आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१५ जून, दिवस १६६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी २६ ते ५० सार्थ तुकाराम गाथा अभंग १९८१ ते १९९२
“15 जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 15 June
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक 15 जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १९८१ ते १९९२चे पारायण आपण करणार आहोत.
15 जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी २६ ते ५०,
26-13
पै सत्यलोकनाथा । वदने आली बळार्था । तरी तो सर्वथा । जाणेचिना ॥26॥
बुद्धीचे सामर्थ्य वाढवून क्षेत्रक्षेत्रज्ञाचा विचार करण्याकरिता ब्रह्मदेवाला चार तोंडे प्राप्त झाली, तरी त्याला क्षेत्राचा निर्णय करता आला नाही.
ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ।
ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः ॥13. 4॥
अर्थ हे (क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे ज्ञान) ऋषींनी आणि छंदोबद्ध ग्रंथांनी अनेक प्रकारांनी वर्णन केले आहे. वेदातील बृहत्सामसूत्रांनी (ब्रह्मसूत्रांनी) व हेतुमान पंडितांनी हे चांगले निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे. ॥14॥
(जीववादी लोकांचे मत)
27-13
एक म्हणती हे स्थळ । जीवाचेचि समूळ । मग प्राण हे कूळ । तयाचै एथ ॥27॥
एक म्हणतात क्षेत्र हे स्थळ जीवाच्याच मालकीचे आहे आणि प्राण हा जीवरूपी मालकाची शेती वाहणारे कूळ आहे.
ज्याप्रमाणे जमिनीचा मालक माझी जमीन म्हणतो, म्हणून तो मालक होतो आणि जमिनीची वाही कूळ करते, त्याप्रमाणे जीव माझा देह म्हणतो, म्हणून येथे जीवाला देहाचा मालक म्हटले आहे आणि प्राण आहे तोपर्यंत देहाचे व्यापार चालतात, म्हणून प्राणाला कूळ म्हटले आहे.
हे स्थळ जीवाचेच समूळ – म्हणजे जीव हा क्षेत्राचा भोक्ता आहे. (कर्ता – म्हणजे कर्म करून कर्माप्रमाणे शरीर प्राप्त करून घेणारा व भोक्ता – म्हणजे कर्माप्रमाणे त्या शरीराचे द्वारा सुखदुःखाचा भोग भोगणारा. )
याप्रमाणे वस्तुतः असंग असलेल्या क्षेत्राज्ञाला कर्ता-भोक्ता मानून त्याच्याशी जडविनाशी क्षेत्राचा कधी नाहीसा न होणारा संबंध, मिमांसा दर्शनाने स्विकारला आहे.
28-13
जया प्राणाचा घरी । अंगे राबती भाऊ चारी । आणि मना ऐसा आवरी । कुळवाडीकर ॥28॥
ज्या प्राणाचे, अपान, व्यान, उदान, समान हे चार भाऊ अंगाने घरीच राबतात आणि येथे जीव, या मालकाच्या तर्फे शेतीची देखरेख करून शेती करणारे मन, हे वहिवाटदार आवारी आहे.
29-13
तयाते इंद्रियबैलांची पेटी । न म्हणे अवसी पहाटी । विषयक्षेत्री आटी । काढी भली ॥29॥
त्याच्या(मनाचे)जवळ ज्ञानेंद्रियरूप व कर्मेंद्रियरूप बैलाच्या जोड्या असून त्यांच्या सहाय्याने रात्र व दिवस न पाहता शब्दस्पर्शादि विषयरूप शेतात खूप श्रम करतो.
30-13
मग विधीची वाफ चुकवी । आणि अन्यायाचे बीज वाफवी । कुकर्माचा करवी । राबु जरी ॥30॥
शास्त्रोक्तकर्मरूपी बीजाला ऊब न देता निषिध्दकर्मरूपी बीजालाच ऊब देऊन वाढविले व अशा रीतीने इंद्रियाकडून कुकर्म करण्याचे जर श्रम करविले,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
31-13
तरी तयाचिसारिखे । असंभड पाप पिके । मग जन्मकोटी दुःखे । भोगी जीवु ॥31॥
तर त्या कुकर्मानुसार पापाचेच अपार पीक येऊन कोटीजन्मपर्यंत जीव दुःखच भोगित राहील.
32-13
नातरी विधीचिये वाफे । सत्क्रिया बीज आरोपे । तरी जन्मशताची मापे । सुखचि मवीजे ॥32॥
किंवा शास्रानुसार आचरणरूपी उचित सत्क्रियारूप बीज पेरले, तर शेकडो जन्माच्या मापाने जीव सुखच मोजित राहील.
33-13
तव आणिक म्हणती हे नव्हे । हे जिवाचेचि न म्हणावे । आमुते पुसा आघवे । क्षेत्राचे या ॥33॥
हे ऐकून दुसरे कित्येक म्हणतात, हे तुमचे म्हणणे बरोबर नाही. हे शरीर जीवाच्या मालकीचे आहे, असे म्हणू नका. या क्षेत्राविषयी जे काय विचारायचे आहे ते सर्व आम्हाला विचारा.
34-13
अहो जीवु एथ उखिता । वस्तीकरु वाटे जाता । आणि प्राणु हा बलौता । म्हणौनि जागे ॥34॥
अहो ! जीव हा वाटेने जात असता या शरीराचे ठिकाणी घटकाभर वस्ती करणारा वाटसरू आहे आणि प्राण हा वतनदार असल्यामुळे क्षेत्रात जागल्याचे काम करतो. (जीव हा मुळात प्रकृतीहून निराळा असा असंग आहे; पण तो अविवेकाने प्रकृतीशी ऐक्य पावून जन्ममरणाच्या वाटेने जाताना क्षेत्राचा आश्रय करतो, हे ” वाटे जाता ” पदाने सुचविले आहे.
उखिता वस्तीकार – विवेकज्ञान उत्पन्न होईपर्यंतच त्याचा (जीवाचा) व देहाचा संबंध असतो हे ” उखिता वस्तीकार ” या पदाने सांगितले आहे.
35-13
अनादि जे प्रकृती । सांख्य जियेते गाती । क्षेत्र हे वृत्ती । तियेची जाणा ॥35॥
सांख्य जिला प्रकृती म्हणतात ती अनादि असून क्षेत्र हे तिचे राहण्याचे ठिकाण आहे.
(सांख्यशास्राप्रमाणे मूळप्रकृती अनादि व अव्यक्त असल्यामुळे ती आपल्या मूळ अव्यक्त अवस्थेत गोचर होऊ शकत नाही. क्षेत्ररूप कार्यरूपानेच ती गोचर होते- म्हणजे प्रकृतिच क्षेत्ररूपाने प्रकट होते. )
36-13
आणि इयेतेचि आघवा । आथी घरमेळावा । म्हणौनि ते वाहिवा । घरी वाहे ॥36॥
आणि तिचे काम करण्याचा सर्व मेळावा घरचाच आहे; म्हणून ती घरीच सर्व वाहित करते.
37-13
वाह्याचिये रहाटी । जे का मुद्दल तिघे इये सृष्टी । ते इयेच्याचि पोटी । जहाले गुण ॥37॥
क्षेत्राची वाही करण्याच्या कामामध्ये मूलभूत जे या सृष्टीत तीन गुण आहेत, ते या प्रकृतीच्या पोटी उत्पन्न झाले आहेत.
38-13
रजोगुण पेरी । तेतुले सत्त्व सोंकरी । मग एकले तम करी । संवगणी ॥38॥
रजोगुण, कर्मरूपी बीजाची पेरणी करतो, सत्वगुण, जितकी पेरणी झाली तितक्याचे रक्षण करतो आणि मग यथाकाळी तमोगुण हा त्याची कापणी करतो. (प्रकृती ही आपल्या सत्व, रज, तम या तीन गुणांच्या द्वारा क्षेत्राची उत्पत्ती, स्थिती, लय करते, असा अर्थ)
39-13
रचूनि महत्तत्त्वाचे खळे । मळी एके काळुगेनि पोळे । तेथ अव्यक्ताची मिळे । सांज भली ॥39॥
पुढे त्यापासून महत् तत्वाचे म्हणजे समष्टिबुध्दीचे खळे निर्माण होते आणि काळरूपी एकट्या बैलाने त्याची मळणी केली जाते. हे करीत असताना शेवटी अव्यक्तरूपी संध्याकाळ होते. (ज्याप्रमाणे खळ्यात धान्य एकत्र करून व त्याची मळणी करून धान्य व भूस निराळे केले जातात, त्याप्रमाणे बुद्धीच्या सहाय्याने बरे-वाईट, पुण्य-पाप अशी कर्माची विभागणी करून त्यांचे सृष्टीत कालांतराने सुखदुःखरूप फळ, प्रकृती पुरुषाला प्राप्त करून देते, असे होत होत शेवटी सर्व सृष्टी अव्यक्त प्रकृतीत लीन होते. या सांख्यमतांत पुरुष चेतन व असंग आहे. तो कर्म करीत नाही ! पण त्याच्या सान्निध्याने प्रकृतीकर्म करते व त्याच्या ठिकाणी अविवेक आहे, तोपर्यंत क्षेत्रान्तर्गतसुखदुःखाचा संबंध व विवेक झाल्यानंतर सुखाचा संबंध मानला असल्यामुळे त्याच्या(पुरुषाच्या) असंगत्वाला बाधा येते; म्हणून वेदान्त दृष्टीने पाहता, या मतातही क्षेत्रक्षेत्रज्ञाचा निवाडा योग्य झाला नाही, असे माऊलिंचे म्हणणे आहे. )
40-13
तव एकी मतिवंती । याबोलाचिया खंती । म्हणितलेया ज्ञप्ती । अर्वाचीना ॥40॥
हे सांख्यांचे मत ऐकून व त्या प्रतिपादनाची खंत वाटून बुद्धीमान योगी म्हणतात, अहो ! हे सर्व तुमचे ज्ञान अलीकडील आहे. (येथून आता माऊलि योगशास्त्राचे मत सांगत आहेत. )
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
41-13
हा हो परतत्त्वाआंतु । के प्रकृतीची मातु । हा क्षेत्र वृत्तांतु । उगेचि आइका ॥41॥
अहो; परतत्व म्हणजे प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या असंग अशा पुरुषाचे ठिकाणी संबंध कसा राहील ? ह्या क्षेत्राच्या उत्पत्तीचा वृत्तांत निवान्तपणे ऐका.
