18. रूख्मिणी चरित्र भाग १, (१ ते ५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️


            श्रीकृष्णाप्रमाणेच मला रुख्मिणीच्या व्यक्तिमत्वाचे आगळेवेगळे पैलू दिसून आले. तिचे अनुपम सौंदर्य, बालपणा पासूनच श्रीकृष्णाविषयीचे गाढ प्रेम, प्रखर निष्ठा, अतूट विश्वास, तीव्र बुध्दीमत्ता, योग्य निर्णारकशक्ती, कर्तव्यनिष्ठा, व्यापकता, कौशल्य, प्रेमधाग्यात लहान थोरांना एकत्र बांधून ठेवण्याची क्षमता……..

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! रूख्मिणी चरित्र !!!

!!!  प्रस्तावना  !!!

                    नमस्कार!!

            आज रामनवमीच्या पावन पर्वावर  रुख्मिणीचे चरीत्र लिहायला घेत आहे. आजपर्यंत ४८ व्यक्तीरेखा वेगवेगळ्या विषयांवर, जसेः महाभारत, रामायण मधील व्यक्तीरेखा, ऐतिहासिक व्यक्तीरेखा, संतचरित्रे व इतरही …स्वामी विवेकानंद, सम्राट अशोक व्यक्तीरेखा आपल्यापुढे प्रस्तुत केल्यात. ही ४९ वे चरित्र “रुख्मीणी” आपल्यापुढे सादर करीत आहे.नेहमीप्रमाणेच प्रोत्साहित करुन आपल्या क्रीया प्रतिक्रीया अपेक्षित!

             रुख्मिणी नीट समजण्यासाठी मी अनेक संदर्भग्रंथांचा अभ्यास केला. हे वाचन करीत असतांनाच योगेश्वर श्रीकृष्णाच्या जीवनातील अनेक घटनांमधून मानवता, समता, बंधुत्ल, अजोड बुध्दीमत्ता, निर्णायक क्षमता, संतुलीत वागणे अशा अनेक गुणांचा परीचय झाला, तो कोणतीही अंधश्रध्दा, चमत्कार वगैरे विचार मनांत न बाळगता! चरित्र लेखन अचुक होण्याच्या दृष्टीने मी  “कृष्णायण”, ” युगंधर”, “कौंतेय”,  “रुख्मिणि स्वयंवर”, “रुख्मिणी हरण, “व्यासपर्व”, “व्यासविचार” अशी कांही पूर्वी व कांही आतां ही वाचून “रुख्मीणी” लिहायला घेतली.

           श्रीकृष्णाप्रमाणेच मला रुख्मिणीच्या व्यक्तिमत्वाचे आगळेवेगळे पैलू दिसून आले. तिचे अनुपम सौंदर्य, बालपणा पासूनच श्रीकृष्णाविषयीचे गाढ प्रेम, प्रखर निष्ठा, अतूट विश्वास, तीव्र बुध्दीमत्ता, योग्य निर्णारकशक्ती, कर्तव्यनिष्ठा, व्यापकता, कौशल्य, प्रेमधाग्यात लहान थोरांना एकत्र बांधून ठेवण्याची क्षमता या तिच्पा अगनित गुणांनी व लोभस व्यक्तिमत्वाने ती केवळ द्वारकाधीशाची जेष्ठ पत्नी नाही तर, द्वारकेचे महाराणीपद आपल्या स्वकर्तृत्वाने प्राप्त केले.

          श्रीकृष्णावरचे अनेक साहित्य उपलब्ध असले तरी, रुख्मीणीवर फारसे लेखन आढळत नाही. रुख्मिणीने पत्र पाठवून आपले हरण करण्यास कळविले हे सर्वश्रृत आहे. दीर्घ काळ श्रीकृष्ण द्वारकेबाहेर असतांना, द्वारकेचा राज्यकारभार खंबीरपणे हाताळणारी,उत्तम निर्णय क्षमता असणारी राज्यकर्ती होती. अन्य सात राण्यांवर पट्टराणीपदाचा वचक ठेवूनही त्यांचेशी स्नेहाचे संबंध टिकवून ठेवून, राणीवशातील वातावरण शांत व स्थीर ठेवण्याचे अवघड कर्तव्य तिने समर्थपणे पार पाडले होते.

           ज्या ज्या वेळी श्रीकृष्ण दुष्ट संहारणार्थ किंवा अन्य कारणाने द्वारकेबाहेर गेले त्यावेळी संपूर्ण द्वारका साम्राज्याची धूरा समर्थपणे व चतुराईने पेलली होती. राज्याची सुरक्षा व्यवस्था डोळ्यात तेल घालून जपली होती. प्रत्येक जेष्ठ व्यक्ती चा योग्य मान राखला. ऋषीमुनींची अत्यंत नम्रतेने सेवा केली.  समवयस्कारांशी मैत्रीपूर्ण व लहानांवर अपार माया केली. अनेक आघाड्यांवर मानसिक संघर्ष सहन करुनही ती सदैव श्रीकृष्णाच्या पाठीशी समर्थपणे उभी राहिली. नेहमी द्वारका सम्राज्याच्या कल्याणाच्या हिताचाच विचार अहोरात्र बाळगला.

