१ ऑक्टोबर, दिवस २७४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी ५१ ते ७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३२७७ ते ३२८८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 1 October
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १७ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३२७७ ते ३२८८ चे पारायण आपण करणार आहोत.
१ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी ५१ ते ७५,

51-17
श्रद्धा म्हणितलियासाठी । पातेजो नये किरीटी । काय द्विजु अंत्यजघृष्टी । अंत्यजु नोहे ? ॥51॥
केवल श्रद्धेने त्याची (मोक्षाची) प्राप्ति होणार नाही; हे पहा, ब्राह्मण खरा, पण अत्यंजाच्या संगतीने पतित होणार नाही काय ? 51
52-17
गंगोदक जरी जाले । तरी मद्यभांडा आले । ते घेऊ नये काही केले । विचारी पा ॥52॥
विचार कर की, गंगोदक जरी असले तरी, ते मद्याच्या भांड्यात भरले असता केव्हांही सेवनीय रहात नाही. 52
53-17
चंदनु होय शीतळु । परी अग्नीसी पावे मेळु । तै हाती धरिता जाळू । न शकेकाई ? ॥53॥
चंदन अंगाने शीतळ खरा, पण त्याच्या काष्ठाला अग्निसंबंध झाला तर, त्याने हात भाजणार नाही काय ? 53
54-17
का किडाचिये आटतिये पुटी । पडिले सोळे किरीटी । घेतले चोखासाठी । नागवीना ? ॥54॥
किंवा हिणकस सोन्याच्या आटणीत उत्तम सोने पडले आणि, नंतर अर्जुना, ते सर्व चोख सोन्याच्या भावाने खरेदी केले तर नुकसान होणार नाही काय ? 54
55-17
तैसे श्रद्धेचे दळवाडे । अंगे कीर चोखडे । परी प्राणियांच्या पडे । विभागी जै ॥55॥
त्याप्रमाणे, श्रद्धा ही स्वरूपतः चांगली खरी, पण ती जेव्हा कोणा जीवांच्या वाटयास येते. 55


56-17
ते प्राणिये तव स्वभावे । आनादिमायाप्रभावे । त्रिगुणाचेचि आघवे । वळिले आहाती ॥56॥
तेव्हा ते जीव स्वभावतःच अनादि मायेच्या शक्तीने त्रिगुणांचेच बनलेले असल्यामुळे. 56
57-17
तेथही दोन गुण खांचती । मग एक धरी उन्नती । तै तैसियाचि होती वृत्ती । जीवांचिया ॥57॥
व त्या त्रिगुणांतही नेहमी दोन गुण दबले जाऊन एकाच उन्नतगुणाचा प्रभाव सुरू असतो, तेव्हा जीवांची वृत्ति त्या गुणानुरोधाची असते. 57
58-17
वृत्ती{ऐ}से मन धरिती । मना{ऐ}सी क्रिया करिती । केलिया ऐसी वरीती । मरोनि देहे ॥58॥
वृत्तिप्रमाणे मनाची घडण, मनाप्रमाणे क्रिया, आणि क्रियेप्रमाणे मेल्यावर पुन्हा देह असे चक्र सुरु असते. 58
59-17
बीज मोडे झाड होये । झाड मोडे बीजी सामाये । ऐसेनि कल्पकोडी जाये । परी जाति न नशे ॥59॥
बीजाचे स्वरूप बदलून झाड होते आणि पुन्हा झाड नाश पावून त्याचा बीजांत अंतर्भाव होतो असे कल्पच्या कल्प गेले तरी, वृक्षत्वजातीचा काही नाश होत नाही. 59
60-17
तियापरी यिये अपारे । होत जात जन्मांतरे । परी त्रिगुणत्व न व्यभिचरे । प्राणियांचे ॥60॥
ह्या क्रमाने, कित्येक जन्मच्या जन्म जरी गेले, तरी प्राण्यांचे त्रिगुणत्व नष्ट होत नाही. 60
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


61-17
म्हणूनि प्राणियांच्या पैकी । पडिली श्रद्धा अवलोकी । ते होय गुणासारिखी । तिही यया ॥61॥
म्हणून प्राण्यांच्या वाट्याला आलेली श्रद्धा ही ह्या तीन गुणांपैक, एका कोणत्या तरी एका उन्नतगुणाच्या अनुरोधाची असते. 61
62-17
विपाये वाढे सत्त्व शुद्ध । तेव्हा ज्ञानासी करी साद । परी एका दोघे वोखद । येर आहाती ॥62॥
कदाचित् शुद्ध सत्व गुणाचा जोर असेल तर त्याला ज्ञानाची इच्छा होते; पण त्याला दुसरे दोन गुण जे आहेत ते प्रतिबंधक आहेत. 62
63-17
सत्त्वाचेनि आंगलगे । ते श्रद्धा मोक्षफळा रिगे । तव रज तम उगे । का पा राहाती ? ॥63॥
सत्वाच्या आधाराने ती श्रद्धा मोक्षफलाचा मार्ग धरिते; पण त्यावेळी रज व तम हे स्वस्थ कसे बसणार ? 63
64-17
मोडोनि सत्त्वाची त्राये । रजोगुण आकाशे जाये । तेव्हा तेचि श्रद्धा होये । कर्मकेरसुणी ॥64॥
सत्व गुणाचे रक्षण मोडून जेव्हा रजोगुण उंचावतो तेव्हा तीच श्रद्धा कर्ममार्गाला लागते. 64
65-17
मग तमाची उठी आगी । तेव्हा तेचि श्रद्धा भंगी । हो लागे भोगालागी । भलतेया ॥65॥
मागून तमोगुणाची आग भडकली की, तीच श्रद्धा भंग पावून वाटेल ते भोग भोगण्यास प्रवृत्त होते. 65
सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत ।
श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यछ्रद्धः स एव सः ॥17. 3॥


66-17
एवं सत्त्वरजतमा- । वेगळी श्रद्धा सुवर्मा । नाही गा जीवग्रामा- । माजी यया ॥66॥
ह्याप्रकारें, अर्जुना, ह्या अगत जीवांच्या वाट्यास आलेल्या श्रद्धेचे स्वरूप ह्या तीन गुणांपैकी कोणत्या तरी एका गुणासारखे असते; त्यावांचुन केवल श्रद्धा अशी असतच नाही. 66
67-17
म्हणौनि श्रद्धा स्वाभाविक । असे पै त्रिगुणात्मक । रजतमसात्त्विक । भेदी इही ॥67॥
म्हणून श्रद्धा स्वभावतः सत्व, रज किंवा तम ह्या तीन गुणांपैकी कोणत्या तरी एका गुणभेदाची असते. 67
68-17
जैसे जीवनचि उदक । परी विषी होय मारक । का मिरयामाजी तीख । उसी गोड ॥68॥
जसे पाणी हे जीवन खरे, पण विषयुक्त झाले तर मारक होते, मिरचीत किंवा मिऱ्यात तिखट व ऊसात गोड होते. 68
69-17
तैसा बहुवसे तमे । जो सदाचि होय निमे । तेथ श्रद्धा परीणमे । तेचि होऊनि ॥69॥
त्याप्रमाणे ज्याचे मन नित्य तमोगुणा ग्रासलेले असते त्याच्या ठिकाणची श्रद्धाही तसाच परिणाम पावून तमोगुणरूपच असते. 69
70-17
मग काजळा आणि मसी । न दिसे विवंचना जैसी । तेवी श्रद्धा तामसी । सिनी नाही ॥70॥
मग, काजळ आणि मस ह्यात जसः भेदाभेद करिता येत नाही, तसा तो तमोगुणी मनुष्य व त्याची तामसी श्रद्धा ह्यात भेद नसतो. 70
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


71-17
तैसीच राजसी जीवी । रजोमय जाणावी । सात्त्विकी आघवी । सत्त्वाचीच ॥71॥
त्याचप्रमाणे राजस स्वभावाच्या प्राण्याच्या ठिकाणची श्रद्धा राजस व सात्विक पुरुषाच्या अंगची श्रद्धा सत्वरूप असते. 71
72-17
ऐसेनि हा सकळु । जगडंबरु निखिळु । श्रद्धेचाचि केवळु । वोतला असे ॥72॥
ह्याप्रमाणे हा सर्व जगद्रूपी पसारा केवळ श्रद्धेचाच ओतला आहे. 72
73-17
परी गुणत्रयवशे । त्रिविधपणाचे लासे । श्रद्धे जे उठिले असे । ते वोळख तू ॥73॥
परंतु, गुणत्रयवश असणाच्या या श्रद्धेवर तीन गुणांचे भिन्न भिन्न ठसे (चिन्हें) उठलेले तुला ओळखता येतील. 73
74-17
तरी जाणिजे झाड फुले । का मानस जाणिजे बोले । भोगे जाणिजे केले । पूर्वजन्मीचे ॥74॥
कारण, झाड ही त्याच्या फुलावरून, मन हे त्यांच्या द्वारा होणाऱ्या भाषेवरून व पूर्वकर्मे कसे होते हे सांप्रतच्या भोगावरून ओळखता येते. 74
75-17
तैसी जिही चिन्ही । श्रद्धेची रूपे तीन्ही । देखिजती ते वानी । अवधारी पा ॥75॥
त्याप्रमाणे ज्या चिन्हावरून श्रद्धेची तिन्ही रूपे ओळखता येतात तो प्रकार कसा ते श्रवण कर. 75

दिवस २७४ वा. १, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३२७७ ते ३२८८
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ३२७७
पुराणिक म्हणविती । जाणोनी कांदे ते भक्षिती ॥१॥
अगस्तीचे मुत्र मळ । लावूनी म्हणती कृष्णावळ ॥धृपद॥
श्रेष्ठ वर्ण ब्राम्हणाचा । संग न सुटे शुद्रीचा ॥२॥
बदराईच्या पाडी दाढा । लगे तुकयाचा हुंदडा ॥३॥
अर्थ
काही लोक स्वत:ला पुराणिक म्हणतात, त्यांना सर्व काही माहिती असते तरी देखील ते कांदे खातात. अगस्तीचे मलमूत्र म्हणजे समुद्राचे मीठ ते कांदयाला लावतात आणि म्हणतात, की हे कृष्णावळ आहे व हे शुध्द आहे असे म्हणून खातात. ब्राम्हणाचा वर्ण म्हणजे श्रेष्ठ वर्ण आहे असे म्हणतात परंतू क्षुद्र स्त्रीचा संग काही सुटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “असे वाईट वागणाऱ्या लोकांना मी अतिशय कठोर शब्दात बोलून त्यांचे दातच पाडीत आहे. ”
3:45

अभंग क्र. ३२७८
स्वप्नी तोहि कैसा न पडसी डोळा । सुंदर सावला घवघवीत ॥१॥
चतुर्भूज माळा रुळे येकावळी । कस्तुरी निढळी रेखिलीसे ॥धृपद॥
शंक चक्र गदा रुळे वैजयंती । कुंडले तळपती श्रवणी दोन्ही ॥२॥
तुका म्हणे स्वप्नी दावी आता पाय । पांडुरंगे माया कृपावंते ॥३॥
अर्थ
देवा तुझे रुपे सुंदर सावळे घवघवीत आहे तरी देखील माझ्या स्वप्नातही तू दृष्टीस का पडत नाहीस ? देवा तू चतुर्भूज आहेस एक पदरी माळ तुझ्या गळयामध्ये आहे आणि कस्तुरीचा अतिशय रेखीव टिळा तुझ्या कपाळावर शोभून दिसत आहे. देवा तुझ्या हातामध्ये शंख चक्र पद्म गदा ही आयुधे आहेत गळयामध्ये वैजयंती माळ आहे. दोन्ही कानामध्ये कुंडले अतिशय चमकून दिसत आहेत असे तुझे सुंदर रुप आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पाडूरंगे माझी आई कृपावंत माऊली तुझे पाय आता मला स्वप्नात तरी दाखव. ”
3:45

अभंग क्र. ३२७९
सातादिवसांचा जरी झाला उपवासी । तरी कीर्तनासी टाकु नये ॥१॥
फुटो हा मस्तक तुटो हे शरीर । परी नामाचा गजर सोडू नये ॥धृपद॥
शरीराचे होत दोनी तेही भाग । परि कीर्तनाचा रंग सांडो नये ॥२॥
तुका म्हणे ऐसा नामी झाला निर्धार । तेथे निरंतर देव वसे ॥३॥
अर्थ
जरी एखादया मनुष्याला सात दिवस अन्न खाण्यास मिळाले नाही तो उपाशी राहिला तरी त्याने कीर्तनाला जाण्याचे सोडू नये. हे मस्तक फुटून जावो किंवा हे शरीर तुटून जावो तरी देखील नामाचा गजर करणे सोडू नये. अहो शरीराचे दोन तुकडे जरी झाले तरी देखील कीर्तनाचा रंग सोडू नये. तुकाराम महाराज म्हणतात, “नामाविषयी व कीर्तनाविषयी असा ज्याचा दृढविश्वास झालेला असतो त्याच्या ठिकाणी देव निरंतर वस्ती करत असतो. ”
3:46

अभंग क्र. ३२८०
पहिली माझी ओवी ओवीन जगन्न । गाईन पवित्र पांडुरंग ॥१॥
दुसरी माझी ओवी दुजे नाही कोठे । जनी वनी भेटे पांडुरंग ॥धृपद॥
तिसरी माझी ओवी तिला नाही ठाव । अवघाची देव जनी वनी ॥२॥
चवथी माझी ओवी वैरिले दळण । गाईन निधान पांडुरंग ॥३॥
पाचवी माझी ओवी ते माझिया माहेरा । गाईन निरंतरा पांडुरंग ॥४॥
साहावी माझी ओवी साहाही आटली । गरुमूर्ती भेटली पांडुरंग ॥५॥
सातवी माझी ओवी आठवी वेळोवेळा । बैसलो डोळा पांडुरंग ॥६॥
आठवी माझी ओवी आठ्ठावीस युगे । उभा चंद्रभागे पांडुरंग ॥७॥
नववी माझी ओवी सरले दळण । चुकले मरण संसारीचे ॥८॥
दाहावी माझी ओवी दाहा अवतार । न यावे संसारा तुका म्हणे ॥९॥
अर्थ
मी ओव्या गात आहे त्या अशा प्रकारे पहिल्या ओवीमध्ये सर्व जगाचे स्वरुप पाडूरंग आहे त्या जगाला एकत्र करुन व पाडूरंगासाठी पहिली ओवी मी गायीन. मी दुसरी ओवी गात आहे ती यासाठी की मी जेथे जातो तेथे मला दुसरे कोणीही नाही जनात वनात कोठेही गेलो तरी पाडूरंगच भेटतो. मी तिसरी ओवी गात आहे परंतू तिला कोणत्याही प्रकारचे स्थान नाही कारण देव जनावनात सर्वत्र व्यापलेला आहे. मी माझी चौथी ओवी गाताना संसाराचे दळण मांडले आहे आणि सर्व गोष्टीचे निदान पाडूरंग यालाच मी या ओवीमध्ये गात आहे. माझी पाचवी ओवी माझे माहेर पंढरपूर यासाठी आहे व त्यामध्येच मी माझ्या पाडूरंगालाही निरंतर गात राहीन. माझी सहावी ओवी गुरु रुपाने भेटलेल्या माझ्या पाडूरंगासाठी आहे. की ज्याच्यापुढे सहा शास्त्रांची देखील मती कुंठीत झाली आहे. माझी सातवी ओवी जो माझ्या डोळयामध्ये निरंतर बसला आहे अशा पाडूरंगासाठी आहे व त्यालाच मी वेळोवेळ
3:46

अभंग क्र. ३२८१
अनाथा जीवन । आम्हा तुमचे चरण । करुनी साठवण । ते धरिले हृदयी ॥१॥
पुष्ट झाली अंगकांती । आनंद न समाये चित्ती । कवतुके प्रीती । गाऊ नाचो उल्हासे ॥धृपद॥
करुणाउत्तरी । करू आळवण हरी । जाऊ नेंदू दुरी । प्रेमप्रीतीपडीभरे ॥२॥
मोहममता करी गोवा । एसे आहेजी केशवा । तुका म्हणे सेवा । आणिक नाही जाणत ॥३॥
अर्थ
देवा आम्हा अनाथांसाठी तुमचे चरण म्हणजे जीवन आहे. म्हणूनच त्याची साठवण करुन आम्ही ते ह्दयात धारण केले आहे. माझी अंगकांती यामुळे अतिशय पुष्ट व दिव्य झाली आहे आनंद तर माझ्या चित्तामध्ये सामावतच नाही. आणि आता कौतुकाने व प्रेमाने तुमचे नाम गाऊ व त्या छंदात आनंदाने नाचू. आता करुण शब्दानी आम्ही हरीला आळवू. आणि प्रेमाने व आवडीने आम्ही तुला कोठेही दूर जाऊ देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मोह आणि ममता हेच सर्वाना अडचण निर्माण करतात. “देवा त्यामुळे मी केवळ तुमची सेवा करणे एवढेच जाणतो यावाचून दुसरे काहीही जाणत नाही. ”
3:46

अभंग क्र. ३२८२
घ्या रे भाई घ्या रे भाई । कोणी काही थोडे बहु ॥१॥
येच हाटी येच हाटी । बांधा गाठी पारखून ॥धृपद॥
वेच आहे बेच आहे । सरले पाहे मग खोटे ॥२॥
उघडे दुकान उघडे दुकान । रात्री झाली कोण सोडी मग ॥३॥
तुका म्हणे अंतकाळी । जाती टाळी बैसोनी ॥४॥
अर्थ
हे माझ्या भावांनो कोणी काही तरी थोडा फार तरी परमार्थाचा माल घ्यावा. याच मनुष्यदेहाच्या बाजारामध्ये पारखून परमार्थरुपी माल आपल्या पदरात बांधून घ्यावा. अहो एकदा की तुमचे आयुष्य सरले की मग परमार्थरुपी मालाचा फायदा तुम्ही कोठे करुन घेणार आहात ? अहो जोपर्यंत तुमचे दुकानरुपी मुख उघडे आहे तोपर्यंतच तुम्ही हरीनाम घ्या एकदा तुमचा आयुष्यरुपी सूर्य अस्ताला गेला रात्र झाली की मग तुम्हाला कोण सोडवील ? तुकाराम महाराज म्हणतात, “एकदा की अंत:काळ आला की तुमचे मुख बंद होऊन जाईल मग तुम्ही हरीनाम घेऊ शकणार नाही त्यामुळे हरीनाम घ्या व स्वत:चे हित साधा. ”
3:46

अभंग क्र. ३२८३
गुणाची आवडी वाचेचा पसरू । पडिला विसरू सर्वरसा ॥१॥
आदि मध्य अंती नाही अवसान । जीवानी जीवन मिळोनी गेले ॥धृ॥
रामकृष्ण नाममाळा हे साजिरी । ओविली गोजिरी कंठाजोगी ॥२॥
तुका म्हणे तनु झालीसे शीतळ । अवघी सकळ ब्रम्हानंदे ॥३॥
अर्थ
मला हरीच्या गुणाची आवड लागली आहे व त्याचेच मी सर्वत्र वर्णन करत प्रसार करीत आहे व त्या छंदामध्ये मला सर्व विषांचा विसर पडला आहे. हरीचे वर्णन करण्यासाठी आता आदी मध्य अंत राहीलेलाच नाही अखंड हरीचे वर्णन चालू आहे आणि शिवरुपी जीवनामध्ये माझा जीवरुपी जीवन मिळून गेले आहे. म्हणजे जीव शिव ऐक्य झाले आहे. रामकृष्ण ही नामावळी मी माझ्या कंठामध्ये अतिशय शोभून दिसेल अशी ओवून ठेवली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “माझे सर्वांग ब्रम्हानंदाने शीतळ झाले आहे. ”
3:47

अभंग क्र. ३२८४
जैसी तैसी तरि वाणी । मना आणी माउली ॥१॥
लेकरांच्या स्नेहे गोड । करी कोड त्या गुणे ॥धृपद॥
मागे पुढे रिघे पोटी । साहे खेटी करी ते ॥२॥
तुका विनवी पांडुरंगा । ऐसे पैंगा आहे हे ॥३॥
अर्थ
लहान मूल कसेही बोबडे बोल बोलले तरी त्याची आई ते बोल मान्य करुन घेते. लहान मुलाविषयी त्या आईचा स्नेह फार दृढ असतो ते लहान मूल कसेही बोल बोलले कसेही वर्तन त्या लहान मुलाने केले तरी त्याचे सर्व गुणाचे कौतुक करुन गोड मानून घेते. लहान मूल सारखे आईच्या मागे पुढे करत असते तिला त्रास देते तिला धक्के मारते तरी देखील ती माऊली त्याच्या सर्व त्रास खोडया सहन करते. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पाडूरंगा आई आणि मुलामध्ये असा स्नेह असतो त्यामुळे मी जो काही तुला त्रास देईल तो तू सहन कर अशी विनंती मी तुला करतो आहे. ”
3:47

अभंग क्र. ३२८५
देवाचि भंडारी । आदा विनियोग करी ॥१॥
आता न माखे हातपाय । नेणो होते कैसे काय ॥धृपद॥
देवे नेली चिंता । झाला सकळ करिता ॥२॥
तुका म्हणे धनी । त्यासी अवघी पुरवणी ॥३॥
अर्थ
देवाचा “कोशपतीच” आमच्या जमाखर्चाची मांडणी करतो. आता आमच्या उदरनिर्वाहासाठी आम्हाला हातपाय मळावेच लागत नाही आणि हे कसे होते हे आम्हाला पण कळत नाही. देवाने आमची सर्व चिंताच नेली आहे आमचे सर्व कार्य करणारा देव झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आमचा धनी श्रीपाडूरंग आहे त्यामुळे आमच्या सर्व आशा इच्छा अपेक्षा त्यालाच पूर्ण कराव्या लागतात. ”
3:47

अभंग क्र. ३२८६
पेणावले ढोर मार खाय पाठी । बैसले ते नुठी तेथूनिया ॥१॥
तैसी माझ्या मना परी झाली देवा । धावे अहंभावा सांडवलो ॥धृपद॥
कडा घाली उडी मागिलांच्या भेणे । पडणे मरणे न कळेचि ॥२॥
तुका म्हणे झालो त्यापरी दुःखित । असे बोलावीत पांडुरंगा ॥३॥
अर्थ
जे जनावर उठवणीस आले आहे ते पाठीवर मार खाते पण बसल्या जागेवरुन उठत नाही. त्याप्रमाणेच देवा माझ्या मनाची अवस्था झाली आहे कितीही सद्विचार ऐकले तरी ते मनाला पटत नाहीत आता तू माझ्या मदतीसाठी देवा धाव मी सर्व अभिमान टाकून दिला आहे. आपले प्राण घेण्यासाठी जर आपल्या मागे कोणी धावले तर आपण पर्वताच्या कडेवरुन खाली उडी मारु पण उडी मारताना आपण पडू आपण मरु हे कळतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पाडूरंगा अगदी त्याप्रमाणे मी दु:खित झालो आहे त्यामुळेच मी तुला बोलावित आहे. ”
3:47

अभंग क्र. ३२८७
झालिया दर्शन करीन मी सेवा । आणीक काही देवा न लगे दुजे ॥१॥
प्रारब्धा अधीन अन्न अच्छादन । स्थिर करोनी मन ठेवी पायी ॥धृपद॥
येगा येगा येगा कृपाळूवा हरी । निववी अभ्यंतरी देऊनि भेटी ॥२॥
आसावले मन जीवनाचे ओढी । नामी रूपी गोडी लावियेली ॥३॥
काय तुम्हापाशी नाही भांडवल । माझे मिथ्या बोल जाती ऐसे ॥४॥
काय लोखंडाचे पाहे गणु दोष । सीवोनि परीस सोने करी ॥५॥
तुका म्हणे माझे अवघे असो द्यावे । आपुले करावे ब्रीद साच ॥६॥
अर्थ
देवा मला एकदा की तुमचे दर्शन झाले तर मी तुमची सेवा अगदी प्रेमाने करीन यावाचून दुसरे मला काहीही लागत नाही. अरे देवा अन्न वस्त्र निवारा हे तर प्रारब्धाच्या आधीन आहे त्यामुळे मी ते काहीच मागणार नाही केवळ माझे मन तुझ्या पायाच्या ठिकाणी स्थिर करुन ठेवू. हे कृपाळू हरी तू ये ये लवकर ये आणि माझ्या मनाला भेट देऊन शांत कर. देवा तू माझे जीवन आहेस व त्यामुळेच माझे मन तुझ्याकडे सारखे ओढ घेत आहे त्याची अपेक्षा करीत आहे तुझ्या नामाची व रुपाची गोडी तू मला लावली आहेस. देवा मी मागितलेले बोल वाया जावे इतके देखील भांडवल तुमच्याजवळ नाही की काय ? अहो परीस कधी लोखंडाचे गुणदोष पाहतो काय त्या लोखंडाला परीसाने स्पर्श केल्याबरोबर त्याचे सोने तो करुन टाकतो. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता माझे गुण दोष तुम्ही बाजूला ठेवून दया आणि तुमचे पतितपावन हे ब्रीद तुम्ही सत्य करुन दाखवा. ”
3:48

अभंग क्र. ३२८८
हरिःॐ तत्सदिति सूत्राचे जे सार । कृपेचा सागर पांडुरंग ॥१॥
हरिःॐ दत्त उदात्त अनुदात्त । प्रचुररहित पांडुरंग ॥धृपद॥
सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे । वेदाचे जे मूळ तुका म्हणे ॥२॥
अर्थ
प्रथम “हरी” हे नाम म्हणजे वेदाचे बीज आहे आणि “ओम तत सत” या नामामध्ये संपूर्ण वेदाचा तात्पर्यभूत सार आहे व याचेही सार म्हणजे माझा कृपेचा सागर “पाडूरंग” आहे. “ओम” इत्यादी अक्षरे “उदात्त, मध्य किंवा अनुदात्त” स्वराने म्हटल्यावर जे हित होणारे आहे तेच हीत पाडूरंगाचा उच्चार केल्याने होणार आहे. तूकाराम महाराज म्हणतात, “हा पाडूरंग सर्वत्र व्यापलेला असून सर्वापासून निराळा आहे आणि तोच वेदाचे मूळ आहे. ”

ऑक्टोबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading