आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१ एप्रिल, दिवस ९१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा, ओवी २२६ ते २५० सार्थ तुकाराम गाथा अभंग १०८१ ते १०९२
“१ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 1 Apirl
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १०८१ ते १०९२ चे पारायण आपण करणार आहोत.
१ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा, ओवी २२६ ते २५०,
226-8
तरि प्रयाणाचिया अवसरे । वात श्लेष्मा । तेणे अंतःकरणी आंधारे । कोंदले ठाके ॥226॥
मरणसमयी कफवातादि दोषांच्या भराने अंतःकरणात अंधार होऊन जातो,
227-8
सर्वेंद्रिया लांकुड पडे । स्मृती भ्रमामाजी बुडे । मन होय वेडे । कोंडे प्राण ॥227॥
सर्व इंद्रियांची गति कुंठित होते; स्मृतीला भ्रम उत्पन्न होतो; मन वेडावून प्राण घोटाळतो
228-8
अग्नीचे अग्निपण जाये । मग तो धूमचि अवघा होये । तेणे चेतना गिंवसिली ठाये । शरीरीची ॥228॥
अग्नीचे अग्निपण जाते व त्याचा चोहोंकडे धूरच होतो, त्यामुळे शरीरांतील ज्ञान दिपून जाते.
229-8
जैसे चंद्राआड आभाळ । सदट दाटे सजळ । मग गडद ना उजाळ । ऐसे झांवळे होये ॥229॥
ज्याप्रमाणे चंद्राच्या आड दाट व पाण्याने भरलेले ढग आल्यावर धड अंधार ना प्रकाश अशी झांजड पडते,
230-8
का मरे ना सावध । ऐसे जीवितासि पडे स्तब्ध । आयुष्य मरणाची मर्याद- । वेळु ठाकी ॥230॥
त्याचप्रमाणे, तो मरतही नाही व सावधही नसतो. अशा रीतीने शरीर नुसते पडलेले असते, व आयुष्य हे मरणाची वेळ पहात असते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
231-8
ऐसी मनबुद्धिकरणी । सभोवती धूमाकुळाची कोंडणी । तेथ जन्मे जोडलिये वाहणी । युगचि बुडे ॥231॥
अशा प्रकारे बुद्धि व इंद्रिये यांच्या सभोवती धूर अतिशय कोंडतो, त्या वेळेस जन्मभर मिळविलेले सर्व लाभ नाश पावतात.
232-8
हा गा हातीचे जे वेळी जाये । ते वेळी आणिका लाभाची गोठी के आहे । म्हणऊनि प्रयाणी तव होये । येतुली दशा ॥232॥
हे पहा, हातचे गेल्यावर मग पुनः लाभ होण्याची गोष्ट कशाला पाहिजे ? म्हणून मरणसमयी अशी दशा प्राप्त होते.
233-8
ऐसी देहाआंतु स्थिति । बाहेरि कृष्णपक्षु वरि राती । आणि सा मासही वोडवती । दक्षिणायन ॥233॥
याप्रमाणे देहातील आंतली स्थिती असुन बाहेर कृष्णपक्षाचा पंधरवडा असतो, व त्यात रात्र आणि दक्षिणायनांतील सहा महिन्यांपैकी एक महिना ही प्राप्त होतात.
234-8
इये पुनरावृतीची घराणी । आघवी एकवटती जयाचिया प्रयाणी । तो स्वरूपसिद्धीची काहाणी । कैसेनि आइके ॥234॥
हे सर्व जन्ममरणाच्या फेऱ्यात पाडणारे योग ज्यांच्या मरणसमयी एके ठिकाणी येतात, त्यांच्या कानी मोक्षप्राप्तीची गोष्ट कोठून पडणार ?
235-8
ऐसा जयाचा देह पडे । तया योगी म्हणोनि चंद्रवरी जाणे घडे । मग तेथूनि मागुता बहुडे । संसारा ये ॥235॥
अशा वेळेवर ज्यांचे देहावसान होते, त्याला तो योगी असल्यामुळे चंद्रलोकापर्यंत जाता येते. मग तेथुन परतून तो फिरून जन्ममरणाच्या फेऱ्यात पडतो.
236-8
आम्ही अकाळ जो पांडवा । म्हणितला तो हा जाणावा । आणि हाचि धूम्रमार्ग गावा । पुनरावृत्तीचिया ॥236॥
हे पांडवा, आम्ही मरणास अयोग्य काळ म्हणून जो म्हटला, तो हाच असे समज, जन्ममरणाच्या गावास नेणारा धूम्रमार्ग हाच;
237-8
येर तो अर्चिरादि मार्गु । तो वसता आणि असलगु । साविया स्वस्थु चांगु । निवृतीवरी ॥237॥
याच्याशिवीय दुसरा जो अर्चिरादि मार्ग, तो भरवस्तीचा, सोपा, अति उत्तम व अगदी सुलभ असून मोक्षापर्यत गेलेला आहे.
शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते ।
एकया यात्यनावृत्तिमन्यया वर्तते पुनः ॥8. 26॥
238-8
ऐसिया अनादि या दोन्ही वाटा । एकी उजू एकी अव्हांटा । म्हणवूनि बुद्धिपूर्वक सुभटा । दाविलिया तुज ॥238॥
असे हे दोन मार्ग -एक सरळ आणि दुसरा वाकडा – अनादि कालापासून चालत आलेले आहेत. म्हणून, हे महावीरा, ते तुला बुद्धिपुरस्सर दाखविले.
239-8
का जे मार्गामार्ग देखावे । साच लटिके वोळखावे । हिताहित जाणावे । हिताचिलागी ॥239॥
का की, त्या मार्गापैकी चांगला कोणता व वाईट कोणता हे तुला दिसावे; आणि खरे खोटे ओळखून, आपले हित साधून घेण्याकरिता (त्वां) हित व अहित यांचाही विचार करावा.
240-8
पाहे पा नाव देखता बरवी । कोणी आड घाली काय अथावी । का सुपंथ जाणोनिया अडवी । रिगवत असे ॥240॥
हे पहा, उत्तम अशी नाव पाहिल्यावरही अथांग डोहांत कोणी उडी घालील काय ? किंवा राजमार्ग टाकून आडमार्गाला जाईल काय ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
241-8
जो विष अमृत वोळखे । तो अमृत काय सांडू शके । तेवि जो उजू वाट देखे । तो अव्हांटा न वचे ॥241॥
जो विष आणि अमृत ही दोन्ही ओळखतो, तो अमृत टाकील का ? त्याचप्रमाणे, जो सरळ मार्ग पाहतो, तो आडमार्गाला जाणार नाही.
242-8
म्हणोनि फुडे । पारखावे खरे कुडे । पारखिले तरे न पडे । अवसरे कही ॥242॥
म्हणून प्रथम खऱ्या -खोट्याची पारख करावी. ती पारख झाली म्हणजे मग तो संकटात पडत नाही
243-8
एऱ्हवी देहाती थोर विषम । या मार्गाचे आहे संभ्रम । जन्मे अभ्यासिलियाचे हन काम । जाईल वाया ॥243॥
बाकी मरण समयी ह्या मार्गाची प्राप्ति होण्याला मोठमोठ्या संकटांची मोठी भीतिच आहे. अंतकाली याची प्राप्ति व्हावी म्हणून जन्मभर जरी अभ्यास केला तरी ते सर्व व्यर्थ होते.
244-8
जरी अर्चिरादि मार्गु चुकलिया । अवचटे धूम्रपंथे पडिलिया । तरी संसारपांती जुंतलिया । भंवतचि असावे ॥244॥
जर अर्चिरादि मार्ग चुकला आणि तो योगी अकस्मात् धूम्रमार्गात पडला, तर जन्ममरणाच्या फेऱ्यात गुंतून फिरत असतो.
245-8
हे सायास देखोनि मोठे । आता कैसेनि पा एकवेळ फिटे । म्हणोनि योगमार्गु गोमटे । शोधिले दोन्ही ॥245॥
अशी ही मोठाली संकटे पाहून, ती कशाने दुर होतील म्हणून, दोन्ही योगमार्गाचे चांगले स्पष्टीकरण केले.
246-8
तव एके बह्मत्वा जाइजे । आणि एके पुनरावृत्ते येइजे । परि दैवगत्या जो लाहिजे । देहाती जेणे ॥246॥
तेंव्हा, एका मार्गाने योगी मोक्षाला जातो, आणि दुसऱ्या मार्गाने जन्ममरणाच्या फेऱ्यात पडतो, परंतु देहावसानाच्या वेळेस दैवगतीने ज्याला जो प्राप्त होईल तो खरा.
नैते सृती पार्थ जानन् योगी मुह्याति कश्चने ।
तस्मात्सर्वेषु कालेषु योगसुक्तो भवार्जुन ॥8. 27॥
247-8
ते वेळी म्हणितले हे नव्हे । वाया अवचटे काय पावे । देह त्यजुनि वस्तु होआवे । मार्गेचि की ॥247॥
अकस्मात् कोणत्या वेळेस काय प्राप्त होईल याचा काही नेम आहे ? म्हणून ही गोष्ट राहू दे. तर देहाती ब्रह्मप्राप्ती करून घेण्यास मार्गच कशाला हवा ?
248-8
तरी आता देह असो अथवा जावो । आम्ही तो केवळ वस्तूचि आहो । का जे दोरी सर्पत्व वावो । दोराचिकडुनी ॥248॥
तर देह मग राहो अथवा जावो, आम्ही केवळ ब्रह्मच आहो असे ज्ञानी समजतात. कारण, दोरीवरील सर्पाचा भास जसा दोरीचे सत्यत्व भासल्यावर दोरीचे ज्ञानासह व्यर्थ होतो;
249-8
मज तरंगपण असे की नसे । ऐसे हे उदकासी कही प्रतिभासे । ते भलतेव्हा जैसे तैसे । उदकचि की ॥249॥
आपल्यावर लाटा येतात किंवा नाहीतशा होतात, याचा पाण्याला कधी भास होतो काय ? कारण ते केव्हांही पाहिजे तरी पाणीच्या पाणीच कायम असते,
250-8
तरंगाकारे न जन्मेचि । ना तरंगलोपे न निमेचि । ते विदेही जे देहेचि । वस्तु जाहले ॥250॥
ते पाणी लाटा उत्पन्न झाल्यामुळे जन्म पावत नाही, किंवा लाटा नाहीतशा झाल्यावर ते नाश पावत नाही, त्याप्रमाणे, देहांत राहून जे देहासुद्धा ब्रह्म झाले,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ९१ वा, १, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १०८१ ते १०९२
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
येथे सार्थ अभंग गाथ्यातील अभंग टाकावे.
अभंग – १०८१
आता मागतो ते ऐके नारायणा । भावपूर्वक मनापासूनिया ॥१॥
असो दे मोकळी जिव्हा जरि गाइल गुण । नाही तरी खिळुन टाकी परती ॥धृपद॥
मातेचिया परी देखती परनारी । ठेवी नेत्र तरी नाही तरी नको ॥२॥
तरी बरे कंटाळा करिती निंदास्तुतीचा । नाही तरि कानांचा ही देख प्रयत्न ॥३॥
सकळ इंद्रियांचा निग्रह करूनि एक । राखवी पृथक तोडोनि भ्रम ॥४॥
तुकयाबंधु म्हणे तेचि वाट प्राणा । पडता नारायणा विसर तुझा ॥५॥
अर्थ
हे नारायणा आता मी तुला जे काही मागत आहे ते तू भावपूर्वक व मनापासून ऐक. माझी जिव्हा तुझे गुणगान गात असेल तर तिला मोकळि ठेव जर माझ्या जीव्हेने तुझे गुणगान गायले नाही तर तिला खिळवून ठेव नाही तर मुकी कर. आणि परनारी ला जर माझ्या डोळ्यांनी मातेसमान पाहिले तरच त्यांना माझ्याजवळ ठेव नाही तर त्या डोळ्यांची देखील मला गरज नाही. एवढे तरी बरे आहे की माझ्या कानांना कोणाचीही निंदा किंवा स्तुती ऐकवत नाही त्याचा मला कंटाळा आहे आणि जर त्यांना कोणाची निंदा किंवा स्तुती ऐकायची असेल तर ते कान बहिरे करून टाक. माझ्या सर्व इंद्रियांचा निग्रह कर व त्यांचा भ्रम तोडून टाका आणि माझे सर्व इंद्रिय तुझ्यापाशी राख. तुकया बंधू कान्होबा म्हणतात की हे नारायणा मला जर तुझा विसर पडला तर माझे प्राणही मला नको त्यांना तू वाटे लाव म्हणजे ठेवू नको.
अभंग – १०८२
नमस्कारी भूते विसरोनि याती । तेणे आत्मिस्थती जाणीतली ॥१॥
परउपकारी वेचियेल्या शक्ती । तेणे आत्मिस्थती जाणीतली ॥धृपद॥
द्वैतांद्वैतभाव नाही जया चित्ती । तेणे आत्मिस्थती जाणीतली ॥२॥
जयाचिये वाचे नये निंदास्तुती । तेणे आत्मिस्थती जाणीतली ॥३॥
उचित अनुचित जाणे धर्मनीती । दृढ भाव भक्ती मानव तो ॥४॥
तुकयाबंधु म्हणे वरकड ते येर । संसाराचे खर भारवाही ॥५॥
अर्थ
आपली जात विसरून जो सर्व प्राणिमात्रांना नमस्कार करतो त्यांनीच आपली आत्मस्थिती जाणली असे समजावे. जो परोपकार करण्यासाठी आपली शक्ती पणाला लावतो त्यानेच आपली आत्मस्थिती जाणली आहे असे समजावे. ज्याच्या चित्ता मध्ये द्वैत आणि अद्वैत हा भावच नाही त्याने आपली आत्मस्थिती झाली आहे. ज्याच्या वाणीमध्ये कोणाविषयी ही निंदा किंवा स्तुती येत नाही त्याने आपली आत्मस्थिती जाणली आहे. ज्याला उचित व अनुचित धर्मनीती समजते आणि देवाविषयी भक्तिभाव ज्याच्या चित्ता मध्ये आहे त्याने मानव जन्माला येऊन आपल्या जन्माचे सार्थक केले असे समजावे. तुकया बंधू कान्होबा म्हणतात या व्यतीरिक्त जर कोणी वागत असेल तर तो व्यक्ती संसाराचा भार वाहणारा गाढवच आहे असे समजावे.
अभंग – १०८३
चवदा भुवने लोक तिन्ही दाढे जो कवळी । संपुष्ट तो संबळीमध्ये देखो ॥१॥
उत्पत्तीसंहारकरिता जो पाळण । तो नंदा नंदन म्हणवीतसे ॥धृपद॥
असुर तोडरी दैत्यांचा काळ । जाला द्वारपाळ बळीचा तो ॥२॥
लक्षुमीचा स्वामी क्षीराच्या सागरा । उच्छिष्ट कवळा पसरी मुख ॥३॥
तुकयाबंधु म्हणे चतुरांचा रावो । भावे तो पाहा हो केला वेडा ॥४॥
अर्थ
ज्या देवाने आपल्या दाढी मध्ये चवदा भुवने आणि तीनही लोकाला कवळले आहे तो देव भक्तांच्या भक्ती करता अगदी छोट्या म्हणजे संपुटा मध्ये राहतो. जो देव या सृष्टीचा उत्पन्न संहार आणि पालन कर्ता आहे तोच देव मी नंदाचा बाळ आहे असे म्हणून घेतो. ज्या देवाने सर्व दैत्यांचा संहार करून त्यांची पैजन करुन पायात बांधले तोच देव बळीराजाच्या भक्ती करता त्याच्या दारात त्याच्या दाराचा द्वारपाल झाला. लक्ष्मीचा पती क्षीरसागरा मध्ये निवास करतो तोच नारायण आपल्या गोकुळातील भक्तांचे उच्चिष्ट खाण्याकरता मुख्य पसरतो. तुकया बंधू कान्होबा म्हणतात हा देव चतुरांचाही चतुर आहे पण भक्तांच्या भक्ती करता तो कसा वेडा झाला आहे ते तुम्ही पहा.
अभंग – १०८४
कोण या पुरुषार्थाची गति । आणियेला हातोहाती ।
जाहाज पृथ्वीपति । केली ख्याती अद्भुत ॥१॥
भला पुंडलिका भला । महिमा नव जाय वर्णिला ।
दगा देउनि अवघियांला । साठविले अविनाश ॥धृपद॥
केले एके घरी केणे । भरली सदोदित दुकाने ।
दुमदुमली सुखाने । हे भाग्याची पंढरी ॥२॥
तुकयाबंधु म्हणे किल्या । संताचे हाती दिल्या ।
आंगावेगळे आपुल्या । टाकुनि जाला मेहेमान ॥३॥
अर्थ
या पुंडलिकाची महती किती आहे पहा जो ब्रम्हांडनायक परमात्मा आहे त्याला त्याने आपल्या हातोहात येथे आणले असून त्याला आपलेसे केले. हा पृथ्वी पती त्याने आपला केला अशी अद्भुत ख्याती या पुंडलिकाची आहे पुंडलिका तु धन्य आहे तुझे हे सुकृत्य नावाजाण्यासारखे आहे. तू सर्व विकारांना दगा देऊन अविनाशी पांडुरंग आपआपल्या हृदयात साठविला आहे. तुझा हा महिमा कसा वर्णन करू पांडुरंग रुपी मला तू एका घरी आणलास पण त्यामुळे याठिकाणी परमार्थाची मोठे मोठे दुकाने लागले आहे त्यामुळे ही पंढरी गजबजून गेली आहे व त्यामुळे सर्वत्र सुख आले आहे. आणि त्यामुळे ही पंढरी भाग्याची आहे. तुकया बंधू कान्होबा म्हणतात ज्या दुकानांमध्ये हा पांडुरंग रुपी मला भरलेला आहे त्या दुकानाच्या किल्ल्या आम्ही संतांच्या स्वाधीन केल्या आणि हे पुंडलिका तू आपल्या देहापेक्षा वेगळे टाकून त्यापासून वेगळा झाला हे तुझे मोठे महात्म्य आहे.
अभंग – १०८५
केली हर्णाळा अंघोळी । येऊनी बैसलो राउळी ॥१॥
आजिचे जाले भोजन । रामकृष्ण नारायण ॥धृ॥
तुकयाबंधू म्हणे नास । नाही कल्पांती जयास ॥२॥
अर्थ
मी वाहत्या पाण्यामध्ये स्नान करून देवळामध्ये येऊन बसलो आहे. आज माझे जेवण झाले ते म्हणजे रामकृष्ण नारायण यांनीच. तुकया बंधू कान्होबा म्हणतात की त्यामुळे माझा कल्पांतातही नास होणे अशक्य आहे.
अभंग – १०८६
तुजलागी माझा जीव झाला पिसा । अवलोकितो दिशा पांडुरंगा ॥१॥
सांडिला व्यवहार माया लोकाचार । छंद निरंतर हाचि मनी ॥धृपद॥
आइकिले कानी ते रूप लोचन । देखावया सीण करिताति ॥२॥
प्राण हा विकळ होय कासावीस । जीवनाविण मत्स्य तयापरी ॥३॥
तुका म्हणे आता कोणता उपाव । करू तुझे पाव आतुडे तो ॥४॥
अर्थ
हे पांडुरंगा तुझ्या भेटी करता माझा जीव वेडापिसा झाला आहे. मी दहाही दिशा तुलाच पाहत फिरतोय. देवा मी तुझ्या भेटीसाठी सर्व माया, मोह, व्यवहार, लोकाचार सोडला आहे आणि सतत तुझ्या भेटीचा छंद मी धरला आहे. देवा तुझ्या स्वरूपाचे वर्णन मी संतांच्या मुखातून ऐकले आहे आणि ते पाहण्याकरिता मी सिण करतोय म्हणजे तळमळ करत आहे. पाण्यावाचून मासा जसा तळमळ करतो ना देवा तसाच माझा जीव तुझ्या भेटी करता कासावीस होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी आता असा कोणता उपाय करू की जेणेकरून मला तुझ्या पायाची प्राप्त होईल ते तूच मला सांग.
अभंग – १०८७
कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल । जरी ठावा असेल तुम्हा कोणा ॥१॥
लागतसे पाया येतो लोटांगणी । मात तरी कोणी सांगा याची ॥धृपद॥
गुण रूप याचे वाणिती या संता । मज क्षेम देता सुख वाटे ॥२॥
सर्वस्वे हा जीव ठेवीन चरणी । पांडुरंग कोणी दावी तया ॥३॥
तुका म्हणे गाईवत्सा तडातोडी । तैसी जाते घडी एकी मज ॥४॥
अर्थ
हे लोकांनो हा विठ्ठल कोणत्या गावाला आहे हे तुम्हाला माहीत आहे का आणि तुम्हाला जर माहित आहे तर तुम्ही मला कृपा करून सांगा मी तुमच्या पाया पडतो वाटेल तर लोटांगण घालतो पण मला त्याची वार्ताह कुणीतरी सांगा. या विठ्ठलाचे गुण व रूप जे कोणी संत करतात त्यांना आलिंगन देताना मला फार सुख वाटते. मी माझा सर्व जीवभाव त्यांच्या चरणावर अर्पण करीन जे मला हा पांडुरंग दाखवितील. तुकाराम महाराज म्हणतात की जसे गाय आणि वासरू यांच्यात ताटातूट केल्यानंतर त्यांना प्रत्यक क्षण दुःखाचा जातो त्याप्रमाणे मला या विठ्ठला वाचून प्रत्येक क्षण दुःखाचा जात आहे.
अभंग – १०८८
विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा ॥१॥
विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारू । उतरील पारु भवनदीचा ॥धृपद॥
विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता । विठ्ठल चुलता बहिणी बंधु ॥२॥
विठ्ठल हे जन विठ्ठल माझे मन । सोईरा सज्जन विठ्ठल माझा ॥३॥
तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा । त्वरित गावा जाइन त्याच्या ॥४॥
अर्थ
विठ्ठल हा माझा जीव भाव आहे कुळधर्म आणि माझा देवही हा विठ्ठलच आहे. विठ्ठलच माझा गुरु आहे आणि तोच मला या भवसागरातून तारणारा आहे आणि या भवसागरातून पार लावणारा आहे. विठ्ठलच माझी माता, पिता, बहीण, बंधू, चुलता सर्व जे काही आहे ते सर्व विठ्ठलच आहे. विठ्ठलच माझे जण आहे विठ्ठलच माझे मन आहे. सोयरा आणि सज्जन हे देखील विठ्ठलच आहे. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल हाच माझा विसावा आहे त्यामुळे मी त्वरित त्याच्या गावाला जाईन.
अभंग – १०८९
एकाचिये सोई कवित्वाचे बांधे । बांधिलिया साधे काय तेथे ॥१॥
काय हाती लागे भुसाचे कांडणी । सत्यासी दाटणी करुनि काय ॥धृपद॥
कवित्वाचे रूढी पाया पडे जग । सुखावोनि मग नरका जाय ॥२॥
तुका म्हणे देव केल्याविण साहे । फजिती ते आहे लटिक्या अंगी ॥३॥
अर्थ
एखाद्या प्रासादिक कवीने शब्दांची जुळवाजुळव करून कविता तयार केली आणि त्याच्या शब्दाची चोरी करून दुसऱ्या एखाद्या कवीने दुसरे काव्य तयार केले तर त्या काव्यापासून त्याला काय लाभ होणार आहे ? भुसाचे जर कांडण केले तर त्यापासून काय होणार आहे त्याप्रमाणे सत्याची पायमल्ली करून काय उपयोग होणार आहे ? एखाद्या प्रसादिक कवीच्या कवितेतील शब्द चोरून त्याच शब्दा द्वारे नवीन काव्य तयार करून तो कवी व त्यांची कविता ही जगामध्ये मानसन्मानास पात्र होईल परंतु असे केल्याने तो कवी सुखासुखी नरकाला जाईल. तुकाराम महाराज म्हणतात देवाची प्राप्ती झाल्यावाचुन केलेले काव्य म्हणजे केवळ खोटे आहे आणि शेवटी त्याची फजिती तर होते.
अभंग – १०९०
भल्याचे दर्शन । तेथे शुभचि वचन ॥१॥
बोलावी हे धर्मनीत । शोभे होत नाही हित ॥धृपद॥
मर्यादा ते बरी । वेळ जाणावी चतुरी ॥२॥
तुका म्हणे बहु । लागे ऐसे बरे मऊ ॥३॥
अभंग अर्थ नाही टाका तपासा
अभंग – १०९१
आवडीने धरिली नावे । प्रियभावे चिंतन ॥१॥
वेडा जाला वेडा जाला । लांचावला भक्तीसी ॥धृपद॥
निचाड हा चाड धरी । तुळसी करी दळ मागे ॥२॥
धरिला मग न करी बळ । तुका म्हणे कळ पायी ॥३॥
अर्थ
देवाने भक्तांच्या आवडीनुसार अनेक रूप व नांव धारण केलेले आहे. व हे हरिभक्त त्या देवाचे नाम आवडीने घेतात. देव वेडा झाला आहे अतिशय वेडा झाला आहे तो भक्तांच्या भक्ती करता लाचावला आहे. या देवाला कसल्याही प्रकारची इच्छा नसते परंतु मनात इच्छा धरून भक्तांना आवडीने तुळशीपत्र तो मागत असतो. तुकाराम महाराज म्हणतात की एकदा जर त्याचे पाय प्रेमाने घट्ट धरले तर त्याचे काहीच चालत नाही त्याला म्हणजे विठ्ठलाला जिंकण्याची खरी किल्ली त्याच्या पायातच आहे.
अभंग – १०९२
कंठी राहो नाम । अंगी भरोनिया प्रेम ॥१॥
ऐसे द्यावे काही दान । आलो पतित शरण ॥धृपद॥
संताचिये पायी । ठेवींतो वेळोवेळा डोई ॥२॥
तुका म्हणे तरे । भवसिंधु एक सरे ॥३॥
अर्थ
देवा कंठामध्ये तुझे नाम राहो आणि हृदयातही तुझ्याविषयी प्रेम राहो असेच काही दान तू मला दे. मी पतित आहे म्हणून मी तुला शरण आलेलो आहे देवा. मी संतांच्या पायावर वेळोवेळी माझा माथा टेकवित आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी हा भवसिंधु एकाच दमात तरुन जाईल असेच मला दान द्या.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