              द्वारकेची भूमी, गर्जना करणारा सागर आणि द्वारकावासी यांना सोडून ती दुसरीकडे जास्तवेळ राहूच शकली नाही. या सर्व अभ्यासातून एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, महाभारतातील रुख्मिणी ही व्यक्तिरेखा पूर्ण वास्तववादी असून, तिचा जन्म,जीवनातील घटना ह्या संपूर्ण  वास्तवांशी संबंधीत आहेत. महाराणी द्रोपदी किंवा राजमाता कुंती यांचे जीवनाला अनेक प्रसंग मंत्रतंत्र, चमत्काराचे वलय आहे तसे रुख्मिणीचे नाही.

        तिचे प्रथम अपत्याचे अपहरण पांचव्याच दिवशी  झाले, पण, तो जिथे आहे तिथे सुखरुप असून व योग्यवेळी तो परत येईल ह्या श्रीकृष्णाच्या आश्वासनावर, तिने पहाडाएवढे दुःख धीराने पचवले. श्रीकृष्णाने एक दोन नाही तर चक्क सात बायका तिच्या प्रेमात हिस्सेदार केल्यात पण तिने कधीही असूया दाखवली नाही, उलट त्यांच्याशी पट्टराणीचा आब राखून सलोख्याने वागली.

             अशा या वास्तववादी, सामर्थ्यशाली, मनस्विनी, अनभिषिक्त महाराणी रुख्मिणीचे प्रलयकारी, मनाला भिडणारे स्पर्श करणार्‍या व्यक्तिमत्वाला कोटीकोटी नमन.

                 
!!!  रूख्मिणी  !!!

भाग – १.

            रुख्मिणी आज जीवनाच्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहचली. श्रीकृष्णाने तर कांही तपांपूर्वीच वानप्रस्थाश्रमाचा निर्णय घेतला होता. महाभारतीय भिषण महायुध्द समाप्तीनंतर युधीष्ठीरच्या राज्यभिषेकाहून परतल्यानंतर त्यांचा विचार पक्का झाला. रुख्मीणी आणि श्रीकृष्ण एकमेकांची मने चांगली ओळखत असल्यामुळे, राणी द्विपाचा कारभार पुढच्या  पिढीला सोपवून, तिचेही श्रीकृष्णाच्या पावलावर पाऊल  पडणार होते. तिने आयुष्यभर पतीची आज्ञा पाळली व पुढेही पाळत राहणार.पार्थाला श्रीकृष्णाने कर्मयोग नुसता ऐकवलाच नाही तर ते स्वतःही जगले आणि रुख्मिणीसुध्दा.

                तिच्या जेष्ठ भावाने तिचा विवाह चेदीचा राजकुमार शिशूपालशी ठरवले होते, पण नकळत्या वयापासून तिचा कल या गवळ्याच्या पोराकडे होता. म्हणूनच पत्र पाठवून राक्षस विवाहाचा पर्याय सुचवला होता. पांच भावांची अतिशय लाडकी बहिण, प्रेमळ मातापित्यांच्या मायेच्या छत्रछायेखाली वाढलेली एका कोवळ्या  राजकन्येकडून हे अतर्क्य कसे घडले? तसं तिचे सारे जीवनच अतर्क्य होते.

             योगेश्वर श्रीकृष्णाची पत्नी झाली, महाराणी झाली. कुणालाही हेवा वाटेल असे सुखाचे आयुष्य तिच्या वाटेला आले, पण सुखाबरोबर दुःखही आलेच..त्या काटेरी बोचर्‍या वाटेवरुन चालतांना मन कित्येकदा रक्ताळले पण ही जीवन नौका यशस्वीपणे पतीच्या आश्वासक साथीने पार केली. आज याक्षणी ती सर्व मोहमाया, राग,लोभ,विकल्प,आशा, अपेक्षा या सर्व भावनांच्या पलिकडे गेलेली. आज ती पट्टराणी, महाराणी, राजकन्या काहीही नाही, आहे ती केवळ एक स्री, रुख्मिणी! गतजीवन चलचित्रपटाप्रमाणे तिच्या नजरेसमोर साकार झाले.

           विदर्भ देशाच्या भिष्मक राजीची कन्या ही राजकन्या. अमरापुरीजवळचे कौंडण्यपूर ही राज्याची राजधानी. भोजवंशीय राजघराणे. तिची माता शुध्दमती ही नावाप्रमाणेच मनाने शुध्द, सात्विक, सोज्वळ, रुपसंपन्न होती. ती पांच भावांची सर्वात धाकटी लाडकी बहिण होती. त्या सर्वांची नांवे रुख्म शब्दाने सुरु होणारी होती.अनुक्रमे.. रुख्मी, रुख्मरथ, रुख्मबाहू, रुख्मेश आणि रुख्मावली.

‌               आजकाल प्रत्येकाच्या मुखात ब्रजवाशी

 नंदच्या पुत्र कृष्णाचेच नांव होते. मथुरेच्या कारावासात त्याला मारण्या साठी केलेले कंसाचे प्रयत्न, जन्मल्याबरोबर  त्याचे बालपण गोकुळात गेले. तिथे त्याने केलेल्या अपूर्व, अतर्क्य बाललीला,  केलेला  पुतनामावशीचा वध, कालियामर्दन, गोवर्धन पर्वत सारखी अचाट जनशक्ती एकत्र करण्याची कला, पराक्रम, जनसंग्रह करण्याची प्रवृत्ती,गोपालन, गोपींच्या खोड्या असे त्याचे अनेक प्रकारचे वर्णन ऐकून रुख्मिणी 

भारावून जात होती. सर्वांची स्थिती सुध्दा अशीच होती, पण रुख्मीच्या डोळ्यात वेगवेच भाव असायचे. त्या गवळ्याच्या पोराला सर्व जणं एवढं महत्व कां देतात असे म्हणून क्रोधाने पाय आपटत राजसभेतून निघून जाई. त्याच्या या संतापी स्वभावाने  आई वडिलांसहित सारे भिऊन असत. आणि रुख्मिणी? कुणाच्या तोंडून श्रीकृष्णाचे नांव जरी कानी पडले तरी, तिला जगाचा विसर पडे.  श्रीकृष्णाविषयी  एक वेगळी भाववना तिच्या ह्रदयात कधी  रुजली कळलेही   नाही.

           कालचक्र फिरत   होते. वय वाढत होते. प्रत्ये’क स्रीच्याच्या जीवनांत आयुष्यातील कळी फुलतांना बदल होतो. रुख्मिणीमधेही परिवर्तन होत होते. तिचा मोठा भाऊ रुख्मिचे वर्चस्व दिवसेंदिवस इतके वाढले की, तो पित्यालाही जुमानेसा झाला.त्यामुळे त्याच्या वार्‍याला कुणीच राहत नव्हते. त्याचा राग कृष्णावर होता. पण  हाच राग रुख्मिणीच्या जीवनात वादळ उठवणारे ठरेल ही कल्पनाही तिला नव्हहती.

            तारुण्यात पदार्पण केलेल्या वैदर्भिय राजकन्या रुख्मिणीच्या सोंदर्य व बुध्दीमत्तेची कीर्ती त्रिखंडात दुमदुमत होती. आणि आसेतुहिमालय राज्यांचे सम्राट, राजपुत्र तिच्या प्राप्तीसाठी आशा लावून बसले होते, पण त्यांना काय माहित ही  रुपवती आधीच आपले ह्रदय हरवून बसली आहे! आणि नियती तिला हसत होती.

                  क्रमशः
      संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
                   २७-५-२०२२.

2

!!!रूख्मिणी भाग-२!!!

             एके दिवशी रुख्मिणी पुजेत मग्न असतांना तिचा जेष्ठ बंधू खुख्मी प्रवेश करीत म्हणाला, आतां तुझे देव देव करण्याचे दिवस संपलेत. आम्ही तुझे स्वयंवर आयोजित केले आहे. मी आणि तातांनी तुझ्या हिताचा घेतलेला योग्य निर्णय तुला मान्य करावाच लागेल. तू कौंडण्यपुरच्या प्रजेचीच नाही तर, संपूर्ण विदर्भ देशाची लाडकी राजकन्या, पांच बंधूंची धाकटी एकुलती एक बहिण, माता-पित्याची लाडकी लेकच नव्हे तर त्यांचा जीव की प्राण आहेस.तुझ्यावर योग्य संस्कार घडवले आहेत.हा  निर्णय तुझ्या सुखाचा व हिताचा करुनच घेतला आहे.

           तुझे स्वयंवर कुरुष देशाचा राजा दंतवक्र आणि चेदी देशाचा राजा शिशूपाल. दोघेही त्या गवळ्याचे म्हणजे श्रीकृष्णा चे आतेभाऊ आहेत. तुझे स्वयंवर सध्या सार्‍या जगाचे आराध्य दैवत  व मथुरेवर १७ वेळा आक्रमन करणारे,मगध देशाचे सम्राट जरासंधानी ठरवले आहे. ते कंसवधाचा सूड घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. चहु देशांचे राजे त्यांचे मांडलिक आहेत.

त्याच्या विरुध्द जातां येणार नाही. त्यांची इच्छा आहे, जरी, देशोदेशींच्या राजांना आमंत्रीत केले असले तरी, माळ तुला शिशूपालच्याच गळ्यात घालायची आहे. यानिमित्याने  जरासंधाशी मैत्री दृढ झाली की,आपल्या राज्याकडे कुणाची वक्रदृष्टी टाकण्याचे धैर्य होणार नाही.असा सर्व बाजुंनी विचार करुनच हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.आणि आला तसा ताडताड पावले टाकीत निघून गेला.

             रुख्मीच्या समोर आपले विचार व्यक्त करण्याचा तिला धीर झाला नाही. मन आक्रंदत होते. स्वयंवराचा अर्थ काय? स्वतः पतीची निवड करनेच ना? स्वयंवर वैदर्भिय देशीच्या राजकन्येचेच ना? मग तिला जर वर निवडण्याचे स्वातंत्र नसेल तर हे स्वयंवराचे नाटक हवे कशाला? रुख्मीदादा जेष्ठ असला तरी, परंपरेने मिळालेला राजकन्याचा अधिकार स्वतःकडे कसा घेऊ शकतो? “वर” निवडीचा अधिकार केवळ माझा आहे .आणि अगदी अबोध वयापासूनच श्रीकृष्णाची मूर्ती ह्रदयात कोरल्या गेली आहे आणि ते तोडणे त्रैलोक्यात कुणालाही शक्य नाही. तिने ठाम निश्चय केला, विवाह होईल तर श्रीकृष्णाशीच, अन्य कुणाशीही नाही.

           रुख्मिणीने श्रीकृष्णाला मनोमन वरले आहे ही गोष्ट  तिची माता, राजपुरोहित सुदेशकाका, व प्रिय मैत्रीण शीलवती यांना माहीत होते. तातांची एवढी लाडकी पण, रुख्मीपुढे ते हतबल होते, वाढते वय, राजकारभारावरची सैल झालेली पकड, व रुख्मिच्या मागे असलेली सम्राट जरासंघाची शक्ती यामुळे त्यांचे हाती कांहीच नव्हते. माता शुध्दमती लेकीचे अंतरंग जाणून असल्यामुळे ती फार दुःखी होती, पण रुख्मिणी दुसर्‍या कुणाला वरणार नाही याची तिला पक्की खात्री होती. रुख्मीला एकच उद्योग, सतत श्रीकृष्णाची निंदानालस्ती करणे, व शिशूपालची प्रशंसा.

          स्वयंवराचे निमंत्रण श्रीकृष्ण वगळता देशोदेशीच्या सर्व राजांना गेले.कारण श्रीकृष्ण हा कोणत्याही देशाचा अभिषक्त राजा किंवा भावी वारस नसलेला, शिवाय ययाती राजापासून शापित असलेले यादव कुळ. त्यामुळे आपल्यासारख्या कुळवंत कुळात श्रीकृष्णाला बोलावणे शोभणार नाही म्हणून त्याला आमंत्रित केले नाही. वास्तविक जो या त्रिभुवनातील सर्वांचा ह्रदय सम्राट,त्याला या असल्या उपचारांची गरजच काय? पराक्रम,बुध्दी,निःस्पृहता असलेल्या श्रीकृष्णासमोर या दुष्ट पाताळयंत्री लोकांचा निभाव लागणार नाही म्हणून ते भीत होते.

           तिच्या मनांतील भाव जाणून सुदेवकाका म्हणाले, पुत्री चिंता करुं नकोस. इथे आलेले रुथकौशिक महाराज तुझे मन व श्रीकृष्णाची महती जाणून आहे.तुझ्या तांतानाही श्रीकृषाणाने इथे यावेसे वाटते त्यामुळे कांहीतरी उपाय शोधून  त्यांना आमंत्रण जाईलच! श्रीकृष्ण व उध्दव नक्की येतील. श्रीकृष्ण स्वयं दीपस्तंभ आहे. तो तुझ्या जीवनातील अंधःकार दूर करुन, तुझं जीवन सुख,आनंदमाधुर्याने उजळून टाकेल.

                        क्रमशः
      संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                     दि. २-६-२०२२

3

!!!रूख्मिणी भाग-३!!!

           सुदेशकाकांनी दिलेल्या अभिवचनिने रुख्मिणीला धीर  आला.जणूं त्यांच्या मुखातून नियतीच बोलली होती. स्वयंवराचा दिवस जसा जवळ येऊ लागला तसं सगळीकडे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले.संपूर्ण कौंडण्यनगरी, राजवाडा सजू लागला. देशोदेशींच्या राजांकरितां नयनरम्य शिबिरे तयार करण्यात आली.रुख्मिणीला या सार्‍यात कांही गम्य नव्हते. तिचे सारे लक्ष श्रीकृष्ण आगमणाकडे लागले होते. तिला भेटायला मुद्दाम सुदामकाका  श्रीकृष्ण आल्याचा निरोप घेऊन आले, हळूच म्हणाले,त्यांचे शिबिर नगरीच्या सीमे बाहेर दूर उभारले आहे. महाराज क्रथकौशिकांनी श्रीकृष्णाचा विधिवत राज्याभिषेक करुन आपले राज्य अर्पन करुन सिंहासनारुढ केले. त्यामुळे ते अभिषिक्त राजा नाही असे कोणी म्हणू शकणार नाही.ऐकून रुख्मीणीच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. तिला हा आनंद मातेच्या कुशीत शिरुन व्यक्त करायचा होता, पण स्वयंवरासाठी निकटचे  आप्तांचे आगमन झाल्याने ती अतिथीसत्कारात व्यस्त होती. सगळं निरावल्यावर ती मातेच्या कुशीत शिरली.

             प्रेमाने तिच्या पाठीवरुन हात फिरवित माता शुध्दमती म्हणाली, बाळे, श्रीकृष्णाचे पाय या भूमीस लागले हे आपले परम भाग्य. तुझ्या विरहाचा अंत करण्यास केवळ तुझ्यासाठी जरी आले असले तरी, तुझा मार्ग सोपा नाही. मार्गात अनेक संकटे,काटे पसरले आहेत.एखादी अप्रिय घटना घडली तरी हताश होऊ नकोस,धीर सोडू नकोस.अंती विजय तुझाच आहे.

श्रीकृष्णाच्या प्रथम पत्नीपदाचा मान तुझाच असेल, आमचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. आणि आनंदाच्या भरात कृष्णद्वेषी रुख्मीदादाचा विसर पडला. त्याची आठवण येताच मन आशंकित झाले.पण मनी ठाम निश्चय केला, कांहीही झाले या देहात प्राण असेपर्यत कायावाचा मनोभावे लढा देईन पण पती म्हणून कृष्णाशिवाय दुसर्‍या कुणालाच वरणार नाही, माळ घालणार नाही.जणूं तिच्या अंतरंगात आदीशक्ती संचारली आतां कोणत्याही संकटास सामना करण्यास रुख्मिणी सिध्द झाली.

             तिच्या मनात विचार आला, कल्पांतापर्यत स्री ही, मग ती सामान्य कुळातील असो वा राजकुळातील असो, सदैव  ती बंधनांच्या श्रुंखलेतच जखडलेली असते. बालपणापासून ते यौवनापर्यंत पिता, बंधु, नंतर पती व वृध्दत्वात पुत्र यांच्या अधिनच राहावे लागते. स्वातंत्र तिला कधीच नाही.अशाच विचारात ती मातेच्या शेजारी निद्राधीन झाली.

            नेहमी प्रमाणेच तिला स्वप्नात गूढ, मधूर स्मीत मुखावर ठेवून श्रीकृष्ण अगदी तिच्या जवळ येऊन म्हणाले, बघ मी तुझ्यासाठी आलोय! जन्मोजन्मी भेटतो आहोच. या जन्मी तुंच माझी पट्टराणी होशील, पण अजून योग आला नाही. धीर सोडु नकोस.तुला मी वचन देतो. तूं माझा प्राण आहेस.आपला विवाह होणार हे नक्की, फक्त योग्य घडीची वाट पहा. कांही दिवसच! कोणाचे कितीही कटकारस्थान असले तरी ते हाणून पाडण्यास हा यादवकुळातील गवळ्याचा पोर सामना, संघर्ष करण्यास समर्थ आहे. येतो मी.आणि ते निघून गेले. रुख्मिणी दचकुन जागी झाली. कोवळे सूर्यकिरण गवाक्षातून येत होते. म्हणजे ते स्वप्न पहाटेचे होते तर? पहाटेची स्वप्ने खरी होतात ना?

              म्हणजे श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार स्वयंवर स्थगित झाले की काय? विचारायचे कुणाला? प्रिय सखी शिलवतीला नक्कीच माहित असेल. तिच्या उठण्याची वाट पाहत ती आधीच आलेली होती. ती उठल्याबरोबर चिंताग्रस्त चेहर्‍याने आंत आली. सखे, कांही विपरित घडले का? कां तुझे मुख असे चिंताग्रस्त? आधी तू सांग, तुझा चेहरा एवढा अलौकिक तेजाने झळकतोय? मग रुख्मिणीने तिला पहाटेचे स्वप्न सांगीतल्यावर, शिलवतीने तिला घट्ट मिठी मारली. डोळ्यातून अश्रूंचा पूर लोटला. भाववेगाने तीने मिठी सोडून तिचे पदस्पर्श करण्यासाठी खाली वाकली, तोच तिला वरचेवर उचलतच म्हणाली, अगऽ वेडी की काय? सखीला कुणी वाकून नमस्कार करतं का? रुख्मीणीऽऽ रुख्मिणीऽ खरं सांग तूं कोण आहेस? आदीमाया, आदीशक्ती की, साक्षात लक्ष्मी? आणि श्रीकृष्ण कोण आहे? साक्षात नारायण? सांग… सांगऽऽ ना गऽ!

              रुख्मिणी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, अशी वेड्यासारखी विचित्र काय बोलतेस? अंत नको बघू. काय घडले ते लवकर सांग. ती म्हणाली, श्रीकृष्णाने तुला आधीच सांगीतले आहे, आतां मी वेगळे तुला काय सांगणार?श्रीकृष्णा च्या पराभवाला भिऊन, या बलाढ्य राजांनी स्वयंवरातून माघार घेऊन सारे राजे आपलं वैभवी प्रदर्शन गुंडाळून निघून गेलेत. रात्रीतून शिबिर परिसर सुना झाला.त्या थोर योगेश्वराने क्रथकौशिकांनी दिलेलं राज्यपद त्यांचे त्यांना अर्पण करुन स्वतःच्या राज्याकडे प्रस्थान केले. तिचा नुकताच श्रीकृष्णाने निरोप घेतला व गेले. नकळत डोळ्यात अश्रू आले. विरहाचे की आनंदाचे? कळत नव्हते.मन मात्र शांत, निवांत, प्रसन्न झाले.

                      क्रमशः
  संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                दि. २–६-२०२२

4

!!!रूख्मिणी भाग-४!!!

              अनिश्चित काळासाठी स्वयंवर पुढे ढकलल्या गेले. सर्वांच्या लक्षात एक गोष्ट लक्षात आली. श्रीकृष्णाच्या पराक्रमा समोर निर्भयपणे उभे राहण्याचे सामर्थ्य कुणातच नव्हते. स्वयंवर स्थगगितीच्या निर्णयाने वरवर आनंद जरी रुख्मी, जरासंध व शिशूपाल दाखवत असले तरी ते खरे नव्हते. रुख्मीच्या ह्रदयात श्रीकृष्णद्वेष,राग खदखदत होता. हा ज्वालारस कोणत्या रुपात बाहेर पडेल याने रुख्मिणीचे मन धास्तावले होते,तर दुसरीकडे श्रीकृष्णावरच्या गाढ विश्वासाने मन शांतही होत होते.

             श्रीकृष्णाचे पारिपात्य हा एकच हेतू मनात धरुन जरासंध व शिशूपाल आपापल्या राज्याकडे निघून गेले. हळूलळू कौंडण्यपूरचे जनजीवन सुरळीत सुरु झाले. आणि एक दिवस वार्ता आली, पश्चिमेकडून जरासंध, पूर्वेकडून शाल्व दक्षिणेकडून रुख्मी व गांधारदेश निकटचा राजा कालयवन एकदम मथुरेवर श्रीकृष्णावर चालून जात आहे. तिचे चिंताग्रस्त मुख बघून सुदेवकाका म्हणाले, तूं मुळीच काळजी करुं नकोस श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष श्रीविष्णू नारायण! दुष्टांचा संहार करण्यासाठीच त्यांनी अवतार घेतला आहे. या आक्रमणाच्या निमित्याने दुष्ट जरासंघ व कालयवन नष्ट होतील. जरासंधाने शत नरबळी देऊन नरमेध यज्ञाचा संकल्प केला आहे. हा अघोरी यज्ञ श्रीकृष्ण कधीच पूर्ण होऊ देणार नाही. आणि होऽ एक महत्वाची बातमी म्हणजे, श्रीकृष्ण मथुरा सोडून लवकरच  अनावर्तात कायमच्या वास्तव्यास जाणार आहे. पश्चिम दिशेला  सागरातील द्विपावर सुवर्ण नगरीचे निर्माण करणार आहे. अनेक स्थापत्यविशारद, कुशल कारागिर, गर्गऋषींच्या मार्गदर्शनाखाली सुवर्ण नगरी तयार होत आहे. पण काका, परंपरागत मथुरा सोडण्याचे काय प्रयोजन? त्या कुटील जरासंधाने सतरा वेळा मथुरेवर आक्रमण करुन मथुरा साम्राज्य पार खिळखिळं करुन टाकले. आर्थिक, सामाजिक, कृषी सारी व्यवस्था उध्वस्त झादली आहे. सततच्या लढाईने सारेच कंटाळले आहे.मनोधैर्य डळमळीत झाले आहे. केवळ कारण आहे श्रीकृष्ण! जरासंघाच्या  मुली, कंसाच्या पत्न्या श्रीकृष्णामुळे विधवा झाल्यात तो सूड घेण्यास आणि कृष्णवध हा एकच ध्यास जरासंधाने मनी धरला आहे. मथुरेत शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून सुवर्ण नगरीचे आयोजन केले आहे. ज्यांना उग्रसेन महाराजांच्या अधिपत्याखाली मथुरेत राहयचे असेल त्यांनी मथुरेत थांबावे, आणि बाकीच्यांनी श्रीकृष्णा बरोबर सुवर्ण नगरीत प्रस्थान करतील. या नवीन साम्राज्याचे राजे असतील श्रीकृष्णाचे तात वसुदेव! ही महत्वाची माहिती सांगून सुदेव निघून गेले.

              जरासंधाबरोबर वैर नको म्हणून, श्रीकृष्णाविरुध्द तातांची इच्छा नसतांनाही ते व रुख्मी लढायला जाणार होते. चहु बाजुंनी श्रीकृष्णाला कोंडीत पकडायचे होते.श्रीकृष्णाचा पराभव अटळ आहे या भ्रमात रुख्मी गुंग असतानाच कालयवन नाशाची बातमी येऊन थडकली. श्रीकृष्णाने युक्ती वापरली. पळून जाण्याचे नाटक करुन श्रीकृष्ण थेट मुचकंद ऋषींच्या गुहेत पोहचले.त्यांच्या पाठलागावर असलेला कालयवन त्यांच्या मागोमाग गुहेत पोहचला. श्रीकृष्णाने आपले उत्तरीय ध्यानस्थ ऋषीच्या अंगावर टाकून स्वतः लपून बसले. उत्तरीय पांघरुण श्रीकृष्ण बसले आहे हे समजून खसकन उत्तरीय ओढल्याबरोबर ऋषींनी डोळे उघडून त्याच्या कडे पाहिल्याबरोबर कालयवन भस्म झाला. श्रीकृष्णाने एका दगडात दोन पक्षी मारले. कालयवन वधामुळे जरासंध आणि त्याच्या सैन्याचे मनोधैर्य खचले. आणि मथुरेच्या सैन्याच्या रक्ताचा थेंबही सांडले नाही. त्याचवेळी जरासंधाचे आधारस्तंभ असलेले हंस आणि भिंडक या दोन सेनापतीचाही श्रीकृष्णाने युक्तीने काटा काढल्यामुळे निराश जरासंधाने आखणी केलेले महायुध्द टळले.

          श्रीकृष्णाच्या नव्या राजधानीचे नांव द्वारकावती, द्वारका ठेवले. नगरीच्या सीमारक्षक तटांना चारही बाजूंनी चार महाद्वारे होती. राजा म्हणून वासुदेव तर युवराज म्हणून बलराम यांचे विधिवत राज्याभिषेक झाला. अनभिषिक्त श्रीकृष्णाची कीर्ती चहूकडे पसरली. सुवर्णनगरीचे वर्णन ऐकून मन थक्क होई. सुवर्णप्रासाद, प्रशस्त व सुंदर रस्ते, उद्याने, वृक्ष, झरे, शस्रागारे राज्यसभा, राणीवसा ही वर्णने ऐकुन रुख्मिणी मनात म्हणे हे सर्व तुझेच आहे.

             या आनंदात मग्न असतांनाच, एके दिवशी जरासंधाचे पत्र घेऊन त्याचा दूत कौंडण्यपुरी आला.शक्य तेवढ्या लवकर स्वयंवराचे आयोजन करण्याची आज्ञा होती. दूताबरोबरच उत्तर पाठवायचे असल्यामुळे, त्वरेने राजपुरोहिताना बोलावून मुहूर्त काढण्यास सांगीतले. शुक्ल पंचमी तिथी काढण्यात आली व दुताला रवाना केले.

                      क्रमशः
  संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                 दि. २–६-२०२२

5

!!!रूख्मिणी भाग-५!!!

            त्याचवेळी अंतःपुरात वेगळीच योजना आखण्यात आली. मुहूर्तावर रुख्मिणी शिशूपालचा विवाह समारंभ पार पाडणार अशी कल्पना निमंत्रितांना दिल्यामुळे कुणी आक्षेप घेण्याचा प्रश्नच उद्ववणार नव्हता. रुख्मिणी हरण होणार नाही  त्यासाठी सशस्र सैनिक ठीकठीकाणी पेरुन कडेकोट बंदोबस्त ठेवायचे ठरले. रुख्मिणी खाली मान घालून ऐकत होती. रुख्मिणीने स्वतःच शिशूपालशी विवाहाची संमती दिल्यामुळे  स्वयंवराचा प्रश्न आपोआपच निकाली लागेल. श्रीकृष्णाची निंदा ऐकणे असह्य झाल्याने रुख्मिणी आपल्या कक्षात आली. मागोमाग माता शुध्दमतीही. तिला बघून आतांपर्यंत आवरुन धरलेले अश्रू ओघळू लागले. मातेने प्रेमाने पाठीवरुन हात फिरवित म्हणाली, धीर सोडू नकोस. प्रत्यक्ष आपली कुलदेवता अंबिका तुझ्या पाठीशी आहे. उद्या पहाटेच सुदेवांना सोबत घेऊन तिच्या दर्शनाला जाऊ. मातेच्या बोलण्याने तिचे मन शांत झाले व झोपही चांगली लागली.

              दुसर्‍या दिवशी पहाटेच सुचिर्भुत होऊन तिघेही अंबिकामातेच्या दर्शनाला निघाले. मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन दोघींनीही मनोभावे पुजा केली. आणि रुख्मिणीच्या मस्तकात लख्खन वीज चमकली. इथूनच सरळ द्वारका… श्रीकृष्णाकडे! प्रत्यक्ष जगन्मातेनेच दाखवलेला मार्ग कसा पार करायचा तेही ती सुचवेलच! सुदेशकाकांना विश्वासात घेऊन त्यांचेशी बोलण्याचे ठरविले. राजमहालात प्रवेश केला. महाद्वाराच्या बाजूच्या भिंतीवर रामायणातील अनेक प्रसंग रेखाटले होते. एका प्रसंगात हनुमान अशोकवनात सीतेसमोर, रामाने दिलेली खुणेची मुद्रिका घेऊन उभा असलेला पाहिल्या बरोबर तिला कल्पना सुचली. आपणही श्रीकृष्णाकडे दूत पाठवून इथे घडणार्‍या घटना कळवल्या तर? तात्काळ तिने सुदेशकाकांना पाचारण केले. ते केवळ राजकन्येचे पुरोहितच नव्हते तर, तिच्यावर तिचे मातेच्या ममतेचं प्रेम होते. ते आल्यावर तिला सुचलेली कल्पना कथन केल्यावर ते म्हणाले, पुत्री तू कोण आहेस? तुला जगदंबेने मार्ग सुचवला, आतां पटकण पत्र लिहायला घे. तिच लिहायची बुध्दी देईल. पण कुठेही वाच्यता करुं नकोस. मी, माता आणि फक्त तुझ्यामधेच ठेव. तिने कुलदेवतेला वंदन करुन पत्र लिहायला घेतले. इथली सर्व इत्थंभूत माहिती  कळवून शेवटी लिहिले, वेळ फार थोडा आहे, तात्काळ निघावे, प्राण कंठाशी आणून तुमची वाट बघत आहे. लिहिलेले भूजपत्र मखमली थैलीत बंदिस्त केले व मातेला बोलावून पत्राबद्दल सांगीतल्यावर, आशिर्वाद देत माता म्हणाली, सुदेवांच्या गुपचुप जाण्याची व्यवस्था करते. तू निश्चिंत रहा.

             दुसरे दिवशी सुदेवांच्या मातोश्रींच्या प्रकृती अस्वस्थतेचे कारण सांगून तातडीने निघाले. एकएक दिवस सरत होता. विवाहदिवस जवळ येत होता. विवाहाची तयारी जोरात सुरु होती. रुख्मिणी डोळ्यात तेल घालून द्वारकेहून येणार्‍या संदेशाची वाट बघत होती. सुदेवविषयी कोणाला नुसती शंका जरी आली तरी त्यांची प्राणाशी गाठ होती. त्यांनी जीव धोक्यात घालून काम स्विकारले आहे. अशा विचारात गुंग असतांनाच मातेने येऊन सांगीतले, सुदेव द्वारकेस पोहोचले. वार्ता ऐकून डोळ्यांना धारा लागल्या. एकीकडे आनंद तर दुसरीकडे मातेचा वियोग! हा विवाह सर्वसंमत होणार नसल्याने पुढे मातेची भेट होणार की नाही सांगता येत नव्हते.

             शुध्दमतीने  तिला मायेने जवळ घेऊन पुढील जीवनात कसे वागावे हा उपदेश केला. बाळे, स्री जीवनांला महत्वाचे वळण देणारा दिवस तुझ्या आयुष्यात येत आहे. स्री जीवनातलं जणूं हे दोन वेगवेगळे जन्मच असतात. पूर्वीच्या आयुष्यात स्री मायेच्या पंखाखाली, तर विवाहानंतर तिला सर्वांना पंखाखाली घ्यावे लागते. आपल्याविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी बर्‍याच वेळा तडजोड करावी लागते.पुढे म्हणाली, माझे हरण करा म्हणणारी इतिहासात तूं पहिली स्री असशील. श्रीकृष्णासारखा अलौकिक, सर्वगुण संपन्न, पराक्रमी पती मिळायला भाग्य लागते. सर्व कर्तव्ये पार पाडून तू त्यांचा श्वास हो! ऐकरुप हो.सर्वांची आवडती हो, उपदेश करुन माता निघून गेली. विवाहाला एकच दिवस उरला. आज रात्रीपर्यत श्रीकृष्ण कौंडण्यपुरात पोहोचायला हवे होते. अस्वस्थ मन व बेचैनीमुळे तिला रात्रभर झोप आली नाही. सकाळी उठून सौंध्यावर विचार करीत उभी असतांना राज प्रासादाच्या महाद्वाराकडे सुदेशकाका येतांना दिसले. ह्रदय धडधडायला लागले, कोणती वार्ता आणली असेल?

                      क्रमशः
   संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                 दि. ३-६-२०२२

रूख्मिणी चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading