आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

९ एप्रिल, दिवस ९९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी १५१ ते १७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ११७७ ते ११८८
“९ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ९ Apirl
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ९ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ११७७ ते ११८८ चे पारायण आपण करणार आहोत.
९ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा, ओवी १५१ ते १७५,
151-9
तैसा कृतनिश्चय वाया गेला । जैसा कोण्ही एकु कांजी प्याला । मग परिणाम पाहो लागला । अमृताचा ॥151॥
त्याचप्रमाणे संसारात मी आहे असा जो त्यांचा कृतनिश्चय, तो वाया जातो. असा कोणी एखादा कांजी पिऊन अमृतापासून होणाऱ्या सुखाचा लाभ इच्छितो,
152-9
तैसे स्थूलाकारी नाशिवंते । भरवसा बांधोनि चित्ते । पाहती मज अविनाशाते । तरी कैचा दिसे ॥152॥
त्याप्रमाणे, अंतःकरणपूर्वक भरंवशाने नाशवंत अशा देहाचे ठिकाणी अविनाशी अशा मला पाहतात, तर मी त्यांना कसा दिसेन ?
153-9
काइ पश्चिमसमुद्राचिया तटा । निघिजत आहे पूर्विलिया वाटा । का कोंडा कांडता सुभटा । कणु आतुडे ॥153॥
हे पहा कोणी पश्चिमसमुद्राकडे जाण्याचा हेतूने पूर्वसमुद्राच्या वाटेला जाऊ लागला, तर त्याला पश्चिमसमुद्र प्राप्त होईल का ? किंवा हे महाविरा, कोंडा कांडू लागले असता त्यात धान्य प्राप्त होईल का ?
154-9
तैसे विकारले हे स्थूळ । जाणितलेया मी जाणवतसे केवळ । काइ फेण पिता जळ । सेविले होय ॥154॥
त्याचप्रमाणे, हे विस्तार पावलेले जग जाणल्याने निर्दोष अशा मला जाणता येईल का ? फेस प्याल्याने पाणी प्याल्याप्रमाणे होते का
155-9
म्हणोनि मोहिलेनि मनोधर्मे । हेचि मी मानूनि संभ्रमे । मग येथिची जिये जन्मकर्मे । तिये मजचि म्हणती ॥155॥
म्हणून मायामोहीत मनोवृत्तीने संसारांतच मी आहे असे भ्रांतीने मानून तेथील जन्ममरणादि सर्व स्थिति मलाही आहेत असे समजतात.
156-9
येतुलेनि अनामा नाम । मज अक्रियासि कर्म । विदेहासि देहधर्म । आरोपिती ॥156॥
याप्रमाणे नामरहित, क्रियारहित व देहरहित असा जो मी, त्या मला नामधारी, कर्मकारी व देहधर्मानी युक्त असणारा असे समजतात,
157-9
मज आकारशून्या आकारु । निरुपाधिका उपचारु । मज विधिविवर्जिता व्यवहारु । आचारादिक ॥157॥
मला निराकाराला आकार, निरुपाधिकाला उपचार, कर्तव्यरहिताला व्यवहार,
158-9
मज वर्णहीना वर्णु । गुणातीतासि गुणु । मज अचरणा चरणु । अपाणिया पाणी ॥158॥
मला जातिरहिताला जात, गुणातीताला गुण, चरणहिताला चरण, हस्तरहिताला हस्त,
159-9
मज अमेया मान । सर्वगतासी स्थान । जैसे सेजेमाजी वन । निदेला देखे 159॥
मज परिमाणातीताला परिमाण, सर्वव्यापकाला ठिकाण; ज्याप्रमाणे अंथरुणात निजलेला वनाची शोभा स्वप्नात पाहतो.
160-9
तैसे अश्रवणा श्रोत्र । मज अचक्षूसी नेत्र । अगोत्रा गोत्र । अरुपा रुप ॥160॥
त्याप्रमाणे कर्णरहिताला कान, नेत्ररहिताला नेत्र, गोत्ररहीताला गोत्र, निराकाराला रूप,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
161-9
मज अव्यक्तासि व्यक्ती । अनार्तासी आर्ती । स्वयंतृप्ता तृप्ती । भाविती गा ॥161॥
अव्यक्त असा जो मी त्या मला व्यक्ती, निरिच्छास इच्छा व जो मी स्वयमेव तृप्त आहे, त्यास तृप्ति अशा कल्पना करतात.
162-9
मज अनावरणा प्रावरण । भूषणातीतासि भूषण । मज सकळकारणा कारण । देखती ते ॥162॥
मी वस्त्ररहित म्हणजे सर्व जगाला पांघरूण घालणारा, त्या मला पांघरूण घालतात; भूषणातीत म्हणजे निराकार असा जो मी, त्या मला दागिने घालतात;
163-9
मज सहजाते करिती । स्वंयभाते प्रतिष्ठिती । निरंतराते आव्हानिती । विसर्जिती गा ॥163॥
मी सर्व जगाला उत्पन्न करणारा असून मला दुसऱ्यांनी उत्पन्न केला आहे असे मानतात; मी स्वयमेव असून माझ्या मूर्ति करतात; मी स्वतःसिद्ध असून माझी प्राणप्रतिष्ठा करतात, व ओतप्रोत भरलेला असून माझे आव्हानविसर्जन करतात.
164-9
मी सर्वदा स्वतःसिद्धु । तो की बाळ तरुण वृद्धु । मज एकरुपा संबंधु । जाणती ऐसे ॥164॥
मी नेहमी स्वयमेव व निराकार असून मला बाल्य, तारुण्य व वार्धक्य अशा अवस्था आहेत असे मानतात.
156-9
मज अद्वैतासि दुजे । मज अकर्तायासि काजे । मी अभोक्ता की भुंजे । ऐसे म्हणती ॥165॥
मी अद्वैत असून माझ्या ठिकाणी द्वैत मानतात; मी काहीएक न करणारा असून कर्मे करतो व काही न खाणारा असून खातो, असे म्हणतात;
166-9
मज अकुळाचे कुळ वानिती । मज नित्याचेनि निधने शिणती । मज सर्वातराते कल्पिती । अरि मित्र गा ॥166॥
मला कुळगोत नसून माझ्या कुळाचे वर्णन करतात, मी नित्य असून मी मरतो असे मानून माझ्या मरणाने शोक करतात; तसेच मी सर्वाच्या अंतर्यामी राहणारा असून अमक्याचा शत्रु व अमक्याचा मित्र अशी माझ्या ठिकाणी कल्पना करतात.
167-9
मी स्वानंदाभिरामु । तया मज अनेका सुखांचा कामु । अवघाची मी असे समु । की म्हणती एकदेशी ॥167॥
मी निजानंदात निमग्न असणारा, त्या मला इतर सुखांची इच्छा करणारा असे मानतात, व सर्व ठिकाणी माझी समदृष्टि असुन मला एकदेशी म्हणजे एका स्थळी राहणारा म्हणतात.
168-9
मी आत्मा एक चराचरी । म्हणती एकाचा कैपक्ष करी । आणि कोपोनि एकाते मारी । हेचि वाढविती ॥168॥
मी सर्व स्थावरजंगमांचा आत्मा असून एकाचा कैवारी व एकावर रागावून त्यास मारणारा अशी माझी सर्वत्र प्रसिद्धि करतात.
169-9
किंबहुना ऐसे समस्त । जे हे मनुष्यधर्म प्राकृत । तयाचि नांव मी ऐसे विपरीत । ज्ञान तयांचे ॥169॥
किंबहुना जे जे मनुष्यधर्म, ते ते सर्व मला लागू आहेत असे त्यांचे विपरीत ज्ञान असते.
170-9
जव आकारु एक पुढा देखती । तव हा देव येणे भावे भजती । मग तोचि बिघडलिया टाकिती । नाही म्हणोनि ॥170॥
ज्या वेळेस ते दृष्टीसमोर एखादी मूर्ति पाहतात, त्या वेळेस ती देवच आहे या भावाने तिला भजतात; ; मग तीच भंगल्यावर तिच्यातील देवपण नाहीसे झाले असे मानून तिचा त्याग करतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
171-9
माते येणे येणे प्रकारे । जाणती मनुष्य ऐसेनि आकारे । म्हणऊनि ज्ञानचि ते आंधारे । ज्ञानासि करी ॥171॥
अशा प्रकाराने मी मनुष्याचा देह धारण करणारा आहे असे समजतात, म्हणून त्यांचे हे ज्ञानच खऱ्या ज्ञानाच्या आड येते.
मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतस: ।
राक्षसीमासुरी चैव प्रकृतिं मोहिनी श्रिता: ॥9. 12॥
172-9
यालागी जन्मलेचि ते मोघ । जैसे वार्षियेवीण मेघ । का मृगजळाचे तरंग । दुरुनीचि पाहावे ॥172॥
सारांश, ज्याची मजविषयी अशा प्रकारची समजूत असते, त्यांचा जन्म व्यर्थच होय. ज्याप्रमाणे, पर्जन्यकालावाचून मेघ व्यर्थ आहेत किंवा मृगजलाच्या लाटा जशा दुरूनच पाहण्यास योग्य होत,
173-9
अथवा कोल्हेरीचे असिवार । नातरी वोडंबरीचे अळंकार । की गंधर्वनगरीचे आवार । आभासती का ॥173॥
अथवा मातीच्या चित्रांतले घोडेस्वार, कपटविद्येचे अलंकार किंवा संध्याकाळी ढगांत दृष्टीस पडणाऱ्या गावाचे कुसू भासते,
174-9
सांवरी वाढिन्नल्या सरळा । वरि फळ ना आंतु पोकळा । का स्तन जाले गळा । शेळिये जैसे ॥174॥
शेर जरी सरळ वाढला तरी तो जसा आत पोकळ असून वर फलही येत नाही, किंवा शेळीच्या गळ्याला उत्पन्न झालेल्या स्तनांतून जसे दूध निघत नाही,
175-9
तैसे मूर्खाचे तया जियाले । आणि धिक् कर्म तयांचे निपजले । जैसे सांवरी फळ आले । घेपे ना दीजे ॥175॥
किंवा सांवरीच्या झाडाला फळ झाले असता ते जसे कोणाला घेता किंवा देता येत नाही, त्याप्रमाणे त्या मूर्खांचे जिणे होय, आणि त्यांच्या कार्यालाही धिक्कार असो !
दिवस ९९ वा, ९, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ११७७ ते ११८८
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ११७७
नको देऊ देवा पोटी हे संतान । मायाजाळे जाण नाठवसी ॥१॥
नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य । तो एक उद्वेग होय जीवा ॥२॥
तुका म्हणे करी फकिराचे परी । रात्रंदिवस हरी येईल वाचे ॥३॥
अर्थ
देवा पोटी संतान देऊ नको कारण मोहजाळात जर मी अडकलो तर मला तुझे ध्यान होणार नाही. देवा धन आणि भाग्य हे तर देऊच नको कारण तो एक जीवाला उद्वेगच आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला फकीर आणि दरिद्री कर मग मात्र मी तुझे रात्रंदिवस माझ्या मुखाने नाम घेईल आणि माझ्या मुखात तुझे नाम सतत येत राहील असेच तू कर.
अभंग क्र. ११७८
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे । उदास विचारे वेच करी ॥१॥
उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥धृपद॥
परउपकारी नेणे परनिंदा । परस्त्रीया सदा बहिणी माया ॥२॥
भूतदया गाईपशूचे पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी ॥३॥
शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्त्व वडिलांचे ॥४॥
तुका म्हणे हेचि आश्रमाचे फळ । परमपद बळ वैराग्याचे ॥५॥
अर्थ
जो मनुष्य उत्तम उद्योग धंदा करून धन कमवितो आणि त्याचा विनियोग चांगला, उत्तम करतो त्याचं मनुष्याला उत्तम गती मिळेल. आणि तो उत्तम जन्माला येऊन पुन्हा सुख भोगेल. जो मनुष्य केव्हाही परनिंदा करत नाही आणि परस्त्री व परनारी यांना आई, बहीण यांच्या समान मानतो व सर्वावर परकर करतो, तसेच जो सर्व प्राणिमात्रांना वर नेहमी दया करतो, गायी सारखेच इतर प्राण्यांचे पालन पोषण करतो आणि आडराणी तहानलेले जीवांना पाणी पाजतो, जो शांत राहून कोणाचे मन दुखवत नाही कोणाशीही वाईट वागत नाही तो आपल्या वाडवडिलांचे महत्त्व वाढवितो. तुकाराम महाराज म्हणतात आदर्श युक्त गृहस्थाश्रमा साठी हेच फळ आहे आणि वैराग्याचे हेच परम बळ आहे.
अभंग क्र. ११७९
हरी म्हणता गति पातके नासती । कळिकाळ कापती हरी म्हणता ॥१॥
हरी म्हणता भुक्ती हरी म्हणता मुक्ती । चुके यातायाती हरी म्हणता ॥धृपद॥
तपे अनुष्ठाने न लगती साधने । तुटती बंधने हरी म्हणता ॥२॥
तुका म्हणे भावे जपा हरीचे नाम । मग काळयम शरण तुह्मा ॥३॥
अर्थ
हरीचे नाम घेतल्याने सर्व पापाचे नाश होतात. आणि सद्गती प्राप्त होते आणि कळिकाळ देखील हरिनाम घेतल्यावर थरथर कापतो. हरी म्हटल्यानंतर भुक्ती मुक्ती प्राप्त होते आणि जन्म मरण रुपी येरझार नाहीसे होतात संपतात. हरिनाम घेतल्यानंतर संसार बंधने तुटतात आणि तप, अनुष्ठान असे इतर कोणतेही साधन करण्याची गरज लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात भक्ती भावपूर्वक हरिनाम घेतल्यानंतर काळात देखील तुम्हाला शरण येणार.
अभंग क्र. ११८०
नये वाटू मन । काही न देखावे ते भिन्न ॥१॥
पाय विठोबाचे चित्ती । असो द्यावी दिवसराती ॥धृपद॥
नये काकुळती । कोणा यावे हरीभक्ती ॥२॥
तुका म्हणे साई । करील कृपेची विठाई ॥३॥
अर्थ
साधकाने पंचवीषयाकडे मन पागु देऊ नये आणि प्राणी मात्रा मध्ये भूतमात्र मध्ये केव्हाही भेद करू नये. आपल्या चित्तामध्ये रात्रंदिवस विठोबाचे चरण असू द्यावे. भक्ताने हरी शिवाय इतर कोणालाही शरण जाऊ नये इतर कोणालाही काहीच मागू नये. तुकाराम महाराज म्हणतात असे जर हरिभक्त वागू लागले तर मग विठाबाई माऊली त्याच्यावर कृपेची सावली करेल.
अभंग क्र. ११८१
सकळ देवाचे दैवत । उभे असे या रंगात ॥१॥
रंगा लुटा माझे बाप । शुद्ध भाव खरे माप ॥धृपद॥
रंग लुटिला बहुती । शुक नारदादि संती ॥२॥
तुका लुटिताहे रंग । साह्य जाला पांडुरंग ॥३॥
अर्थ
सर्व दैवताचे दैवत जो हा विठ्ठल तो कीर्तन व भजन याच्या रंगांमध्ये उभा आहे. हे माझे बाप हो तुम्ही शुद्ध भक्तीचे माप घेऊन कीर्तन आणि भजनाचा रंग लुटा. शुक, नारद आणि पुष्कळ संतांनी हा रंग लुटला आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी हा रंग लुटत होतो त्या वेळेला पांडुरंग मला साह्य झाला आहे.
अभंग क्र. ११८२
उशीर का केला । कृपाळुवा जी विठ्ठला ॥१॥
मज दिले कोणा हाती । काय मानिली निश्चिंती ॥धृपद॥
कोठवरी धरू धीर । आता मन करू स्थिर ॥२॥
तुका म्हणे जीव । ऐसी भाकितसे कीव ॥३॥
अर्थ
हे कृपाळू विठ्ठला मला भेटण्या विषयी तुम्ही इतका उशीर का केलास मला कोणाच्या तरी हाती स्वाधीन करून तुम्ही निश्चिंत झाला आहात काय ? मी कोठ पर्यंत धीर धरू आणि माझे मन तरी कुठपर्यंत स्थिर करू. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता माझा जीव काकुळतीला येऊन तुमची करुणा भाकत आहे.
अभंग क्र. ११८३
तुका वेडा अविचार । करी बडबड फार ॥१॥
नित्य वाचे हाचि छंद । राम कृष्ण हरी गोविंद ॥धृपद॥
धरी पांडुरंगी भाव । आणीक नेणे दुजा देव ॥२॥
गुरुज्ञान सर्वा ठायी । दुजे न विचारी काही ॥३॥
बोल नाईके कोणाचे । कथे नागवा चि नाचे ॥४॥
संगउपचारे काटाळे । सुखे भलते ठायी लोळे ॥५॥
काही उपदेशिले नेणे । वाचे विठ्ठल विठ्ठल म्हणे ॥६॥
केला बहुती फजित । तरी हे चि करी नित्य ॥७॥
अहो पंडितजन । तुका टाकावा थुंकोन ॥८॥
अर्थ
हा तुकाराम फार वेड आहे आणि अविचारी आहे आणि हा हरिभजना विषय फार बडबड करत आहे. माझ्या वाणीला नित्य सर्व काळ राम कृष्ण गोविंद हरी या नामाचा छंद लागला आहे. पांडुरंगा विषयीचा माझा दृढ भक्तिभाव आहे आणि या पांडुरंगा वाचून इतर कोणालाही मी आता मानत नाही. गुरु ज्ञानामुळे मला सर्वत्र हरीच आहे असा अनुभव येत आहे आणि त्या वाचून मी इतर कोणत्याही पदार्थाचा विचार करत नाही. मी शुद्ध संतांशिवाय कोणाचाही उपदेश ऐकत नाही आणि कथेमध्ये मी तल्लीन होऊन इतका नाचतो की मला माझ्या कपड्याची देखील शुद्ध राहत नाही. विषयाचा भोग घेणे या विषयी मला फार कंटाळा आला आहे. आणि हरी सुखामध्ये मी कोठेही लोळतो. कोणी काहीही उपदेश केला तरी तो मला कळत नाही मी माझ्या वाणीने विठ्ठल विठ्ठलच म्हणतो. माझी फजिती अनेकांनी केली तरी मी माझ्या वाणीने हरीचे नाम नित्य सर्वकाळ घेतो. तुकाराम महाराज म्हणतात अहो पंडित जनहो हा तुकाराम वेडाच आहे त्यामुळे तुम्ही त्याची उपेक्षाच करा.
अभंग क्र. ११८४
आली सिंहस्थ पर्वणी । न्हाव्या भटा जाली धणी ॥१॥
अंतरी पापाच्या कोडी । वरीवरी बोडी डोई दाढी ॥धृपद॥
बोडिले ते निघाले । काय पालटले सांग वहिले ॥२॥
पाप गेल्याची काय खुण । नाही पालटले अवगुण ॥३॥
भक्तीभावे विण । तुका म्हणे अवघा सीण ॥४॥
अभंग क्र. ११८५
तुज घालोनिया पूजितो संपुटी । परि तुझ्या पोटी चवदा भुवने ॥१॥
तुज नाचऊनि दाखवू कौतुक । परी रूपरेखा नाही तुज ॥धृपद॥
तुजलागी आम्ही गात असो गीत । परी तू अतीत शब्दाहूनि ॥२॥
तुजलागी आह्मी घातियेल्या माळा । परि तू वेगळा कर्तुत्वासी ॥३॥
तुका म्हणे आता होऊनि परिमित । माझे काही हित विचारावे ॥४॥
अभंग क्र. ११८६
पापाची मी राशी । सेवाचोर पायापाशी ॥१॥
करा दंड नारायणा । माझ्या मनाची खंडणा ॥धृपद॥
जना हाती सेवा । घेतो लडपणे देवा ॥२॥
तुझा ना संसार । तुका दोहीकडे चोर ॥३॥
अर्थ
देवा मी तर पापाची राशीच आहे तुझी सेवा करण्याची मी टाळाटाळ करीत होतो. मी सेवा चोर आहे पण असे असले तरी मी तुझ्या पायाजवळ येऊन बसलो आहे. याकरिता देवा तुम्ही मला दंड करा. मला जो पदोपदी मान मिळत आहे त्याची तुम्ही खंडांना करा. देवा मी इतका पापी आहे की मी लोकांकडून माझी सेवा करून घेत आहे. तुकाराम महाराज म्हणतात या कारणामुळेच देवा मी धड तुझाही झालो नाही आणि संसाराचा ही झालो नाही दोन्हीकडेही मी चोर झालो आहे.
अभंग क्र. ११८७
दुडीवरी दुडी । चाले मोकळी गुजरी ॥१॥
ध्यान लागो ऐसे हरी । तुझे चरणी तैशापरी ॥धृपद॥
आवतण्याची आस । जैसी लागे दुर्बळासी ॥२॥
लोभ्या काळांतराची आस । बोटे मोजी दिवस मास ॥३॥
तुका म्हणे पंढरीनाथा । मजला आणिक नको व्यथा ॥४॥
अर्थ
गुजराती स्त्री एकावर एक घागरी ठेवून हात सोडून चालतात पण ती घागरी पडणार नाहीत याची देखील ते दक्षता घेतात. अगदी त्याप्रमाणे तुझ्या चरणाच्या ठिकाणी माझे ध्यान लागू द्यावे, जसा एखादा भिकारी मला कोणी जेवण्याचे आमंत्रण देतो का याची वाट पाहतो, आणि एखाद्या लोभी मनुष्याने एखाद्या व्यक्तीला व्याजाने पैसे द्यावे व त्याचा हिशोब लावावा, की आता किती दिवस झाले पैसे देऊन, त्याचे व्याज किती झाले असावे याचा हिशोब अगदी एकाग्रचित्ताने तो लोभी मनुष्य जसा करतो तसेच माझे चित्त तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी लागावे. तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरीनाथा मला ही तुझाच ध्यास लागू द्या मला दुसरी कोणतीही व्यथा नको.
अभंग क्र. ११८८
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला । करे टाळी बोला मुखे नाम ॥१॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा । हा सुखसोहळा स्वर्गी नाही ॥धृपद॥
कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥२॥
सकळासी येथे आहे अधिकार । कलयुगी उद्धार हरीनामे ॥३॥
तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती । ऐसे बहुताग्रंथी बोलियेले ॥४॥
अर्थ
मी समस्त लोकांच्या पाया पडून विनंती करीत आहे की तुम्ही हाताने टाळी मुखाने विठ्ठलाचे नाम घेत राहा. विठ्ठल विठ्ठलच तुम्ही वेळोवेळा म्हणत रहा. हा सुखाचा सोहळा स्वर्गातही नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंदा गोपाळा नाममंत्र हा वैकुंठी ला जाण्याचा सोपा मार्ग आहे. हरीचे नाम घेण्यास सगळ्यांना अगदी सर्वानाच अधिकार आहे. कलियुगामध्ये हरिनामानेचा उद्धार होणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात हरिनामा पाशी चारही मुक्ती आहे असे पुष्कळ ग्रंथांमध्ये वर्णन आहे.
येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















