२७ मे, दिवस १४७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ५०१ ते ५२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १७५३ ते १७६४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२७ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २७ May
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २७ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १७५३ ते १७६४ चे पारायण आपण करणार आहोत.
२७ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ५०१ ते ५२५,

501-11
मग म्हणतसे देवा । तू सूत्री विश्वलाघवा । जग आला मा आघवा । पूर्वस्थिति पुढती ॥501॥
तेव्हा मग अर्जुन म्हणू लागला, देवा ! विश्वरूपी मायाखेळाचा तू सूत्रधार आहेस. पुनः हे जग पूर्वस्थितीत आले ना !
502-11
परी पडिलिया दुःखसागरी । तू काढिसी का जयापरी । ते कीर्ति तुझी श्रीहरी । आठवित असे ॥502॥
परंतु दुःखसागरात पडलेल्या आपल्या भक्तांना तू बाहेर काढतोस, अशी जी तुझी कीर्ती आहे, त्या कीर्तीची माझ्या अंतःकरणात आठवण होत आहे.
503-11
कीर्ति आठविता वेळोवेळा । भोगितसे महासुखाचा सोहळा । तेथ हर्षामृतकल्लोळा । वरी लोळत आहे ॥503॥
ती कीर्ती पुनः पुनः आठवतांना मी चित्तात अत्यंत सुखाचा सोहळाही भोगत आहे आणि तेथे त्या सुखातील हर्षरूपी अमृताच्या लाटांवर मी लोळत आहे.
504-11
देवा जियालेपणे जग । धरी तुझ्या ठायी अनुराग । आणि दुष्टा तया भंग । अधिकाधिक ॥504॥
देवा ! तू दान दिल्यामुळे हे जग तुझ्या ठिकाणी प्रेम करीत आहे आणि दुष्टांचा अधिकाधिक जीव मनोभंग होत आहे.
505-11
पै त्रिभुवनींचिया राक्षसा । महाभय तू हृषीकेशा । म्हणौनि पळताती दाही दिशा । पैलीकडे ॥505॥
कारण त्रैलोक्याच्या सर्व राक्षसांना, भगवंता ! तू महाभयरूप वाटतोस; म्हणून ते दाही दिशांच्या पलीकडे पळून जात आहेत.

506-11
येथ सुर नर सिद्ध किन्नर । किंबहुना चराचर । ते तुज देखोनि हर्षनिर्भर । नमस्कारित असती ॥506॥
बाकीचे देव, मनुष्य, सिध्द, किन्नर, किंबहुना सर्व प्राणी तुला अत्यंत आनंदित पाहून तुला नमस्कार करीत आहेत.

कस्माच्च ते न नमेरन्महात्मन्
गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे ।
अनन्त देवेश जगन्निवास
त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् ॥11. 37॥

अर्थ हे महात्मन्, अत्यंत महान्, महद्ब्रह्माचा देखील आदिकर्ता जो तू, त्या त्या तुला राक्षस इत्यादि का नमस्कार करत नाहीत ? हे अनंता, देवाधिदेवा, जगन्निवासा, तू अक्षर व सत् व असत् म्हणून जे आहे ते तू आहेस व त्याच्या अतीत जे आहे तेही तू आहेस ॥37॥
507-11
एथ गा कवणा कारणा । राक्षस हे नारायणा । न लगतीचि चरणा । पळते जाहले ॥507॥
हे नारायणा ! येथे हे राक्षस कोणत्या कारणाने तुझ्या चरणाला नमस्कार न करतांच पळून जात आहेत ?
508-11
आणि हे काय तूते पुसावे । येतुले आम्हासिही जाणवे । तरी सूर्योदयी राहावे । कैसेनि तमे ॥508॥
आणि हे तुला कशाला विचारायला पाहिजे ?एवढे आम्हालाहि कळते की, सूर्योदय झाल्यावर अंधाराने कसे राहावयाचे.
509-11
जी तू प्रकाशाचा आगरु । आणि जाहला आम्हासि गोचरू । म्हणौनिया निशाचरा केरु । फिटला सहजे ॥509॥
देवा ! तूच स्वयंप्रकाशाचे अमर्याद कोठार आहेस आणि तोच तू आम्हाला प्रत्यक्ष दृष्टीस पडला आहेस; म्हणून संपूर्ण राक्षसरूपी केर कचरा सहजच नाहीसा झाला.
510-11
हे येतुले दिवस आम्हा । काही नेणवेचि श्रीरामा । आता देखतसो महिमा । गंभीर तुझा ॥510॥
इतकेदिवस हे भगवंता ! आम्ही हे काहीच जाणत नव्हतो. आता तुझा आगाध महिमा आम्हाला कळून आला आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

511-11
जेथूनि नाना सृष्टींचिया वोळी । पसरती भूतग्रामाचिया वेली । तया महद्ब्रह्माते व्याली । दैविकी इच्छा ॥511॥
जेथून अनंत सृष्टीच्या रांगा व चतुर्विध प्राण्यांच्या वेली पसरतात, त्या अव्यक्त मायेला तुच देवाच्या इच्छेने जन्म दिला.
512-11
देवो निःसीम तत्त्व सदोदितु । देवो निःसीम गुण अनंतु । देवो निःसीम साम्य सततु । नरेंद्र देवांचा ॥512॥
सदासर्वदा असणारी अमर्याद सत्ता देवा ! तूच आहेस. अनंत व अर्याद गुणस्वरूप तूच आहेस. नित्य व अमर्याद अशी समब्रह्मस्थिती तूच आहेस. तू देवांचाही देव आहेस.
513-11
जी तू त्रिजगतिये वोलावा । अक्षर तू सदाशिवा । तूचि सदसत् देवा । तयाही अतीत ते तू ॥513॥
तू त्रैलोक्याचा जिव्हाळा असून, हे सदाशिवा ! तू अविनाशी आहेस. कार्यकारणरूप जगत तूच झाला असून, त्यावेगळे जे आहे, तेही तूच आहेस.

त्वमादिदेवः पुरुषः पुराण
स्त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।
वेत्तासि वेद्यं च परं च धाम
त्वया ततं विश्वमनन्तरूप ॥11. 38॥

अर्थ तू आदिदेव, पुराणपुरुष आहेस. तू या विश्वाचे अखेरीचे स्थान आहेस. (म्हणजे प्रलयकाली विश्व तुझ्यामधे लीन होईल). तू सर्व जाणतोस. जाणण्याला अत्यंत योग्य तू आहेस. अत्यंत श्रेष्ठ असे आश्रयस्थान तू आहेस. हे अनंतरूपा तू हे विश्व विस्तारले आहेस. ॥11-38॥
514-11
तू प्रकृतिपुरुषांचिया आदी । जी महत्तत्वा तूचि अवधी । स्वये तू अनादि । पुरातनु ॥514॥
देवा ! तू या प्रकृतिपुरुषाचाही आदी म्हणजे कारण आहेस. जी भगवंता ! महत्वाचे शेवटही तूच आहेस. स्वतः तू अनादी पुरातन आहेस.
515-11
तू सकळ विश्वजीवन । जीवांसि तूचि निधान । भूतभविष्याचे ज्ञान । तुझ्याचि हाती ॥515॥
तू सर्व विश्वाचे जीवन असून, सर्व जीवाचे अधिष्ठान तूच आहेस आणि भूत भविष्यज्ञान तुझ्या स्वाधीन आहे.

516-11
जी श्रुतीचिया लोचना । स्वरूपसुख तूचि अभिन्ना । त्रिभुवनाचिया आयतना । आयतन तू ॥516॥
तू वेदांचे डोळे आहेस. आत्मस्वरूपाशी तू अभिन्न आहेस आणि म्हणून आत्मस्वरूपाचे सुखही तूच आहेस. तूच संपूर्ण त्रिभुवनाला आधार असणार्‍या विश्वरूपालाही आधार आहेस.
517-11
म्हणौनि जी परम । तूते म्हणिजे महाधाम । कल्पांती महद्ब्रह्म । तुजमाजी रिगे ॥517॥
म्हणून भगवंता ! तुला सर्वश्रेष्ठ म्हणतात व सर्वाचे अंतिम वसतिस्थान तुलाच म्हणतात. कल्पाचे शेवटी ही माया तुझ्या ठिकाणीच लीन होते.
518-11
किंबहुना तुवा देवे । विश्व विस्तारिले आहे आघवे । तरि अनंतरूपा वानावे । कवणे तूते ॥518॥
किंबहूना तूच संपूर्ण जगत्स्वरूपाने प्रगट झाला आहेस, तेव्हा हे विश्वरूपा ! तुझे वर्णन करण्यास कोण समर्थ आहे ?

वायुर्यमोग्निर्वरुणः शशाङ्कः
प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च ।
नमो नमस्तेऽस्तुसहस्रकृत्वः
पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥11. 39॥

नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व । अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः ॥11. 40॥
अर्थ वायु, यम, अग्नि, वरुण, चंद्र ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचाही पिता तू आहेस. तुला नमस्कार असो. सहस्रवधि नमस्कार असोत. पुन्हा पुन्हा तुला नमस्कार असो. ॥11-39॥हे सर्वत्र असणार्‍या प्रभो, पुढून, मागून, सर्व बाजूंनी तुला नमस्कार असो. सामर्थ्याला अंत नसलेला व पराक्रमाला इयत्ता नसलेला तू आहेस. तू सर्व व्यापतोस, तस्मात् सर्व तूच आहेस. ॥11-40॥
519-11
जी काय एक तू नव्हसी । कवणे ठायी नससी । हे असो जैसा आहासी । तैसिया नमो ॥519॥
देवा ! तू काय नाहीस व कोणत्या ठिकाणी नाहीस ? हे असो. जसा तू आहेस, तशाच तुला नमस्कार असो.
520-11
वायु तू अनंता । यम तू नियमिता । प्राणिगणी वसता । अग्नि तो तू ॥520॥
अनंता ! तूच वायू असून, प्राण्यांना कर्माप्रमाणे शासन करणारा यम तूच आहेस. सर्व प्राणिमात्रांच्या जठरात राहणारा अग्नि तूच आहेस.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

521-11
वरुण तू सोम । स्रष्टा तू ब्रह्म । पितामहाचाही परम । आदि जनक तू ॥521॥
वरूण, सौम, सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेव व ब्रह्माचाही उत्पन्नकर्ता असा परमकारण तूच आहेस.
522-11
आणिकही जे जे काही । रूप आथि अथवा नाही । तया नमो तुज तैसयाही । जगन्नाथा ॥522॥
आणिकही रूप आहे किंवा रूप नाही जे जे काही आहे, ते तूच आहेस, देवा ! तशा तुला नमस्कार असो.
523-11
ऐसे सानुरागे चित्ते । नमन केले पंडुसुते । मग पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥523॥
अशा रितीने प्रेमयुक्त चित्ताने भगवंताला अर्जुनाने नमन केले आणि पुनः भगवंता ! तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो, असेच म्हणू लागला.
524-11
पाठी तिये साद्यंते । न्याहाळी श्रीमूर्तीते । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥524॥
नंतर त्या संपूर्ण विश्वरूपाकडे पाहून पुनः भगवंता ! तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो असेच म्हणू लागला.
525-11
पाहता पाहता प्रांते । समाधान पावे चित्ते । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥525॥
एका एका अवयवाकडे पाहात पाहात, मनात परम संतोष मानून पुनः भगंवंता तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो असे म्हणू लागला

दिवस १४६ वा, २७, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १७५३ ते १७६४
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. १७५३
धन्य ते पंढरी धन्य भीमातीर । आणियेले सार पुंडलिके ॥१॥
धन्य तो हि लोक अवघा दैवाचा । सुकाळ प्रेमाचा घरोघरी ॥धृपद॥
धन्य ते ही भूमी धन्य तरुवर । धन्य ते सुरवर तीर्थरूप ॥२॥
धन्य त्या नरनारी मुखी नाम ध्यान । आनंदे भवन गर्जतसे ॥३॥
धन्य पशु पक्षी कीटक पाषाण । अवघा नारायण अवतरला ॥४॥
तुका म्हणे धन्य संसार ती आली । हरीरंगी रंगली सर्वभावे सर्वभावे ॥५॥
अर्थ

सर्व वेद, शास्त्रांचे सार असा जो पांडुरंग त्याला पुंडलिकाने पंढरीत आणले आहे म्हणून ती पंढरी धन्य आहे व ते भीमातीर ही धन्य आहे. त्या ठिकाणी राहणारे लोकही धन्य आहेत कारण देवाच्या दारामध्ये राहणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या घरी भक्ती प्रेमाचा सुकाळा आहे. त्या पंढरी मधील भूमि ही धन्य आहे तेथील झाडेझुडपे धन्य आहेत आणि तीर्थरूप सरोवरही धन्य आहे. त्या पंढरीतील नर व नारी हेही धन्य आहेत कारण त्यांच्या मुखामध्ये नेहमी विठ्ठलाचे नाम व चित्तामध्ये त्याचेच ध्यान आहे त्यामुळे हे पंढरी क्षेत्र, पंढरी भुवन विठ्ठलाच्या आनंदाने व नामा ने गर्जुन गेले आहे. त्या पंढरीतील पशुपक्षी, कीटक, पाषाण देखील धन्य आहेत कारण या सर्वासाठीच नारायणाने तेथे अवतार घेतला आहे. तुकाराम महाराज म्हणतात या संसारात जन्माला येऊन जे सर्व भाविक हरी रंगात रंगले ते खरोखरच धन्य आहेत.
अभंग क्र. १७५४
मायबाप करिती चिंता । पोर नाइके सांगता ॥१॥
नको जाऊ देउळासी । नेतो बागुल लोकासी ॥धृपद॥
वैष्णवा संगती । हाती पडली नेणो किती ॥२॥
कर्णद्वारे पुराणिक । भुलवी शब्दे लावी भीक ॥३॥
आम्हा कैचा मग । करिसी उघडियांचा संग ॥४॥
तुका म्हणे जाणे नरका । त्यांचा उपदेश आइका ॥५॥
अर्थ

एखादा मुलगा परमार्थ करतो आणि ते त्याच्या आई बापाला आवडत नाही मग त्याच्याविषयी त्याच्या आई बापाला फार चिंता लागते ते म्हणतात काय करावे याला कितीही सांगितलं तरी हा ऐकतच नाही. मग ते आईबाप त्या मुलाला म्हणतात अरे तू त्या देवळामध्ये जाऊ नकोस बंर कारण तेथे बागुलबुवा आहे तो लोकांना धरून नेत असतो. अरे त्याची भक्ती करणाऱ्या वैष्णवा च्या संगतीत असे किती लोक आहेत की त्यांचे हात साफडले आहेत. आणि हे पुराणिक लोक कानात असे सांगतात की जग मिथ्या आहे व त्याची कथा पटवून सांगतात आणि त्यांच्या शब्दात भुलुन टाकून भिकेला लावतात. अरे तू जर त्या उघड्या वैष्णवाची संगती करशील तर तु ही त्यांच्यासारखाच होशील मग आमची सेवा करण्यासाठी ईथे कोण राहील ? तुकाराम महाराज म्हणतात ज्या मुलाला अशा दुष्ट आई बापाचा उपदेश ऐकून नरकाला जायचं असेल त्यांनी त्यांचा उपदेश ऐकावा.
अभंग क्र. १७५५
मन माझे चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ स्थिर नाही ॥१॥
आता तू उदास नव्हे नारायणा । धावे मज दीना गांजियेले ॥धृपद॥
धाव घाली पुढे इंद्रियांचे ओढी । केले तडातडी चित्त माझे ॥२॥
तुका म्हणे माझा न चले सायास । राहिलो हे आस धरुनी तुझी ॥३॥
अर्थ

देवा माझे मन फार चपळ आहे ते निश्चिंत एका ठिकाणी राहत नाही, एक घडी काय एक क्षण स्थिर राहत नाही. त्यामुळे हे नारायणा तू माझ्या विषयी उदास होऊ नकोस मी दिन आहे त्रासलेलो आहे त्यामुळे तु माझ्याकडे लवकर धाव घे. देवा माझे इंद्रिय माझ्या मनाचेच ऐकतात व माझे मन विषयाकडे ओढ घेते त्यामुळे माझ्या चित्ताची त्यांनी तडातोड केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा आता ह्या मनापुढे माझे काहीही चालत नाही आता तुच ह्या मनाला हरी नामाची ओढ लावुन एका ठिकाणी चित्त स्थिर करशील अशी अपेक्षा मी तुझ्यापाशी धरून राहिलो आहे.
अभंग क्र. १७५६
मागतियाचे दोनचि कर । अमित भांडार दातियाचे ॥१॥
काय करू आता कासयात भरू । हा मज विचारु पडियेला ॥धृपद॥
एके साठवणे प्रेमे वोसंडली । जिव्हा हे भागली करिता माप ॥२॥
तुका म्हणे आता आहे तेथे असो । अंकुनिया बैसो पायापाशी ॥३॥
अर्थ

दान देणाऱ्याला दोनच हात आहेत परंतु दात्याच्या घरी अमीत प्रेम रुपी भांडार भरलेले आहे. आता मी काय करू तुझे प्रेम रुपी दान कशात भरू हा विचारच मला पडलेला आहे. अंतकरण तुझ्या भक्ती प्रेमाने भरलेले आहे आणि ते ओसंडून वाहत आहे आणि जिव तर तुझ्या नामाचा जप करता करताच थकला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी जसा आत्ता आहे तसाच राहतो तुझा आज्ञाधारी दास बनवून तुझ्या पायापाशी राहतो.
अभंग क्र. १७५७
जिचे पीडे बाळ । प्राण तियेचा विकळ ॥१॥
ऐसा मातेचा स्वभाव । सूत्र दोरी एक जीव ॥धृपद॥
सुखाची विश्रांती । उमटे मातेचिये चित्ती ॥२॥
तुका म्हणे संत । तुम्ही बहु कृपावंत ॥३॥
अर्थ

मातेच्या बाळाला पीडा होते त्रास होते त्यावेळी त्या मातेचा प्राण विकळ होतो. असा मातेचा स्वभावच असतो जोडलेल्या दोरीप्रमाणे दोन दोरी एकत्र असाव्यात त्याप्रमाणे त्यांचा एकजीव झालेला असतो. बाळाला सुख विश्रांती मिळाली की ते चिन्ह आपोआप मातेच्या चित्तामध्ये उमटतात. तुकाराम महाराज म्हणतात हे संतजन हो तुम्ही ही त्या मातेप्रमाणे कृपावंत आहात.
अभंग क्र. १७५८
यावे माहेरास । हेच सर्वकाळ आस ॥१॥
घ्यावी उच्छिष्टाची धणी । तीर्थ इच्छी पायवणी ॥धृपद॥
भोग उभा आड । आहे तोंवरीच नाड ॥२॥
तुका म्हणे देवे । माझे सिद्धी पाववावे ॥३॥
अर्थ

संत हे माझे मायबाप आहेत व त्यांच्याकडे माहेरास यावे हीच आस मला सर्व काळ आहे. मग त्यांच्या माहेराला जाऊन अन्न सेवन करावे व त्यांच्या चरणाचे तीर्थ घ्यावे हीच माझी इच्छा आहे. जोपर्यंत माझ्या पापाचे व प्रारब्धाचे भोग आहेत तोपर्यंत ते पाप संत दर्शनास आड येणारच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात आता देवानेच माझी इच्छा पूर्ण करावी आणि संतांची भेट मला घडवावी.
अभंग क्र. १७५९
लेकराचे हित । वाहे माउलीचे चित्त ॥१॥
ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीती ॥धृपद॥
पोटी भार वाहे । त्याचे सर्वस्व ही साहे ॥२॥
तुका म्हणे माझे । तुम्हा संता ओझे ॥३॥
अर्थ

आपल्या लेकराचे हित कशात आहे या विषयीची चिंता माऊलीचे चित्त त्या आईचे चित्तच वाहत असते. अशी ही कळवळयाची जात आहे कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता प्रेम करत असते. अशी ही विलक्षण जात असणारी माता नऊ महिने त्या मुलाला पोटात वाढवते व त्याचा सर्व त्रास सहन करते. तुकाराम महाराज म्हणतात की हे संत जन हो माझे सर्व परमार्थिक ओझे तुमच्यावरच आहे.
अभंग क्र. १७६०
आम्हा गांजी जन । तरि का मेला नारायण ॥१॥
जाली पोरटी निढळे । नाही ठाव बुड आळे ॥धृपद॥
आह्मी जना भ्यावे । तरि का न लाजिजे देवे ॥२॥
तुका म्हणे देश । जाला देवाविण ओस ॥३॥
अर्थ

आम्हाला हे लोक फार त्रास देतात मग यावरून असे वाटते आमचा नारायण मेला की काय ? आता आम्ही पोरके झालो आहोत दरिद्री कुल हिन झालो आहोत आम्हाला कोठेही ठावठिकाणा नाही असे झाले आहे. आम्ही लोकांना भ्यावे मग आमचा रक्षक नारायण याला लाज का वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता असे वाटायला लागले आहे की हा देश देवा वाचुन ओस झाला आहे.
अभंग क्र. १७६१
तुम्ही पाय संती । माझे ठेवियेले चित्ती ॥१॥
आता बाधू न सके काळ । जाली विषम शीतळ ॥धृपद॥
भय नाही मनी मनी । देव वसे घरी रानी ॥२॥
तुका म्हणे भय । आम्हा स्वप्नी तेही नये ॥३॥
अर्थ

हे संत जन हो तुम्ही तुमचे पाय माझ्या चित्तामध्ये ठेवले आहेत. आता त्यामुळे मला काळ भेदू शकणार नाही व माझे सर्व प्रकारचे विषय शांत झाले आहेत. आता घरात व रानात देवच वसलेला आहे त्यामुळे माझ्या मनात कसल्याही प्रकारचे भय राहिलेले नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता स्वप्नात देखील मला कसल्याही प्रकारचे भय राहिलेले नाही.
अभंग क्र. १७६२
काळाचे ही काळ । आम्ही विठोबाचे लडिवाळ ॥१॥
करू सत्ता सर्वा ठायी । वसो निकटवासे पायी ॥धृपद॥
ऐसी कोणाची वैखरी । वदे आमुचे समोरी ॥२॥
तुका म्हणे बाण । हाती हरीनाम तीक्षण ॥३॥
अर्थ

आम्ही विठोबाचे लाडके आहोत त्यामुळे आम्ही काळाचेही काळ आहोत. आता आम्ही सर्वत्र आमचीच सत्ता करू आणि भक्तिभावपूर्वक या विठोबाच्या पायाच्या ठिकाणीच राहू. अशी कोणाची वाणी आहे की आमच्या समोर अमाच्या विरोधात बोलेल ? तुकाराम महाराज म्हणतात कारण आमच्या हातात हरीनाम रूपी तीक्ष्ण बाण आहे.
अभंग क्र. १७६३
जन्मा येऊन उदार जाला । उद्धार केला वंशाचा । मेळवूनि धन मेळवी माती । सदा विपत्ती भोगीतसे ॥१॥
नाम घेता न मिळे अन्न । नव्हे कारण देखिलिया । धर्म करिता ऐके कानी । बांधे निजोनि डोकियासी ॥धृपद॥
घरा व्याही पाहुणा आला । म्हणे त्याला बरे नाही । तुमचे गावी वैद्य आहे । बैसोनि काय प्रयोजन ॥२॥
उजवू किती होतिल पोरे । मरता बरे म्हणे यांसी । म्हणऊनि देवा नवस करी । दावी घरींहुनि बोने ॥३॥
पर्वकाळी भट घरासी आला । बोंब घाला म्हणे पोरा । तुमचा उणा होईल वाटा । काळ पिठासी आला ॥४॥
दाढी करिता अडका गेला । घरात आला बाइलेपे । म्हणे आता उगवी मोडी । डोई बोडी आपुली ॥५॥
तीर्थ स्वप्नी नेणे गंगा । पूजन लिंगा गाविंचिया । आडकुनि दार बैसे दारी । आल्या घर म्हणे ओस ॥६॥
माझ्या भय वाटे चित्ती । नरका जाती म्हणोनि । तुका म्हणे ऐसे आहेत गा हरी । या ही तारी जीवांसी ॥७॥
अर्थ

महाराज या अभंगामध्ये एका श्रीमंत पण नास्तिक आणि कंजूष असलेला व्यक्तीचे वर्णन करतात ते म्हणतात हा मनुष्य जन्माला येऊन फार उदार झाला आणि याने आपल्या वंशाचाही उद्धार केला. ते म्हणजे कसे माहित आहे का ? याने पुष्कळ धन संपत्ती मिळवली आणि मातीत पुरून ठेवली आणि सदा सर्व काळ उभे आयुष्य भिकाऱ्या सारखेच भोगीत राहिला. अशा कंजूस व्यक्तीचे नांव जरी घेतले तरी दिवसभर अन्न मिळणार नाही व कसल्याही प्रकारचे काम होणार नाही. दुसऱ्याने कोणीही दानधर्म केले असेल असे याने कानाने ऐकले तरी याचे डोके दुखते मग तो डोक्याला फडके बांधुन झोपतो. याच्या घरी जर त्याचा व्याही पाहुणा म्हणून आला तर तो म्हणतो तुमच्या जावयाला बरे नाही त्यामुळे त्याला तुमच्या गावाला पाठऊन दिला आहे कारण तुमच्या गावाला चांगला वैद्य आहे आणि त्या वैद्याला विचारून आम्हाला तुम्हीच कळवावे तुमचा येथे थांबुन काय उपयोग आहे ? तुम्ही तुमच्या घरी जावे असे तो त्याच्या व्याह्याला म्हणतो कारण त्याच्या खाण्याचा खर्च होणार असतो म्हणून. हा मनुष्य स्वतःशीच मनात बोलतो की अजुन किती दिवस मुले बाळे होणार आहेत आणि कधी राग आला तर तो म्हणतो ही मुले कधी मरणार काय माहिती ? आणि याकरता तो देवाला नवसही करतो आणि नवस पावन झाला आणि तर तो देवाला वाहायचा नैवद्य घरी बसल्या बसल्या देवाला दाखवतो. तो मुलांना सांगतो पर्व काळी जर ब्राम्‍हण घरी आले तर आपल्या घरात चोरी झाली आहे असे बोंब मारून सांगा. अरे तुम्ही त्या ब्राम्‍हणाला पीठ वगैरे वाढवू नका कारण तुम्ही असे केले तर तुमचा वाटा कमी होईल. हा मनुष्य न्हाव्याकडे दाढी करत असताना थोडे पैसे जास्त गेल्यामुळे घरी आल्यानंतर आपल्या सौभाग्यवतीला म्हणतो, आता तू केस ठेवण्याची जुनी पद्धत मोडून टाक व त्या न्हाव्याकडे जाऊन संपूर्ण केस काढून टाक कारण त्याच्याकडे माझे जास्त पैसे गेले आहेत. अशा कंजूस मनुष्याला केव्हाच तीर्थयात्रा करून गंगेत स्नान करून किंवा गावाच्या शंकराच्या मंदिरात जाऊन पुजा करता येत नाही. आणि तो दाराला कडी लावून बाहेरच बसतो कारण कोणी पाहुणा आला तर त्याला सांगतो हे घर ओस पडलेले आहे इथे कोणीच राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा माझ्या चित्ताला भय वाटते हे असे मनुष्य नरकाला जातात म्हणुन. देवा हे हरी असे लोक या जगामध्ये आहेत परंतु त्यांचा तु द्वेष. करू नको त्यांचा द्वेष न करता त्यांना या भवसागरातून तार.
अभंग क्र. १७६४
जाणे वर्तमान । परि ते न वारे त्याच्याने ॥१॥
तो ही कारणांचा दास । देव म्हणविता पावे नास ॥धृपद॥
वेची अनुष्ठान । सिद्धी कराया प्रसन्न ॥२॥
तुका म्हणे त्याचे । मुद्दल गेले हाटवेचे ॥३॥
अर्थ

एखाद्या ज्योतिषाला वर्तमान जरी माहीत असले तरी केलेल्या कर्मापासून दुःख त्याला टाळता येत नाहीत. कारण तोही कर्मभोगाचा दास आहे त्याने देवाचे नांव आपल्या मुखवाटे उच्चारले तर त्याच्या कर्म भोगाचा नाश ही होईल. एखादा तपस्वी अष्टमहासिद्धी प्राप्त करण्याकरता तप करतो असे असले तरी त्याला आपल्या कर्मयोगाचे फळ भोगावेच लागते. तुकाराम महाराज म्हणतात असे लोक अनुष्ठान करतात परंतु या भवनदितील विषयांची खरेदी करण्यातच त्यांचे मुद्दलरुपी आयुष्य व्यर्थ जात असते.

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading