आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२२ एप्रिल, दिवस ११२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी ४७६ ते ५०० सार्थ तुकाराम गाथा अभंग १३३३ ते १३४४
“२२ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २२ Apirl
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २२ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
२२ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी ४७६ ते ५००,
476-9
जेथ अखंड वसिजे यागी । जे वेदांची वज्रांगी । जयाचिये दिठीचा उत्संगी । मंगळ वाढे ॥476॥
जे पृथ्वीवरील देवच; जे तपश्चर्येचे मूर्तिमंत अवतार; ज्यांच्या योगाने सर्व तीर्थाचे दैव उदय पावले आहे;
477-9
जे पृथ्वीतळींचे देव । जे तपोवतार सावयव । सकळ तीर्थांसी दैव । उदयले जे ॥477॥
ज्यांच्या ठिकाणी यज्ञाचा अखंड वास, जे वेदांची बळकट कवचे, व ज्यांच्या दृष्टींच्या संबंधाने सर्व ठिकाणी मंगलाची वृद्धि होते
478-9
जयाचिये आस्थेचिये वोले । सत्कर्म पाल्हाळी गेले । संकल्पे सत्य जियाले । जयांचेनि ॥478॥
ज्यांच्या आस्तारूप ओलाव्याने सत्कर्माचा प्रसार झाला, व ज्यांच्या निश्चयाने सत्य कायम राहिले;
479-9
जयांचेनि गा बोले । अग्नीसि आयुष्या जाहाले । म्हणोनि समुद्रे पाणी आपुले । दिधले यांचिया प्रीती ॥479॥
ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीचे आयुष्य वाढले म्हणून त्यांच्या प्रीतीस्तव अग्नीला समुद्राने आपल्या ठिकाणी आश्रय दिला.
480-9
मिया लक्ष्मी डावलोनि केली परौती । फेडोनि कौस्तुभ घेतला हाती । मग वोढविली वक्षस्थळाची वाखती । चरणरजा ॥480॥
मी लक्ष्मीला ढकलून पलीकडे केली, व कौस्तुभ मणि गळ्यातून काढून हातात घेतला;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
481-9
आझूनि पाउलांची मुद्रा । मी हृदयी वाहे गा सुभद्रा । जे आपुलिया दैवसमुद्रा । जतनेलागी ॥481॥
आणि मग ज्यांच्या चरणरजाच्या प्राप्तीकरिता मी आपल्या उराची खळगी म्हणजे छाती पुढे केली; ; हे नरेंद्रा, माझा शांतपणाचा लौकीक कायम राहण्याकरिता ज्यांच्या पावलाची खूण मी अजून आपल्या ह्रदयावर बाळगली आहे
482-9
जयांचा कोप सुभटा । काळाग्निरुद्राचा वसौटा । जयांचा प्रसादी फुकटा । जोडती सिद्धी ॥482॥
ज्यांचा कोप म्हणजे काळ, अग्नी व रुद्र यांचे वसतिस्थान होय, व जे प्रसन्न झाले असता फुकट सिद्धि प्राप्त होतात,
483-9
ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण । आणि माझा ठायी आर्तिनिपुण । आता माते पावती हे कवण । समर्थणे ॥483॥
असे पुण्यपुज्य जे ब्राह्मण, आणि त्यातून माझे ठिकाणी पूर्ण भक्ति करितात, ते मद्रूप होतात, यात सिद्ध ते काय करावयाचे आहे ?
484-9
पाहे पा चंदनाचेनि अंगानिळे । शिवतिले निंब होते जे जवळे । तिही निर्जिवीही देवांची निडळे । बैसणी केली ॥484॥
हे पहा, चंदनाच्या अंगवायूने स्पर्श केलेल्या जवळच्या कमी किंमतीच्या लिंबासही जर देवाच्या मस्तकावर स्थान मिळते
485-9
मग तो चंदनु तेथ न पवे । ऐसे मनी कैसेनि धरावे । अथवा पातला हे समर्थावे । तेव्हा कायि साच ॥485॥
तर मग चंदनाचे वास्तव्य तेथे घडणार नाही, अशी मनात शंका कशी धरावी ? अथवा, त्या ठिकाणी त्याचे वास्तव्य घडले असे सांगितल्यावर खरे वाटावे,
486-9
जेथ निववील ऐसिया आशा । हरे चंद्रमा आधा ऐसा । वाहिजत असे शिरसा । निरंतर ॥486॥
नाही तर खोटे का होईल ?विष प्राशन केल्याने त्यापासून होणाऱ्या दाहाचे शमन होईल अशा आशेने, शंकरांनी मस्तकावर निरंतर अर्धचंद्रधारण केला,
487-9
तेथ निवविता आणि सगळा । परिमळे चंद्राहूनि आगळा । तो चंदनु केवि अवलीळा । सर्वांगी न बैसे ॥487॥
तर दाहाचे शमन करणारा, व पुर्ण आणि चंद्राहून सुवासाने अधिक असा जो चंदन, तो सर्वागावर सहजचका धारण केला जाणार नाही ?
488-9
का रथ्योदके जियेचिये कासे । लागलिया समुद्र जाली अनायासे । तिये गंगेसि काय अनारिसे । गत्यंतर असे ॥488॥
किंवा रस्त्यावरील उदक जिच्यात मिळाल्यामुळे समुद्रात सहज जाऊन मिळतात त्या गंगेला समुद्राशिवाय दुसरीगति आहे काय ?
489-9
म्हणोनि राजर्षि का ब्राह्मण । जया गती मती मीचि शरण । तया त्रिशुद्धी मीच निर्वाण । स्थितिही मीचि ॥489॥
म्हणून ज्यांना गति व ज्ञान देणारा आणी ज्यांचे रक्षण करनारा मीच आहे, त्या राजर्षीना व ब्राह्मणांना भुक्ति व मुक्ति खरोखर मीच आहे.
490-9
यालागी शतजर्जरे नावे । रिगोनि केवि निश्चिंत होआवे । कैसेनि उघडिया असावे । शस्त्रवर्षीं ॥490॥
यास्तव शतावधि छिद्रांच्या नावेत बसून आपण बुडनार नाही अशा भरवशाने निष्काळजी कसे राहावे ? तसेच शस्त्रांचा वर्षाव चालला असता आपल्याला दुखापत होणार नाही अशा भरंवशाने उधड्या अंगाने कसे फिरावे ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
491-9
अंगावरी पडता पाषाण । न सुवावे केवि वोडण । रोगे दाटलिया आणि उदासपण । वोखदेसी ॥491॥
अंगावर दगड पडत असता ढाल का न पुढे करावी ? रोगाने त्रस्त असता औषध घेण्याविषयी कसे उदासीन असावे ?
492-9
जेथ चहूकडे जळत वणवा । तेथूनि न निगिजे केवि पांडवा । तेवि लोका येऊनिया सोपद्रवा । केवि न भजिजे माते ॥492॥
हे अर्जुना चोहोकडुन वणवा लागल्यावर तेथुन बाहेर कसे पंडु नये ? त्याचप्रमाणे उपद्रवासहीत असलेला जो मृत्युलोक त्यात जन्मल्यावर माझे भजन का न करावे ?
493-9
अगा माते न भजावयालागी । कवण बळ पा आपुला आंगी । काइ घरी की भोगी । निश्चिती केली ॥493॥
अरे, मला न भजण्याविषयी मनुष्यांच्या अंगी असे कोणते सामर्थ्य आहे ? त्यांच्या घरी सर्व भोग्य वस्तुंची समृद्धि असल्यामुळे ते निष्काळजी झाले काय ?
494-9
नातरी विद्या की वयसा । या प्राणियासि हा ऐसा । मज न भजता भरवसा । सुखाचा कोण ॥494॥
का, मला न भजता विद्या, तारूण्य यापासुन सुखप्राप्ति होईल असा प्राण्यांना भरवसा आहे ?
495-9
तरी भोग्यजात जेतुले । ते एका देहाचिया निकिया लागले । आणि येथ देह तव असे पडिले । काळाचा तोंडी ॥495॥
तर बाबारे, जितक्या म्हणून भोग्य वस्तू आहेत तितक्या एका देहाच्या सुखाकरीता उत्पन्न केलेल्या आहेत, आणि पाहू गेलेअसता ह्या मृत्युलोकी देह काळाच्या तोंडात पडलेला आहे !
496-9
बाप दुःखाचे केणे सुटले । जेथ मरणाचे भरे लोटले । तिये मृत्युलोकीचियेशेवटिले । येणे जाहाले हाटवेळे ॥496॥
या मृत्युलोकाच्या बाजारांत दुःखरूपी माल भरलेलाअसून मरणरूपी माप चालले आहे त्या ठिकाणी बाजार उठण्याचे समयी मनुष्यरूपाने येणे झाले आहे.
497-9
आता सुखेसि जीविता । कैची ग्राहिकी कीजेल पंडुसुता । काय राखोंडी फुंकिता । दीपु लागे ॥497॥
तर हे पंडूसुता, अशा वेळी जीवाला सुख होईल अशी कोनती खरेदी करता येईल ? हे पहा (विस्तव विझून गेल्यावर राहीलेली) राख फुंकून दिवा लागेल का ?
498-9
अगा विषाचे कांदे वाटुनी । जो रसु घेइजे पिळुनी । तया नाम अमृत ठेउनी । जैसे अमर होणे ॥498॥
ज्याप्रमाणे विषाचे कांदे वाटून त्याचा रस काढावा व त्याला अमृत हे नाव देऊन तो प्यावा आणि अमर होण्याची इच्छा करावी.
499-9
तेवि विषयांचे जे सुख । ते केवळ परम दुःख । परि काय कीजे मूर्ख । न सेविता न सरे ॥499॥
त्याप्रमाणे विषयापासून होणारे जे सुख नव्हे, ते परमदुःख होय, पण काय करावे, मूर्ख लोक विषयसुख भोगल्यावाचून राहत नाहीत.
500-9
का शीस खांडूनि आपुले । पायीचा खती बांधिले । तैसे मृत्युलोकीचे भले । आहे आघवे ॥500॥
किंवा आपले मस्तक तोडून ते जसे पायाला झालेल्या क्षतावर बांधावे, त्या प्रमाणे या मृत्युलोकातील सर्व विषयसुख आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ११२ वा, २२, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १३३३ ते १३४४
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. १३३३
गोदेकांठी होता आड । करूनि कोड कवतुके ॥१॥
देखण्यांनी एक केले । आइत्या नेले जिवनापे ॥धृपद॥
राखोनिया होतो ठाव । अल्प जीव लावूनि ॥२॥
तुका म्हणे फिटे धनी । हे सज्जनी विश्रांति ॥३॥
अर्थ
एकदा एका माणसाला गोदावरीच्या काठावर खूप तहान लागली व तेथे एक आड, विहीर होते ते पाहून तो खूप आनंदीत झाला व तो ज्याने आड, विहीर निर्माण केली त्याचे कौतुक करू लागला. दुसऱ्या एका मनुष्याने पाहिले व तो त्या मनुष्याला म्हणू लागला अरे पाणी काढण्याचे श्रम करण्यापेक्षा पलीकडे गोदावरीचा तीर्थ आहे तिथे जा पाणी काढण्याचे श्रम लागणार नाही. त्या आडाच्या नादी लागणाऱ्या मनुष्य सारखा मीही संसारातील उपाधीना जीव लावत बसलो होतो. तुकाराम महाराज म्हणतात मला संतांच्या संगती मुळे सर्व उपाधीच्या भ्रमाचा निरास झाला आणि माझी इच्छा पूर्ण होऊन परमात्मसुखाची विश्रांती त्यांनी मला प्राप्त करून दिली.
अभंग क्र. १३३४
न पाहे माघारे आता परतोनि । संसारापासूनि विटला जीव ॥१॥
सामोरा येऊनि कवळी दातारा । काळाचा हाकारा न साहावे ॥धृपद॥
सावधान चित्त होईल आधारे । खेळता ही बरे वाटईल ॥२॥
तुका म्हणे कंठ दाटला या सोसे । न पवेचि कैसे जवळी हे ॥३॥
अर्थ
मी संसाराकडे मागे वळून पाहणार नाही कारण आता या संसारापासून माझा जीव आटला आहे. हे दातारा मला काळाचा हाकारा सहन होत नाही त्यामुळे तू माझ्या समोर येऊन मला कवटाळ. तू जवळ आलास की माझे चित्त सावधान होईल व तुझा आधार माझ्या चीत्ताला राहील आणि मग मी संसारातील कोणतेही खेळ खेळताना काहीच मला वाटणार नाही उलट बरे वाटेल. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या भेटी करता माझा कंठ दाटला आहे तरीही तू माझ्या जवळ का येत नाही ?
अभंग क्र. १३३५
मथनीचे नवनीत । सर्व हितकारक ॥१॥
दंडवत दंडा परी । मागे उरी नुरावी ॥धृपद॥
वचनाचा तो पसरुं काई । तांतडी डोईपाशींच ॥२॥
तुका म्हणे जगजेठी । लावी कंठी उचलूनि ॥३॥
अर्थ
मंथन केलेले नवनीत हे सर्व प्रकारे हितकारक आहे. देवा तुम्हीही तसेच आहात त्यामुळे मी तुम्हाला साष्टांग नमस्कार करत आहे. तुझ्याशी बोलण्याचा पाल्हाळ करण्यात काही उपयोग नाही. तुझ्या पायावर डोके ठेवण्याची तातडी करणे हेच बरोबर. तुकाराम महाराज म्हणतात हे जग जेठी तू मला उचलून तुझ्या कंठाशी लाव.
अभंग क्र. १३३६
अवचितचि हाती ठेवा । दिला सेवा न करिता ॥१॥
भाग्य फळले जाली भेटी । नेघें तुटी यावरी ॥धृपद॥
दैन्य गेले हरली चिंता । सदैव आता यावरी ॥२॥
तुका म्हणे वाटा जाला । बोलोंबोला देवासी ॥३॥
अर्थ
देवाची कोणत्याही प्रकारची सेवा न करता या देवाने माझ्या हातात अवचितच आत्मसुखाचा मेवा दिला आहे. माझे भाग्य फळाला आले म्हणून मला देवाची भेट झाली. आता मी देवाचा वियोग घडू देणार नाही. आमचे दैन्य गेले सर्व चिंता नाहीशी झाली आम्ही यापुढे असेच भाग्यवान राहणार आहोत. तुकाराम महाराज म्हणतात देवाने मला माझा वाटा दिला त्यामुळे मी देवाशी गोड गोड गप्पा मारत आहे.
अभंग क्र. १३३७
समर्थाची धरिली कास । आता नाश काशाचा ॥१॥
धावे पावे करीन लाहो । तुमचा आहो विठ्ठला ॥धृपद॥
न लगे मज पाहाणे दिशा । हाकेसरिसा ओढसी ॥२॥
तुका म्हणे नव्हे धीर । तुम्हा स्थिर दयेने ॥३॥
अर्थ
सर्वसमर्थ असा देव आता मी त्याची कास धरली आहे. त्यामुळे माझा नाश कसा होईल ? अहो विठ्ठला धावे, पावे हा तुमचा धावा मी करीत राहील. मी तुला हाक मारल्यावर तू माझ्याजवळ ओढल्यासारखा येतोस. त्यामुळे मला इतर कोणतीही दिशा पाहण्याची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या पोटी दया पण आहे आणि त्यामुळे माझ्यावर कोणतेही संकट आले तर तुम्हाला धीर धरवतच नाही.
अभंग क्र. १३३८
करू तैसे पाठांतर । करुणाकर भाषण ॥१॥
जिही केला मूर्तीमंत । ऐसा संतप्रसाद ॥धृपद॥
सोज्ज्वळ केल्या वाटा । आइत्या नीटा मागीलां ॥२॥
तुका म्हणे घेऊ धावा । करू हावा ते जोडी ॥३॥
अर्थ
देवा आम्ही असे पाठांतर करू की तुला आमची करूणाकर येईल. ज्यामुळे मूर्तिमंत संताचा प्रसाद आपल्या मिळेल. पूर्वी ऋषीमुनींनी ज्या स्वज्वळ वाटा निर्माण केल्या त्या झाडून संतांनी पुन्हा नीट नाटक्या केल्या. तुकाराम महाराज म्हणतात त्याच वाटेवर आपण धाव घेऊ आणि संतांनी जो लाभ मिळून घेतला आहे त्याचीच प्राप्ती करून घेण्याची हाव मनात धरु.
अभंग क्र. १३३९
अचळ न चळे ऐसे जाले मन । धरूनि निजखुण राहिलो ते ॥१॥
आवडी बैसली गुणाची अंतरी । करू धणीवरी सेवन ते ॥धृपद॥
एकविध भाव नव्हे अभावना । आणिक या गुणा न मिळवे ॥२॥
तुका म्हणे माझे पडिले आहारी । ध्यान विटेवरी ठाकले ते ॥३॥
अर्थ
माझे मन चंचल होते ते आता स्थिर झाले आहे कारण संतांनी मला निजखून दाखविली आहे तीच निजखून मी धरून राहिलो आहे. देवाच्या गुणाची आवड अंतरंगात बसली आहे आता त्याच गुणाचे तृप्ती होईपर्यंत पोट भरून सेवण करू. देवाच्या ठिकाणी जो काही भक्तिभाव लपला आहे त्या ठिकाणी अभावाने होणे शक्य नाही. आणि इतर कोणत्याही गुणामध्ये माझे मन अगदी प्रपंच सुखांमध्ये देखील समरस होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात जे विटेवर समचरण उभे आहे त्याचे मी ध्यान केले असता तेच माझ्या पचनी पडले आहे.
अभंग क्र. १३४०
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा । आणीक मी देवा काही नेणे ॥१॥
गाये नाचे उडे आपुलिया छंदे । मनाच्या आनंदे आवडीने ॥धृपद॥
लाज भय शंका दुराविला मान । न कळे साधन यापरते ॥२॥
तुका म्हणे आता आपुल्या सायासे । आम्हा जगदीशे सांभाळावे ॥३॥
अर्थ
देवा वैष्णवांच्या संगतीत माझ्या जीवाला फार सुख वाटते. यावाचून दुसरे काहीच मी जाणत नाही. मनाच्या आनंदामध्ये हरीचे नाम मुखाने गातो नाचतो आणि उड्या मारतो त्याच छंदात मी रंगून जातो. आता माझी लाज, भय, शंका आणि मान अपमान हे सर्व दूर झाले आहेत. वैष्णवांच्या संगती वाचून मला दुसरे कोणतेही साधन कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता या जगदीशाने आमचा सांभाळ करावा.
अभंग क्र. १३४१
शरण शरण वाणी । शरण त्रिवाचा विनवणी ॥१॥
स्तुती न पुरे हे वाचा । सत्य दास मी दासांचा ॥धृपद॥
देह सांभाळून । पायावरी लोटांगण ॥२॥
विनवी तुका संता दीन । नोहे गौरवे उत्तीर्ण ॥३॥
अर्थ
हे संतजनहो मी तुम्हाला काकुळतीला येऊन त्रिवार हीच विनंती करत आहे की तुम्हाला मी शरण आलो आहे. तुमची स्तुती माझ्या वाचेने होत नाही परंतु मी तुम्हाला एक सत्य सांगत आहे की मी तुमच्या दासांचा ही दास आहे. मी माझ्या देहाची कोणतीही पर्वा न करता तुमच्या पायावर लोटांगण घेत आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे संतांनो मी दिन आहे आणि माझ्या वाणीने तुमची कितीही स्तुती केली तरी तुमच्या उपकरातून उत्तीर्ण होणे अशक्य आहे.
अभंग क्र. १३४२
लेकरा लेववी माता अळंकार । नाही अंतपार आवडीसी ॥१॥
कृपेचे पोसणे तुमचे मी दीन । आजि संतजन मायबाप ॥धृपद॥
आरुषा उत्तरी संतोषे माउली । कवळूनि घाली हृदयात ॥२॥
पोटा आले त्याचे नेणे गुणदोष । कल्याणाचि आस असावे हे ॥३॥
मनाची ते चाली मोहाचिये सोई । ओघ गंगा काई परतो जाणे ॥४॥
तुका म्हणे कोठे उदार मेघा शक्ती । माझी तृषा किती चातकाची ॥५॥
अर्थ
आई आपल्या लेकराला आवडीने अलंकार घालते व त्याला पाहिल्यानंतर तिच्या आनंदाला अंतपार नसते. त्याप्रमाणे हे संतजनहो तुम्ही माझे मायबाप आहात आणि तुमच्या कृपेने पोचला जाणारा मी दिन आहे. मुल कसेही बोलले तरी त्याच्या आईला संतोष वाटतो व ती आई त्याला आपल्या हृदयाशी धरून कवटाळते. आपल्या पोटी आलेल्या मुलाचे गुणदोष आई पाहत नसते उलट त्याचे कल्याण व्हावे हीच तिची इच्छा असते. मुलाविषयी त्या आईचा मोह असतो त्यामुळेच तिचे मुलाकडे मन धाव घेते. गंगेचा प्रवाह कधी मागे फिरतो का, त्याप्रमाणे आईचे मन त्या मुला पासून कधीच मागे फिरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मेघाला वर्षाव करण्याची शक्ती अमर्याद असते, मग माझ्यासारख्या चातकाची तहान आहे ती म्हणजे किती, संत हे म्हणजे मेघाप्रमाणे आहेत तर मी चातकाप्रमाणे आहे.
अभंग क्र. १३४३
युक्ती तव झाल्या कुंठीत सकळा । उरली हे कळा जीवनाची ॥१॥
संतचरणी भावे ठेविले मस्तक । जोडोनि हस्तक राहिलोंसे ॥धृपद॥
जाणपणे नेणे काहीचि प्रकार । साक्षी ते अंतर अंतरासी ॥२॥
तुका म्हणे तुम्ही केले अभयदान । जेणे समाधान राहिलोसे ॥३॥
अर्थ
संतांविषयी युक्ती आणि दृष्टांत आता कुंठित झाले आहे. आता उरले ते फक्त त्यांच्याविषयी कार्याचा भाग. संतांच्या पुढे मी भक्तिभावाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो आहे. आणि त्यांच्यापुढे मी माझे दोन्ही हात जोडून उभा आहे, मी माझ्या शहाणपणाच्या जोरावर परमार्थातील कोणतेही गुढ जाण्यास गेलो तर ते मला कळत नाही याविषयी माझे मनच मला साक्षी आहे. अर्थात संतांची कृपा झाल्याशिवाय काहीही कळत नसते. तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही संतजनांनी मला “भिऊ नकोस” असे अभयदान दिले त्यामुळेच मी निवांत राहिलो आहे.
अभंग क्र. १३४४
हा गे आलो कोणी म्हणे बुडतिया । तेणे किती तया बळ चढे ॥१॥
तुम्ही तव भार घेतला सकळ । आश्वासिलो बाळ अभयकरे ॥धृपद॥
भुकेलिया आस दाविता निर्धार । किती होय धीर समाधान ॥२॥
तुका म्हणे दिली चिंतामणीसाठी । उचित कांचवटी दंडवत ॥३॥
अर्थ
पाण्यात बुडत असलेल्या माणसाला जर म्हटले की ‘थांब मी आलोय ” तर त्याला किती बळ येते. त्याप्रमाणे तुम्ही संतांनी माझा सर्व भार तुमच्या माथ्यावर घेतला आहे व माझ्यासारख्या बाळाच्या मस्तकावर तुमचा अभय हस्त ठेवून “भिऊ नकोस” असे आश्वासन तुम्ही मला दिले आहे. एखाद्या भुकेलेल्या मनुष्याला म्हटले की थांब मी तुला जेवू घालतो तर त्याला किती समाधान मिळते. तुकाराम महाराज म्हणतात की संतांनी माझा सर्व भार त्यांच्या माथी घेतला व त्या बदल्यात मी त्यांना फक्त साष्टांग नमस्कार केला, हे म्हणजे असे झाले की त्यांनी मला चिंतामणी रत्न द्यावा आणि मी त्यांना त्या बदल्यात काचेचा तुकडा द्यावा.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















