1. भागः-१ पितामह भीष्माचार्यः संपूर्ण चरित्र (कादंबरीरुपात)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

पितामह भीष्माचार्यः ही संपूर्ण चरित्र लेखमाला मीनाक्षीताई देशमुख यांनी ती संकलित अर्थात (कादंबरीरुपात) या लेखमालेचे संकलन केले असून एकूण २५ भाग असून येथे वाचण्यासाठी सोपे व्हावे म्हणून मूळच्या ५ भागाचा १ भाग बनविला आहे. याची नोंद घ्यावी.
Part:-1 Pitamah Bhishmacharya: Complete Biography (Novel Form), Pitamah Bhishma Complete Biography

पितामह भीष्म संपूर्ण चरित्र

भागः-१

पुर्वजन्मी राजा शंतनु महाभिष नामक इक्ष्वाकु कुलभुषक होते. त्यांनी केलेल्या धर्मचारणानं आणि यज्ञांनी स्वर्गलोकी देवसभेत बसण्यास जागा मिळाली. तीथे अचानक गंगेन प्रवेश केला. तीच्या अनुपम सौंदर्याने दोघेही एकमेकांकडे आकृष्ट झाले. ब्रह्मदेवांना त्यांचे हे वर्तन विकारयुक्त वाटल्याने त्यांनी दोघांनाही भूतलावर जाण्याची आज्ञा दिली. ते म्हणाले, “ज्या भूमीचं वैशिष्ट्य विकार आहे त्या भूमीवर ते पुर्णतः भोगुन परत या.”

त्यावेळी ते ब्रह्मदेवाला म्हणाले, “विकार हे भूमीच वैशिष्ट्य नसुन मानवी देहाचं कारण आहे जे तुम्ही योजलेलं आहे.” असे म्हणुन शंतनू स्वतःचे क्षेत्र शोधार्थ निघाले. बरीच वर्षे लोटली. ययातीच्या कुळातील वंशज दुष्यंतपुत्र भरतांचे वंशज आणि या लोकीचे त्यांचे पिता पतीप गंगाकिनारी योगसाधना करीत असतांना गंगा त्यांचेसमोर जाऊन शंतनूबरोबर लग्न करण्याचा मानस व्यक्त केला. त्यांनी ती मान्य केली. गंगा भूलोकी निघाली असतां तीला अष्टवसूंनी भेटुन सांगीतले की, “वशिष्ठ मुनींचा उपमर्द केल्याने शापग्रस्त झालो आहोत.” अष्टवसूनांही कामना निर्माण झाली, पण स्वर्गलोकात कामनेला स्थान नसल्यामुळे ते भूलोकी आले. त्यांनी द्यू नावाच्या वसूला आपलं सर्व सामर्थ्य देऊन भूलोकी त्यांना नाममात्र जन्माला येण्यासाठी पाठवले, पण जन्म मानवाच्या गर्भातुन नको म्हणुन गंगेला प्रार्थना केली.

शंतनू गंगेच्या सौंदर्याने एवढे प्रभावित झाले की, तीने केलेल्या अटी त्यांनी बिनशर्त स्विकारल्या. तीने स्वतःच्या स्वातंत्र्याची मागणी करुन म्हटले की, कोणत्याही कृत्त्याबद्दल विचारायचे, हटकायचे नाही. ज्यावेळी उल्लंघन होईल त्या क्षणी आपल्या जीवनांतुन निघुन जाईन. त्याप्रमाणे त्यांनी कबुल केले. लग्न झाल्यावर सातही मुले तीने गंगेत अर्पण करतांना हताशपणे व दुःखाने पाहण्याशिवाय कांहीच करु शकत नव्हते. परंतु आठव्यावेळी राजपत्नी गंगा जेव्हा गर्भवती झाली तेव्हा लोकक्षोम, आणि प्रिय पत्नीचा, सम्राज्ञीचा प्रजाजनांकडुन अवमान होण्यापेक्षा स्वतःच जाब विचारायचे ठरवुन आठव्या मुलाच्या वधापासुन अडवलं. झालं! ठरल्याप्रमाणे गंगा त्यांना जातांना वात्सल्यभरल्या नजरेनं पाहत म्हणाली, “हा बाळ फार लहान आहे, त्याचे योग्य संगोपन करुन योग्य वेळी परत करीन.”

लोकक्षोभ व झालेल्या घटना आणि गंगेचा विरह यातुन सुटण्यासाठी शंतनु यमुने किनारी हस्तीनापुरला कुरुंची राजधानी करुन जीवन व्यतीत करु लागले.

एक दिवस शंतनू मृगाची शिकार करीत असतांना जखमी मृगाच्या मागे जातांना ते भागीरथीच्या पात्रात मध्यभागी उभे राहिले असतां भागीरथीचा जलप्रवाह एकदम रोडावलेला दिसला म्हणुन आश्चर्याने भांबावुन चहुबाजुने पाहत असतांना त्यांना दिव्यज्योतयुक्त बालक आपल्या बाणांनी नदीवर बांध बांधीत असलेला दिसला. त्या बालकाचे डोळे पाहुन त्यांना गंगेची आठवण झाली. मनात म्हणाले, “गंगे! वियोगाचे दूःख विसरण्यासाठी असा रानावनात भटकत असतो. तू सातही मुलांना तुझ्याच जलात बुडविले. आठव्याला सोबत नेलेस. तुझा जलप्रवाह थांबवणे फक्त कैलासपती आणि दुसरा हा तुझा पुत्रच असु शकतो.” त्याचवेळी जलप्रवाहातुन त्या बालकाचे बोट धरुन गंगा प्रगटली.

क्रमशः

संकलन – मिनाक्षी देशमुख

भागः-२

भीष्म

गंगा पुर्वीसारखीच चिरतरुण दिसत होती. तीच्या तोंडवळ्यावर गेलेला तो बालक नुकताच तारुण्यात पदार्पण करीत असलेला दिसला. गंगाने त्यांना सांगीतले हा आपला *आठवा पुत्र!* आधीच्या सात पुत्रांची खंत न करतां या *देवव्रताला* सांभाळा. हा आठवा पुत्र देवव्रत आपला सर्व शोक नष्ट करेल. याला वशिष्ठांनी वेद आणि त्याचे सहाही अंग शिकविलीत. बृहस्पती आणि शुक्राचार्यांनी सर्व अस्र शस्रांमधे पारंगत आणि प्रविण केले. आता याला युध्दशास्रातील सुक्ष्मता, राजधर्म, अर्थशास्राचा ज्ञाता, दुर्जेय योध्दा होण्यासाठी भगवान परशुरामाच्या आश्रमी पाठवावं !

हा वसु नामक देवतांमधील “द्यौ” नावाचा नववा वसु असुन महर्षि वशिष्ठांच्या शापाने या जन्मात अवतीर्ण झाला. देवव्रताला सोबत घेऊन शंतनू हस्तीनापुरला आले. त्यांचा उत्साह ओसंडुन जाऊ लागला. हस्तीनापुरच्या कार्यात दोघेही कार्यमग्न झाले. अशातच एके दिवशी उन्मत्त क्षत्रियांचे निर्दालन करणारे कर्मकठोर महापुज्य, नवीन भूमी, नवसमाज निर्माण करणारे भूतलावरचे एकमेव सर्जनहार परशुरामांनी देवव्रताला महेंद्र पर्वतावर पाठवण्याची आज्ञा केली.

महेंद्र पर्वतावर देवव्रत अनेक कष्ट करुन शस्रविद्येचे धडे, परशुविद्या, वायव्य विद्या, अनेक प्रकारचे अस्र, शस्राचे ज्ञानार्जन करीत होते. या काळात त्यांना सहनशीलता आणि कार्यशक्ती मिळाली. प्राणायम आणि प्रणवोपासनेतुन शारीरीक शक्ती प्राप्त झाली. वेदपठणांनी आणि उपनिषदांच्या वैदिक तत्वज्ञानाने नितिशास्र धर्मतत्व प्राप्त झाली. ते देवदत्तांना म्हणाले धनुर्विद्यापेक्षा धर्मचर्चा आणि राजधर्मापेक्षा राजनितित प्राविण्य मिळवावे लागेल.

परशुरामांच्या सानिध्यात सर्व प्रकारची विद्या ग्रहण करुन देवव्रत हस्तीनापुरला प्रवेशले. त्यांनी हस्तीनापुरचा व आजुबाजुचा सर्वांगीन विकास केला. युध्द सामुग्री, त्याचे उत्पादन, रथ गाड्यांचे कारखाने, वस्रोद्योग, कलाकुसर, वास्तुकला, नृत्य-संगीत आणि शस्र शिक्षणाला गती दिली. देवव्रताला उसंत नव्हती. देवव्रताने सर्व जबाबदारी उचलल्यामुळे शंतनूला एकटेपणाची जाणीव व्हायला लागली. पत्नी गंगा जाऊन तप लोटली. हस्तीनापुरच्या राजप्रसादात शंतनुला घर नव्हते.

शंतनूला फार एकटं एकटं व अस्वस्थ वाटत होत म्हणुन थोडा बदल व्हावा या दृष्टीने ते यमुना काठावर आले. तीथे त्यांना अत्यंत मधुर पण उग्र वाटावा असा गंध येऊ लागला. त्यांनी गंध कुठुन येतो त्याचा मागोवा घेत गेले असतां त्यांच्या दृष्टीस एक नावाडी कन्या पडली. अप्रतिम सौंदर्य! सुडौल देह, चपळ पण निर्भय कोळ्याची पुत्री *मत्स्यगंधा* होती.

अनेक वर्षांचे संयमाचे बांध फुटण्याची वेळ आल्यासारखे वाटले. ते नावेतुन तीच्या पित्याकडे येऊन थेट मागणीच घातली. पण त्याने अट घातली की, हिला होणारा पुत्र हस्तीनापुरच्या सिंहासनावर बसेल. तिथुन ते उदास मनःस्थीतीत परतले. ही व्यथा वयाच्या कोणत्याही अवस्थेत पिडीत करते..

देवव्रताने राजसारथ्याला विश्वासात घेऊन पित्याच्या दुःखाचे,उदासीनतेचे, व्यथेचे कारण जाणुन घेतले. आता पितृधर्माचा नवा अध्याय विश्वाला पहायचा होता. देवव्रत सरळ धीवर दाशराज समोर जाऊन पित्यासाठी मागणी घातली. त्याच्या अटीप्रमाणे तीचीच मुलं राजपदावर बसतील. पण धीवरचे समाधान न झाल्याने देवव्रताने यमुनाजल हाती घेऊन “ग्रहतारे, वायु, जलदेवतांच्या साक्षीने प्रतिज्ञा केली की, हा शंतनूपुत्र देवव्रत आजन्म ब्रम्हचारी राहील” आणि हीच *भीष्मप्रतिज्ञा* म्हणुन सर्वश्रृत झाली.

क्रमशः

संकलन – मिनाक्षी देशमुख.

भीष्मः

भागः-३

देवव्रताने माता गंगेला दिलेल्या वचनानुसार वडिलांना सुखी ठेवण्यासाठी स्वतःच्या सर्व सुखाचा त्याग करणं म्हणजे पितृऋणातुन कांही अंशी मुक्त होण्यासारखं नाही का? धर्मशील भीष्माच्या कर्मकर्तव्यात मातृधर्मानं प्रवेश केला.

दुसर्‍या दिवशी प्रातःकाळी मत्सगंधेला घेऊन परतीच्या प्रवासाला देवव्रत (भीष्म) निघाले. विवाहानंतर मत्स्यगंधाची ‘सत्यवती’ झाली. ब्रम्हचर्य व्रताचं पालन करण्यासाठी देवव्रत भीष्म हस्तीनापुरच्या भूमीपुत्रांना आर्य जीवनशैली देत एकटा फीरुं लागले.

देवव्रताने सत्यवतीला पित्याकडे सोपवले. भीष्माचे हे लोकोत्तर कार्य बघुन प्रसन्न झालेल्या शांतनुने देवव्रताला इच्छामृत्युचे वरदान दिले.

सत्यवतीपासुन महाराज शंतनूला चित्रगंद आणि विचित्रविर्य असे दोन पुत्र झाले. चित्रगंद १६ वर्षाचा झाला नाही तोच शांतनूचे प्राणोक्रमण झाले. चित्रगंद गादीवर बसला, परंतु थोड्याच दिवसात गंधर्वबरोबरच्या युध्दात मारला गेला. विचित्रविर्य लहान असल्यामुळे भीष्मांच्या देखरेखेखाली शासन करुं लागला. भीष्मांना पुनः राज्यव्यवहारात लक्ष घालणे भाग पडले.

भीष्म विचार करुं लागले त्यांच्यातील दोन मनांच्या द्वदांचा. एका मनाला हवं ते सांपडल्याचा समाधान, पित्यासाठी स्वसुखाला तिलांजली दिली हे अलौकीकच नाही काय ? रामाने पित्याच्या आज्ञेनुसार १४ वर्षे वनवास भोगला. परंतु गेलेले ऐश्वर्य परत लाभेल याची खात्री तरी होती, पण भीष्मांच्या बाबतीत तसेही नव्हते. तसं राज्य हे नश्वरच! मनगटाच्या जोरावर मिळवु शकतं.

आणि दुसरं मन ! पित्याचं दुःख नाहीसं करण्यासाठी आजन्म ब्रम्हचर्यव्रत स्विकारण्याची प्रतिज्ञा! शेवटी शरीरधर्म आहेच ना ! वडिलांचच उदाहरण समोर आहे. गंगेच्या विरहानं ते विचारी असुनही सत्यवतीच्या मोहात अडकलेच ना ! प्रजाहितदक्ष, जनकल्याणासाठी क्षण क्षण झिजणारे शरीराने द्रोह केल्यावर शरीरसुखासाठी कर्तव्यच्युत झालेच ना !

तारुण्यात नुकतेच पदार्पण झालेले, वेदाभ्यासी, शस्र-अस्र विद्या निपुन असले आज शरीरात बळ असल्यामुळे आजन्म ब्रम्हश्चर्य व्रत स्विकारण्याची अविवेकी प्रतिज्ञा प्रतिज्ञा केल्यामुळे मनाला जरी समाधान लाभले, कर्तव्य बजावल्याच्या आंनदात आकंठ डुंबले तरी, उद्या शरीर जागृत झाले, त्यालाही भूक असते, जिथे देवाधिदेव इंद्राला अहिल्येचा मोह झालाच ना !

एक दिवस शारीरीक भूकेने पिडीत झालेवर विवेक! सदाचरण, वेदाभ्यास हे सर्व शारीरीक भूकेसमोर स्वाहा होईल आणि केलेली प्रतिज्ञाही! या सर्व उहापोहातुन मनावर विजय मिळवला. निश्चय केला, दुर्वर्तनाला फिरकु देणार नाही, विवेक सोडणार नाही. हयातभर प्रतिज्ञेबरहुकुम वर्तन करुन भीष्म उपाधीला कलंक लागु देणार नाही. आजन्म ब्रम्हश्चर्य व्रताचे पालन करु! दोन्ही मनाचे द्वंद संपले. भीष्मांना पुनः आनंद प्राप्त झाला. मन शांत शांत झाले.

क्रमशः

संकलन – मिनाक्षी देशमुख.

भीष्मः

भागः-४

सत्यवती आणि भीष्मांना विचित्रविर्याच्या लग्नाची चिंता लागली. पित्याच्या भोगेच्छासाठी सत्यवतीला आणले, त्याच मातेच्या आज्ञेने ब्रम्हचारी भीष्मांना प्रसंगी हरण करायला सांगीतले. मातृधर्म आणि भातृधर्म यांत ते अडकले हे त्यांच कर्तव्य असेल किंवा नसेलही. त्याचवेळी काशीनरेशाच्या तीन कन्यांचे स्वयंवर घोषित झाले. भीष्मांनी अलौकीक शस्र अस्र कौशल्य करुन सर्वांना हरवुन तीन्ही मुलींना पळवुन आणले.

त्यातील मोठी कन्या अंबाचे शाल्वावर प्रेम आहे हे जेव्हा भीष्मांना कळले तेव्हा त्यांनी सन्मानाने तीची पाठवणी केली. परंतु शाल्वाचा अहंकार दुखावल्याने अंबेला अव्हेरलं. त्यामुळे अंबा पुनः हस्तीनापुरला परतली. राज्यसभेत विचित्रविर्याना म्हणाली, “शाल्वाने अस्विकार केल्यामुळे आपणच माझा स्विकार करावा”

त्यावर ते म्हणाले, “तु ज्यावेळी शाल्वाकडे गेली तेव्हाच हा विषय संपली.”

त्यांची स्पष्टोक्ती ऐकुन ती म्हणाली, “स्वयंवरातुन भीष्मांनी हरण केल्यामुळे त्यांनी माझी जबाबदारी स्विकारावी.”

सभेमधे भीष्मांविषयी सर्वांना आदर होता. सभेतुन निषेधाचे सूर उमटु लागले. भीष्मांनी तीच्या इच्छेनुसार शाल्वाकडे ससन्मान पाठवणी केली. त्यामुळे अंबेनी इच्छेनुसार वाटेल तिथं जावं. भीष्म अविवाहित राहण्याच्या प्रतिज्ञेशी बांधील आहे. ती संतापाने बेभान होऊन कुरुराज्यसभेतुन बाहेर पडली.

इकडे वेदव्यासांसोबत त्यांच्या शिष्यांच्या चर्चेत उधाण आले. जैमिनी, पैल, सरसावत यांचे सोबत भीष्मांबद्दल सुरु होती. पराक्रम, धर्मनिष्ठा, ब्रम्हश्चर्य, त्याग आणि प्रचलीत ज्ञान, शिवाय पराक्रमी असल्यामुळे ते दुर्जेय योध्दा होऊ शकतात, परंतु समाजात स्थीत्यंतर नाही आणु शकत. ते प्रचलित धर्माचं शिस्तीत पालन करताहेत, पण धर्माच्या गर्भातही सृष्टीकर्त्याचा हेतु सांभाळायचा विचार त्यांचेजवळ नाही. संस्कृतीची मुल्य जपणे सुध्दा धर्मच आहे ना! चित्रगंदा सारख्याचे तारुण्य अपरिपक्व असतांना दोन अल्लड कन्या भोगक्रियेला देऊन कुरुवंशाचा घातच केला.

भीष्माचं ब्रम्हश्चर्य दुसर्‍यांना संयमाची दिक्षा का देऊ शकत नाही? असल्या कृतीने सम्राट भरताची राज्यपरंपरा क्षीण होऊन संस्कृतीचा आधारच नष्ट होईल ! भीष्माची त्यागशीलता कोणतं सर्जन करेल ? इतिहासाचं सखौल ज्ञान, राज्यशासनाच्या सर्व पध्दती, नीती आणि न्यायाचे बारकावे, अर्थशास्रांचं असलेलं भीष्मांच ज्ञान कधीही गतिमान आणि उर्जस्वी होऊ शकत नाही.

त्यावर व्यास शांंतपणे म्हणाले, “पराक्रमाला समर्थन लागतं ! धर्माला तत्वज्ञानाचा आधार लागतो ! ब्रम्हश्चर्यव्रतामधे निरपेक्ष प्रेम असावं लागतं ! त्याग सृष्टीकर्त्याच्या ध्येयाशी मिळतं घेणारा व ज्ञानाला कृतज्ञेतेचं आवरण लागतं!”

अशाप्रकारे भीष्मांविषयी उलट सुलट चर्चा होऊन निराकरण केले.

इकडे अंबा तणतणतच म्हणाली, “तप करुन ज्या भीष्मानं सत्यानाश केला त्यांना आणि हस्तीनापुरला दुःखाच्या खाईत लोटणारं !”

क्रमशः

संकलन – मिनाक्षी देशमुख.

भीष्म

भागः-५

लग्नानंतर थोड्याच दिवसांनी क्षयरोगाने आजारी पडुन विचित्रविर्याचा निपुत्रीक मृत्यु झाला. कुरुवंशाच्या नाशाचा प्रश्न उपस्थीत झाला. भीष्मांनी इच्छीले असते तर ते सहज राजगादीवर बसु शकले असते. वंशरक्षणासाठी लग्न करण्यांत कोणतीच अडचण नव्हती. पण मोठ्यात मोठे प्रलोभन किंवा गरज त्यांना आपल्या प्रतिज्ञेपासुन विचलीत करु शकत नव्हतं. सत्यवतीच्या पित्याला दिलेल्या वचनानुसार, त्रैलोक्याचे राज्य, ब्रम्हपद एवढेच नव्हे तर मोक्षाचाही त्याग करु शकतात. पण सत्याचा त्याग करु शकत नाही. पंचमहाभूते आपला धर्म सोडतील, चंद्र शीतलतेचा त्याग करील, धर्मराज धर्म सोडतील पण भीष्म सत्य प्रतिज्ञा सोडण्याचा विचार सुध्दा करुं शकत नाही. प्रतिज्ञा पालन असावे तर असे!

इकडे अंबा फिरत फिरत एका सरोवराकाठी पोहोचली. ही भुमी म्हणजे दोन राज्यांच्या मधलं अरण्य होतं. तीथे तीला वृध्द जेष्ठ तिपस भेटले. ती त्यांना तपश्चर्येबद्दल माहिती विचारत असतांना तीचे पितामह होत्रवाहनान आले. तिची कर्मकहाणी ऐकल्यावर त्यांचा अतीव दुःख व संतापाने त्यांचा संयम सुटला. त्यांच्या सल्ल्यानुसार जमदाग्निनंदन परशुरामांना शरण गेली. भीष्मांनी परशुरामांकडुन अस्रविद्या घेतली होती. गुरु या नात्याने त्यांनी भीष्माला बोलावुन अंबाला स्पर्ष करुन कलंकीत केले असल्यामुळे तिच्याशी विधिवत लग्न करण्यास सांगीतल्यावर, भीष्म म्हणाले ज्या स्रीने दुसर्‍यावर प्रेम केले तिला कोणताही धार्मिक पुरुष कसा ठेवु शकेल ? यावर परशुराम क्रोधीत होऊन म्हणाले एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रीय केली. त्यांनी भीष्मांना युध्दासाठी ललकारले.

गुरु शिष्यांत सतत तेवीस दिवस भयंकर युध्द झाले. परशुरामांजवळ विश्वातील सर्वच अस्रविद्या असुनसुध्दा देव आणि ऋषींनी युध्द थांबवण्यासाठी मध्यस्थी केल्यामुळे भीष्मांनी पारवास्राचा प्रयोग केला तेव्हा हे अस्र अज्ञात आहे असं दाखवुन युध्द संपविले. भीष्मांनी त्यांचे गुरु परशुरामाचे न ऐकता सत्याचे रक्षण केले आणि अद्भुत पराक्रमाने परशुरामासारख्या अद्वितिय धनुर्धरालाही ‘त्राही भगवान’ केले. सत्य, प्रतिज्ञा आणि वीरतेची पराकाष्ठा झाली.

अंबा तीच्या प्रतिशोधासाठी निघाली. भगवान परशुरामांचा पराभव करणारा श्रेष्ठ क्षत्रियवीर असा लौकीक प्राप्त झालेले भीष्म पराभूत मनोवृत्तीने हस्तीनापुरी परतले. परशुरामांना भिडायला गेलेले भीष्म सुखरुप परत येईपर्यंत सर्वच काळजीत होते. सुखरुप परत आल्यामुळे त्यांचे अभुतपुर्व विशाल स्वागत केले. भीष्मांना हा उपचार नको होता. इथे जयपराजयाची गोष्टच नव्हती !

कुणीही विजयी नव्हतं ! कुणीही जिंकलं नव्हतं! उलट संस्कृती पराजीत झाली होती. परंपरा अपमानीत झाली होती. राष्टधर्म व्यथीत झाला होता.

भीष्म त्यांच्या व्यक्तीधर्माशी प्रामाणिक होते. परशुराम त्यांच्या समष्टीधर्मांचं पालन करीत होते आणि अंबा ? अंबा विकारग्रस्त होती. ती सृष्टीरचैत्याला विध्वंस करायला भाग पाडत होती.

या सर्व प्रकाराने उद्गिन्न झालेलं मन शांत करण्यासाठी अतिपुर्वेला जान्हवी सागराला मिळते तीथे जायला निघाले.

क्रमशः

संकलन – मिनाक्षी देशमुख.

सूर्यवंशी शूरवीर चरित्र

पितामह भीष्म चरित्र सर्व भाग


👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading