आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

33. सारदामाता चरित्र भाग १, (१ ते ५)
रामचंद्र मुखर्जी आणि शामसुंदरीच्या पोटी जयरामवाटी या गावी सारदाचा जन्म झाला. जन्मा पासूनच सारदाचे वेगळेपण दिसून येत होते. कधी जास्त रडणे नाही, की आकांडतांडव नाही. लाडा कौतुकात सारदा सहा वर्षाची झाली. आणि तिच्या विवाहाचा प्रस्ताव कामारपुकुरच्या रामेश्वर मुखर्जींचा …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! सारदामाता !!!
!!! प्रस्तावना !!!
!! नमस्कार !!
आतापर्यंत आपल्यासमोर वेगवेगळ्या विषयांचे “७८” व्यक्ती चरित्र सादर केली. आपणापैकी कोणी लिखित संदेश देऊन तर, कोणी दूरध्वनी वरून माझे भरभरून कौतुक केले. त्यामुळे मला ऊर्जा मिळत गेली. आणि मी लिहित गेले… लिहीत आहे..
आता आपल्यासमोर सादर करीत आहे “७९ वे पुष्प “सारदामाता”!
नेहमीप्रमाणे आपल्या क्रिया प्रतिक्रिया अपेक्षित!
सारदा माता म्हणजे, रामकृष्ण परमहंसाची पत्नी. रामकृष्ण परमहंसाच्या प्रत्येक कार्यात सारदा मातेचाही तेवढ्याच मोलाचा वाटा व सहकार्य होते.
जयरामवाटी या गावातील सामान्य ब्राह्मण कुटुंबात सारदामाताचा जन्म झाला. त्यांचा विवाह वयाच्या सहाव्या वर्षीच २३ वर्षीय गदाधरांशी झाला. त्यांना शिक्षण नसूनही त्यांचे विचार प्रगल्भ आणि पुरोगामी होते. पती गदाधर उर्फ रामकृष्णाने त्यांना व्यवहारज्ञान शिकवले. सारदादेवींना ऐन तारुण्यातही संसाराची ओढ, सक्ती नव्हती. एखाद्या योगिनी सारख्या विरक्त होत्या. हे त्यांचे जगावेगळे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
समोरच्या माणसाच्या मनातील वाईट विचार, दुर्भावना त्यांच्यासमोर नतमस्तक होत. आणि त्याला त्यांच्या ठाई दिसू लागे केवळ पवित्र मातृत्वच!
सारदादेवींनी सर्वांना मातृप्रेम दिलं म्हणूनच त्या ।”जगन्माता ” झाल्या. जणू मातृत्वाला श्रेष्ठत्व देण्यासाठी, प्रेमाचा संदेश जगाला देण्यासाठीच जणू त्यांचा जन्म झाला असावा. प्रेमात फार मोठी ताकत असते हे त्यांनी आपल्या वागण्यातून, व्यवहारातून जगाला दाखवून दिले.
जगात कोणीही परक नाही. तो अगदी तुमच्यातच आहे. त्याचे वर भरभरून प्रेम करा. हा संदेश त्या मातृरुपिणी जगन्मातेने दिला. त्यांच्या जीवनाचे मुख्य ध्येय होते… श्रद्धा, भक्ती आणि त्याग. शांती हवी असेल तर लोकांचे दोष न पाहता व स्वनिरीक्षण करा.
बेलूर मठात रामकृष्ण परमहंस, सारदामाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव इतका पडतो की आपणही त्यातलेच एक होऊन जातो.
सहा वर्षाची सारू लग्न होऊन सासरी येते. लोक लाजेस्तव तिच्या अंगावर मागून आणून घातलेले दागिने तिच्या अंगावरून काढण्यात आले. दुसऱ्या दिवशी काका तिला भेटायला आले असता, सारुला ओकेबोके पाहून तिला घरी घेऊन आले. तेच मुळी दोन वर्षानेच ती सासरी गेली. दोन वर्षानंतर सारु सासरी आली तेव्हा, सासू रामकृष्णांबरोबर दक्षिणेश्वरला गेलेली होती. तिला गाव सीमेवर असलेल्या हलदार तळ्यावर स्नानाला जायचे होते, पण वाटेत घनदाट झाडी असल्यामुळे कसे जावे या विचारात असताना, तिच्याच वयाच्या आठ मुली स्नानास जाताना दिसल्या. त्यांच्या बरोबर ती जाऊ लागली. नंतर कळले की त्या कालीमातेच्या अष्टनायका होत्या.
भानुअत्याने तिला पतीबद्दल माहिती दिल्यावर, पती कडे जाण्याची ओढ लागली. पण गेल्या सात-आठ वर्षात साधी विचारपूसही केली नाही म्हणून त्या खंतावल्या. रामकृष्णांनी बारा वर्षे तपस्या करून सिद्धी प्राप्त केली. पण खाण्यापिण्याची आबाळ झाल्याने त्यांना पोटाचा विकार जडल्याचे कळल्यावर मात्र त्या गेल्या. सारदादेवीचा बराचसा वेळ पतीसोबतच जात होता. तिथं पती-पत्नीचे मिलन नसून, होते, दोन्ही आत्म्याची एकरूपता. पुतणी लक्ष्मी कडून थोडं पुस्तकी ज्ञानही शिकून घेतले. सारूने पक्का निश्चय केला, यानंतर सासू व पतींची सेवा करीत जीवन व्यतीत करायचे.
