आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२३ एप्रिल, दिवस ११३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी ५०१ ते ५३५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १३४५ ते १३५६
“२३ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २३ Apirl
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २३ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १३४५ ते १३५६ चे पारायण आपण करणार आहोत.
२३ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी ५०१ ते ५३५,
501-9
म्हणोनि मृत्युलोकी सुखाची कहाणी । ऐकिजेल कवणाचा श्रवणी । कैची सुखनिद्रा आंथरुणी । इंगळाचा ॥501॥
म्हणुन मृत्युलोकात खर्या सुखाची कथा कोणाच्या कानांनी ऐकली जाईल ?निखार्याच्या (इंगळ म्हणजे विंचू किंवा विस्तव) अंथरुणावर मनमोकळेपणाने (निश्चिंत)झोप घेता येईल काय.
502-9
जिये लोकीचा चंद्र क्षयरोगी । जेथ उदयो होय अस्तालागी । दुःख लेऊनि सुखाची आंगी । सळित जगाते ॥502॥
ज्या लोकीचा चंद्र क्षयरोगाने ग्रासलेला आहे. जेथे अस्ताला जाण्यासाठीच सुर्याचा उदय होत असतो, दुःखच सुखाचा अंगरखा घालून नाटक करुन जगाला छळण्याचे काम करत असते. (म्हणजे विषयात सुख भासते पण अनुभवास येत नाही)
503-9
जेथ मंगळाचा अंकुरी । सवेचि अमंगळाची पडे पोरी । मृत्यु उदराचिया परिवरी । गर्भु गिंवसी ॥503॥
जेथे मांगल्याच्या अंकुराबरोबरच अमंगलाची कीड आहे. आणि आईच्या पोटातील गुप्त गर्भाशयात सुद्धा मृत्यु गर्भाला गाठतो.
504-9
जे नाही तयाते चिंतवी । तव तेचि नेइजे गंधर्वी । गेलियाची कवणे गावी । शुद्धी न लभे ॥504॥
जेवत नाही त्याचे चिंतन मृत्युलोक करायला लावतो, मग तिच गोष्ट गंधर्व हिरावून नेतात. पण कोठे नेतात याचा पत्ताही लागत नाही.
505-9
अगा गिंवसिता आघवा वाटी । परतले पाउलचि नाही किरीटी । सैंघ निमालियाचियाचि गोठी । तिंये पुराणे जेथिची ॥505॥
अरे अर्जुना, सगळ्या मार्गानी शोध घेतला तरी, मृत्युच्या मुखात गेलेल्यांचे एकही पाऊल परत फिरलेले दिसत नाही. जेथील पुराणे म्हणजे असंख्य जन मेलेल्यांच्या गोष्टींनी भरलेली आहेत.
506-9
जेथीचिये अनित्यतेची थोरी । करितया ब्रह्मयाचे आयुष्यवेरी । कैसे नाही होणे अवधारी । निपटूनिया 506॥
जेथील नाशवंताचे वर्णन जरी कोणी ब्रम्हदेवाच्या आयुष्या एवढ्या दिर्घकाळपर्यंत करीत बसला तरी सर्वार्थाने कळनार नाही.
507-9
ऐसी लोकीची जिये नांदणूक । तेथ जन्मले आथि जे लोक । तयांचिये निश्चिंतीचे कौतुक । दिसत असे ॥507॥
अशा तर्हेने या लोकीची क्षणभंगुर स्थिती आहे, तेथे जन्मलेल्या लोकांनी निश्चिंत राहावे. ही नवलाईची गोष्ट आहे.
508-9
पै दृष्टादृष्टीचिये जोडी । लागी भांडवल न सुटे कवडी । जेथ सर्वस्वे हानि तेथ कोडी । वेचिती गा ॥508॥
अरे ऐहिक(क्षणिक)पारलौकीक लाभासाठी भांडवलातील एक कवडी सुद्धा ज्यांच्या हातुन सुटत नाही पंरतु (ते) जेथे सर्वस्वाचा नाश आहे, तेथे कोट्यावधी रुपये खर्च करतात.
509-9
जो बहुवे विषयविलासे गुफे । तो म्हणती उवाये पडिला सापे । जो अभिलाषभारे दडपे । तयाते सज्ञान म्हणती ॥509॥
जो विषयविलासात गुंतुन राहिला आहे. तो सध्या सुखात आहे असे म्हणतात. जो वासनेच्या भाराने दडपुन गेला आहे, त्याला ज्ञानी म्हणतात.
510-9
जयाचे आयुष्य धाकुटे होय । बळ प्रज्ञा जिरौनि जाय । तयाचे नमस्कारिती पाय । वडिल म्हणुनि ॥510॥
ज्याचे आयुष्य थोडे उरले आहे, बळ बुद्बी कमी झाली आहे, त्यालाच वडील समजुन त्याच्याच पायावर लोटांगणे घालतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
511-9
जव जव बाळ बळिया वाढे । तव तव भोजे नाचती कोडे । आयुष्य निमाले आंतुलियेकडे । ते ग्लानीचि नाही 511॥
जसे जसे मुल वाढते तसतसे आईबाप कौतुकाने नाचतात. परंतु त्याची वाढ होत असताना आयुष्याची दोरी कुमकुवत होते. या बद्दल त्यांना खेद माहितच नसतो.
512-9
जन्मलिया दिवसदिवसे । हो लागे काळाचियाचि ऐसे । की वाढती करिती उल्हासे । उभविती गुढिया ॥512॥
मुल जन्मल्यावर, ते दिवसेंदिवस तो काळाचा घास होऊ लागते. तरीही हौसेने वाढदिवस साजरा करतात व गुढ्या उभारतात.
513-9
अगा मर हा बोलु न साहती । आणि मेलिया तरी रडती । परि असते जात न गणिती । गहिंसपणे ॥513॥
अरे अर्जुना कोणी तु मर हा शब्द सहन करीत नाहीत. मेल्यावर तरी रडतात, पण आपले आयुष्य कमी कमी होत चालले आहे. हे त्यांना मुर्खपणाने समजत नाही,
514-9
दर्दुर सापे गिळिजतु आहे उभा । की तो मासिया वेटाळी जिभा । तैसे प्राणिये कवणा । वाढविती तृष्णा ॥514॥
सापाकडुन उभा गिळला जात असताना देखील बेडुक उडत असलेल्या माशीला पकडण्यासाठी जीभ बाहेर काढुन वेटाळीत असतो. अशाप्रकारे कोणत्या लोभासाठी हे प्राणी(विषयाची)ताहन वाढवित असतात कोण जाणे ?
515-9
अहा कटा हे वोखटे । मृत्युलोकीचे उफराटे । एथ अर्जुना जरी अवचटे । जन्मलासी तू ॥515॥
अरेरे ! हे वाईट आहे ! मृत्युलोकातील सर्वच न्याय उफराटा आहे. अर्जुना ज्या अर्थी तु येथे दैवयोगाने जन्मला आहे.
516-9
तरि झडझडोनि वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग । जिया पावसी अव्यंग । निजधाम माझे ॥516॥
तरी या मृत्युलोकाच्या राहाटीतुन सर्व झटकुन मोकळा हो, आणि या भक्तिच्या मार्गाला असा लाग की, त्यायोगे तुला माझ्या निर्दोष स्वरुपाच्या पदाचा लाभ घडेल.
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः ॥9. 34॥
॥इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगुह्य योगोनाम नवमोऽध्यायः ॥9॥
। ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ।
517-9
तू मन हे मीचि करी । माझा भजनी प्रेम धरी । सर्वत्र नमस्कारी । मज एकाते ॥517॥
तु आपले मन मद्रुप कर, माझ्या भजनाबद्दल प्रेम बाळग, सर्व ठिकानी माझे अस्तित्व जाणुन मला वंदन कर.
518-9
माझेनि अनुसंधाने देख । संकल्पु जाळणे निःशेख । मद्याजी चोख । याचि नांव ॥518॥
माझ्या अखंड ध्यानाने सर्व संकल्प पुर्णपणे जाळतो, त्याला स्पष्टपणे मद्दाची(यजनकर्ता) असे नांव द्दावे.
519-9
ऐसा मिया आथिला होसी । तेथ माझियाचि स्वरुपा पावसी । हे अंतःकरणीचे तुजपासी । बोलिजत असे ॥519॥
तू जेव्हा माझ्या ध्यासाने संप्पन्न होशील, तेव्हाच माझ्या स्वरुपाला पावशील ही माझ्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट तुला मी सांगत आहे
520-9
अगा आवघिया चोरिया आपुले । जे सर्वस्व आम्ही असे ठेविले । ते पावोनि सुख संचले । होऊनि ठासी ॥520॥
अरे आम्ही आमचे सर्वस्व पुर्ण चातुर्याने राखुन ठेविले आहे. ते लाभुन तु सुखाने ओतप्रोत भरुन जाशील.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
521-9
ऐसे सांवळेनिपरब्रह्मे । भक्तकामकल्पद्रुमे । बोलिले आत्मारामे । संजयो म्हणे ॥521॥
अशा प्रमाने भक्तांची इच्छा पुर्ण करणार्या ब्रम्हस्वरुप सावळ्या श्रीकृष्णांनी अर्जुनास बोध केला, असे संजय बोलले.
522-9
अहो ऐकिजत असे की अवधारा । तव इया बोला निवांत म्हातारा । जैसा म्हैसा नुठी का पुरा । तैसा उगाचि असे ॥522॥
ज्ञानेश्वर महाराज जणास (श्रोत्यांना) सांगतात. ऐका, म्हातारा धृतराष्ट्र हे बोल ऐकत शांत राहिला. एखादा आळशी, ऐदी पाण्यात बसल्यावर रेडा जसा हालत नाही. तसा तो मुकाट्याने बसला.
523-9
तेथ संजये माथा तुकिला । अहा अमृताचा पाऊस वर्षला । की हा एथ असतुचि गेला । सेजिया गावा ॥523॥
तेव्हा संजयाने मान डोलावली व स्वःताशी म्हणाला, हा हा हा ! आज अमृताची वृष्टी झाली. पण हा म्हातारा येथे असुन शेजारच्या गावी गेल्यासारखा आहे.
524-9
तऱ्ही दातारु हा आमुचा । म्हणोनि हे बोलता मैळेल वाचा । काइ झाले ययाचा । स्वभावोचि ऐसा ॥524॥
परंतु हा आमचा अन्नदाता आहे. स्पष्ट बोलुन वाचेला दोष लागेल. याला इलाज नाही कारण याचा स्वभावच असा आहे.
525-9
परि बाप भाग्य माझे । जे वृत्तांतु सांगावयाचेनि व्याजे । कैसा रक्षिलो मुनिराजे । श्रीव्यासदेवे ॥525॥
परंतु धन्य माझे भाग्य की, महामुनी श्री व्यासमहाराजांनी रणवृतांत सांगण्याच्या निमित्ताने मला निर्भय राखले आहे.
526-9
येतुले हे वाडे सायासे । जव बोलत असे दृढे मानसे । तव न धरवेचि आपुलिया ऐसे । सात्विके केले ॥526॥
अशा रितीने मोठ्या प्रयासाने मन घट्ट करुन संजय मनातल्या मनात बोलत आहे, तोच अष्टसात्विकभाव आवरुन धरवेनात व त्याला सावरता येईनात. (अशी अवस्था अष्ट सात्विक भावांनी केली)
527-9
चित्त चाकाटले आटु घेत । वाचा पांगुळली जेथिची तेथ । आपादकंचुकित । रोमांच आले ॥527॥
त्याच्या चित्ताला(मनाला)चकीत झाले, चक्कर आली, जीभ लुळी पडली, व सर्वागावर रोमांचा उभे राहिले.
528-9
अर्धोन्मीलित डोळे । वर्षताति आनंदजळे । आंतुलिया सुखोर्मीचेनि बळे । बाहेरि कापे ॥528॥
अर्धे उघडलेले डोळे आनंदाश्रुचा वर्षाव करु लागले. व अंतर्यामी उसळनार्या आंनदाच्या लाटाच्या प्रभावाने शरिर थरथर कापु लागले.
529-9
पै आघवाचि रोममूळी । आली स्वेदकणिका निर्मळी । लेइला मोतियांची कडियाळी । आवडे तैसा ॥529॥
सर्व रोमांच्या मुळाशी निर्मळ घामाचे थेंब आले, त्यामुळे त्याने अंगावर मोत्याच्या जाळीचा अंगरखाच घातला आहे. असा तो दिसु लागला.
530-9
ऐसा महासुखाचेनि आर्तिरसे । जेथ आटणी होईल जीवदशे । तेथे निरोविले व्यासे । ते नेदीच हो ॥530॥
अशाप्रकारे महासुखाच्या उत्कर्षाने, जेथे जिवाचे भान विरुन गेल्यामुळे रणवृत्तांत सांगण्याची श्रीव्यासांनी केलेली आज्ञा ती पुर्णपणे पाळली जाईना.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
531-9
आणि कृष्णार्जुनाचे बोलणे । घो करी आले श्रवणे । की देहस्मृतीचा तेणे । वापसा केला ॥531॥
आणि त्यावर कृष्णार्जुनाचे बोलणे धो धो आवाज करीत संजयाच्या कानी आले. त्याने संजयाला पून्हा भानावर आणले. व रणवृत्तांत सांगण्यास प्रवृत्त केले
532-9.
तेव्हा नेत्रींचे जळ विसर्जी । सर्वागीचा स्वेदु परिमार्जी । तेवीचि अवधान म्हणे हो जी । धृतराष्ट्राते ॥532॥
तेंव्हा डोळ्यातील आंनदाश्रु पुसुन, अंगावरील घामही पुसला आणि तो धृतराष्ट्राला म्हणाला महाराज आता लक्ष द्दा.
533-9
आता कृष्णवाक्यबीजा निवाडु । आणि संजय सात्विकाचा बिवडु । म्हणोनि श्रोतया होईल सुरवाडु । प्रमेयपिकाचा ॥533॥
आता श्रीकृष्णाच्या वेचक वाक्यांची उत्तम बिजे आणि त्यास संजय ही अष्टसात्विक भावरुपी पिकाच्या दुसर्या पेरणीकरिता तयार झालेली जमीन. त्यामुळे श्रोत्यांना सिद्धांतरुपी पिकाची सुगीच होईल. यात तिळमाञ शंका नाही.
534-9
अहो अळुमाळु अवधान देयावे । येतुलेनि आनंदाचेराशी वर बैसावे । बापश्रवणेद्रिया दैवे । घातली माळ ॥534॥
श्रोते हो, या कथानकाकडे लक्ष द्दावे व एवढ्यानेच आंनदाच्या राशीवर बसावे. तुमच्या कानाच्या भाग्याने तुम्हास माळ घातली आहे.
535-9
म्हणोनि विभूतीचा ठावो । अर्जुना दावील सिद्धांचा रावो । तो ऐका म्हणे ज्ञानदेवो । निवृत्तीचा ॥535॥
तेव्हा आज सिद्धराज श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, ईश्वरी विभुतीचे स्थान निरुपण करतील. ते आपण श्रवण करा, अशी या निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेवांची विनंती आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगुह्ययोगोनाम नवमोऽध्यायः ॥9॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 34॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 535॥
। ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ।
दिवस ११३ वा, २३, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १३४५ ते १३५६
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. १३४५
कैसा तू देखिला होसील गोपाळी । पुण्यवंता डोळी नारायणा ॥१॥
तेणे लोभे जीव जालासे बराडी । आम्ही ऐशी जोडी कई लाभो ॥धृपद॥
असेल ते कैसे दर्शनाचे सुख । अनुभवे श्रीमुख अनुभविता ॥२॥
तुका म्हणे वाटे देसी आलिंगन । अवस्था ते क्षणक्षणा होते ॥३॥
अर्थ
हे नारायणा त्या पुण्यवंत गोपा बालकांनी तुला त्यांच्या डोळ्याने कसे पाहिले असेल, मी ही तुला पाहावे यासाठी माझा जीव कासावीस होत आहे. तो लाभ आम्हाला कधी होणार काय माहित. तुझ्या दर्शनाचा सुख लाभ कसा आहे आम्हाला काय माहीत असणार, परंतु ज्यांनी हरीच्या श्रीमुखाचा अनुभव घेतला आहे त्यांनाच त्या सुखाचा अनुभव आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तु मला तुझे रूप केव्हा दाखवशील याची मी क्षणाक्षणाला इच्छा करत आहे आणि तु मला आलिंगन केंव्हा देशील याची वाट मी पाहत आहे.
अभंग क्र. १३४६
कासया या लोभे केले आर्तभूत । सांगा माझे चित्त नारायणा ॥१॥
चातकाचे परी एकचि निर्धार । लक्षभेदीतीर फिर नेणे ॥धृपद॥
सांवळे रूपडे चतुर्भुज मूर्ती । कृष्णनाम चित्ती संकल्प हा ॥२॥
तुका म्हणे करी आवडीसी ठाव । नको माझा भाव भंगो देऊ ॥३॥
अर्थ
हे नारायणा माझे चित्त तुझ्या दर्शनासाठी एवढे आतुर का केले ते मला सांग ? ज्याप्रमाणे मेघाच्या पाण्यावाचून दुसरे पाणी प्यायचे नाही असा निश्चय चातकाचा असतो, ज्याप्रमाणे लक्षभेदी बाण मागे परत फिरायचे नाहीये हे जाणते, त्याप्रमाणे माझे मन, तुझे दर्शन झाल्याशिवाय समाधान पाहणार नाही असा निर्धार माझ्या मनाने केला आहे. जी सावळी रूपडी चतुर्भुज मूर्ती आहे तिला माझ्या डोळ्यांनी पाहावे व त्याचे नाम मी नेहमी घ्यावे असा माझ्या मनाने संकल्प केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या आवडीला तू ठाव दे माझ्या भक्तीभावाला तू भंगु देऊ नको.
अभंग क्र. १३४७
काय माझा पण होईल लटिका । ब्रिदावळी लोका दाविली ते ॥१॥
खरी करूनिया देई माझी आळी । येऊनि कुरवाळी पांडुरंगे ॥धृपद॥
आणीक म्या कोणा म्हणवावे हाती । नये काकुलती दुजियासी ॥२॥
तुका म्हणे मज येथे चि ओळखी । होईन तो सुखी पायानींच ॥३॥
अर्थ
हे देवा मी तुझी ब्रिदावळी म्हणजे तू पतित-पावन आहेस दीनानाथ आहेस अशी केली आहे व अशी प्रतिज्ञा केली की तू भक्तवत्सल आहेस मग ती खोटी होईल काय ? त्यामुळे पांडुरंगा मी तुझी जी ब्रिदावळी सर्व लोकांमध्ये केली आहे ती खरी करून दाखवा आणि माझी प्रतिज्ञा ही खरी कर. आणि माझ्याजवळ येऊन मला प्रेमाने कुरवाळ. मी तुझ्या वाचून कोणाचा आहे आश्रित म्हणून घेणार नाही आणि तुझ्या वाचून कोणालाही मी काकुळतीला येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात फक्त तुलाच मी ओळखत आहे आणि मी तुझ्या पायाच्या सुखाने सुखी होतो.
अभंग क्र. १३४८
तुम्हा आम्हा जव जालिया समान । तेथे कोणा कोण सनमानी ॥१॥
उरी तो राहिली गोमटे गौरव । ओढे माझा जीव पायापाशी ॥धृपद॥
नेणपणे आम्ही आळवू वोरसे । बोलवितो रसे शब्दरत्ने ॥२॥
तुका म्हणे लळे पाळी वो विठ्ठले । का हे उरविले भेदाभेद ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही व आम्ही ज्यावेळी एकरूप होऊ त्यावेळी कोणी कोणाचा सन्मान करावा ? देवा जोपर्यंत तुमच्यात व माझ्या भेद आहे तोपर्यंत मला तुमचा आदर आहे तुमच्याविषयी चांगुलपणा आहे व त्यामुळेच माझा जीव तुमच्या पायाकडे ओढ घेत आहे. आम्ही अज्ञानी आहोत त्यामुळे आम्ही तुम्हाला प्रेम शब्दाने आळवित आहोत आणि रसभरीत शब्द रत्नांनी तुमच्याशी गप्पा मारत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात हे विठाई तू आमचा लळा पाळ तू तुमच्यात व आमच्यात भेद का उरु दिला.
अभंग क्र. १३४९
नको माझे मानू आहाच ते शब्द । कळवळ्याचा वाद करीतसे ॥१॥
कासयाने बळ करू पायापाशी । भाकावी ते दासी करुणा आह्मी ॥धृपद॥
काय मज चाड असे या लौकिके । परी असे निके अनुभवाचे ॥२॥
लांचावल्यासाठी वचनाची आळी । टकळ्याने घोळी जवळी मन ॥३॥
वाटतसे आस पुरविसी ऐसे । तरि अंगी पिसे लावियेले ॥४॥
तुका म्हणे माझी येथेंचि आवडी । श्रीमुखाची जोडी इच्छीतसे ॥५॥
अर्थ
देवा मी तुझ्याशी जे काही बोलत आहे ते माझे शब्द पोकळ मानू नकोस. मी मी तुझ्याशी अतिशय कळवळ्याने बोलत आहे. देव मी कशाच्या बळावर तुमच्या पायाला घट्ट धरू. आम्ही दासांनी फक्त तुझी करूणा भाकावी एवढेच. देवा मला लौकीकाची आवड आहे काय ? परंतु मला तुझा अनुभव यावा एवढी इच्छा आहे. देवा मला तुझ्या शी बोलता यावे तुझा अनुभव घ्यावा याची इच्छा आहे व त्यामुळेच माझे मन तुझ्याजवळ घोळत आहे गिरक्या घेत आहे. देवा मला पूर्ण खात्री आहे की तू माझी इच्छा पूर्ण करशील त्यामुळेच मी माझ्या मनाला तुझे वेड लावून घेतले आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला या श्रीहरीचे श्रीमुख दिसावे आणि ते पाहण्याची इच्छा झालेली.
अभंग क्र. १३५०
जन्मा आलीयाचा लाभ । पद्मनाभ दरुषणे ॥१॥
म्हणउनि लवलाहे । पाय आहे चिंतीत ॥धृपद॥
पाठीलागा येतो काळ । तू कृपाळु माउली ॥२॥
बहु उसंतीत आलो । तया भ्यालो स्थळासी ॥३॥
कोण्या उपाये हे घडे । भव आंगडे सुटकेचे ॥४॥
तुका म्हणे तू जननी । ये निर्वाणी विठ्ठले ॥५॥
अर्थ
मनुष्य जन्माला आल्याचा लाभ कोणता असेल तर पद्मनाभा चे दर्शन होणे हाच. म्हणून मी पद्मनाभा च्या पायाचे चिंतन करीत आहे. हा काळ पाठीमागे लागला आहे पण तु माझी कृपाळू माऊली आहेस त्यामुळे तुला माझी सर्व चिंता आहे. मी खूप वेळाने येथे आलो आहे. मी या यमलोकीच्या स्थळा लाभलो आहे. या भवसागरातून माझी सुटका केव्हा होईल हे काही मला कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला तू माझी जननी आहेस, आई आहेस त्यामुळे मला या दुःखातून सोडवण्यास लवकर ये, धावत ये.
अभंग क्र. १३५१
जेणे वाढे अपकीर्ती । सर्वार्थी ते वर्जावे ॥१॥
सत्य रुचे भलेपण । वचन ते जगासी ॥धृपद॥
होइजेते शूर त्यागे । वाउगे ते सारावे ॥२॥
तुका म्हणे खोटे वर्म । निंद्यकर्म काळिमा ॥३॥
अर्थ
जेणे अपकीर्ती वाढते त्याचा त्याग करावा. जगाला नेहमी भले पणाने वागणे, खरे वागणे हेच आवडते तर नेहमी खरे वागून, खरे बोलून खरा शूर व्हावे. तुकाराम महाराज म्हणतात निंद्य वागणे, खोटे वागणे हेच आपल्या प्रतिमेला काळे फासण्याचे वर्म आहे.
अभंग क्र. १३५२
याची सवे लागली जीवा । गोडी हेवा संगाचा ॥१॥
परते न सरवे दुरी । क्षण हरीपासूनि ॥धृपद॥
जाले तरी काय तंट । आता चट न संडे ॥२॥
तुका म्हणे चक्रचाळे । वेड बळे लाविले ॥३॥
अर्थ
मला हरीची गोडी लागली आहे त्यामुळे मला त्याची संगती हवी अशी मनापासून इच्छा आहे. एक क्षण देखील हारी पासून परत यावे किंवा त्याच्यापासून दूर जावे असे मला वाटत नाही. आता हरी बरोबर कितीही भांडणे होवो, तंटा होवो, आता याचा लोकांमध्ये बोभाटा झाला तरी चालेल पण मला हरीच्या संगतीची जी चटक लागली आहे ती काही केल्या सुटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात चक्राला एकदा की गती दिली की ती थांबत नाही त्याप्रमाणे देवाने त्याच्या गुणाने आम्हाला वेड लावून टाकले आहे.
अभंग क्र. १३५३
याचा तव हाचि मोळा । देखिला डोळा उदंड ॥१॥
नेदी मग फिरो मागे । अंगा अंग संचरे ॥धृपद॥
का गा याची नेणा खोडी । जीभा जोडी करितसे ॥२॥
पाघरे ते बहु काळे । घोंगडे ही ठायीचे ॥३॥
अंगी वसेचि ना लाज । न म्हणे भाज कोणाची ॥४॥
सर्वसाक्षी अबोल्याने । दुश्चिंत कोणे नसावे ॥५॥
तुका म्हणे धरिला हाती । मग निश्चिंती हरीने ॥६॥
अर्थ
मी पुष्कळ वेळा डोळ्याने पाहिले आहे की हरी हीच एक सवय आहे. जो कोणी याची श्रद्धायुक्त भक्ती करतो त्याला तो संसाराकडे परत मागे फिरून येत नाही आणि त्याच्या अंगांमध्ये संचार करतो. हरीची आणखी एक खोड आहेत ती म्हणजे याचे नांव घेतले कि जिभेला मोठा लाभ होतो. हे तुम्हाला माहीत आहे काय. हा हरी नेहमी काळया रंगाची घोंगडी पाघरतो आणि ती घोंगडी म्हणजे त्याचा कृष्णवर्ण देह आहे. याला कसलीही लाज वाटत नाही आणि समोर कोणाचीतरी बायको आहे याचाही तो विचार करत नाही. हरी अबोला आहे सर्व साक्षी आहे त्यामुळे त्यांच्याविषयी कोणीही उदासीन असू नये व सर्वानी याचे भजन करावे. तुकाराम महाराज म्हणतात या हरीने एकदा की त्याच्या हाताला भक्तला धरले तर तो भक्त निश्चिंतच होतो.
अभंग क्र. १३५४
प्रसिद्ध हा असे जगा । अवघ्या रंगारंगाचा ॥१॥
तरी वाटा न वजे कोणी । नारायणी घरबुडी ॥धृपद॥
बहुता ऐसे केले मागे । लाग लागे लागेना ॥२॥
हो का नर अथवा नारी । लाहान थोरी आदर ॥३॥
जाले वेगळे लोकी पुरे । मग नुरे समूळ ॥४॥
कळेना तो आहे कैसा । कोणी दिशा बहु थोडा ॥५॥
तुका म्हणे दुसऱ्या भावे । छाया नावे न देखवे ॥६॥
अर्थ
हरीची जगामध्ये अशी कीर्ती आहे की जगात जेवढे नाम, रूप, रंग आहे ते सर्व याचेच आहे. हाच त्यांच्यामध्ये व ते सर्व याच्यामध्ये आहे. नारायणाच्या मागेच जो जातो त्याचे घर बुडते. नारायणाच्या मागे पूर्वी अनेक भक्त गेले आहे त्याचे ध्यान करून ते त्याच्या स्वरूपाला प्राप्त झाले, त्यांचा परत मागमूसही लागला नाही. मग ते पुरुष असो अथवा नारी असो लहान असो किंवा मोठे असो एकदा की भक्त लौकीकातून बाजूला निघाला तो भक्त की एकदा हरी च्या स्वरुपात लीन झाला मग त्याची अविद्य समूळ नाहीशी होते. नारायण कसा आहे हे कोणालाच माहीत नाही, कोणत्या दिशेला आहे हेही माहीत नाही, लहान आहे की मोठा आहे हे देखील कोणालाच माहीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जर द्वैतरूपाने पाहिले तर छायाही शरीरापेक्षा वेगळे असते.
अभंग क्र. १३५५
न संडावा आता ऐसा वाटे ठाव । भयासी उपाव रक्षणाचा ॥१॥
म्हणऊनि मने वळियेले मन । कारियाकारण चाड नाही ॥धृपद॥
नाणावी उपाधि करूनिया मूळ । राखता विटाळ तेचि व्हावे ॥२॥
तुका म्हणे येथे न वेचे वचन । निजी निजखूण सांपडली ॥३॥
अर्थ
हरिचरण व रूप आता कधी सोडूच नये असे मला वाटते कारण सर्व भयापासून रक्षण यात ठीकाणी होते. म्हणूनच मी माझे मन हरी कडे वळविले आहे आता मला कार्य करण्याची आवडच राहिली नाही. प्रपंच हा उपाधी मुलुख आहे त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करावे आणि लक्ष दिलेच तर आपणही उपाधी रूप होऊन जाऊ. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळेच मी प्रपंचाविषयी जास्त काही बोलत नाही व बोलूही वाटत नाही कारण मला आत्मसुखाचे वर्म सापडले आहे.
अभंग क्र. १३५६
सत्तेचे भोजन समयी आतुडे । सेवन ही घडे रुचिनेसी ॥१॥
वर्मेंभ्रम नेला जाले एकमय । हृदयस्थी सोय संग झाला ॥धृपद॥
कोथळीस जमा पडिले संचित । मापल्याचा वित्त नेम झाला ॥२॥
तुका म्हणे धणी ऐसा झालो आता । करीन ते सत्ता माझी आहे ॥३॥
अर्थ
जर आपल्या सत्तेचे म्हणजे स्वतः चे भोजन असेल तर ते आपल्याला केव्हाही जेव्हा आपल्याला भूक लागेल तेव्हा सेवन करता येते आणि ते भोजन आपण आवडीने सेवन करतो. तसेच मला परमार्थाचे मुख्य वर्म समजले आहे व त्यामुळे संसाराचा भ्रम नाहीसा झाला आहे हृदयस्थ राहणारा जो हरी आहे त्याचा संग मला झाला आहे. हरीच्या कोथळी मध्ये माझे संचित कर्म जमा आहे आता तेवढे प्रारब्ध कर्म नियमा प्रमाणे भोगायचे राहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी आता इतका समर्थ झालो आहे की मी जे म्हणेल ते होऊ शकते.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