42-13
शून्यसेजेशालिये । सुलीनतेचिये तुळिये । निद्रा केली होती बळिये । संकल्पे येणे ॥42॥
शून्यसेजशालिये म्हणजे शून्यमय अव्यक्तदशेच्या शय्यागृहात भगवंताच्या सृष्टी निर्माण करणार्या इच्छारूप संकल्पाने लीनतेच्या गादीवर निद्रा केली होती.
(संसारतप्त जीवांचा, ज्ञानोपदेशद्वारा उध्दार करण्याकरिता आवश्यक असलेली शास्त्रे व बुद्धी, मन, इंद्रिये इत्यादि कार्यसृष्टीचा संहार होऊन पुनः ती निर्माण व्हावी म्हणून भगवान ” शुध्दसत्वात्मिकचित्त मी ग्रहण करीन ” असा संकल्प करतात व सृष्टीचा संहार होऊन त्या सृष्टी बरोबर भगवंताचा संकल्पही प्रकृतीच्या साम्यभावाला प्राप्त होतो- म्हणजे प्रकृतीत लीन होतो नंतर ज्याप्रमाणे एखादा मनुष्य मी सकाळी चार वाजता उठून अमुक काम करीन असा संकल्प करून निजतो व त्या संकल्पानुसार तो जागा होऊन ठरलेले काम करतो, त्याप्रमाणे प्रलयाचा अवधी संपल्यावर प्रकृतीत लीन असलेला हा भगवंताचा संकल्प अद्भूत होऊन भगवान सर्व सृष्टी निर्माण करतात. )
43-13
तो अवसांत चेइला । उद्यमी सदैव भला । म्हणौनि ठेवा जोडला । इच्छावशे ॥43॥
तो सर्गारंभी अकस्मात् जागा झाला आणि प्रयत्न करण्यात तो सदा तत्पर असल्यामुळे त्याने क्षेत्राचा ठेवा इच्छेने प्राप्त करून घेतला.
44-13
निरालंबीची वाडी । होती त्रिभुवनायेवढी । हे तयाचिये जोडी । रूपा आली ॥44॥
ही अव्यक्तदशेची वाडी त्रिभुवनाएवढीच असल्यामुळे संकल्पाच्या सहाय्याने ती त्रिभुवनरूप कार्यरूपाने व्यक्त झाली.
45-13
मग महाभूतांचे एकवाट । सैरा वेटाळूनि भाट । भूतग्रामांचे आघाट । चिरिले चारी ॥45॥
मग पंचमहाभूतरूप पडीत जमीन संपूर्ण एकत्र करून जीवाचे चार भाग निर्माण केले.
46-13
यावरी आदी । पांचभूतिकांची मांदी । बांधली प्रभेदी । पंचभूतिकी ॥46॥
यानंतर आधी पांचभौतिकाचा समुदाय पांचभौतिकरूपानेच निरनिराळ्या भेदाने विभागला गेला.
47-13
कर्माकर्माचे गुंडे । बांध घातले दोहीकडे । नपुंसके बरडे । राने केली ॥47॥
मनुष्यशरीररूपी क्षेत्राच्या दोहो बाजूला कर्म-अकर्मरूपी दगडांचे बांध घातले आणि ‘नपूंसकें’ – म्हणजे मनुष्याव्यतिरिक्त प्राणी नापीक जमीन बनविली.
(कर्माकर्माचे गुंडे । बांध घातले दोहीकडे ।
कर्माकर्म म्हणजे विधिनिषेध. हे कर्माकर्म मनुष्यप्राण्यांकरिताच सांगितले आहेत. मनुष्य, विहित कर्माप्रमाणे आचरण करून त्या पुण्याचे उत्कर्षरूप पीक प्राप्त करून घेतो व अकर्माचे आचरण करून पापजन्य दुर्गतिरूप पीक घेतो
नपुंसके बरडे । राने केली ॥नपूंसकें- म्हणजे मानवयोनी नाहीत अशा वृक्षादियोनी
बरडे राने केली -म्हणजे ज्यात क्रियमाण कर्म उत्पन्न होत नाही, अशा केल्या
मानवयोनिव्यतिरिक्त इतर पशुपक्ष्यादि योनीतील जीवांना, शास्त्राने कर्माकर्माचे किंवा धर्माधर्माचे विधान लागू केले नसल्यामुळे त्या योनीतील जीवांकडून पुण्यपापरूप क्रियमाण कर्म होत नाही; म्हणून त्या योनीतील कर्माने सूखदुःखरूप फळही मिळत नाही. केवळ प्रारब्धरूप झालेल्या पूर्वीच्या पापकर्मांचे सुखदुःखरूप फळ भोगणार्या त्या योनी आहेत, असा अर्थ.
48-13
तेथ येरझारेलागी । जन्ममृत्यूची सुरंगी । सुहाविली निलागी । संकल्पे येणे ॥48॥
मग जेथे लाग नाही त्या स्थितीत पुनः पुनः जन्ममरणाची येरझार करण्याकरिता या संकल्पाने जन्ममृत्यूंचे भुयार तयार केले.
49-13
मग अहंकारासि एकलाधी । करूनि जीवितावधी । वहाविले बुद्धि । चराचर ॥49॥
मग आयुष्य आहे तोपर्यंत हा संकल्प अहंकाराशी ऐक्य करून बुद्धीकडून चराचराची वहिवाट करवितो-म्हणजे क्षेत्रज्ञाला कर्माच्या कर्तृत्वाचा व त्या कर्मानुसार सुखदुःखरूप फळाच्या भोगाचा अनुभव घ्यायला लावतो.
50-13
यापरी निराळी । वाढे संकल्पाची डाहाळी । म्हणौनि तो मुळी । प्रपंचा यया 50॥
याप्रमाणे शून्यरूपी अव्यक्तदशेत संकल्पाची डहाळी वाढली; म्हणून प्रपंचाला संकल्प मूळ कारण आहे.
(याप्रमाणे योगमतांत सत्वगुण, इच्छा, संकल्प, सृष्टी इत्यादि पदार्थ सत्य मानून त्यांचा क्षेत्रज्ञाशी संबंध मानला आहे; पण वेदान्तदर्शनाने क्षेत्रज्ञाला अद्वैतस्वरूप ठरवून तद्व्यतिरिक्त सर्वच मिथ्या मानले आहे. म्हणून वेदान्तदृष्टीने पाहता योगमतांतही क्षेत्रक्षेत्रज्ञाचा निवाडा बरोबर झाला असे दिसत नाही. )
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १६६ वा, १५, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १९८१ ते १९९२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. १९८१
कथा पुराण ऐकता । झोपे नाडिले तत्त्वता । खाटेवरी पडता । व्यापी चिंता तळमळ ॥१॥
ऐसी गहन कर्मगति । काय तयासी रडती । जाले जाणते जे चित्ती । काही नेघे आपुल्या ॥धृपद॥
उदक लाविता न धरे । चिंता करी केंव्हा सरे । जाऊ नका धीरे । म्हणे करिता ढवाळ्या ॥२॥
जवळी गोचीड क्षीरा । जैसी कमळणी दर्दुरा । तुका म्हणे दूर । देश त्याग तयासी ॥३॥
अर्थ
कथा व पुराण ऐकताना झोप येते. मग खाटेवर पडलो झोप न येता विविध प्रकारची चिंता व्याप याविषयी तळमळ मनात येते. अशी ही प्रारब्धाची कर्मगती गहाण आहे, मग त्यापुढे संसारी माणसे काय रडतील ? सर्व काही जाणत असलेले लोक सुद्धा चांगले विचार आपल्या चित्तात घेत नाहीत. कथा-पुराणे चालू असताना माणसे झोप आली की डोळ्याला पाणी लावतात परंतु झोप काही केल्या आवरत नाही तेव्हा ही कथा पुराण केव्हा संपेल या विषयी तो चिंता करत असतो. परंतु जर समजा दुसऱ्याच्या टवाळया चालू असतील आणि बैठकीत एखादा मनुष्य उठला तर त्याला तो म्हणतो थांबा जाऊ नका आत्ताच जाऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात गोचिड स्तना जवळ राहते परंतु ते शुद्ध दुध न पिता अशुद्ध रक्त पिते तसेच बेडुक आणी कमळ एकाच ठिकाणी राहते परंतु बेडकाला कमळाचा सुगंध न आवडता चिखलाचा दुर्गंध च आवडतो. त्याप्रमाणे मूर्ख मनुष्य हरिकथा व पुराण चालु असताना ऐकत नाही ते जणू दूर देशांअंतरी भटकंती करत असतात.
3 3
अभंग क्र. १९८२
संदेह बाधक आप आपणाते । रज्जु सर्पवत भासतसे ।
भेऊनिया काय देखिले येणे । मारे घायेंविण लोळतसे ॥१॥
आपणेचि तारी आपणचि मारी । आपण उद्धरी आपणया ।
शुक नळिके न्याये गुंतलासी काय । विचारूनि पाहे मोकिळया ॥ध्रु॥
पापपुण्य कैसे भांजिले अंक । दशकाचा एक उरविला ।
जाणोनिया काय होतोसी नेणता । शून्या ठाव रिता नाही नाही ॥२॥
दुरा दृष्टी पाहे न्याहाळूनि । मृगजळा पाणी न म्हणे चाडा ।
धावताचि फुटे नव्हे समाधान । तुका म्हणे जाण पावे पीडा ॥३॥
अर्थ
कोणत्याही गोष्टीविषयी संधेह धरला तर तो आपल्याला बाधत आसतो. जसे दोरी रस्त्यावर पडलेली असते ती आपल्याला सर्पाप्रमाणे भासते व दोरीचे मूळ स्वरूप न समजल्यामुळे पाहणारा त्याला घाबरत असतो. दोरी ला सर्प समजून हा खुप भितो मग हा काय करतो दोरीचा स्पर्श झाल्यामुळे त्याला वाटते मला सर्प चावला आणि असे म्हणत तो खाली लोळत असतो. या सर्वाचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की आपल्याला ज्ञान तारू शकते व अज्ञाना ने आपण आपल्या स्वतःला मारू ही शकतो आणि आपण आपला उद्धारही करून घेऊ शकतो. पोपट पकडणारा मनुष्य काय करतो तर गोल फिरणारी नळी केवळ तिथे ठेवतो मग त्या ठिकाणी पोपट आला की त्या नळीवर बसतो व तो बसल्यामुळे नळी फिरते त्यामुळे पोपट त्या नळीला घट्ट पायाने आवळून धरतो व उलटा होतो उलटा झाला की पोपटाला वाटते की मी पडेल त्या मुळे तो नळी ला घट्ट आवळून धरतो आणि पोपट पकडणारा येतो व पोपटाला घेऊन जातो परंतु पोपटाने पाय जरी सोडले असते तर तो मोकळा झाला असता. त्याप्रमाणे आपणही आपला विचार करून पहा आपणही मोकळे आहोत. पण त्या पोपटा प्रमाणे आपली अवस्था झाली आ��
3 33
अभंग क्र. १९८३
कथे उभा अंग राखेल जो कोणी । ऐसा कोण गणी तया पापा ॥१॥
येथे तो पातकी न येता च भला । रणी कुचराला काय चाले ॥धृपद॥
कथे बैसोनी आणीक चर्चा । धिग त्याची वाचा कुंभपाक ॥२॥
तुका म्हणे ऐलपैल ते थडीचे । बुडतील साच मध्यभागी ॥३॥
अर्थ
जो कथेला उभे राहून हरी भजन करण्याकरता अंग चोरतो त्याच्या पापाची गणती कोण करेल ? हरी कथेमध्ये असा पापी न आलेलाच बरा. युद्धामध्ये कुच्चर शिपाई येऊन काय उपयोग आहे काय ? जो कथेमध्ये बसून इतर कोणत्याही गप्पा झोडतो त्याच्या वाणीचा धिक्कार असो त्याला कुंभ पाकी नर प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात नदीच्या अलीकडचे लोक असो किंवा पलीकडे जर मध्यभागी नदी आली तर काही चुकी आपण केली तर बुडण्याची संभवता असते त्याचप्रमाणे कथेमध्ये जर कोणी विक्षेप केला बडबड केली व्यर्थ गप्पा गोष्टी झोडल्या तर तो भवनदीमध्येच बुडून जातो.
3 3
अभंग क्र. १९८४
नावडे ज्या कथा उठोनिया जाती । ते यमा फावती बरे वोजा ॥१॥
तो असे जवळी गोचिडाच्या न्याये । देशत्यागे ठाये तया दुरी ॥धृपद॥
नव्हे भला कोणी नावडे दुसरा । पाहुणा किंकरा यमा होय ॥२॥
तुका म्हणे तया करावे ते काई । पाषाण का नाही जळामध्ये ॥३॥
अर्थ
ज्यांना हरिकथा आवडत नाही म्हणून हरी कथेतून उठून जातात ते यमाच्या हाती कोणतेही कष्ट न करता आपोआप सापडतात. तो मनुष्य हरिकथेतील हरी रस सेवन करत नाही जसे गोचीड स्तनाच्या अगदी जवळ असते परंतु दूध पीत नाही परंतु अशुद्ध रक्त पिते आणि तसेच हरिकथा ज्या ठिकाणी चालू असेल त्या ठिकाणाहून हा उठून दूर निघून जातो. त्या मनुष्याला कोनी चांगला मनुष्य आपल्या जवळ आला तर आवडत नाही तो मनुष्य म्हणजे यमाचा पहूनाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशा अभक्त मनुष्याला काय करावे. जसा पाषाण पाण्यामध्ये असूनही त्याचा अंतर भाग कोराडच असतो त्याप्रमाणे हा मनुष्य हरीकथेत बसलेला असूनही त्याचा अंतरंग कोरडाच असतो.
3 3
अभंग क्र. १९८५
जवळी नाही चित्त । काय मांडियेले प्रेत ॥१॥
कैसा पाहे चंद्रिदृष्टि । दीप स्नेहाच्या शेवटी ॥धृपद॥
कांतेलेंसे श्वान । तैसे दिशा हिंडे मन ॥२॥
त्याचे कानी हाणे । कोण बोंब तुका म्हणे ॥३॥
अर्थ
हरी कथेत बसलेला मनुष्याचे चित्त हरीकथेत नसेल तर ते जवळ ठेवलेले प्रेतच आहे. तेल संपत आलेला दिवा जसा शेवटी मोठा होतो त्याप्रमाणे कथा न समजल्यामुळे या माणसाचे डोळे तसे मोठे होतात अगदी तारवटलेल्या दृष्टीने तो पाहतो. पिसाळलेले कुत्रे जसे कोठेही हिंडते़ तसे त्याचे मन दहा दिशात हिंडते. तुकाराम महाराज म्हणतात अशा मनुष्याच्या कानी कोणी बोंब मारावी आणि त्याचा काय उपयोग होणार आहे
3 3
अभंग क्र. १९८६
दुर्बळा वाणीच्या एक दोनि सिद्धी । सदैवा समाधि विश्वरूपी ॥१॥
काय त्याचे वाया गेले ते एक । सदा प्रेमसुख सर्वकाळ ॥धृपद॥
तीर्थ देव दुरी तया भाग्यहीना । विश्व त्या सज्जना दुमदुमिले ॥२॥
तुका म्हणे एक वाहाती मोळिया । भाग्ये आगिळया घरा येती ॥३॥
अर्थ
जे लोक योग अभ्यास करून एक-दोन रिद्धी सिद्धी प्राप्त करून घेतात ते लोक दुर्बळ आहेत परंतु जे सर्व विश्वामध्ये समरूप भावनेने पाहतात ते सदैव समाधीत असतात. त्या ज्ञानी भक्ताने केलेले कोणतेही कर्म एक तरी वाया ला गेलेले आहे काय ? तो सदासर्वकाळ हरीच्या प्रेम सुखात असतो. भाग्यहीन मनुष्याला तीर्थ व देव दूर आहे असे वाटते पण त्या सज्जन भक्ताला सर्व विश्वच देव स्वरूपात वाटते व सर्व पाणी हे तीर्थ जला प्रमाणे वाटतात. तुकाराम महाराज म्हणतात काही मनुष्य एका कवडी करता डोक्यावर मुळ्या वाहतात परंतु भाग्यवान मनुष्याच्या घरी भाग्य आपोआप चालत येते.
3 3
अभंग क्र. १९८६
दुर्बळा वाणीच्या एक दोनि सिद्धी । सदैवा समाधि विश्वरूपी ॥१॥
काय त्याचे वाया गेले ते एक । सदा प्रेमसुख सर्वकाळ ॥धृपद॥
तीर्थ देव दुरी तया भाग्यहीना । विश्व त्या सज्जना दुमदुमिले ॥२॥
तुका म्हणे एक वाहाती मोळिया । भाग्ये आगिळया घरा येती ॥३॥
अर्थ
जे लोक योग अभ्यास करून एक-दोन रिद्धी सिद्धी प्राप्त करून घेतात ते लोक दुर्बळ आहेत परंतु जे सर्व विश्वामध्ये समरूप भावनेने पाहतात ते सदैव समाधीत असतात. त्या ज्ञानी भक्ताने केलेले कोणतेही कर्म एक तरी वाया ला गेलेले आहे काय ? तो सदासर्वकाळ हरीच्या प्रेम सुखात असतो. भाग्यहीन मनुष्याला तीर्थ व देव दूर आहे असे वाटते पण त्या सज्जन भक्ताला सर्व विश्वच देव स्वरूपात वाटते व सर्व पाणी हे तीर्थ जला प्रमाणे वाटतात. तुकाराम महाराज म्हणतात काही मनुष्य एका कवडी करता डोक्यावर मुळ्या वाहतात परंतु भाग्यवान मनुष्याच्या घरी भाग्य आपोआप चालत येते.
3 3
अभंग क्र. १९८७
परिमळे काष्ठ ताजवा तुळविले । आणीक नावांची थोडी । एक ते कांतिवे उभविली धवळारें
एकाचिया कुड मेडी । एक दीनरूप आणिती मेळिया । एक ते बांधोनि माडी
अवघिया बाजार एकचि जाला । मिविकली आपुल्या पाडी ॥१॥
गुण तो सार रूपमध्यकार । अवगुण तो फार पीडीतसे ॥धृपद॥
एक गुणे आगळे असती । अमोल्य नावाचे खडे । एक समर्थ दुर्बळा घरी
फार मोलाचे थोडे । एक झगमग करिती वाळवंटी । कोणी न पाहाती तयांकडे
सभाग्य संपन्न आपुलाले घरी । मा एक दैन्य बापुडे ॥२॥
एक माने रूपे सारिख्या असती । अनेकप्रकार याती । ज्याचिया संचिते जैसे आले पुढे
तयाची तैसिच गति । एक उंचपदी बैसउनि सुखे । दास्य करवी एका हाती
तुका म्हणे का मानिती सुख । चुकलिया वाया खंती ॥३॥
अर्थ
चंदन हे एक प्रकारचे कास्ट आहे तरीदेखील त्याच्या सुगंध या गुणामुळे त्याला वजन काट्यात त्याचे माफ करून योग्य ते मूळ ठरवले जाते. मग जगामध्ये इतर जातीचे लाकडे काय थोडी आहेत काय ? मग त्यांची तुलना चंदनाची कशी करता येईल काही लाकडे कापली जातात त्यावर नक्षीकामही केले जाते काही लाकडे झोपडीच्या कुडीला लावतात तर काही लाकडे मेढीला रवलेली असतात. एक लाकूड असे असते की त्याची दीनवाणी मोळी केली जाते व ते विकण्यास नेले जाते आणि एक लाकूड अशी असते की त्याची माडी बांधतात. सर्व प्रकारची कास्ट बाजारात विकण्यास आणली तरीदेखील ते वेगवेगळ्या मोलाने विकली जातात. म्हणून प्रत्येक गोष्टीतील गुण हे सार आहे रूप मध्यम आहे आणि आकार हा अवगुण आहे तो फार त्रास देतो. सामान्य खड्यापेक्षा माणिक, पाचू, मोती हे अनमोल खडे आहेत व तेच त्यांच्या पेक्षा श्रेष��
3 3
अभंग क्र. १९८८
नाही आम्हा शत्रु सोईरे पिशुन । दाटले हे घन माहियेर ॥१॥
पाहे तेथे पांडुरंग रखुमाई । सत्यभामा राही जननिया ॥धृपद॥
लाज भय काही आम्हा चिंता नाही । सर्वसुखे पायी वोळगती ॥२॥
तुका म्हणे आह्मी सदैवाची बाळे । जालो लडिवाळे सकळांची ॥३॥
अर्थ
आम्हाला कोणत्याही प्रकारचे शत्रू, सोयरे, उच, नीच असे दिसत नाही तर सर्वत्र आम्हाला आमचे माहेर पंढरी दाटलेली आहे असे दिसत आहे. मला सर्वत्र पांडुरंग रुखुमाई सत्यभामा हेच माता-पिता दिसत आहेत. आम्हाला कोणत्याही प्रकारची लाज भय चिंता नाही सर्व सुखे आमच्या पायापाशी लोळण घेतात. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही श्रीमंताची बाळे झाले आहोत व त्यामुळे सर्वाचे लाडके झाले आहोत.
3 3
अभंग क्र. १९८८
नाही आम्हा शत्रु सोईरे पिशुन । दाटले हे घन माहियेर ॥१॥
पाहे तेथे पांडुरंग रखुमाई । सत्यभामा राही जननिया ॥धृपद॥
लाज भय काही आम्हा चिंता नाही । सर्वसुखे पायी वोळगती ॥२॥
तुका म्हणे आह्मी सदैवाची बाळे । जालो लडिवाळे सकळांची ॥३॥
अर्थ
आम्हाला कोणत्याही प्रकारचे शत्रू, सोयरे, उच, नीच असे दिसत नाही तर सर्वत्र आम्हाला आमचे माहेर पंढरी दाटलेली आहे असे दिसत आहे. मला सर्वत्र पांडुरंग रुखुमाई सत्यभामा हेच माता-पिता दिसत आहेत. आम्हाला कोणत्याही प्रकारची लाज भय चिंता नाही सर्व सुखे आमच्या पायापाशी लोळण घेतात. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही श्रीमंताची बाळे झाले आहोत व त्यामुळे सर्वाचे लाडके झाले आहोत.
3 3
अभंग क्र. १९८९
गर्भी असता बाळा । कोण पाळी त्याचा लळा ॥१॥
कैसा लाघवी सूत्रधारी । कृपाळुवा माझा हरी ॥धृपद॥
सर्प पिली विताचि खाय । वाचविता कोण माय ॥२॥
गगनी लागला कोसरा । कोण पुरवी तेथे चारा ॥३॥
पोटी पाषाणांचे जीव । कवण जीव त्याचा भाव ॥४॥
तुका म्हणे निश्चळ राहे । होईल ते सहज पाहे ॥५॥
अर्थ
बाळ गर्भात असताना त्याचे लाड कोण पूर्ण करतो ? माझा हरी सर्व सूत्रधारी आहे तो कृपाळू आहे आणि सर्वाचे चतुराईने कसे रक्षण करतो ते पहा. सर्पींन व्याली कि ती पिल्लांना जन्म देताच पिल्ले खाऊन टाकते परंतु तरीदेखील पिल्लांना वाचविणारी कोण तेथे आई आहे ? कोळी उंच ठिकाणावर आपले घर बांधत असतो तरीही अशा परिस्थितीत त्याला त्या ठिकाणी चारा कोण पुरवीत असतो ? पाषाणाच्या पोटात देखील बेडूक जिवंत राहतो मग तेथे त्याला जीवनासाठी अत्यावश्यक लागणारे खाद्य कोण देते ? तुकाराम महाराज म्हणतात यामुळेच तुम्ही निश्चल रहा आणि जे जे होईल ते आपल्या दृष्टीने सहज रीत्या पहाता रहा.
3 3
अभंग क्र. १९९०
न म्हणे कोणा सिद्ध साधक गव्हार । अवघा विश्वंभर वाचूनिया ॥१॥
ऐसे माझे बुद्धी काया वाचा मन । लावी तुझे ध्यान पांडुरंगा ॥धृपद॥
गाता प्रेमगुण शंका माझ्या मनी । नाचता रंगणी नाठवावी ॥२॥
देई चरणसेवा भूताचे भजन । वर्ण अभिमान सांडवूनि ॥३॥
आशापाश माझी तोडी माया चिंता । तुजविण वेथा नको काही ॥४॥
तुका म्हणे सर्व भाव तुझे पायी । राहे ऐसे देई प्रेम देवा ॥५॥
अर्थ
मी कोणालाही अमुक एक सिद्ध आहे किंवा साधक आहे किंवा मूर्ख आहे असे म्हणणार नाही कारण सर्वत्र विश्वंभर व्यापून उरलेला आहे. हे पांडुरंगा माझी बुद्धी काया वाचा मन यांना तुझेच ध्यान लाव. देवा तुझे गुण गाताना तुझ्या रंगात नचतांना मला कसलीही लाज किंवा शंका मनामध्ये येईल असे करू नकोस. देवा सर्व वर्ण अभिमान, जाती अभिमान सांडून तुझ्या चरणांची सेवा मला घडावी आणि सर्व भुतमात्रा तुझेच रुप आहे असे मला वाटू द्यावे. देवा माझ्या मनातून आशा, पाष, मोह, माया, चिंता सर्व काढून टाका आणि तुझ्या वाचून व्यर्थ काहीही खटपट करण्याची व्यथा माझ्या हातून घडू देऊ नको. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझा सर्व भक्तिभाव तुझ्या पायी राहिल अशा प्रकारचे प्रेम तु मला दे म्हणजे झाले.
3 3
अभंग क्र. १९९१
अग्निमाजी गेले । अग्नि होऊनी तेच ठेले ॥१॥
काय उरले तयापण । मागील ते नाम गुण ॥धृपद॥
लोह लागे परिसा अंगी । तोही भूषण जाला जगी ॥२॥
सरिता वोहळा ओघा । गंगे मिळोनी जाल्या गंगा ॥३॥
चंदनाच्या वसे । तृण चंदन जाले स्पर्शे ॥४॥
तुका म्हणे जवळा संता पायी । दुजेपणा ठाव नाही ॥५॥
अर्थ
अर्थ –एखादी वस्तू आगीत पडली असता ती पण जळू लागते आणि थोड्याच वेळात ती वस्तूदेखील अग्निस्वरूप होऊन जाते मग त्या वस्तूला आधीचे वस्तूपण उरत नाही, एवढेच काय तर तिचे नांव आणि गुण देखील मागे उरत नाही. त्याप्रमाणेच एकदा का लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की त्याचे त्वरित सोन्यात रूपातर होते, एवढेच नव्हे तर त्याचे मोल वाढते आणि ते जगी भूषण ठरते. त्याच न्यायाने एकदा का नदीनाले आणि ओघ-ओहोळ गंगेला मिळाले की त्यांचे पहिले अस्तित्व आणि ओळख जाऊन त्या गंगास्वरूपच होऊन जातात व चंदनाच्या संगतीत राहून इतर वृक्षांना देखील चंदनाचा सुगंध येऊ लागतो त्यामुळे नक्की चंदनाचे झाड कोणते ते अंती ओळखणे कठीण होऊन जाते. तुकाराम महाराज म्हणतात की माझे देखील तसेच झाले आहे, संतांच्या चरणांची सेवा करता करता, त्यांच्या पायाचा स्पर्श मला झाला आणि मी देखील संतरूपच होऊन गेलो व त्यामुळे आता दुजेपणा मला नावाला देखील उरला नाही.
3
अभंग क्र. १९९२
ऐशा भाग्ये ज्यालो । तरी धन्य जन्मा आलो ॥१॥
रुळे तळीले पायरी । संत पाय देती वरी ॥धृपद॥
प्रेमामृतपान । होईल चरणरजे स्नान ॥२॥
तुका म्हणे सुखे । तया हरतील दुःखे ॥३॥
अर्थ
मी जर जन्माला येऊन अशा परमभाग्या प्रमाणे जगलो तरच मी जन्माला येऊन धन्य झालो. ते परमभाग्य म्हणजे संत ज्या पायरीवर सतत ये-जा करत असतात ती सर्वात खालची रुळलेली पायरी मी झालो तर फार बरे होईल. असे जर झाले तर हरिच्या प्रेम अमृताचे पान होईल आणि संतचरणरजाने नित्य स्नान होईल. तुकाराम महाराज म्हणतात असे जर झाले तर या सुखा मुळे सर्व दुःख नाहीसे होतील.
3
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















