34. राजा छत्रसाल चरित्र भाग १, (१ ते ५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

सहारा नावाचा एक परगाणा होता. तेथून मोरनगावकडे जाणारा रस्ता घनदाट जंगलातून जात होता. त्या मोरनगावाकडे एक छोटासा कफिला मराठे आणि मोगलांच्या हल्ल्याचाच्या भीतीने लपून-छपून जात होता. एका पालखीत आजारी राजा चंपतराय छत्रसालचे वडील…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! राजा छत्रसाल म.!!!  

!!!  प्रस्तावना  !!!

                   नमस्कार

             सन्माननीय वाचक वृंद! आतापर्यंत आपल्यासमोर नवनवीन व्यक्तींचे चरित्रे जसे… धार्मिक, अध्यात्मिक, पौराणिक, ऐतिहासिक आणि इतरही प्रस्तुत केल्यात. आपण भरभरून कौतुक करून माझे मनोबल, उत्साह सतत वाढवीत राहिलात. त्यामुळे मला प्रोत्साहन मिळून, मी लिहीत गेले. लिहीत आहे. आणि परमेश्वर करून घेईल तोपर्यंत लिहीत राहील.

       आज आपल्यासमोर घेऊन येत आहे ६९वे पुष्प “राजा छत्रसाल”

       नेहमीप्रमाणे आपल्या क्रिया प्रतिक्रिया अपेक्षित!

          कोणतेही ऐतिहासिक चरित्र रेखाटने एवढे सहज सुलभ नाही. अगदी शिवनुष्य पेलण्यासारखे आहे. भारतीय संस्कृती शतकांनुशतके चालत आलेली आहे. विविधतेत एकता हे संस्कृतीचे प्राण तत्व आहे. आणि अखंडता आधारशीलता आहे. त्यामुळे या शक्तीने संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधून ठेवलेले आहे. भारतीय संस्कृतीला मूर्त रूप देण्यासाठी अनेक ऋषीमुनी, महापुरुषांनी फार महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. जेव्हा जेव्हा भारत संकटमय अंधारात डुबायला लागायचा, तेव्हा याच महापुरुषांनी आपला प्रकाश पसरवला. योग्य मार्गदर्शन दाखवले. जेव्हा जेव्हा विदेश आक्रमण करून मानवी मूल्ये पायदळी तुडवण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा तेव्हा   “संभवामि  युगे युगे” च्या तत्त्वाप्रमाणे, अवतारी पुरुषांनी जन्म घेऊन प्रतिरोध केला. मूल्यांचे जतन केले .

        असे महापुरुष समाजाचे तारक, उद्धारक म्हणून जनमानसात फार उच्च स्थानावर विराजमान असतात. त्यांच्यापैकीच एक आहेत.. छत्रपती शिवाजी महाराज! भारतीय संस्कृतीचा गौरव आणि पराक्रमाचे शलाकापुरुष. यांच्याच प्रेरणेने छत्रसाल वयाच्या २० व्या वर्षी त्यांच्या दरबारातून स्वतंत्र राज्य स्थापना करण्याचे स्वप्न घेऊन निघाले. छत्रसालांनी अविरत साठ वर्षे मोगल सत्तेशी संघर्ष करून स्वतंत्र बुंदेलखंडाची स्थापना केली. छत्रसालाच्या कथा आजही सांगितल्या जातात. अशीच एक लोक कथा संपूर्ण बुंदेलखंडात प्रसिद्ध आहे. बुंदेलखंडात एक प्रथा आहे. छत्तररपूर मध्ये छत्रसालांचा एक ओटा आहे. नवदांमत्य त्या ओट्यावर नमस्काराला येतात.  तिथल्या लोकांचा असा समज आणि विश्वास आहे की, त्यांची होणारी संततीच्या अंगात शछत्रसालांचा पराक्रम येईल. सर्वीकडे बुंदेलखंडाची प्रतिमा उज्वल करतील.

                 इतिहास लिहिताना संशोधनाचा आधार घ्यावाच लागतो. लेखकाला जेवढी माहिती मिळेल तेवढे देण्याचा तो प्रयत्न करतो. छत्रसलांची ऐतिहासिक माहिती विखुरलेली आहे. अनेक दुवे निखळलेले होते .त्यांच्याबद्दलची माहिती देण्यासाठी मला डॉक्टर भगवानदास गुप्तांचे “बुंदेलखंड केसरी” आणि “महाराजा छत्रसाल बुंदेला” या दोन पुस्तकातून बरीचशी माहिती उपलब्ध झाली. तसेच माझे जवळ असलेल्या संदर्भांचाही लाभ झाला.

          तसा विचार केला तर, छत्रसालांचे पूर्ण आयुष्य संकटाशी झुंज देण्यातच गेले. वयाच्या १८-१९ व्या वर्षी आई-वडिलांची हत्या झाली आणि ते अगदी एकाकी पडले. मोठे दोन भाऊ आपपल्या संसारात वेगवेगळ्या ठिकाणी होते. बहिणीच्या नवऱ्याकडून थोडीफार मदत मिळाली. आणि ते गेले छत्रपती  शिवाजी महाराजांच्या आश्रयाला. तिथे त्यांनी सर्व प्रकारची विद्या ग्रहण करून आणि समर्थ रामदासांचा आशीर्वाद घेऊन उरी स्वतंत्र बुंदेलखंडाचे, स्वतंत्र राज्याचे स्वप्न घेऊन आपल्या मातृभूमीत परतले.

          आणि मग झाला त्यांचा संघर्ष सुरू. सतत साठ वर्षे. मागे वळून पाहायलाही त्यांना अवधी मिळाला नाही. साठ वर्षानंतर त्यांनी स्वतंत्र बुंदेलखंड राज्य स्थापन केले.  राज्याची सर्वी घडी नीट बसवून कोणत्याही मोहपाशात न अडकता आपल्या दोन्ही पुत्रावर राज्याची जबाबदारी सोपवून, अगदी निर्लेपणे अलगद आपले जीवन संपवले.. अगदी एखाद्या ऋषी सारखे.

      अशा या महान योद्धास कोटी कोटी प्रणाम!!

          क्रमशः
मिनाक्षी देशमुख.
दि. २८-७-२०२३.

!!!  राजा छत्रसाल  !!!

( ६९वे पुष्प “राजा छत्रसाल” )

                 भाग – १.

              सहारा नावाचा एक परगाणा होता. तेथून मोरनगावकडे जाणारा रस्ता घनदाट जंगलातून जात होता. त्या मोरनगावाकडे एक छोटासा कफिला मराठे आणि मोगलांच्या हल्ल्याचाच्या भीतीने लपून-छपून जात होता. एका पालखीत आजारी राजा चंपतराय छत्रसालचे वडील होते. पालखी बरोबर राणी काली कुमारी व पुत्र छत्रसाल घोड्यावर स्वार होते. त्यांचे मागे दहा पायदळ शिपाई व पंधरा सशस्त्र घोडेस्वार सावकाश चालत होते. चंपतरायांना धक्के सहन होत नसल्यामुळे पालखी हळू चालली होती. काही अंतर गेल्यावर क्षीण आवाजात चंपतरायांनी पालखी थांबण्याची आज्ञा दिली. भोयांनी पालखी खाली ठेवली. घोड्यावरून उतरुन राणी कालीकुमारी पालखी जवळ आली. चंपतयांना खोकल्याची मोठी उबळ आल्याने तिने त्यांना पाणी पाजले. छत्रसाल पालखी जवळ आल्यावर चंपतराय म्हणाले, छत्रा, इथून एक रस्ता साकन गावाला जातो. तिथे असलेल्या तुझ्या ताईकडे जाऊन काही दिवस राहा. मराठ्यांचा व मोगलांचा दबाव कमी झाल्यावर सहाराला ये. काही दिवसांनी मी सुद्धा तिथे येईल. एवढे बोलण्याने  चंपकरायांना धाप लागली.

             बाबा, तुम्हाला एकट्याला सोडून मी नाही जाऊ शकत. मोगलांची तुकडी कधी येईल सांगता येत नाही. हळू आवाजात छत्रसाल म्हणाले, मोगल आणि मराठ्यांना घाबरून हे शिपाई कधीही उलटू शकतात. यांच्यावर माझा भरोसा नाही. चंपतराय म्हणाले, छत्रा, आता विचार करायला वेळ नाही. आयुष्यभर बाण आणि तलवारीचे घाव सोसून हे शरीर जर्जर झाले आहे. शिवाय हा आजार. तुला बुंदेलवासियांसाठी वेगळे राज्य स्थापन करायचे आहे. त्यासाठी तूं सुरक्षित राहणे आवश्यक आहे. तुझ्या रक्षणार्थ जावई ज्ञानशहाकडे पाठवीत आहे.

         छत्रसाल म्हणाले, बाबा, मी तुम्हाला प्रथम मोरनगावला पोहोचवून मग ताईकडे जातो. राणी कालीकुमारी म्हणाल्या, स्वामी, छत्रसालचे म्हणणे योग्य आहे. आपण या घनदाट जंगलातून जात असताना जंगली जानवरे व शत्रूंचा कधीही हमला होऊ शकतो. हा ५०  जणांना एकटाच भारी आहे.  शूर पुत्र आपल्याबरोबर असला तर आपल्याला काळजी राहणार नाही.

       नाही.. या क्षणी, इथून हा जावयाच्या गावाला जाईल. राजा चंपतरायने आज्ञा दिली. व्याकुळ नजरेने छत्रसाल ने पाच स्वारांना बरोबर घेऊन, आई-वडिलांना नमस्कार करून निघून गेले. राणी साश्रू नयनाने छत्रसाल गेल्या वाटेकडे पहात होत्या.

          छत्रसाल दिसेनासे झाल्यावर, राणी म्हणाल्या, स्वामी, आता तर जर मोगल किंवा सुजानसिंह फौजेसह येऊन आक्रमण केले तर आपण कुणीच जिवंत राहणार नाही. आपला पराक्रमी पुत्र सोबत असता तर काळजी राहिली नसती. म्हणूनच त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याला दूर ज्ञानशाह कडे पाठवले. आता उशीर न करता लवकर मोरनगाव कडे  निघा. कफिला पुन्हा मोरनगावच्या दिशेने निघाला…

         छत्रसाल संध्याकाळच्या वेळी चाकण गावाला पोहोचले. गावाच्या वेशी जवळ बरोबरच्या घोड्या स्वारांना थांबवून एका सैनिकासह बहिणीच्या घरी आले. बहिणीचे घर म्हणजे चिरेबंद मजबूत गढी होती. छत्रसाल गढीजवळ पोहोचून पहारेकर्‍याला आपली ओळख देऊन शिपायासह आत गेले. दासीने निरोप दिल्यावर त्यांची बहीण मानकुंवर बाहेर आली. आश्चर्याने म्हणाली, छत्रा, यावेळी न कळवता कसा आलास? काय झाले?

           छत्रसाल सांगू लागले… इंद्रमणी  युद्धात गुंतले असल्यामुळे त्यांचा नायक साहेबराय सगळा कारभार पाहत होता. काही दिवस त्यांनी आश्रय दिला. पण नंतर कोणाच्या तरी दबाव आला असल्यामुळे त्यांनी बाबांना दुसरीकडे जाण्याची सूचना केली. मोरनगावला आपले विश्वासू लोक असल्यामुळे बाबांनी मोरनगावला जाणे पसंत केले. मानकुंवर म्हणाली, आई-बाबांनी एकटे सोडून यायला नको होते. छत्रसालने आपली विवशता सांगितली, पण हट्टी मानकुंवर काहीच ऐकायला तयार नव्हती. मध्येच घाबरत छत्रसालच्या सोबतचा शिपाई म्हणाला, ठाकूराईन छत्रसालांना ताप आहे. सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही. पण मानकुंवरने पाणीही विचारले नाही. छत्रसालला आल्या वाटेने परत पाठवले.

            अंगात ज्वर असल्याने लटपट कसे तरी घोड्यावर स्वार होऊन दोघेही गावाच्या वेशी जवळ आले.  तिथे जागा पाहून शिपायाने त्यांच्या झोपण्याची व्यवस्था केली. रात्र वाढत होती. पण भुकेमुळे झोप कुणालाच येत नव्हती. तेवढ्यात शोधत छत्रसालचे मेहूणे ज्ञानशहा दोन शिपायांसह तिथे जेवण व अंथरुण घेऊन आले. आपल्या पत्नीच्या वागण्याची  खंत व्यक्त केली. छत्रसाल म्हणाले, ताईंना आई-बाबांच्या काळजीपोटीच मला उलट पावली परत पाठवले. मी आजारी बाबांजवळ थांबण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण त्यांनी माझे व आईचे ऐकले नाही.

                  ज्ञानशहा म्हणाले, मला वाटते, बाबांना काहीतरी जाणवले असेल. त्यांना अंदाज आला असावा. मोगल त्यांच्या पाठलागवर असतील. तू सुरक्षित राहण्यासाठी तुला जाणून-बुजून दूर केले. अरे त्यांनी बुंदेलखंडाच्या स्थापनेची जी मशाल पेटवली तिला  प्रज्वलित करण्याचे काम तुलाच करायचे आहे. त्यात तुझे भाऊ, कुटुंबीय, मित्र, हितचिंतक सगळे बुंदेलखंडाची अस्मिता कायम राखण्यासाठी आपला जीव ओवाळून टाकतील. छत्रसालने अन्नदेवतेला साक्षी ठेवून प्रतिज्ञा केली.. वेगळा बुंदेलखंड बनवण्यासाठी मी माझे प्राण पणाला लावेन. माझा संकल्प पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. शाबासऽ! मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. रात्री इथेच मुक्काम करा. सकाळी सहाराकडे  रवाना व्हा.

          क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. २८-७-२०२३.

!!!  राजा छत्रसाल  !!!

                  भाग -२.

                   ज्ञानशाह म्हणाले, सकाळी सहाराकडे रवाना व्हा. तिथे रतनशहा आणि अंगदला भेटून पुढची योजना बनवा. कोणतीही मदत लागली तर मला निःसंकोच सांग. शत्रूपासून नेहमी सावध रहा. सूचना देऊन ज्ञानेशहा गावाकडे रवाना झाले.

         छत्रसालचे तापामुळे अंग दुखत होते. त्यांचे मन अंधाकाराशी झुंज देत होते. आपल्या कार्याची सुरुवात कुठून करावी त्यांना सुचत नव्हते. जे आपले भाऊबंद मोगलांच्या अधिन होऊन अडथळे निर्माण करत आहेत, त्यांचा समाचार आधी घेऊन, मगच मोगलांशी दोन हात करावे. अर्धी रात्र सरली तरी, मनात चाललेल्या विचाराने झोप येत नव्हती. कोणाची आपल्याला साथ मिळेल? जुझरसिंग आणि चंपतरायचा वारसा आपले जुने वैभव परत मिळेल का? संभव असंभवाच्या विचारामध्ये त्यांना कधीतरी झोप लागली.

            सकाळी थोडी उशिराच जाग आली. ताप उतरल्यामुळे तरतरी वाटत होती. तेवढ्यात दोन नोकरांसह खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन ज्ञानशहा आले. नाश्ता झाल्यावर ज्ञानेशांनी पुन्हा त्यांना सरळ सहारला जाण्याचा सल्ला दिला. वडिलांची बातमी तिथेच मिळेल म्हणाले. ज्ञानशहाच्या पाया पडून छत्रसाल स्वारांसह सहाराकडे रवाना झाले.

            सहारामध्ये ठाकूर प्रतापची मोठी गढी होती. छत्रसाल सरळ गढीतच प्रवेशले. या ठाकूरांच्याच आश्रयाला चंपतराय सहारात होते. मोगल सरदार राव इंद्रमणी पासून धोका आहे हे कळल्याबरोबर चंपक रायलाला मोरनगावकडे जाण्याचा सल्ला ठाकूरने दिला होता.

             रतनशहा आणि अंगद छत्रसालचे मोठे बंधू आधीच गढीत आले होते. छत्रसालने प्रणाम केल्यावर, बाबां बद्दल चौकशी केली. मग बाबांनी कसे आपल्याला जबरदस्तीने ताईकडे पाठवले, तिथे घडलेली सर्व  हाकिकत कथन केली.दोन्ही भावांना बाबांची अतिशय काळजी वाटू लागली.

      दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गढीत एकदम गडबड ऐकू आली. म्हणून छत्रसाल व रतनशहा आपल्या कक्षातून बाहेर आले. तोच बाबांबरोबर असलेला नाहर सिंह घोड्यावरून उतरून लटपटत्या पायाने त्यांच्याकडेच एक येऊ लागला. त्याचे कपडे रक्ताने माखले होते.  कपडे ठीक ठिकाणी फाटले होते. वेदनेने चेहरा विकृत झाला होता.रतनशहाने विचारले, काय झालं? तुझी दशा अशी कशाने झाली? आई बाबा ठीक आहेत ना? नाहर म्हणाला, सरदार काही ठीक नाही. सगळं संपलं. काय बोलतोस? लवकर सांग काय झालं? नहारमध्ये बोलण्याची शक्ती अजिबात नव्हती. पण अडखळत सांगू लागला…,

       ज्या ठिकाणाहून छोटे सरकार छत्रसाल आम्हाला सोडून निघाले, तिथून आम्ही जेमतेम एक कोस पुढे गेलो नाही तोच, घोडे स्वारांचा मोठा दस्ता येऊन आमच्यावर तुटून पडला. आश्चर्य म्हणजे आमच्या बरोबरच्या सैनिकांनी जराही विरोध केला नाही. शत्रू महाराजांच्या पालखीकडे झेपावलेले पाहून महाराणींनी  आपला थोडा मध्ये घातला असता, एका सैनिकांनी त्यांच्या घोड्याचा लगाम धरला व महाराणीला हात घालायचा त्याचा इरादा दिसल्याबरोबर, महाराणीने कटार आपल्या छातीत खुपसून घेतली. त्यांचे शरीर घोड्यावरून खाली आलेले पाहून महाराजांनी देखील आपली कटार काढली…. बुंदेलांच्या प्रतिष्ठेचा सूर्य मावळला….

         बातमी ऐकून दोघेही बंधू दुःखाने विव्हल झाले. छत्रसाल म्हणाले, मी बाबांचा हुकूम मोडून त्यांच्या सोबतच राहायला हवे होते. मी एकटाच पन्नास लोकांना भारी होतो. पश्चातापदग्ध छत्रसाल म्हणाले, मी या संरक्षक शिपायांना सोडणार नाही. त्यांना गुडघे टेकायला भाग पाडेल. साहेबरायने आपला मित्र असल्याचे नाटक करून आतून मोगल आणि सुजन सिंहाला मिळालेला असावा. नाही तर तो आपल्याला सावध करू शकला असता.

           रतनशाह म्हणाले, ताबडतोब सहारा सोडायला हवे. आई-बाबांचा अंतिम संस्कार आटोपून नंतर काय करायचे ते ठरवू. तोवर गडीतली गर्दी त्यांच्या भोवती जमली होती.

          तिघा भावांनी मिळून आई-वडिलांचा दहावा, गंगापूजन पुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे केले. जवळचे नातेवाईक व आसपासच्या गावचे लोक जेवायला होते. हे लोक चंपतरायच्या उद्देशावर निष्ठा ठेवून होते. या संधीचा फायदा घेऊन, छत्रसालने शत्रू विरुद्धच्या मोहिमेत यातील किती लोक साथ देऊ शकतील हा अंदाज घेण्याचा प्रयत्न करीत होते.

          या सर्व गोष्टीत पंधरा दिवस निघून गेले. छत्रसाल आपल्या भावांना म्हणाले, आता आपण ही जागा सोडून देवगडला गेलो की पुढचा बेत ठरवता येईल. आई-वडिलांच्या मृत्यू नंतर छत्रसाल कोणतीही जोखीम घ्यायला तयार नव्हते. रतनशहा म्हणाले, मी इथे काही दिवस थांबून जे सरदार आपल्या कार्यक्रमात आले होते त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलेन. त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करीन. आपल्या पुढच्या कार्यवाहीत हे आवश्यक आहे. छत्रसालांनी हरकत घेतल्यावर रतनशहा म्हणाले, इतक्या लवकर काहीच घडणार नाही. त्यांचे शत्रुत्व राजा चंपत्रायांशी होते.जुझारसिंहानंतर त्यांनी मोगलांना नाकीनऊ आणले होते. म्हणून त्यांचा राग बाबांवर होता. सध्या आपण त्यांच्या नजरेत नाही. खरंतर आपलं काहीच अस्तित्व नाही.

       तर मग मोगलांना आपल्या अस्तित्वाची जाणवून करून द्यावं लागेल. या हिंदुस्थानाच्या पवित्र भूमीवर आमचे अस्तित्व, शक्ती दाखवून द्यावी लागेल. आपलं राज्य निर्माण करावं लागेल. माझे आयुष्य मी याच उद्देशासाठी समर्पित करेन. छत्रसाल अभिमानाने म्हणाले…

             क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                   दि. २८-७-२०२३.

!!!  राजा छत्रसाल  !!!

                  भाग – ३.

               ठरल्याप्रमाणे रतनशहा सहाराला थांबले. रतनशहाने काही धन छत्रसाल जवळ दिले. विश्वासू पाच घोडेस्वार घेऊन, छत्रसाल व अंगद देवगडकडे रवाना झाले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी देवगडला पोहोचले. तिथेच एका लहानशा किल्ल्यात अंगदचे वास्तव्य होते. दोघेही  सुसज्ज दालनात पोहोचले. दोघेही दिवाणावर स्थानापन्न झाले. छत्रसाल विचार करू लागले आपण तीन भाऊ असून देखील वडिलांच्या शेवटच्या क्षणी एकही पुत्र असू नये. मला जबरदस्तीने दूर केले तर इतरांना बोलावण्याचा प्रश्नच नव्हता. बाबांना नक्कीच हल्ला होण्याची आशंका असावी. जे झालं ते तर परत आणू शकत नाही, पण इतिहासाची पुनरावृत्ती पण होऊ द्यायची नाही. आपण अशी शक्ती केंद्र तयार करू की कोणी भेदू शकणार नाही. राजा जुझारसिंह आणि चंपक रायचे शौर्य, पराक्रम, धाडस, आत्मगौरवाचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे.

           तेवढ्यात अंगद पत्नी रामकुंवर नाश्ता घेऊन आली. छत्रसालने वहिनीला नमस्कार केला. तिचा मुलगा आजारी असल्यामुळे ती  सासऱ्याच्या अंतिम संस्कारात सहभागी होऊ शकली नव्हती. त्यांच्या आठवणीने रामकुवर रडू लागली.थोडी  शांत झाल्यावर म्हणाली, छत्रा भैया, बाबांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका. राजपुतांची मान मर्यादा नष्ट होऊ देऊ नका. प्रत्येक श्वास त्याच कार्यासाठी समर्पित करीन असा प्रण करा.

         छत्रसाल उठून वहिनीच्या पायाला स्पर्श करून म्हणाले, आता आई राहिली नाही. आईच्या ठिकाणी आपणच आहात. आई म्हणून तुम्हाला आश्वासन देतो की, बुंदेलच्या मानसन्मान कायम राखण्यासाठी माझे जीवन समर्पित होईल. अंगदने उठून छत्रसालला मिठीत घेतले. दोघेही एकमेकांचे खाद्य ओले करत होते. शब्द फुटत नव्हते.

            रात्रीचे जेवण झाल्यावर दोघे भाऊ दालनात बसले होते. अंगत म्हणाले, छत्रा,कसला विचार करतोस? छत्रसाल म्हणाले, या बुंदेलखंडाच्या धरतीवर मोगलांचे अस्तित्व असह्य होत आहे. पण करणार काय? आपल्या रावराजेंना मोगलांच्या दास्यत्वातून मुक्त होण्याची इच्छा नाही. त्यांची बुंदेली अस्मिता कुंठीत झाली आहे. त्यांच्याशी बोलायला गेलं तर ते आपल्यालाच गप्प बसा, आरामात जीवन जगा म्हणतील. त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.

         आज कोणत्याही हिंदू राज्यांमध्ये मोगलांसमोर ताठ मान करून चालण्याची हिंमत नाही.आपसातील मतभेद, गैरसमज, द्वेष, दुरावा सोडून एक झाले तर या मोगलांची वाट लागायला कितीसा वेळ लागेल? पण आश्चर्याची गोष्ट आहे की, आपण आपल्याच लोकांचा द्वेष करतो आणि परकीयांशी मैत्री. तेही अशा परकीय लोकांशी ज्यांचा धर्माचा, जातीचा काही सुद्धा संबंध नाही. गेली पाचशे वर्षांपासून हिंदू याच मनोवृत्तीचे शिकार झालेत. आता ती सवय त्यांच्यात इतकी भिनली की, ती मोडता येत नाही.

         छत्रसाल म्हणाले,अंगद दादा, आपण चळवळ सुरू केल्यावर आपल्याला दोन मोर्चा वर लढावे लागेल. सर्वात आधी परतंत्रात सुख मानणाऱ्या भाऊबंदाशी. नंतर मोगलांशी. आपल्याजवळ सैन्य नाही. राज्य नाही. मोगला सारखा बलाढ्य शत्रूला तोंड देण्यासाठी आपल्याला आधी पैसा, सैन्याची जुळवाजुळ करावी लागेल.

        अंगद  म्हणाले, छत्रा, पैशाची चिंता करू नकोस. आपले आजोबांनी ती व्यवस्था करून ठेवली आहे. दैलवाडा मध्ये आपले दूरचे नातेवाईक रामधन बुंदेलेजवळ विश्वासाने बरीच संपत्ती देऊन ठेवली आहे. त्यांना सांगून ठेवले, त्यांच्या नातवंडांना जेव्हा गरज पडेल तेव्हा ही संपत्ती ते मागतील तेव्हा देऊन टाकावी. छत्रा तू दैलवाडाला जाऊन ती धनराशी ताब्यात घे. मुलांच्या उपयोगी पडेल म्हणून आपले वडील चंपत रायांनी ते धन कधीच घेतले नाही. तू दौलवाडाला जा. शिवाय आपल्या काही हितचिंतकांना भेटून काही ठिकाणी प्रयत्न कर.

         राजा जुझारसिंहाच्या कारकीर्दीत राजपुरोहित भानु नावांचे पुरोहित काम करत होते. त्यांनी खूप धन गोळा केले आहे.  त्यांनी मदत केली तर फार मोठी रक्कम मिळू शकेल. आईने सांगितले होते की, या पुरोहिताला अनेक जहागिऱ्या दिल्या होत्या. छत्रसाल म्हणाले, ठीक आहे तुमच्या सल्ल्याने वागेन.

