आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२८ जून, दिवस १७९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ३५१ ते ३७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २१३७ ते २१४८
“28 जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 28 June
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक 28 जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २१३७ ते २१४८ चे पारायण आपण करणार आहोत.
28 जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ३५१ ते ३७५,
351-13
तैसे जयाचिया ठायी । न साहणे काहीचि नाही । आणि साहतु असे ऐसेही । स्मरण नुरे ॥351॥
त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी सहन न करणे हे कधीच नसते आणि आपण सहन करीत आहोत अशी आठवणही ज्याचे ठिकाणी रहात नाही,
352-13
आंगा जे पातले । ते करूनि घाली आपुले । येथ साहतेनि नवले । घेपिजेना ॥352॥
जे जे काही सुखदु:खादि भोग शरीराला प्राप्त होतात ते सर्व आपले स्वरूपच आहे असे तो समजतो व म्हणून आपण अलौकिक असे काही सहन करतो असा अभिमानाचा पगडा त्याचेवर बसत नाही.
353-13
हे अनाक्रोश क्षमा । जयापाशी प्रियोत्तमा । जाण तेणे महिमा । ज्ञानासि गा ॥353॥
हे प्रियोत्तमा अर्जुना, दात, ओठ न चावता स्वभावत:च असलेली ही क्षमा ज्याच्या ठिकाणी असते त्या पुरुषाच्या योगाने ज्ञानास मोठेपण प्राप्त होते असे समज.
354-13
तो पुरुषु पांडवा । ज्ञानाचा वोलावा । आता परिस आर्जवा । रूप करू ॥354॥
अर्जुना तो पुरुष ज्ञानाचे जीवन आहे. आता आर्जवाचे स्वरूप तुला सांगतो ऐक.
355-13
तरी आर्जव ते ऐसे । प्राणाचे सौजन्य जैसे । आवडे तयाही दोषे । एकचि गा ॥355॥
अर्जुना, तर ज्यास आर्जव म्हणून म्हणतात ते असे आहे की ज्याप्रमाणे प्राणाचे प्रेम कोणासंबंधीही असेना का ? ते सर्वावर एकसारखेच असते.
356-13
का तोंड पाहूनि प्रकाशु । न करी जेवी चंडांशु । जगा एकचि अवकाशु । आकाश जैसे ॥356॥
अथवा सूर्य जसा तोंड पाहून प्रकाश करीत नाही किंवा आकाश जसे सर्व जगाला सारखीच जागा देतो.
357-13
तैसे जयाचे मन । माणुसाप्रति आन आन । नव्हे आणि वर्तन । ऐसे पै ते ॥357॥
त्याप्रमाणे ज्याचे मन निरनिराळ्या माणसांशी निरनिराळे नसते आणि ज्याची वागणूकही अशा प्रकारची असते
358-13
जे जगेचि सनोळख । जगेसी जुनाट सोयरिक । आपपर हे भाख । जाणणे नाही ॥358॥
की सर्व जगच त्याच्या ओळखीचे आहे, त्याचे जगाशी फार जुने नाते आहे आणि आपले व परके ही भाषा तो जाणत नाही
359-13
भलतेणेसी मेळु । पाणिया ऐसा ढाळु । कवणेविखी आडळु । नेघे चित्त ॥359॥
त्याचे वाटेल त्याच्याशीही पटते आणि पाण्याच्या सारखी ज्याची वागण्याची रीत असते आणि कोणाही विषयी त्याचे चित्त विकल्प घेत नाही.
360-13
वारियाची धाव । तैसे सरळ भाव । शंका आणि हाव । नाही जया ॥360॥
वार्याचे वहाणे जसे सरळ असते तसे ज्याच्या मनातील विचार सरळ असतात आणि ज्याला संशय व लोभ नसतात,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
361-13
मायेपुढे बाळका । रिगता न पडे शंका । तैसे मन देता लोका । नालोची जो ॥361॥
आईपुढे येण्यास मुलास जशी शंका वाटत नाही, त्याप्रमाणे आपल्या मनातील विचार लोकांना सांगताना तो मागेपुढे पहात नाही.
362-13
फांकलिया इंदीवरा । परिवारु नाही धनुर्धरा । तैसा कोनकोपरा । नेणेचि जो ॥362॥
ज्याप्रमाणे उमलेल्या कमलाला आपला सुवास जसा मर्यादित जागेत दाबून ठेवता येत नाही, त्याप्रमाणे ज्याचा जीव कोनाकोपरा जाणतच नाही. (म्हणजे ज्याच्या अंत:करणाला गुप्त जागा माहीत नसते.
363-13
चोखाळपण रत्नाचे । रत्नावरी किरणाचे । तैसे पुढा मन जयाचे । करणे पाठी ॥363॥
रत्नाचा निर्मळपण असतो, (पण) त्याच्यापेक्षा त्याच्या किरणांचा निर्मळपणा अधिक पुढे असतो, त्याप्रमाणे ज्याचे मन पुढे असते व करणे पाठीमागून असते.
364-13
आलोचू जो नेणे । अनुभवचि जोगावणे । धरी मोकळी अंतःकरणे । नव्हेचि जया ॥364॥
जो कोणत्याही बाबतीत आगाऊ विचार करण्याचे जाणतच नाही व जो आत्मानुभावात तृप्त असतो, जो आपल्या मनाने कशाशी चिकटतही नाही व कशाचा मुद्दाम त्यागही करत नाही.
365-13
दिठी नोहे मिणधी । बोलणे नाही संदिग्धी । कवणेसी हीनबुद्धी । राहाटीजे ना ॥365॥
ज्याची दृष्टी कपटी (अथवा ओशाळी) नसते व ज्याचे बोलणे संशययुक्त नसते आणि कोणाशीही हलकट बुद्धीने वागत नाही.
366-13
दाही इंद्रिये प्रांजळे । निष्प्रपंचे निर्मळे । पांचही पालव मोकळे । आठही पाहर ॥13-366॥
ज्याची दहाही इंद्रिये सरळ, निष्कपट आणि शुद्ध असतात.
367-13
अमृताची धार । तैसे उजू अंतर । किंबहुना जो माहेर । या चिन्हांचे ॥367॥
अमृताच्या धारेप्रमाणे त्याचे अंत:करण सरळ असते. फार काय सांगावे ? जो या चिन्हाचे माहेर असतो.
368-13
तो पुरुष सुभटा । आर्जवाचा आंगवटा । जाण तेथेचि घरटा । ज्ञाने केला ॥368॥
अर्जुना, तो पुरुष आर्जवाची मूर्तीच आहे व तो पुरुष ज्ञानाने आपले रहावयाचे ठिकाण केले आहे असे समज.
369-13
आता ययावरी । गुरुभक्तीची परी । सांगो गा अवधारी । चतुरनाथा ॥369॥
आचार्योपासना
आता यानंतर गुरुभक्तीचा प्रकार सांगू. हे चतुरांच्या राजा तो तू ऐक.
370-13
आघवियाचि दैवा । जन्मभूमि हे सेवा । जे ब्रह्म करी जीवा । शोच्यातेहि ॥370॥
ही गुरुसेवा सर्व भाग्यांची उत्पन्न होण्याची जमीन आहे व जी सेवा शोकग्रस्त जीवाला ब्रह्म करते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
371-13
हे आचार्योपास्ती । प्रकटिजैल तुजप्रती । बैसो दे एकपांती । अवधानाची ॥371॥
ती गुरुभक्ती आता तुला स्पष्ट सांगितली जाईल. मात्र तू तिकडे एकसारखे लक्ष दे.
372-13
तरी सकळ जळसमृद्धी । घेऊनि गंगा निघाली उदधी । की श्रुति हे महापदी । पैठी जाहाली ॥372॥
तरी सर्व जलसंपत्ती घेऊन गंगा ही जशी समुद्रात प्रवेश करते अथवा वेद जसे ब्रह्मपदात प्रविष्ट होतात,
373-13
नाना वेटाळूनि जीविते । गुणागुण उखिते । प्राणनाथा उचिते । दिधले प्रिया ॥373॥
अथवा आपल्या जीवासह व आपल्या अंगच्या गुणावगुणांसह सरसकट आपल्या स्वत:ला पतिव्रतेने उत्तम प्रकाराने आपल्या पतीस दिले,
374-13
तैसे सबाह्य आपुले । जेणे गुरुकुळी वोपिले । आपणपे केले । भक्तीचे घर ॥374॥
त्याप्रमाणे ज्याने आपले अंतर मनादिक व बाह्य इंद्रियादिक गुरुकुळाला अर्पण केले व आपल्याला गुरुभक्तीचे घर केले आहे,
375-13
गुरुगृह जये देशी । तो देशुचि वसे मानसी । विरहिणी का जैसी । वल्लभाते ॥375॥
ज्याप्रमाणे विरहिणीचे चित्तात प्रियकर असतो, त्याप्रमाणे ज्या देशात गुरूचे घर असते, तो देश ज्याच्या मनामधे असतो.
दिवस १७९ वा, २८, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २१३७ ते २१४८
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २१३८
ऐका जी संतजन । सादर मन करूनि ॥१॥
सकळाचे सार एक । कंटक ते त्यजावे ॥धृपद॥
विशेषता कांद्याहूनि । सेवित्या घाणी आगळी ॥२॥
तुका म्हणे ज्याची जोडी । ते परवडी बैसीजे ॥३॥
अर्थ
हे संतजन हो मी जे काही बोलत आहे ते तुम्ही तुमचे मन सावध करू ऐका. माझ्या सर्व बोलण्याचा सार एकच आहे की जे वाईट वृत्तीचे लोक आहेत जे अधम आहेत त्यांचा तुम्ही त्याग करावा. कांद्याचा दुर्गंध येतोच परंतु कांदा खाणाऱ्यांचा दुर्गंध त्याच्या पेक्षा विशेष प्रकारे जास्त येतो. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे वाईट लोकांची संगती करू नये कंटक लोकांची संगती करू नये ज्याच्या संगतीत आपण राहू त्या प्रकारचे गुण आपल्या अंगी हळूहळू येतात.
अभंग क्र. २१३९
आज्ञा पाळुनिया असे एकसरे । तुमची उत्तरे संतांची ही ॥१॥
भागवूनि देह ठेवियेला पायी । चरणावरी डोई येथुने चि॥धृपद॥
येणे जाणे हे तो उपाधीचे मूळ । पूजा ते सकळ अकर्तव्य ॥२॥
तुका म्हणे असे चरणींचा रज । पदी च सहज जेथे तेथे ॥३॥
अर्थ
हे संत जनहो तुम्ही मला जशी आज्ञा केली आहेत त्या प्रमाणे मी त्या आज्ञेचे पालन करून तसेच वागत आहे. सर्व प्रकारच्या भोगापासून माझा देह आता निवृत्त झाला आहे आता तुमच्या चरणावर हा देह मी अर्पण केला आहे आणि येथूनच तुमच्यावर चरणावर मी माझे डोके ठेवत आहे. खरे तर तुमची पूजा म्हणजे काहीच न करणे ही आहे आणि तुमच्याकडे येणे जाणे म्हणजे हे उपाधीचे मूळ आहे म्हणजे हे उपाधीमुळेच घडते. तुकाराम महाराज म्हणतात हे संत जनहो मी तर तुमच्या पायाची धूळ आहे तुमचे पावले जेथे जेथे उमटतील तेथे तेथे मी आत्म दृष्टीने सहजच असेल.
अभंग क्र. २१४०
न संडावा ठाव । ऐसा निश्चयाचा भाव ॥१॥
आता पुरे पुन्हा यात्रा । हे चि सारूनि सर्वत्रा ॥धृपद॥
संनिधा चि सेवा । असो करुनिया देवा ॥२॥
आज्ञेच्या पाळणे । असे तुका संता म्हणे ॥३॥
अर्थ
हे हरी तुझ्या ठिकाणी असलेला माझा दृढ भक्तीभाव, तो सोडू नये असा माझा निश्चय झाला आहे. आता जन्ममरणाची यात्रा पुन्हा पुन्हा घडणे हे पुरे झाले सर्व काम मी बाजूला सारुन केवळ एकच करणार आहे. मी केवळ देवाच्या सान्निध्यात राहून देवाची सेवा करणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी संतांच्या आज्ञेचे सतत पालन करत राहीन.
अभंग क्र. २१४१
उपाधीजे बीज । जळोनि राहिले सहज ॥१॥
आम्हा राहिली ते आता । चाली देवाचिया सत्ता ॥धृपद॥
पराधीन ते जिणे । केले सत्ता नारायणे ॥२॥
तुका म्हणे जाणे पाय । खुंटले आणीक उपाय ॥३॥
अर्थ
सर्व उपाधीचे बीज म्हणजे अज्ञान आहे आणि ते नारायणाच्या ज्ञानाने जळून गेले आहे. आम्ही जे काही करणार आहोत ते केवळ देवाच्या सत्तेनेच. आम्ही नारायणाच्या आधीन जिणे जगत आहोत. त्याच्या सत्तेनेच जे होईल ते आम्ही करत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, “आता माझे सर्व उपाय खुंटले आहेत मी केवळ नारायणाचे चरणच जाणतो आहे. ”
अभंग क्र. २१४२
गोविंदावाचोनि वदे ज्याची वाणी । हगवण घाणी पिटपिट ते ॥१॥
मस्तक सांडूनि सिसफूल गुडघां । चार तो अवघा बावळ्याचा ॥धृपद॥
अंगभूत ह्मूण पूजितो वाहाणा । म्हणता शाहाणा येईल कैसा ॥२॥
तुका म्हणे वेश्या सांगे सवासिणी । इतर पूजनी भाव तैसा ॥३॥
अर्थ
जो आपल्या वाणीने गोविंदावाचून व्यर्थ बडबड करतो त्याची बडबड म्हणजे हगवणीतल्या पीटपीटीप्रमाणे आहे. स्त्रीने जर डोक्याला लावायचे फूल गुडघ्याला लावले तर तीचे ते वागणे चारचौघामधे मुर्खपणाचे ठरते. कोणाच्याही पायातला जोडा म्हणजे वहाणे हे शरीराप्रमाणेच पुज्य आहे असे समजून त्याची पूजा करतो त्याला शहाणा कसे म्हणता येईल. तुकाराम महाराज म्हणतात, “गोविंदावाचून इतर कोणाही विषयी बडबड करणे किंवा बोलणे म्हणजे वेश्येला सुवासीण म्हणून बोलावण्यासारखेच आहे. ”
अभंग क्र. २१४३
कुतऱ्या ऐसे ज्याचे जिणे । संग कोणी न करीजे ॥१॥
जाय तिकडे हाडहाडी । गोऱ्ह्ववाडी च सोइरी ॥धृपद॥
अवगुणाचा त्याग नाही । खवळे पाही उपदेशे ॥२॥
तुका म्हणे कैची लवी । ठेंग्या केवी अंकुर ॥३॥
अर्थ
ज्याचे जगणे कुत्र्याप्रमाणे आहे त्याचा संग कोणीही करू नये. जिकडे जाईल तिकडे त्याची हाड हाड होते आणि जेथे गुघाण असेल तेथे त्याचे सोयरे संबंधी असतात. असा मनुष्य कोणी चांगला उपदेश केला तर आपल्या अवगुणाचा त्याग तो करतच नाहीत परंतु चांगला उपदेश करणाऱ्या मनुष्या वर ही तो रागवतो. तुकाराम महाराज म्हणतात वाळलेले लाकूड कसे वाकेल, झाडाच्या बुंध्याला कितीही पाणी घातले तर त्याला अंकुर कसे फुटेल.
अभंग क्र. २१४४
सर्वथा ही खोटा संग । उपजे भंग मनासी ॥१॥
बहु रंगे भरले जन । संपन्न चि अवगुणी ॥धृपद॥
सेविलिया निःकामबुद्धी । मदे शुद्धी सांडवी ॥२॥
त्रासोनिया बोले तुका । आता लोका दंडवत ॥३॥
अर्थ
वाईट लोकाची संगती करणे खोटे पणाचे लक्षण आहे कारण त्यांच्या संगतीने मनाची चांगली बुद्धी भंग पावते. हे जग विविध रंगाने भरलेले आहे तसेच अवगुणानी संपन्न आहे. मद्याचे सेवन अगदी निष्काम बुद्धीने सहजतेने जरी झाले तरी ते मद्य आपली शुद्ध हरवून टाकते त्याप्रमाणे वाईट माणसाची संगती अगदी सहज जरी घडली तरी परिणामी आपल्याला त्रासच होतो. तुकाराम महाराज म्हणतात मी अगदी आता त्रासुन बोलत आहे या वाईट लोकांना माझा दंडवत दंडवत आहे.
अभंग क्र. २१४५
उपचारासी वांज जालो । नका बोलो यावरी ॥१॥
असेल ते असो तैसे । भेटीसरिसे नमन ॥धृपद॥
दुसऱ्यामध्ये कोण मिळे । छंद चाळे बहु मते ॥२॥
एकाएकी आता तुका । लौकिका या बाहेरी ॥३॥
अर्थ
देवा आता मी तुमची पूजा करण्यास उपचारास असमर्थ झालो आहे त्यामुळे आता याविषयी माझ्याशी काहीही बोलू नका. देवा आता माझ्यापुढे कोणतेही भूतमात्रा येऊ द्या, कोणताही जीव येऊ द्या मी त्यांना तुझ्यासारखा समजेन व त्यांना वंदन करेन. या जगामध्ये अनेक छंद, अनेक चाळे आणि अनेक मते असणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये आता कोण मिसळेल ? तुकाराम महाराज म्हणतात मी आता एकाएकीच या लौकिकका च्या बाहेर पडलो आहे.
अभंग क्र. २१४६
मी ते मी तू ते तू । कुंकुड हे लाडसी ॥१॥
वचनासी पडो तुटी । पोटींचे पोटी राखावे ॥धृपद॥
येथील तेथे तेथील येथे । वेगळ्या कुंथे कोण भारे ॥२॥
एकाएकी आता तुका । लौकिका या बाहेरी ॥३॥
अर्थ
मी म्हणजे आत्मा आणि आत्मा नेहमी सुखरूप असतो आणि तु म्हणजे देह आणि देहाची तुलना केव्हाही आत्म्याशी होऊ शकत नाही त्यामुळे या दोन्हीचे ऐक्य मानणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे. मी देह आहे असेही म्हणू नये आणि मी ब्रम्ह आहे या देखील वचनाची तूट पडावी आणि आपल्याला जो अनुभव आला असेल तो आपल्या हृदयात साठवूण ठेवावा. आत्म्याचे धर्म हे आत्म्याचे असतात आणि देहाचे धर्म हे देहाचेच असतात त्यामुळे येथील धर्म तेथे आणि तेथील धर्म येथे असे मानणे देखील चुकीचे आहे आणि तसे ओझे आपल्या माथ्यावर घेऊन कोण कुंथत बसेल ? तुकाराम महाराज म्हणतात आत्म्याचे व्यापकत्व आत्म्याला आणि देहाचे मर्यादित पणा देहाला देण्याविषयी मी आता कंबर कसली आहे.
अभंग क्र. २१४७
लाडाच्या उत्तरी वाढविती कलहे । हा तो अमंगळ जातिगुण ॥१॥
तमाचे शरीरी विटाळ चि वसे । विचाराचा नसे लेश तो ही ॥धृपद॥
कवतुके घ्यावे लेकराचे बोल । साहिलिया मोल ऐसे नाही ॥२॥
तुका म्हणे काय उपदेश खळा । न्हाउनि काउळा क्षते धुंडी ॥३॥
अर्थ
आम्ही प्रेमाने लोकांना उपदेश करतो परंतु दुष्ट लोक त्या उपदेशा मध्ये चूक काढून आमच्याशी विनाकारण भांडतात परंतु हा दोष त्यांचा नाही तर हा त्यांच्या स्वभाव जातीचा गुण आहे जो फार अमंगळ आहे. तमोगुणी असलेल्या लोकांच्या शरीरांमध्ये नेहमी षड विकारांचा विटाळच असतो परंतु चांगल्या विचारांचा लेष देखील त्यांच्या मध्ये नसतो. माझ्यासारख्या लेकराचे बोल तुम्ही कौतुकाने घ्यावे आणि ते जर तुम्ही सहन केले तर विचार अंती तुमच्या असे लक्षात येईल की या बोलाचे मोल कोठेही नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी दुष्टांना कितीही उपदेश केला तरी त्याचा काही उपयोग होणार आहे काय कारण कावळ्याला गंगेत जरी स्नान घातले तरी तो नंतर जनावरांची शतेच धुंडत राहत असतो
अभंग क्र. २१४८
आता मज देवा । इचे हातीचे सोडवा ॥१॥
पाठी लागलीसे लांसी । इच्छा जिते जैसी तैसी ॥धृपद॥
फेडा आता पाग । अंगी लपवुनी अंग ॥२॥
दुजे नेणे तुका । काही तुह्मासी ठाउका ॥३॥
अर्थ
देवा मला आता या इच्छेच्या हातून सोडवा. ही इच्छा माझ्या पाठीशी लागली आहे तिचे किती लाड पुरवले होते, आयुष्य कितीही सरले तरी देखील इच्छा जशी आहे तशीच जिवंत राहते. देवा तुमच्या अंगात माझे अंग लपवून घ्या व माझे व तुमचे ऐक्य करा माझ्या आतील इच्छा नाहीशी करा. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला तुमच्या वाचून दुसरे काहीही नको हे तुम्हाला ठाऊकच आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















