आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

३ एप्रिल, दिवस ९३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी १ ते २५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ११०५ ते १११६
“३ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ३ Apirl
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ३ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ११०५ ते १११६ चे पारायण आपण करणार आहोत.
३ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी १ ते २५,
सार्थ श्रीज्ञानेश्वरी: :: ॥ अथ नवमोऽध्यायःअध्याय नववा ॥ राजविद्याराजगुह्ययोग ॥
अध्याय नववा
1-9
तरि अवधान एकवेळे दीजे । मग सर्व सुखासि पात्र होईजे । हे प्रतिज्ञोत्तर माझे । उघड ऐका ॥1॥
श्री ज्ञानेश्वर म्हणतात, ” श्रोतेहो, ऐका. मी प्रतिज्ञापुर्वक हे स्पष्ट सांगतो की, तुम्ही एक लक्ष इकडे दिले तर सर्व सुखाला पात्र व्हाल.
2-9
परि प्रौढी न बोले हो जी । तुम्हा सर्वज्ञांचा समाजी । देयावे अवधान हे माझी । विनवणी सलगीची ॥2॥
पण तुम्हा सर्वज्ञांच्या सभेपुढे मी हे आढ्यतेने बोलत नाही हो ! ‘तुम्ही लक्ष द्या ‘ ही माझी तुम्हाला लडिवाळपणाची विनंती आहे.
3-9
का जे लळेयांचे लळे सरती । मनोरथाचे मनौरे पुरती । जरी माहेरे श्रीमंते होती । तुम्हा ऐसी ॥3॥
कारण, तुम्हासारखी संपन्न माहेरघरे असल्यावर, आवड म्हणुन जी एक वृत्ति आहे तिची देखील आवड पुर्ण होते, आणि मनोरथाची देखील इच्छा तृप्त होते !
4-9
तुमचेया दिठिवेचिया वोले । सासिन्नले प्रसन्नतेचे मळे । ते साऊली देखोनि लोळे । श्रांतु जी मी ॥4॥
तुमच्या कृपादृष्टीच्या ओलाव्याने भरांत आलेल्या प्रसन्नतेच्या मळ्याची थंडगार सावली पाहून, श्रमलेला असा जो मी, तो त्या ठिकाणी विश्रांति घेतो.
5-9
प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो । म्हणोनि आम्ही आपुलिया स्वेच्छावोलावो लाहो । येथ जरी सलगी करू बिहो । तरी निवो के पा ॥5॥
महाराज, तुम्ही सुखामृताचे डोहच आहां, म्हणुन आम्ही आपले इच्छेप्रमाणे त्यात बागडावे असे म्हणतो. येथेही जर तसे करून घेण्यास तुमच्याशी सलगी करण्यास भिऊ लागलो, तर आम्ही तृप्त तरी व्हावे कोठे ?
6-9
नातरी बालक बोबडा बोली । का वाकुडा विचुका पाऊली । ते चोज करूनि माऊली । रिझे जेवी ॥6॥
किंवा बालकाच्या बोबड्या बोलांनी व वेड्यावाकड्या चालण्याने ज्याप्रमाणे कौतुक मानून आई आनंद पावते, त्याप्रमाणे
7-9
तेवी तुम्हा संतांचा पढियावो । कैसेनि तरि आम्हावरी हो । या बहुवा आळुकिया जी आहो । सलगी करीत ॥7॥
तुम्हा संतजनांची प्रीति कोणत्या तरी रितीने मजवर व्हावी, या पुर्ण इच्छेने मी तुमच्याशी सलगी करीत आहे.
8-9
वाचूनि माझिये बोलतीये योग्यते । सर्वज्ञ भवादृश श्रोते । काय धड्यावरी सारस्वते । पढो सिकिजे ॥8॥
याशिवाय तुमच्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यांची माझ्या बोलण्याच्या नुसत्या योग्यतेवर प्रिती बसनार नाही. सरस्वतीपुत्राला धडे पाठ करून विद्या संपादन करावी लागते काय ?
9-9
अवधारा आवडे तेसणा धुंधुरु । परि महातेजी न मिरवे काय करू । अमृताच्या ताटी वोगरू । ऐसी रससोय कैची ॥9॥
पहा की, पाहीजे तेवढा मोठा जरी काजवा असला तरी सूर्यप्रकाशापुढे त्याचे तेज पडेल काय ? तसेच अमृतरूप ताटांत वाढण्याजोगी पाकनिष्यत्ति कोणती आहे ?
10-9
अहो हिमकरासी विंजणे । की नादापुढे आइकवणे । लेणियासी लेणे । हे कही आथी ॥10॥
अहो, ज्याचे थंड किरण आहे अशा चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा सुस्वराला गायन ऐकविणे, तसेच दागिन्याला अलंकार घालने असे कोठे होईल का ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
11-9
सांगा परिमळे काय तुरंबावे । सागरे कवणे ठायी नाहावे । हे गगनचि आडे आघवे । ऐसा पवाडु कैचा ॥11॥
परिमळाने कशाचा वास घ्यावा ? समुद्राने कशांत न्हावे ? आणि हे आकाश ज्यात मावेल अशी मोठी वस्तु कोणती आहे सांगा बरे !
12-9
तैसे तुमचे अवधान धाये । आणि तुम्ही म्हणा हे होये । ऐसे वक्तृत्व कवणा आहे । जेणे रिझा तुम्ही ॥12॥
त्याचप्रमाणे, तुमचे अवधान तृप्त होईल, आणि तुम्ही असे म्हणाल की, ‘ ही गोष्ट खरी ‘, असे तुम्हाला तृप्त करण्याजोगे वक्तृत्व कोणाचे आहे ?
13-9
तरि विश्वप्रगटतिया गभस्ती । हातिवेनि न कीजे आरती । का चुळोदके अपांपती । अर्घ्यु नेदिजे ॥13॥
म्हणुन, सर्व जग प्रकाशमय करणाऱ्या सुर्याला काडवातीने आरती करू नये की काय ? किंवा समुद्राला चुळकाभर पाण्याने अर्ध्य देऊ नये का ?
14-9
प्रभु तुम्ही महेशाचिया मूर्ती । आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती । म्हणोनि बेल जऱ्ही गंगावती । तऱ्ही स्वीकाराल की ॥14॥
महाराज, तुम्ही केवळ शंकराची मुर्ति आहां, आणि मी गरीब तुमची भक्तीने पूजा करीत आहे. म्हणून बोलाच्या ऐवजी माझ्या बोलरूपी निर्गुडीचा तुम्ही स्वीकार करणार नाही का ?
15-9
बाळक बापाचिये ताटी रिगे । रिगौनि बापातेच जेवऊ लागे । की तो संतोषलेनि वेगे । मुखचि वोडवी ॥15॥
लहान मुल बापाच्या ताटात जेवायला बसुन बापालाच जेवू घालते, तेव्हा तो संतोषभराने आपले तोंड घास घेण्याकरीता पुढे करतोच;
16-9
तैसा मी तुम्हाप्रती । चावटी करितसे बाळमती । तरी तुम्ही संतोषिजे ऐसी जाती । प्रेमाची या ॥16॥
त्याचप्रमाणे, मी जरी तुमच्याशी बालकाप्रमाणे विनोदाने वर्तन करितो, तरी तुम्हाला त्या माझ्या वर्तनापासून आनंदच झाला पाहीजे, असा प्रेमाचा गुण आहे;
17-9
आणि तेणे आपुलेपणाचेनि मोहे । तुम्ही संत घेतले असा बहुवे । म्हणोनि केलिये सलगीचा नोहे । आभारु तुम्हा 17
आणि त्या आपलेपणाच्या अभिमानाने तुम्ही संतजनांनी बहूत प्रकारांनी मला ‘ आपला ‘ असे म्हटले आहे; म्हणून माझ्या या सलगीचा आपणास विषाद होणार नाही.
18-9
अहो तान्हेयाची लागता झटे । तरी अधिकचि पान्हा फुटे । रोषे प्रेम दुणवटे । पढियंतयाचेनि ॥18॥
अहो, वासराने दुशी दिल्यावर गाईला ज्याप्रमाणे अधिकच पान्हा फुटतो, त्याप्रमाणे अत्यंत प्रिय जो मनुष्य असतो त्याच्या रागावण्याने प्रेम दुप्पट होते.
19-9
म्हणऊनि मज लेकुरवाचेनि बोले । तुमचे कृपाळूपण निदैले । ते चेइले हे जी जाणवले । यालागी बोलिलो मी ॥19॥
म्हणून, मज लेकराच्या बोबड्या बोलांनी तुमचे निजलेले कृपाळूपण जागे झाले, असे जाणून मी बोललो.
20-9
एऱ्हवी चांदणे पिकविजत आहे चेपणी । की वारया धापत आहे वाहणी । हा हो गगनासी गंवसणी । घालिजे केवी ॥20॥
येऱ्हवी चंद्राचे चांदणे कोणी आठीत घालून पिकविले आहे काय ? किंवा वाऱ्याला वाहण्याकरीता कोणी गति दिली आहे का ? तसेच आकाशाला कोणी गवसणी घातली आहे का ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
21-9
आइका पाणी वोथिजावे न लगे । नवनीती माथुला न रिगे । तेवि लाजिले व्याख्यान न निगे । देखोनि जयाते ॥21॥
ऐका : पाण्याला पातळ करावे लागत नाही; आणि लोणी तयार झाल्यावर ते रवीने कोणी घुसळीत नाही, त्याचप्रमाणे, ज्याला पाहून माझे व्याख्यान लाजल्यामुळे माघारी येते.
22-9
हे असो शब्दब्रह्म जिये बाजे । शब्द मावळलेया निवांतु निजे । तो गीतार्थु मऱ्हाटिया बोलिजे । हा पाडु काई ॥22॥
हे असो, ज्यापुढे वेदांचे शब्द कुंठित झाल्यामुळे तेही ज्याच्या शय्येवर गाढ निद्रा घेतात, (ज्यापुढे वेदांची मति कुंठित झाल्यामुळे तेही स्तब्ध राहातात, ) तो गीतार्थ मी मराठी भाषेत वर्णन करावा असा माझा अधिकार आहे का ?
23-9
परि ऐसियाही मज धिंवसा । तो पुढतियाचि येकी आशा । जे धिटीवा करूनि भवादृश्या । पढियंता होआवे ॥23॥
परंतु अशी स्थिति असतांही मला पुढच्या आशेवर इच्छा उत्पन्न झाली, ती ही की, मन धीट करून तुमच्यासारख्यांची प्रीति संपादन करावी.
24-9
परि आता चंद्रापासोनि निवविते । जे अमृताहूनि जीवविते । तेणे अवधान कीजो वाढते । मनोरथा माझिया ॥24॥
तर आता चंद्रापेक्षाही थंड करणाऱ्या व अमृताहूनही जीवन देणाऱ्या अशा अवधानाने माझ्या मनोरथाला पुष्टि द्या.
25-9
का जै दिठिवा तुमचा वरुषे । तै सकळार्थसिद्धि मती पिके । एऱ्हवी कोंभेला उन्मेषु सुके । जरी उदास तुम्ही ॥25॥
कारण, जर तुमची कृपादृष्टीरूप वृष्टि मजवर पूर्ण होईल, तर माझ्या बुद्धिरूप भूमीत सकलार्थरूप धान्य पिकेल. येरव्ही जर तुम्ही उदास असाल, तर अंकुर आलेले ज्ञान सुकून जाईल.
दिवस ९३ वा, ३, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ११०५ ते १११६
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ११०५
सर्वा भूती द्यावे अन्न । द्रव्य पात्र विचारोन । उपतिष्ठे कारण । तेथे बीज पेरीजे ॥१॥
पुण्य करिता होय पाप । दुग्ध पाजोनि पोशिला साप । करोनि अघोर जप । दुःख विकत घेतले ॥धृपद॥
भूमी पाहाता नाही वेगळी । माळ बरड एक काळी । उत्तम निराळी । मध्यम कनिष्ठ ॥२॥
म्हणोनि विवेके । काही करणे ते निके । तुका म्हणे फिके । रुची नेदी मिष्टान्न ॥३॥
अर्थ
सर्व भूतमात्रांना अन्न जरूर खायला द्यावे परंतु धन देतांना विचार करून द्यावे. जेथे बीज टाकल्यावर उत्कृष्ट प्रकारे ते बीज उगवेल तेथेच बीज टाकावे. दया बुद्धीने सर्पाला जर दूध पाजले तर ते पुण्य होत नाही तर पाप होते. अघोरी मंत्र जप केले तर पाप होते आणि दुःख विकत घेतल्या सारखे होते. भूमी सर्वत्र एकच आहे पण तिचे प्रकार वेगवेगळे आहेत म्हणजेच माळ जमीन, काळी जमीन, उत्तम जमीन, मध्यम जमीन, कनिष्ठ जमीन असे वेगवेगळे जमिनीचे भेद आहेत. तुकाराम महाराज म्हणतात कोणतेही कर्म करताना विवेकबुद्धीने कर्म करावेत ते केव्हाही चांगलेच जसे मिष्टांन्न आहे पण त्याला चवच नाही तर ते फिके आहे म्हणजे ते जेवणार्याला आवडत नाही ते अन्न चविष्ट नाही.
अभंग क्र. ११०६
देवावरी भार । वृत्ति अयाचित सार ॥१॥
देह देवाचे सांभाळी । सार योजे यथाकाळी ॥धृपद॥
विश्वासी निर्धार । विस्तारला विश्वंभर ॥२॥
तुका म्हणे व्हावे । बळ एक चि जाणावे ॥३॥
अर्थ
साधकाने सर्व भार देवावर घालून आयाचित (जे काही मिळेल त्यामध्ये समाधानी राहणे) वृत्तीने, संतोष वृत्तीने रहावे हेच खरे परमार्थाचे सार आहे. आपला देह देव सांभाळतो हे समजून आपला देह योग्य कर्माकडे वळवावा. या विश्वाचे पालन पोषण करणारा एक विश्वंभर सर्वत्र विस्तारलेला आहे याविषयी दृढ विश्वास ठेवावा. तुकाराम महाराज म्हणतात विश्वासाचे बळ या जगात सगळ्यात मोठे आहे.
अभंग क्र. ११०७
वर्त्तता वासर । काय करावे शरीर ॥१॥
ठेवा नेमून नेमून । माझे तुमचे पायी मन ॥धृपद॥
नेदाविया वृत्ती । कोठे फांको चि श्रीपती ॥२॥
तुका म्हणे भले । जन्मा येऊनिया ज्याले ॥३॥
अर्थ
हे विठ्ठला अरे हे शरीर मर्यादितरहित वागत असेल तर हे शरीर ठेवून काय करावे ? त्यामुळे हे देवा माझे मन तुझ्या पायाच्या ठिकाणी नेमून ठेव. हे श्रीपती माझी वृत्ती तुमच्या पायापासून इतर कोठेही फाकु देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात जे मनुष्य जन्माला येऊन असे जगतात तेच खरे जगतात.
अभंग क्र. ११०८
केली प्रज्ञा मनाशी । तई मी दान सत्यत्वेशी । नेईन पायापाशी । स्वामी मूळ पंढरिये ॥१॥
तोवरी हे भरी पोट । केला तो मिथ्या बोभाट । नाही सांपडली वाट । सइराट फिरतसे ॥धृपद॥
ज्यावे आदराचे जिणे । स्वामी कृपा करी तेणे । पाळिल्या वचने । सख्यत्वाचा अनुभव ॥२॥
घडे तैसे घडो आता । मायबापाची सत्ता । तुका म्हणे चिंता । काय पाहे मारगा ॥३॥
अर्थ
मी अशी प्रतिज्ञा म्हणजे निश्चय केला आहे की मी त्या पंढरीराया ला त्याच वेळी दान मागेल ज्यावेळी हा पंढरीनाथ मला मूळ पाठवून त्याच्याकडे पंढरीला बोलवेन. त्यावेळी मी मला जे हवे आहे ते मागेन. तोपर्यंत मी माझे पोट भरण्याचे काम करेन. आजपर्यंत मी मला हे नको ते नको असा व्यर्थ बोभाटा केला आहे त्यामुळे मला परमार्थाची खरी वाट सापडली नाही व मी स्वैर पणाने फिरत होतो. जो आपल्या स्वामी चा आदर करतो स्वामी त्याच्यावर कृपा करतात. स्वामी ने केलेल्या आज्ञेचे पालन केल्यावर स्वामीच्या मित्रत्वाचा अनुभव येतो. तुकाराम महाराज म्हणतात आता माझा माय बाप पांडुरंग याच्या सत्तेने जे घडायचे असेल ते घडो आता त्यात कसली चिंता मी करणार आहे मी आता केवळ पंढरीला जाण्याची वाट पाहत आहे.
अभंग क्र. ११०९
नेत्र झाकोनिया काय जपतोसी । जव नाही मानसी प्रेम भाव ॥१॥
उघडा मंत्र जाणा राम कृष्ण म्हणा । तुटती यातना गर्भवास ॥धृपद॥
यंत्र मंत्र काही करिसी जडी बुटी । तेणे भूतसृष्टी पावशील ॥२॥
सार तुका जपे बीजमंत्र एक । भवसिंधुतारक रामकृष्ण ॥३॥
अर्थ
अरे जर तुझ्या मनात भक्ती प्रेम भाव नाही तर मग तू डोळे झाकून मंत्रजप काय करतोस ? अहो तुम्ही रामकृष्ण हा मंत्र म्हणा याने तुमचे सर्व गर्भवास तुटतील. अरे तुम्ही यंत्र पूजा, मंत्र पुजा याच्या खटपटीत जर पडालं तर पिशाच्च योनीला जाल. तुकाराम महाराज म्हणतात सर्वाचे सार आणि वेदाचे बीज म्हणजे रामकृष्ण हे नाम आहे आणि हाच मंत्र तुला ह्या भवसागरातून पार पाडील.
अभंग क्र. १११०
संत मारगी चालती । त्यांची लागो मज माती ॥१॥
काय करावी साधने । काय नव्हे एक तेणे ॥धृपद॥
शेष घेईन उच्छिष्ट । धाय धणीवरी पोट ॥२॥
तुका म्हणे संता पायी । जीव ठेविला निश्चयी ॥३॥
अर्थ
संत ज्या मार्गाने चालत आहेत त्या मार्गातील त्यांच्या पायाची माती माझ्या अंगाला लागो. इतर साधने करण्याची काय गरज आहे आणि संतांच्या पायाच्या धुळीने काय मिळणार नाही तर सर्व काही प्राप्त होणार आहे. संतांचे उच्चिष्ट मी माझे पोट तृप्त होईपर्यंत सेवन करेल. तुकाराम महाराज म्हणतात मी माझा जीव संतांच्या पायावर निश्चय पणाने अर्पण केलेला आहे.
अभंग क्र. ११११
जैसे तैसे बाळ मातेसी आवडे । बोलता बोबडे शब्द गोड ॥१॥
आपुले आवडी लेववी खाववी । पाहोनिया जीवी सुख वाटे ॥२॥
तुका म्हणे काय देऊ परिहार । काय ते साचार जाणा संत ॥३॥
अर्थ
बाळ कसे ही असो पण ते त्याच्या आईला आवडते ते बोबडे जरी बोलले तरी त्याचे बोल त्याच्या मातेला गोड वाटते. ती माता त्या मुलाला दागिने घालते, जेऊ घालते, चांगले कपडे घालते आणि त्या बाळाला पाहून तिलाच सुख वाटते, आनंद वाटतो. तुकाराम महाराज म्हणतात हे संतजन हो मीही तुमचे लाडके बाळ आहे मीही माझे बोबडे बोल बोलत आहे त्यामुळे माझे हित कशात आहे हे तुम्हीच जाणा.
अभंग क्र. १११२
देवाचिया वस्त्रा स्वप्नी ही नाठवी । स्त्रियेसी पाठवी उंच साडी ॥१॥
गाईचे पाळण नये चि विचारा । अश्वासी खरारा करी अंगे ॥धृपद॥
लेकराची गांड स्वये धावे क्षाळू । न म्हणे प्रक्षाळू द्वीज पाय ॥२॥
तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥
अर्थ
देवाचे वस्त्र जर फाटले तर नवे आणावे असे कधीच वाटत नाही पण निर्लज्ज मनुष्य त्यांच्या बायकोला उंच नवी साडी आपण होऊन आणतो. गाईचे पालन करावे असे मनात विचार चुकून सुद्धा येणार नाही परंतु लालसेने घोड्याचा खरारा मात्र नक्की करतो. एखाद्या मनुष्याच्या लेकराने संडास केली तर तो स्वतः धुण्यास धाव घेतो पण ब्राम्हणाचे पाय धुवावे असे तो कधीही म्हणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसांच्या तोंडावर थुंकावे हे माणसे नरकवास भोगण्यासाठीच यमाकडे जातात.
अभंग क्र. १११३
उरा लावी उर आळंगिता कांता । संतासी भेटता अंग चोरी ॥१॥
अतीत देखोनि होय पाठीमोरा । व्याह्यासी सामोरा जाय वेगी ॥धृपद॥
द्वीजा नमस्कारा मनी भाव कैचा । तुर्कांचे दासीचा लेंक होय ॥२॥
तुका म्हणे तुम्ही क्रोधासी न यावे । स्वभावा करावे काय कोणी ॥३॥
अर्थ नाही टाका तपासा
अभंग क्र. १११४
ब्रम्हज्ञान जरी कळे उठाउठी । तरि का हिंपुटी वेदशास्त्रे ॥१॥
शास्त्रांचे भांडण तप तीर्थाटन । पुरींचे भ्रमण याजसाठी ॥धृपद॥
याजसाठी जप याजसाठी तप । व्यासे ही अमुप ग्रंथ केले ॥२॥
याजसाठी संतपाय हे सेवावे । तरि च तरावे तुका म्हणे ॥३॥
अर्थ
ब्रम्हज्ञान हे केव्हाही उठता-बसता झाले असते तर वेद आणि शास्त्र यांनी “ज्ञानाचा अधिकार फार मोठा आहे” असे सांगून हींपुटी म्हणजे कष्टी का झाले असते ? ब्रम्ह ज्ञानाविषयी सहाही शास्त्रांमध्ये भांडण चालू आहे आणि त्याच्या प्राप्तीसाठीच तप तिर्था टन सांगितले आहे आणि तप तिर्थाटन हे सर्व साधने ब्रम्हज्ञान समजावण्यासाठीच आहे आणि व्यासांनी ही ब्रम्हज्ञान कळावे यासाठी अनेक ग्रंथ केलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात ब्रम्हज्ञान समजण्यासाठी संतांच्या पायाची सेवा करावीच लागते तरच हा भवसागर ही तरता येतो.
अभंग क्र. १११५
गायत्री विकोनी पोट जे जाळिती । तया होय गति यमलोकी ॥१॥
कन्येचा जे नर करिती विकरा । ते जाती अघोरा नरकपाता ॥धृपद॥
नाम गाऊनिया द्रव्य जे मागती । नेणे तया गति कैसी होय ॥२॥
कैसी होय गती तेच हो जाणती । आम्हासी संगती न लगे त्यांची ॥३॥
आमुचा सांगाती आहे तो श्रीहरी । न लगे दुराचारी तुका म्हणे ॥४॥
अर्थ
गायत्री मंत्र शिकवणारे जे कोणी लोक असतील त्यांनी शिकवण्याचे मोबदल्यात धन द्रव्य घेतले तर त्यांची गती त्यांना यमलोकी नेत असते. जे कोणी आपल्या कन्येची विक्री करतात ते अघोर नरकवास नक्की भोगतात हरिनाम घेऊन जे द्रव्य मागतात त्यांची गती काय होईल ते काहीच कळत नाही त्यांची गती काय होईल हे त्यांनाच माहीत. आम्हाला त्या पाप्यांची संगती देखील नको. तुकाराम महाराज म्हणतात आमची संगती करणारा तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे आम्हाला दुराचारी मनुष्याची संगती नको आहे.
अभंग क्र. १११६
साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा । वेश्येचिया घरा पुष्पे नेसी ॥१॥
वेश्या दासी मुरळी जगाची वोवळी । ते तुज सोवळी वाटे कैशी ॥२॥
तुका म्हणे आता लाज धरी बुच्या । टांचराच्या कुच्या मारा वेगी ॥३॥
अर्थ
साधूच्या दर्शनाची लाज जो गव्हारा म्हणजे मूर्ख मनुष्य आहे तोच धरतो आणि वैश्येच्या घरी फुले नेण्याकरिता त्याला लाज वाटत नाही. वैश्या, दासी, मुरळी या जगात निंद्य म्हणजे ओवळी आहेत आणि त्या तुला सोवळी म्हणजे चांगल्या शुद्ध कशा वाटतात ? तुकाराम महाराज म्हणतात आरे नीच माणसा, निर्लज्जा, हलकटा आता तरी थोडीशी लाज धरा, अशा माणसांना चपलेचा टाचणे खाली मारले पाहिजे.
येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















