आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

5. अभिनव रामायण संपूर्ण भाग १, (१ ते ५)
……रामाचा सत्कार करुन झाल्यावर ऋषी म्हणाले,रामा तूं सर्वांचा राजा आहे. तूं महारथी,धर्मप्रवर्तक असून माझ्यासह सार्या ऋषींना प्रिय आहेस,तसंच सर्वमान्य आहेस.ऋषीवर! आपण फार महान आहांत.आम्ही ज्या ज्या आश्रमां ना भेटी दिल्यात तिथे केवळ आपल्या गुणांचे,कार्यांची महतीच कानी पडली. रामाचे हे अनुभवाचे बोल…..
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
अभिनव रामायण
!!! प्रस्तावना !!
नमस्कार!
आतांपर्यंत बरेचसे व्यक्तीरेखा आपल्यासमोर प्रस्तुत केल्यात.आपण भरभरुन दाद देऊन कौतुक केले.आतां मी आगळे वेगळे काल,आज आणि उद्याचे अभिनव रामायण प्रस्तुत करीत आहे.नेहमीप्रमाणे आपल्या क्रीया प्रक्रीया अपेक्षित!
सहसा अनुभवाला न येणारा,पण पूर्णपणे जगावेगळा रामायणांतील वाडःमयीन अविष्कार आगळा वेगळा आहे.यापुर्वी सीता,मंदोदरी,अहिल्या,तारा ही चरित्र्यें रेखाटलीत,त्यामधे जवळ जवळ रामायणांतील सर्व घटना आलेल्या असल्यामुळे,यात सगळ्या घटना घेतल्यात पण संक्षीप्त रुपाने!
समाजातील बहुतांश लोकांना सत्याची कास धरुन जीवन व्यापन करावेसे वाटते.पण परिस्थितीचे दडपण, विकारांची प्रबळता,मर्यादित समज आणि तुटपुंजी ताकद यामुळे चांगल्या वाईट गोष्टींची नीट उकल होत नाही.या मुळे जसे जीवन घडावेसे वाटते ते सर्वथा अवघड असते.सामाजिक, राजकीय स्तरांवर जे घडण्याची आस मनुष्याला लागलेली असते,तेच रामायणांत चित्रित केले.पण त्याच बरोबर महर्षी वाल्मीकींनी मानवजातीचे स्वप्न कसे साकार करतां येईल हे सुध्दा विशद केले आहे.म्हणुनच रामायण फक्त स्वप्नरंजक न ठरतां सद् चरित्र्याची कास व दुष्ट विकारी प्रवृतींचा त्याग हा मानवी समाजाचा चिरंतन आणि सर्वदेशीय जिव्हाळ्याचा विषय आहे.रामायण लिहिण्याचा वाल्मीकीचा हेतू आणि वाचण्याचा आपला उद्देश तेव्हाच साध्य होईल जेव्हा रामायणांतील विचार सामान्य माणसांच्या जीवनांत प्रतिबिॅंबित होतील.
सत् आणि असत् यातील संघर्ष किंवा चांगल्या वाईटाचा झगडा हा मानवी संस्कृतिचा अविभाज्य भाग आहे.
हा संघर्ष आधी होता,सध्या आहे,आणि पुढेही राहील.चांगल्या वाईटाची जाणीव सामान्य माणसाला असते,पण सद्तत्वा ला उचलुन धरण्याची शक्ती कमी पडते. अन्यायाला विरोध करण्याची ताकद तोकडी पडते.त्यामुळे सर्व काळांत माणुस अरेरावी हुकुमशहांची जुलुम जबरदस्ती हताशपणे सहन करीत आला कुणीतरी प्रचंड ताकदीचा सत्पुरुष येऊन आपली या जाचातुन,त्रासातुन सुटका करेल या आशेवर तो जीवन कंठीत असतो.आणि असा पुरुष पुढे आल्यावर मोठ्या निर्धाराने त्याच्यामागे ठामपणे उभे राहतात.जशी रामायणांत वानरं दगडधोंडे घेऊन रामाच्या मागे उभी राहिली,इतकेच नव्हे तर,राक्षस म्हणवणारे,प्रहस्त,कुंभकर्णादी वीरांनी सुध्दा सीतापहराबद्दल तिव्र निषेध व्यक्त केला होता.बिबिषणाने तर सत्याचा पक्षच उचलुन धरला होता.
सर्व काळांत,सर्व प्रदेशात,कोणत्या तरी स्वरुपात नांवाने,निमित्याने,कोणा तरी तारणहार रामाची वाट बघत असतात.रामराज्याचे स्वप्न उरी बाळगुन असतो.म्हणजेच राम पूर्वी होता,आजही आहे आणि भविष्यातही असेलच!चांगल्या तत्वांचे पुनरुत्थान आणि जुलमां चा शेवट हाच रामायणाचा सारांश आहे.
सामान्य मानवी जीवनांत केवळ अभावाने आढळणारे सारे चांगले गुण आणि पराक्रम एकाच व्यक्तित महर्षी वाल्मीकांनी दाखवल्यामुळे रामात देवपण दिसते.वास्तविक रामायण आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्याशी निगडीत आहे.धर्म,जात,पंथ,पक्ष वैयक्तिक तसेच सामाजिक दृष्टीकोण व प्रादेशिक बंधने मानवी मर्यादांच्या वर उठण्यास रामायण आपणांस शिकवते, रामायण मानसाला राग,लोभ,मोह या अवगुणांची गुलामगिरी तोडुन माणुस म्हणुन जगण्याचा आग्रह करते,
मी लिहित असलेल्या रामायणांतील कांही प्रचलित गैरसमजुती दूर होतील, जसेः- सीता स्वयंवर,रामाचे पित्रृवचन पालन,सेतूबांधणी,शस्रास्रे,राक्षस,वानर कोण होते,याबद्दलच्या आपल्या परंपरा गत समजुतींना धक्का बसत असला तरी मुळ रामायणाची संहिता कायम राहिल याची दक्षता,काळजी घेतली आहे.
राम जसा आहे तसा पहावा,नीट समजल्यामुळे मग राम देवघरांत न राहतां वैयक्तीक आयुष्यात येऊन सामाजिक जाण वाढेल आणि राजनीती च्या नांवाखाली सोयीचे राजकारण न घडतां समाज आणि राष्र्टहिताचा प्रयत्न होऊ शकेल.म्हणुनच रामाचे मोठेपण शोधण्याचा हा प्रपंच!
मिनाक्षी देशमुख.
जय श्रीराम
!! श्रीराम !!
!!! अभिनव रामायण !!! भाग – १.
एकाच व्यक्तीच्या ठीकाणी सद्गुण, चारित्र्य,सामर्थ्य आणि सर्वगुणसंपन्नता असुं शकते कां? नेमक्या याच सनातन प्रश्नाने वाल्मीकी रामायणाची सुरुवात झाली.तप आणि साधना यांत सतत मग्न असलेल्या वाल्मीकी ऋषींनी नारदमुनींना प्रश्न केला की,सध्याच्या चालु घडीला गुणवान,पराक्रमी,धर्मज्ञानी,उपकार स्मरणारा,सत्य व एकवचनी,चरित्र्यवान, मनावर संयम असलेला,क्रोधाला जिंकणारा,कोणाचीही असुया न करणारा माणुस या पृथ्वीतलावर गवसेल का? नारदमुनी प्रसन्नपणे म्हणाले,तुम्ही केलेले वर्णन एकाच माणसाच्या ठीकाणी आढळणे कठीण आहे,परंतु सर्वगुण संपन्न,पराक्रमी,चरित्रवान असा इक्ष्वाकु राजघराण्यांत “राम” नांवाचा राजा होऊन गेला.नारदमुनींनी श्रीरामाच्या चरित्र्याची माहिती थोडक्यात वाल्मीकींना देऊन ते देवलोकांत निघुन गेले.
आणि वाल्मीकी ऋषी तामसा नदी कडे निघाले.मार्ग आक्रमित असतां, त्यांच्या मनांत नारदांनी सांगीतलेल रामकथा घोळत होती.ऋषी तमस नदी काठी पोहचले असतां,नदीकाठचा शांत परिसर,स्वच्छ व निर्मळ जल पाहुन स्नान करण्याची इच्छा झाली.ते नदीच्या पात्रा कडे निघाले असतां,त्यांचे लक्ष जवळच्या झाडावर बसलेल्या क्रौंच पक्षाच्या गोड आवाजात किलबिल करीत एकमेकां भोवती मोठ्या प्रेमाने रुंजी घालत असले ल्या एका जोडप्याकडे गेले.अचानक आलेल्या एका तिक्ष्ण बाणाने त्या पक्षातील नराचा वेध घेतल्याने तो जमीनीवर पडुन प्राणांंतिक वेदनेने तडफडत असलेला घायाळ जोडीदाराला पाहुन,पक्षीण करुण आवाजांत चित्कारुं लागली.
इतक्यात प्राणांतिक वेदणांनी तडफडणारा तो नरपक्षी,दुःखाने आकांत करणारी पक्षीण व त्यांच्या दुःखावर जगणारा शिकारी आपले सावज घेण्यासाठी पुढे आलेला पारधी पाहुन महर्षी वाल्मीकींच्या तोंडुन सहजच एक श्लोक बाहेर पडला.
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीःसमः
यत् कौचमिथुनादेकवधीः काममोहितम्।।
हे निषादा!प्रेमलिलेत मग्न असणार्या क्रौंच जोडप्यातील एकाला तूं ठार मारलेस,तुला कधीही कायम टिकणारी प्रतिष्ठा मिळणार नाही अशी शापवाणी त्यांच्या तोंडुन बाहेर पडली. आणि त्यांचे त्यांनाच आश्चर्य वाटले.मी हे कसे काय बोलुन गेलो?मनाच्या अशा दोलायमान अवस्थेत ते आपल्या आश्रमात येऊन घडलेला करुण प्रसंग व सहजगत्या बाहेर पडलेला श्र्लोक आणि दिलेली शापवाणी याचाच विचार करत ध्यानमग्न स्थितीत बसुन राहिले. इतक्यात प्रत्यक्ष ब्रम्हदेवच त्यांच्या आश्रमात आले.त्यांनी विध्यात्याचे यथोचित स्वागत करुन सृष्टीकर्त्यासमोर हात जोडुन उभे राहिले,पण त्यांच्या मनात पारध्याने केलेला दुष्ट प्राणघातच घोळत होता.
त्यांच्या मनांतील होत असलेली घालमेल ओळखुन ब्रम्हदेव म्हणाले, माझ्याच इच्छेने आपल्याला हे छंंदोबध्द काव्य स्फुरले.तेव्हा परम पवित्र श्रीरामा ची कथा, तुम्ही काव्यातुन लोकांपर्यंत पोहचवा.जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत तुम्ही रचलेली श्रीरामाची कथा लोकांमधे प्रचलित राहील.
अंगावर वारुळ वाढवुन कठीण तपश्चर्या केलेल्या ऋषीचे ह्रदय एका पारध्याकडुन झालेल्या पक्षीवधामुळे करुणेने द्रवले,आणि नकळत शापवाणी त्यांच्या तोंडुन बाहेर पडली.पण या उत्स्फुर्त उद्रेकामागे दैवीस्फुरण प्रत्यक्ष विधाताच आहे ही उमज वाल्मीकांना झाला.पक्षीवध ही अतिरेकी कृत्यांची प्रतिकात्मक घटना होती.आपल्या क्षुद्र स्वार्थासाठी लोकांना लुबाडणारी प्रतिष्ठीत धेंडे स्वतःच्या स्वार्थी व भ्रष्ट कृत्यांनी संपूर्ण समाजजीवन गढूळ करणारे,मानवी संस्कतीचा विध्वंश करणार्यांना प्रतिष्ठा मिळणार नाही हेच त्यांच्या शापवाणीतुन सिध्द होते.क्रौंच पक्षाची पारध हे केवळ निमित्यमात्र कारण आहे.अशा संस्कृतीचा विनाश टाळण्यासाठीच रामासारखा महामानव पुढे सरसावले.हेच रामायणाचे सार आहे.
जोपर्यंत पृथ्विवर मानव आहे तोवर नागडा स्वार्थ आणि दैवी प्रेरणांचा झगडा चालुच राहणार!वाल्मीकींना स्फुरलेले काव्य दैवीदेणगी आहे हे प्रत्यक्ष विध्यात्याने सांगीतल्यावर,त्यांच्याच आज्ञेने रामकथा सांगण्यासाठी आपली लेखणी वाल्मीकींनी सरसावली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ५-३-२०२१.
!!! अभिनव रामायण !!! भाग – २.
शरयूनदीतीरी कोशल नांवाचा एक प्रशस्त धनधान्याने व सुखशांतीने लोक वस्तीचा प्रदेश वसलेला होता.या प्रदेशाची अयोध्या नांवाची राजधानी प्रसिध्द होती.हे नगर मोठ्या राष्र्टाची ऊभारणी करणार्या राजा दशरथाने सर्वांगीन विकास करुन अधिक समृध्द केले होते.अनेक तत्रज्ञ,विविध देशाचे व्यापारी वास्तव्याला होते.अयोध्याचे नागरिक सुखी,प्रसन्न,स्वकष्टावर संतुष्ट असलेले निर्लोभी व सत्यवादी होते.
धृष्टी,जयंत,विजय,सुराष्र्ट राष्र्ट वर्धन,अकोप,धर्मपाल,आणि अर्थशास्रा चा ज्ञाता सुमंत हे दशरथ राजाचे आठ मंत्री सर्वगुणसंपन्न,राजनिष्ठ असल्याने अयोध्याची किर्ती दूरवर पसरली होती.या शिवाय वसिष्ठ व वामदेव ऋषी दरबारी होते.हेरखातेही जबरदस्त असल्यामुळे प्रत्येक गोष्टीची बिनचुक माहिती वेळेवर मिळत असे.प्रसंगी कठोर होऊन अपर्याध्याला दंड देणे,राजकोष वाढवणे सैन्यबल दक्ष ठेवणे,बिनाअपराध शत्रुशी सुध्दा सहिष्णुतेने वागणे,आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे,सजग राहुन राजाचे हिताचे ते रक्षण करीत असत.
इतके सर्व ठीक असुनही दशरथ राजा पोटी संतान नसल्यामुळे ते दुःखी होते.त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्ठी याग ऋष्यश्रृंगांच्या पौराहित्याखाली शरयू नदीच्या उत्तर तीरावर अश्वमेध यज्ञ केला.त्या यज्ञातुन एक तेजस्वी पुरुष प्रगट होऊन खिरीने भरलेले सुवर्णपात्र राजाला देऊन म्हणाले,हे पायस तुझ्या राण्यांना दिल्यास तुला पुत्रप्राप्ती होईल. त्याप्रमाने राजाने तिन्ही राण्यांस पायस दिल्यावर तिन्ही राण्या गर्भवती झाल्यात.
यथावकाश कौसलेने चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष नवमीला रामाला जन्म दिला. सुमित्रेने आश्लेषा नक्षत्रावर लक्ष्मण व शतृघ्न, आणि रेवती नक्षत्रावर कैकयीने भरताला जन्म दिला.दशरथ राजाचे चारही पुत्र तार्यांसारखे कांतीमान होते. अयोध्यानगरी रोषनाई व फुलांनी सजवुन नागरिकांनी राजपुत्रांचा जन्मोत्सव साजरा केला.
राजा दशरथांची ही चारही मुलें सर्व गुणसंपन्न होती.सर्व मुलांचे अध्ययन आणि युध्दकलेचचे ज्ञान उत्तमप्रकारे पार पडले.त्यांच्यामधे श्रीराम श्रेष्ठ व लोक प्रिय असुन पित्याच्या सेवेत नेहमीच रत असत.वैशिष्ट्य म्हणजे राम लक्ष्मणाची जास्त जवळीक होती.हे सर्वच भाऊ सद्गुणी,समजुतदार,विनयी,सर्वज्ञानी,
दूरदर्शी आणि तेजस्वी होते.अशा चार प्रभावशाली पुत्रांच्या प्राप्तीमुळे दशरथ राजा समाधानी,आनंदी होते.
राजपुत्रांची शिक्षण पूर्ण झाल्यावर यौवनाच्या उंबरठ्यावर आलेल्या राजपुत्रांच्या लग्नाच्या फिकरीत असतांनाच एक दिवस राजा दशरथांकडे महातेजस्वी ऋषी विश्वामित्रांचे आगमन झाले.विश्वामित्र कठोर व्रताचे पालन करणारे होते.त्यांचे यथोचित स्वागत झाल्यावर येण्याचे प्रयोजन विचारले असतां,राजाची नम्र भाषा ऐकुन विश्वामित्र आनंदाने पुलकित होऊन म्हणाले, हे राजन्!कांही विशिष्ट हेतूच्या सिध्दीस्तव मी अनुष्ठान सुरु केले.जवळ जवळ अनुष्ठान पुर्ण होत आले,पण कार्याच्या शेवटी मारीच आणि सुबाहु या दोन राक्षसांनी माझ्या कार्यात अडथळा निर्माण केला आहे.रक्तमासांचे सडे शिंपुन माझी कर्मभूमी अपवित्र करताहेत माझ्या क्रोधाचा उपयोग करुन शाप पण देऊं शकत नाही,कारण माझ्या मनाची शांती ढळल्यास माझे अनुष्ठान भंग होईल.यज्ञ रक्षणार्थ,हे राजन्!तुझा पराक्रमी जेष्ठ पुत्र राम मला दिल्यास माझे अनुष्ठान पुर्ण होईल.
विश्वामित्रांची मागणी ऐकुन राजा सुन्न झाले.विनंतीवजा स्वरांत म्हणाले, मुनीवर! राम केवळ १६ वर्षाचा कोवळा कुमार,एवढ्या बलाढ्य राक्षसांशी कशी काय झुंज देऊ शकेल?ससैन्य घेऊन स्वतःच आपल्या कार्यरक्षणासाठी येतो.हे राक्षस कोणाच्या अधिपत्याखाली अशी आततायी कृत्ये करतात हे सांगावे.
राजा!पौलस्त्य ऋषीच्या वंशातील विश्रमा मुनींचा मुलगा,देवांचा खजिनदार कुबेराचा भाऊ रावण,ब्रम्हदेवाच्या वराने महान बलशाली व पराक्रमी,त्याच्या अधिपत्याखालील राक्षस सर्व विश्वाला त्रास देत आहे.याच रावणाच्या प्रेरणेने मारीच व सुबाहु माझ्या अनुष्ठानांत विघ्ने निर्माण करीत आहेत.रावणाचे नांव ऐकताच भयभीत होत राजा म्हणाले, मुनिवर!रावण,मारीच,सुबाहु पराक्रमात मृत्युइतके भयंकर आहेत.त्यांच्याशी लढण्यास मी येतो,पण माझ्या कोवळ्या रामाला मागु नये.
राजाचे बोलणे ऐकुन क्रोधिष्ट विश्वामित्र म्हणाले,तूं वचनभंग केलेस तर तुझ्या कुळाचा नाश निश्चित आहे.त्यांच्या कोपाने धरणी कापु लागली.हे पाहुन संयमी वसिष्ठ ऋषी राजाला समजावत म्हणाले, राजन् विश्वामित्रांच्या सानिध्यात रामाला इजा होऊच शकत नाही.आपण निश्चिंत असावे.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ५-३-२०२१.
!!! अभिनव रामायण !!! भाग – ३.
वशिष्ठ ऋषी म्हणाले,राजन्! हे विश्वामित्र ऋषी स्वतःच धर्माचे मूर्तिमंत रुप,बलवानांमधे बलिष्ठ,विद्येमुळे सार्या जगात श्रेष्ठ,तपाचरणी,जगातील सर्व अस्रांची त्यांना माहिती आहे.ते स्वसामर्थ्याने त्या राक्षसांचा निःपात करण्यास समर्थ आहेत.केवळ कांही विशिष्ट हेतूने,रामाचे हित लक्षात घेऊनच त्यांना नेत आहे.दशरथांनी सत्वर राम लक्ष्मणास बोलावुन त्यांना विश्वामित्रांच्या स्वाधीन केल्यावर तिघेही प्रवासास निघुन गेले.
रामायणांत वारंवार नरमांसभक्षी राक्षस अरण्यात वास्तव करुन असल्याचे सतत वर्णन आलेले आहे.वाल्मीकींनी वर्णन केलेले रामायण,कौरव-पांडवांच्या घनघोर भारतीय युध्दाच्या फार पुर्वी घडलेले दिसते.रामायण हे या युध्दापुर्वीचे यावरुन रामायणाचा काल किती प्राचीन आहे याची कल्पना येते.रामाच्या काळांत उत्तर हिंदुस्थानातील गंगा यमुना नद्यांचे खोरे आणि पंजाबच्या जवळपासच्या सुपिक प्रदेशामधेच प्रामुख्याने लोकवस्ती होती.आणि उत्तर हिंदुस्थानचा बाकी बराच भाग आणि संपुर्ण दक्षिण हिंदुस्थान भयानक निबिड जंगलांनी व्याप्त असल्यामुळे हिस्र श्वापदे व कांही नरमांसभक्षी माणसे या अरण्यांतुन राजरोस फिरत,जंगलात असलेल्या तुरळक सुसंस्कृत माणसांच्या वस्त्यांवर प्राणघातक हल्ले करीत.शिवाय दुर्गम पहाडांवर उक्रांतीच्या वरच्या टप्प्यावरील मानवसदृश वानरांची वस्ती होती.ही रामायणकालीन भौगोलिक परिस्थिती पुढील इतिहास काळाशी मिळतीजुळती दिसते.
मध्ययुगात शास्रीय आणि तांत्रिक ज्ञानाने पुढारलेले युरोपियन जेव्हा आपली गलबते घेऊन शोध मोहिमेवर निघाले,तेव्हा आफ्रिकेच्या निबिड अरण्यात नरभक्ष्यांच्या टोळ्या आढळुन आल्या होत्या.पुढारलेल्या युरोपियना पुढे आफ्रिका व आशिया खंडातील मागासलेले लोक सहजगत्या त्यांची गुलामगिरी स्विकारीत.यावरुन असे स्पष्ट होते की,रामायणकाळी सुसंस्कृत, पुढारलेले,व अर्धवट उक्रांत वानरसदृश माणसे आणि नरमांसभक्षी राक्षस लोक एकाच खंडप्राय प्रदेशात एकाच काळात वास्तव्य करणे शक्य वाटते.फार जुन्या काळातील राम या महामानवाचे चरित्र आजच्या आधुनिक काळात कितपत सुसंगत आणि अनुकरणीय असु शकेल. यासाठी रामायणातील संघर्ष कोणत्या प्रवृत्तीत मोडते हे पाहावे लागेल. वास्तविक रावण हा पराक्रमी,सुविद्य व उच्चकुलीन होता.पण सुखभोगाची अनिवार लालसा आणि सत्तेच्या गर्वामुळे शिवाय ब्रम्हदेवाच्या वरदानामुळे तो राक्षसी प्रवृत्तीचा झाला.सहाजिकच त्याच्या भोवती अतिरेकी,विध्वंशक, भ्रष्टाचारी आणि बलात्कारी वृत्तींच्या लोकांची भुतावळ जमली होती.इतिहासा च्या पानोपानी आणि चालु घडीला सुध्दा सत्तापिपासू आणि स्वार्थी सत्ताधिशां भोवती अनन्वित कृत्ये करणार्यांचाच भरणा असतो.असे लोक नेहमीच कायदा सुव्यवस्था,सदाचार,संस्कृतींची जपणूक करणार्या सद् वृतींशी होत असतो. रामायण या दृष्टीने सर्व काळी,सर्व प्रदेशात सुसंगती आणि औचित्य राखुन आहे.
अयोध्येपासुन कांही अंतरावर असलेल्या नदीच्या दक्षिण तिरावर महर्षी विश्वामित्रांनी श्रीरामाला बलातिबला विद्या शिकविली.या विद्येमुळे रोगराई, थकावट येत नसुन शरीरांत ताकद राहते. मंत्र देत ते म्हणाले,रामा! ही विद्या तूं जगाच्या रक्षणार्थ उपयोग कर.हे रघुनंदना! तुझ्यात अनेक गुण आहेत ते गुण व माझ्या तपोबलाच्या प्रभावाने मी देत असलेल्या विद्येने वृध्दींगत होतील. नंतर ती रात्र शरयू नदीच्याकाठी गवताच्या शय्येवर घालवली.
दुसर्या दिवशी आन्हिक उरकवुन तिघेही गंगा आणि शरयूच्या संगमावर पोहचले.ती रात्र त्यांनी संगमावरच्या आश्रमांत काढली.दुसर्या दिवशी विश्वामित्रांच्या मार्गदर्शनाखाली राम लक्ष्मण एका निबिड अरण्यात आले.भर दिवसांसुध्दा किर्र आंधार होता.हिंस्र श्वापदे मोकाट सुटलेले,पक्षी भिषण स्वरांत ओरडत होते.हा भिषण वनाचा प्रदेश कोणता म्हणुन रामाने विचारल्या वर विश्वामित्र म्हणाले,पूर्वी मलद व करुष नांवाची धनधान्याने समृध्द दोन मोठी नगरें होती.कुरुष म्हणजे भूक व मलद म्हणजे चिखल.ही दोन्ही नगरे चांगली भरभराटीस असतांनाच,आपल्या इच्छे नुसार अनेकरुपे धारण करणारी ताटका नावाच्या राक्षसीनीने प्रवेश करुन दोन्ही नगराचा पूर्ण नाश केला.हे रामा!ताटके सारख्या अधर्मियांना मारुन तूं हा प्रदेश निष्कंटक कर.ज्याच्या शिरावर राज्याचा भार असतो त्याचे हे कर्तव्य असते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ५-३-२०२१.
!!! अभिनव रामायण !!! भाग – ४.
विश्वात्रांच्या आज्ञेनुसार रामाने ताटकेचा वध करुन पापमुक्त झालेल्या तो वनप्रदेश परत बहरला,खुलला. दुसर्या दिवशी विश्वामित्रांनी त्यांची सारी अस्रविद्या देऊन परत ती अस्रे कशी मिटवायची याचे सुध्दा शिक्षण त्यांनी रामाला दिले.ही अस्रे ध्वनींच्या माध्यमा तुन मनातच राहत.गरज पडेल तेव्हा ती साकार होऊन बाहेर पडत,ही अस्रे फेकुन मारली जात नसत,तर विशिष्ट सुचनेद्वारे सोडली जात.यासाठी संयम फार आवश्यक असे.या अस्रांचा परिणाम लक्षात घेऊन देवतांचे नांव दिल्या गेलीत. या अस्रांचे अण्वस्रासारखे सामर्थ्य इतके मोठे होते की,प्रदेशच्ये प्रदेश बेचिराख होऊ शकत होते.ब्रम्हास्र हे आधुनिक अग्निबाणासारखे खूप उंच चढत असे.
संपूर्ण रामायणाच्या कथेची बैठकच मुळी रामाच्या सज्जन,पराक्रमी लोकप्रीय जीवनावर आधारीत आहे.रामा चे व महापराक्रमी पण दुष्ट प्रवृत्तीच्या रावणाशी युध्द होऊन,तो पराभूत होऊन मारल्या गेला.या कथेतील Fiction मुळे ही कथा समाजाच्या तळागळात झिरपत स्थिरावली.राम रावण युध्दांत वापरलेली अस्रशस्र ही फक्त धनुष्यबाण नसुन प्रगत अस्रे होती जी विश्वामित्रांकडुन रामाला मिळाली होती.आणि रावण त्याच्या मायावी राक्षसगणांसह चित्तारला गेला. महापराक्रमी अण्वस्रधारी रामाने तशाच पराक्रमी व अण्वस्रसंपन्न रावणावर संहारक भयानक युध्द केले असे लिहितां आले असते.पण पादचारी वनवासी रामाने केवळ वानराच्या मदत आणि दगडधोंड्याच्या शस्राने जगद्जेत्या शक्ति शाली रावणाला परास्त केले.चालु काळांत नाही कां सिनेमा किंवा टी.व्ही. धारावाहिकेत आधुनिक शस्रांनी युध्द झाल्यावर शेवटी दगडधोंडे आणि लाथा बुक्यांचीच मारामारी दाखवतात.
विश्वामित्रासह राम लक्ष्मण रमणीय सिध्दाश्रमात पोहोचले. विश्वामित्रांचा सिध्दप्रयोग येथेच सपन्न होणार होता,पण त्यांच्या कार्यात राक्षसां कडुन विघ्ने आणली जात होती.राम लक्ष्मण त्यांना म्हणाले,आतां आपण आपल्या अनुष्ठानाला,यज्ञाला सुरुवात करावी.राक्षसांकडुन येईल त्या अडथळ्यांचा आम्ही निःपात करुं!यज्ञ सुरु होताच दुष्ट राक्षस मारीच व सुबाहु आश्रमावर चालुन आलेले पाहतांच रामाने मानवास्र सोडल्याने मारीच कित्येक योजने दूर असलेल्या समुद्रात जाऊन कोसळला.सुबाहुसहित सारे राक्षस रामाने अग्निबाणाने नष्ट केले आणि विश्वामित्रांचे यज्ञकार्य यथासांग पार पडले.
यज्ञ पार पडल्यावर राम लक्ष्मणा ला वाटले,आतां आपण अयोध्येला परत जाऊ,या आनंदात असतांनाच,विश्वामित्र म्हणाले,आपण मिथिलेला राजा जनका कडच्या यज्ञासाठी जात आहोत.तिथे असलेले पुरातन अद्भुत धनुष्य तुम्ही बघणे फार जरुरीचे आहे.
विश्वामित्र,राम लक्ष्मण व इतर शिष्यगणांसह मिथिला नगरीच्या जवळ पोहोचले असतां,जवळच एक जुना, निर्जन पण रमणीय आश्रम दिसल्यावर रामाने त्यांना विचारले,एवढा सुंदर आश्रम असुन निर्मनुष्य कां?त्यावर विश्वामित्रांनी त्या पुरातन निर्जन आश्रमा ची हकिकत सांगण्यास सुरुवात केली. फारपुर्वी तपस्वी गौतमऋषी पत्नी अहिल्यासोबत या आश्रमांत वास्तव्यास होते.एक दिवस गौतममुनी आश्रमांत नाही ही संधी साधुन त्यांचे रुप धारण करुन प्रत्यक्ष इंद्रदेव कुटीत शिरले. अहिल्येला थोडे आश्चर्य वाटले की आपले पती तर आतांच गेले,मग एवढ्या तच कसे परत आले?पण पत्नीधर्मास अनुसरुन त्यांची इच्छा पूर्ण केली.संतुष्ट इंद्र कुटीबाहेर पडत असतांनाच गौतम मुनी परतले.आपल्याच रुपातील पुरुषाला पाहुन,आपल्या तपोबलाने त्यांना सारा प्रंसग लक्षात आला.कमंडलु तील हाती पाणी घेऊन इंद्राच्या अंगावर शिंपडुन,तुझ्या अंगाला क्षतं पडतील असा शाप दिला.आणि अहिलेल्या तूं पाषाणवत राहुन केवळ हवा भक्षण करुन एकटीच या आश्रमात वर्षानुवर्से राहशील असा शाप दिल्यावर, निर्दोष अहिल्येने उःशाप मागीतल्यावर ते म्हणाले,जेव्हा दशरथत्र राम या आश्रमात येईल,तेव्हा तुझा उध्दार होऊन पवित्र होशील व तुझे पुर्वीचे शरीर प्राप्त होईल. तू पापमुक्त झाल्याने तुझा मी स्विकार करेन.असे म्हणुन विश्वामित्र तपश्चर्या करायला हिमालयात निघुन गेल्यामुळे हा आश्रम असा उजाड झाला.
रामा! पुण्यकर्मी गौतमऋषींच्या आश्रमात प्रवेश करुन असलेल्या दुर्देवी अहिल्येचा उध्दार कर!विश्वामित्रांच्या आज्ञेनुसार श्रीरामाने प्रवेश करतांच ढगांत लपलेल्या चंद्राप्रमाणे लोकदृष्टीपासुन दूर राहिलेल्या अहिल्येने श्रीरामाचे पदवंदन केले.शाप मुक्त अहिल्याचा,पती गौतमऋषीं बरोबर पुन्हा नव्याने संसार सुरु झाला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ६-३-२०२१.
!!! अभिनव रामायण !!! भाग -५.
रामलक्ष्मणांसह विश्वामित्रांनी मिथिलेत प्रवेश करुन राजा जनकाच्या यज्ञमंडपात पोहोचल्यावर स्वतः जनक राजा व त्यांचे पुरोहित शतानंदानी विश्वमित्रांचे यथायोग्य सत्कार करुन यज्ञ समाप्तीपर्यंत राहण्याची विनंती केली. नंतर त्यानी दशरथपुत्र राम लक्ष्मणाची ओळख करुन,ताटका,सुबाहु ,मारीच यांचे निपात्य कसे केले हे सांगुन गौतम ऋषी व अहिल्येच्या पुनर्भेटींची घटना सुध्दा त्यांनी सविस्तर हकिकत राजाला सांगीतले.शतानंदाला अहिल्येची शाप मुक्तता केल्याचे ऐकुन खुपच आनंद झाला,कारण शतानंद अहिल्येचा मुलगा होता.
जनकराजाने सीतास्वयंवराचे आयोजन केले.स्वयंवरासाठी दूरदूरचे मोठमोठे राजे आमंत्रीत होते.स्वयंवरात अद्भूत अवजड असे शिवधनुष्य ठेवले होते.कोणत्याही राजाकडुन ते धनुष्य साधे हललेही नाही.नंतर श्रीराम उठले, सारे लोक आश्चर्याने पाहत असतांना, श्रीरामाने शिवधनुष्य उचलुन प्रत्यंच्या चढवली.प्रत्यंचा खेचताच धनुष्य मध्यभागी तुटुन दोन तुकडे झाल्याबरोबर वज्रपातासारखा मोठा आवाज झाला. सीतेने रामाला वरमाला घातली.त्याच मांडवात जनकराजाची दुसरी मुलगी उर्मिलेचा विवाह लक्ष्मणाशी व जनक राजाचा भाऊ कुशध्वजाच्या दोन मुलीं मांडवी व श्रुतकीचा विवाह भरत व शत्रुघ्नाशी असे चारही विवाह सुमुहुर्ता वर संपन्न झाले.राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आपापल्या पत्नीसह अयोध्येस येत असल्याचे कळल्यावर अयोध्यानगरी सुशोभित होऊन त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली.
विवाहानंतर दुसर्याच दिवशी विश्वामित्र तपश्चर्येसाठी हिमालयाकडे निघुन गेले.हिमालयाकडे गेलेले विश्वामित्र रामायणात पुन्हा येत नाही,पण
विश्वामित्रांनी रामायण घडविले.केवळ त्यांच्यामुळेच वयाच्या १६ व्या वर्षी राम राक्षसांबरोबर संघर्षात उतरले.रावण राम संघर्षाला तोंड,ताटका वधाने सुरु झाले. आणि त्या संघर्षाची तिव्रता पुढे वाढतच गेली.दुष्ट,अतिरेकी आणि संस्कृती विध्वंशक रावणाला परास्त करण्यासाठी विश्वामित्रांनी रामाची निवड करुन त्यांना अनेक अस्रे शिकवत भावी संघर्षासाठी सज्ज केले.
सत्-असत् प्रवृत्तीमधील झगडा नित्याचाच आहे.फक्त संघर्षाचे स्वरुप, झगडणारा पक्ष आणि प्रेरणा देणारे विचारवंत काळाच्या ओघात बदलत जातात.मध्ययुगीन भारतात मुस्लीम सत्ताधार्यांच्या अत्याचाराला तोंड देण्या साठी समर्थ रामदासांची शिवछत्रपतींना प्रेरणा मिळाली.राम-रावणातील संघर्ष अशाच प्रकारच्या सर्वकालिन संघर्षाचे प्रतिक आहे.अशा संघर्षाची कारणे सुध्दा ठराविक असतात,फक्त त्याचे बाह्य स्वरुप बदलते.भोगाची अनिवार लालसा, संपत्तीचा शोष,सत्तेला चिटकुन राहण्या ची चटक आणि अहंकार हीच मूलभुत कारणे युगानुयुगे जुलुम,जबरदस्ती आणि निर्बलांची पिळवणुक घडवत आलेली आहे.रामायणात जगत् जेत्या ज्ञानी रावणाने हेच केले.त्याला उत्तर म्हणुन सत् प्रवृत्तीच्या मानदंडाच्या रुपात रामाची घडण,विचारवंत विश्वामित्रांनी केली.आणि अशा उदात्त चारित्र्याच्या बलिष्ठ रामाला त्यांच्या प्रत्येक कार्यात सहचारी म्हणुन परमपवित्र सीतेसारखी सहधर्मचारिणीची जोड मिळाली.
विवाहकार्य संपन्न झाल्यावर भरताचा मामा युधाजित गांधार देशाला
(सध्याचे अफगणिस्तान) जाण्यास निघाले असतां,भरत व त्याच्याबरोबर सदैव असणारा शत्रुघ्नसुध्दा,दशरथराजा च्या अनुमतीने मामाबरोबर मातुलगृही जाण्यास रवाना झाले.राजा दशरथांचे चारही पुत्र शील आणि सद् व्यवहाराने लोकप्रिय होते.पित्याच्या आज्ञेने श्रीराम मोठ्या आस्थेने राज्यकारभार सांभाळु लागले.राम स्वभावतःच मोठ्या मनाचे होते.कोणी कठोर बोलले तरी त्यांच्या तोंडुन अपशब्द निघत नसे.कुणी केलेले उपकार कायम लक्षात ठेवत.राम मूद्देसुद बोलण्यात बृहस्पतीइतके कुशल होते. धर्म,अर्थ,काम याचे त्यांना यथायोग्य ज्ञान होते.सज्जन लोकांचे संगठन आणि दुर्जनांचा बंदोबस्त करण्याची त्यांची हातोटी वाखाणण्यासारखी होती.राज्या च्या धनाचा आगम व विनियोगावर त्यांचे बारीक लक्ष असे.
अशा सर्वगुणसंपन्न,पराक्रमी व कर्तबगार रामाला, मंत्र्यासोबत मसलत करुन अभिषेक करण्याचे दशरथ राजाने ठरविले.सर्वांच्या एकमुखी निर्णयाने रामा च्या राज्याभिषेकाची तयारी करण्याची राजाने आज्ञा दिली.ही आनंदवार्ता सर्वीकडे कळल्याने रामाचे अभिनंदन करण्यास प्रजेच्या झुंडी राज प्रसादाकडे लोटल्या.पुष्यनक्षत्रावर जेष्ठ पुत्र रामाचा अभिषेक निश्चित झाला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.



















