आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१३ एप्रिल, दिवस १०३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी २५१ ते २७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १२२५ ते १२३६
“१३ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 1 Apirl
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १३ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १२२५ ते १२३६ चे पारायण आपण करणार आहोत.
१३ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी २५१ ते २७५,
251-9
का शाखा सानिया थोरा । परि आहाति एकाचिये तरुवरा । बहु रश्मि परि दिनकरा । एकाचे जेवी ॥251॥
किंवा फांद्या जरी लहानमोठ्या असल्या तरी त्या एकाच झाडाच्या असतात, अथवा पुष्कळ किरणे दृष्टीस पडली तरी ती जशी एकाच सुर्यापासून निघालेली असतात;
252-9
तेवि नानाविधा व्यक्ती । आनाने नामे आनाना वृत्ती । ऐसे जाणती भेदला भूती । अभेदा माते ॥252॥
त्याप्रमाणे अनेक व्यक्ति असून जरी त्यांची नावे व स्वभाव पुष्कळ आहेत, तरी भूतांमध्ये माझे ऐक्य आहे असे जाणतात.
253-9
येणे वेगळालेपणे पांडवा । करिती ज्ञानयज्ञु बरवा । जे न भेदती जाणिवा । जाणते म्हणउनि ॥253॥
हे पांडवा, अशा रीतीने सर्व भूते वेगळी आहेत असे जाणून जे उत्तम असा ज्ञानयज्ञ करतात, व जे जाणते असल्यामुळे त्यांच्या ज्ञानाच्या ठिकाणी भिन्न भाव उरत नाही;
254-9
ना तरी जेधवा जिये ठायी । देखती का जे जे काही । ते मीवाचूनि नाही । ऐसाचि बोधु ॥254॥
किंवा जेव्हा ज्या ठिकाणी ते जी जी वस्तु पाहतात, त्यात माझ्यावाचून दुसरे काही नाही असा ज्यांच्या मनाचा निश्चय असतो;
255-9
पाहे पा बुडबुडा जेउता जाये । तेउते जळचि एक तया आहे । मग विरे अथवा राहे । तऱ्ही जळाचिमाजि ॥255॥
हे पहा, पाण्यावरील बुडबुडा जिकडे जातो, तिकडे पाणी म्हणून त्याला एकच आहे, मग तो नाहीसा झाला अथवा राहिला तरी तो पाण्यातच असतो; .
256-9
का पवने परमाणु उचलले । ते पृथ्वीपणावेगळे नाही गेले । आणि माघौते जरी पडले । तरी पृथ्वीचिवरी ॥256॥
किंवा वाऱ्याने मातीचे कण उंच उडाले, तरी त्यांना काही पृथ्वीपणावेगळे केले नाही, आणि पुनः जरी ते खाली पडले, तरी ते पृथ्वीवरच;
257-9
तैसे भलतेथ भलतेणे भावे । भलतेही न हो अथवा होआवे । परि ते मी ऐसे आघवे । होऊनि ठेले ॥257॥
त्याचप्रमाणे, पाहिजे तेथे पाहिजे त्या भावनेने पाहिजेल ते होवो, परंतु ते सर्व ‘ मीच आहे ‘ अशी ज्यांचे मनाची वृत्ति होऊन गेली आहे;
258-9
अगा हे जेव्हडी माझी व्याप्ति । तेव्हडीचि तयांचि प्रतीति । ऐसे बहुधाकारी वर्तती । बहुचि होउनि 258॥
अर्जुना, माझी जेवढी व्याप्ति आहे तेवढा त्यांचा अनुभव आहे; आणि याप्रमाणे पुष्कळ व्यक्तींत जरी ते वागले, तरी ते मद्रूपच झालेले असतात.
259-9
हे भानुबिंब आवडे तया । सन्मुख जैसे धनंजया । तैसे ते विश्वा इया । समोर सदा ॥259॥
हे धनंजया, सुर्यबिंब पाहिजे त्याने पाहिले असता त्याच्यासमोरच ते दिसते, त्याप्रमाणे ते ज्ञानी नेहमी जगाच्या समोरच असतात;
260-9
अगा तयांचिया ज्ञाना । पाठी पोट नाही अर्जुना । वायु जैसा गगना । सर्वांगी असे ॥260॥
अर्जुना, त्यांच्या ज्ञानाला आंतबाहेर असा भेद नाही. ज्याप्रमाणे वायु हा आकाशात सर्वत्र भरलेला आहे;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
261-9
तैसा मी जेतुला आघवा । तेचि तुक तयांचिया सद्भावा । तरी न करिता पांडवा । भजन जहाले ॥261॥
त्याप्रमाणे; मी जेवढा संपुर्ण आहे, तेवढा त्यांच्या सद्भावाच्या मापास उतरतो, म्हणून हे पांडवा, त्यांनी भजन न करिता माझे भजन केल्याप्रमाणे होते.
262-9
एऱ्हवी तरी सकळ मीचि आहे । तरी कवणी के उपासिला नोहे । एथ एके जाणणेवीण ठाये । अप्राप्तासी ॥262॥
एरव्ही तरी मी सर्वत्र भरलेला आहे; परंतु माझी कोण व कोठे उपासना करीत नाहीत ? परंतु एक पूर्ण ज्ञानाशिवाय अज्ञानी जनाला माझी प्राप्ति होत नाही. .
263-9
परि ते असो येणे उचिते । ज्ञानयज्ञे यजितसांते । उपासिती माते । ते सांगितले ॥263॥
परंतु हे असो; या योग्य ज्ञानयज्ञाने यज्ञ करून जे माझी उपासना करतात; ते भक्त तुला सांगितले. .
264-9
अखंड सकळ हे सकळा मुखी । सहज अर्पत असे मज एकी । की नेणणेयासाठी मूर्खी । पविजेचि माते ॥264॥
सदासर्वकाली जी जी कर्मे होतात, ती सर्व बाजूंनी मला सहज पावतात, परंतू हे मुर्खांना समजत नसल्यामुळे मी त्यांना प्राप्त होत नाही.
अहं क्रतुरहं यज्ञ: स्वधाहमहमौषधम् ।
मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम् ॥9. 16॥
265-9
तोचि जाणिवेचा जरी उदय होये । तरी मुदल वेदु मीचि आहे । आणि तो विधानाते जया विये । तो क्रतुही मीचि ॥265॥
तेच ज्ञान झाले असता, मुख्य वेद मीच आहे, त्यात विधि-अनुष्ठान जे सांगितले आहे तो ऋतुही मीच.
266-9
मग तया कर्मापासूनि बरवा । जो सांगोपांगु आघवा । यज्ञु प्रगटे पांडवा । तोही मी गा ॥266॥
मग हे पांडवा, त्या यज्ञविधानापासून प्रकट होणारा जो यथाविधि यज्ञ, तोही मीच आहे
267-9
स्वाहा मी स्वधा । सोमादि औषधी विविधा । आज्य मी समिधा । मंत्रु मी हवि ॥267॥
देवांस हवि देण्याचा मंत्र मी, पितरांसही हवि देण्याचा मंत्र मी, सोमवल्ली वैगेरे नानाप्रकारच्या औषधि मी,
268-9
होता मी हवन कीजे । तेथ अग्नि तो स्वरुप माझे । आणि हुतके वस्तू जे जे । तेही मीचि ॥268॥
धृत मी, समिधा मी, मंत्र मी, होमद्रव्य मी, ऋत्विज मी, ज्यात हवन करावयाचे तो अग्निही माझे स्वरुप आहे, आणि अग्नीत हवन करण्याचा ज्या ज्या वस्तु, त्याही मीच आहे.
पिताहमस्य जगतो माता धाता पितामह: ।
वेद्यं पवित्रमोंकार ऋक्साम यजुरेव च ॥9. 17॥
269-9
पै जयाचेनि अंगेसंगे । इये प्रकृतीस्तव अष्टांगे । जन्म पाविजत असे जगे । तो पिता मी गा ॥269॥
हे पहा, ज्याच्या अंगसंगाने अष्टांग-प्रकृति ही जगास प्रसवते, तो जगत्पिता मी
270-9
अर्धनारीनटेश्वरी । जो पुरुष तोचि नारी । तेवि मी चराचरी । माताही होय ॥270॥
अर्धनारीनटेश्वर स्वरूपात ज्याप्रमाणे पुरुष तोच स्त्री व स्त्री तोच पुरुष असतो, त्याप्रमाणे स्थावरजंगमाची माताही मी;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
271-9
आणि जाहाले जग जेथ राहे । जेणे जीवित वाढत आहे । ते मीचि वाचूनि नोहे । आन निरुते ॥271॥
आणि उत्पन्न झालेले जग ज्या ठिकाणी राहते, व ज्याच्या योगाने प्राणिमात्राचे रक्षण होते ते निःसंशय माझ्याशिवाय होत नाही.
272-9
इये प्रकृतिपुरुषे दोन्ही । उपजली जयाचिया अमनमनी । तो पितामह त्रिभुवनी । विश्वाचा मी ॥272॥
प्रकृति व पुरुष ही दोन्ही ज्याच्या अंतःकरपाधिरहित स्वरूपात म्हणजे निर्गुणात उत्पन्न होतात, तो या विश्वाचा आजा त्रिभुवनात मीच.
273-9
आणि आघवेया जाणणेयाचिया वाटाणो । जया गावा येती गा सुभटा । वेदांचिया चोहटा । वेद्य जे म्हणिजे ॥273॥
अर्जुना, सर्व ज्ञानाच्या वाटा ज्या गावात येऊन मिळतात, व चारी वेदांच्या चव्हाट्यावर ज्याला वेद्य असे म्हणतात.
274-9
जेथ नाना मता बुझावणी आली । एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली । चुकली ज्ञाने जेथ मिळो जाहली । जे पवित्र म्हणिजे ॥274॥
ज्या ठिकाणी पुष्कळ प्रकारची मते ऐक्यतेस आली, शास्त्रांची एकमेकांशी ओळख झाली; व चुकलेली ज्ञाने जेथे एकत्र मिळाली, असे जे स्थान, त्याला पवित्र असे म्हणतात.
275-9
पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरु । घोषध्वनी नादाकारु । तयांचे गा भवन जो ॐकारु । तोही मी गा ॥275॥
हे पहा, ब्रह्मबीजाला परा, पश्यंती, मध्यमा आणी वैखरी या चार वाचा हेच अंकुर फुटल्यावर, त्यांचे मंदीर जो ॐकार, तोही मीच होय.
दिवस १०३ वा, १३, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १२२५ ते १२३६
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. १२२५
तुझ्या नामाची आवडी । आम्ही विठो तुझी वेडी ॥१॥
आता न वजो अणिका ठाया । गाऊ गीत लागो पाया ॥धृपद॥
काय वैकुंठ बापुडे । तुझ्या प्रेमासुखापुढे ॥२॥
संतसमागममेळ । प्रेमसुखाचा सुकाळ ॥३॥
तुका म्हणे तुझ्या पायी । जन्ममरणा ठाव नाही ॥४॥
अर्थ
हे विठ्ठला आम्हाला तुझ्या नामाची इतकी आवड लागली आहे की तुझ्या नामात आम्ही वेडे झालेलो आहोत. त्यामुळे हे विठ्ठला आता आम्ही कोणीही कोठेही जाणार नाही. तुझ्या पायाला आम्ही लागणार आहोत. देवा तुझ्या प्रेम सुखापुढे हे बिचारे वैकुंठ तरी काय आहे. संतांच्या संगती मध्ये, प्रेमामध्ये प्रेम सुखाचा काळ असतो. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या चरणांच्या ठिकाणी जन्म मरणाला काहीच ठाव नाही.
अभंग क्र. १२२६
साकरेच्या योगे वर्ख । राजा कागदाते देखे ॥१॥
तैसे आम्हा मानुसपण । रामनाम केण्यागुणे ॥धृपद॥
फिरंगीच्या योगे करी । राजा काष्ठ हाती धरी ॥२॥
रत्नकनका योगे लाख । कंठी धरिती श्रीमंत लोक ॥३॥
देवा देवपाट । देव्हार्यावरी बैसे स्पष्ट ॥४॥
ब्रह्मानंदयोगे तुका । पढीयंता जनलोका ॥५॥
अर्थ
मिठाईचे वर लावलेला कागदाला म्हणजे वखराला राजा कशासाठी घेईल पण मिठाईच्या कारणामुळे तो कागद राजा बघत असतो. अगदी तसेच आम्ही रामाचे नांव घेतो त्यामुळे आम्हाला मोठेपणा आलेला आहे. तलवारीच्या कारणामुळे ज्या लाकडामध्ये तलवार आहे त्या लाकडाला राजा हातात धरतो. रत्न सोने हे ज्या लाखेत ओवलेले असतात त्या लाखेला किंमत नसते परंतु रत्न सोने गळ्यात घालण्याकरता श्रीमंत लोक त्या लाखेला गळ्यात घालतात. देवासाठी केलेला पाट हा देव घरामध्ये देवाच्या आधी उघडपणे जाऊन बसतो. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे ब्रम्हानंदाचा अनुभव माझ्या अंगी आहे त्या योगाने लोक मला किंमत देतात मला मानतात, नाहीतर मला कोणी विचारले नसते.
अभंग क्र. १२२७
धनवंतालागी । सर्वमान्यता हे जगी ॥१॥
माता पिता बंधु जन । सर्व मानिती वचन ॥धृपद॥
जव चाले मोठा धंदा । तव बहिण म्हणे दादा ॥२॥
सदा शृंगारभूषणे । कांता लवे बहुमाने ॥३॥
तुका म्हणे धन । भाग्य अशाश्वत जाण ॥४॥
अर्थ
धनवंत लोकांना सर्व जगात मान्यता आहे. माता पिता बंधू सर्व लोक त्याचेच ऐकतात. जोपर्यंत धंदा मोठ्या प्रमाणात चालतो तोपर्यंत बहीण भावाला दादा दादा म्हणते. बायकोला जर शृंगार भूषणे दिले तर ती नवऱ्याच्या पुढे आदराने लवते त्याला बहुमान देते. तुकाराम महाराज म्हणतात धन आणि धनामुळे प्राप्त झालेले भाग्य हे दोन्ही न टिकणारे आहे.
अभंग क्र. १२२८
न विचारिता ठायाठाव । काय भुंके तो गाढव ॥१॥
केला तैसा लाहे दंड । खळ अविचारी लंड ॥धृपद॥
करावे लाताळे । ऐसे नेणे कोण्या काळे ॥२॥
न कळे उचित । तुका म्हणे नीत हित ॥३॥
अर्थ
कोणताही विचार न करता वेळ प्रसंग न जाणता जो कोठेही नुसता बडबड करतो तो म्हणजे एक प्रकारचा कर्कश ओरडणारा गाढवच होय. असा मनुष्य अविचारी लंड म्हणजे अधम आहे तो जसे कर्म करतो तसेच त्याला शिक्षाही होत असते. गाढवाला जसे कोठे ही लाथ मारण्याची सवय असते कोठे लाथ मारावी हे देखील त्याला समजत नाही त्याप्रमाणे मूर्ख माणसांचे वर्तन असते. तुकाराम महाराज म्हणतात अशा मुर्खांना उचित काय आहे ते कळत नाही, धर्म नीती काय आहे ते कळत नाही, आपले हित कशात आहे हे देखिल कळत नाही.
अभंग क्र. १२२९
कंठी नामसिक्का । आता कळिकाळासी धक्का ॥१॥
रोखा माना की सिक्का माना । रोखा सिक्का तत्समाना ॥धृपद॥
रोखा न माना का सिक्का न माना । जतन करा नाक काना ॥२॥
सिक्का न मानी रावण । त्याचे केले निसंतान ॥३॥
सिक्का मानी हळाहळ । जाले सर्वांगी शीतळ ॥४॥
तुका म्हणे नाम सिक्का । पटी बैसविले निजसुखा ॥५॥
अर्थ
माझ्या कंठामध्ये आता हरिनामाचा शिक्का आहे त्यामुळे मी कळीकाळाला ही धक्का देण्याचे सामर्थ्य बाळगतो. हे लोकांनो तुम्ही वेद रुपी रोखा माना किंवा हरिनाम रुपी शिक्का माना हे दोन्ही सारखेच आहे आणि नाम हे दोन्ही सारख्याच पात्रतेची आहेत. जर तुम्ही दोघाना मानले नाही तर तुमचे यमदूत नाक कापून नेईल त्यामुळे त्यांचे जतन करण्यासाठी वेद रुपी रोखा आणि नामरूपी शिक्का हे दोन्ही माना. रावणाने रामरुपी शिक्का मानला नाही तर देवाने त्याला निर्वंश केले. भगवान शंकराने देखिला हा नाम रुपी शिक्का त्याच्या कंठात धारण केला आहे त्यामुळे हलाहल विष पिऊन देखील त्यांचे सर्वांग शितल झाले. तुकाराम महाराज म्हणतात मी हि नामरूपी शिक्का माझ्या कंठात धारण केलेला आहे त्यामुळे मी नीज सुखाच्या राज्यावर बसलोय.
अभंग क्र. १२३०
भूती देव म्हणोनि भेटतो या जना । नाही हे भावना नरनारी ॥१॥
जाणे भाव पांडुरंग अंतरीचा । नलगे द्यावा साचा परिहार ॥धृपद॥
दयेसाठी केला उपाधिपसारा । जड जीवा तारा नांव कथा ॥२॥
तुका म्हणे नाही पडत उपवास । फिरतसे आस धरोनिया ॥३॥
अर्थ
सर्वत्र देव आहे असे समजूनच मी सर्वाना आलिंगन देतो स्त्री पुरुष ही भावनाच माझ्या मध्ये नाही. माझ्या अंतरंगातील सर्वकाही पांडुरंग जाणतो आहे त्यामुळे यासंबंधी अधिक काही बोलण्याची मला गरज वाटत नाही. जड जीवांना तारण्याकरता हरिकथा ही योग्य नौका आहे आणि मला जड जीवांची दया येते त्यामुळे मी हरिकथा करतो व त्यासाठीच मी हरी कथा करण्याची उपाधी आणि पसारा घातलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात घरी खाण्यास मला अन्न नाही की काय म्हणून मी उपवास करतो, मला काहीतरी मिळेना या आशेने हरिकथा करत सगळीकडे मी फिरत आहे असे तुम्हाला वाटते काय, तर तसे नाही जड जीवाचा उद्धार व्हावा याकरिता मी फिरतोय.
अभंग क्र. १२३१
हारपल्याची नका चित्ती । धरू खंती वायांचं ॥१॥
पावले ते म्हणा देवा । सहज सेवा या नावे ॥धृपद॥
होणार ते ते भोगे घडे । लाभ जोडे संकल्पे ॥२॥
तुका म्हणे मोकळे मन । अवघे पुण्य या नावे ॥३॥
अर्थ
एखादी वस्तू जर हरवली तर त्याविषयी खंत मानु नका. एखादी वस्तू जर हरवली तर देवाला अर्पण केले असे म्हणा त्यामुळे तुम्हाला देवाची सहजच सेवा घडते. जसे भाग्यात, नशिबात आहे ते घडतेच पण जर एखादी वस्तू हरवली आणि तुम्ही देवाला समर्पण केल्याचा संकल्प केला तर त्या योगाने तुम्हाला मोठा लाभ होतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्या वेळी आपले मन मोकळे असते त्या वेळी आपल्या कडून आपोआप पूण्य कर्म घडत असते.
अभंग क्र. १२३२
नेसणे आले होते गळ्या । लोक रळ्या करिती ॥१॥
आपणिया सावरीले । जग भले आपण ॥धृपद॥
संबंध तो तुटला येणे । जागेपणे चेष्टाचा ॥२॥
भलती सेवा होती अंगे । बारस वेगे पडिले ॥३॥
सावरीले नीट वोजा । दृष्टिलाजा पुढिलांच्या ॥४॥
बरे उघडिले डोळे । हळहळे पासूनि ॥५॥
तुका म्हणे विटंबना । नारायणा चुकली ॥६॥
अर्थ
नेसलेले धोतर फिटत असेल म्हणून हळूहळू वर घेत घेत गळ्यापर्यंत आले तर ते वेगळेच काहीतरी हास्यास्पद दिसते. त्यामुळे लोक आपली चेष्टा करतात. जर तेच धोतर वेळेत आपण व्यवस्थित सावरले तर मग कोणीही आपली चेष्टा करणार नाही मग जगही भले आणि आपणही भले. आपण जर नेहमी सावध राहिलो तर चेष्टेचा विषय तुटतो. आपल्या अंगी जर भलतेच सवयी असतील तर आपण चेष्टेचा भाग होतो. आपण जर व्यवस्थित वस्र, धोतर सावरले तर पुढच्या लोकांची लाज आपल्याला वाटणार नाही. लोक देखील माझी अशीच चेष्टा करत होते बरे झाले आता माझे डोळे उघडले मी आता गबाळ्या माणसांप्रमाणे संसारात राहून चेष्टेचा भाग झालो होतो परंतु मी आता परमार्था लागलो आहे, मी लवकरच माझी सावरासावर केली आहे त्यामुळे लोकांच्या चेष्टे पासून मी मोकळा झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा बरे झाले आता माझी विटंबना चुकली कारण मी परमार्थाला लागलो त्यामुळे लोक आणि माझा देहभाव याचा मला विसर पडला आहे.
अभंग क्र. १२३३
जिव्हा जाणे फिके मधुर की क्षार । येर मास पर हातास न वळे ॥१॥
देखावे नेत्री बोलावे मुखे । चित्ता सुखदुःखे कळो येती ॥धृपद॥
परिमळासी घ्राण ऐकती श्रवण । एकाचे कारण एका नव्हे ॥२॥
एकदेही भिन्न ठेवियेल्या कळा । नाचवी पुतळा सूत्रधारी ॥३॥
तुका म्हणे ऐशी जयाची सत्ता । का तया अनंता विसरलेती ॥४॥
अर्थ
एखाद्या पदार्थाची चव फिकी, गोड आहे की खारट हे फक्त जिभेलाच कळते जिभेला मांस आहे तसेच इतर अवयवांना ही मांस आहे, पण जर हाताला विचारले तर हातांनाच पदार्थांची चव सांगता येणार नाही. जसे नेत्राला दिसते, मुखाला बोलता येते आणि चित्तालाच सुखदुःख समजते, नाकाने वास घेता येतो आणि कानाने ऐकता येते याप्रमाणे एका इंद्रियाने होणारे ज्ञान दुसऱ्या इंद्रियाला होत नाही. देवाने एका देहाच्या ठिकाणी भिन्न भिन्न धर्म ठेवले आहेत आणि सर्वाची सूत्र हातात धरून या देहाला नाचवीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात एवढी ज्याची सत्ता आहे त्या अनंताला तुम्ही का विसरता ?
अभंग क्र. १२३४
न लगे द्यावा जीव सहज चि जाणार । आहे तो विचार जाणा काही ॥१॥
मरण जो मागे गाढवाचा बाळ । बोलिजे चांडाळ शुद्ध त्यासी ॥२॥
तुका म्हणे कई होईल स्वहित । निधान जो थीत टाकु पाहे ॥३॥
अर्थ
मुद्दाम जीव देण्याची गरज नाही तो एक दिवस जाणारच आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. जो देवाजवळ मरण मागतो तो गाढवाचा बाळ आहे, एवढेच नाही तर तो शुद्ध चांडाळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात की जो देवाला मरण मागतो त्याला हे कसे कळत नाही की देहरूपी अमूल्य ठेवा जर तो राहिलाच नाही तर मेल्यानंतर काहीही आपले हित होणार नाही उलट जिवंत राहून संत सेवा घडेल हरिभक्ती होईल.
अभंग क्र. १२३५
मोल वेचूनिया धुंडिती सेवका । आम्ही तरी फुका मागो बळे ॥१॥
नसता जवळी हित फार करू । जीव भाव धरू तुझ्या पायी ॥धृपद॥
नेदू भोग आम्ही आपुल्या शरीरा । तुम्हासी दातारा व्हावे म्हणून ॥२॥
कीर्ती तुझी करू आमुचे सायास । तू का रे उदास पांडुरंगा ॥३॥
तुका म्हणे तुज काय मागो आम्ही । फुकाचे का नाभी म्हणसी ना ॥४॥
अर्थ
देवा व्यवहारांमध्ये पैसे देऊनच चाकर म्हणजे नोकर ठेवण्यात येतो पण मी तर बळेच तुझा बिनपगारी चाकर झालो आहे. तरीही तू मला तुझा चाकर करून घेत नाही हे आश्चर्यच आहे ना. देवा तू आममच्याजवळ जरी नसलास तरी आम्ही तुझ्या पायाच्या ठिकाणी आमचा भक्तिभाव ठेवू आणि आमचे पुष्कळ हीत करून घेऊ. हे दातारा आम्ही कोणत्याही प्रकारचे भोग भोगणार नाही कारण तुम्हाला सर्व भोगता यावे म्हणूनच. अरे पांडुरंगा आम्ही खूप कष्ट करून तुझी कीर्ती वाढवू पण तू आमच्याविषयी असा उदास का आहेस हे काही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात अरे आम्ही तुला असे काय मागत आहोत कि, तू तुझ्या मुखाने फक्त फुकटचे दोन शब्द “भिऊ नकोस” एवढेही उच्चार करत नाहीस.
अभंग क्र. १२३६
काय लवणकणिकेविण । एके क्षीण सागर ॥१॥
मा हे येवढी अडचण । नारायणी मजविण ॥धृपद॥
कुबेर अट्टाहासे जोडी । काय कवडी कारणे ॥२॥
तुका म्हणे काचमणी । कोण गणी भांडारी ॥३॥
अर्थ
जर समुद्रात मिठाचा एक खडा कमी पडला तर समुद्राला काही कमीपणा येणार आहे काय ? तसेच नारायणाच्या व्यापक स्वरूपाला माझ्यावाचून काही अडचण येणार आहे काय ? कुबेर अट्टाहासाने धन जोडतो पण त्यातील एका कवडिला काहीच किंमत नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात रत्नांचा भांडारामध्ये काचेच्या मण्याला काय किंमत आहे त्याप्रमाणे देवाच्या जवळ माझी काय किंत आहे, तो परिपूर्ण आहे मी त्याच्यावाचून अपूर्ण आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















