31. संत सोपानदेव चरित्र भाग १, (१ ते ५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

आज कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस. सगळ वातावरण उदास खिन्न!  सगळ्या चराचरावर,अवकाशावर एक खिन्न दुःखी विमनस्कतेची छाया पसरले ली,सार्‍या सृष्टीवर,सृष्टी चक्रातल्या पंच महाभूतवर सुध्दा एक अवकळा पसरली होती.आणि इंद्रायणीच्या घाटावर विमनस्क अवस्थेत बसलेल्या सोपानदेवां चा …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!!  संत सोपानदेव चरित्र  !!!      

           

!!  *प्रस्तावना*  !!!

संत सोपानदेव चरित्र

!!  *प्रस्तावना*  !!!

    नमस्कार!

         संत श्री सोपानदेव ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधु!ज्ञानेश्वर माऊली इतकेच प्रतिभाशाली,बुध्दीमान,मृदु स्वभावाचे.निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वरांसारखे गुरु आणि मोठे भाऊ अशा दोघांचे मार्ग दर्शन सार्थकी लावणारा एक अलौकीक संत,माऊली लोकांच्या गळ्यातील ताईत बनले.ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनांवर, कार्यावर लाख अक्षरं लिहिल्या गेली, आजही लिहिल्या जात आहेत,पण सोपानांवर अगदी स्फुट स्वरुपांत लिहिल्या गेले. “कैवल्य गीता” मधील भगवत गीता व “सोपानदेवी” वाचल्यावर  सोपानदेवांच्या अलौकिक बुध्दीमत्ता, असामान्य प्रतिभेची आणि शब्दांवर असलेल्या अफाट प्रभुत्वाची साक्ष पटते. गीतेच्या ७०० श्लोकांच अगदी शब्दशः भाषांतर म्हणजे “सोपानदेवी” आहे. ज्ञानेश्वरांचे धाकटे भाऊ,त्यांचे समकाली न असुनही सोपानदेवांची भाषा अत्यंत सोपी,सुलभ आणि त्याही काळात इतक्या सोप्या मराठीत भगवद् गीतेचे भाषांतर लिहुन सोपानदेवांनी किती मोठं कार्य केलय हे लक्षात येते.

      ज्ञानेश्वरांपासुन सोपानदेवांना वेगळं काढल्या जाऊच शकत नाही.कारण ज्ञानदेव ज्ञानसूर्य होते तर,सोपानदेव त्यांची सावली.म्हणुनच सोपानांचं अस्तित्व त्या ज्ञानसूर्याच्या सावलीसारखं झालय!किंचित दुर्लक्षित गेलेले सोपानां बद्दल लिहितांना ते सर्वार्थाने सर्वांना समजावे या दृष्टीने केलेला हा छोटासा प्रयत्न आहे.

        ज्ञानदेव हे सोपानदेवांचे मोठे भाऊ तर होतेच पण त्याच बरोबर आई,वडील, सखा,गुरु,परमेश्वर सर्व कांही होते.

      आळंदीच्या कर्मठ मंडळींनी या भावंडांच्या आईवडीलांवर कसा जीव घेणा प्रसंग आणला आणि त्यांनी तो कसा निमुटपणे स्विकारला,त्यांच्या मनाची झालेली घालमेल,त्यांच्या आत्म समर्पनाच्या वावटळींनी चौघांही भावंडांची आयुष्ये कशी पाल्यापाचोळ्या सारखी भिरभिरली,हा नियतीचा आखलेला डाव त्यांनी कसा सहन केला, चौघांतली एकी,एकमेकांबद्दलचे अपार  प्रेम आणि बुध्दीमत्तेचे तेजस्वी वलयाच्या सहाय्याने या चौघा भावंडांनी नियतीवर आणि आपल्या तेजस्वी ज्वाळांनी अंधकारावर कशी मात केली हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

      मौजीबंधनाची आवश्यकता आहे किंवा नाही या बाबत चारही भावंंडात झालेले चर्चेत सोपानदेवांचे बुध्दीसामर्थ्य प्रभावीपणे स्पष्ट होते.सोपानदेव जेव्हा आत्मअध्ययनात रमले होते,त्यावेळी त्यांनी एकटाक हरिपाठ अभंग लिहून पुर्ण केले.सोपानदेवांनी लिहिलेली “सोपानदेवी” आणि ज्ञानदेवांनी लिहिले ली “ज्ञानेश्वरी” आपल्या दोन्हीही लहान भाऊ व शिष्य यांचा अलौकिक बुध्दीचा साक्षात्कार पाहुन निवृत्तीनाथांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटले,

       ज्ञानदेवांच्या संजीवन समाधी नंतर  सोपानदेव आणखीणच अबोल,शांत झाले.आता सूर्यच नव्हता तर सावली कुठे?आणि शेवटी ज्ञानसूर्याची सावली ज्ञानसूर्यात विलिन झाली.

         जसे जगाच्या अंतापर्यंत ज्ञानदेव, ज्ञानसूर्य आपल्या तेजाने तळपणार, तद्वतच ज्ञानसूर्याची सावली असलेले सोपानदेव तळपत राहतील.

    नेहमी प्रमाणे आपल्या क्रीया प्रतिक्रीया अपेक्षित!

            मिनाक्षी देशमुख.

!!!  सोपानदेव  !!!

                   भाग –  १.

         आज कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस. सगळ वातावरण उदास खिन्न!  सगळ्या चराचरावर,अवकाशावर एक खिन्न दुःखी विमनस्कतेची छाया पसरले ली,सार्‍या सृष्टीवर,सृष्टी चक्रातल्या पंच महाभूतवर सुध्दा एक अवकळा पसरली होती.आणि इंद्रायणीच्या घाटावर विमनस्क अवस्थेत बसलेल्या सोपानदेवां चा गोरा रंग काळवंडला होता.नेहमी चेहर्‍यावर दिसणारी भावुक निरागसता आज झाकाळलेली होती.अंगावरच्या उत्तरीयाचंही त्यांना भान नव्हतं.डोळ्यां तील सारं तेज लोप पावुन अविरत वाहणारे अश्रू थांबतां थांबत नव्हते. आणि त्या जीवघेण्या निरव शांततेनं सोपानदेवांच्या दुःखाला जणुं वेदनेचा आवाज फुटुन त्यांनी टाहो फोडला ज्ञानदादाssss

        ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेऊन कांहीच तास उलटले होते.समाधीस्थाना वरची ती शिळा सरकावल्याचा प्रत्येक क्षण सोपानदेवांना दुःखाच्या वनव्यांत लपेटुन घेणारा ठरत होता.समाधी ज्ञानदेवांनी घेतली पण सोपानदेवांना वाटत होते आपलंच शरीर निष्र्पाण झालं  श्वास कोंडला जातोय,वाहणारं रक्त गोठतेय अशी कांहीशी विचित्र अवस्था सोपानांची झाली.ज्ञानदेवांच्या समाधीचे दुःख एखाद्या प्रपातासारखं कोसळलं. खरंतर आधीच आपण संजीवन समाधी घेणार हे ज्ञानदेवांनी संकेत दिले होते. सगळ्यांनी त्यांना परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्नही केला होता,पण निश्चयाचा महामेरु ज्ञानदेवांनी कुणाचचं, इतकच काय गुरुस्थानी असणार्‍या निवृत्तीनाथांच,लाडक्या सोपानाच,आणि प्राणाहुन प्रिय असलेल्या मुक्ताबाईंचही ऐकलं नाही.

       आपलं जीवितकार्य संपल्यावर ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली खरी,पण आपल्या माघारी प्रियजनांचं काय होईल हा विचार त्यांच्या मनाला स्पर्शला नसेल हाच प्रश्न सोपानांचं काळीज कुरतडत होतं.काळजांतील ही वेदना कशी सावरावी?आवरावी?पायाखालची जमीनच सरकल्यावर कसं ऊभं रहायच? कुणाच्या आधारावर?आतां समाधीस्त ज्ञानदादा पुन्हा कधीच दिसणार नाही. त्यांचा आश्वासक स्पर्श परत होणार नाही हे बुध्दीला पटतय पण मनाला?सोपान देवांच्या मनांत विचारांचं काहूर उठलं होतं.लोकांच्या दृष्टीने संत असलेले,भक्तां च्या नजरेत माऊली असलेले ज्ञानदादा त्यांचे सर्वस्व होते.त्यांचे मोठे भाऊ तर होतेच,पण त्याचबरोबर,आई,वडील,गुरु सखा,परमेश्वर सारच कांही होते.त्यांच्या अगनित आठवणींनी सोपानांचा बांध फुटुन ओक्सीबोक्सी रडु लागले.कोण सांत्वन करणार होत? कोण पाठीवरुन हात फिरवणार?कोण डोळे पुसणार? आक्रोश करत दादाss दादा असा कसा रे निष्ठुर झालास?आईवडील सोडुन गेले तेव्हा आमचं कळण्याचं वयही नव्हतं! पण तूं आमचं सर्वस्व झालास.तेव्हा नव्हतो रे पोरके झालो,आतां मात्र खर्‍या अर्थाने अनाथ झालो.त्यांना हुंदके आवरत नव्हते.

       सोपानाss सोपानाsss कुणीतरी हाक मारतय असा अचानक भास झाला, हा तर ज्ञानदादाचा आवाज!त्यांनी चमकुन समाधीच्या चबुतर्‍याकडे बघीतलं,पण छे.. तिथे कुणीच नव्हत. काही तासांपुर्वीच तर त्यांच्या नजरेसमोर हजारोंच्या गर्दीने फुललेला इंद्रनील पर्वतातील “निरंजन गुहा” आळंदीशेजार च्या त्या समाधी स्थळाला एखाद्या तीर्थ स्थळाचं रुप प्राप्त झालं होतं.विशेष म्हणजे या सोहळ्यास पांडुरंगासहित रुख्मिणी आणि समस्त देवगण उपस्थित होते.नामदेवांची मुले नारा,विठा,म्हादा, गोदा सुन्न मनाने राबत होते.विठ्ठल नामाच्या आणि ज्ञानदेवांच्या अभंग व जयजयकाराने सारा आसमंत निनादुन गेला होता.निवृत्तीनाथ मात्र धीरगंभीर, स्थीर होते.

      समाधी घ्यायच्या आदल्या रात्री, मुक्ताइने विचारले, दादाsss तूं रागावला,कंटाळलास?कां एवढ्या लवकर समाधी घेतोस?ज्ञानदेव म्हणाले, मुक्ते! ज्या उद्देष्टींसाठी माझा जन्म झाला ते माझे जीवितकार्य पुर्ण झाल्यामुळे मी सधाधीस्त होतोय!सोपान,मुक्ताई,निवृत्ती सह गर्दीच्या महासागराला सामोरे गेले. ज्ञानदेवांना समोर बघतांच सावतामाळी, गोरोबाकाका,नामदेव,सेना न्हावी,परिसा भागवत,सच्चिदानंद बाबा,विसोबा खेचर चोखामेळा इत्यादी संतांनी ज्ञानदेवांच्या पायावर लोळण घेतले.नामदेवांची विकल अवस्था पाहुन म्हणाले,नामया! काय हे?

                 क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
               ३०-४-२०२१.

!!!  सोपानदेव  !!!

भाग – २.

        ज्ञानदेव म्हणाले,नामया!तुम्हीच असा विलाप करुं लागलात तर बाकीच्यां ना कोण सावरणार?भागवत धर्माच्या झेंड्याखाली सारा बहुजन समाज एकत्र आणुन आध्यात्मिक लोकशाहीचं,भक्तीचं राज्य उदयास आणलं आणि वारकरी धर्म पुनर्जीवित केला,हे माझं जीवित कार्य संपल्यावर,आपला वारसा दुसर्‍या वर सोपवुन समाधीस्त होणं योग्य नाही कां?नामदेवांनी अश्रूभरल्या नयनांनी मुक संमती  दर्शवली.नंतर सहभोजन झाले.इंद्रायणीच्या काठी आर्त स्वरांत विठूरायाचा कारुण्याची किनार असलेला गजर झाला.आणि संतांमधे श्रेष्ठ,अद्वैता चं मर्म जाणणार्‍या नामदेवांचे ह्रदयस्पर्शी किर्तन झाले.चौथ्या प्रहरी निवृत्तीनाथानी मिठीत विसावलेल्या ज्ञानदेवांना समाधी स्थानावर आणले.सोपानदेव हे सारं अगतिकतेने,विकलतेने,दुःखी मनाने बघत होते.ह्रदयात कालवाकालव होत होती.निृवत्तीनाथ ज्ञानदेवांच्या हाताला धरुन जात असतांना छोट्या वळणावर,

साक्षात विठ्ठल उभा होता,पुढे होऊन त्याने ज्ञानदेवांचा दुसरा हातास धरले. मुक्ताईचा हात धरुन सोपनदेव त्यांच्या मागुन अतिव दुःखाने,निराशेने चालत होते.

          गुहा आली तसे ज्ञानेश्वरांनी अफाट पसरलेल्या भक्तसागराला दोन्ही हात जोडुन अभिवादन केले.निवृत्तीनाथां ना कडकडुन मिठी मारली.त्यानंतर सोपान,मुक्ताईला आपल्या मिठीत घेतले. मुक्ताबाई तर टाहो फोडुन रडत होती. आणि सोपानांना तर त्यांच्या मिठीत मृत्यु यावासा वाटत होते.मिठी सैल झाली. त्यांच्यातल्या भातृत्वावर,माऊलीने, योगी राजाने मात केली आणि दोघांना मिठीतुन  दूर केले.गुहेत प्रवेश करुन चबुतर्‍यावर त्यांनी पद्मासन घालुन डोळे मिटले ते कधीही न उघडण्यासाठी.सर्व बाहेर आल्यावर निवृत्तीनाथांनी गुहेच्या मुखाची शिळा लावली.विठूरायाचा आणी ज्ञानदेवांचा गजर करीत जड अंतःकरणाने व अश्रूभरल्या डोळ्यांनी सर्वजण घरी परतले.सोपानदेव मात्र त्या चैतन्याच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा आठवत,शोधत,आठवणींना अभिषेक करत इंद्रायणीच्या घाटावर बसुन राहिले.

अश्रूंच्या सोबतीने व जुन्या आठवणींनी!

त्यांना आठवले लहानपणी मुक्ताईबरोबर भांडण झाले की,लगेच कसा समझौता होत असे व ते कौतुक विठ्ठलपंत व रुख्मिणी पाहत,दोघेही एकमेकांना देणारे प्रत्युत्तराने त्यांच्या विलक्षण बुध्दीची साक्ष पटत असे.

        अनावधानाने पत्नीने दिलेली संमती गृहीत धरुन विठ्ठलपंतांनी संसार त्यागुन काशीला प्रयाण केले.तिथल्या श्रीपाद स्वामींकडुन सन्यास ग्रहण केला व चैत्यन्यस्वामी नाम धारण केले.कांही कालाने श्रीपादस्वामी तीर्थयात्रा करत करत आळंदीला आले असतां सिध्देश्वर मंदिरात रुख्मिणीची भेट झाली.तीने या तेजपुंज स्वामींना  वंदन केल्यावर,त्यांनी पुत्रवती भव असा आशिर्वाद दिला.ती व्यथीत होऊन मुखावाटे हुंदका उमटल्या वर,स्वामींनी दुःखाचे कारण विचारल्या वर रुख्मिणीने सारी हकिकत कथन केली. सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. ज्याला आपण सन्यासदीक्षा दिली तो दुसरा तिसरा कोणी नसुन चैत्यन्यस्वामी म्हणजेच या दुर्दैवी मुलीचा पती आहे. अनावधानाने कां होईना या दुर्देवी मुलीच्या दुःखास आपण कारणीभूत ठरलो ही बोच लागल्यामुळे त्यांनी तीर्थ यात्रा रद्द करुन काशीस परतले आणि तात्काळ विठ्ठलपंतांना गृहस्थाश्रम स्विकारण्याची आज्ञा केली.हे धर्मबाह्य कृत्य झाले असे वाटल्याने कर्मठ धर्मपीठाने वाळीत टाकुन गावगाड्याच्या दैनंदिन कार्यक्षेत्रातुन त्यांना बहीष्कृत केले.

         विठ्ठलपंतांनी गृहस्थाश्रम स्विकार ल्यानंंतर त्यांना निवृत्ती,ज्ञानदेव,सोपान मुक्ताबाई अशी चार अपत्ये झाल्यावर त्यांना अधिकच क्लेश,त्रास सहन करावा लागला.त्यातुन ती अजान बालकें सुध्दा समाजाच्या तिव्र उपहास आणि अवहेलनेतुन सुटली नाही.आयुष्य जगणे कठीण झाल्यावर विठ्ठलपंत पत्नीमुलां सह त्रिम्बकेश्वरला जाण्यास निघाले असतां वाटेत ब्रम्हगिरी पर्वताच्या जंगलात वाघाची गर्जना ऐकु आल्याने सर्वांची चुकामुक झाली.निवृत्तीनाथ एका गुहेत शिरले.तिथे त्यांची गहनीनाथांची भेट झाली.गहनीनाथांनी संपूर्ण हटयोगाची दीक्षा देऊन त्यांना ब्रम्हज्ञानी बनवले.

                 क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

भाग – ३.

        त्रिम्बकेश्वरीही न्याय मिळत नाहीसे पाहुन कुंटुंबासह विठ्ठलपंत आळंदीस परतले.आणि आळंदीच्या ब्राम्हणवृंदा कडे क्षमायाचना करीत राहिले.आजही ते सकाळी माधुकरी मागायला गावात गेले  असतां माधुकरी तर मिळाली नाही परंतु अपमान,अवहेलना व शिव्यांचे मात्र धनी बनले.निवृत्तीनाथांना हटयोगाची दीक्षा मिळुन ब्रम्हज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांच्या वागण्यात खुपच फरक पडला.इतके दिवस भावंडांना घेऊन खेळणारे निवृत्ती एकदमच प्रौढ झाल्यासारखे वागु लागले. अवघं दहा वर्षाचं वय असलेले निवृत्ती  धर्माचं,अध्यात्माचं,ब्रम्हज्ञानाचं तत्वज्ञान बोलुृ लागले.सहा वर्षाच्या सोपानांना जास्त कळायचं नाही,पण आठ वर्षाचे ज्ञानेश्वर मात्र असंख्य प्रश्न विचारुन,शंका समाधान होईपर्यंत दोघांचा संवाद चालत असे.

         असेच दिवस चालले होते.मुल थोडी मोठी झाल्यावर त्यांच्या मौंजीचा प्रश्न ऐरणीवर आला,तसे विठ्ठलपंत ब्रम्ह पीठासमोर जाऊन,मुलांच्या मौंजीबंधना साठी शुध्दीपत्र देऊन पात्र ठरवण्याची विनंती केली.आम्हा पतीपत्नीस द्याल ती शिक्षा,प्रायश्चित भोगण्याची तयारी दाखवली.वडिल सतत चिंतेत,आई पुन्हा पुन्हा डोळे पुसते याचे कारण लहानग्या सोपानाला कळत नसले तरी,ब्रम्हज्ञाना चा अभ्यास करण्याकरीतां निवृत्ती ज्ञानेश्वर इंद्रायणी घाटावर एकांतस्थळी जात असे.घाटावरुन येतां जातां लोकांची बोलणी कानावर पडत असल्याने,आई वडीलांच्या मनातील व्यथेची,वादळाची कांहीशी कल्पना त्या दोघांना आली होती

          धर्मसभेचा निर्णय ऐकायला सकाळी गेलेले विठ्ठलपंत संध्याकाळ झाली तरी परतले नाहीत म्हणुन शंका कुशंकांनी त्रस्त रुख्मिणी,काय करावे की आपणच जावे अशा विचारांत असतांना  विठ्ठलमंदिरात कीर्तन करणारे विनायक बुवा येतांना दिसले, ते आल्यावर लांबुन च त्यांना त्रिवार नमस्कार करीत धर्मसभेत काय झाले विचारल्यावर ते म्हणाले,पोरी!काय? आणि कसे सांगु? आज धर्मसभेत न्याय नव्हता तर न्यायाची क्रूर चेष्टा होती.तेवढ्यात विठ्ठल पंत आल्याचे पाहुन विनायकबुवा घाईने निघुन गेले.असहाय्य जखमी पाखरा सारखे गलितत्रात्र  होऊन आंत आलेल्या विठ्ठलपंतांना रुख्मिणीने काय झाले धर्मसभेत?त्यांनी गुडघ्यात घातलेली मान वर केली आणि त्यांचा विदिर्ण,भग्न मंदिरासारखा गौरवर्ण काळवंडलेले मुख बघुन,तीच्या काळजाचा ठाव सुटला. विषण्ण,विव्हल,काळजाचा थरकाप उडवुन थरथरणार्‍या स्वरांत विठ्ठलपंत म्हणाले,रुख्मिणी संपलss सगळंss सगळss संपलss !आपल्या निरागस  बाल्यावस्थेत असलेल्या चार लेकरांचा विचारही न करतां या धर्मसभेने आपल्या ला देहांताची शिक्षा सुनावली असुन लवकरच अमलांत आणायची आहे.

        रुख्मिणीने स्वतःच्या मनाला आवर घालुन आपल्या दिवसभर उपाशी असले ल्या मुलांना खाऊ घातले.सोपान,मुक्ताई तर झोपले,पण निवृत्ती,ज्ञानदेवांना जवळ घेऊन,उसणे अवसान एकवटुन  म्हणाली,निवृत्ती,ज्ञानेशा!लक्षपुर्वक ऐका. उद्यापासुन तुमचे बाबा व मी नसणार, तेव्हा ही मोडकी तोडकी झोपडी,त्यांतील असलेला किडुकमिडुक संसार आणि सोपान,मुक्ता या सगळ्यांचा सांभाळ तुम्हाला करायचाय!ज्या जगाने आम्हाला मान खाली घालायला लावली,त्याच जगाला माना उंच करुन तुमच्याकडे पाहावं लागेल.तुमची बुध्दीमत्ता,यश, कीर्ती,समाजाच्या दृष्टीक्षेपात मावणार नाही एवढे मोठे व्हा.उतुंग यश मिळवा. इतकी दिगंवत कीर्ती मिळवा की, सन्याशाची पोरं म्हणुन हिनवणारं हे जग तुमच्या पायावर डोकं टेकवायला मिळण्यासाठी अहमहनिका लागेल, धडपडेल,जीव टाकतील!”न भूतो न भविष्यती। असं भव्य दिव्य कार्य करा. निवृत्ती,ज्ञानेशा कानांत प्राण आणुन आई चा प्रत्येक शब्द ऐकत होते.मातृत्वाच्या या विराट दर्शनाला विठ्ठलपंतांनी मनोमन वंदन केले.

        मनांतलं सगळं सांगीतल्यावर त्या माऊलीला हुंदका आवरेनासा झाला. त्यांचे डोळे पुसण्याचा निष्फळ प्रयत्न करीत,ज्ञानदेव म्हणाले,आई!मातेला तीच्या अजान लेकरांपासुन दूर करणारा, त्यांची ताटातूट करणारा हा कसला धर्म? दादा! हा प्रश्न आज ना उद्या या धर्म पंडितांना विचारण्याची वेळ येणार आहे. आपल्या सात वर्षाच्या लोकराच्या विलक्षण बुध्दीची साक्ष माता पितांना पटल्याने दोघेही समाधान पावले व ती लेकरांना थोपटत राहिली.

                  क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  सोपानदेव  !!!

भाग – ४.

           आईच्या प्रेमळ स्पर्शाने थोपटत असल्याने निवृत्ती,ज्ञानदेव कधी निद्रेच्या कुशीत सामावले त्यांना कळलेही नाही. सोपान,मुक्ताई तर आधीच झोपी गेले होते.आपल्या हळव्या झालेल्या,अखेरची निरवा निरव करणार्‍या,मातृत्वाची प्रचिती देणार्‍या पत्नीचे हात हाती घेऊन गदगदल्या व अपराधी स्वरांत विठ्ठलपंत म्हणाले!खरं तर नवर्‍याने बायकोची काळजी घेऊन सुखी ठेवायचे असते!पण मी तुला दुःखाशिवाय कांहीच दिले नाही. खोटं बोललो,वंचना केली,त्याग केला, सन्यास घेतला,गुरुंच्या आज्ञेने परत गृह स्थाश्रम स्विकारला.माझ्या करंट्यापणा मुळे तूं दुर्देवी ठरलीस आणि त्याहीपेक्षा दुर्देवी ठरलीत आपली ही अजान चार लेकरं!मी ना चांगला पती,ना चांगला पिता होऊ शकलो. या मुलांना जन्म देण्याशिवाय कोणतच कर्तव्य पुर्ण करुं शकलो नाही.आपण असतांनाच समाजाने त्यांची इतकी अवहेलना केली, माघारी तर त्यांचे गिधाड्यासारखे लचके तोडतील.मी तुझ्या पत्नित्वाचा आणि मातृत्वाचा अनंत अपराधी आहे.क्षमा कर रुख्मिणी!क्षमा कर! नाही स्वामी!नाहीs  तुम्ही कुणाचा कसलाही अपराध केलेला नाही.माझा तर नाहीच नाही.उलट आपल्यासारखा प्रेमळ,समंजस,सन्मान करणारा सहचर मिळाला यांतच मला सर्व कांही मिळाले.

          आपण मुलांना उत्तम संस्कार, त्यांच्या मनांत उत्पन्न केलली ज्ञानलालसा त्यांच्या पंखात भरलेलं श्रध्देचं बळ दिलं हेच आदर्श व चांगल्या पित्याचे लक्षण आहे.आपल्या मुलांच्या कल्याणार्थ देहांत प्रायश्चित घेत आहोत,यापेक्षा मोठा त्याग, आहुती काय असुं शकेल?उत्तर रात्र संपत आली.रुख्मिणीने मातृत्वाचे सारे सामर्थ्य,जीवनरस ओतुन मुलांसाठी पेज रांधुन ठेवली.एकमेकांना चिटकुन झोपले ल्या आपल्या पिल्ल्यांच्या मस्तकाचं दोघांनीही अवघ्राण केलं.आणि मागे न पाहतां झटकण दोघेही बाहेर पडले कधीहि परत न येण्यासाठी.आतां फक्त होते ते आत्मसमर्पन…फक्त आत्मसमर्पन

            एके काळी तरुन वयात प्रकांड पंडीत म्हणुन काशीत गणल्या गेलेले विठ्ठलपंत!आणि आज? काळजात कोंडलेल्या वात्सल्याच्या उद्रेकाने आकांत करणार्‍या वात्सलमयी मातेचं स्वरुप खरं की,सहचारीनी म्हणुन आत्म समर्पण करणारं रुप खर?विठ्ठलपंतांनी एक उपाय सुचवला.माझ्या पापाचं परिमार्जन म्हणुन देहान्त प्रायश्चित मी एकट्याने घेतले तर आपली मुलं अनाथ

होणार नाही,तूं त्यांना आईबापाचं प्रेम देऊन कर्तव्य पार पाडुं शकशील.तप्त शिश्याचा रस कानात ओतत आहे असे तीला वाटले.नाही स्वामीss नाही.दोघेही तेवढेच दोषी आहोत.पतीच्या प्रत्येक सुखदुःखात पत्नी अर्धी वाटेकरी असते. तरी विठ्ठलपंत आपला अट्टाहास पुढे नेत तीला समजावत असतांना,सहस्र सूर्याचं तेज असणार्‍या चार स्फुलिंगांना जन्म देणारी रुख्मिणी ठाम निश्चयाने म्हणाली, माझ्यातील आई जागी होण्यापूर्वी आपण निघावं!आंत निजलेल्या चौघांना देवाच्या भरोश्यावर सोडुन,झोपडीचं मोडकं तोडकं कवाड बंद करुन दोघेही झपझप चालु लागले.इंद्रायणीकाठी येऊन त्या दुर्देवी दोघांनी पाण्यांत पाऊल घातले मात्र,अचानक स्तब्ध,शांत पाण्याला अचानक उधाण आलं. हा इंद्रायणीचा आनंद होता की विद्रोह?एक उंच लाट उसळली आणि दुसर्‍याच क्षणी दोघांना आपल्यात सामावुन घेतले. लेकरांच्या भविष्यासाठी,जगाच्या कल्याणासाठी आत्मसमर्पण केलेले हे दोन जीव म्हणजे अध्यात्माच्या इतिहासा तील रुपेरी वर्खाच पानं आहेत.

      दुसर्‍या दिवशी नेहमीच्या सवयी प्रमाणे सकाळी लवकर उठलेल्या निवृत्ती ज्ञानेशांना आई बाबांचे अंथरुण रिकामे दिसले.सोपान मुक्ताई अजुन झोपलेलेच होते.निवृत्तींचं काळीज चरकलं.रात्रीचा आईबाबांचा संवाद आठवला.दोघेही बाहेर पडले.थोड्या वेळाने मुक्ताई उठली सगळीकडे बघीतल्यावर आई न दिसल्या मुळे आईss आईss करत जोराने रडु लागली.तिच्या रडण्याच्या आवाजाने सोपान जागे होऊन तिची समजुत घालुं लागले.त्यांना प्रतिक्षा होती,आई बाबांची, मोठे भाऊ निवृत्ती ज्ञानेशाची आणि आणखी कशाची? याचे उत्तर काळच देणार होते,म्हणुन प्रतिक्षा होती काळाचीसुध्दा!

           रडुन थकलेल्या मुक्ताला परत झोपवुन सोपान थेट पाणवठ्यावर आले. तेथील बायकांना आई दिसली कां म्हणुन विचारले,कदाचित काटके गोळा करायला गेली असेल,असे वाटुन बाभुळ  वनात जाऊन आईss आईss अशा हाका मारण्याचा सपाटा लावला.

                    क्रमशः
संकलन ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  सोपानदेव  !!!

भाग  –  ५.

         सोपानदेव काट्याकुट्यांची पर्वा न करतां आईss आईss करत बेभानपणे धावत होते.मुक्ता घरी एकटीच असल्याचे लक्षात आल्यावर,व आतांपर्यंत आई घरी पोहचली असेल असे वाटुन रक्ताळलेल्या पायांनी घरी आल्यावर मुक्ता रडत असलेली दिसली.पण आई?निवृत्तीनाथ ज्ञानदेव श्लोकांचे पठण संपवुन घरी आले तर त्यांना अंगणांत रक्ताळलेल्या पावलांचे ठसे दिसले.लगेच त्यांनी घरांत धाव घेतली.सोपानांचे दोन्ही पाय रक्ताळलेले,बाभळींच्या काट्यांनी पायांची चाळण झालेली,अवस्था पाहुन ज्ञानेशांचे मन गलबलुन आले.पायावर उपचार करुन,दोघांनाही घरी थांबण्यास सांगुन आईच्या शोधार्थ जातो म्हणुन दोघेही बाहेर पडले.

         दिवसभरांत ना आईबाबा परतले ना निवृत्ती ज्ञानदेव!सोपानांचा पाय चांगलाच सुजुन ठणका लागल्या होत्या. आईची सतत आठवण येत होती. मोठ्याने रडावेसे वाटत होते,पण आपण रडलो तर,मुक्ताईला सांभाळणे कठीण झाले असते,म्हणुन एवढ्या लहान वयात सारं दुःख आंतल्या आंत गिळुन टाकलं. संध्याकाळ झाली.अंधार पडला,दोघांना ही भीति वाटत होती.सोपानदादा आई बाबा कुठे गेले असतील रे?निवृत्तीदादा, ज्ञानदादा अजुन कां आले नाहीत?मला भूक लागली रे सोपानदादा!ठसठसणारा पाय घेऊन सोपान चुलीजवळील गाडगे मडके धुंडाळल्यावर थोडे पोहे मिळाले,ते  भिजवुन त्यात थोडे मीठ टाकुन मुक्ताई ला खायला दिले.ती घास तोंडात टाकणार तोच ती म्हणाली,तू पण घे!थोडे थोडे दोघेही खाऊ.सोपानांना गलबलुन आले.कांही वेळापुर्वी भूकेसाठी रडणारी हीच का ती मुक्ताई?

       आई बाबांच्या शोधात दिवसभर वणवण हिंडत निवृत्ती ज्ञानेश्वर घरी परतत असतांना मनी विचार आला .खरच काल ऐकल्याप्रमाणे त्यांनी आत्मत्याग,देहान्तप्रायश्चित घेतले असेल का?दोघांच्याही मनाचा थरकाप उडाला. निवृततींना मृत्यु म्हणजे काय हे थोडे तरी समजत होते,पण लहान तीन भावडांना काय सांगायचे?कसे समजवायचे?मलाच आतां यांची आईबाबा होऊन जबाबदारी घ्यावी लागेल,गुरुमाऊली!मला शक्ती, बळ द्या.सोपान मुक्ताई एकटे घरी घाबरले असतील या विचाराने दोघेही एकमेकांना दिलासा देत घरी पोहौचले. सोपान मुक्ताई दाराशी एकमेकांना चिटकुन बसले होते.त्यांना पाहतांच आई बाबांचा शोध लागला कां म्हणुन विचारले काय सांगायच या बालजीवांना?कशी समजुत काढायची?तेवढ्यात सोपानांचा आवाज आला,दादा!भूक लागली रेss  त्याबरोबर आपल्यालाही भूक लागल्या ची जाणीव त्यांना झाली.एका मडक्यांत असलेल्या कण्या व परसदारी असलेल्या शेवग्याच्या शेंगा व पाला पातेल्यात शिजायला टाकला.अन्नब्रम्हाची सिध्दता तर झाली खरं..पण अशीच ज्ञानाची सिध्दता केली तर अज्ञानाच्या अंधकारा वर सहज मात करतां येईल असे विचार ज्ञानदेवांच्या मनात आले.

      आई वडीलांनी केलेल्या आत्म समर्पणाच्या वावटीळनं या चौघांचीही आयुष्य पालापाचोळ्यासारखी भिरभिरत जावीत असा डाव कदाचित नियतीनचं आखला असावा.पण तीला कुठं माहित होतं की,चौघांतील एकी,एकमेकांबद्दल चा अपार जिव्हाळा,प्रेम आणि बुध्दीमत्ते चे तेजस्वी वलय याच्या सहाय्याने नियती वर मात करणार होती…त्या अग्नीच्या तेजस्वी ज्वालांनी अंधारावर मात केली तशी!कण्या शिजवायला चुलीजवळ बसलेल्या निवृत्तींना बघुन सोपान मुक्ताई ला आईच बसलेली असल्याचा भास झाला.आणि दोघांचेही डोळे भरुन आले. मुक्ता रडायला लागली,पण सोपान? अबोध वयाचा,धड लहान नाही ना धड मोठा नाही.त्यांच्या मनाची घुसमट घुसमट होऊ लागली.मुक्तासारखं लहान होऊन रडायचं होतं.मोठं होऊन तीची समजुत काढायची होती.नेमकं कोणत्या भूमीकेत जावे हेच कळेना.त्यांची ती अवस्था निवृत्तींच्या लक्षात आल्यावर, जवळ जाऊन पाठीवर हात फिरवत म्हणाले,अरे!तू मुक्तापेक्षा मोठा असलास तरी अजुन लहान आहेस.मनाचा कोंडमारा करुं नकोस.सहानुभुतीच्या शब्दांनी व पाठीवर मायेने हात फिरल्या मुळे  आतांपर्यंत आवरुन धरलेले अवसान गळुन पडले.आणि मोठ्याने हबरडा फोडला.. आईss आईss खरं तर तो टाहो नव्हताच तर आकांत होता. एका लेकरानं आईसाठी,अनाथानं माये साठी,निराधाराने आधारासाठी,सोपानानं आईसाठी केलेला आकांत,आक्रोश होता

               क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

 संत सोपानदेव चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading