आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१६ एप्रिल, दिवस १०६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी ३२६ ते ३५० सार्थ तुकाराम गाथा अभंग १२६१ ते १२७२
“१६ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १६ Apirl
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १६ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
१६ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी ३२६ ते ३५०,
326-9
लोकपाळरांगेचे । राउत जिये पदीचे । उचैःश्रवा खाचे । खोलणिये ॥326॥
ज्यांच्या सभोवती लोकपालांसारखे राजे चालत असुन, जय मिळविलेले पदवीधर सरदार आहेत, व उच्चैःश्रवा नामक खाजगी कोतवालघोडा आहे.
327-9
हे बहु असो जे ऐसे । भोग इंद्रसुखासरिसे । ते भोगिजती जव असे । पुण्यलेशु ॥327॥
हे असो; याप्रमाणे तोपर्यंत पुण्याचा अंश आहे, तोपर्यंत ते इंद्राच्या सुखासारखे पुष्कळ भोग भोगतात.
ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।
एवंत्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥9. 21॥
328-9
मग तया पुण्याची पाउटी सरे । सवेचि इंद्रपणाची उटी उतरे । आणि येऊ लागती माघारे । मृत्युलोका ॥328॥
मग त्यांच्या पुण्याची पुंजी संपताक्षणीक इंद्रपणाचा अभिमान लोपून ते मृत्युलोकी माघारे येतात.
329-9
जैसा वेश्याभोगी कवडा वेचे । मग दारही चेपू न ये तियेचे । तैसे लाजिरवाणे दीक्षितांचे । काय सांगो ॥329॥
ज्याप्रमाणे वेश्येच्या पायी एखाद्याने आपले सर्व द्रव्य खर्च केल्यानंतर त्याला तिच्या दाराला देखील बोट लावण्याची सत्ता नसते, त्याप्रमाणे या यज्ञकर्त्याची स्थिति फार लाजिरवाणी होते, ती तुला काय सांगूं ?
330-9
एवं थितिया माते चुकले । जीही पुण्ये स्वर्ग कामिले । तया अमरपण ते वावो जाले । अंती मृत्युलोकु ॥330॥
याप्रमाणे, ज्या वेळेस जपावयाचे, त्या वेळेस मला चुकून ज्यांनी पुण्यमार्गाच्याआचरणाने स्वर्गप्राप्ति करुन घेतली, त्यांचे अमरत्व वाया जाऊन शेवटी ते मृत्युलोकी परत येतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
331-9
मातेचिया उदरकुहरी । पचूनि विष्ठेचा दाथरी । उकडूनि नवमासवरी । जन्म जन्मोनि मरती ॥331॥
नंतर मातेच्या उदररूप गुहेत विष्ठेच्या थरांत नऊ महिनेपर्यंत उकडून पक्क दशेत येतात, आणि जन्माला येऊन मरण पावतात.
332-9
अगा स्वप्नी निधान फावे । परि चेइलिया हारपे आघवे । तैसे स्वर्गसुख जाणावे । वेदज्ञाचे ॥332॥
अरे, स्वप्नात प्राप्त झालेला ठेवा जसा जागृत झाल्यावर सर्व नाहीसा होतो, त्याप्रमाणे यज्ञकर्त्याचे सुख आहे असे समज.
333-9
अर्जुना वेदविद जऱ्ही जाहला । तरी माते नेणता वाया गेला । कणु सांडूनि उपणिला । कोंडा जैसा ॥333॥
समज. अर्जुना, ज्याप्रमाणे धान्य काढून घेतलेला कोंडा उफनला असता व्यर्थ होतो, त्याप्रमाणे, वेदार्थज्ञानी जरी झाला, तरी मला जाणल्याशिवाय त्याचा जन्म व्यर्थ होय.
334-9
म्हणऊनि मज एकेविण । हे त्रयीधर्म अकारण । आता माते जाणोनि काही नेण । तू सुखिया होसी ॥334॥
म्हणून माझ्या एकट्याशिवाय हे तीन्ही वेदोक्त धर्म व्यर्थ आहेत; तेव्हा आता मलाच जाण, दुसरे मनात आणू नको, म्हणजे सुखी होशील.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥9. 22॥
335-9
पै सर्वभावेसी उखिते । जे वोपिले मज चित्ते । जैसा गर्भगोळु उद्यमाते । कोणाही नेणे ॥335॥
हे पहा, ज्यांनी आपले चित्त सर्वभावेकरून माझ्याच ठिकाणी उक्ते विकले आहे; ज्याप्रमाणे गर्भातील गोळा कोणताही उद्योग करावयाचे जाणत नाही,
336-9
तैसा मीवाचूनि काही । आणिक गोमटेचि नाही । मजचि नाम पाही । जिणेया ठेविले ॥336॥
त्याप्रमाणे ज्यांना माझ्या वाचून दुसरे काहीच चांगले दिसत नाही, व ज्यांनी माझ्याचकरिता आपला जीव ठेवला आहे,
337-9
ऐसे अनन्यगतिके चित्ते । चिंतितसांते माते । जे उपासिती तयाते । मीचि सेवी ॥337॥
अशा प्रकारे एकनिष्ठ अंतःकरणाने जे माझे चिंतन करुन माझी सेवा करतात, त्यांची सेवा मीच करतो.
338-9
ते एकवटूनि जिये क्षणी । अनुसरले गा माझिये वाहणी । तेव्हाचि तयांची चिंतवणी । मजचि पडली ॥338॥
ते ऐक्यतेस पावून ज्या वेळेस माझ्याच भजनी लागले, त्याच वेळी त्यांचीचिंता मला पडली.
339-9
मग तीही जे जे करावे । ते मजचि पडिले आघवे । जैशी अजातपक्षांचेनि जीवे । पक्षिणी जिये ॥339॥
मग जे जे काही करण्याचे ते मनात आणतात; ते सर्व मला करावे लागते. ज्याप्रमाणे पंख न फुटलेल्या पक्ष्यांच्या जीवनाकरिता पक्षिणीच सारखी खटपट करीत असते,
340-9
आपुली तहानभूक नेणे । तान्हया निके ते माउलीसीचि करणे । तैसे अनुसरले जे मज प्राणे । तयांचेन काइसेनिहि न लजे मी ॥340॥
कींवा, आपली तहानभूक न जाणता, आपल्या तान्ह्या लेकरास जे सुखकारक तेच आईला करावे लागते, त्याचप्रमाणे, ज्यांनी मनापासून सर्व भार मजवर टाकला आहे,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
341-9
तया माझिया सायुज्याची चाड । तरि तेचि पुरवी कोड । का सेवा म्हणती तरी आड । प्रेम सुये ॥341॥
त्यांचे सर्व इच्छित मीच पूर्ण करतो. त्यांना माझ्या ऐक्याची इच्छा झाली, तर मी त्यांचे कौतुक पुरवितो; किंवा माझी सेवाच करावी असे ते म्हणतील, तर त्यांच्या व माझ्यामध्ये प्रेमभाव उत्पन्न करतो.
342-9
ऐसा मनी जो जो भावो । तो तो पुढा पुढा लागे तया देवो । आणि दिधलियाचा निर्वाहो । तोहि मीचि करी ॥342॥
याप्रमाणे ते आपल्या मनात जी जी इच्छा करतात, ती ती वारंवार मला पुरवावी लागते; आणि जे त्यांना दिलेले असते, त्याचे रक्षणही मीच करतो.
343-9
हा योगक्षेमु आघवा । तयांचा मजचि पडिला पांडवा । जयाचिया सर्वभावा । आश्रयो मी ॥343॥
हे पांडवा, ज्यांचा सर्व भाव मजवरच असतो, त्यांचा योगक्षेम मजवरच पडतो.
येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता: ।
तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् ॥29. 3॥
344-9
आता आणिकही संप्रदाये । परि माते नेणती समवाये । जे अग्नि-इंद्र-सूर्य-सोमाये । म्हणऊनि यजिती ॥344॥
आता मी सर्वव्यापकरूपाने आहे असे न जाणून प्रत्येक सांप्रदायिक लोक अग्नि, इंद्र, सुर्य, चंद्र यांना मीच जाणून भजतात;
345-9
तेही कीर मातेचि होये । का जे हे आघवे मीचि आहे । परि ते भजती उजरी नव्हे । विषम पडे ॥345॥
ते त्यांचे पूजन खरोखर माझेच होते, कारण या सर्व जगात मीच भरून राहिलो आहे, परंतु ते त्यांचे भजन पद्धतशीर नसून चुकलेले असते
346-9.
पाहे पा शाखा पल्लव वृक्षाचे । हे काय नव्हती एकाचि बीजाचे । परि पाणी घेणे मुळाचे । ते मुळीचि घापे ॥346॥
हे पहा, वृक्षांच्या शाखा, पाने वगैरे एकाच बीजापासून उत्पन्न झालेली नव्हत का ? परंतु पाणी जे घालावयाचे, ते मुळाशीच घातले पाहिजे;
347-9
का दहाही इंद्रिये आहाती । इये जरी एकेचि देहीची होती । आणि इही सेविले विषयो जाती । एकाचि ठाया ॥347॥
किंवा दहा ईंद्रिये जरी एकाच देहाची आहेत, आणि त्यांनी सेवन केलेले विषय जरी एकाच ठिकाणी जातात,
348-9
तरि करोनि रससोय बरवी । कानी केवि भरावी । फुले आणोनि बांधावी । डोळा केवि ॥348॥
तरी उत्तम स्वयंपाक करून तो कानांत कसा घालावा ? आणि फुले आणून डोळ्यांनी कशी हुंगावी ?
349-9
तो रसु तो मुखेचि सेवावा । परिमळु तो घ्राणेचि घ्यावा । तैसा मी तो यजावा । मीचि म्हणोनि ॥349॥
तर अन्न हे तोंडानेच सेवन केले पाहीजे, आणि सुवास हा नाकानेच घेतला पाहिजे, त्याचप्रमाणे माझी पुजा करणे ती मीच समजून केली पाहिजे.
350-9
येर माते नेणोनि भजन । ते वायाचि गा आनेआन । म्हणोनि कर्माचे डोळे ज्ञान । ते निर्दोष होआवे ॥350॥
एरव्ही, मला न जाणता जे भजन ते, करणे काही तरी असून व्यर्थ होय. म्हणून, कर्म आचरण्यास ज्ञान ही दृष्टि आहे; तर ते ज्ञान निर्दोष असे झाले पाहिजे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च ।
न तु मामभिजानंति तत्वेनातश्च्यवंति ते । 9. 24 ।
दिवस १०६ वा, १६, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १२६१ ते १२७२
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. १२६१
आपुलिया बळे नाही मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ॥१॥
साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥धृपद॥
काय म्या पामरे बोलावी उत्तरे । परि त्या विश्वंभरे बोलविले ॥२॥
तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा । वागवी पागुळा पायाविण ॥३॥
अर्थ
मी माझ्या सत्तेने बोलत नाही तर कृपावंत सखा असा हा पांडुरंग तोच माझ्या वाणीने बोलत आहे. साळुंकी मंजुळ शब्दात बोलते पण तिला शिकविणारा धनी वेगळाच असतो. मी पामर आहे मी काय कोणाला उपदेश करणार परंतु विश्वंभर माझ्या मुखातून उपदेश करून घेत आहे इतरांना उपदेश तोच करत आहे. तुकाराम महाराज म्हणतात हरीचे कौशल्य कोणाला कळले आहे काय तो तर पागळ्या माणसालाही पाया विण चालवू शकतो.
अभंग क्र. १२६२
हित सांगे तेणे दिले जीवदान । घातकी तो जाण मनामागे ॥१॥
बळे हे वारावे आडरान करिता । अंधळे चालता आडराने ॥धृपद॥
द्रव्य देऊनिया धाडावे तीर्थासी । नेदावे चोरासी चंद्रबळ ॥२॥
तुका म्हणे ऐसे आहे हे पुराणी । नाही माझी वाणी पदरीची ॥३॥
अर्थ
जो आपल्या हिताचा उपदेश करतो त्याने आपल्याला जीवदान दिले आहे असेच समजावे. आणि तू तुझ्या मनासारखा कसाही वाग असे सांगणारा जो असतो तो घातकी आहे असे समजावे. एखादा जर अधर्माच्या मार्गाने चालत असेल तर त्याला बळच सन्मार्गाला लावावे जर आड मार्गाने कोणी चालत असेल तर त्याला चांगल्या मार्गाने आणून सोडावे. आपल्याकडे पैसे असतील त्यास मदत करून तीर्थयात्रेस पाठवावे परंतु चोराला सहाय्य करून पाप करून घेऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या पदरच्या वाणीने मी काहीही सांगत नाही तर हे सर्व पुराणात वर्णन केले आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे.
अभंग क्र. १२६३
ऐसा घेई का रे संन्यास । करी संकल्पाचा नाश ॥१॥
मग तू राहे भलते ठायी । जनी वनी खाटे भोई ॥धृपद॥
तोडी जाणिवेची कळा । होई वृत्तीसी वेगळा ॥२॥
तुका म्हणे नभा । होई आणुचा ही गाभा ॥३॥
अर्थ
अरे तू असा संन्यासी हो की तुझ्या अहंतेचा सर्व संकल्पाचा नाश होईल, मग तू कुठेही रहा अगदी जनात, वनात, खाटेवर, जमिनीवर कुठेही रहा काही हरकत नाही. “मला सर्व समजते” हे बंधन तु तोडून टाक. अगदी मी ब्रम्ह आहे या वृत्ती होऊनही तू वेगळा होय. तुकाराम महाराज म्हणतात तु सर्वाच्या पेक्षा वेगळा म्हणजे आकाशापेक्षाही मोठा आणि अनु रेणु पेक्षाही लहान म्हणजे अनु रेणु चा गाभा होय.
अभंग क्र. १२६४
सोळा सहस्र होऊ येते । भरले रिते आह्मापै ॥१॥
ऐसे तुम्हा ठायाठाव । म्हणे देव संपादे ॥धृपद॥
कैची चिरामध्ये चिरे । मना बरे आले तै ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । अंगसंगा भिन्न करा ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही सोळा सहस्त्र बायका करता एवढे रूप धारण करता मग आमच्या साठी वेगवेगळे रूप का धारण करत नाही ? देवा तुम्हाला कोणतेही रूप धारण करता येते, आणि त्यांची संपादणीही करता येते. देवा द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस द्रौपदीला वस्त्र देऊन तिचे लज्जारक्षण तुम्ही केले वस्त्रात वस्त्र केले त्यावेळी तुमच्या मनात असे करावे हे कसे बरे आले ? तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा तुम्ही आम्हाला तुमच्यापासून दूर करता हे बरे नाही.
अभंग क्र. १२६५
इहलोकी आम्हा भूषण अवकळा । भोपळा वाकळा अन्न भिक्षा ॥१॥
निमोली संपदा भयविरहित । सर्वकाळ चित्त समाधान ॥धृपद॥
छिद्राचा आश्रम उंदीरकुळवाडी । धन नाम जोडी देवाची ते ॥२॥
तुका म्हणे एक सेवटी राहणे । वर्तता या जना विरहित ॥३॥
अर्थ
इहलोकांमध्ये आम्हाला भूषण म्हणजे काय तर पाणी पिण्यास भोपळा, अंगावर पाघरण्यास गोधडी आणि खाण्यास भिक्षेचे अन्न, आमचे भूषण हेच आहे. कारण ही संपदा भय विरहित आहे हिला कसल्याही प्रकारचे भय नाही. आणि या संपदेमुळे चित्ताला सर्वकाळ समाधान राहते. आमचे घर म्हणजे अनेक प्रकारचे छिद्रांचे त्यामध्ये अनेक प्रकारचे उंदीर आहेत आणि हरी नाम घेणे हेच आमचे धन आहे. तुकाराम महाराज म्हणतात शेवटी आम्हाला या घरात एकटे राहावे लागणार आहे कारण आम्ही सर्व जन, लोकापेक्षा वेगळे वर्तन करतो व वेगळ्या वर्तनाने वागतो आहोत.
अभंग क्र. १२६६
गाऊ नेणे कळा कुसरी । कान धरोनि म्हणे हरी ॥१॥
माझ्या बोबडिया बोला । चित्त द्यावे बा विठ्ठला ॥धृपद॥
मज हंसतील लोक । परि मी गाईन निःशंक ॥२॥
तुझे नामी मी निर्लज्ज । काय जनासवे काज ॥३॥
तुका म्हणे माझी विनंती । तुम्ही परिसा कमळापती ॥४॥
अर्थ
देवा उत्तम प्रकारे कसे गावे हे मला कळत नाही परंतु तुझ्यापुढे मी दोन्ही कान धरून मी नाचत आहे. हे विठ्ठला माझ्या बोबड्या शब्दांकडे तू तुझे चित्त द्यावे, लक्ष द्यावे. माझे बोबडे शब्द ऐकून मला लोक हसतील पण मी कोणतीही शंका किंवा संकोच न करता तुझ्यापुढे तुझे गुणगान गाईन. देवा तुझे नाम घेण्यासाठी मी निर्लज्ज झालो आहे मग आता मला या लोकांशी काय काम ? तुकाराम महाराज म्हणतात हे कमलापती तुम्ही माझी विनंती एवढी ऐका.
अभंग क्र. १२६७
विष पोटी सर्पा । जन भीते तया दर्पा ॥१॥
पंच भूते नाही भिन्न । गुण दुःख देती शीण ॥धृपद॥
चंदन प्रिय वासे । आवडे ते जातीऐसे ॥२॥
तुका म्हणे दाणा । कुचर मिळो नये अन्ना ॥३॥
अर्थ
सापाच्या पोटी विष असते म्हणून लोक त्याला भितात. सर्वाचे देह पंचमहाभूतांपासूनच बनवलेले आहेत. ते भिन्न नाही परंतु ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या गुणामुळे सुख दुःख प्राप्त होते. चंदनाच्या वासामुळे चंदन आवडते त्याप्रमाणे ज्याच्या-त्याच्या गुणानुसार लोकांना जो तो आवडतो. तुकाराम महाराज म्हणतात अन्न जर शिजले तर त्यामध्ये सर्व अन्न शिजते पण एखादा कुच्चर दाणा असतोच की तो शिजत नाही आणि तो अन्नात मिसळतही नाही तो कडकच असतो त्याप्रमाणे यावरून असे सिद्ध होते की सर्वत्र पंचभुताची व्याप्ती आहे परंतु प्रत्येकाचा गुणधर्म भिन्नभिन्न आहे.
अभंग क्र. १२६८
देव अवघे प्रतिपादी । वंदी सकळा एक निंदी ॥१॥
तेथे अवघे गेले वाया । विष घास एके ठाया ॥धृपद॥
सर्वांग कुरवाळी । उपटी एक रोमावळी ॥२॥
तुका म्हणे चित्त । नाही जयाचे अंकित ॥३॥
अर्थ
काही लोक सर्वत्र देव आहे असे सांगतात आणि सर्वाना वंदन ही करतात. पण एखाद्याची पुष्कळ निंदाही ते करत असतात. हे असे केल्याने त्याचे सर्व कर्म वाया जातात. जसे एकाच ताटात मिष्टांन्न आणि वीष असावे त्याप्रमाणे काही लोकांच्या ठिकाणी ब्रम्हज्ञान आणि वाईट प्रकृती असतात. हे मनुष्य असे वागतात की एखाद्याच्या अंगावरून प्रेमाने कुरवाळायचे आणि दुसरीकडे त्याच्या अंगावरील एक केस हळूच उपटायचा. तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे चित्त त्याच्या स्वाधीन नाही त्याचे वागणे आणि बोलणे वेगवेगळे असते त्यामुळे त्याचे सर्व केलेले कर्म वाया जाते.
अभंग क्र. १२६९
मज माझा उपदेश । आणिका नये याची रीस ॥१॥
तुम्ही अवघे पांडुरंग । मी च दुष्ट सकळ चांग ॥धृपद॥
तुमचा मी शरणागत । काही करा माझे हित ॥२॥
तुका पाय धरी । मी हे माझे दुर करी ॥३॥
अर्थ
मी केलेला उपदेश हा माझ्या कल्याणाकरिताच आहे त्यामुळे त्याचा कोणीही ताप मानुन घेऊ नये. तुम्ही सर्व पांडुरंगा समान आहात तुम्ही सगळे चांगले आहात मात्र तेवढा मीच दुष्ट आहे मी तुम्हाला शरण आलेलो आहे. तेव्हा तुम्ही माझे काहीतरी हित करा. तुकाराम महाराज म्हणतात मी तुमचे पाय धरले आहेत त्यामुळे आता तुम्ही “मी आणि माझा” हा भ्रम दूर करा.
अभंग क्र. १२७०
जाणे त्याचे वर्म नेणे त्याचे कर्म । केल्याविण धर्म नेणवती ॥२॥
मैथुनाचे सुख सांगितल्या खूण । अनुभवाविण कळो नये ॥२॥
तुका म्हणे जळो शाब्दिक हे ज्ञान । विठोबाची खूण विरळा जाणे ॥३॥
अर्थ
जाणत्याचे वर्म आणि अज्ञानी माणसाची कर्म हे घडल्या वाचून त्यांचा अनुभव येत नाही. आणि विधीयुक्त कर्म केल्यावाचून कर्म धर्मरूप होत नाही. मैथुनाचे सुख सांगितल्यावर कळत नाही तर ते प्रत्यक्ष अनुभवानेच कळून येईल. तुकाराम महाराज म्हणतात जो म्हणतो की मी ब्रम्ह जाणले आहे त्या शब्दज्ञान्याला आग लागो आणि ज्याने विठोबाला साधले आहे तो सर्वापेक्षा निराळाच आहे.
अभंग क्र. १२७१
अभिमानी पांडुरंग । गोवा काशाचा हो मग ॥१॥
अनुसरा लवलाही । नका विचार करू काही ॥धृपद॥
कोठे राहतील पापे । जालिया हो अनुतापे ॥२॥
तुका म्हणे ये चि घडी । उभ्या पाववील थडी ॥३॥
अर्थ
आपला अभिमान जर साक्षात पांडुरंग धरीत आहे तर मग आपल्याला अडचणच कशाची आहे ? त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विचार न करता पांडुरंगाला लवकर शरण जावे. जर केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला तर पाप राहीलच कोठे ? तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्ही खर्या भक्तिभावाने पांडुरंगाला शरण गेलात तर तुम्हाला तो त्याच घटकेला उभ्या संसारातून पैलतीराला पोहोचवेल.
अभंग क्र. १२७२
तुझे वर्म हाती । दिले सांगोनिया संती ॥१॥
मुखी नाम धरीन कंठी । अवघा सांडवीन पोटी ॥धृपद॥
नवविधा वेढिन आधी । सापडलासी भावसंधी ॥२॥
तुका म्हणे बळिये गाढे । कळिकाळ पाया पडे ॥३॥
अर्थ
देवा तुझ्या प्राप्तीचे वर्म संतांनी माझ्या हाती दिली आहे ते वर्म असे आहे की, मी माझ्या मुखाने तुझे नाम घ्यावे आणि ते कंठात धारण करावे आणि मी तुला माझ्या हृदयात साठवून ठेवावे. देवा तू तर माझ्या भक्तिप्रेमात आधीच गुंतलेला आहे. आता मी तुला नवविधाभक्ति ने वेढून टाकील. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही इतके बलवान झालो आहोत की कळीकाळ देखील आमच्या पाया पडतो.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















