१॥
उमजल्याविण न धरी सांभाळ । असो खळखळ जनाची हे ॥धृपद॥
गरज्या न कळे आपुलिया चाडा । करावी ते पीडा कोणा काई ॥२॥
तुका म्हणे भोग भोगितील भोगे । संचित ते जोगे आहे कोणा ॥३॥
अर्थ
ज्याला वेड लागले आहे तो मनुष्य काहीही बडबड करत असतो आणि ज्याला खरेच भूक लागली आहे तो मनुष्य हे गोड अन्न ते वाईट अन्न आहे असे काहीही न म्हणता अन्नग्रहण करतो असतो. कोणतीही गोष्ट समजल्याशिवाय बुद्धीचा सांभाळ करणे अशक्य आहे. जगामध्ये अनेक लोकांच्या आशा अनेक त्रासदायक चेष्टा आहेत पण त्या सध्या असू द्याव्यात. गरजुवंत व्यक्तीला आपल्या इच्छे पुढे काय चांगले काय वाईट हे कळत नाही कोणाला त्रास द्यावे कोणाला नाही हे देखील त्याला कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जगात अनेक लोक आपल्या कर्मानुसार भोग भोगतील व काही लोक भोगतही आहेत कारण त्यांचे पूर्व संचित कर्म देखील योग्य नाहीत.
अभंग क्र. २१५२
आपुला तो देह आम्हा उपेक्षीत । कोठे जाऊ हित सांगो कोणा ॥१॥
कोण नाही दक्ष करिता संसार । आह्मी हा विचार वमन केला ॥धृपद॥
नाही या धरीत जीवित्वाची चाड । कोठे करू कोड आणिकाचे ॥२॥
तुका म्हणे असो चिंतोनिया देवा । मी माझे हा हेवा सारूनिया ॥३॥
अर्थ
अहो जेथे आम्ही आमच्या देहाची उपेक्षा केली तेथे आम्ही दुसऱ्याला हित सांगण्यासाठी कोठे जाऊ ? आपला संसार दक्षतेने चांगला करावा याविषयी कोण तत्पर नाही परंतु आम्ही तर आमचा संसार ओकुन टाकला आहे. अहो येथे मीच माझ्या जिवित्वा चि आवड पूर्ण करत नाही त्याची आवड करत नाही तर इतरांचे कोडकौतुक कोठे करत बसु. तुकाराम महाराज म्हणतात आता मी आणि माझे हा हेवा दूर सारुन केवळ देवाचे चिंतन करायचे आहे.
अभंग क्र. २१५३
चाकरीवाचून । खाणे अनुचित वेतन ॥१॥
धणी काढोनिया निजा । करील ये कामाची पूजा ॥धृपद॥
उचितावेगळे । अभिलाषे तोंड काळे ॥२॥
सांगे तरी तुका । पाहा लाज नाही लोका ॥३॥
अर्थ
आपल्या धन्याची चाकरी केल्यावाचून त्याचा पगार खाणे म्हणजे अनुचितच आहे. त्याच आदराने धन्याची सेवा केली तर तो धनी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला योग्य प्रकारचा मोल देऊन त्याचा गौरव करीन. उचित काम न करता केवळ पगार घेतला आणि धनाच्या अभिलाशा ने काम केले तर त्याचे तोंड काळे होते. तुकाराम महाराज म्हणतात मी एवढे सांगतो तरी या लोकांना लाज नाही म्हणजे देवाने तयार केलेले, आपल्यासाठी तयार केलेले सुख देवाच्या सेवेवाचुन घेऊ नये आणि घेतले तर तो एक प्रकारचा अनुचित प्रकार घडतो.
अभंग क्र. २१५४
बरे सावधान । राहावे समय राखोन ॥१॥
नाही सारखिया वेळा । अवघ्या पावता अवकळा ॥धृपद॥
लाभ अथवा हानी । थोड्यामध्ये च भोवनी ॥२॥
तुका म्हणे राखा । आपणा नाही तोचि वाखा ॥३॥
अर्थ
लोकहो तुम्ही योग्य व अयोग्य वेळ पाहून सावध रहा. कारण सर्व वेळ सारखी नसते काही वेळा आपली अवकळा देखील होते एखाद्या गोष्टीची आपण सुरुवात म्हणजे भवानी करायला गेलो की थोड्याच वेळामध्ये आपल्याला हानी होते किंवा लाभ होतो कारण ती वेळच तशी असते. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे लोकहो तुम्ही सावध व्हा वेळ पाहून तुम्ही हरिभक्ती करा जोपर्यंत तुमच्यावर अवकळा होण्याची वेळ आली नाही तोपर्यंत तुम्ही सावध व्हावे.
अभंग क्र. २१५५
काय करू जी दातारा । काही न पुरे संसारा ॥१॥
जाली माकडाची परि । येतो तळा जातो वरी ॥धृपद॥
घाली भलते ठायी हात । होती शिव्या बैस लात ॥२॥
आदि अंती तुका । सांगे न कळे झाला चुका ॥३॥
अर्थ
हे दातारा मी काय करू कारण संसारासाठी कितीही काही केले तरी ते पुरेच पडत नाही. ज्याप्रमाणे एखादे वानर खांबाला बांधले तर ते जसे खाली जा वर ये असे करत असते त्याप्रमाणे माझी स्थिती झाली आहे. भलत्याच ठिकाणी भलत्याच विषयाला हात घालतो त्यामुळे लोक तुम्हाला शिव्या घालतात लाथा हाणतात. तुकाराम महाराज म्हणतात देवा सुरुवातीपासून आतापर्यंत माझ्याकडून चुका झाल्या आहेत आता त्या कोणत्या आहेत हे तुला सांगायची गरज मला वाटत नाही.
अभंग क्र. २१५६
धर्म तो न कळे । काय झांकिलये डोळे ॥१॥
जीव भ्रमले या कामे । कैसी कळो येती वर्मे ॥धृपद॥
विषयांचा माज । काही धरू नेदी लाज ॥२॥
तुका म्हणे लांसी । माया नाचविते कैसी ॥३॥
अर्थ
धर्म काय आहे ते काही लोकांना कळत नाही मात्र डोळे झाकून तर बसतात. सर्वाचे जीव कामवासनेने भ्रमले आहे त्यामुळे धर्माचे खरे वर्म कशात आहे हे कसे कळून येईल. विषयाचा माज जिकडे-तिकडे सर्वाच्या अंगी लागलेला आहे त्यामुळे धर्म रक्षण कसे करावे धर्माचे खरे वर्म काय आहे याविषयी थोडी देखील लाज ते ठेऊ देत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात ही मायारूपी राक्षस लोकांना कशी नाचवीत आहे ते पहा.
अभंग क्र. २१५७
दुर्जनाची जोडी । सज्जनाचे खेंटर तोंडी ॥१॥
पाहे निमित्य ते उणे । धावे छळावया सुने ॥धृपद॥
न म्हणे रामराम । मने वाचे हे चि काम ॥२॥
तुका म्हणे भागा । आली निंदा करी मागा ॥३॥
अर्थ
वाईट कर्मे करून संतांचे खेटर तोंडावर मारून घेणे हीच खरी दुर्जनांची पावती आहे. संतांचे काहीतरी ऊने पाहण्याचे निमित्त करतात आणि त्यांना छळण्यासाठी हे दुर्जन लोक त्यांच्यावर कुत्र्यासारखे धावून जातात. वाचेणे कधी राम राम म्हणणार नाही परंतु संतांना सज्जनांना छळण्यासाठी त्यांना त्रास देण्यासाठी त्यांच्यावर धावून जाणे हेच त्यांचे काम आहे. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या पाठीमागे सज्जनांच्या पाठीमागे त्यांची निंदा करणे हेच या दुर्जन लोकांच्या भाग्यात म्हणजे नशिबात आहे.
अभंग क्र. २१५८
शादीचे ते सोंग । संपादिता राजा वेग ॥१॥
पाहा कैसी विटंबना । मूर्खा अभाग्याची जना ॥धृपद॥
दिसते ते लोपी । झिंज्या ओढोनिया पापी ॥२॥
सिंदळी त्या सती । तुका म्हणे थुंका घेती ॥३॥
अर्थ
राजाने केवळ एखाद्या नीच स्त्रीशी लग्न करण्याचे सोंग जरी केली तरी ते त्याला कमीपणा आणणारे ठरते. मूर्ख व अभागी लोकांची कशी सीमा झाली ती पहा, त्यांची विटंबना तुम्हीच पहा. काही लोक असे आहेत कि ते आपला चेहरा जरी चांगला दिसत असला तरी लपवून ठेवतात आणि डोक्यावरील केस वाढवून फिरतात असे हे पापी आहेत. तुकाराम महाराज म्हणतात पतिव्रता स्त्री जर व्याभिचारिणस्रीप्रमाणे वर्तन करू लागली किंवा तिच्या संगतित जरि राहु लागली तरी लोकांकडून तिला स्वतःचीच निंदा ऐकून घ्यावी लागते.
अभंग क्र. २१५९
भक्त म्हणऊनि वंचावे जीवे । तेणे शेण खावे काशासाठी ॥१॥
नासिले अडबंद कौपीन ते माळा । अडचण राउळामाजी केली ॥धृपद॥
अंगीकारिले सेवे अंतराय । तया जाला न्याय खापराचा ॥२॥
तुका म्हणे कोठे तगो येती घाणी । आहाच ही मनी अधीरता ॥३॥
अर्थ
काही मनुष्य स्वतःला थोर भक्त म्हणून घेतात आणि देवाची सेवा करण्याविषयी कामचुकारपणा करतात मग स्वतःला भक्त म्हणून काम चुकारपणा करण्याचे शेण कशासाठी खावे ? असे लोक करदुड्याला लंगोटी बांधतात गळ्यामध्ये माळा मुद्रांचे भूषण घालतात पण खरे तर त्यांनी परमार्थाचा नाश च केलेला असतो असे लोक देवळातही जातात आणि उगाचच अडचण करतात. अशा लोकांनी देवाची सेवा करण्याचे अंगिकारले असते परंतु देवाच्या सेवेपासून ते अंतरतात म्हणजे खापराचा स्पर्श जरी परिसाला झाला तरी त्याचे सोने होत नाही त्या न्यायाने यांची गती झालेली असते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या मनातच आधीरता आहे म्हणजे धैर्यच नाही अशा घाण लोकांच्या मनामध्ये परमार्थ तप धरील काय ?
अभंग क्र. २१६०
गयाळाचे काम हिताचा आवारा । लाज फजितखोरा असत नाही ॥१॥
चित्ता न मिळे ते डोळा सलो येते । असावे परते जवळूनि ॥धृपद॥
न करावा संग न बोलावी मात । सावधान चित्त नाही त्यासी ॥२॥
तुका म्हणे दुःख देतील माकडे । घालिती साकडे उफराटे ॥३॥
अर्थ
एखाद्या गबाळ्या व्यक्तीचे काम केले तर त्याला केलेले काम पटत नाही त्यामुळे त्याची फजिती होते आणि अशा फजित खोरला लाजही वाटत नसते. आपल्या चित्ताला जे पटत नाही ते पाहिल्याबरोबर आपल्या डोळ्याला ते सलते त्यामुळे अशा गबाळ्या व्यक्तींची मदत न करता त्यांच्या जवळ देखील आपण जाऊ नये. अशा मनुष्याला कोणत्याही प्रकारचा चांगला उपदेश करू नये त्याचा संग करू नये कारण आपण सांगितलेले समजून घेण्याची स्थिती त्याची नसते त्याचे चित्तच सावधान नसते. तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारची ही वानरे आहेत की त्यांना चांगला उपदेश केला तरी ते आपल्यालाच त्रास देऊन संकटातील टाकतील.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