           अंगद म्हणाले, राजपूत राजा आणि सरदारांना एकजूट होण्यासाठी पत्र लिहावे लागेल. ते एका ध्वजाखाली येण्यास तयार झाले तरी, कोणाच्या ध्वजाखाली येतील? आपल्याकडे ना सैन्य, ना पैसा, ना प्रांत, ना संघटन. अशावेळी त्यांचा आपल्यावर कसा विश्वास बसावा? त्यासाठी आधी सैन्य गोळा करावे लागेल. सैन्याच्या मदतीने काही प्रांत जिंकून घेऊ. मग तिथे केंद्र बनवून संचालन करता येईल. एकदा का पाया मजबूत झाला की, लोक आपल्या ध्वजा खाली येतील.

          दुसऱ्या दिवशी सकाळी छत्रसाल दैलवाडला ३० घोडे स्वारांसह रवाना झाले. छत्रसाल तीस घोडेस्वारांसह  रामधन बुंदेलेकडे दैलवाडला आले. त्यांनी रामधन बुंदेलेला आपली योजना सांगितल्यावर संपूर्ण कोष दुसऱ्या दिवशी देण्याचे कबूल केले. रामधनने त्यांचे चांगले आदरतिथ्य केले.

       रामधनने वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले धन जमा करून छत्रसरला दिले. रामधनांच्या प्रामाणिक पणामुळे छत्रसाल भावविव्हल होऊन म्हणाले, काका तुमच्यासारखे निष्ठावंत प्रामाणिक सुपुत्र मिळाले तर देशाच्या नकाशावर बुंदेलखंड राज्याचा उदय व्हायला वेळ लागणार नाही.

           क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                दि. २८-७-२०२३.

!!!  राजा छत्रसाल  !!!

                   भाग – ४.

                 परतीच्या प्रवासात छत्रसाल गावो गावी मुक्काम करत येथील तरुणांना सैन्य भरतीसाठी प्रेरणा देत होते. उज्वल भविष्याची स्वप्न दाखवत होते. जे तरुण तयार झाले त्यांची नावे पत्ते लिहून घेतले. त्यांना आश्वासन दिले, योग्य वेळी सैन्यात भरतीसाठी बोलावण्यात येईल.

       दैवलगड मध्ये छत्रसालचे आजोबा, मावश्या राहत होत्या. तसेच बऱ्याच दिवसापासून पवार परिवार राहत होते. ती वस्तीच पवारांची होती. गावचे प्रधान विक्रमसिंहची मोठी मुलगी देवकुवर उपवर झाली होती. चंपकराचा राजवंश उजाड झाला असला तरी, राजाची मुले त्यांच्या सारखीच पराक्रमी, धाडसी होतील व नुकतेच छत्रसाल तिथे येऊन गेल्यामुळे विक्रमसिंहना  त्या घराण्याशी सोयरीक जोडणे गौरवस्पद वाटले. त्यांनी अंगदकडे प्रस्ताव पाठवला. अंगद त्या परिवाराला चांगले ओळखत होते. ते लोक पिढ्यानपिढ्या अनेक धोके पत्करून क्षात्रधर्म निभावत होते. मोगलांच्या पराधीनतेत राहूनही स्वतःची अस्मिता, तेजस्विता कायम ठेवली होती. या प्रस्तावावर एकट्याने निर्णय घेणे योग्य न वाटल्याने अंगदने आपले बंधू रतनशहाला बोलावून घेतले. त्यामुळे दोन्ही कामे होणार होती. एक म्हणजे लग्नाच्या प्रस्तावावर विचार करणे, दुसरे म्हणजे तिघे भाऊ मिळून भावी योजनेवर विचार विरमर्श करणे.

          सर्वांनी विचार करून छत्रसालचे लग्न विक्रम सिंहाची कन्या देवकुंवरशी करण्याचे निश्चित झाले. पंधरा दिवसांनी छत्रसाल देवगडला परत आले. त्यांनी सैन्यात भरतीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. आणि आणलेली सगळी धनराशी अंगदकडे सोपवली.  तिथे बंधू रतनशहा व वहिनी चंद्रकौरला

 पाहून छत्रसालांना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्या दोघांना नमस्कार केला. वहिनी म्हणाल्या,

 भाऊजी आता तुम्ही लवकरच चतुर्भुज होणार आहात. या तुमच्या दोन्ही भावांनी तुमचे लग्न पक्के केले. दोघे भाऊ आणि दोघी वाहिन्यांना प्रस्तावाला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता.

           पुढचे तीन महिने गडबडीत गेले. विवाहविधी उरकवून वधूला देवगडला आणले. बऱ्याच दिवसांनी घरी मंगल कार्य झाले होते. राजा चंपत राय आणि महाराणीची कमतरता सर्वांनाच भासत होती. सर्व आटोपेपर्यंत आणखी आठ दिवस गेले.

             एक दिवस जेवण झाल्यावर, तिघे भाऊ ओसरीवर बसलेले. कोणता पाहुणा मोगलांच्या विरुद्ध बिनशर्त समर्थन आणि सक्रिय सहयोग कोण देईल याचा आढावा घेतल्यावर ५०% लोक त्यांच्या बाजूने असल्याचे त्यांच्या लक्षात आले. रतनशहा म्हणाले,  छत्रा, योजनेप्रमाणे तू ओरछाकडे  प्रयान करून भानु पुरोहितांची भेट घे. त्यांचे म्हणणे समजून घे. त्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी छत्रसाल ओरछाकडे निघाले.

        छत्रसाल ओरछाकडे निघाल्यावर संदेश वाहकाद्वारे भानु पुरोहिताचा वंशज सूर्यभानला निरोप पाठवला की, छत्रसाल भेटायला येत असून त्यांना सैन्य उभारण्यासाठी धनाची आवश्यकता आहे. संदेश ऐकून पंडित सूर्यभान काळजीत पडला. त्याने जवळच राहत असलेल्या धाकटा भाऊ मेघा पंडित प्रसिद्ध असलेल्या भावाला मसलत करण्यासाठी बोलावून घेतले.

         तो आल्यावर पंडित सूर्यभानने संदेश वाहकाचा निरोप सांगितल्यावर म्हणाला, इतक्या वर्षानंतर आपली आठवण कशी झाली? पुरोहित वंशाचा परिवार कुठे आहे? कसा आहे? जगला की मेला याची दखल सुद्धा घेतली नाही. आणि आता भेटायला येत आहे ते धनासाठी. मोठे धर्म संकटच आहे.

        पंडित मेघा म्हणाला, त्यात कसलं आलं आहे धर्मसंकट? आपल्या तीन पिढ्यांनी त्यांचे मीठ खाल्ले. त्यांच्याकडून मानसन्मान, जहागीर मिळाल्या. आम्ही न मागता त्यांनी भरपूर दिले. आज त्यांचेवर संकट आल्यामुळे पहिल्यांदा आपल्या समोर हात पसरत आहे तर,  तुम्हाला वाटते आभाळ जणू कोसळले.

           तेवढ्यात पंडित सूर्यभानची पत्नी मधुराणी आली, तिनेही छत्रसालला मदत करण्याचा कल दिल्यावर, सूर्यभान म्हणाले, अहोऽ, आपले कुटुंब मोठे आहे. आपल्या दोन कन्येचा व मेघाच्या तीन मुली, छत्रसालला सर्व दान दिले तर पाच मुलींचा विवाह कसे करणार? कोण देणार आपल्याला पैसा? देणारेच आपल्याला मागत आहे. घाईने निर्णय घेणे योग्य नाही. कधीकाळी आपण त्यांचे पुरोहित होतो. असेल. पण आता नाही आणि पुढे होण्याची शक्यताही नाही. त्यांच्या जवळ किल्ला, कोष, सैन्य काहीच नसताना कसे काय राज्य उभारणार? सगळेजण आपला जीव वाचवण्याचे बघतात. आसपासचा एकही हिंदू राजाच्या डोक्यावर मुकुट नाही. सगळे मोगलांचे पाय चाटीत आहेत. हिंदू राजाची सारी अस्मिता लयाला गेली आहे.

        मधुराणी म्हणाली, अशा पारतंत्रात जगताना आम्ही स्त्रिया नेहमी भीती खाली वावरत असतो. सतत भीती वाटत असते की, एखादी मोगली सैनिकाची तुकडी येईल व आम्हाला विटंबनाला सामोरे जावे लागेल. आपण ब्राह्मण असल्यामुळे, तलवार चालवणे आपला धर्म नाही. पण जे हात तलवारीची करामत दाखवतात त्यांना बळ तरी द्यावे. वेळ पडली तर तलवार सुद्धा उचलावी. भगवान परशुरामांनी सुद्धा शस्त्र धारण केले होतेच ना?

         सूर्यभान रागाने म्हणाले, मुर्खा आहात तुम्ही. राजकारणात तुम्हाला पडायचे काहीच कारण नाही. मधुराणीचा चेहरा रागाने लाल झाला. त्या म्हणाल्या, शेकडो वर्षापासून तुम्ही पुरुषांनी समाज आणि राजकारणापासून स्त्रियांना दूर ठेवले. पण आता असे चालणार नाही. दोघे बंधू  पहिल्यांदाच मधुराणीचे ते अनोखे रूप  पाहून विस्मय चकीत  होऊन पाहतच राहिले.

              क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. २८-७-२०२३

!!!  राजा छत्रसाल  !!!

                  भाग – ५.

                 पंडिताईन मधुराणी दीराला म्हणाल्या, कुंवरजी, छत्रसालजींना जेवढे धन लागत आहेत तेवढे द्या. उलट आमच्या ऐपतीपेक्षा जास्तच द्या. ही एक संधी आहे. तुमचे व्यक्तिमत्व उंचावण्याची, इतिहासात तुमचे नाव लिहिले जाण्याची. काळाची पाऊले ओळखून तसे वागा.

             तेवढ्यात बाहेर घोड्यांच्या टापांचा आवाज जवळ आल्यावर, मधुराणी दिराला म्हणाल्या, जरा बाहेर जाऊन बघा बरं! छत्रसाल कुवंरजी तर आले नाहीत ना?

            दोघे भाऊ बाहेर व्हरांड्यात येऊन पाहता तो पंचवीस  तीस घोडेस्वार पाहून मोगल आहेत की काय या भीतीने ते घाबरले. पण तेवढ्यात छत्रसाल घोड्यावरून उतरून व्हरांड्यात येऊन स्वतःची ओळख देत व नमस्कार करत म्हणाले, मी छत्रसाल. राजा चंपतरायचाचा धाकटा मुलगा. तुम्ही नावाने मला ओळखत असालच .अरेऽ,  हे काय बोलणे? राजा चंपतरायला कोण ओळखत नाही? तुम्ही चौघे भाऊ होतात. तुमचा मोठा भाऊ सारवाहनशी माझी चांगली ओळख होती. हे मोगलांचे स्वार नाहीत हे पाहून सूर्यभान व मेघा पंडित निश्चिंत झाले.

              छत्रसाला घेऊन सूर्यकांत व मेघा आत दालनात येऊन गालिच्यावर बसले. मेघा पंडित ने राजकुमार कुमार छत्रसालना झुकून नमस्कार केला. म्हणाले, सारवाहनची दुःखद घटना घडली, तेव्हा मी राजाजींच्या सेवेत होतो. बरं कसं काय येणं केलं? आमचा पत्ता कसा मिळाला?

              छत्रसाल म्हणाले, तुम्हाला माहितीच असेल आता महाराज, महाराणी या जगात नाहीत, अरेरे! आम्हाला नाही कळले. काय झाले होते? मग छत्रसालांनी घडलेली घटना कथन केली. सूर्यभानने दुःख, शोक व्यक्त केला.

           छत्रसाल म्हणाले, ज्या लोकांमुळे महाराज व महाराणींवर असा दुःखद प्रसंग आला, त्यांना धडा शिकवण्यासाठी बुंदेलांचे सैन्य उभे करायचे आहे. त्यासाठी मोठ्या रकमेची गरज आहे. तुमच्याकडून मदतीची अपेक्षा आहे.

                सूर्यभान दयनियता दाखवत, असमर्थता व्यक्त केली. छत्रसालचेचे मन उद्विग्न झाले.

           तेवढ्यात पंडिताईन मधुराणी हातात रेशमी पिशवी घेऊन आल्या. छत्रसालना नमस्कार करून म्हणाल्या, या दारातून तुम्ही रिकाम्या हाताने परत जाणार नाही. माझ्याजवळ जी बचत व दागिने आहेत, हे माझे स्त्री धन आहे. यावर माझा अधिकार आहे. हे मी बुंदेलखंडाच्या आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी अर्पण करीत आहे. मधुराणीने जबरदस्तीने पिशवी छत्रसालना दिली.

               आई! तुम्ही बुंदील खंडासाठी जे औदार्य दाखवले त्याची कशालाही तोड नाही. मी तुम्हाला वचन देतो,बुंदेलांच्या स्वाभिमानाची रक्षा करण्यासाठी, त्यांच्यासाठी राज्य उभे करण्यासाठी मी माझ्या प्राण्याची अहुती द्यायला मागे पुढे पाहणार नाही. तुमचे आशीर्वाद असू देत.

         मधुराणीने डोळे पुसत त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. म्हणाल्या, महाप्रतापी राजाच्या मुलाचे आमच्या घरी आगमन झाले. सन्मान मिळाला. त्याबद्दल हे घर सदैव ऋणी राहील. सूर्यभानात छत्रसालांच्या नजरेला नजर मिळवण्याची हिंमत नव्हती.

           छत्रसाल उठून आपल्या घोड्याजवळ येऊन रिकिबीत पाय ठेवणार तोच, सूर्यभानने हाक मारली. कुमार… राजकुमार… बेटा… मला क्षमा कर. स्वार्थाने मी अंध झालो होतो. माझी ऐपत असेल तेवढे पैसे घेऊन लवकरच देवगडला घेऊन येईन. रतनशहा आणि अंगदची पण भेट होईल. ऐकून छत्रसाल निर्विकार होते. पण मधुराणीच्या चेहऱ्यावर संतोष दिसला.

          सातव्या दिवशी छत्रसाल देवगडला पोहोचले. प्रवासात त्यांनी सैन्य भरतीचे काम केले. सावकार, शेतकऱ्यांकडून जमवलेली धनराशी अंगदकडे सोपवली. अंदने सांगितले, दोन दिवसापूर्वी सूर्यभान येऊन मोठी धनराशी देऊन गेला.

            तिघा भावाने ठरवले, मोगलांविरुद्ध मोहीम सुरू करण्याआधी या मोहिमेसाठी किती राजे आणि बुंदेले सरदारांची मदत मिळू शकेल? त्यांनी काहींना पत्र पाठवले. काहींकडे संदेश वाहक पाठवले. व काहींना स्वतः जाऊन भेटले. तीन महिने धावपळ करण्याचा परिणाम असा निघाला की, कोणीही मोगलांशी टक्कर द्यायला तयार नव्हते. त्या सगळ्यांनी मोगलान विरुद्ध उठाव केलेला राजा जुझारसिंग, पृथ्वी सिंग आणि चंपतरायची झालेली गत पाहिली होती. ते कोणताही धोका पत्करायला तयार नव्हते. उलट त्यांनाच परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तिघे भाऊ निराश झाले.

        एके दिवशी त्यांचे काका जामशहा कालपिला जायला निघाले असता, वाटेत देवगड लागले. मुलांना भेटायला मुद्दाम आले .त्यांचे आदरतिथ्य, औपचारिक गोष्टी झाल्यावर, अंगद निराश होऊन म्हणाले, काका, आम्ही अगदी एकटे पडलो. कोणी साथ द्यायला तयार नाही. आपलेपणा तर सगळे दाखवतात. तुमच्या बरोबर आहोत म्हणतात. मदत करण्याच्या शपथा घेतात. पण म्यानातून तलवार काढून पुढे कोणीच येत नाही. काका त्यांची समजूत घालवण्याचा प्रयत्न करीत होते.

            अंगद म्हणाले, हे तर माहीत होते की सगळे मोगलांच्या आधिन आहेत. त्यांच्या हुकमाची अमंलबजावनी करतात. पण हे नव्हते माहीत की, राजपुतांच्या स्वाभिमानाचा सूर्य पूर्णपणे बुडाला आहे. छत्रसाल म्हणाले, कितीही वाईट परिस्थिती असली तरी, मी माझ्या ध्येयापासून विचलित होणार नाही. संकल्प सोडणार नाही. प्राण खर्ची पडले तरी चालेल. मी माझी तलवार उचलीनच.

            क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि. २८-७-२०२३.

       

राजा छत्रसाल म. चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading