आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

35. श्रीमंत रमाबाई पेशवे चरित्र भाग १, (१ ते ५)
चार दिवसांपूर्वीच काका रघुनाथरावां सोबत साताऱ्यास जाऊन माधवरावांना छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्रे दिली होती. श्रीमंत माधवराव पेशवे लहान म्हणून छत्रपती महाराजांनी ” मराठा दौलतीचे वस्त्रे” दादासाहेबांना आणि “…………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! श्रीमंत रमाबाई पेशवे !!!
!!! प्रस्तावना !!!
नमस्कार!!
सन्माननीय वाचकवृंद, आतापर्यंत मी आपल्यासमोर वेगवेगळ्या नवनवीन व्यक्ती चरित्रे… धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक व इतरही प्रस्तुत केल्यात. आणि आपणही भरभरून माझे कौतुक करून मनोबल वाढवले. प्रोत्साहित केले. त्यामुळे मला ऊर्जा मिळत गेली. मी लिहित गेले लिहीत आहे.
आज आपल्यासमोर घेऊन येत आहे ६८ वे पुष्प! अगदीच उपेक्षित असलेली व्यक्तिरेखा ” रमाबाई”
( माधवराव पेशव्यांची पत्नी).
नेहमीप्रमाणे आपल्या प्रिय प्रतिक्रिया अपेक्षित!
इतिहासात किंवा इतरत्र रमाबाई बद्दल फारसे साहित्य उपलब्ध झाले नाही. जे काही थोडं बहुत मिळाले त्या आधारावर रमाबाईंची चरित्र रेखाटण्याचा इतिहासाशी प्रामाणिक राहून आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
दहा वर्षाच्या रमाबाई श्रीमंत माधवराव पेशव्यांची पत्नी म्हणून उंबरठा ओलांडून शनिवार वाड्यात प्रवेश केला. बालपण सरले नाही, तारुण्यात पदार्पणही पुरते झाले नाही, तोच त्यांचेवर एका मागून एक संकटाच्या मालिका सुरू झाल्या. १६ वर्षाच्या माधवरावांना पेशवाईची वस्त्रे स्वीकारावी लागली. आणि त्यांचे तर बालपण हरपलेच, पण त्यांचे बरोबर रमाबाईचीही बालपण हरपले. ज्या काकांनी पुतण्या माधवरावांना अंग खांद्यावर खेळवले तेच काका स्वार्थाने व राज्यमोहने अंध होऊन माधवरावां विरुद्ध सतत कटकारस्थान करण्यात मग्न झाले. त्यातच त्यांना सखाराम बापू सारखा कुटील सल्लागाराची जोड मिळाली.
खरं म्हणजे पेशवाईची वस्त्रे दादासाहेबांनाच हवी होती. पण मोठेपणा करून ती माधवरावांना देववली. त्यांना वाटले, माधवाला जरी पेशवाई मिळाली तरी तो अननुभवी पोरसवदा आहे. तो नामधारी पेशवा राहील व दौलतीचा सर्व कारभार आपल्या मनाप्रमाणे चालवता येईल.
पण त्यांच्या साऱ्या आशा आकांक्षावर पाणी फिरले गेले. अल्पवयीन माधवराव जाणकार राजकारण्यापेक्षाही जास्त प्रगल्भतेने मुसद्दीपणे दौलतीचा उत्कर्ष केला. पानिपतच्या युद्धात झालेल्या पराभवाचा डाग आपल्या असिम कर्तृत्वाने धुऊन काढला.
रमाबाई वयाने जरी लहान असल्यास तरी, वयाच्या मानाने त्या फार जास्त समंजस होत्या. आपल्या पतीच्या कर्तुत्वाचा त्यांना अतिशय अभिमान होता. तसे त्या कधीकधी मिळालेल्या एकांतात बोलून दाखवत होत्या.
रमाबाईंचे खेळण्या बागडण्याची वय पण, पतीवर आलेल्या जबाबदारीने त्यांना अकाली पोक्त बनवले होते. रघुनाथ रावांच्या कुटिल कटकारस्थानं त्या वाड्यात असल्यामुळे दिसत असूनही, कधी मर्यादा ओलांडली नाही की, कधी सगळं माहीत असूनही पतीचे कान फुंकले नाही. माधवरावांची आई गोपिकाबाई माधवरावांवर रागावून गंगापूर गेल्यावर, जबाबदार स्त्री म्हणून आपले कर्तव्य रमाबाईंनी पार पाडले.
दादासाहेब माधवरांचा नाश करण्यासाठी अघोरी अनुष्ठाने, भानामती अशासारखे उद्योग करीत होते. रमाबाई हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत असूनही कधी त्यांनी तोंडातून ब्र काढलं नाही. एवढ्या लहान वयात केवढा शोषिकपणा? रमाबाईंनी कधीही पतीला उलट सुलट सांगून भडकवले नाही. हे सर्व श्रीमंत माधवरावही जाणत होते. त्याचमुळे त्यांना पत्नीबद्दल सार्थ अभिमान होता. श्रीमंत माधवरावांनी रमाबाईच्या वडिलांकडचे मिरजचे वतन काढून गोपाळराव पटवर्धनांना दिले. पण रमाबाईंनी एका शब्दानेही माधवरावांना छेडले नाही की, नाराजी व्यक्त केली नाही. जेव्हा की प्रत्येक स्त्रीला माहेरचा अभिमान असतो. केवढा हा त्याग?
श्रीमंत माधवरावांच्या आजारात त्या सतत सावलीसारख्या त्यांच्या पाठीशी राहून न कंटाळता दिवस रात्र सेवा केली. हे काय त्यांचे वय होते? श्रीमंत माधवरांना जेव्हा पैलतीरीची जाणीव झाली, तेव्हा त्यांनी रमाबाईला सहगमन करता का म्हणून विचारल्यावर क्षणाचाही विलंबन न लावता त्या मोकळ्या मनाने तयार झाल्या. माधवरावांना पूर्ण जाणीव होती की, आपल्यानंतर रमाबाईंना रोज सतीचे मरण मरावे लागणार. त्यात त्यांना कुणाचा आधार नव्हता. दादासाहेब व आनंदीबाई स्वार्थाने अंध झालेले, आई गोपिकाबाई गाणगापूरला जाऊन बसलेल्या. अशा स्थितीत भविष्यात रमाबाईची होणारी फरफट त्यांना स्पष्ट दिसत असल्यामुळेच त्यांनी त्यांना सहगमनाबद्दल विचारले होते. आणि रमाबाईंनीही तात्काळ कबुली दिली होती.
ऐन तारुण्यात पदार्पण केलेल्या रमाबाईंना पती सुखापासून त्यांच्या असाध्य आजारामुळे वंचित रहावे लागले. पण रमाबाईंनी कधी खंत व्यक्त केली नाही, की मुद्रेवरून दाखवले नाही. का त्यांना तारुण्य सुलभ भावना नव्हत्या? त्यांनाही चार चौघांसारखे सुख उपभोगावेसे वाटत नव्हते? श्रीमंत माधवराव शेवटच्या घटकामोजीत असताना, दादासाहेब नजर कैदेतून पळून जाण्याचा केलेला प्रयत्न जेव्हा श्रीमंतांना कळला व ते अतिशय संतप्त झाल्यामुळे त्यांना झालेला त्रास पाहून मात्र, रमाबाईंचा आतापर्यंतचा संयम गळून पडला. व आपली मर्यादा आबाधीत ठेवून त्यांची चांगलीच कान उघाडणी केली.
अशा या त्यागी महान साध्वीला कोटी कोटी प्रणाम!!
क्रमशः
मिनाक्षी देशमुख.
!!! रमाबाई !!!
भाग – १.
चार दिवसांपूर्वीच काका रघुनाथरावां सोबत साताऱ्यास जाऊन माधवरावांना छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्रे दिली होती. श्रीमंत माधवराव पेशवे लहान म्हणून छत्रपती महाराजांनी
” मराठा दौलतीचे वस्त्रे” दादासाहेबांना आणि “कारभारी पदाची वस्त्रे” सखाराम बोकिलांना दिली. श्रीमंत माधवराव पेशव्यांवर अकाली जबाबदारी पडल्यामुळे आपणाला पेलवेल की नाही यामुळे ते चिंतित झाले होते. तशातच काका रघुनाथराव हलक्या कानाचे होते. त्यांनी राजकारण करून सदाशिव भाऊ साहेबांना मत्सरापोटी उत्तरेत लढाईसाठी रवाना केले होते.
त्यांना आठवले, आपले पिताश्री श्रीमंत नानासाहेब पेशवे कर्तबगार पेशवा असून देखील अंतकाळी किती दिन झाले होते. त्या आठवणीने त्यांचे मन करुणेने दाटून आले. आऽग आऽग भाऽऊ भाऽऊ भाऽऊ असे सारखे ओरडत होते. माधवांचा हात बंधू रघुनाथरावांच्या हाती देऊन, कातर, गदगदल्या स्वरात निर्वाणीचे बोलत नानासाहेब म्हणाले, आम्ही आता काही पळाचे सोबती. आता माधवाला हाताशी धरून राज्य राखावे. भाऽऊ भाऽऊ करतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अंत्यसमयी विश्वासाने आपला हात अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या काकाश्रींच्या हाती दिला. असे काकाश्री आपल्या पाठीशी खंबीर उभे राहल्यास आपण पानिपतवर झालेला पराभव सहजच धुवून काढून मराठी दौलतीला कर्जमुक्त करू. पराक्रमी काका पुतण्यांच्या बलदंड हाताने मराठी दौलतीला ऊर्जावस्था प्राप्त करून देऊ. पण माधवरावांना हेही माहित होते की काकाश्री अंतस्थ नाराज आहेत. पेशवाईची वस्त्रे त्यांना हवी होती. त्यांच्या सोबतीला सखाराम बापू आहेत.
निजाम, हैदरअली, टोपीवाले इंग्रज टपून बसलेले. सर्वीकडून कोंडी झालेली अशावेळी बाहेरच्या शत्रूंना तोंड देताना त्यांना घरातील अंतर्गत शत्रूलाही तोंड द्यावे लागेल.धगधगत्या अग्नीतून वाटचाल करावी लागेल, असह्य चटके सहन करत संकटाचा सामना करावा लागेल याचीही माधवरावांना जाणीव होती.
पण त्यांनी दृढनिश्चय केला. विघ्नहर्ता श्री गजाननाची कृपा लाभल्यावर कितीही मोठे संकट आले तरी संकटातून बाहेर पडू. अंतिम क्षणापर्यंत मराठी दौलतीसाठी देह झिजवू….
नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे माधवराव गोपिका बाईंचा आशीर्वाद घेण्यास आले. आणि आपल्या मनातील शंका कुशंका सांगून मन मोकळ करून म्हणाले, आमच्या पाठीशी कोणीच नसताना एवढी मोठी जबाबदारी पेलवेल ना? अशी कधी कधी शंका येते. का तुमचे काकासाहेब आहेत ना? आईसाहेब! काकांच्या लहरी स्वभावाची भीती वाटते. त्यांना स्वतःचे मत नाही. त्यांना जसं सांगितलं तसं ते वळतात. त्यातच काकी आनंदीबाई खूप महत्त्वकांक्षी. आपल्या पतीने मराठी दौलतीची पेशवे व्हावे ही त्यांची जबर इच्छा.
गोपिकाबाई म्हणाल्या, रावसाहेब, तुम्हाला पेशवे पद मिळाले पण अतिशय विचित्र परिस्थितीत. पण माधवा, अशा प्रतिकूल परिस्थितीतच खऱ्या कर्तुत्वान पुरुषाचा कस लागत असतो. आणि तुम्ही तो समर्थपणे पेलून तुमचे कर्तव्य एक दिवस उजाळून निघेल. इतिहासाला नोंद घ्यावीच लागेल. आणि स्वतःला एकाकी का समजता? आम्ही तुमच्या भक्कम पाठीशी आहोत. थोरले बाजीराव, तुमचे पिताश्री यांच्या पठडीत आम्ही राजकारणात तयार झालो आहोत. आमच्या अनुभवाचा वेळोवेळी उपयोग होईल. शिवाय गोपाळराव पटवर्धन, शास्त्री बुवा, त्र्यंबकराव पेठे मामा, रास्ते मामा या सर्वांची तुम्हाला साथ असल्यावर तुम्ही एकाकी नाही. हिम्मत हरू नका.
तेवढ्यात गोविंद पंत भेटीस आल्याची हुजर्याने वर्दी दिली. गोविंद पंतांचा मुजरा स्वीकारून श्रीमंत माधवराव पेशव्यांनी विचारले, बोला पंत काय काम काढले? ते एकदम म्हणाले, श्रीमंत, मी एक गरीब माणूस. अडचणीत पडलो तर आयुष्यातून उठेल. मुलं बाळ उघड्यावर पडतील. रस्त्यावर येतील. ते भिकेला लागू नये म्हणून आपण मला पेशव्यांच्या जवाहर खाण्याच्या जबाबदारीतून मुक्त करावे, ही आपल्या चरणाशी विनंती आहे.
काय बोलता? एवढे काय झाले आम्हाला नीट सबळ कारण समजल्याशिवाय तुमची या जबाबदारीतून मुक्तता करणार नाही. पेशवे कडक आवाजात म्हणाले. आमचे अभय आहे. बोला. श्रीमंत, श्रीमंत.. ओलावल्या नेत्रांनी पंत म्हणाले, पेशव्यांच्या जवाहिर खान्यात मौलिक दाग दागिने आणि दुर्मिळ रत्न आहेत. सणासुदीला, विवाहप्रसंगी पेशवे परिवारातील स्त्रिया पसंतीचे दागिने नेतात. तशा नोंदी केल्या जाते. पण नोंदणी न करता दागिना नेला आणि गाहाळ झाला तर माझ्यासारख्या गरीब माणूस रसातळाला जाईल. इज्जतीचे धिंडवडे निघतील.
श्रीमंत संतत्त होऊन विचारले, नोंद न करता कोण दागिने नेतो? श्रीमंत, नामोल्लोख करायला लावून या गरिबाला संकटात लोटू नये. गयावया करत पंत म्हणाले. दाराबाहेर ऐकत असलेले रघुनाथराव धाडकन आत शिरले आणि आवाज उंचावून म्हणाले, बिना नोंदी करता दागिने आम्ही नेले म्हणून सांगा ना. आमचा तेवढाही अधिकार नसेल तर या शनिवार वाड्यात वास्तव करण्यास आम्हाला काही सारस्य नाही आणि गोविंद पंत ही किरकोळ बाब माधवरावांना सांगण्याची काही आवश्यकता नव्हती. आम्ही ते दागिने सुरक्षित परत केले असते .आणि गहाळ झाले असते तर त्याची किंमत किंवा तसेच दागिने बनवून जवाहर खान्यात दिले असते.
श्रीमंत पेशवे धारदार आवाजात म्हणाले, गोविंद पंत, यापुढे बिना नोंदीचे जवाहर खान्यातील मौल्यवान दागिने कुणालाही द्यायचे नाही. खुद्द पेशवे, पेशव्याची स्त्री पेशवीण असली तरीही. हा नियम पेशवे परिवारातील साऱ्यांना लागू राहील. आमच्या या आज्ञेचे उल्लंघन होता कामा नये. या आता. मुजरा करून पंतानी सुटकेचा व मोठ्या संकटातून मुक्त झाल्याचा निःश्वास टाकत बाहेर पडले.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २२-७-२०२३.
!!! रमाबाई !!!
भाग – २.
महालातील वातावरण अतिशय गंभीर झाले. आपला पुत्र माधवाचा हा आगळावेगळा अविष्कार पाहून गोपिका बाईंनी मनातल्या मनात माधवांची स्तुती केली. आणि रघुनाथराव ते अगदी सर्द झाले. सिंहाच्या छावाची ती पहिली झेप दादा साहेबांना भयभीत करून गेली. वातावरण हलके करण्याच्या उद्देशाने गोपिकाबाई म्हणाल्या, बसा ना भाऊजी. कशाला इतर लोकांसमोर आमचा अपमान होत असेल तर ?
भावनावश होऊन माधवराव म्हणाले, दादासाहेब आमचे काही चुकले असेल तर क्षमा मागतो. आपण वाड्यातील थोरले कर्तव्यदक्ष राज पुरुष आहात. पण शिस्तीचे आपल्या माणसाकडूनच उल्लंघन होत असेल तर इतरांवर वचक ठेवणे कठीण होते. दादासाहेब, तुमचा माधव अजून लहान आहे. आपणच सांभाळून घ्यावे. ते तर आम्ही करतोच आहोत. गोपीकाबाईच्या आज्ञेवरून दासीने केसरी दुधाचे आणले. दुग्ध प्राशन करून श्रीमंत पेशवे माधवराव व दादासाहेब गोपिका बाईच्या महालातून बाहेर पडले.
दुपारची वामा कुक्षी श्रीमंत माधवराव आपल्या महालात घेत होते. थोड्याच वेळात अंजरी शालूत दहा वर्षाच्या रमाबाईंनी प्रवेश केला. जड शालू सांभाळणे रमाबाईंना अवघड जात होते. माधवराव त्या तेजःपुंज सौंदर्याकडे अनिमिष नेत्राने पाहतच राहिले. कालपर्यंत परकर पोलक्यात पाहण्याची सवय असलेल्या माधवरावांनी विचारले, तुम्ही आमच्या रमाच आहात ना? इश्यऽ, असं का विचारणं व्हावं? प्रसन्नपणे माधवराव म्हणाले, तुम्ही खूप छान दिसत आहात. बसा ना. नको आमची भीती वाटते? आपल्या प्रिय माणसाची कधी भीती वाटत नाही स्वामी. माधववरावांच्या सांगण्यावरून रमाबाई मंचकाच्या काठावर टेकल्या.
माधवराव म्हणाले, रमा, दिवस किती भरभर जातात ना? या मधल्या काळात पुलावरून कितीतरी पाहून पाणी वाहून गेले. पण आम्हाला तो प्रसंग अजूनही जसाच्या तसा आठवतो. विवाह नंतर तुम्ही शनिवार वाड्यात वधू म्हणून प्रवेशल्या. आपल्या वयाची वाड्यातील साऱ्या मुली मुलं हजारी कारंज्याच्या बाजूला खेळत होते. खेळ चांगला रंगात आला होता. आणि आम्ही तुमच्या पाठीत जोराचा धपाटा घातला. तुम्ही रडत रडत वरती आमची तक्रार करायला आई साहेबांकडे गेल्या होत्या .आईसाहेब म्हणाल्या, अगं, तो तुझा नवरा आहे. नवऱ्याची तक्रार करायची नसते. तुझी काही चूक झाली असेल. जा खेळ..
लगेच गंभीर होत श्रीमंत माधवराव म्हणाले, रमा आमच्या बिकटप्रसंगी तुमचं सहाय्य हवं आहे. वेळोवेळी आम्हाला सांभाळून घेत चला. घ्याल ना? हे काय विचारणं स्वामी? स्वामी! आम्ही तुमची धर्मपत्नी आहोत. हिंदू स्त्री आपल्या पतीची छाया बनून वावरत असते. संकट समयी त्यांच्या पाठी उभी राहते. वादळ वाऱ्याला सामोरे जाते. आम्ही पती सेवेत किंचितही कसर ठेवणार नाही.
पण आजच स्वामींना हा प्रश्न का पडला? कारण कारण माधवराव बोलू लागले…..
रमा, पानिपत युद्धभूमीवर भाऊकाकांनी पराक्रमाची शर्थ केली. प्रत्यक्ष त्यांचे काय झाले हे त्या परमेश्वरालाच ठाऊक. भाऊकाका परत आले नाही म्हणून पिताश्री नानासाहेबांनी हाय खाऊन भाऽऊ भाऽऊ म्हणत प्राण सोडले. मोठे बंधू विश्वासराव पानिपत युद्धात मृत्यूच्या विकराल दाढेत लुप्त झाले. अशा या विपरीत परिस्थितीत दौलतीची पेशवे म्हणून आमची नियुक्ती झाली. आज मराठीची दौलत कर्जाच्या ओझ्याखाली खोलवर बुडाली आहे. मराठे सामर्थ्यहीन झाले आहेत. हैदर अली, नागपूरकर भोसले, निजाम हैदर, इंग्रज दौलीच्याचा घास घ्यायला टपून बसले आहेत. इंग्रज तर व्यापारी म्हणून आले आणि एक एक प्रांत घशाखाली घालत आहे. त्यांना वेळीच रोखले नाही तर एक दिवस ह्या हिंदुस्तानचे राज्यकर्ते होतील.
त्यातच एकेकाळी अटकेपार झेंडा रोवणारे आमचे काकासाहेब स्वार्थाने स्वतःच्या मातीला विसरले. स्वतःचा चैनीवर, विलासावर जनतेचा पैसा उधळत आहेत. त्यांना आवर घालण्याचं कठीण काम आमच्यावर आले आहे. ” धरलं तर चावत सोडलं तर पळतं “अशी आमची गत झाली आहे. हिशोब तपासताना काकासाहेबांनी स्वतःच्या चैनबाजीसाठी मोठमोठ्या उचललेल्या रकमा दिसतात. असंच चालू राहिलं तर आधीच कर्जात बुडालेली दौलत भिकेला लागायला वेळ लागणार नाही. पण आम्हाला तसं होऊ द्यायचं नाही. ही छत्रपतींचीनी मोठ्या कष्टाने उभारलेली दौलत वाचवायची आहे. त्यासाठी काकांबरोबर शत्रुत्व पत्ककरावे लागले तरी आम्ही मागेपुढे पाहणार नाही. म्हणून विचारत होतो, रमा, तुम्ही आमच्याबरोबर आहात ना? स्वामीऽ म्हणत त्यांच्या कवेत शिरल्या. तोच चारचे टोल पडले. रमाला हलकेच बाजूला करीत म्हणाले, पर्वतीवर आपण दोघे जगदीश्वराच्या दर्शनाला जायचे आहे. तुमच्यासाठी मेणा सज्ज करायला सांगितला. तुम्ही निघण्याची तयारी करा. आम्ही मागून घोड्यावरून येतो.
थोड्याच वेळात रेशमी पडदे सोडलेला मेणा पर्वतीच्या दिशेने निघाला. पाठोपाठ अश्वारूढ श्रीमंत माधवराव पेशवे, त्यांच्या मागेपुढे अंगरक्षक दौडत होते. पर्वतीवर पोहोचताच मंदिरात जाऊन दोघांनी जोडीने हरिहरेश्वराचे दर्शन घेतले. पायऱ्या उतरत असताना श्रीमंत पेशव्यांनी प्रियदर्शनी म्हणून हाक मारली. अग बाई! हे वेगळंच नाव दिलं. पण खूप आवडलं. पण सामींनी या नावाने आम्हाला फक्त एकांतातच हाक मारावी. बरं! बरं! तुम्ही देवाजवळ इतक्या तन्मयतेने काय मागितले? आम्ही देवाजवळ मागितले, देवा! आमचे स्वामी फारच हळव्या भावनाप्रधान निर्मळ मनाचे आहेत. एवढ्या लहान वयात त्यांचेवर दौलतीचाची मोठी जबाबदारी येऊन पडली. मराठी दौलत खिळखिळी झाली आहे. अशावेळी तू आमच्या स्वामींच्या पाठी रहा त्यांचे आत्मबल वाढवून येणाऱ्या संकटातून त्यांची मुक्तता करत जा. आम्हाला खात्री आहे, परमेश्वर आपलं वेळोवेळी नक्की रक्षण करेल.
अत्युत्तम! शनिवार वाड्यात दोघेही परतले त्यावेळी बरीच रात्र झाली होती.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २३-७-२०२३.
!!! रमाबाई !!!
भाग – ३.
सकाळी श्रीमंत माधवराव पेशवे सदरेत गेले. तिथे गोपाळराव पटवर्धन, विंचुरकर, शास्त्री बुवा त्र्यंबकराव मामा पेठे, घोरपडे, मोरोबा आधीच उपस्थित होते. श्रीमंत आल्यावर मुजरे झडले. श्रीमंतांच्या अज्ञाने सारे स्थानापन्न झाल्यावर, श्रीमंत म्हणाले, छत्रपती शिवरायांनीची यथोगाथा गायलेल्या प्रतापगडावर शांती यज्ञ करायचे ठरवले. त्याप्रमाणे सर्व तयारी झाली ना? आपण उद्या भल्या पहाटेच निघणार आहोत. हा यज्ञ करायचा आमचा उद्देश आहे पानिपतच्या युद्धात राष्ट्राची फार मोठी हानी झाली यात आपली एक तरुण पिढी गारद झाली. त्या वीर पुरुषांच्या आत्म्यांना शांती लाभावी. तसेच पानिपतचे अपयशामुळे शत्रू डोके काढत आहेत. बाहेरील तसेच अंतर्गत शत्रूंना तोंड द्यावे लागेल. त्यासाठी देव देविकांची आशीर्वाद लाभावा या उदात्त हेतूने आम्ही हा यज्ञ करीत आहोत.
निघूया आपण म्हणून श्रीमंत उठून उभे राहताच सारे खासे उठले. पुन्हा मुजरे झडले. सेवकांनी पेशव्यांच्या श्वेत रंगाचा अबलख घोडा समोर आणला. पेशव्यांनी घोड्यावर मांड घेतली. सारे खासे आपापल्या घोड्यावर स्वार झाले. सोबत ५० घोडेस्वारही स्वार झाले. ती सारी महादारातून बाहेर पडत वेगाने दौडू लागले.
दादासाहेबांच्या बदामी महालाच्या गावाक्षात दादासाहेब, सखाराम बापू व गंगोबा तात्या उभे होते. घोडे नजरेआड होताच सर्वजण स्थानापन्न झाले. शांततेला वाचा फोडत गंगोबातात्या म्हणाले, श्रीमंत, शांती यज्ञाला गेले, तुम्ही नाही गेलात? मुद्दामच नाही गेलो. त्यांच्यासोबतच्या सरदार मंडळीत मी एकाकी पडलो असतो. मग आमची कोंडी झाली असती. वाड्यावर कोणी जबाबदार व्यक्ती थांबायला हवं या सबबीखाली आम्ही जायचे टाळले, सखारामबापू म्हणाले, चांगला निर्णय घेतला आपण. मतलब?
शांती यज्ञ फक्त एक निमित्त आहे. जवळच्या सरदारांना एकांत स्थळी नेण्याचा श्रीमंतांचा काहीतरी वेगळा डाव असावा. पण दादासाहेब, चिंचेचे कारण नाही. आपली काही माणसे मी गुप्तपणे रवाना केली आहे. तिथे घडलेली प्रत्येक घटना आपल्याला कळेल.
माधव इतक्या थराला जाईल असे वाटले नव्हते. राजकारणात कोणी कोणावर विश्वास ठेवू नये. सखाराम बापू म्हणाले, दादासाहेब, आपण श्रीमंतांना दप्तरी गुंतवलं तेव्हाच मी आपल्याला नको म्हटले होते. पण आपण ऐकलं नाही. बापू, आमचा यात वेगळा डाव होता. माधवाला फडाच्या कामात गुंतवून ठेवलं म्हणजे ते आमच्या राज्यकारभारात लक्ष देणार नाही व आमचा डाव साध्य करता येईल. पण दादासाहेब, हा मोहरा काही वेगळाच आहे. श्रीमंत माधवराव खूप चाणाक्ष, बुद्धिमान आहे. चांगले चांगले कारकुन त्यांच्यापुढे नांगी टाकतात. सारे दप्तर त्यांना चळा चळा कापते. श्रीमंतांचा दप्तरी अभ्यास दांडगा आहे. ऐकून आम्हाला आनंद वाटला. फडातील कारकुनांना चांगली शिस्त लागेल. आणि आमच्या राजकारणात त्यांची ढवळाढवळ होणार नाही.
सखाराम बापू म्हणाले, दादासाहेब, तुम्ही जमादार खात्याच्या किल्ल्याच त्यांच्या हाती दिल्यात.
श्रीमंतांना दप्तर खान्याची खडा न खडा माहिती झाली आहे. लष्करी खर्चापासून ते खाजगीचा खर्चापर्यंतचा बारीक सारीक तपशील त्यांनी गोळा केला आहे. तुम्ही वेळोवेळी उचललेल्या रकमाचा तपशील देता देता माझी पाचावर धारण बसली होती. तपशील देवताच आला नाही. लष्करात २०० घोडे खरेदी केल्याची नोंद व रक्कम खर्ची टाकलेली पाहून श्रीमंतांनी लष्कर प्रमुखाला बोलावून चौकशी केली. तो अधिकारी म्हणाला, या सहा महिन्यात दोनशे अरबी घोडे आलेच नाही. संतप्त माधवराव श्रीमंतांनी मला विचारलेवर मी काहीच सांगू शकलो नाही. मला माहित होतं हा पैसा आपण नाटक शाळेतील कलावंतीणीवर उधळला होता. श्रीमंतांनी माझीच हजेरी घेतली. दौलतीचा कारभारी म्हणून त्यांच्यासमोर जायची माझी देखील हिम्मत होत नाही.
रघुनाथराव पुरते अस्वस्थ झाले स्वतःला सावरत म्हणाले, माधव खूप शिस्तप्रिय आहे. अपराधी म्हणून समोर कितीही जवळचा असला तरी ते गय करत नाही. बघूया पाण्यापेक्षा रक्त अधिक घट्ट असतं. बापू मुजरा करून निघून गेले.
आनंदीबाई म्हणाल्या, स्वामी, माधव बराच बनेल दिसतो. तो नानासाहेबांचा पुत्र आहे. वहिनी साहेबांच्या तालिमीत तयार झाला आहे. त्यांनी त्याच्या पायाभूत शिक्षणाकडे चांगले लक्ष दिले आहे. संस्कृत भाषेचा त्यानं चांगला अभ्यास केला आहे. विशेष म्हणजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासचा त्याने चांगला अभ्यास केला आहे. लहानपणापासूनच तो फडावर बसायचा.
रघुनाथरावांची मनःस्थिती द्विधा झाली होती. वेळोवेळी सखाराम बापू, गंगोबातात्या, आनंदीबाई त्यांच्या मनात माधवराव बद्दल विष कालवत असत. त्यांच्या साध्या स्वभावाचा फायदा घेऊन त्यांना जसे त्यांच्या मनात माधवरांबद्दल विष कालवत, त्यांना भरवले जात, तसे ते वागत. ती वेळ निघून गेली की, त्यांना पश्चाताप होत असे.
प्रतापगडावर वरील मंदिराच्या प्रांगणात शांती यज्ञाचे आयोजन केले होते. सर्व तयारी झालेली पाहून श्रीमंत समाधान पावले. रमाबाईची चौकशी केल्यावर त्या शिवाईच्या देवळात गेल्याचे कळले. तेही काही मंडळी सह तिकडे गेलेत. देवळात रास्ते मामी व दोन बायका पाहून त्यांना व्यत्यय नको म्हणून श्रीमंत तसेच मागे देवळाच्या बाजूला गेले. तर तिथे रमाबाई दासीं बरोबर खेळताना दिसल्या. ते मंडळी बरोबर त्यांच्या खेळात व्यत्य नको म्हणून मागे फिरले. पण पळत असलेल्या रमाबाईंना बघून देवबाने त्यांना आवाज दिला. आक्कासाहेबऽऽ.. काय देवबाकाका? अरेऽ गडावरचा प्रसन्न वातावरण बघून आम्ही तिघी चौघी चोर शिपायाचा खेळात रंगलो होतो. पण आक्कासाहेब, तुमचा खेळ सरकार स्वामी आणि खासे मंडळींनी बघितला आहे. अग बाई! खरंच? धास्तावून रमाबाईंनी विचारले, काका तू काहीतरी सांगतोस. मग त्या झाडामागे जाऊन बघा. रमाबाईने समोर बघितले. बाई गं! स्वामी आणि खासे मंडळी उभे दिसले.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २३-७-२०२३.
!!! रमाबाई !!!
भाग – ४.
सर्वांना तिथे बघून ओशाळलेल्या रमाबाई पदर सावरून राजवाड्याच्या दिशेने दासींसह निघून गेल्या. नंतर श्रीमंत पेशवेंनी बरोबरच्या खाशा मंडळ बरोबर शिवाईचे दर्शन घेतले. आणि सर्वजण महालातील एका दालनात स्थानापन्न झाले. श्रीमंत चिंतातूर स्वरात म्हणाले, शास्त्रीजी, आता पुढे काय करायचे? आमच्यावर फारच कठीण जबाबदारी आली आहे. वय लहान. अनुभव नाही. दौलतीची परिस्थिती बिकट. तंजावर पासून अटकेपर्यंत दरारा असलेली मराठी दौलत चारही बाजूंनी खिळखिळी झाली आहे. निजाम, हैदर मागचा वाचवा काढण्यासाठी टपून बसले आहेत. उत्तरेत कुणाचा पायपोस नाही. सरदारात एकी नाही. राज्य कर्जात बुडलेले, काकासाहेबांचा आधार नाही. अशा स्थितीत आम्हाला कैक रात्री झोप येत नाही.
श्रीमंत वयावर काही अवलंबून नाही. शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी तोरणा घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. त्या महापुरुषाची आमची तुलना कशी होऊ शकणार? त्यांच्या पायाजवळ तरी राहण्याची आमची पात्रता आहे का? त्यांची धडाडी आमच्यात कुठून येणार? शिवाय महाराजांना फार मोठी साथ होती. त्यांच्यासाठी अनेकांनी आपल्या प्राण्यांचे बलिदान केले होते. त्यांच्या पाठीशी जिजामाता, दादोजी कोंडदेव होते. आम्ही अगदी एकाकी आहोत. शास्त्रीबुवा म्हणाले! कोण म्हणतं तुम्ही एकाकी आहात? गोपाळराव पटवर्धन, त्रिंबकराव पेठे, घोरपडे, विंचुरकर, मल्हारराव रास्ते दरकरांसारखे खांदेवीर आहेत. सावरून घ्यायला मी आहे. नाना आहेत. तुम्ही फक्त हिम्मत धरून उभे रहा. राज्याची सूत्रे स्वतंत्रपणे हाती घ्या. कोणाची लुडबुड चालू देऊ नका. पण काकासाहेब नाराज होतील ना?
श्रीमंत अभय असेल तर खरं सांगू? अभय आहे. शास्त्रीबुवा, म्हणून तर तुम्हा सर्वांना एकांती आणले. शांतीयज्ञ हे निमित्य आहे. शास्त्रीबुवा म्हणाले, दादासाहेब शूर पराक्रमी आहेत. शत्रूत त्यांचा दराराही आहे. पण ते चंचल वृत्तीचे आहे. ते सखाराम बापू व गंगोबा तात्याच्या सल्ल्याप्रमाणे वागतात. त्यामुळे राज्यातील परिस्थिती बदलून जाते. तुम्ही राज्याचे सर्व सूत्रे स्वतंत्रपणे हत्ती घेतली तरच, या विस्कटलेल्या दौलतीची घडी नीट बसवता येईल. आम्ही सर्वजण रक्ताच्या शेवटच्या थेंब थेंब असेपर्यंत शत्रूलाच त्राही भगवान करून सोडू.
पेशवे म्हणाले, आमची सारी भिस्त तुमच्या सारख्या अनुभवी मंडळी वरच आहे. तुमच्या भरोशावरच आम्ही पेशवाईची वस्त्रे स्वीकारली. तुम्हा मंडळींचा एवढा मोठा भक्कम आधार असल्यावर आम्हाला काही चिंता नाही. लवकरच आम्ही राज्याची सूत्रे स्वतंत्रपणे हाती घेतो. श्रीमंत पेशव्यांच्या निर्णयाने मंडळीत उत्साह संचारला.
पेशवे उभे राहताच सर्व मंडळी उभी राहिली. नाना, उद्याच्या शांती यज्ञाची सर्व तयारी झाली ना? होय श्रीमंत! पहाटे चार वाजता होमवनाला प्रारंभ होणार आहे. शांतीयज्ञाचे पूजन आपल्या हस्ते होणार आहे. तशी कल्पना बाईसाहेबांना दिली आहे. मुजरे घालून मंडळी बाहेर पडले.
श्रीमंत पेशवे राजवाड्यातील दिवानखान्यात आले, तोच रमाबाई जवळ येऊन म्हणाल्या, स्वामीऽ, आम्हाला क्षमा करावी. क्षमा? कशाबद्दल? आम्ही पेशवाईण असून देखील खेळलो. मग त्यात काय बिघडलं? पेशवाईन म्हणून आम्हाला ते शोभलं नाही. रमा, काय शोभल नी काय नाही, हे आपणच ठरवायचं असतं. लोकांचा विचार केला तर, ते ” पायी चालू देत नाही गाढवावरही बसू देत नाही” म्हणजे स्वामीऽ, तुम्हाला राग नाही आला. नाही! उलट वाईट वाटलं. तुमच्या रंगलेल्या खेळात व्यत्यय आला म्हणून. त्यासाठी आम्ही मागेच थांबलो होतो. पण देवबाने घोटाळा केला. चार भिंतीत कोंढून पडलेली पेशवीण बाई हरणीसारखी बागडतांना पाहून, आम्हा सर्वांनाच आनंद झाला.
एक सुस्कारा टाकत रमाबाई म्हणाल्या, सुटले बाई एकदाचे! त्यावर पेशवे मोठ्याने हसत म्हणाले, हेच तुमचे खेळण्याबाबतचे दिवस. पण आम्ही मात्र या सुखापासून वंचित झालो. म्हणजे? अहोऽ! काल-परवापर्यंत तुम्ही परकारात वावरत होत्या. वाड्यात येथेच्छ बागडत होत्या. आमच्याशी भांडत होत्या. आम्हालाही भांडायला मजा येत होती. पण नियतीच्या एकाच वाराने सारे बदलून गेले. आम्ही मराठी दौलतीचा पेशवा झालो. तुम्हाला शालू नेसावा लागला. अकाली पोक्तपणा आला. आपलं बालपण हरवलं. हरवावं लागलं. आयुष्यातील स्वर्गीय सुखाला पारखं व्हावं लागलं. या पेशवाई पदाच्या जबाबदारी मुळे आम्ही देखील आमचं बालपण हरवून बसलो.
आता या तुम्ही. सकाळी लवकर उठून तुम्हाला तयारी करावी लागेल. पूजेला बसायचं आहे.
सकाळी लवकर तयारी करुन दोघेही मांडवात आले, तेव्हा तोबा गर्दी उसळली होती. मुख्य पुजाराने यज्ञकुंड पेटवला होता. दहा पुरोहित यज्ञाकुंडा भोवती बसले होते. पुरोहित उंच आवाजात मंत्रोच्चार करीत होते. नानासाहेब पेशवे, विश्वासराव आणि पाणीपतवर वीरमरण प्राप्त झालेल्या वीर सैनिकांच्या नावाने समाधी टाकल्या जात होत्या. वेदांच्या पवित्र घोषांनी वातावरण मंगलमय झाले होते. सनईची मंगल मंद धून वातावरणात घुमत होती. जवळजवळ दुपारपर्यंत चाललेल्या शांती यज्ञाची सांगता करण्यात आली. सुग्रास भोजनाच्या पंगती उठल्या.
शांती यज्ञ आटोपल्यावर संध्याकाळी बायकांचे मेणे पुण्याकडे रवाना झाले. श्रीमंतांसोबत खासे लोक आणि मागेपुढे हत्यारे स्वार दौडत होती.
एक महिन्यानंतर ठरल्याप्रमाणे श्रीमंत माधवराव पेशव्यांनी स्वतंत्र राज्य कारभार हाती घेण्याचा आपला निर्णय आईसाहेब गोपिकाबाई आणि रघुनाथरावांना कळवला. ऐकून दोघांनीही आपले समाधान व आनंद व्यक्त केला. रघुनाथराव म्हणाले, माधवा, चिंता करू नकोस. कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या पाठी अभंग कड्यासारखे उभे राहून तुमचे हात बळकट करून पानिपतच्या युद्धात गेलेली इज्जत परत मिळवू… आम्हाला राज्याचा लोभ कधी नव्हता आणि आताही नाही. गोपिकाबाई म्हणाल्या, भावजी, थोरल्या वहिनी म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो, माधवाला आपल्या पदरात घ्या. त्याला खंबीर साथ द्या.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
२३-७-२०२३.
!!! रमाबाई !!!
भाग – ५.
रघुनाथराव म्हणाले, वहिनीसाहेब, विनंती नाही, आज्ञा करा. तुमचा अधिकारच आहे तो. माधवराव म्हणाले, काकासाहेब, लवकरच गणेश महालात दरबार भरवणार आहोत. त्यावेळी आपल्या आशीर्वादाची अपेक्षा करतो. आमचा आशीर्वादच आहे माधवा. केशरी दुग्धपान आटपून दादासाहेब आपल्या बदामी महालाकडे निघून गेले. गोपिकाबाईही प्रसन्नपणे आपल्या दालनाकडे निघून गेल्या.
आता आपल्या राज्यकारभारात काकाश्रींचा अडथळा राहणार नाही म्हणून श्रीमंत पेशव्यांनी मनोमन समाधानाचा, सुटकेचा निःश्वास टाकला.
श्रीमंत माधवराव पेशव्यांनी गणेश महालात आपल्या पहिल्या दरबाराचे आयोजन केले. शनिवार वाड्याभोवती गाडद्यांचा कडक पहारा आवळला गेला. शनिवार वाड्याच्या दिल्ली दरवाजावरील नगारखान्यावर भगवा झेंडा डौलाने फडकत होता. खिळेबंद बुलंद दरवाजा सताड उघडला होता. महाद्वारावर हत्यारी शिपाई शिस्तीत उभे होते.
श्रीमंतांची सख्त ताकीद होती की, ज्यांना दिल्ली दरवाजातून गणेश महालात शिरण्याचा मान आहे, त्यांनाच प्रवेश द्यावा. इतरांना गणेश महालातून सोडावे. गणेश महाल तुडुंब भरला होता. सारे सरदार, मानकरी आपापल्या इतमामाप्रमाणे बसले होते. गंगोबातात्या एका मोकळ्या असनावर बसले होते. त्यांना दिल्ली दरवाजातून प्रवेश मिळाला नाही म्हणून, ते नाराज होते. सरदार, मानकरी दबक्या आवाजात बोलत होते. श्रीमंत माधवराव पेशव्यांचा पहिलाच दरबार असल्यामुळे ते खंबीरपणे हाताळतील की नाही याची धास्ती प्रत्येकाला वाटत होती. तेवढ्यात भालदार, चोपदारांची ललकारी दरबारात घुमली. खडी ताजिम, निगा रखोऽऽ महाराजऽऽ आणि दरबार खाडकन उभा राहिला. श्रीमंत माधवराव पेशवे आत प्रवेशले. मखमली पायघड्यांवरून धीमी पावले टाकत श्रीमंत मसनदीकडे जात होते. दुतर्फा उभे असलेले सरदार, मानकरी, मनसबदार यांचे मुजरे झडत होते. मुजरांचा स्वीकार करत मोठ्या डौलाने पेशवे पुढे जात होते. मसनदी पुढे येताच त्यांनी श्रद्धेने मसनदीला मुजरा केल्यावर ते मसनदीवर विराजमान झाले. त्यांनी इशारा करतात दरबार स्थानापन्न झाला. सगळ्यांच्या नजरा श्रीमंत पेशव्यांवर स्थिरावल्या.
श्रीमंत त्रिंबकराव मामा पेठेंना म्हणाले, मामा, दरबाराच्या कामकाजाला सुरुवात करा. मामा अडखळलेले पाहून, कारण विचारले. ते म्हणाले, अजून दादासाहेब व सखाराम बापू आलेले नाहीत…
हा दरबार मराठा दौलतीच्या पेशव्यांचा आहे. मसनदीची शान राखल्या गेलीच पाहिजे. पेशव्यांच्या मसनदीपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. कामकाजाला रितसर सुरुवात करा. तोच दरबार उठून उभा राहिला. दादासाहेब, सखाराम बापू गडबडीने आत येत होते. दादासाहेब आसनाकडे गेले. सखाराम बापू मसनदीकडे येऊ लागताच, श्रीमंत कडाडले.. कारभारी सखाराम बापूऽऽ, पेशव्यांचा दरबार म्हणजे कचेरीचा फड समजलात की काय? तुम्ही पेशव्यांचे कारभारी. आजचा आमचा हा पहिला दरबार. तुम्ही दरबार सुरू होण्याआधीच हजर व्हायला हवे होते. हा मसनदीचा अपमान आहे. ही तुमची पहिलीच वेळ असल्याने एक वेळ गय करतो. पुन्हा अशी चूक झाली तर कडक कार्यवाही केल्या जाईल. दरबाराचे नियम सर्वांना सारखेच लागू आहेत. खुद्द आम्हाला देखील.
पेशव्यांचा अवतार पाहून सारा दरबार स्तब्ध झाला. रघुनाथराव पेशव्यांचा शीघ्रकोपी स्वभाव पाहून जागीच गारठले. सखाराम बापूच्या आडून आपल्याला लक्ष केल्या जात असल्याची दादासाहेबांना जाणीव झाली. आणि श्रीमंत लगेच शांत झाले. म्हणाले, बापू कामकाजाला सुरुवात करा. कामकाजाला सुरुवात झाली…
दरेकर्यांनी लष्करासाठी घोड्यांची मागणी केल्यावर ती श्रीमंतांनी मंजूर करून म्हणाले, सर्व सरदारांनी आपापल्या फलटणीत आलेला नवीन घोड्याची बरोबर मोजणी करावी. नाहीतर होते काय की, कचरीत घोडे खरेदी केल्याची नोंद असते, पण प्रत्यक्षात ती घोडे लष्करात येत नाही, बाहेरच कुठेतरी भटकत असतात. रघुनाथरावांना कळून चुकले, ही चपराक आपल्याला आहे.
अशाच प्रकारच्या मागण्या पुढे येत होत्या. श्रीमंत मंजुरी देत होते. आणखीन काही पुढे आलेले विषय हाताळले. दरबार संपल्याचे जाहीर करून पेशवे उठले. त्याबरोबर सारा दरबार उठला. संतप्त दादासाहेब, गंगोबा तात्या, सखाराम बापूही बाहेर पडले. श्रीमंत माधवराव पेशवेंनी पहिला वहिला दरबार जिंकला. चांगला दरारा निर्माण केला होता.
दुसऱ्या दिवशी गाजलेल्या दरबाराची चर्चा सर्वत्र होऊ लागली. हा तडफेचा पेशवा पानिपतचा कलंक धुऊन काढेल याबद्दल लोकांची खात्री पटली.
रात्रीचे जेवण झाल्यावर, माधवराव पेशवे पार्वती बाईंच्या महाली गेले. त्यांना नमस्कार केला. औक्षवंत व्हा. माधवराव आणि पार्वतीबाई बोलत होते भाऊ साहेबांचा शोध घेण्याचे पेशव्यांनी वचन दिले. पार्वतीबाई म्हणाल्या, काल तुम्ही दरबार फार गाजवला म्हणे! माधवराव, नेहमी एक सावधगिरी बाळगा. सखारामबापू व गंगोबात्यापासून सावध राहा. त्यांच्या तालावर दादासाहेब नाचतात. त्यांना स्वतःचं मत नाही. आम्हाला चांगलं भोवलं. आता तुमच्या मागे लागलेत. त्यांच्यावर अजिबात विश्वास धरू नका. तसेच आनंदीबाई पासून सुद्धा. आम्हाला सर्व माहिती आहे काकी. चिंता करू नका.
बरं काय म्हणतात आमच्या सुनबाई? आमच्या वर अकाली पेशवेपदाची जबाबदारी पडल्यामुळे, त्यांना पोक्तपणा आला. पार्वतीबाई म्हणाल्या, त्या फार सोशिक आहे. अशी पत्नी मिळायला देखील भाग्य लागते. इकडच्या तिकडच्या गोष्टी होऊन माधवराव आपल्या महाली परतले. तोच आई साहेबांनी बोलावल्याचा निरोप मिळाला.
श्रीमंत गोपिकाबाईच्या महाली गेल्यावर, त्यांना नमस्कार करून मंचकावर विराजमान झाले. गोपिकाबाई म्हणाल्या, काल म्हणे, तुम्ही दरबारात रुद्रावतार धारण केला होता. माधवरावांनी कारण सांगितल्यावर, त्या म्हणाल्या, फार चांगले केले. वेळेत दखल घेतली तर त्यांच्या वर्तनाला थोडा तरी आळा बसेल. तुम्ही सावधगिरीने निर्णय घेत चला. बऱ्याच किरकोळ गोष्टी होऊन माधवराव आपल्या दालनी पोहोचले तेव्हा बरीच रात्र झाली होती.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २३-७-२०२३.



















