१ मे, दिवस १२१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा, ओवी १७६ ते २०० सार्थ तुकाराम गाथा अभंग १४४१ ते १४५२

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 1 May
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
१ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा, ओवी १७६ ते २००,

स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।
भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ॥10. 15॥

176-10
एथ आपुले वाडपण जैसे । आपणचि जाणिजे आकाशे । का मी येतुली घनवट ऐसे । पृथ्वीचि जाणे ॥176॥
ज्याप्रमाणे आकाशाचे मोठेपण आकाशालाच समजते, किंवा पृथ्वीचे वजन पृथ्वीलाच समजते,
177-10
तैसा आपुलिये सर्वशक्ती । तुज तूचि जाणू लक्ष्मीपती । येर वेदादिक मती । मिरवती वाया ॥177॥
त्याप्रमाणे हे लक्ष्मीपती, तुमची सर्व शक्ती तुम्हीच जाणतां. एरव्ही तुमची आम्हाला कळली, असा वेदादिक व्यर्थ गर्व वाहतात.
178-10
हा गा मनाते मागा सांडावे । पवनाते वावी मवावे । आदिशून्य उतरोनि जावे । केउते बाही ॥178॥
अहो, मनाच्या गतीला कसे मागे टाकावे ? वार्‍याला कवेत कसे धरावे ? आणि बाहुंनी माया कशी तरून जावी ?
179-10
तैसे हे तुझे जाणणे आहे । म्हणोनि कोणाही ठाकते नोहे । आता तुझे ज्ञान होये । तुजचिजोगे ॥179॥
त्याप्रमाणे, तुमचे ज्ञान होणे फार दुस्तर आहे, म्हणून ते कोणाला होत नाही, तर तुमचे तुम्हालाच समजते.
180-10
जी आपणपयाते तूचि जाणसी । आणिकाते सांगावयाही तू समर्थ होसी । तरी आता एक वेळ घाम पुसी । आर्तीचिये निडळीचा ॥180॥
तुमचे ज्ञान तुम्हालाच आहे, व ते आपण दुसर्‍यांनाही समजून देण्यास समर्थ आहात, तर एकदा आमच्या हौसेच्या कपाळाचा घाम पुसून टाका बरे !
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


181-10
हे आइकिले की भूत भावना । त्रिभुवनगजपंचाना । सकळदेवदेवतार्चना । जगन्नायका ॥181॥
हे प्राणिमात्राला उत्पन्न करणार्‍या ! हे संसाररूपी हत्तींचा नाश करणार्‍या ! हे सकळ देवांना पूज्य असणार्‍या ! हे जगताचे स्वामी असणार्‍या ! माझे हे बोलणे ऐकलेंस काय ?
182-10
जरी थोरी तुझी पाहात आहो । तरी पासी उभे ठाकावयाही योग्य नोहो । या शोच्यता जरी विनवू बिहो । तरी आन उपायो नाही ॥182॥
अनुभविलेल्या तुझ्या थोरवीकडे लक्ष दिले असता, तुझ्यापाशी उभे राहण्यापुरती देखील आमची योग्यता नाही. या अपात्रतेचे वाईट वाटून जरी तुम्हाला विनंति करायला भ्यालो तरीपण त्यांवाचून दुसरा उपायहि नाही.
183-10
भरले समुद्र सरिता चहूकडे । परि ते बापियासि कोरडे । का जै मेघौनि थेंबुटा पडे । तै पाणी की तया ॥183॥
चहूकडे समुद्र, नद्या, इत्यादि जलाशय जरी भरले, तरी त्या बापड्या चातकाच्या दृष्टीने मात्र ते सर्व कोरडेच होत, कारण जेव्हा मेघांतून पाण्याचा थेंब पडतो, तेव्हाच तो ते पाणी पीत असतो.
184-10
तैसे गुरु जी सर्वत्र आथी । परि कृष्णा आम्हा तूचि गती । हे असो मजप्रती । विभूती सांगे ॥184॥
त्या प्रमाणे उपदेश करणारे श्रीगुरु सर्वत्र असले तरी श्रीकृष्णा ! आम्हाला मात्र शरण जाऊन विचारण्याला तूच एक गति आहेस. हे असो. मला आता आपल्या विभूति सांग.
वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः ।
याभिर्विभूतिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥10. 16॥
185-10
जी तुझिया विभूती आघविया । परि व्यापिती शक्ति दिव्या जिया । तिया आपुलिया दावाविया । आपण मज ॥185॥
देवा ! दिव्यशक्तीने व्यापून असलेल्या ज्या तुझ्या संपूर्ण विभूती आहेत, त्या आपल्या आपण मला दाखवाव्यात.


186-10
जिही विभूती यया समस्ता । लोकाते व्यापूनि आहाती अनंता । तिया प्रधाना नामांकिता । प्रगटा करी ॥186॥
हे अनंथा, ज्या तुझ्या विभूती तिन्ही लोकांना व्यापून आहेत. त्यातील मुख्य मुख्य नावाजलेल्या असतील त्या सांगा.

कथं विद्यामहं योगिंस्त्वा सदा परिचिन्तयन् ।
केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥10. 17॥

187-10
जी कैसे मिया तूते जाणावे । काय जाणोनि सदा चिंतावे । जरी तूचि म्हणो आघवे । तरि चिंतनचि न घडे ॥187॥
महाराज, मी तुम्हाला कसे जाणावे ? जर सर्व तुम्हिच आहात असे म्हणावे तर माझ्या हातून तुमचे चिंतन होणार नाही.
188-10
म्हणोनि मागा भाव जैसे । आपुले सांगितले तुवा उद्देशे । आता विस्तारोनि तैसे । एक वेळ बोले ॥188॥
म्हणून पूर्वी (4/5/6 श्र्लोकात) ज्या संक्षेपाने आपल्या विभूती सांगितल्या त्यांचा विस्तार करून एक वेळ पुन्हा एकदा सांगा
189-10
जया जया भावाचा ठायी । तूते चिंतिता मज सायासु नाही । तो विवळ करूनि देई । योगु आपुला ॥189॥
ज्या ज्या विभूतीच्या ठिकाणी तुम्ही आहात असे समजून चिंतन केले असता, मला श्रम पडणार नाहीत, असा तुमच्या प्राप्तीचा तो उपाय स्पष्ट करून सांगा.

विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन ।
भूयः कथय तृप्तिर्हि श्रृण्वतो नास्ति मेऽमृतम् ॥10. 18॥

190-10
आणि पुसलिया जिया विभूती । त्याही बोलाविया भूतपती । येथ म्हणसी जरी पुढती । काय सांगो ॥190॥
हे भूपती, मी ज्या विभूती बद्दल विचारले आहे त्या सांगा, त्याच त्या पुन्हा पुन्हा काय सांगावयाचे आहेत असे जर कदाचित म्हणाल, तर
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


191-10
तरी हा भाव मना । झणे जाय हो जनार्दना । पै प्राकृताही अमृतपाना । ना न म्हणवे जी ॥191॥
देवा जनार्दना ! अशी तुझ्या मनात कदाचित् कल्पना येईल, पण प्रकृतिजन्यहि अमृत प्यायला मिळाले असता जसे कोणाच्याने नको म्हणवत नाही.
192-10
जे काळकूटाचे सहोदर । जे मृत्यूभेणे प्याले अमर । तरि दिहाचे पुरंदर । चौदा जाती ॥192॥
जे अमृत काळकूटाचा भाऊ होय, मृत्यु येऊ नये म्हणून ते इंद्रादि प्याले, तरी ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा इंद्र होतात.
193-10
ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसु । जया वायाचि अमृतपणाचा आभासु । तयाचाही मीठांशु । जे पुरे म्हणो नेदी ॥193॥
असा कोणी एक क्षीरसमुद्रांतून निघालेला जो रस, त्याचे ठिकाणी व्यर्थच अमरपणाचा भास आहे, पण त्याचीहि गोडी, ‘पुरे’ असे म्हणू देत नाही.
194-10
तया पाबळेयाही येतुलेवरी । गोडियेचि आथि थोरी । मग हे तव अवधारी । परमामृत साचे ॥194॥
अशा त्या क्षुद्र पदार्थाच्या गोडीची एवढी थोरवी आहे. मग पहा, हे तर खरोखर परमामृतच आहे.
195-10
जे मंदराचळु न ढाळिता । क्षीरसागरु न डहुळिता । अनादि स्वभावता । आइते आहे ॥195॥
या परमामृताकरिता मंदाराचलाला फिरवावे लागले नाही, क्षीरसागराला डहुळावे लागले नाही, हे अनादि, स्वाभाविक व सिध्द आहे.


196-10
जे द्रव ना नव्हे बद्ध । जेथ नेणिजती रस गंध । जे भलतयांही सिद्ध । आठवलेचि फावे ॥196॥
जे पातळ नाही, घट्ट नाही, ज्याचे ठिकाणी रसगंधादि गुणहि नाहीत व जे स्मरण झाल्याबरोबर आपल्या ठिकाणी मूळचेच आहे असा कोणालाहि अनुभव येतो.
197-10
जयाची गोठीचि ऐकतखेवो । आघवा संसारु होय वावो । बळिया नित्यता लागे येवो । आपणपेया ॥197॥
या परमामृताचे नुसते वर्णन ऐकताच सर्व संसार खोटा ठरतो व आपला विनाशीपणा जाऊन, बळेच आपल्याठिकाणी नित्यता धर्म येतो.
198-10
जन्ममृत्यूची भाख । हारपोनि जाय निःशेख । आत बाहेरी महासुख । वाढोचि लागे ॥198॥
जन्ममरणाची भाषा निःशेष निहीशी होते व आंतबाहेर परमसुख वाढू लागतें.
199-10
मग दैवगत्या जरी सेविजे । तरी ते आपणचि होऊनि ठाकिजे । ते तुज देता चित्त माझे । पुरे म्हणो न शके ॥199॥
सुदैवाने या परमामृताचे सेवन झाले असता, ते आपणच होऊन राहते, असे हे परमामृत तू मला पाजीत असतांना माझे चित्त पुरे म्हणू शकत नाही.
200-10
तव तुझे नामचि आम्हा आवडे । वरि भेटी होय आणि जवळिक जोडे । पाठी गोठी सांगसी सुरवाडे । आनंदाचेनी ॥200॥
भगवंता ! तुझे नांवच तर आम्हाला अत्यंत प्रिय वाटते. त्यातहि पुनः तुझे दर्शन होऊन नित्य सान्निध्य आहे. त्यात पुनः प्रेमाने गोड गोड गोष्टी सांगतोस.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस १२० वा, १, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १४४१ ते १४५२
सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. १४४१
मायबापाचिये भेटी । अवघ्या तुटी संकोचा ॥१॥
भोगिले ते आहे सुख । आता मुख मोकळे ॥धृपद॥
उत्तम ते बाळासाठी । लावी ओठी माउली ॥२॥
तुका म्हणे जाली धणी । आनंद मनी न समाये ॥३॥
अर्थ

आई बापाच्या भेटीने मुलाचा सर्व संकोच नष्ट होतो. आई बापाच्या घरी वाटेल ते सुखोपभो घेता येते आणि वाटेल ते खाण्यासाठी मुख नेहमी मोकळे असते. माऊली आपल्या मुलांसाठी चांगले दूध जतन करून त्याच्या ओठाला लावते. तुकाराम महाराज म्हणतात आई बापाच्या भेटीने मुलांचे समाधान होते त्यांचा आनंद मनात मावत नाही.
अभंग क्र. १४४२
उदासीनाचा देह ब्रम्हरूप । नाही पुण्य पाप लागत त्या ॥१॥
अनुताप अंगी अग्नीचिया ज्वाळा । नाही मृगजळा विझो येत ॥धृपद॥
दोष ऐशा नावे देहाचा आदर । विटाळले अंतर अहंभावे ॥२॥
तुका म्हणे जाय नासोनिया खंती । तव चि हे चित्ती बद्धता ते ॥३॥
अर्थ

जे देहा विषयी उदास असतात ते ब्रम्‍हरूपच असतात. त्यांना पाप-पुण्य लागत नाही त्यांच्या अंगी वैराग्याच्या अग्निज्वाळा असतात प्रपंचाच्या मृगजळा ने ते विझत नाही. देहा विषय प्रेम म्हणजे पाप व देहाकाराने अंतकरण वितळते. तुकाराम महाराज म्हणतात जो पर्यंत चित्तातून प्रपंच त्याविषयी खंत गेलेली नसते तोपर्यंत चित्त बद्ध अवस्थेत असते.
अभंग क्र. १४४३
बंधनाचा तोडू फासा । देऊ आशा टाकोनि ॥१॥
नाही ते च घेता शिरी । होईल दुरी निजपंथ ॥धृपद॥
नाथिले चि माझे तुझे । कोण वोझे वागवी ॥२॥
तुका म्हणे अंतराय । देवी काय जिणे ते ॥३॥
अर्थ

भव सागरातील बंधनाचा फासा तोडून टाकून देहा विषयी आशा टाकून देऊ. तुम्ही भवसागराचा आणि देह अभिमानाचे ओझे डोक्यावर घेतले तर तुम्हाला आत्मसुखाचा अनुभव दुरावेल. जे खोटे आहे त्याचे “माझे आणि तुझ्या पणाचे” खोटे ओझे कोणी वागवावे. तुकाराम महाराज म्हणतात ज्या जगण्यामुळे देव आपल्यापासून अंतर तो त्या जगण्याला काय अर्थ आहे ?
अभंग क्र. १४४४
तेच किती वारंवार । बोलो फार बोलिले ॥१॥
आता माझे दंडवत । तुमच्या संत चरणांसी ॥धृपद॥
आवडी ते नीच नवी । जाली जीवी वसती ॥२॥
तुका म्हणे बरवे जाले । घरा आले बंदरीचे ॥३॥
अर्थ

हे संतांनो मी आत्तापर्यंत पुष्कळ बोललो आहे पण तेच तेच बोलू तरी किती वेळा ? आता ते बोलणे फार झाले आता माझे तुम्हा संत चरणांना दंडवत आहे. तुमच्या विषयी माझ्या मनामध्ये नित्य नवी आवड येऊन राहते. तुकाराम महाराज म्हणतात हे संत चरण दूर समुद्राच्या बंदरावर होते ते आता आमच्या जवळ आले हे फार बरे झाले.
अभंग क्र. १४४५
उपासा सेवटी अन्नासवे भेटी । तैसी माझी मिठी पडो पायी ॥१॥
पुरवी वासना साच सर्वजाणा । आम्हा नारायणा अंकिताची ॥धृपद॥
बहुदिसा पुत्रामाते सवे भेटी । तैसा दाटो पोटी प्रीतिउभड ॥२॥
तुका म्हणे धन कृपणा सोईरे । यापरि दुसरे नहो आता ॥३॥
अर्थ

भरपूर दिवस उपवास केला आणि उपवास संपल्यानंतर अन्न खाण्याविषयी जी उत्कंठता असते तशीच उत्कंठता तुमच्या चरणांची मिठी पडणे विषयी असो. हे नारायणा तू आम्हा भक्तांच्या अंतकरणातील सर्व काही जाणतो त्यामुळे माझ्या अंकिताची एवढी वासना पूर्ण करा. खुप दिवसानंतर आईला मुलाची गाठ पडल्यावर भेट झाल्यावर जसा प्रेमाचा उमाळा येतो अगदी तसाच प्रेमाचा उमाळा माझ्या पोटी दाटून येवो. तुकाराम महाराज म्हणतात कंजूस माणसाला जशी धनाची आवड असते त्याप्रमाणेच मला तुमची आवड असू द्या इतर कोणाचीही मला आवड नसू द्यावी.
अभंग क्र. १४४६
रणी निघता शूर न पाहे माघारे । ऐशा मज धीरे राख आता ॥१॥
संसारा हाती अंतरलो दुरी । आता कृपा करी नारायणा ॥धृपद॥
वागवितो तुझिया नामाचे हत्यार । हाचि बडिवार मिरवितो ॥२॥
तुका म्हणे मज फिरता माघारे । तेथे उणे पुरे तुम्ही जाणा ॥३॥
अर्थ

युद्धाला निघालेला शूर शिपाई जसा मागे वळून पाहत नाही अगदी तसेच धैर्य माझ्यामध्ये तुम्ही राखावे. हे नारायणा मी संसाराच्या हातून बाजूला झालो आहे आता माझ्यावर कृपा करावी. तुझ्या नामाचे हत्यार मी वागवीत आहे आणि त्याचीच बढाई मी सर्वत्र करत आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मी जर प्रपंचाकडे मागे फिरलो तर त्यात कमीपणा आहे की मोठेपण आहे हे तुम्ही जाणा.
अभंग क्र. १४४७
सकळ पूजा स्तुति । करावी ते व्होवे याती ॥१॥
म्हणऊनि वारा जन । संतपूजा नारायण ॥धृपद॥
सेवावे ते वरी । दावी उमटूनि ढेंकरी ॥२॥
तुका म्हणे सुरा । दुधा म्हणता केवी बरा ॥३॥
अर्थ

लोकांकडून पूजा स्तुती करून घेण्यास अधिकार योग्य असावा लागतो, योग्यता असावी लागते. त्या मुळे अयोग्य माणसे बाजूला सारून नारायण आणि संतांची पूजा करा. उत्तम प्रकारचे जेवण सेवन केल्यावर तृप्तीचा ढेकराणे जेवण करणाऱ्याच्या मुखावरील सुख लगेच समजते. तुकाराम महाराज म्हणतात दुधाला मद्य समजने व संतांना सामान्य समजणे योग्य होईल काय ?
अभंग क्र. १४४८
धीर नव्हे मने । काय तयापाशी उणे ॥१॥
भार घातलियावरी । दासा नुपेक्षील हरी ॥धृपद॥
याऐसी आटी । द्यावी द्रव्याचिये साटी ॥२॥
तुका म्हणे पोटे । देवा बहु केले खोटे ॥३॥
अर्थ

खरेतर आपल्या जवळच धीर नाही नाहीतर देवाजवळ काय कमी आहे. देवावर आपल्या योग्य क्षैमाचा भार‌ घातला की देव आपल्या दासांची कधीही उपेक्षा करीत नाही. धनप्राप्तीसाठी आपण किती कष्ट करतो तेवढेच कष्ट हरी प्राप्तीसाठी केले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात देवा खरे म्हणजे पोटासाठी आम्ही खोटे झालेलो आहोत.
अभंग क्र. १४४९
द्रव्याचिया कोटी । नये गांडीची लंगोटी ॥१॥
अंती बोळवणेसाठी । पांडुरंग धरा कंठी ॥धृपद॥
लोभाची लोभिके । यांचे सन्निधान फिके ॥२॥
तुका म्हणे हिते । जग नव्हो पडो रिते ॥३॥
अर्थ

कोट्यावधी द्रव्य जरी कमावले तरी आपल्याबरोबर ढुंगणाची लंगोटी देखील येत नाही. अंतकाळी पांडुरंग आपल्याला त्याच्या जवळ बोलवीन त्याकरिता त्याचे नाम कंठात धारण करा. विषय लोभाने लोभी मनुष्याची संगती व्यर्थ ठरते. तुकाराम महाराज म्हणतात मी जगातील लोकांना त्यांच्या हिताचे उपदेश करत आहे कारण त्यांनी त्यांच्या हिताबद्दल मोकळे राहू नये म्हणून.
अभंग क्र. १४५०
कोणापाशी आता सांगो मी बोभाट । कधी खटपट सरेल हे ॥१॥
कोणा आराणूक होईल कोणे काळी । आपुलाली जाळी उगवूनि ॥धृपद॥
माझा येणे दुःखे फुटतसे प्राण । न कळता जन सुखी असे ॥२॥
भोगा आधी मने मानिलासे त्रास । पाहे लपायास ठाव कोठे ॥३॥
तुका म्हणे देतो देवाचे गाऱ्हाणे । माझे ऋण येणे सोसियेले ॥४॥
अर्थ

आता मी माझे गार्हाणे तक्रार मी कोणाजवळ सांगु, संसाराची खटाटोप केव्हा संपेल ? या संसाराच्या जाळ्यातून माझी सुटका केंव्हा होईल आणि माझे समाधान केव्हा होईल ? संसारा मुळे माझे प्राण फुटत आहे इतर लोकांना हे दुःख माहित नाही म्हणून ते सुखी आहेत. भोगाच्या आधीच भोगा विषयी माझे मन त्रासलेले आहे आणि ते आता कोठे लपवावे. तुकाराम महाराज म्हणतात देवाविषयी मी संतांकडे तक्रार करत आहे की, देवाने माझे सेवा रुपी ऋण घेतले आहे पण त्याची परतफेड तो करत नाही.
अभंग क्र. १४५१
राहिलो निराळा । पाहो कवतुक डोळा ॥१॥
करू जगाचा विनोद । डोळा पाहोनिया छंद ॥धृपद॥
भुललिया संसारे । आले डोळ्यासी माजिरे ॥२॥
तुका म्हणे माथा । कोणी नुचली सर्वथा ॥३॥
अर्थ

मी संसारापासून वेगळे राहून त्याचे कौतुक माझ्या डोळ्याने पाहत आहे. जगातील लोकांना संसाराचा किती छंद लागला आहे हे डोळ्याने पाहून त्यांची फजिती आपण पाहू. संसाराला हे सर्व लोक भुलले असून त्यांच्या डोळ्यावर धुंदी आली आहे. तुकाराम महाराज म्हणतात संसार जे कोणी गुंतले आहेत त्यापैकी कोणीही आपले डोके वर काढत नाही.
अभंग क्र. १४५२
आम्हा एकविधा पुण्य सर्वकाळ । चरणकमळ स्वामीचे ते ॥१॥
चित्ताचे संकल्प राहिले चळण । आज्ञा ते प्रमाण करुनी असो ॥धृपद॥
दुजिया पासाव परतले मन । केले द्यावे दान होईल ते ॥२॥
तुका म्हणे आता पुरला नवस । एकाविण ओस सकळ ही ॥३॥
अर्थ

आम्हा पांडुरंगाच्या दासांना सर्व पूर्ण पर्वकाळ म्हणजे पांडुरंगाचे चरणकमल आहे. चित्तामध्ये एक पांडुरंगाचे चरणकमल आहेत आणि त्याची आज्ञा प्रमाण मानून आम्ही राहत आहोत. इतर मायिक पदार्थापासून आमचे मन परतले आहे. पांडुरंग जे दान आम्हाला देईल ते दान आम्ही घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात आता आमचे सर्व नवस पूर्ण झाले आहे पांडुरंगा वाचून सर्वकाही ओस असल्या सारखेच वाटत आहे.

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading