६ एप्रिल, दिवस ९६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी ७६ ते १०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ११४१ ते ११५२

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“६ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ६ Apirl
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ६ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १११४ ते १११५ चे पारायण आपण करणार आहोत.


६ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी ७६ ते १००,

76-9
पाहे पा कापसाचा पोटी । काय कापडाची होती पेटी । तो वेढितयाचिया दिठी । कापड जाहला ॥76॥
हे पहा, कापसाच्या पोटात कापडाचे गठ्ठे असतात का ? वापरणाराच्या समजुतीने तो कापड बनला आहे !
77-9
जरी सोने लेणे होऊनि घडे । तरी तयाचे सोनेपण न मोडे । येर अळंकार हे वरचिलीकडे । लेतयाचेनि भावे ॥77॥
जर सोन्याचे दागिने बनविले तर सोनेपण नाहीसे होते का ? बाकी स्थुल दृष्टीने वापरणाराच्या कल्पनेने ते दागिने दिसतात;
78-9
सांगे पडिसादाची प्रत्युत्तरे । का आरिसा जे आविष्करे । ते आपले की साचोकारे । तेथेचि होते ॥78॥
आपल्या शब्दाचा जो प्रतिध्वनि ऐकू येतो, किंवा आरशांत जे आपले स्वरूप आपण पाहतो, तो खरोखर आपल्या बोलण्याचा किंवा पाहण्याचा परिणाम आहे, किंवा आपल्या पूर्वीच ते तेथे होते सांग बरे !
79-9
तैसी इये निर्मळे माझा स्वरुपी । जो भूतभावना आरोपी । तयासी तयाच्या संकल्पी । भूताभासु असे ॥79॥
त्याचप्रमाणे ह्या माझ्या निरुपाधिक स्वरूपावर जो भूतांच्या कल्पनेचा आरोप घेतो, त्याला त्याच्या कल्पनेमुळे माझ्या ठिकाणी भूतांचा भास होतो.
80-9
तेचि कल्पिती प्रकृती पुरे । आणि भूताभासु आधीच सरे । मग स्वरुप उरे एकसरे । निखळ माझे ॥80॥
तीच कल्पना करणारी माया संपली, म्हणजे माझ्या ठिकाणचा भूतांचा भास नाहीसा होतो. मग, माझे निरुपाधिक असे जे शुद्ध स्वरूप, तेच निखालस उरते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


81-9
हे असो आंगी भरलिया भवंडी । जैशा भोवत दिसती अरडीदरडी । तैशी आपुलिया कल्पना अखंडी । गमती भूते ॥81॥
हे असो; आपल्या भोवती गरगर फिरतांना भोवंड आल्यावर ज्याप्रमाणे डोंगर वैगेरे फिरतातसे दिसते,
82-9
तेचि कल्पना सांडूनि पाही । तरि मी भूती भूते माझिया ठायी । हे स्वप्नीही परि नाही । कल्पावयाजोगे ॥82॥
त्याचप्रमाणे, आपल्या मनात कल्पना उत्पन्न झाल्यावर अखंड ब्रह्मस्वरूपात भूतांचा भास होतो. तीच कल्पना सोडून जर पाहीले, तर मी भूतांच्या ठिकाणी व भुते माझ्या ठिकाणी आहेत, अशी स्वप्नात देखील कल्पना करण्यासारखी गोष्ट नाही.
83-9
आता मीच एक भूताते धर्ता । अथवा भूतामाजि मी असता । या संकल्पसन्निपाता । आंतुलिया बोलिया ॥83॥
आता, ‘ मीच एक भूतांचा धारण करणारा अथवा भूतांत असणारा’ ह्या सर्व गोष्टी संकल्परूप सन्निपात वायुच्या लहरीतील बडबडी आहेत.
84-9
म्हणोनि परियेसी गा प्रियोत्तमा । यापरी मी विश्वासी विश्वात्मा । जो इया लटकिया भूतग्रामा । भाव्यु सदा ॥84॥
म्हणून हे प्रियोत्तमा, ऐक की, अशा प्रकारे मी सृष्टीचा विश्वात्मा किंवा खोट्या सृष्टीचा आधार, ह्या कल्पना मिथ्या आहेत.
58-9
रश्मीचेनि आधारे जैसे । नव्ह तेचि मृगजळ आभासे । माझा ठायी भूतजात तैसे । आणि मातेही भावी ॥85॥
ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रखर किरणांनी, पाणी नसता मृगजलाचा भास होतो, त्याप्रमाणे, सर्व भूते माझ्या ठिकाणी आहेत व मीही त्यांमध्ये आहे, अशी कल्पना उत्पन्न होते.


86-9
मी ये परीचा भूतभावनु । परि सर्व भूतांसि अभिन्नु । जैसी प्रभा आणि भानु । एकचि ते ॥86॥
अशा प्रकारे, भूतांना उत्पन्न करणारा असुनही, सुर्य आणि त्याचे तेज ही ज्याप्रमाणे एकच आहेत, त्याप्रमाणे मी त्यापासून निराळा नाही.
87-9
हा आमचा ऐश्वर्ययोगु । तुवा देखिला की चांगु । आता सांगे काही एथ लागु । भूतभेदाचा असे ॥87॥
हा आमचा ऐश्वर्ययोग (अद्भूत कृत्य) तुला चांगला समजला ना ? तर आता सांग बरे, की मी व प्राणिमात्र यांच्यात काही तरी भेदाचा संबंध आहे काय ?
88-9
यालागी मजपासूनि भूते । आने नव्हती हे निरुते । आणि भूतावेगळिया माते । कहीच न मनी हो ॥88॥
याकरिता, माझ्याहून सर्व प्राणिमात्र खरोखर वेगळे नाहीत; आणि मीही त्यांच्यापासून वेगळा आहे असे कधी समजू नको.

यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान् ।
तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥9. 6॥

89-9
पै गगन जेवढे जैसे । पवनु गगनी तेवढाचि असे । सहजे हालविलिया वेगळा दिसे । एऱ्हवी गगन तेचि ते ॥89॥
आकाशाचा जेवढा विस्तार आहे, तेवढा वारा भरून राहीलेला आहे; परंतु तो सहज हालवला तर आकाशापासुन निराळा भासतो. येरव्ही आकाश तेच तो आहे;
90-9
तैसे भूतजात माझा ठायी । कल्पिजे तरी आभासे काही । निर्विकल्पी तरि नाही । तेथ मीच मी आघवे ॥90॥
त्याप्रमाणे, प्राणी माझ्या ठिकाणी आहेत अशी मनात कल्पना आली, म्हणजे थोडा भास होतो. तेच कल्पनेच्या अभावी पांहू गेले असता सर्वत्र मी एकच आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


91-9
म्हणऊनि नाही आणि असे । हे कल्पनेचेनि सौरसे । जे कल्पनालोपे भ्रंशे । आणि कल्पनेसवे होय ॥91॥
म्हणून भूतांचे नसणे आणि असणे हे कल्पनेच्या संबंधाने भासते; व जे कल्पना नाहींशी झाल्यावर भासत नाही आणि कल्पनेबरोबर भासते, .
92-9
तेचि कल्पिते मुदल जाये । तै असे नाही हे के आहे । म्हणऊनि पुढती तू पाहे । हा ऐश्वर्ययोगु ॥92॥
तेच कल्पना उत्पन्न करणारे अज्ञान समूळ नाहीसे झाल्यावर भूतांचे असणे व नसणे कोठून भासणार ? म्हणून यापुढे माझी अद्भूत कृति तुला सांगतो ती पहा
93-9.
ऐसिया प्रतीतिबोधसागरी । तू आपणपेयाते कल्लोळु एक करी । मग जव पाहासी चराचरी । तव तूचि आहासी ॥93॥
अशा ह्या अनुभवरूपी समुद्रांत तू स्वतः एक लाट बनून रहा; मग तू या चराचरांकडे पांहू लागलास, म्हणजे सर्वत्र तूच भरला आहेस असे तुझ्या दृष्टीस पडेल ऐस
94-9
या जाणणेयाचा चेवो । तुज आला ना म्हणती देवो । तरी आता द्वैतस्वप्न वावो । जाले की ना ॥94॥
देव म्हणाले :- अर्जुना ! हे जे मी तुला ज्ञान सांगितले त्याचा तुझ्या मनात काही प्रकाश पडला का ? तर आता तुला जे मी व विश्व ही दोन आहेत असे स्वप्न पडले होते, ते खोटे ठरले नाही का ?
95-9
तरी पुढती जरी विपाये । बुद्धीसि कल्पनेची झोप ये । तरी अभेदबोधु जाये । जै स्वप्नी पडिजे ॥95॥
परंतू पुढे कदाचित् तुझ्या बुद्धीला जर कल्पनारूपी झोप लागली, तर मी व जग ही एकच आहेत असा जो बोध, तो जगद्रूपी स्वप्न पडू लागल्यावर नाहीसा होईल;


96-9
म्हणोनि ये निद्रेची वाट मोडे । निखळ उद्बोधाचेचि आपणपे घडे । ऐसे वर्म जे आहे फुडे । ते दावो आता ॥96॥
म्हणून या कल्पनारूप निद्रेची वाट मोडून, शुद्ध असे जे ब्रह्मज्ञान ते आपोआप तुला प्राप्त होईल असे जे एक खरे तत्त्व आहे ते तुला आता दाखवून देतो.
97-9
तरी धनुर्धरा धैर्या । निके अवधान देई बा धनंजया । पै सर्व भूतांते माया । करि हरि गा ॥97॥
तर, हे धैर्यवान धनंजया, तू नीट लक्ष दे की, प्राणिमात्राची उत्पत्ति, स्थिति व लय यास एक मायाच कारण आहे.

सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् ।
कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥9. 7॥

98-9
जिये नांव गा प्रकृती । जे द्विविध सांगितली तुजप्रती । एकी अष्टधा भेदव्यक्ती । दुजी जीवरुपा ॥98॥
त्या मायेला प्रकृति असे म्हणतात, व ती दोन प्रकारची आहे म्हणून तुला पूर्वी (अध्याय 7 श्लोक 4-5) सांगितलेंच आहे. पैकी एक आठ प्रकारच्या रूपाने भिन्न आहे व दुसरी जीवरूप अशी आहे.
99-9
हा प्रकृतीविखो आघवा । तुवा मागा परिसिलासे पांडवा । म्हणोनि असो काइ सांगावा । पुढतपुढती ॥99॥
हे पांडवा, हा प्रकृतीचा सर्व विषय तू पूर्वी ऐकलाच आहेस, म्हणून त्याजबद्दल पुनः पुनः सांगण्याचे कारण नाही.
100-9
तरी ये माझिये प्रकृती । महाकल्पाचां अंती । सर्व भूते अव्यक्ती । ऐक्यासी येती ॥100॥
तरी महाप्रलयाच्या शेवटी ही सर्व भूते माझ्या प्रकृतिरूप अव्यक्त स्वरूपात लय पावतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ९६ वा, ६, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ११४१ ते ११५२
सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. ११४१
न मनी ते ज्ञानी न मनी ते पंडित । ऐसे परीचे एकएका भावे ॥१॥
धातू पोसोनिया आणिका उपदेश । अंतरी तो लेश प्रेम नाही ॥धृपद॥
न मनी ते योगी न मनी ते हरिदास । दर्शने बहुवस बहुता परीची ॥२॥
तुका म्हणे तया नमन बाह्यात्कारी । आवडती परि चित्तशुद्धी ॥३॥
अर्थ

जे लोक मनात वेगळे आणि वागताना वेगळे वागतात असे माणसे ज्ञानी असो वा पंडित असो मी त्यांना मानत नाही. असे लोक स्वतःचा देह पोसतात आणि दुसर्‍याला उपदेश करतात परंतु त्यांच्या अंतकरणात प्रेमाचा लवलेशही नसतो. ज्यांच्याकडे प्रपंचाची भरपूर साधने असतात अशा योगी आणि हरिदास यांना मी मानत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी या ज्ञानी, पंडित, योगी, हरिदास यांना बाह्यतः नमस्कार करतो परंतु मला ते आवडतात ज्यांची चित्तशुद्धी झाली आहे.
अभंग क्र. ११४२
कासया पाषाण पूजितसा पितळ । अष्ट धातु खळ भावे विण ॥१॥
भावचि कारण भावचि कारण । मोक्षाचे साधन बोलियेले ॥धृपद॥
काय करिल जपमाळा कंठमाळा । करिशी वेळोवेळा विषयजप ॥२॥
काय करिशील पंडित हे वाणी । अक्षराभिमानी थोर होय ॥३॥
काय करिशील कुशल गायन । अंतरी मळीण कुबुद्धि ते ॥४॥
तुका म्हणे भाव नाही करीसी सेवा । तेणे काय देवा योग्य होशी ॥५॥
अर्थ

अरे वेड्या जर तुझ्या मनात हरी विषय खरा भक्तिभाव नसेल तर मग तू पाषाणाच्या, पितळाच्या व अष्टधातू च्या मूर्तींची पूजा का करतोस ? अरे हरी प्राप्ती करून घ्यायची असेल तर मनामध्ये शुद्ध भक्तिभाव पाहिजे आणि शुद्ध भक्तिभाव हेच मोक्षाचे साधन आहे असे उपनिषद व भाद्गवतगीतेत सांगितले आहे. अरे तू वेळोवेळा जर विषयात गुंतून राहिलास तर मग तू कितीही जपमाळ केले आणि कंठात कितीही तुळशीच्या, रुद्राक्षाच्या माळा घातल्या तर त्या माळा काय करणार ? अरे नुसतीच पंडित वाणी बोलून काय उपयोग आहे आणि बोलून काय करशील आणि तू अक्षर पठण केले तर त्यामुळे फक्त तुला अभिमानच होईल तुझी बुद्धी जर शुद्ध झाली नसेल तर मग तू कितीही कुशल गायन केलेस तर त्याचे काय करशील ? तुकाराम महाराज म्हणतात जर तू देवाची सेवा सात्विक व शुद्ध श्रद्धेने केली नाही तर तु देवाच्या आशीर्वादा योग्य कसा काय होणार ?
अभंग क्र. ११४३
शिळा जया देव । तैसा फळे त्याचा भाव ॥१॥
होय जतन ते गोड । अंतरा येती नाड ॥धृपद॥
देव जोडे भावे । इच्छेचे ते प्रेम घ्यावे ॥२॥
तुका म्हणे मोड दावी । तैशी फळे आली व्हावी ॥३॥
अर्थ

एखाद्या मनुष्याने दगडाच्या देवाच्या प्रतिमेचे श्रद्धेने पूजा केली तर त्याला त्याच्या भावनेनुसार फळ प्राप्त होते. सात्विक श्रद्धेचे रक्षण केले पाहिजे आणि त्याचे रक्षण करताना अनेक विघ्ने, अडथळे निर्माण होत असतात. त्यांना बाजूला सारून त्यांचे रक्षण करावे लागते कारण देव शुद्ध भक्ती व श्रद्धने आपल्याशी जोडला जातो. आपल्या इच्छेनुसार कोणत्याही भक्तीचा स्वीकार करावा. नवविधाभक्ति पैकी कोणत्याही एका भक्तीचा स्वीकार करावा पण जर श्रद्धा नसेल तर ती भक्ती व्यर्थ ठरते. तुकाराम महाराज म्हणतात जसे बीज पेरु तसे अंकुर उगवते व तसेच झाड उगवते फळही त्याप्रमाणे येतात त्याचप्रमाणे ज्याची जशी श्रद्धा असेल तसेच त्याला फळ प्राप्त होईल.
अभंग क्र. ११४४
अंतरीचे गोड । राहे आवडीचे कोड ॥१॥
संघटणे येती अंगा । गुणदोष मनभंगा ॥धृपद॥
उचिताच्या कळा । नाही कळत सकळा ॥२॥
तुका म्हणे अभावना । भावी मूळ ते पतना ॥३॥
अर्थ

ज्या माणसांचे अंतकरण गोड असते, प्रसन्न असते त्यांच्या आवडीची इच्छापुर्ती होते. जर लोकांशी संघटन ठेवले तर आपल्या अंगांमध्ये विविध प्रकारचे गुण दोष उत्पन्न होतात व मनोभंग होतो. त्यामुळे कोणाशीही संघटन करू नये. बऱ्याच लोकांना उचित काय अनुचित काय हे कळतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात जर आपण अंधश्रद्धा वान व्यक्तीचे संघटन केले तर देव, संत आणि वेद यांच्या ठिकाणी आपली अभावना उत्पन्न होते आणि तेच आपल्या नाशाचे मूळ कारण होते.
अभंग क्र. ११४५
कासया जी ऐसा माझे माथा ठेवा । भार तुम्ही देवा संतजन ॥१॥
विचित्र विंदानी नानाकळा खेळे । नाचवी पुतळे नारायण ॥धृपद॥
काय वानरांची अंगीची ते शक्ती । उदका तरती वरी शिळा ॥२॥
तुका म्हणे करी निमित्तचि आड । चेष्टवूनि जड दावी पुढे ॥३॥
अर्थ

हे संत जन हो तुम्ही मला देव मानून माझ्या डोक्यावर मोठे पणाचा भार का ठेवतात ? नारायण भिन्न भिन्न प्रकारे आपले चातुर्य दाखवून या जगामध्ये वावरतो आणि अनेक प्रकारचे पुतळे येथे नाचवीतो. दगड पाण्यावर तरावा एवढी शक्ती एवढे कर्तव्य वानरांच्या अंगी आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात हा नारायण कोणतेही कार्य करताना कोणाला तरी निमित्त करून आपण स्वतः अधिष्ठान राहून जडा कडून कार्य करून घेतो.
अभंग क्र. ११४६
पाया पडावे हे माझे भांडवल । सरती हे बोल कोठे पायी ॥१॥
तरि हे सलगी कवतुक केले । लडिवाळ धाकुले असे बाळ ॥धृपद॥
काय उणे तुम्हा संताचिये घरी । विदित या परी सकळ ही ॥२॥
तुका म्हणे माझे उचित हे सेवा । नये करू ठेवाठेवी काही ॥३॥
अर्थ

हे संत जन हो तुमच्या पाया पडणे हेच माझे मुख्य भांडवल आहे कारण तुमच्या पायाची स्तुती मी करणे शक्य नाही. तरीदेखील मी सलगी करून तुमचे कौतुक केले. कारण मी तुमचे लाडके बाळ आहे तुम्हा संतांच्या घरी काय उणे आहे. तुम्हाला तर माझी सर्व परिस्थिती माहीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्हा संतांच्या चरणी नतमस्तक व्हावे हिच माझी सेवा आहे या वाचून दुसरे मी काही करू शकत नाही.
अभंग क्र. ११४७
वदवावी वाणी माझी कृपावंता । वागपुष्पे संता समर्पीशी ॥१॥
सर्वसंकटाचा तुम्हा परिहार । घालावा म्या भार पांडुरंगा ॥धृपद॥
एकसरे चित्त ठेवूनिया पायी । जालो उतराई होतो तेणे ॥२॥
तुका म्हणे येथे जाले अवसान । काया वाचा मन वेचूनिया ॥३॥
अर्थ

देवा तुम्ही माझी वाणी अशी वदावा म्हणजे माझ्या वाणीतून असे शब्द बाहेर यावे की जेणेकरून तुमचे स्तुती रुपी शब्दपुष्पे संतांच्या चरणांवर समर्पित व्हावी. हे पांडुरंगा माझ्या सर्व संकटाचा भार मी तुमच्यावर घालावा आणि तुम्ही त्याचा परिहार करावा. देवा तुमच्या पायी मी माझे चित्त ठेवून निवांत झालो आणि तुम्ही केलेल्या कृपाशीर्वादातून मी उतराई झालो. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा काय वाचा मन मी तुमच्या चरणी ठेवले व आता माझे कर्तव्य संपले आहे.
अभंग क्र. ११४८
नमावे पाय हे माझे उचित । आशीर्वादे हित तुमचिया ॥१॥
कृपेचा वोरस न समाये पोटी । म्हणोनि उफराटी वचने ही ॥धृपद॥
तुमची उष्टावळी ते माझे भोजन । झाडावे अंगण केरपुंजे ॥२॥
परि ऐसे पुण्य नाही माझे गाठी । जेणे पडे मिठी पायासवे ॥३॥
तुका म्हणे राहे आठवण चित्ती । ऐशी कृपा संती केली तुह्मी ॥४॥
अर्थ

हे संत जन हो तुमच्या पायी मी नमावे म्हणजे नम्र व्हावे हेच उचित आहे कारण तुमच्या आशीर्वादानेच माझे हित होणार आहे. तुम्ही माझ्यावर कृपा केली त्यामुळे माझ्या पोटात आनंद मावत नाही. संतांनो मी तुमची स्तुती करण्याऐवजी तुम्हीच माझी स्तुती करत आहात. मी तुमचे उरलेले अन्न खाणे हेच माझे भोजन आहे तुमचे अंगण झाडावे व झाडलेल्या अंगणातून कचऱ्याचे ढीग उचलून टाकावे हेच माझे कर्तव्य आहे पण असे माझ्या नशिबी नाही की जेणेकरून मला तुमच्या पायाची अखंड मिठी पडेल. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या चित्तामध्ये अखंड हरीची आठवण राहील अशी कृपा तुम्ही माझ्यावर केली तेही मी तुमची कोणतीही सेवा केली नाही तरी, त्याबद्दल मला धन्य वाटत आहे.
अभंग क्र. ११४९
काय नाही माता गौरवीत बाळा । काय नाही लळा पाळीत ते ॥१॥
काय नाही त्याची करीत ते सेवा । काय नाही जीवा गोमटे ते ॥धृपद॥
अमंगळपणे काटाळा न धरी । उचलोनि करी कंठी लावी ॥२॥
लेववी आपुले अंगे अळंकार । संतोषाये फार देखोनिया ॥३॥
तुका म्हणे स्तुति योग्य नाही परी । तुम्हा लाज थोरी अंकिताची ॥४॥
अर्थ

माता आपल्या बाळाचा गौरव करत नाही काय, आणि त्याचा लळा ती पूर्ण करीत नाही काय ? माता तिच्या बाळाची सेवा करत नाही काय, आणि सेवा केल्याने तिला बरे वाटत नाही काय ? ते बाळ अमंगळ जरी असले किंवा दिसण्यास कसेही असले तरी त्या मातेला त्याचा कंटाळा येतो काय ती त्याचा कंटाळा कधीही धरत नाही, उलट त्या बाळाला उचलून कंठाशी लावते किंवा त्याला मिठी देते. ती माता बालकाला अलंकार परिधान करते आणि त्या बालकाला पाहून मातेलाच संतोष होतो तिला खूप आनंद होतो. तुकाराम महाराज म्हणतात हे संत जन हो तुम्ही माझी स्तुती करणे योग्य नाही परंतु तुम्हाला माझा अभिमान असल्यामुळे तुम्ही माझी स्तुती करतात जशी आई आपल्या मुलाचा अभिमानाने गौरव करते अगदी त्याप्रमाणेच.
अभंग क्र. ११५०
माझिया मीपणावरी पडो पाषाण । जळो हे भूषण नाम माझे ।
पापा नाही पार दुःखाचे डोंगर । जालो ये भूमीसी ओझे ॥१॥
काय विटंबना सांगो किती । पाषाण फुटती ऐसे दुःख ।
नर नारी सकळ उत्तम चांडाळ । न पाहाती डोळा माझे मुख ॥धृपद॥
काया वाचा मने अघटित करणे । चर्मचक्षु हात पाय ।
निंदा द्वेष घात विश्वासी व्यभिचार । आणीक सांगो किती काय ॥२॥
लक्ष्मीमदे माते घडले महा दोष । पत्नी दोनी भेदभेद ।
पितृवचन घडली अवज्ञा अविचार । कुटिल कुचरवादी निंद्य ॥३॥
आणीक किती सांगो ते अवगुण । न वळे जिव्हा कापे मन ।
भुतदया उपकार नाही शब्दा धीर । विषयी लंपट शब्द हीन ॥४॥
संत महानुभाव ऐका हे उत्तरे । अवगुण अविचार वृद्धि पापा ।
तुका म्हणे सरते करा पांडुरंगी । शरण आलो मायबापा ॥५॥
अर्थ

माझ्या “मी (अहंकार) ” पणावर दगड पडो आणि जगात माझे जे नाम झाले, माझे जे भूषण झाले आहे त्याला आग लागो. माझ्या पापाला पारावार नाही त्यामुळे मी अनेक दुःखाचे डोंगर भोगत आहे. मी भूमीला भार झालो आहे माझी काय फजिती होत आहे हे मी किती सांगू. माझे दुखने ऐकून दगडही फुटेल. स्त्री-पुरुष, उत्तम वर्णातील लोक, चांडाळ हे सर्वजण डोळ्याने माझे मुख देखील पाहत नाहीत. माझ्या काया, वाचा, मनाने, चक्षूने, हाताने, पायाने निंदा, द्वेष, घात, दुसऱ्यांचा विश्वास तोडणे, व्याभिचार असे अनेक अनहित कर्म केलेले आहेत माझ्या हातून वाईट कर्मे घडलेली आहेत आता ते मी कसे सांगू ? संपत्तीच्या मदाने माझ्या हाताने अनेक महापाप घडले मी दोन पत्नीमध्ये भेद करत होतो. पितृवचनाची मी अवज्ञा केली असा मी अविचारी, कुटील कुच्चर, भांडखोर आहे. मी आता माझे किती अवगुण तुम्हाला सांगू ते सांगण्याकरिता देखील जीभ वळत नाही. मन थरथर कापते. मी कधीही भूतदया केली नाही कोणावर कधीही उपकार केले नाही. माझ्या शब्दांना धीर नाही स्थैर्य नाही. मी विषय लंपट आहे माझ्याकडे आता बोलण्यासाठी शब्दच नाही. तुकाराम महाराज म्हणतात संत महानुभव तुम्ही माझे बोलणे ऐका मला तुम्ही पांडुरंगाच्या पायापाशी सरते करा माझे अवगुण अविचार वाढले आहे मग पांडुरंग माझा स्वीकार करील कसा याविषयी विचार करा मला सांगा हे मायबाप हो मी तुम्हाला शरण आलो आहे माझ्यावर येवढा उपकार करा मला तुम्ही पांडुरंगाच्या पायापाशी सरते करा.
अभंग क्र. ११५१
फिराविली दोनी । कन्या आणि चक्रपाणी ॥१॥
जाला आनंदे आनंद । अवतरले गोविंद ॥धृपद॥
तुटली बंधने । वसुदेवदेवकीची दर्शने ॥२॥
गोकुळासी आले । ब्रम्ह अव्यक्त चांगले ॥३॥
नंद दसवंती । धन्य देखिले श्रीपती ॥४॥
निशी जन्मकाळ । आले अष्टमी गोपाळ ॥५॥
आनंदली मही । भार गेला सकळ ही ॥६॥
तुका म्हणे कंसा । आट भोविला वळसा ॥७॥
अर्थ

वसुदेवाने मथुरेच्या तुरुंगांमध्ये देवकीच्या पोटी जन्माला आलेल्या कृष्णाला उचलून गोकुळात यशोदे जवळ आणून ठेवले आणि यशोदेला झालेली योगमाया रूप कन्येला देवकी जवळ आणून ठेवली. अशाप्रकारे कन्येची आणि चक्रपाणी हरीचे आदलाबदल करण्यात आली. ज्या वेळी कृष्णाने जन्म घेतला त्यावेळी जिकडे तिकडे आनंदीआनंद झाला. श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि वसुदेव देवकीच्या हातातील सर्व बंधने आपोआप तुटून गेली. अव्यक्त चांगले ब्रम्‍ह गोकुळात नाम रूपाला आले. नंद-यशोदा धन्य आहेत की ज्यांनी श्रीकृष्णाला पाहिले. भगवान श्रीकृष्ण श्रावण वद्य, अष्टमीला, रोहिणी नक्षत्र, वार बुधवार आणि मध्यरात्रीला जन्माला आले. पृथ्वी ही आनंदली कारण तिचा भार कृष्णाच्या जन्मामुळे हलका झाला. तुकाराम महाराज म्हणतात भगवंताच्या जन्मामुळे कंस भयभीत झाला आणि भयाच्या भोवऱ्यात सापडून गरगर फिरू लागला.
अभंग क्र. ११५२
सोडिलेल्या गाठी । दरुषणे कृष्णभेटी ॥१॥
करिती नारी अक्षवाणे । जीवभाव देती दाने ॥धृपद॥
उपजल्या काळे । रूपे मोहीली सकळे ॥२॥
तुका तेथे वारी । एकी आडोनि दुसरी ॥३॥
अर्थ

श्रीकृष्ण भेटीने सर्वाच्या हृदयातील संशयाच्या गाठी सुटल्या गेल्या. गोकुळातील सर्व नारी श्रीकृष्णाचे औक्षण करू लागल्या व त्याला जीवाभावाचे दान देऊ लागल्या. भगवंताने जन्म घेऊन आपल्या अलौकिक रूपाने सर्वाना मोहून टाकले. तुकाराम महाराज म्हणतात ज्या वेळी भगवंताचा जन्म झाला त्या वेळी गोपी स्त्रिया तेथे जन्माला आल्या मग त्यावेळी मी देखील तेथे दारावर उभा राहून एकि मागे एक गोपींना आत पाठवण्यासाठी बारी देत होतो.

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading