आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२१ जून, दिवस १७२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी १७६ ते २०० सार्थ तुकाराम गाथा अभंग २०५३ ते २०६४
“21 जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 21 June
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक 21 जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २०५३ ते २०६४चे पारायण आपण करणार आहोत.
21 जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी १७६ ते २००,
176-13
आत्मया जीवबुद्धी । जे लागली होती क्षयव्याधी । ते जयाचिये सन्निधी । निरुजा कीजे ॥176॥
देह बुद्ध्यादि अनात्म पदार्थ मी आहे (म्हणजे मी जीव आहे) असा (भ्रमाचा) क्षयरोग आत्म्याला जो झाला होता, तो रोग ज्याचा सहवास बरा करतो.
177-13
ते अनिरूप्य की निरूपिजे । ऐकता बुद्धी आणिजे । वाचूनि डोळा देखिजे । ऐसे नाही ॥177॥
(ज्ञान दाखवता येत नाही. लक्षणांवरून ओळखावे लागते. ) ते ज्ञान निरूपण करण्यासारखे नाही, तथापि त्याचे निरूपण केले जाईल आणि ते ज्ञानाचे निरूपण ऐकल्यावर ज्ञान बुद्धीला जाणता येईल. त्याशिवाय डोळ्यांनी पहाता येईल असे ते ज्ञान नाही.
178-13
मग तेचि इये शरीरी । जै आपुला प्रभावो करी । तै इंद्रियांचिया व्यापारी । डोळाहि दिसे ॥178॥
मग तेच ज्ञान जेव्हा या शरीरात आपली शक्ती प्रगट करते, तेव्हा ते इंद्रियांच्या क्रियेवरून डोळ्यांनाही दिसते.
179-13
पै वसंताचे रिगवणे । झाडाचेनि साजेपणे । जाणिजे तेवी करणे । सांगती ज्ञान ॥179॥
वसंताचा प्रवेश झाडाच्या टवटवीतपणावरून जाणता येतो, त्याप्रमाणे ज्ञानवान पुरुषांची इंद्रिये त्या पुरुषात ज्ञानाचे अस्तित्व दाखवतात.
180-13
अगा वृक्षासि पाताळी । जळ सापडे मुळी । ते शाखांचिये बाहाळी । बाहेर दिसे ॥180॥
अरे अर्जुना, वृक्षाला जमिनीमधे पाणी सापडते. (ते पाणी जरी डोळ्याला प्रत्यक्ष दिसत नाही)तरी ते बाहेर फांद्यांच्या विस्तारावरून दिसते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
181-13
का भूमीचे मार्दव । सांगे कोंभाची लवलव । नाना आचारगौरव । सुकुलीनाचे ॥181॥
अथवा अंकुराचा लुसलुशीतपणा हा जमिनीचा मृदुपणा सांगतो किंवा आचार हा चांगल्या कुलवानाचा थोरपणा दाखवतो.
182-13
अथवा संभ्रमाचिया आयती । स्नेहो जैसा ये व्यक्ति । का दर्शनाचिये प्रशस्ती । पुण्यपुरुष ॥182॥
अथवा आदरातिथ्याच्या तयारीवरून जसा स्नेह प्रगट होतो किंवा दर्शनाने होणार्या समाधानावरून पुण्यपुरुष ओळखू येतो.
183-13
नातरी केळी कापूर जाहला । जेवी परिमळे जाणो आला । का भिंगारी दीपु ठेविला । बाहेरी फाके ॥183॥
अथवा केळीत उत्पन्न झालेला कापूर जसा सुवासाने कळण्यात येतो अथवा भिंगाच्या आत ठेवलेला जो दिवा त्याचा प्रकाश जसा भिंगाच्या बाहेर पसरतो
184-13
तैसे हृदयीचेनि ज्ञाने । जिये देही उमटती चिन्हे । तिये सांगो आता अवधाने । चागे आइक ॥184॥
त्याप्रमाणे हृदयातील ज्ञानाने देहाच्या ठिकाणी जी लक्षणे उमटतात ती आता सांगतो. चांगले लक्ष देऊन ऐक.
अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् ।
आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥13. 7॥
अर्थ अमानित्व, दंभरहितता, अहिंसा, सर्वसहनशीलता, सरळपणा, सद्गुरुसेवा, (आंतर व बाह्य) शुद्धि, स्थैर्य, अंत:करणनिग्रह –
185-13
तरी कवणेही विषयींचे । साम्य होणे न रुचे । संभावितपणाचे । वोझे जया ॥185॥
तर कोणत्याही बाबतीत कोणाचीही बरोबरी करणे, त्याला आवडत नाही, आणि मोठेपणाचेही त्याला ओझे वाटते.
186-13
आथिलेचि गुण वानिता । मान्यपणे मानिता । योग्यतेचे येता । रूप आंगा ॥186॥
त्याच्या अंगी असलेल्या गुणांचे वर्णन केले तर व तो खरोखर मानास योग्य आहे म्हणून त्यास मान देऊ लागले तर अथवा लोकांनी मागण्याजोगी पात्रता आपल्या अंगी आली आहे अशी त्या पात्रतेची प्रगटता झाली तर,
187-13
तै गजबजो लागे कैसा । व्याधे रुंधला मृगु जैसा । का बाही तरता वळसा । दाटला जेवी ॥187॥
त्यावेळी तो कसा गडबडून जातो तर ज्याप्रमाणे पारध्याने चोहोकडून वेढलेले हरीण घाबरे होते अथवा हातांनी पोहून जात असता, तो पोहणारा मनुष्य ज्याप्रमाणे भोवर्यात सापडावा.
188-13
पार्था तेणे पाडे । सन्माने जो सांकडे । गरिमेते आंगाकडे । येवोचि नेदी ॥188॥
अर्जुना, तितक्या प्रमाणाने सन्मानाच्या योगाने ज्याला संकट वाटते आणि जो मोठेपणाला आपल्या अंगाकडे येऊच देत नाही.
189-13
पूज्यता डोळा न देखावी । स्वकीर्ती कानी नायकावी । हा अमुका ऐसी नोहावी । सेचि लोका ॥189॥
आपली पूज्यता आपण डोळ्यांनी पाहू नये, आपली कीर्ती आपण कानांनी ऐकू नये, हा एक मनुष्य आहे अशी आपली लोकांना आठवणच होऊ नये.
190-13
तेथ सत्काराची के गोठी । के आदरा देईल भेटी । मरणेसी साटी । नमस्कारिता ॥190॥
असे ज्याला वाटते अशा पुरुषाच्या ठिकाणी सत्काराची गोष्ट कोठे आहे ? (म्हणजे अशा पुरुषाला आपला सत्कार व्हावा असे कसे वाटेल ?) असा मनुष्य आदराला भेट कशी देईल ? (म्हणजे आपला आदर व्हावा अशी कशी इच्छा करेल ? त्याला जर कोणी नमस्कार केला तर त्याला ते मरणासारखे वाटते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
191-13
वाचस्पतीचेनि पाडे । सर्वज्ञता तरी जोडे । परी वेडिवेमाजी दडे । महिमेभेणे ॥191॥
बृहस्पतीच्या तोडीची सर्वज्ञता तर त्याला प्राप्त झालेली असते, परंतु महत्वाच्या भीतीने तो वेडात लपतो.
192-13
चातुर्य लपवी । महत्त्व हारवी । पिसेपण मिरवी । आवडोनि ॥192॥
आपले ठिकाणी असलेले शहाणपण तो लपवून ठेवतो, आपल्यात असलेला मोठेपणा बेपत्ता करून टाकतो. व मोठ्या आवडीने वेडेपण लोकात दाखवतो.
193-13
लौकिकाचा उद्वेगु । शास्त्रांवरी उबगु । उगेपणी चांगु । आथी भरु ॥193॥
लोकात होणार्या प्रसिद्धीची ज्यास शिसारी असते व शास्त्रांचा वादविवाद करण्याचा ज्याला कंटाळा असतो, काही न करता उगी राहण्यावर ज्याचा अतिशय भर असतो.
194-13
जगे अवज्ञाचि करावी । संबंधी सोयचि न धरावी । ऐसी ऐसी जीवी । चाड बहु ॥194॥
लोकांनी आपला अनादरच करावा व नातलगांनी आपला थाराच धरू नये (आपल्या नादी लागू नये) अशा प्रकारची ज्याच्या जीवामधे फार इच्छा असते.
195-13
तळौटेपण बाणे । आंगी हिणावो खेवणे । ते तेचि करणे । बहुतकरुनी ॥195॥
ज्या कृतीच्या योगाने नम्रता अंगी बाणेल व स्वत:च्या ठिकाणी कमीपणा हे भूषण होईल, त्याच गोष्टी बहुतेक तो करतो.
196-13
हा जीतु ना नोहे । लोक कल्पी येणे भावे । तैसे जिणे होआवे । ऐसी आशा ॥196
ज्याच्या योगाने हा जिवंत आहे की नाही अशी लोक आपल्याविषयी कल्पना करतील अशा प्रकारचा आपला आयुष्यक्रम असावा अशी त्यास आशा असते.
197-13
पै चालतु का नोहे । की वारेनि जातु आहे । जना ऐसा भ्रमु जाये । तैसे होईजे ॥197॥
पलीकडे असलेला तो चालतो आहे की नाही, किंवा वार्यानेच जात आहे अशा प्रकारचा आपल्याविषयी जगात भ्रम उत्पन्न व्हावा तसे आपण व्हावे असे त्यास वाटते.
198-13
माझे असतेपण लोपो । नामरूप हारपो । मज झणे वासिपो । भूतजात ॥198॥
माझ्या असतेपणाचा लोप व्हावा (म्हणजे मी एक अमुक आहे अशी माझ्या अस्तित्वाची कोणास आठवणच होऊ नये). माझे नाव व रूप नाहीसे व्हावे (म्हणजे माझे नाव अथवा रूप कोणाच्या डोळयांसमोर येऊ नये), कदाचित मला पाहून प्राणिमात्र भितील तर तसे होऊ नये
199-13
ऐसी जयाची नवसिये । जो नित्य एकांता जातु जाये । नामेचि जो जिये । विजनाचेनि ॥199॥
याप्रमाणे ज्याचे नवस असतात व जो सदोदित एकांतामधे जात असतो व एकांताच्या नावानेच तो जगतो (म्हणजे त्याला एकांत इतका आवडतो).
200-13
वायू आणि तया पडे । गगनेसी बोलणे आवडे । जीवे प्राणे झाडे । पढियंती जया ॥200॥
वायूचे व त्याचे पटते, आकाशाशी बोलणे त्याला आवडते. (त्यास बोलण्याचा कंटाळा असतो) व ज्याला झाडे ही जीवाप्रमाणे आवडतात
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १७२ वा, २१, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २०५३ ते २०६४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २०५३
देखोवेखी करिती गुरू । नाही ठाउका विचारु ॥१॥
वर्म ते न पडे ठायी । पांडुरंगाविण काही ॥धृपद॥
शिको कळा शिको येती । प्रेम नाही कोणा हाती ॥२॥
तुका म्हणे सार । भक्ती नेणती गव्हार ॥३॥
अर्थ
एकमेकांचे पाहून हा गुरू श्रेष्ठ आहे तो गुरू श्रेष्ठ आहे असे पाहून गुरू करतात परंतु खरा विचार कोणता आहे हे कोणालाही कळत नाही. पांडुरंगा विन खरे परमार्थाचे वर्म कोणालाही कळणार नाही. अनेक प्रकारच्या कला या शिक्षणातून घेता येतात परंतु खरे प्रेम कसे निर्माण करावे ते कसे असते हे शिकवणे कोणाच्याही हातात नाही. तुकाराम महाराज म्हणतात जे मूर्ख गवार लोक आहेत त्यांना सर्व साराचे हे सार म्हणजे भक्ती आहे व ती भक्ती कशी करावी हेच समजत नाही.
अभंग क्र. २०५४
भाग्यवंत म्हणो तया । शरण गेले पंढरिराया ॥१॥
तरले तरले हा भरवसा । नामधारकाचा ठसा ॥धृपद॥
भुक्तीमुक्तीचे ते स्थळ । भाविकनिर्मळ निर्मळ ॥२॥
गाइले पुराणी । तुका म्हणे वेदवाणी ॥३॥
अर्थ
जे पंढरीरायाला शरण गेले त्यांना आम्ही भाग्यवंत म्हणू. पंढरीरायाच्या नामाने मागेही पुष्कळ भक्त तरले आणि पुढेही तरतील यात संशय नाही. कारण नामधारक भक्तांची तशी प्रसिध्दीच आहे. भोळ्या भाविकांना नामसंकीर्तन हेच एक भोग-मोक्ष प्राप्त होण्याचे पवित्र क्षेत्र आहे. तुकाराम महाराज म्हणतात वेदांनी व पुराणांनी याची फार स्तुती केली आहे.
अभंग क्र. २०५५
जैसे चित्त जयावरी । तैसे जवळी ते दुरी ॥१॥
न लगे द्यावा परिहार । या कोरडे उत्तर ।
असे अभ्यंतर । साक्षभूत जवळी ॥धृपद॥
अवघे जाणे सूत्रधारी । कोण नाचे कोणे परी ॥२॥
तुका म्हणे बुद्धि । ज्याची ते च तया शुद्धी ॥३॥
अर्थ
ज्याची ज्या वस्तूविषयी जशा प्रकारची चित्तात समजूत असते त्याप्रमाणे त्याला ती वस्तू जवळ अथवा दूर होत असते ; म्हणूनच ‘ देव नाही ‘ अशी ज्याची समजूत झाली त्याला देव दूर आहे आणि ‘ देव आहे ‘ अशी समजूत असेल तर तो फार जवळ आहे. ‘ देव ‘ आहे यासंबंधी काही बोलायलाच नको. कारण नुसत्या कोरड्या बोलण्याने काय होणार आहे ? वस्तुस्थितीने पाहिले तर सर्वाच्या हृदयात ‘ मी दृष्टा आहे ‘ या रूपाने जे ज्ञान होते ते देवाचेच ज्ञान होय. त्यामुळे तो अगदी जवळ आहे. सर्वाच्या कर्माची सूत्रे ज्याच्या हातात आहेत आणि कोणता जीव कसा नाचतो ; अहंकारारूढ होऊन कसे कर्म करतो हे सर्व जो पाहातो त्याला ‘ देव ‘ म्हणावे. तुकाराम महाराज म्हणतात सारांश जशी ज्याची सदोष वा निर्दोष बुध्दी असेल त्याप्रमाणे त्याला भ्रम – प्रेमात्मक ज्ञान होते.
अभंग क्र. २०५६
नाही पाइतन भूपतीशी दावा । धिग त्या कर्तव्या आगी लागो ॥१॥
मुंगियांच्या मुखा गजाचा आहार । न साहावे भार जाय जीवे ॥२॥
तुका म्हणे आधी करावा विचार । शूरपणे तीर मोकलावा ॥३॥
अर्थ
ज्याच्या पायात घालायसाठी पायतान नाही परंतु राजाशी बरोबरी करतो अशा माणसाचा धिक्कार असो आणि त्याच्या कर्तव्याला आग लागो. हत्तीला रोजचा जो आहार द्यायचा आहे तो जर मुंगीला दिला तर त्या आहाराच्या भारानेच मुंगीचा जीव जाईन. तुकाराम महाराज म्हणतात आधी आपल्या मध्ये किती सामर्थ्य आहे याचा विचार सैन्यातील शिपायाने करावे आणि मगच हातात बाण घेऊन शत्रूवर बाण सोडवावा.
अभंग क्र. २०५७
तिन्ही लोक ॠणे बांधिले जयाने । सर्वसिद्धि केणे तये घरी ॥१॥
पंढरीचोहोटा घातला दुकान । मांडियेले वान आवडीचे ॥धृपद॥
आषाढी कार्तीकी भरियेले हाट । इनाम हे पेठ घेता देता ॥२॥
मुक्ती कोणी तेथे हाती नेघे फुका । लुटितील सुखा प्रेमाचिया ॥३॥
तुका म्हणे संतसज्जन भाग्याचे । अनंता जन्मीचे सांटेकरी ॥४॥
अर्थ
ज्यांनी तिनही लोकांना आपल्या ऋनाणे बांधून ठेवले आहे असे वैष्णव आहेत व त्यांच्या घरी सर्व सिद्धी चा माल असतो. पंढरीच्या चवाट्यावर त्यांनी परमार्थिक दुकान मांडलेले आहे व सर्व परमार्थरूपी आवडीचा माल त्यांनी दुकानात ठेवलेला आहे. आषाढी आणि कार्तिकीला येथे मोठ्या प्रमाणाचा बाजार भरतो आणि जे कोणी येथे नामाचा हरिनामाची देवाणघेवाण करतात त्यांना या पांडुरंगाने ही पंढरी इनाम म्हणून दिली आहे. त्या दुकानांमध्ये मोक्ष रुपी माल देखील आहे परंतु त्याला कोणीही फुकट देखील हात लावत नाही हातातही घेत नाही परंतु हरी प्रेम सुख हा माल भरपूर प्रमाणात भक्त लोक लुटत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात संत सज्जन हे मोठे भाग्यवान आहेत कारण त्यांच्याकडे अनंत जन्माच्या पुण्याचे साठे आहेत.
अभंग क्र. २०५८
दुःखाचिये साठी तेथे मिळे सुख । अनाथाची भूक दैन्य जाय ॥१॥
उदाराचा राणा पंढरीस आहे । उभारोनि बाहे पालवितो ॥१॥
जाणतियाहूनि नेणत्याची गोडी । आळीगिया आवडी करूनिया ॥२॥
शीण घेऊनिया प्रेम देतो साटी । न विचारी तुटी लाभा काही ॥३॥
तुका म्हणे असो अनाथ दुबळी । आम्हासी तो पाळी पांडुरंग ॥४॥
अर्थ
जे पंढरीला नेहमी येतात त्यांना दुखाच्या बदल्यात सुख प्राप्त होते आणि जे अनाथ आहेत त्यांची भूक आणि दैन्य हे नाहीसे होते. कारण उदाराचा राजा पंढरी मध्ये उभा आहे तो त्याचे दोन्ही हात पुढे करून भक्तांना आपल्याजवळ बोलून घेतो. जाणत्या भक्तापेक्षा नेणत्या भक्ताची जास्त गोडी या विठोबा रायाला आहे आणि त्याच भक्तांना तो आवडीने आलिंगन देतो. भक्तांचे शीण भाग घेऊन त्या बदल्यात त्यांना हा देव प्रेम देतो परंतु त्या बदल्यात आपल्याला काही लाभ होईल की नाही याविषयी लाभ होईल किंवा तोटा होईल याविषयी देव काहीच विचार करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही भले अनाथ असो दुबळे असो परंतु आमचे रक्षण पालन-पोषण तो पांडुरंग करतो.
अभंग क्र. २०५९
आणिक मात माझ्या नावडे जीवासी । काय करू यासी पांडुरंगा ॥१॥
मुखा ते चि गोड श्रवणी आवडी । चित्त माझे ओढी तुझे पायी ॥धृपद॥
जये पदी नाही विठ्ठलाचे नाम । मज होती श्रम आइकता ॥२॥
आणिकाचे मज म्हणविता लाज । वाटे हे सहज न बोलावे ॥३॥
तुका म्हणे मज तू च आवडसी । सर्वभावेविसी पांडुरंगा ॥४॥
अर्थ
हे पांडुरंगा माझ्या जीवाला तुझ्या वाचून दुसरी कोणतीही गोष्ट आवडत नाही याला मी तरी काय करू ? माझ्या मुखाला तुझे नाम घेणेच गोड वाटते कानाला देखील तुझी कीर्ती एकण्यास आवडते आणि माझे चित्त तर नेहमी तुझ्या पायाकडेच ओढ घेत असते. काही शब्द ऐकतांना त्यात विठ्ठलाचे नाम नसले तर ते शब्द ऐकतांना मला श्रम वाटते. मी तुझ्या वाचुन इतर कोणाचा आहे असे म्हणून घेतले तरी मला लाज वाटते आणि सहज देखील मी दुसऱ्याचा आहे असे मला बोलावे वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा मला सर्व भक्तिभावाने काया-वाचा-मनाने तुच आवडतो आहेस.
This message was deleted
अभंग क्र. २०६०
कळेल हे तैसे गाईन मी तुज । जनासवे काज काय माझे ॥१॥
करीन मी स्तुती आपुले आवडी । जैसी माझ्या गोडी वाटे जीवा ॥धृपद॥
होऊनी निर्भर नाचेन मी छंदे । आपुल्या आनंदे करूनिया ॥२॥
काय करू कळा युक्ती या कुसरी । जाणिवेच्या परी सकिळका ॥३॥
तुका म्हणे माझे जयासवे काज । भोळा तो सहज पांडुरंग ॥४॥
अर्थ
हे पांडुरंगा, हे विठ्ठला मला जसे कळेल, जसे उमगेल तसेच मी तुझे नाम गाईन, तुझे कीर्तन करिन लोकांना काय वाटेल याचा मी विचार करणार नाही कारण माझा त्यांच्यासोबत आता काही संबंध आणि काम राहिलेलेच नाही, त्यामुळे तो आता प्रश्नच उद्भवत नाही. तुझी स्तुती मी अशी करिन जेणेकरून माझ्या जीवाला ती गोड वाटेल आणि तुला आवडेल, तुला रुचेल. तसेच मी या परमार्थाच्या छंदापोटी निर्भर (आनंदभरीत) मनाने नाचेंन, गाईन कारण तूच आता माझ्या आनंदाचे एकमेव कारण झाला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात हे सर्व करताना म्हणजेच देवाला साध्य करून घेण्याच्या या प्रयत्नात मी इतर कोणत्याही योजना आखणार नाही माझे ज्याच्यासोबत काम आहे, मला ज्याला प्रसन्न करून घ्यायचे आहे तो पांडुरंग अतिशय भोळा आहे, त्याला फक्त खरा भाव लागतो आणि त्यानेच तो सहज साध्य होतो.
अभंग क्र. २०६१
तयासी नेणती बहु आवडती । होय जया चित्ती एक भाव ॥१॥
उपमन्यु धुरु हे काय जाणती । प्रल्हादाच्या चित्ती नारायण ॥धृपद॥
कोळी भिल्ल पशु श्वापदे अपार । कृपेच्या सागरे तारियेली ॥२॥
काय ते गोपाळे चांगली शाहाणी । तया चक्रपाणी जेवी सवे ॥३॥
तुका म्हणे भोळा भाविक हा देव । आम्ही त्याचे पाव धरूनी ठेलो ॥४॥
अर्थ
देवाला भोळी, भाबडी, देवाविषयी जास्त काही ज्ञान नसलेली आणि शब्दज्ञानाचा तर सुगावा देखील नसलेली अशी नेणती परंतु चित्तात त्याच्याविषयी एकनिष्ठ भाव असलेली भक्तगण खूपच आवडतात. भक्त उपमन्यु, धुरू हे काय जाणते होते आणि भक्त प्रल्हादाच्या चित्तात तर फक्त आणि फक्त नारायणच होता, अन्य त्याला काहीही ठाऊक नव्हते. त्याच न्यायाने म्हणूनच कोळी, भिल्ल माणसे, किंबहुना पशु आणि श्वापदे देखील त्याच्या कृपेच्या आधारे तरले गेले. श्रीकृष्णा बरोबर असलेले त्याचे सवंगडी, गोपाळे काय शहाणे होती किंवा त्यांच्यात काय तो शहाणपणा ठासून भरला होता परंतु त्यांचा श्रीहरीवर अपार जीव होता आणि चक्रपाणी देखील ह्याचकारणामुळे त्यांच्या समवेत जेवत असे. तुकाराम महाराज म्हणतात असा हा देव स्वतः भोळा आणि भाविक आहे आणि आम्ही देखील त्याच भावाने त्याचे पाय अखंड धरून आहोत.
अभंग क्र. २०६२
न लगे पाहावे अबद्ध वाकडे । उच्चारावे कोडे नाम तुझे ॥१॥
नाही वेळ काळ पंडितांचा धाक । होत का वाचक वेदवक्ते ॥धृपद॥
पुराणी ही कोठे न मिळे पाहाता । तैशी या अनंता ठेवू नामे ॥२॥
आपुलिया मना उपजे आनंद । तैसे करू छंद कथेकाळी ॥३॥
तुका म्हणे आम्ही आनंदेचि धालो । आनंद चि ल्यालो अळंकार ॥४॥
अर्थ
हे हरी तुझे नाम अबद्ध आहे की वाकडे आहे हे काहीच पाहण्याची गरज नाही केवळ आवडीने तुझे नाम उच्चारावे लागते. हरीचे नाम घेण्याकरता कोणत्याही प्रकारचा काळ किंवा वेळ लागत नाही आणि आपण नाम बरोबर घेतो की चुकीचे घेतो यासाठी पंडित लोकाचा धाकही नसतो आणि समोर कोणीही असो शास्त्री असो किंवा वेद वक्ता असो नाम घेणाऱ्याला त्याची भीती नसते. हरि प्रतिपादन जे वेदाने केले आहे ते तर कळून घेण्यासही सोपे नाही परंतु अशा हरीला आपण आपल्या योग्यतेनुसार आपल्याला सोपे जाईल असे वेगवेगळे प्रकारचे नावे आपण ठेवू. हरीकथेच्या वेळी जेणेकरून आपल्या मनामध्ये आनंद निर्माण होईल असे वेगवेगळे प्रकारचे छंद आपण करत जाऊ. तुकाराम महाराज आम्ही आनंदानेच तृप्त झालो आहोत आणि आनंदाचे अलंकार परिधान करत आहोत.
अभंग क्र. २०६३
दैन्य दुःख आम्हा न येती जवळी । दहन हे होळी होती दोष ॥१॥
सर्व सुखे येती माने लोटांगणी । कोण यांसी आणी दृष्टीपुढे ॥धृपद॥
आमुची आवडी संतसमागम । आणीक त्या नाम विठोबाचे ॥२॥
आमचे मागणे मागो त्याची सेवा । मोक्षाची निर्दैवा कोणा चाड ॥३॥
तुका म्हणे पोटी सांटविला देव । नुन्य तो भाव कोण आम्हा ॥४॥
अर्थ
दैन्य आणि दुख आमच्या जवळ येत नाही आणि दोष्याची तर होळी होऊन ते जळून खाक होते. सर्व सुख हे लोटांगण घेऊन आमच्या पायाजवळ येतात परंतु त्याकडे कोण लक्ष देत असतो ? कारण आमची आवडही संत समागम आहे आणि इतर काही म्हणाल तर ते केवळ विठोबाचे नाम आहे. आमची काही मागणी असेल तर आम्ही त्याला त्याची सेवाच मागू मोक्षाची कोणत्या अभाग्यला आवड आहे ? तुकाराम महाराज म्हणतात सकल ब्रह्मांडनायक असा देव आम्ही आमच्या पोटात साठवलेला आहे त्यामुळे आता आम्हाला कोणत्याहि प्रकारचा कमीपणा म्हणजे न्युनपणा आहे ?
अभंग क्र. २०६४
काळतोंडा सुना । भलते चोरुनि करी जना ॥१॥
धिग त्याचे साधुपण । विटाळुनि वर्ते मन ॥धृपद॥
मंत्र ऐसे घोकी । वश व्हावे जेणे लोकी ॥२॥
तुका म्हणे थीत । नागवला नव्हे हित ॥३॥
अर्थ
जो लोकांना चोरून वाईट व भलतेच कर्म करतो असा मनुष्य म्हणजे काळतोंड्या कुत्र्या प्रमाणे आहे. काही मनुष्य असेही आहेत की जे साधू पणाचा आव आणतात व वाईट कर्म करतात व अशा लोकांचे मन विटाळून गेलेले असतात अशा लोकांच्या साधू पणाचा धिक्कार असो. जेणे करून लोक वश होतील अशा प्रकारचे मंत्र हा घोकत असतो. तुकाराम महाराज म्हणतात असा काळतोंड्या कुत्र्या प्रमाणे असलेला ढोंगीपणाचे सोंग आणणारा साधू देवाविषयी पूर्ण पणे नागवलेला असतो त्यामुळे त्याचे हित कधीही होत नाही.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















