आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१७ एप्रिल, दिवस १०७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी ३५१ ते ३७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १२७३ ते १२८४
“१७ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १७ Apirl
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १७ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
१७ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा, ओवी ३५१ ते ३७५,
351-9
एऱ्हवी पाहे पा पंडुसुता । या यज्ञोपहारा समस्ता । मीवाचूनि भोक्ता । कवणु आहे ॥351॥
अर्जुना, एरव्ही असे पहा की, या सर्व यज्ञोपचारांचा माझ्यावाचून दुसरा कोण भोक्ता आहे ?
352-9
मी सकळा यज्ञांचा आदि । आणि यजना या मीचि अवधि । की माते चुकोनि दुर्बुद्धि । देवा भजले ॥352॥
मी सकळा यज्ञांचा आदि । आणि मी सर्व यज्ञांचा आदि आहे, व यजनाचा शेवटही मीच आहे; परंतु दुर्बुद्धि जे असतात, ते मला सोडून इंद्रादि देवांसभजतात.
353-9
गंगेचे उदक गंगे जैसे । अर्पिजे देवपित्तरोद्देशे । माझे मज देती तैसे । परि आनानी भावी ॥353॥
ज्याप्रमाणे गंगेचे पाणी देव व पितर यांच्या नांवाने गंगेतच अर्पण करतात, त्याप्रमाणे ते माझे मलाच देतात
354-9
म्हणऊनि ते पार्था । माते न पवतीचि सर्वथा । मग मनी वाहिली जे आस्था । तेथ आले ॥354॥
पण निराळ्या भावाने ! म्हणून पार्था, ते कधीही मला पावत नाहीत; मग मनात जी इच्छा धारण करतात, त्या ठिकाणी ते जातात.
यान्ति देवव्रता देवान्पितॄन्यान्ति पितृव्रता: ।
भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥9. 25॥
355-9
मने वाचा करणी । जयांची भजने देवांचिया वाहणी । ते शरीर जातियेक्षणी । देवचि जाले ॥355॥
मन, वाचा व इंद्रिये यांच्या योगाने जे इंद्रादि देवाचे भजन करतात, ते, शरीर जाताक्षणीच देवरूप होतात.
356-9
अथवा पितरांची व्रते । वाहती जयांची चित्ते । जीवित सरलिया तयाते । पितृत्व वरी ॥356॥
अथवा, ज्यांच्या मनाने पितरांची व्रते करण्याचे घेतले आहे, त्यांना प्राणांती पितृलोक प्राप्त होतो; .
357-9
का क्षुद्रदेवतादि भूते । तियेंचि जयांची परमदैवते । जीही अभिचारिकी तयाते । उपासिले ॥357॥
किंवा वेताळादि पिशाच व शुद्र देव ही ज्यांची परम दैवते आहेत, व ज्यांनी घातक अशा जारणमारण कर्मांनी त्यांची उपासना केली आहे,
358-9
तया देहांची जवनिक फिटली । आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली । एवं संकल्पवशे फळली । कर्मे तया ॥358॥
त्यांना देहाचा पडदा पडतांच पिशाचयोनीची प्राप्ति होते. अशा प्रकारे त्यांच्या संकल्पाप्रमाणे त्यांची कर्मे त्यांना फळतात !
359-9
मग मीचि डोळा देखिला । जीही कानी मीचि ऐकिला । मनी मी भाविला । वानिला वाचा ॥359॥
मग जे दृष्टीने मलाच पाहतात, कानांनी माझ्याच नांवाचे श्रवण करतात, मनाने माझेच ध्यान करतात, व माझेच वर्णन करतात,
360-9
सर्वांगी सर्वाठायी । मीचि नमस्कारिला जिही । दानपुण्यादिके जे काही । ते माझियाचि मोहरा ॥360॥
सर्वागाने व सर्व ठिकाणी मलाच नमस्कार करतात, दाने, पुण्य वगैरे सर्व काही माझ्याच उद्देशाने करतात,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
361-9
जिही मातेचि अध्ययन केले । जे आंतबाहेर मियाचि धाले । जयांचे जीवित्व जोडले । मजचिलागी ॥361॥
ज्यांनी माझ्या नामस्मरणाचेच अध्ययन केले आहे, जे माझ्याच योगाने अंतर्बाह्य तृप्त झाले आहेत, ज्यांनी आपले आयुष्य माझ्याकडेच खर्च केले आहे,
362-9
जे अहंकारु वाहत आंगी । आम्ही हरीचे भूषावयालागी । जे लोभिये एकचि जगी । माझेनि लोभे ॥362॥
ज्यांना माझ्याशिवाय दुसऱ्या कसल्याही प्राप्तीची इच्छा नाही; आम्ही हरिची कीर्ती वाढविणारे आहो असा जे अहंकार बाळगतात,
363-9
जे माझेनि कामे सकाम । जे माझेनि प्रेमे सप्रेम । जे माझिया भुली सभ्रम । नेणती लोक ॥363॥
माझीच इच्छा करून ज्यांची इच्छा पूर्ण होते, जे मजवरच प्रेम ठेवून आनंदित होतात, जे माझ्याच मुळे वेडावून जाऊन लोकांची पर्वा करीतनासे होतात,
364-9
जयांची जाणती मज शास्त्रे । मी जोडे जयाचेनि मंत्रे । ऐसे जे चेष्टामात्रे । भजले मज ॥364॥
मलाच जाणणे हीच ज्यांची शास्त्रे आहेत, आणि ज्यांच्या गुरुमंत्राने इतरांना माझीप्राप्ति होते, व अशा प्रकारे जे सर्व व्यवहारांत माझ्याशिवाय इतर कोणाचेच भजन करीत नाही,
365-9
ते मरणाऐलीचकडे । मज मिळोनि गेले फुडे । मग मरणी आणिकीकडे । जातील केवि ॥365॥
ते मरणाच्या अगोदरच मद्रूप होऊन जातात; मग मरणानंतर माझ्याशिवाय दुसरीकडे कसे जातील ?
366-9
म्हणोनि मद्याजी जे जाहाले । ते माझिया सायुज्या आले । जिही उपचारमिषे दिधले । आपणपे मज । 366 ।
म्हणून, माझे यजन करणारे जे होतात, ते माझ्यात मिसळतात; कारण त्यांनी सेवेच्या मिषाने आपलेपणा मला अर्पण केला आहे.
367-9
पै अर्जुना माझा ठायी । आपणपेवीण सौरसु नाही । मी उपचारी कवणाही । नाकळे गा ॥367॥
अर्जुना, माझ्या ठिकाणी आत्मत्व समर्पण केल्याशिवाय माझ्यावर त्यांचे खरे प्रेम उत्पन्न होत नाही. म्हणून दुसऱ्या कोणत्याही उपायाने मी प्राप्त होत नाही
368-9
एथ जाणिव करी तोचि नेणे । आथिलेपण मिरवी तेचि उणे । आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे । तो काहीचि नव्हे l368l
मजविषयी ज्ञान झाले असे जो म्हणतो, त्याला खरोखर माझे ज्ञान होत नाही. मी कृतार्थ झालो असे जो दाखवितो, तो कृतार्थ होत नाही.
369-9
अथवा यज्ञदानादि किरीटी । का तपे हन जे हुटहुटी । ते तृणा एकासाठी । न सरे एथ ॥369॥
अथवा, हे किरीटी, आम्ही यज्ञ केले; आम्ही धर्म केला, किंवा आम्ही तप केले, अशी जी घमेंड बाळगतात, त्यांना माझ्या प्राप्तीच्या मानाने पाहिले असता काडीइतकीही योग्यता नसते.
370-9
पाहे पा जाणिवेचेनि बळे । कोण्ही वेदापासूनि असे आगळे । की शेषाहूनि तोंडागळे । बोलके आथी ॥370॥
हे पहा, ज्ञानबलात वेदाहून कोणी अधिक जाणता आहे काय ? किंवा शेषापेक्षा बोलण्यात किंवा मुखांनी कोणी अधिक आहे काय ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
371-9
तोही आंथरुणातळवटी दडे । येरु नेति नेति म्हणोनि बहुडे । एथ सनकादिक वेडे । पिसे जाहले ॥371॥
पण तो शेषही ज्याच्या अंथरूणाखाली दडतो, वेदही ” नेति नेति ” म्हणून मागे सरतो, तसेच सनकादिक पूर्ण ब्रह्मज्ञानीही ज्याच्याविषयी वेडे झाले आहेत;
372-9
करिता तापसांची कडसणी । कवणु जवळा ठेविजे शूळपाणी । तोहि अभिमानु सांडूनि पायवणी । माथा वाहे ॥372॥
तपस्व्यांची गणती करू लागले तर महादेवाच्या योग्यतेला दुसरा कोण लागेल ? परंतु त्यानेही अभिमान सोडून ज्याचे पादोदक म्हणजे भागीरथी आपले मस्तकावर धारण केली आहे;
373-9
नातरी आथिलेपणे सरिसी । कवणी आहे लक्ष्मियेऐसी । श्रियेसारिखिया दासी । घरी जियेते ॥373॥
किंवा संपन्नपणात लक्ष्मीपेक्षा कोणी अधिक आहे का ? तिच्या घरी सिद्धीसारख्या दासी आहेत. ,
374-9
तिया खेळता करिती घरकुली । तया नामे अमरपुरे जरि ठेविली । तरि न होती काय बाहुली । इंद्रादिक तयांची ? ॥374
त्या दासी आपल्या खेळांत जी घरकुली करतात, त्यांचे नाव जर अमरपुरी ठेविले, तर इंद्रादिक देव हे त्यांच्या घरकुल्यातील बाहुली होणार नाहीत काय ?
375-9
तया नावडोनि जेव्हा मोडती । तेव्हा महेंद्राचे रंक होती । तिया जेउते झाडा पाहती । ते कल्पवृक्ष ॥375॥
पुढे त्या दासींना ती घरकुली न आवडून जेंव्हा ती मोडतात, तेंव्हा इंद्राचे रंक बनतात व त्या ज्या झाडाकडे पाहतात, ती झाडे कल्पवृक्ष होतात;
दिवस १०७ वा, १७, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १२७३ ते १२८४
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. १२७३
माझ्या मना लागो चाळा । पहावया विठ्ठला डोळा ॥१॥
आणीक नाही चाड । न लगे संसार हा गोड ॥धृपद॥
तरि च फळ जन्मा आलो । सरता पांडुरंगी जालो ॥२॥
तुका म्हणे देवा । देई चरणांची सेवा ॥३॥
अर्थ
या विठ्ठलाला माझ्या डोळ्याने पहावे असा छंद माझ्या डोळ्याला लागो. मला यावाचून दुसरी कोणतीच इच्छा नाही मला हा संसार देखील गोड वाटत नाही. जर मी पांडुरंगाच्या मान्यतेला प्राप्त झालो तर मनुष्य जन्माला आल्याचे फळ झाले असे मी समजेन. तुकाराम महाराज म्हणतात याकरिता देवा मला तुमच्या चरणांची सेवा घडावी.
अभंग क्र. १२७४
अवघे जेणे पाप नासे । ते हे असे पंढरीसी ॥१॥
गात जागा गात जागा । प्रेम मागा विठ्ठला ॥धृपद॥
अवघी सुखाची च राशी । पुंडलिकाशी वोळली हे ॥२॥
तुका म्हणे जवळी आले । उभे ठाले समचरणी ॥३॥
अर्थ
सर्व पाप ज्याच्या दर्शनाने नष्ट होतात असे ते ब्रम्ह पंढरीत आहे. त्यामुळे गात – गात पंढरीला जा आणि त्या विठ्ठलाला प्रेम मागा. जी सर्व सुखाची राशी आहे अशी सुखाची राशी पुंडलिका साठी विटेवर उभी राहिली आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे ब्रम्ह आपल्या जवळ आले आहे आणि विटेवर त्याचे समचरण ठेवून उभे राहिले आहे.
अभंग क्र. १२७५
देह तुझ्या पायी । ठेवूनि जालो उतराई ॥१॥
आता माझ्या जीवा । करणे ते करी देवा ॥धृपद॥
बहु अपराधी । मतिमंद हीनबुद्धि ॥२॥
तुका म्हणे नेणे । भावभक्तीची लक्षणे ॥३॥
अर्थ
देवा तुझ्या पायाच्या ठिकाणी माझा देह ठेवून तुझ्या उपकारा तून उतराई झालो आहे. देवा माझ्या जीवाचे आता तुला जे काही करायचे असेल ते कर. देवा मी फार मतिमंद आहे अपराधीच आहे आणि हिन बुद्धीचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा भक्तिभावाची लक्षणे कोणती आहेत ती मला माहित नाही.
अभंग क्र. १२७६
जन हे सुखाचे दिल्याघेतल्याचे । अंत हे काळीचे नाही कोणी ॥१॥
जाल्या हीन शक्ती नाकडोळे गळती । सांडोनि पळती रांडापोरे ॥धृपद॥
बाइल म्हणे खर मरता तरी बरे । नासिले हे घर थुंकोनिया ॥२॥
तुका म्हणे माझी नव्हतील कोणी । तुज चक्रपाणी वाचूनिया ॥३॥
अर्थ
सर्व लोक सुखाचे सोबती आहेत आणि यांच्याशी देणे-घेणे केले तरच ते उपयोगी पडतात आणि यांच्याशी देणे-घेणे केले नाही तर यांना आपला काहीच उपयोग होत नाही. अंतकाळी कोणीही कोणाचे नाही. अरे तुझी शक्ति हीन झाली, तू म्हातारा झाला की तुझे नाक आणि डोळे गळायला लागतील त्या वेळी बायको आणि पोरे तुला सोडून पडतील. तुझी बायको ज्यावेळी तू घरात थुंकशील त्यावेळी म्हणेल खरेतर हा म्हातारा मेलेला बरा याने जागोजागी थुंकून माझे घर खराब केले. तुकाराम महाराज म्हणतात हे चक्रपाणी तुझ्या वाचून माझे कोणीच नाही.
अभंग क्र. १२७७
जाणोनि नेणते करी माझे मन । तुझी प्रेमखूण देऊनिया ॥१॥
मग मी व्यवहारी असेन वर्तत । जेवी जळाआत पद्मपत्र ॥धृपद॥
ऐकोनि नाइके निंदास्तुति कानी । जैसा का उन्मनी योगिराज ॥२॥
देखोनि न देखे प्रपंच दृष्टी । स्वप्नीचिया सृष्टि चेइल्या जेवी ॥३॥
तुका म्हणे ऐसे जालियावाचून । करणे तो सीण वाटतसे ॥४॥
अर्थ
देवा मला तुझे स्वरूप आत्म रूपाने समजल्या वरही, तुझे माझ्या मनाला सर्व ज्ञान असूनही मला अज्ञानी ठेव. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात राहूनही पाण्या पेक्षा वेगळे राहते त्याप्रमाणे व्यवहारांमध्ये मी राहूनही व्यवहारात न राहिल्या प्रमाणे वर्तन करेल असे मला कर. मी व्यवहारांमध्ये कोणाची निंदा व स्तूती ऐकणार नाही. जसा समाधिस्त योगी बाह्य व्यवहार जाणत नाही अगदी त्याप्रमाणे. जसे स्वप्नात भासलेली सृष्टीच्या जागृत अवस्थेत आल्यानंतर मिथ्या ठरते अगदी त्याप्रमाणे, मी प्रपंचात राहूनही प्रपंच माझ्या दृष्टीने पाहणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात अशी स्थिती झाल्यावाचून मी जे काही करत आहे ते मला शिणच वाटत आहे.
अभंग क्र. १२७८
विठ्ठला विठ्ठला । कंठ आळविता फुटला ॥१॥
कारे कृपाळू न होसी । काय जाले मज विशी ॥धृपद॥
जाल्या येरझारा । जन्मां बहुतांचा फेरा ॥२॥
तुका म्हणे नष्टा । अबोलण्या तुझ्या चेष्टा ॥३॥
अर्थ
देवा, विठ्ठला विठ्ठला म्हणता म्हणता माझा कंठ फुटला आहे. मी हाक मारून देखील तू माझ्या विषयी कृपाळू का होत नाही. तुला माझ्याविषयी काय झाले आहे ? देवा तुझ्यासाठी मी पुष्कळ येरझार्या घातल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात अरे नाष्टा तू केलेल्या चेष्टा सांगण्यासारख्या नाहीत.
अभंग क्र. १२७९
प्रपंच वोसरो । चित्त तुझे पायी मुरो ॥१॥
ऐसे करी गा पांडुरंगा । शुद्ध रंगवावे रंगा ॥धृपद॥
पुरे पुरे आता । नको दुजियाची सत्ता ॥२॥
लटिके ते फेडा । तुका म्हणे जाय पीडा ॥३॥
अर्थ
देवा माझे चित्त प्रपंचातून ओसरो आणि ते चित्त तुझ्या पायी लागो. हे पाडूरंगा तू असेच काहीतरी कर माझे चित्त तुझ्या शुध्द स्वरुपाच्या रंगात रंगून टाकावे. देवा आता पुरे झाले माझ्यावर दुसऱ्या कोणाचेही आता सत्ता नको आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा सर्व खोटयाचे तुम्ही निवारण करा म्हणजे माझ्या जन्ममरणाची पीडा जाईल. ”
अभंग क्र. १२८०
बोलाचे गौरव । नव्हे माझा हा अनुभव ॥१॥
माझी हरीकथा माउली । नव्हे आणिकासी पागिली ॥धृपद॥
व्याली वाढविले । निजपदी निजवले ॥२॥
दाटली वो रसे । त्रिभुवन ब्रम्हरसे ॥३॥
विष्णु जोडी कर । माथा रज वंदी हर ॥४॥
तुका म्हणे बळ । तोरडी हा कळिकाळ ॥५॥
अर्थ
मी हरीकथा फक्त व बोलण्यापुरते हरीकथेचे महत्व सांगतोय असे नाही तर मला प्रत्यक्ष त्याचा अनुभव आहे. माझी हरीकथा माऊली कोणच्याही पारतंत्र्याखाली नाही ती भक्तांचा उध्दार करण्याकरता पूर्णपणे स्वतंत्र आहे. या हरीकथा माऊलीनेच माझ्या आध्यात्मिक वृत्तीला जन्म दिला त्या वृत्तीला वाढविले आणि या हरीकथा माऊलीनेच मला आत्मसुखाच्या निजपदी निजविले आहे. ही हरीकथा माऊली त्रिभुवनामध्ये ब्रम्हरसाच्या दुधाने भरलेली आहे. श्रीविष्णू या हरीकथा माऊलीचे दूध पिणाऱ्या खऱ्या वैष्णवाला हात जोडतात आणि श्रीभगवान त्या निष्ठावंत वैष्णवांच्या चरणरजाला मस्तकाने वंदन करतात. तुकाराम महाराज म्हणतात, “याचे एवढे बळ आहे की हा कळीकाळाच्या देखील पायात बेडी घालतो. ”
अभंग क्र. १२८१
सेवट तो भला । माझा बहु गोड जाला ॥१॥
आलो निजांच्या माहेरा । भेटो रखुमाईच्या वरा ॥धृपद॥
परिहार जाला । अवघ्या दुःखाचा मागिला ॥२॥
तुका म्हणे वाणी । गेली आता घेऊ धणी ॥३॥
अर्थ
शेवटी माझ्या सेवेचा परिणाम चांगला झाला मी रुक्मीणी चा पती माझा पांडुरंग याच्या भेटीला पंढरपूर म्हणजे माझ्या माहेरा ला आलो आहे. माझ्या मागच्या सर्व दुःखांचा नाश झाला. तुकाराम महाराज म्हणतात आता माझ्या वाणीने हरीचे नाम तृप्ती होईपर्यंत घेण्याचे मी ठरविले आहे.
अभंग क्र. १२८२
तुझे नाम गाऊ आता । तुझ्या रंगी नाचो था था ॥१॥
तुझ्या नामाचा विश्वास । आम्हा कैचा गर्भवास ॥धृपद॥
तुझे नामी विसर पडे । तरी कोटी हत्या घडे ॥२॥
नाम घ्या रे कोणी फुका । भावे सांगतसे तुका ॥३॥
अर्थ
देवा आम्ही आता तुझे नाम घेऊन तुझ्या नामाच्या रंगात थयथय नाचेन. तुझ्या नावावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला कसा गर्भवास होईल ? तुझ्या नामाचा जर विसर पडला तर आमच्या हातून कोटी ब्रम्हहत्या घडल्याचे पातक होईल. तुकाराम महाराज म्हणतात या देवाचे नांव कोणीतरी फुकट घ्या मी तुम्हाला अगदी भक्ती भावपूर्वक सांगत आहे.
अभंग क्र. १२८३
बाइल तरी ऐसी व्हावी । नरकी गोवी अनिवार ॥१॥
घडो नेदी तीर्थयात्रा । केला कुतरा हातसोंका ॥धृपद॥
आपुली च करवी सेवा । पुजवी देवासारिखे ॥२॥
तुका म्हणे गाढव पशु । केला नाशु आयुष्या ॥३॥
अर्थ
बायको अशी असावी जी नवऱ्याला बळेच नरकात ढकलेल ती कधीही तीर्थयात्रा करू न देणारी पाहिजे. जी आपल्या नवर्याला नेहमी पाळीव कुत्र्या प्रमाणे आपल्या अधीन करून ठेवील अशीच बायको असावी. आपली त्याच्याकडून सेवा करून घेईल आणि देवासारखी पूजा करून घेईल अशी च बायको हवी. तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचा पती म्हणजे एक प्रकारचा गाढव पशु आहे आणि त्याने आपल्या आयुष्याचा नाश केला आहे.
अभंग क्र. १२८४
बाइले अधीन होय ज्याचे जिणे । तयाच्या अवलोकने पडिजे द्वाड ॥१॥
कासया ते जंत जिताती संसारी । माकडाच्या परी गारोडयांच्या ॥धृपद॥
बाइलेच्या मना येईल ते खरे । अभागी ते पुरे बाइलेचे ॥२॥
तुका म्हणे मेंग्या गाढवाचे जिणे । कुतऱ्याचे खाणे लगबगा ॥३॥
अर्थ
जो बायकोच्या आधीन राहून जीवन जगतो त्याचे तोंड जरी पाहिले तरी संकटे आपोआप येऊन पडतात. असे माणसे संसारात का जगतात कोणाला माहित, की जे गारुड्याच्या खेळातील वानराप्रमाणे बायको जशी नाचवेल तसे नचतात. बायको म्हणेल तेच खरे आहे असे नवरे म्हणतात ते अभागी आहेत असे जाणावे. तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसांची जिने म्हणजे मेंग्या गाढवाप्रमाणे आहे आणि वचवच करून खाणाऱ्या कुत्र्याप्रमाणे आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















