आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

७ एप्रिल, दिवस ९७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी १०१ ते १२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ११५३ ते ११६४
“७ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ७ Apirl
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ७ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ११५३ ते ११६४ चे पारायण आपण करणार आहोत.
७ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी १०१ ते १२५,
101-9
ग्रीष्माचा अतिरसी । सबीजे तृणे जैसी । मागुती भूमीसी । सुलीने होती ॥101॥
ग्रीष्म ऋतूमध्ये कडक उन्हाच्या योगाने ज्याप्रमाणे गवत बीजासह जिरून जाते; किंवा वर्षाकालच्या मेघाचे अवडंबर संपल्यावर शरदऋतूचा अंकुर फुटतो,
102-9
का वार्षिये ढेंढे फिटे । जेव्हा शारदीयेचा अनुघडु फुटे । तेव्हा घनजात आटे । गगनीचे गगनी ॥102॥
तेव्हा सर्व आकाशांतील ढग आकाशातच जिरून जातात; अथवा आकाशाच्या पोकळीत ज्याप्रमाणे वायु उत्पन्न होऊन नाहीसा होतो
103-9
नातरी आकाशाचिये खोपे । वायु निवांतुचि लोपे । का तरंगता हारपे । जळी जेवी ॥103॥
अथवा आकाशाच्या पोकळीत ज्याप्रमाणे वायु उत्पन्न होऊन नाहीसा होतो, किंवा पाण्यात उत्पन्न झालेल्या लाटा पाण्यातच नाहीतशा होतात,
104-9
अथवा जागिनलिये वेळे । स्वप्न मनीचे मनी मावळे । तैसे प्राकृत प्रकृती मिळे । कल्पक्षयी ॥104॥
नाही तर जागे झाल्यावर मनातले स्वप्न मनातच मावळते, त्याप्रमाणे महाप्रलयाच्या शेवटी प्रकृतीपासून उत्पन्न झालेली सर्व भूते प्रकृतींतच मिळतात
105-9
मग कल्पादी पुढती । मीचि सृजी ऐसी वदंती । तरी इयेविषयी निरुती । उपपत्ती आइक ॥105॥
मग सृष्टीच्या आरंभी पुनः ती मीच निर्माण करितो अशी जी बोलवा आहे, ती विषयीची खरी खुबी तुला सांगतो, ती ऐक.
प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः ।
भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात् ॥9. 8॥
106-9
तरी हेचि प्रकृति किरिटी । मी स्वकीया सहजे अधिष्ठी । तेथ तंतुसमवायपटी । जेवि विणावणी दिसे ॥106॥
तर अर्जुना, ह्याच माझ्या प्रकृतीचा मी जेव्हा सहज अंगीकार करतो, तेव्हां, तंतूंच्या समुदायासंबंधाने ज्याप्रमाणे वस्त्रावर विणकर दिसते
107-9
मग तिये विणावणीचेनि आधारे । लहाना चौकडिया पटत्व भरे । तैसी पंचात्मके आकारे । प्रकृतिचि होये ॥107॥
मग त्या विणकरीच्या आधाराने जशी लहान चौकड्यांची वस्त्रे तयार होतात, त्याप्रमाणे, पंचभूतात्मक आकाराने प्रकृति सृष्टिरूपाने चमकूं लागते.
108-9
जैसे विरजणियाचेनि संगे । दूधचि आटेजो लागे । तैशी प्रकृति आंगा रिगे । सृष्टिपणाचिया ॥108॥
ज्याप्रमाणे विरजण घातल्याच्या योगाने दूध विरजू लागते त्याप्रमाणे, प्रकृति ही सृष्टीतील आकार बनूं लागते.
109-9
बीज जळाचि जवळीक लाहे । आणि तेचि शाखोपशाखी होये । तैसे मज करणे आहे । भूतांचे हे ॥109॥
ज्याप्रमाणे पाण्याच्या सान्निध्याने बीजाला फांद्या वैगेरे फुटून त्याचे झाड होते, त्याप्रमाणे प्राणिमात्रासंबंधी सृष्टीतील पसारा माझ्यामुळे होतो.
110-9
अगा नगर हे राये केले । या म्हणणया साचपण कीर आले । परि निरुते पाहता काय शिणले । रायाचे हात ॥110॥
अरे, एखादे शहर राजाने वसविले हे म्हणणे जरी खरे असले, तरी खरोखर पाहू गेले असता राजाच्या हाताला काही शीण पडतो का ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
111-9
आणि मी प्रकृति अधिष्ठी ते कैसे । जैसा स्वप्नी जो असे । मग तोचि प्रवेशे । जागृतावस्थे ॥111॥
आणि मी प्रकृतीचा स्वीकार करतो तो कसा म्हणशील, तर जसा स्वप्नावस्थेंत असलेला मनुष्य जागृतावस्थेत येतो तसा
112-9
तरि स्वप्नौनि जागृती येता । काय पाय दुखती पंडुसुता । की स्वप्नामाजी असता । प्रवासु होय ॥112॥
हे पंडुसुता, स्वप्नावस्थेंतून जागृतावस्थेत येतांना त्या मनुष्याचे पाय दुखतात का ? किंवा स्वप्नावस्थेंत असतांना त्याला फिरण्याचे श्रम होतात का ?
113-9
या आघवियाचा अभिप्रावो कायी । जे हे भूतसृष्टीचे काही । मज एकही करणे नाही । ऐसाचि अर्थु ॥113॥
या सर्वाचा अभिप्राय काय म्हणशील, तर ही भूतसृष्टि निर्माण करण्याला मला काही एक करावे लागत नाही, हाच अर्थ आहे.
114-9
जैशी राये अधिष्ठिली प्रजा । व्यापारे आपुलालिया काजा । तैसा प्रकृतिसंगु माझा । येर करणे ते इयेचे ॥114॥
ज्याप्रमाणे राजाने आज्ञेत ठेवलेली प्रजा आपल्या प्राप्तीस्तव व्यापार करते, त्याप्रमाणे, प्रकृतीचा व माझा संबंध आहे. येरव्ही उत्पत्ति, स्थिती व लय हे सर्व व्यापार तिचेच आहेत.
115-9
पाहे पा पूर्णचंद्राचिये भेटी । समुद्र भरते अपार दाटी । तेथ चंद्रासि काय किरीटी । उपखा पडे ॥115॥
हे पहा, पौर्णिमेच्या चंद्राची भेट होताच समुद्राला अपार भरती येते. पण अर्जुना येथे चंद्राला काही श्रम पडतात का ?
116-9
जड परि जवळिका । लोह चळे तरि चळो का । कवणु शीणु भ्रामका । सन्निधानाचा ॥116॥
लोखंड जड असूनही लोहचुंबक जवळ असल्याने जरी हालते, तरी लोहचुंबकाला लोखंड हालवण्याचे कोणते श्रम पडतात ?
117-9
किंबहुना यापरी । मी निजप्रकृति अंगीकारी । आणि भूतसृष्टी एकसरी । प्रसवोचि लागे ॥117॥
किंबहुना याप्रमाणे मी सृष्टि उत्पन्न होणाऱ्या इच्छेचा अंगीकार केल्यावर एकदम प्राणिमात्राचा विस्तार होऊ लागतो.
118-9
जो हा भूतग्रामु आघवा । असे प्रकृतिआधीन पांडवा । जैसी बीजाचिया वेलपालवा । समर्थ भूमि ॥118॥
पांडवा, हा सर्व प्राणिसमुदाय प्रकृतीच्या आधीन आहे. ज्याप्रमाणे बीजाला वेली, पाने वैगेरे उत्पन्न करण्यास भूमि समर्थ आहे,
119-9
नातरि बाळादिका वयसा । गोसावी देहसंगु जैसा । अथवा घनावळी आकाशा । वार्षिये जेवी ॥119॥
अथवा बाळपण, तारुण्य व वृद्धपण या अवस्थाना ज्याप्रमाणे देहसंग हे मुख्य कारण आहे, किंवा आकाशात मेघपंक्ति उत्पन्न होण्यास जसा वर्षाकाल कारण आहे,
120-9
का स्वप्नासि कारण निद्रा । तैसी प्रकृति हे नरेंद्रा । या अशेषाहि भूतसमुद्रा । गोसाविणी गा ॥120॥
किंवा स्वप्नाला जशी निद्रा कारण आहे, त्याचप्रमाणे हे नरेंद्रा, या सर्व प्राणिसमुदायाला प्रकृति मुख्य कारण होय.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-9
स्थावरा आणि जंगमा । स्थूळा अथवा सूक्ष्मा । हे असो भूतग्रामा । प्रकृतिचि मूळ ॥121॥
स्थावरजंगमाला, स्थुलसूक्ष्माला, फार काय सांगावे ? या जगाला प्रकृतिच मूळ कारण होय.
122-9
म्हणोनि भूते हन सृजावी । का सृजिली प्रतिपाळावी । इये करणी न येती आघवी । आमुचिया आंगा ॥122॥
म्हणून, प्राणी उत्पन्न करावे किंवा उत्पन्न झालेल्यांचा प्रतिपाळ करावा, या सर्व कृतीचे कर्तुत्व मजकडे येत नाही.
123-9
जळी चंद्रिकेचिया पसरती वेली । ते वाढी चंद्रे नाही वाढविली । तेवि माते पावोनि ठेली । दुरी कर्मे ॥123॥
पाण्यात चंद्राला प्रकाश वेल पसरल्याप्रमाणे दिसतो, त्याची उत्पत्ति चंद्राने केली नाही, त्याप्रमाणे, ही कर्मे मजपासून उत्पन्न झालेली असुनही मजपासून दुरच असतात.
न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय ।
उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥9. 9॥
124-9
आणि सुटलिया सिंधुजळाचा लोटु । न शके धरु सैंधवाचा घाटु । तेवि सकळ कर्मा मीच शेवटु । ती काइ बांधती माते ॥124॥
ज्याप्रमाणे, समुद्राच्या पाण्याचा लोट वाहू लागल्यावर त्याला मिठाचा बांध आडवू शकत नाही, त्याप्रमाणे, माझ्यात लय पावणारी सर्व कर्मे मला कशी बांधू शकतील ?
125-9
धूम्ररजांची पिंजरी । वाजतिया वायुते जरी होकारी । का सूर्यबिंबामाझारी । आंधारे रिगे ॥125॥
धूराचे छत जर वाहणाऱ्या वायुस हाक मारुन अडथळा करील, किंवा सुर्यकिरणात अंधार शिरेल, फार काय सांगावे ?
दिवस ९७ वा, ७, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ११५३ ते ११६४
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ११५३
मुख डोळा पाहे । तैशी च ते उभी राहे ॥१॥
केल्याविण नव्हे हाती । धरोनि आरती परती ॥धृपद॥
न धरिती मनी । काही संकोच दाटणी ॥२॥
तुका म्हणे देवे । ओस केल्या देहभावे ॥३॥
अर्थ
भगवंताचा जन्म झाल्यानंतर त्याला पाहण्यासाठी आलेल्या गोपी भगवंत श्रीकृष्णाला पाहिले की तेथेच तटस्थ उभे राहात. त्यांच्या हाताला धरून त्यांना बाजूला केल्याशिवाय त्या गोपी तेथून बाजूला जातच नव्हत्या. गर्दीतही गोपी भगवंताचे मुख पाहण्याकरिता कोणत्याही प्रकारचा संकोच मानत नव्हते. तुकाराम महाराजांचा देवाने आपल्या स्वरूपाच्या मोहाने सर्वाचे देहभाव हरपून टाकले होते.
अभंग क्र. ११५४
गोकुळीच्या सुखा । अंतपार नाही लेखा ॥१॥
बाळकृष्ण नंदा घरी । आनंदल्या नरनारी ॥धृपद॥
गुढिया तोरणे । करिती कथा गाती गाणे ॥२॥
तुका म्हणे छंदे । येणे वेधिली गोविंदे ॥३॥
अर्थ
श्रीकृष्णाच्या जन्मामुळे गोकुळातील सुखाला अंतपार नव्हता. नंदाच्या घरी बाळकृष्ण जन्माला आल्यामुळे सर्व नरनारीना आनंद झाला. सर्वानी आपल्या घरावर गुढ्या (भगव्या पताका) उभारल्या दाराला तोरण बांधले आणि आनंदाने हरिकथा करत हरि गुण गात होते. तुकाराम महाराज म्हणतात श्रीकृष्णाने सर्वाना आपल्या छंदात रंगवून टाकले आणि सर्वाना आपल्या रूपाने मोहून टाकले.
अभंग क्र. ११५५
विटंबिला भट । दिला पाठीवरी पाट ॥१॥
खोटे जाणोनि अंतर । न साहे चि विश्वंभर ॥धृपद॥
ते चि करी दान । जैसे आइके वचन ॥२॥
तुका म्हणे देवे । पूतना शोषियेली जीवे ॥३॥
अर्थ
कंसाने बालकृष्णास मारण्यास महाबळ भट नावाच्या ब्राम्हणस पाठविले. तो आल्यानंतर नंद यशोदेने त्याला बसण्यासाठी पाट दिला. आपण मोठे त्रिकालज्ञानी ज्योतिषी आहोत असे तो म्हणाला असे म्हणून नंद-यशोदाला त्याने मोहित केले. आणि नंतर त्याने श्रीकृष्णाचे मुद्दाम विरुद्ध भविष्य सांगण्यास सुरुवात केली. त्यावेळी भगवंताने तो ज्या पाटावर बसला होता तोच मायेने उडविला आणि त्या भटाच्या पाठीवर बसविला म्हणजे जोरात मारला. तो खोटे बोलत होता त्याचा अंतर्भाव पाहून श्रीकृष्ण विश्वंभराला ते सहन झाले नाही. ज्या प्रकारचे खोटे भविष्य तो भट सांगत होता त्या प्रकारचे दान त्याला देण्यास भगवंताने सुरुवात केली. तुकाराम महाराज म्हणतात नंतर देवाने पुतणाला ही मारले तिच्या स्तनातील दूध पिऊन तिचा प्राण ही देवाने पिऊन टाकला.
अभंग क्र. ११५६
प्रेम देवाचे देणे । देहभाव जाय जेणे । न धरावी मने । शुद्धी देशकाळाची ॥१॥
मुक्त लज्जाविरहित । भाग्यवंत हरीभक्ती । जाले वोसंडत । नामकीर्तीपवाडे ॥धृपद॥
जोडी जाली अविनाश । जन्मोनि जाले हरीचे दास । त्यास नव्हे गर्भवास । परब्रह्मी सौरस ॥२॥
हे चि वाहाती संकल्प । पुण्यप्रसंगाचे जप । तुका म्हणे पाप । गावी नाही हरीजना ॥३॥
अर्थ
प्रेम देवाचे देणे आहे आणि प्रेमानेच माणसाचा देहभाव नाहीसा होतो. प्रेमाने देश कालाची देखील मनाला शुद्ध राहत नाही. ज्या हरी भक्तांच्या मनात प्रेम असते ते लज्जा विरहित असतात, भाग्यवंत असतात. हरिनाम कीर्तीचे पोवाडे त्यांच्या ठिकाणी ओसंडून वाहत असते. हरिभक्त जन्माला येऊन हरीचे दास होतात आणि त्यामुळे त्यांना अविनाशी अशा पांडुरंगाची प्राप्ती होते. हरिभक्त हरी ची भक्ती करतात त्या कारणाने आणि परब्रम्ह त्यांच्याशी एकरूप होतात त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा गर्भवास भोगावे लागत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात मी आता असाच संकल्प करतो की, माझ्या हातून सदा पुण्यकर्म घडो आणि माझ्या मुखातून सदा हरिनाम जप घडो, असे संकल्प जे हरी भक्त करतात त्यांच्या गावी चुकून देखील पाप येत नाही.
अभंग क्र. ११५७
तोचि लटिक्यामाजी भला । म्हणे देव म्या देखिला ॥१॥
ऐशियाच्या उपदेशे । भवबंध कैसे नासे ।
बुडवी आपणासरिसे । अभिमाने आणिकास ॥धृपद॥
आणिक नाही जोडा । देव म्हणविता तया मूढा ॥२॥
आणिकाचे न मनी साचे । तुका म्हणे या श्रेष्ठांचे ॥३॥
अर्थ
जो म्हणत असेल की मी देव पाहिला आहे तर तो लबाडा चाही शिरोमणी आहे. अशा लबाड माणसाच्या उपदेशाने कसा भावबंध नाश पावेल सांगा बरे ? अभिमानाने तो मनुष्य स्वतः नरकाला जातो आणि त्याच्याबरोबर दुसऱ्यालाही नरकाला घेऊन जातो. जो स्वतःला देव समजतो अशा माणसाच्या जोडीला या जगात कोणीही नाहि. तुकाराम महाराज म्हणतात श्रेष्ठ साधुसंतांनी जरी चांगला उपदेश केला तरी हे दांभिक मनुष्य कोणालाही चांगले म्हणत नाहीत.
अभंग क्र. ११५८
होईल जाला अंगे देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥१॥
येरांनी सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥धृपद॥
धाला आणिकाची नेणे तहान भूक । सुखे पाहे सुख आपुलिया ॥२॥
तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव । शब्दाचे गौरव कामा नये ॥३॥
अर्थ
हरी आणि गुरुच्या कृपेने ज्याला देव प्राप्त झाला असेल त्याला सर्वत्र देवाची प्रचिती येते. यावाचून इतर रेमट कथा करणाऱ्या लोकांनी लोकांच्या मनाचे मनोरंजन करण्याकरिता कोणतेही रमेट कथा करत बसाव्यात. जो पोट भरून जेवतो त्याला इतरांची तहानभूक कळत नाही त्याप्रमाणे जो देवरूप झालेला असतो तोच सर्वत्र सुख पाहतो. तुकाराम महाराज म्हणतात येथे प्रत्यक्ष अनुभव पाहिजे नुसताच शब्द ज्ञानचा वापर करण्यात अर्थ नाही तो कामी येत नाही.
अभंग क्र. ११५९
का न वजावे बैसोनि कथे । ऐसे ऐका हो श्रोते । पांडुरंग तेथे । उभा असे तिष्ठत ॥१॥
म्हणऊनि करी धीर । लक्ष लावूनि सादर । भवसिंधुपार । असेल ज्या तरणे ॥धृपद॥
कथे काही अणुमात्र । नो बोलावा हा वृत्तांत । देवभक्ता चित्त । समरसी खंडणा ॥२॥
का वैष्णव पूजावे । ऐका घेईल जो भावे । चरणरजा शिवे । वोढविला मस्तक ॥३॥
ऐसे जाणा हे निभ्रांत । देव वैष्णवाचा अंकित । अलिप्त अतीत । परमित त्यासाठी ॥४॥
घालोनि लोळणी । तुका आला लोटांगणी । वंदी पायवणी । संतचरणींचे माथा ॥५॥
अर्थ
हे श्रोत्यांनो हरिकथा चालू असताना मधून का उठून जाऊ नये ते मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही ऐका. कथा चालू असताना स्वतः पांडुरंग तेथे कथा ऐकण्यासाठी तिष्ठत उभा असतो आणि आपण जर मधून उठलो तर त्या पांडुरंगाची अवज्ञा केल्यासारखा प्रकार होतो त्यामुळे कथेत बसण्याचा धीर धरावा आणि कथा भक्ती भावपूर्वक व लक्ष देऊन ऐकावी. ज्याला हा भवसागर तरुन जायचा असेल त्याने मी सांगितले तसे ऐकावे. कथा चालू असताना कोणत्याही गोष्टी अनुमात्र म्हणजे थोड्या देखील बोलू नये कारण तेथे देव आणि भक्त यांच्या चित्ताचा मिलाप झालेला असतो म्हणजे दोघेही एकरूप झालेले असतात आणि आपण जर मध्येच बोललो तर त्यात बिघाड होतो. वैष्णवांना का पुजावे श्रद्धेने ऐकायचे असेल तर ऐका. वैष्णवांच्या पायाची धूळ म्हणजे रजकण चरणरज आपल्या मस्तकाला लावता यावी म्हणून भगवान शंकर देखील आपले मस्तक पुढे करत असतात त्यामुळे वैष्णवांना पुजावे देव वैष्णवाचा अंकित आहे हे तुम्ही जाणून घ्या. तो देव या जगतामध्ये राहून देखील या जगापासून अलिप्त आहे विलक्षण आहे आणि असा देव वैष्णवा करिता सगुण-साकार झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात वैष्णवाचा एवढा अनन्यसाधारण महिमा आहे, त्यामुळे मी वैष्णवांच्या चरणी लोळणी घालून त्यांच्या चरणावर लोटांगण घालत आहे वैष्णवाचे चरण धुवून, धुतलेल्या तीर्थ ला मी माझ्या मस्तकाला, माथ्याला लावतो.
अभंग क्र. ११६०
अनुभवे आले अंगा । ते या जगा देतसे ॥१॥
नव्हती हाततुके बोल । मूळ ओल अंतरिची ॥धृपद॥
उतरूनि दिसे कशी । शुद्धरसी सरे ते ॥२॥
तुका म्हणे दुसरे नाही । ऐसी ग्वाही गुजरली ॥३॥
अर्थ
मला जो अनुभव आला आहे तो मी या जगाला देत आहे. माझे हे शब्द म्हणजे नुकतेच हातात काहीतरी दयावे व अंदाजेच त्याचे वर्णन करावे अशापैकी नाहीतर ते शब्द म्हणजे माझा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि त्या शब्दात त्या शब्दाच्या मुळात माझ्या अंतरीचा ओलावा आहे. माझे हे शब्द म्हणजे मी घेतलेल्या अनुभवाच्या कसावर खरे उतरलेले आहेत आणि त्याची मान्यताही संतांनी दिलेली आहे हे शब्द म्हणजे शुध्द शांतरस आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “माझे शब्द म्हणजे सिध्दांतावाचून दुसरे काहीच नाहीत याविषयी प्रत्यक्ष साक्ष देऊन मी हे तुमच्यापुढे ठेवले आहे ती साक्ष म्हणजे माझ्या अनुभवाची आहे. ”
अभंग क्र. ११६१
साधकाची दशा उदास असावी । उपाधि नसावी अंतर्बाहय ॥१॥
लोलुप्यता काय निद्रेते जिणावे । भोजन करावे परिमित ॥धृपद॥
एकांती लोकाती स्त्रियांशी भाषन । प्राण गेल्या जाण बोलो नये ॥२॥
तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे । तोचि ज्ञान लाहे गुरुकृपा ॥४॥
अर्थ
परमार्थातील साधकाची दशा संसाराविषयी उदास असावी. आणि त्याच्या अंतःकरणात काम क्रोध आणि बाह्यरंगात संसार विषयी कोणतीही उपाधी नसावी. साधकाने लोलुप असू नये, निद्रेला नियंत्रित ठेवावे तसेच कमी जेवावे. साधकाने परस्त्रीशी एकातात किंवा लोकातात देखील बोलू नये. तुकाराम महाराज म्हणतात या वचनाचे जो साधक पालन करून त्या वचनाच्या ठिकाणी स्थिर राहील त्यालाच हरीच्या व गुरूच्या कृपेने ज्ञान प्राप्त होईल.
अभंग क्र. ११६२
अंतरींची ज्योती प्रकाशली दीप्ति । मुळींची जे होती आच्छादिली ॥१॥
तेथींचा आनंद ब्रम्हांडी न समाये । उपमेशी काये देऊ सुखा ॥धृपद॥
भावाचे मथिले निर्गुण संचले । ते हे उभे केले विटेवरी ॥२॥
तुका म्हणे आम्हा ब्रम्हांड पंढरी । प्रेमाची जे थोरी साठवण ॥३॥
अर्थ
आमच्या अंतरंगात हरीच्या मूळ स्वरूपाचा प्रकाश होता परंतु अज्ञानाने तो झाकला गेला होता पण आता हरीच्या स्वरूपाची ज्योत आमच्या अंतरंगात पुन्हा पेटली आहे त्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. माझ्या या आनंदाला कोणती उपमा देऊ हेच मला सुचेनासे झाले आहे. पुंडलिकाने निर्गुण स्वरूपाला त्याच्या भक्तीच्या रवीने मंथन करूनच सगुण साकार केले व त्या निर्गुण निराकार ब्रह्माला विटेवर उभे केले. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला ब्रह्मांड म्हणजे पंढरीच आहे कारण तेथे भक्तीची मोठी साठवण आहे.
अभंग क्र. ११६३
कासया गा मज घातले संसारी । चित्त पायावरी नाही तुझ्या ॥१॥
कासया गा मज घातले या जन्मा । नाही तुझा प्रेमा नित्य नवा ॥धृपद॥
नामाविण माझी वाचा अमंगळ । ऐसा का चांडाळ निर्मीयेलो ॥२॥
तुका म्हणे माझी जळो जळो काया । विठ्ठला सखया वाचूनिया ॥३॥
अर्थ
देवा माझे चित्त तुझ्या पाया च्या ठिकाणी नाही मग मला तू संसारात का घातले ? देवा तुझ्या विषयी मला जर नित्यनवे प्रेमच नाही तर मग तू मला मनुष्यजन्म मला का घातले ? देवा तुझ्या नामा वाचुन माझी वाचा अमंगळ आहे तर मग अशा चांडाळा तू निर्माणच का केलेस ? तुकाराम महाराज म्हणतात जर माझा सखा विठ्ठला माझ्याजवळ नाही तर माझ्या शरीराला आग लागो.
अभंग क्र. ११६४
प्रारब्धेचि जोडे धन । प्रारब्धेचि वाडे मान ॥१॥
कासोस करिसी वाया । भजे मना पंढरीराया ॥धृपद॥
प्रारब्धेचि होय सुख । प्रारब्धेचि पावे दुःख ॥२॥
प्रारब्धेचि भरे पोट । तुका करीना बोभाट ॥३॥
अर्थ
प्रारब्धाने धनप्राप्ती होते आणि प्रारब्धाने च मान वाढतो त्यामुळे हे मना सर्व जर प्रारब्धाने होते तर मग व्यर्थ हव्यास तू काय करतोस ? हे सर्व सोडून दे आणि पांडुरंगराया चे भजन कर प्रारब्धाने सुख दुःख होते. तुकाराम महाराज म्हणतात प्रारब्धनेच पोट भरते त्यामुळे मी माझे पोट भरण्याकरता केव्हाही कोणालाच काहीही मागितले नाही आणि त्याचा बोबाटा ही केलेला नाही.
येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