एक दिवस पतीचे पाय चेपत असताना, सारूने विचारले, माझ्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कोणता आहे? रामकृष्ण म्हणाले, जन्मदात्री माता व मंदिरातील मातेसमान मी तुम्हाला मानतो. सर्व स्त्रिया मला मातेसमान आहे. तुम्हाला त्याच रूपाने पाहतो. त्यांच्या कानात शब्द गुंजले… तुम्हा दोघांचे मिलन शिवशक्तीचे आहे. रामकृष्णांच्या इच्छेनुसार त्या रामकृष्णांच्या खोलीत झोपू लागल्या. पण माता पुत्र नात्याने. पती-पत्नी एकत्र राहूनही त्यांचा वैराग्य, ज्ञान, विवेक अक्षुण्ण राहतो, तोच खऱ्या अर्थाने ब्रह्मनिष्ठ! त्यांना समाधान होते की आपली पत्नीही आपल्याच विचाराची आहे. ती वैषयिक असतील तर मात्र कठीण झाले असते. त्यांना पूर्णपणे खात्री पटली, आपल्या पत्नीत देवत्व असून ती शारदामय आहे. आणि त्याच भावनेने प्रेरित होऊन त्यांनी पत्नीची षोडपचारे पूजन केले. चरणावर जपमाला ठेवून हात जोडले. सारदादेवीच्या हृदयात विश्व मातृत्वाची भावना जागृत झाली.
मध्यंतरी बरेच दिवस तब्येत ठीक नसल्यामुळे व वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे, सारदादेवी माहेरी होत्या. त्याचवेळी इकडे सासूचेही निधन झाले. रामकृष्णांची हेंडसाळ झाल्यामुळे व आईच्या मृत्यूमुळे त्यांची तब्येत फारच खालावली होती. त्यांना घशाचा रोग जडला. औषधोपचाराचाही फायदा झाला नाही. त्यांनी आपल्या कार्याची जबाबदारी सारदादेवी, नरेंद्र व इतर शिष्यांवर सोपवून इहलोकीचा निरोप घेतला.
माताजींना बुद्धी कौशल्य व दैवी शक्ती प्राप्त असल्यामुळे, त्यांनी पतीचे रामकृष्णांचे कार्य शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडले. त्याचबरोबर माहेरच्या लोकांचाही भार सांभाळला. अनेकांना दीक्षा दिल्या. योग्य मार्गदर्शन करून शिष्यांच्या मदतीने अनेक मठांची स्थापना केली. सर्वांना एका सूत्रात बांधून ठेवले. उच्च निच भेदभाव पाळला नाही. जाती धर्माचा विचार कधी मनात आला नाही. अगदी प्रत्येक शिष्याला पुत्रवत प्रेम दिले. शेवटी सर्वातून विरक्त झाल्या. आणि अनंतात विलीन झाल्या.
अशा या त्यागमन कर्तव्यनिष्ठ प्रेममयी माताजींना कोटी कोटी प्रणाम!!
क्रमशः
मिनाक्षी देशमुख.
!!! सारदामाता !!!
(सारदामाता रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी)
भाग – १.
रामचंद्र मुखर्जी आणि शामसुंदरीच्या पोटी जयरामवाटी या गावी सारदाचा जन्म झाला. जन्मा पासूनच सारदाचे वेगळेपण दिसून येत होते. कधी जास्त रडणे नाही, की आकांडतांडव नाही. लाडा कौतुकात सारदा सहा वर्षाची झाली. आणि तिच्या विवाहाचा प्रस्ताव कामारपुकुरच्या रामेश्वर मुखर्जींचा धाकटा भाऊ गदाधराचा आला. पण सारदारांच्या मातोश्री पतीला म्हणाल्या, आपली मुलगी केवळ सहा वर्षाची कोमल, नाजूक पोर २२-२३ वर्षाच्या घोडं नवऱ्याला द्यायला कसे तयार झालात?
रामचंद्रांचा धाकटा भाऊ नील माधव म्हणाले, दादा, या घरी आपली सारू देऊन फार मोठी चूक होईल. का? मुलांत काही ऐब, व्यसन आहे का? नाही. पण वेडसर आहे असं ऐकिवात आहे. नाचतो, गातो, कपाळ आपटतो, रडत रडत म्हणतो, माॅंऽऽ! दर्शन दिलं नाहीस तर, तुझ्यासमोर प्राणार्पण करीन…..
रामचंद्र पत्नीला म्हणाले, माधवाला सारुच्या जन्माची हकीकत सांग… ती सांगू लागली… भाऊजी, मी एकदा जयरामवाटीच्या पश्चिमेला असलेल्या मंदिरात गेले होते. तिथे असलेल्या झाडावरून पाच सहा वर्षाची लाल साडी नेसलेली एक सुंदर तेजस्वी मुलगी उतरून माझ्याजवळ येऊन म्हणाली, माऽऽ मी तुझ्या घरी येणार आहे. पुढचं काही आठवत नाही. काही स्त्रियांनी मला बेशुध्दावस्थेतचव घरी आणून पोहोचवले. आणि वर्षभरातच सारुचा जन्म झाला.
रामचंद्र म्हणाले माधव चिंता करू नकोस. विधिलिखित टळत नाही. हे सर्व प्रभू रामचंद्रांच्या इच्छेने घडत आहे, असा विचार करून मी सारुच्या लग्नाला होकार दिला.
सारूच्या विवाहाचा मुहूर्त जवळ आला तसा रामचंद्र बाबूंच्या घरी लगीनघाई सुरू झाली. परिस्थितीनुसार थोडीशी खरेदी, घरासमोर छोटासा मांडव टाकला. सामान सुमानाची बेगमी करणे अशी कामे होऊ लागली. सारुसाठी जरीची साडी व लाखेचं लाल कंगन आणले.
मुहूर्ताचा दिवस उगवला. दोन घटका आधी वराकडील कामारपुकुरची मंडळी आली. रामचंद्रबाबू आणि काही लोकांनी त्यांचे स्वागत केले.
लग्न घटिका भरली. शुभमंगल सावधानऽऽ अशा मंत्रघोषात मामाच्या सहाय्याने वधूने आपल्या चिमुकल्या हाताने गदाधराच्या गळ्यात वरमाला घातली. नवरदेव गदादरनेही सारुच्या गळ्यात हार घातला. ताशे सनईचे मधुर स्वर गुंजू लागले. कार्यक्रम आटोल्यावर भोजनाची तयारी सुरू झाली.
सारू भुकेने बेजार झाली होती. तसे तिने आईला सांगितले. पण आज उपवास करावा लागत असल्यामुळे तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. भुकेने व्याकूळ सारू मागच्या अंगणात जाऊन झोपल्याचे कळतात तिची आई आली. तिचे ते लोभस रुप, भांगात पतीने भरलेले सिंदूर, ती आकर्षक दिसत होती. पण उपासामुळे चेहरा मलूल झाला होता. आईचे ह्रदय गलबलून आले. सारुला कडेवर उचलून आणले व तिला आपल्या हाताने भरवले.
सर्व कार्यक्रम आटोपल्यावर वरात निघाली तेव्हा, लाडक्या लेकीच्या विरहाने रामचंद्रबाबू आणि शामसीसुंदरीला अश्रू आवरणे कठीण झाले.
नववधू सासरी आल्यावर, करण्यात येणारे सर्व संस्कार सासू चंद्रमणीने मोठ्या सुनेकडून करवून घेतले. सारदामणीला सगळे नवखे, अपरिचित वातावरण असल्यामुळे बावरून गेली. जेवणे झाल्यावर तिने अंथरुण जवळ केले. दिवसभराच्या थकव्याने लवकर झोपी गेली.
विवाह समयी सुनेच्या अंगावर काही दागिने असावे म्हणून,सासु चंद्रमणीने जमीनदार धर्मदास लाहाकडून दागिने आणून तिच्या अंगावर घातले होते. चटर्जींची सज्जन पणाची वागणं पाहून त्यांनीही मोठ्या मनाने चार दिवस घालायला दिले. परंतु चंद्रमणीला दागिने परत करायची घाई झाली होती. सूनेच्या अंगावरचे दागिने मागायचे कसे? ही समस्या पाहून गदादर म्हणाले, माते, चिंता करू नकोस. आत्ता देतो आणून, असे म्हणून सारु जिथे झोपली होती तिथे गेले आणि तिच्या अंगावरचे दागिने हलकेच काढले. आईच्या स्वाधीन करून म्हणाले, हे दागिने आत्ताच्या आता लाहाच्या स्वाधीन कर.
दिवस उजाडला. सवयीप्रमाणे सारदामणी उठली आणि अंगावर दागिने नसल्याचे पाहून ती घाबरली. आता सासू, नंदन, जाऊ आपल्याला रागवतील या भयाने ती रडू लागली. चंद्रमणीचे लक्ष होतेच. सारू जवळ जाऊन रडण्याचे कारण विचारल्यावर, सारु रडत रडत म्हणाली, माझ्या हातून दागिने हरवले. पण मी नाही हरवले. मी तर झोपेत होते. चंद्रमणीचे मन भरून आले. आवंढा गिळून स्वतःला सावरत, अबोध, निर्मल बालिका सुनेला समजावत म्हणाली, चिंता करू नकोस. रडणे बंद कर. कोणी तुला रागवणार नाही. बेटी, अलंकाराला महत्त्व द्यायचे नसते. माझा पुत्र गदाधर तुला असा अनमोल दागिना आणून देईल की, तसा राजाच्या राणीजवळही नसेल.
सासूच्या प्रेमळ शब्दांनी तिचे अश्रू थांबले. सासू म्हणाली, दात घासून ये. आल्यावर चंद्रमाणीने तिला गरम गरम दूध दिले. म्हणाली, शेजारच्या सुलु आणि आनंदीशी खेळ. त्या दोघी नात्याने तुझ्या ननंदा लागतात. मागच्या पडवीत तिघीही खेळायला गेल्यात. सुनेला बोडम म्हणतात. सारूची मोठी जाऊ रामेश्वरी सासूला म्हणाली, नव्या बोडमचे फारच लाड चाललेत. अग! ती लहान आहे. हे घर तिला परक वाटू नये म्हणून सांभाळतेय….
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख
!!! सारदामाता !!!
भाग – २.
दुपारची वेळ होती. गदादर ध्यानात मग्न होते. रामेश्वर आणि हृदयराम शेतातून भाजी घेऊन येत असताना त्यांना वाटेत जयरामवाटीहून येत असलेले सारदामणीचे काका, ईश्वरचंद्र भेटले. त्यांना घरी आणले. हातपाय धुण्यासाठी मागील दारी गेले. हात पाय धुतले तोच, पांढराशुभ्र पंचा घेऊन सस्मित सारु पुढे आली. तिच्याकडे लक्ष जाताच तिच्या अंगावर दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. ईश्वरचंद्राचा स्वभाव तापट होता. घरात येताच त्यांनी सारुच्या अंगावरचे दागिने कुठे आहेत म्हणून विचारले. जणूं काही ते दागिने माहेरचेच असल्याचा भाव त्यांच्या बोलण्यात होता. त्यांचा तो स्वर चंद्रमणीला बिलकुल आवडला नाही. तरी ती शांतपणे म्हणाली, “नव्या सुनेच्या अंगावर अलंकार असावेत म्हणून, मागून आणून घातले होते. ते ज्याचे त्याला नेऊन दिले.”
ईश्वरचंद्र म्हणाले, अशा घरी मला सारुला ठेवायचे नाही. चल गं. सारू आपलं कपड्याचं गाठोड घेऊन आली. सासू, जावेला नमस्कार केला. ती निघाली… दूर उभा असलेला दीर म्हणाला, वहिनी, लवकर येशील गंऽ! ईश्वरचंद्र म्हणाले, ती नाही येणार परत. आणि पुतणीचा हात धरून चालूही लागले. चंद्रमणी चिंतातूर होऊन म्हणाली, बिचारी पोर! रडवेली होउन मागे पाहत होती. काय होईल? काही कळेना .रामेश्वर म्हणाले, चिंता करू नकोस. तिचे पिता रामबाबू देवभक्त व शांत स्वभावाचे आहेत. ते बदलून टाकतील वातावरण. गदाधर आतल्या खोलीतून सर्व एकत होते. त्यांना मोठ्याने हसताना पाहून रागाने चंद्रमणीने कठोर स्वरात विचारले, “का हसतोस?”
“हसू नको तर काय करू?” गदाधर म्हणाले, “तुम्ही उगीच चिंता करताय. काहीही झाले तरी हा विवाह बदलू शकत नाही.” सर्वांच्या मनावरचे दडपण दूर झाले.
सारु आपल्या काका बरोबर जयरामवाटीत प्रवेशली तेव्हा रात्र झाली होती. लाडक्या लेकीला पाहून, शामादेवीला खूप आनंद झाला .कडेवर असलेल्या उमेशला खाली ठेवले. आणि घरातून पाण्याचा गडवा आणून लेकीच्या व दीराच्या पायावर ओतला. तेवढ्यात रामचंद्र बाहेरून आले. सारुला जवळ घेऊन म्हणाले, खूप दमली असशील. जेवण करून झोप.
ती आत गेल्यावर, ईश्वरचंद्राने थोरल्या बंधुला नमस्कार करून म्हणाले, “दादा, सारूचे सासर चांगलं नाही. त्यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत.”
“अरे पण काय झाले?”
“दादा विवाहात घातलेले दागिने त्यांनी काढून घेतलेले पाहून मला खूप राग आला. मी ताडताड बोलून न जेवता सारुला घेऊन निघून आलो.”
“ईश्वर, तुझी चूक झाली. अरे त्यांचीही परिस्थिती आपल्यासारखीच. सारू आपली लाडकी लेक असूनही एक अलंकार घालू शकलो नाही. नवी सून ओकीबोकी दिसू नये म्हणून उसने दागिने आणून घातले असतील. अरे तुझ्या भावजयीच्या वेळीही असंच करावं लागलं होतं. अरेऽ, विवाह हा दैवाधीन असतो. आपण न बोललेलं उचित ठरते.” ईश्वरचंद्राला भावाचे बोलले रुचले नाही. ते बाहेर निघून गेले.
ईश्वरचंद्र व नील माधव शेती करीत. आणि रामचंद्र कलकत्त्यात जाऊन पैसे कमावित असत. घरच्या दोन्ही स्त्रिया काटकसरीने घर चालवीत होत्या . पाच-सहा वर्षाची सारूसुद्धा इतरांबरोबर शेतात काम करीत असे.
दोन वर्षाचा काळ उलटला. एके दिवशी गदादर, रामेश्वर, हृदयराम गप्पा करीत बसले असता, चंद्रमणी म्हणाली, लग्नाला दोन वर्षे झाले. सारदेला आणायला हवे. ठीक आहे. मुहूर्त पाहून हृदयराम व गदाधर सारुला न्यायला येत असल्याचे पत्र पाठवले.
गावच्या वेशीवर आल्याचे कळताच, रामचंद्र त्यांच्या स्वागताला जाऊन मोठ्या आदराने घरी आणले. दोन दिवस पाहूणचार घेऊन सारदेसह ते कामारपुकुरकडे निघाले.
सारदादेवी या घरी आधी राहून गेल्यामुळे तिला तिथे परके वाटले नाही. तिला माहेरी काम करण्याची सवय असल्यामुळे, इथेही केर काढणे, देवपूजेची तयारी करणे, अंथरुण घालणं, भांडी घासणे वगैरे काम करू लागली. स्वतःची कामे कमी झाल्यामुळे मोठी जाऊ रामेश्वरी तिच्यावर खूश होती.
सारदाची लहान बहीण कादंबिनी सात वर्षाची झाली. दिसायला अतिशय सुरेख व रेखीव होती. कोकंडाच्या त्रिलोकनाथ चक्रवर्ती या श्रीमंत गृहस्थांकडून आपल्या अकरा वर्षीय पुत्रासाठी कादंबिणीला मागणी आली. रामचंद्र- शामसुंदरीला स्थळ पसंत पडले. पण लग्न कोकंडात करण्याची अट रामचंद्र बाबूंना पसंत नव्हती. शामसुंदरी म्हणाली, “अहोऽ! पण सर्व खर्च तेच करणार आहेत. आपल्याला तोशीस नाही. मग अट मान्य करायला काय हरकत आहे?”
लग्न ठरले आणि घरात गडबड सुरू झाली. मार्गशीषातल्या थंडीत लग्न काढल्यामुळे सर्वजण कुरकुरले. तेव्हा सारदा म्हणाली, तिन्ही ऋतू देवांनीच निर्माण केले. नाव ठेवून कसे चालेल? सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. रामबाबू तिला कुरवाळीत म्हणाले, ही माझी लेक सामान्य नाही. हिच्याकडून काहीतरी असामान्य कर्तृत्व घडण्याच्या निर्धारानेच परमेश्वराने हिला दुनियेत आणले. त्यांच्या बोलण्यावर विवाहास आलेली त्यांची बहीण विमल म्हणाली, “दादा, एवढ्याशा बोलण्यावर सारुला असामान्यत्व कसे देता? इंग्रजांचे राज्य आहे. असं काही बोलला तर लोक वेड्यात काढतील.”
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख.
!!! सारदामाता !!!
भाग – ३.
मोठी माणसं आपापल्या कामात गर्क होती. मुलं खेळण्यात दंग होती. खेळता खेळता प्रसन्नाने मधेच म्हटले, काजूच्या लग्नाला आशीर्वाद घेण्यासाठी आपण जगध्दात्रीच्या दर्शनाला जायचे का? सर्व मुलांचा होकार आल्यावर जाण्याच्या तयारीला लागले.
दुसऱ्या दिवशी सकाळीच सर्व मुलांबरोबर सारुही निघाली. मंदिर दिसताच तळीवर पाय धुवून सारु मंदिरात शिरली. आरती सुरू होती. मुलांना बाहेरच थांबण्यास सांगितले आणि ती डोळे मिटून गाभाऱ्याबाहेर बसली. तिची भाव समाधी इतकी एकाग्रतेने लागली की, तिला आजूबाजूचे भानच उरले नाही. त्या समाधीत एक मुलगी येऊन म्हणाली, “आता तू घरी जा.” थोड्या वेळाने सारुने डोळे उघडले. आजुबाजुला कोणीच दिसले नाही. कदाचित आपल्याला भास झाला असेल असे वाटून ती बाहेर आली. दर्शन झाल्यावर सर्व मुले घराच्या दिशेने निघाली.
दुसऱ्या दिवशी चक्रवर्तींना वरात आल्याचा निरोप गेला. त्यांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. दुपारची जेवण वगैरे झाले व संध्याकाळच्या वेळी मुलं भानू आत्याभोवती जमली. गप्पा गोष्टी सुरू असताना भानूआत्या सारूकडे पाहून म्हणाली, सारू, तू खरोखरच भाग्यवान आहेस. तुला इतका चांगला पती लाभला. त्यांच्यात रामकृष्ण समाविष्ट झाले. आज माझे बोलणे तुला खरे वाटणार नाही. परंतु भविष्यात ते “रामकृष्ण ” म्हणून ओळखले जातील. सारूच्या मुखावर आनंद उमटला. उत्सुकतेने विचारले, भानू आत्या, तुला कसे समजले?
अग! मी ध्यानमग्न झाले की माझे अस्तित्वच उरत नाही. असेच एकदा ध्यानात असताना मला समजले. भानूआत्या तुम्ही एकट्या राहता, भीती नाही वाटत? भयऽ? माझे माहेर शिहड. जयरामवाटीत “मानगर्विता घोष” नावाने सासरी प्रवेश केला. तारुण्यातच सगळी सोडून गेली. इथे रामचंद्र मुखर्जी आमचे उपाध्याय. त्यांच्या आधाराने एकटी राहून जप जाप्य, ध्यान धारणेत दिवस घालवते. रामचंद्र प्रभू सोबतीला असताना भीती कसली? मुलांनो, मनापासून भक्ती केली तर, परमेश्वर कोणत्याही रूपाने येऊन मदत करतो.
विवाह मुहूर्त रात्रीचा होता. तयार होऊन वधू कडील मंडळी लग्न मंडपात प्रवेशली. तिथला श्रीमंती थाटमाट पाहून, मुखर्जी मंडळी आवाक झाली. वाजंत्री वाजत होती. विवाह मुहूर्तावर वधूच्या मामाने वधू कादंबरीसह लग्नवेदीवर प्रवेश केला. सावधानऽऽ घोषणा होताच मामाच्या निर्देशानुसार कादंबरीने सुधाकरच्या गळ्यात वरमाला घातली. त्यांनीही तिचे अनुकरण केले. वाजंत्री कडाडली. आतषबाजी सुरू झाली.
कोकण्डातील त्रिलोकनाथ मोठे प्रस्थ होते. दुसऱ्या दिवशी रामचंद्र मुखर्जींनी जाण्याची अनुमती मागितल्यावर, त्रिलोकनाथ म्हणाले, बाबूमोशाय, मुलगी लहान आहे. वातावरण अपरिचित. ती बुजेल. दोन दिवस पाहुणचार करून तिलाही घेऊन जावे. त्यांचं अगत्य, बोलण्यातील नम्रता पाहून, रामचंद्र चांगलेच प्रभावित झाले. आपल्या मुलगी कादंबरीला चांगलं घर मिळाल्याने त्यांनी अंतरिक भक्तीने प्रभू रामचंद्राला नमस्कार केला.
दोन दिवसांनी रामचंद्रांनी त्रिलोकनाथ चटर्जींचा निरोप घेतला.
सतत दोन वर्षे पाऊस नसल्यामुळे जयरामवाटीतीत दुष्काळाने उग्र रुप धारण केले. गुरांना चारा नाही. माणसांना खायला अन्न नाही. लोक हवालदील झाले. शेतकरी गाय बैल कसायाला विकू लागले. मरण येत नाही म्हणून माणसं जगत होती. अशा परिस्थितीत थोडासा का होईना दिलासा देण्याचा हेतूने रामचंद्रांनी पेरणीसाठी ठेवलेला भात भुकेल्यांना द्यायचा विचार घरात प्रकट केला.
सारदा म्हणाली, “दादा, मी खिचडी शिजवू का?”
“जमेल तुला?”
“पातेले उचलायला तुम्हाला बोलावीन.”
सारुच्या मदतीला तिची आई श्यामसुंदरीही आली. लगेच बातमी पसरली. लोक उलट सुलट चर्चा करू लागले. याला असले उपद्व्याप करायला कोणी सांगितले? वगैरे… हे बोलणे रामचंद्राच्या पुतण्याने ऐकले व घरी येऊन चुलत्याला सांगितल्यावर, रामबाबू म्हणाले, आपण काही वाईट करत नाही. भुकेल्याला अन्न देणे आणि शरणार्थीला अभय देणे हा आपला धर्म आहे.
सारदा खिचडी शिजवत होती. रामबाबू चुल्यावरून भांडी उतरवत होते. श्याम सुंदरी भांड्यात खिचडी काढून देत होती. प्रसन्ना, रामशरण, सूर्या वाटप करीत होते. समाधान झालेल्या लोकांच्या चेहऱ्यावरचे तृप्त भाव पाहून रामबाबूंना आनंद वाटत होता.
दोन-तीन दिवसानंतर एक काळी कुट्ट मुलगी आली. अंगावर फाटके कपडे. बरेच दिवसात केसांना तेल न मिळाल्यामुळे केस करडे, राठ झाले होते. डोळ्यातील भूक तीव्रतेने जाणवत होती. ती धावतच गोठ्यात गेली. गाई साठी ठेवलेला कोंडा बका बका खाऊ लागली. तिला हाकलायला लागले तर, कळवळून सारदा म्हणाली, गरीब बिचारी. बऱ्याच दिवसांचा भुकेचा डोंब तिला शांत करू द्या. प्रसन्ना ती बाहेर आली की, तिला खिचडी दे. लक्ष ठेव. नाहीतर ती तशीच निघून जाईल.
सारदाने यौवनात पदार्पण केले. भानूआत्या म्हणाली, तू रामकृष्णांच्या घरी जावस. ऐकून सारु हसू लागली. ते पाहून भानूआत्या म्हणाली, मला माहित आहे, तुझ्या पतीचे नाव गदाधर आहे. त्यांना तोतापुरींचा साक्षात्कार झाल्यावर ते दक्षिणेश्वरला आले. गदाधरने त्यांना गुरु मानून भक्ती केली. तेच गदाधराला रामकृष्ण म्हणू लागले. यापुढे ते रामकृष्ण म्हणूनच ओळखले जातील.
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख.
!!! सारदामाता !!!
भाग – ४.
भानुआत्याने सारदेला पतीबद्दल माहिती सांगितल्यावर, सारदा त्यांना नमस्कारासाठी वाकली, तोच तिचे हात पकडून आत्या म्हणाली, नाही.. नाही.. पोरी, मीच तुला नमस्कार करायला हवा. काहीतरी काय बोलता आत्या? काही दिवसांनी माझ्या बोलण्याचा अर्थ तुला समजेल. सारु, तू नीलमाधव बरोबर कामारपुकुरला जा. तेच तुझं खरं घर आहे.
सारदा कामारपुकुरला आली त्यावेळी तिची सासू चंद्रमणी रामकृष्ण बरोबर दक्षिणेश्वरला होती. घरात जाऊला ती मदत करू लागली. तिला स्नानासाठी हलदार तलावावर जायचे होते. पण तलाव गावच्या सीमेवर असून मार्गात दाट झाडी होती. इतक्या दूर एकटीने कसे जायचे? या विचारात मागीलदारी येऊन उभी राहिली. तोच तिच्याच वयाच्या आठ मुली स्नानाला तलावाकडे जाताना दिसल्या. त्यांच्याशी परिचय नव्हता, तरी त्यांच्या सोबतीने जायचं ठरवून त्यांच्याबरोबर चालू लागली. त्यानंतर हा क्रम रोजचाच झाला .
एकदा तिने आपल्या जावेला विचारल्यावर ती कुत्सितपणे हसून म्हणाली, भाऊजींनी आपल्या पत्नीसाठी केलेली काही किमया असेल. पती बद्दल बोललेले सारुला आवडले नाही.
काही दिवसांनी तिला माहेरी नेण्यासाठी नीलमाधव आले. तिने आपलं गाठोडे घेतले. दीर जाऊला नमस्कार केला आणि काकांबरोबर निघाली. चालता चालता तिने त्या मुलींबद्दल सविस्तर सांगून विचारले, काका, त्या मुली कोण असतील? त्या कालीमातेच्या अष्टनायिका असाव्यात. कारण त्या कोणालाच दिसल्या नाही. परंतु त्या माझ्याबरोबर का येत होत्या? सारू, मला नाही सांगता येणार. घरी गेल्यावर तू दादांनाच विचार.
विवाहानंतर रामकृष्णांनी तोतापुरीच्या सूचनेनुसार संन्यास घेतला होता. रामकृष्णांना सर्वत्र जगन्नाथ दिसत होते. ते गात, नाचत, कधी मोठ्याने हसत तर कधी रडत असत. दक्षिणेश्वरला कोणी अन्नदान केले की, जेवलेल्यांच्या पात्रावळी स्वतः उचलत असत. त्यांना अंगावरच्या वस्त्राचीही शुद्ध नव्हती. नौबतखान्यापासून जवळच वड, पिंपळ, बेल, आवळी व अशोक अशी पाच झाडे होती. त्या पंचवटीत जाऊन रामकृष्ण ध्यानाला बसत. लोकांनी त्यांना वेडा ठरवलं होते. जयरामवाटीतील लोक विचारीत, रामबाबू एवढी सोन्यासारखी पोर त्या वेड्याच्या गळ्यात का बांधली? जन्मभराच्या दुःखात का लोटलीस?
उत्तर रामबाबूजवळ नव्हते. शामादेवी रात्रंदिवस मुलीचे दुःख पाहून रडत असे. सारदा सगळ पाहात, ऐकत होती. या सात आठ वर्षात पतीने आपली साधी चौकशी केली नाही. ते पूर्णतः आपल्याला विसरले. आपले जीवन असंच रसहीन, सुखविरहित जाईल याचे तिला दुःख होई. पण दुःख आपल्या चेहऱ्यावर उमटले तर माता-पिता कष्टी होईल म्हणून ती आपला चेहरा निर्विकार ठेवी. बारा वर्षाची कठोर तपश्चर्या संपवून रामकृष्णांना सिद्धी प्राप्त झाली. जगाचं कल्याण हा एकच विचार त्यांच्या मनात रात्रंदिवस होता. ते ब्रम्हानंदात लीन असल्यामुळे त्यांना भूक तहान समजत नव्हते. परिणामी त्यांना पोटदुखीची व्याधी जडली. असह्य वेदनेने ते तडफडू लागले. शरीर फक्त हाडाचा सापळा राहिला. डोळे खोल गेले होते. श्वास चालू होता म्हणून ते जिवंत आहे समजायचे. त्यांची अवस्था पाहून मयूर बाबू घाबरले. तिथे असलेली गुरु योगेश्वरी ब्राह्मणी म्हणाली, मयूर बाबू, रामकृष्णांना कामारपुकुरला पाठवावं. तिथेच त्यांना आराम पडेल.
चंद्रमणीने वैद्याला विचारून जाण्याची तयारी केली. सात वर्षानंतर रामकृष्ण कामारपुकुरला आले. त्यांच्यासोबत योगेश्वरी ब्राह्मणी, हृदयराम आणि चंद्रमणी होते. घरी आल्यामुळे चंद्रमणीला खूप आनंद झाला. आपला पुत्र वेडा, बावळा गदाधर नसून ते आता “स्वामी रामकृष्ण” होते. पूर्वी हेटाळणी करणारे निंदक, नातेवाईक, प्रतिष्ठित लोक त्यांना भेटायला येऊ लागले. सर्वांना सारदामणीची कमतरता तीव्रतेने भासत होती. रामेश्वरने आईला विचारले, माॅं, सारदेला आणायला जाऊ का? काही गरज नाही. इथे आल्या आल्याच गदाईने सारदेला येण्याबद्दल सांगावा धाडला आहे.
इतक्या वर्षानंतर आलेल्या पतीच्या निरोपाने सारदा प्रमुदित झाली. माता पित्यानाही आनंद झाला. वडील रामचंद्र म्हणाले, बेटी, तेच तुझं खरं घर आहे. माधव देईल तुला पोहोचवून. नाही दादा, मी एकटीच जाईन. अगं मार्ग निर्मनुष्य. दाट झाडी. जनावरांच भय. असं असताना….
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच सारु मार्गस्थ झाली. वाटेत तिला एक स्त्री भेटली. ती स्त्री माहेरी कामारपुकुरला जात होती. तिच्या सोबतीने सारदा सासरी आली तेव्हा दिवे लागणची वेळ झाली होती.
तिने स्नान वगैरे करून, आधी देवाला नमस्कार केला. नंतर घरातल्या मोठ्या मंडळींना नमस्कार केला. पती समोर येऊन उभी राहताच, रामकृष्णांनी विचारले, एकट्याच आलात? होय! भय वाटलं नाही? नाही. बरं! खूप थकला असाल. आराम करा. उद्यापासून ही ब्राह्मणी सांगेल ते ऐका. होय!
पतीच्या सरळ शांत बोलण्यामुळे, सारदेच्या मनातील किल्मिष निघून गेले. दुसऱ्या दिवसापासून ती पतीच्या सेवेत मग्न झाली. गेल्या सात वर्षात त्यांनी आपली एकदाही चौकशी केली नव्हती. पण आता ती त्यांना जवळ असावीशी वाटत होते. मात्र सामान्य माणसांचे भाव तिथे नव्हते. तिचं जीवन अधिक सुंदर, आदर्श व्हावं म्हणून ते झटत होते. ती परिपूर्ण असावी म्हणून व्यावसायिक ज्ञानही तिला देऊ लागले.
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख.
!!! सारदामाता !!!
भाग – ५.
संध्याकाळच्या वेळी, सारदा पतीच्या खोलीतील समई लावण्यास गेली असता, वाता कशा ठेवाव्यात हे त्यांनी सप्रयोग करून दाखवले. ती नमस्कार करून तिथेच बसली. दोघे बोलत असतानाच, चंद्रमणी आली. सारदेने त्यांना नमस्कार केल्यावर आशीर्वाद देत म्हणाली पुत्रवती भव! रामकृष्ण हसले. मातेने विचारले का हसलास? अग माॅं, त्यांना अत्यंत बुद्धिमान सुंदर कन्या आणि पुत्र आहेत. आणखी त्यात भर कशाला?
दोघीही बावरल्या. म्हणाल्या, समजले नाही. अग माॅं, कालीमातेचे भक्त आणि या जगावर प्रेम करणारे सर्व आमचे पुत्र आहेत. हि सारदादेवी दुनियाला ज्ञान देण्यासाठी आली आहे. चंद्रमणीच्या लक्षात आले, आपला पुत्र आणि सून सामान्य नसून अद्वितीय आहेत.
सारदादेवीचा बराचसा वेळ पती समवेत जाऊ लागला. तिथे स्त्री – पुरुष भाव नसून, होती दोन आत्म्यांची एकरूपता. एकदा ती कपडे वाळत घालत असताना, एकही चुनी न पडता कपडे कसे वाळत घालावे हे त्यांनी सांगितले. अशा अनेक छोट्या मोठ्या बाबतीत ते सारदेला तयार करीत होते.
एकदा लक्ष्मी, सारदेची पुतणी, पुस्तक वाचत होती. तिच्याजवळ बसून सारदा वाचण्याचा प्रयत्न करीत असताना, तिथे हृदयरामने येऊन विचारले, काय वाचता आहात? पुस्तक. परंतु स्त्रियांनी वाचन करायचे नसते. सारदाने आश्चर्याने विचारले, का? कारण, पुढे कादंबऱ्या, नाटक वाचून स्रिया बिघडतात. तिच्या हातातील पुस्तक ओढून घेऊन तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी गुप्तपणे सारदाने एक आण्याचे पुस्तक आणवले. लक्ष्मीला म्हणाली, तू शाळेत जे शिकतेस ते मला शिकवशील? आपण पडवीत न्हाणी पाशी बसू. तिथे कोणी येणार नाही.
रामकृष्ण पत्नीशी संवाद करताना भैरवी ब्राह्मणीने सारदेकडे बघितले. ती गुलाबी रंगाची साडी नेसली होती. कपाळावरचं लाल भडक कुंकू, टपोऱ्या डोळ्यात संयम आणि प्रेमाचा अथांग सागर पाहून, ही इतरांपेक्षा खूपच वेगळी आहे हे लक्षात येताच ती हसली.
दुपारची घरातील कामे आटपून, सारदा काही कामे करत बसली असताना, लक्ष्मी येऊन तिला म्हणाली, जगात उद्भवणाऱ्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी अलिप्तता आणि भक्तीचा मार्ग श्रेष्ठ आहे असे ठाकूर रामकृष्ण वारंवार सांगतात. मला समजले नाही. तुम्ही सांगाल ? रामकृष्णांनी ते ऐकले. त्यांनी दोघींना बोलावले. म्हणाले उदाहरणार्थ सांगतो… या तुझ्या काकीच्या आईला पुष्कळ मुलं झाली. अत्यंत काटकसर करून त्यांना वाढविले. अतिशय कष्ट केले. त्यातली काही मुलं दगावली. त्यांना दुःखाशिवाय काय मिळाले? ह्या तुझ्या काकीला तसलं दुःख होऊ नये म्हणून, आपलं मन परमेश्वराच्या नामस्मरणात गुंतवले की, वासना आपल्याला स्पर्शही करत नाही.
रात्रीची सर्व आवरावर झाल्यावर सारदा लक्ष्मीपाशी आली व तिने दिलेले पुस्तक वाचू लागली. हा नित्याचाच क्रम ठरला.
सकाळी शारदा घर सारवत असताना रामकृष्ण आत येत गमतीने म्हणाले, मुलाच्या वाढदिवसाला तुम्ही सजता, परंतु त्याचा मृत्यू झाला तर दुःखाने तुमची तडफड होते. म्हणून…. सारदाने हलक्या आवाजात प्रश्न केला… सगळेच मृत्यूच्या खाईत पडतील का?
हे परमेश्वरा, ही साधी, अबोध असेल असे वाटले. पण हिच्याजवळ बरंच ज्ञान आहे तर!
एकदा भैरवी ब्राह्मणीने सर्वांसाठी स्वयंपाक केला. सर्वांची जेवण झाल्यावर ह्या तिघी जेवायला बसल्या. उत्सुकतेने भैरवीने विचारले, रामेश्वरी, भाजी कशी झाली? तशी बरी आहे, पण मिरची जरा जास्तच झाली. भैरवीने सारदाला विचारल्यावर, शारदा म्हणाली, आवडली. छान झाली.
रामेश्वरीने विचारले, सारदा, भाजी तिखट झाली होती ना? मग तू खोटं का बोललीस? रागावू नका. पण आपल्या सत्य बोलण्याने कोणी दुखावत असेल तर, थोडं खोटं बोलून समोरच्याला खुश करावं.
कामारपुकुरला असतानाही रामकृष्ण समाधी मग्न होत असत. कधी कधी त्यांचे मन अनंतात बुडून जात असे. कधीकधी ते त्यांच्याजवळ असणाऱ्या मंडळीशी हास्यविनोद करीत. साध्यासुध्या इच्छा जागृत करून स्वतःला ते द्वैतभूमीवर आणत. त्यासाठी ते आपल्या भावजयीला वेगवेगळ्या भाज्या करायला सांगत आणि तीही त्यांचा हट्ट पुरवीत असे.
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख.



















