१ नोव्हेंबर, दिवस ३०५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ४०१ ते ४२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३६४९ ते ३६६०

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 1 November
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३६४९ ते ३६६० चे पारायण आपण करणार आहोत.
१ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ४०१ ते ४२५,

401-18
परी कर्मी असोनि कर्मे । जो नावरे समें=विषमे । चर्मचक्षूंचेनि चामे । दृष्टि जैसी ॥401॥
परंतु कर्म करीत असून जो कर्माच्या वाईट अथवा चांगल्या परिणामाने लिप्त होत नाही, जशी चर्मचक्षूंच्या चर्माने खरी दृष्टी लोपत नाही; 401
402-18
तैसा सोडवला जो आहे । तयाचे रूप आता पाहे । उपपत्तीची बाहे । उभऊनि सांगो ॥402॥
तसा तो कर्मातीत झाला आहे; त्याची लक्षणे तुला युक्तीने बाहू उभारुन सांगतो. 402
यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते ।
हत्वाऽपि स इमाण्ल्लोकान्न हन्ति न निबध्यते ॥18. 17॥

403-18
तरी अविद्येचिया निदा । विश्वस्वप्नाचा हा धांदा । भोगीत होता प्रबुद्धा । अनादि जो ॥403॥
तरीही प्रबुद्धा अर्जुना, जो अज्ञानाच्या निद्रेत विश्वरूपी स्वप्नाचा अनुभव पुष्कळ वर्षे घेत होता, 403
404-18
तो महावाक्याचेनि नांवे । गुरुकृपेचेनि थांवे । माथा हातु ठेविला नव्हे । थापटिला जैसा ॥404॥
तो ” तत्त्वमसि ” हे महावाक्य कानी पडून गुरुकृपेच्या बलाने मस्तकावर नुसता हात ठेवणे नव्हे, तर जसा थापटून जागा केला आहे, 404
405-18
तैसा विश्वस्वप्नेसी माया । नीद सांडूनि धनंजया । सहसा चेइला अद्वया- । नंदपणे जो ॥405॥
तसा अर्जुना, जगद्रुपी स्वप्न व अज्ञानरूपी निद्रा टाकून सहज निजस्वरूपाचे दर्शनाने जागा झाला, 405


406-18
तेव्हा मृगजळाचे पूर । दिसते एक निरंतर । हारपती का चंद्रकर । फांकता जैसे ॥406॥
तेव्हा चंद्र उगवल्यावर मृगजळाचे दिसणारे पुर आपोआप नाहीसे होतात
407-18
का बाळत्व निघोनि जाय । तै बागुला नाही त्राय । पै जळालिया इंधन न होय । इंधन जेवी ॥407॥
किंवा बाल्यदशा निघून गेल्यावर बागुलबुवाला जशी कोणी भीत नाही, किंवा लाकूड जळल्यावर त्यात जसा लाकूडपणा राहत नाही, 407
408-18
नाना चेवो आलिया पाठी । तै स्वप्न न दिसे दिठी । तैसी अहं ममता किरीटी । नुरेचि तया ॥408॥
अथवा जागृत झाल्यावर स्वप्ने दृष्टीस पडत नाही, तसा अर्जुना, त्याला मी व माझे हा अभिमान राहत नाही, 408
409-18
मग सूर्यु आंधारालागी । रिघो का भलते सुरंगी । परी तो तयाच्या भागी । नाहीचि जैसा ॥409॥
मग अंधार पाहण्याकरिता जरी सूर्य वाटेल त्या भुयारात शिरला, तरी तेथे जसा अंधार राहत नाही, 409
410-18
तैसा आत्मत्वे वेष्टिला होये । तो जया जया दृश्याते पाहे । ते दृष्य द्रष्टेपणेसी होत जाये । तयाचेचि रूप ॥410॥
तसा मी आत्मा आहे, अशी ज्याची पूर्ण समजूत झाली, तो ज्या वस्तूकडे पाहील ती वस्तू व त्याची दृष्टी ही त्याला आत्मरुपीच दिसतील. 410
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


411-18
जैसा वन्हि जया लागे । ते वन्हिचि जालिया आंगे । दाह्यदाहकविभागे । सांडिजे ते ॥411॥
अग्नि ज्या पदार्थास लागतो तो पदार्थ जसा अग्निरूप होतो व मग जसा दाह्य व दाहक हा भेद शिल्लक राहत नाही, 411
412-18
तैसा कर्माकारा दुजेया । तो कर्तेपणाचा आत्मया । आळु आला तो गेलिया । काही बाही जे उरे ॥412॥
तसे कर्माचे ठिकाणी द्वैत मानून ते कर्म करण्याचा आत्म्यावर आळ आलेला नाहीसा झाल्यावर जे काही उरते, 412
413-18
तिये आत्मस्थितीचा जो रावो । मग तो देही इये जाणेल ठावो ? । काय प्रलयांबूचा उन्नाहो । वोघु मानी ? ॥413॥
त्या आत्मस्थितीत राहणारा जो श्रेष्ठ पुरुष तो हा देह माझा आहे व मी देहाहून निराळा आहे असे मानेल काय ? हे पहा, प्रलयकाळी जलाची वृद्धी होऊन सर्व जलमय झाल्यावर त्यात लहान लहान ओघाला आपल्याहून निराळे ठेवीत नाही, 413
414-18
तैसी ते पूर्ण अहंता । काई देहपणे पंडुसुता । आवरे काई सविता । बिंबे धरिला ? ॥414॥
त्याप्रमाणे अर्जुना, ब्रह्माचे ठिकाणी अहंता उत्पन्न झाली असता म्हणजे ब्रह्मच मी आहे, असा आगाध बोध झाला असता तो ब्रह्मरूप झालेला अहंकार देहा पुरता कसा आवरला जाईल ? हे पहा सूर्याचे प्रतिबिंब धरल्याने सूर्य का आपल्या हाती लागणार आहे ? नाही. 414
415-18
पै मथूनि लोणी घेपे । ते मागुती ताकी घापे । तरी ते अलिप्तपणे सिंपे । तेणेसी काई ? ॥415॥
ताक घुसळून लोणी काढल्यावर ते पुन: ताकांत घातले तर ते पूर्वीप्रमाणे ताकाची एकरूप होईल का ? 415


416-18
नाना काष्ठौनि वीरेशा । वेगळा केलिया हुताशा । राहे काष्ठाचिया मांदुसा । कोंडलेपणे ? ॥416॥
अथवा हे वीरेशा, लाकडात स्वभावात:च गुप्त असलेला अग्नी घर्षणादि उपायाने प्रगट केल्यास तो लाकडाच्या पेटीत कोंडून ठेवल्यावर राहील का ? 416
417-18
का रात्रीचिया उदराआंतु । निघाला जो हा भास्वतु । तो रात्री ऐसी मातु । ऐके कायी ? ॥417॥
किंवा रात्रीच्या अंधारातून जो सूर्य बाहेर निघाला आहे, तो ” रात्र ” अशी गोष्ट कानांनी ऐकल तरी का ! 417
418-18
तैसे वेद्य वेदकपणेसी । पडिले का जयाचे ग्रासी । तया देह मी ऐसी । अहंता कैची ? ॥418॥
ज्याप्रमाणे जाणण्याची वस्तू व जाणणारा ही ज्याचे बोधांत नाहीशी झाली आहेत, त्याला मी देह आहे अथवा देहात आत्मा आहे, असा गर्व कुठून असणार ? 418
419-18
आणि आकाशे जेथे जेथुनी । जाइजे तेथ असे भरोनी । म्हणौनि ठेले कोंदोनी । आपेआप ॥419॥
आणि, आकाशाने जेथून ज्या ठिकाणी जावे, त्याठिकाणी ते भरलेले असल्यामुळे सहजच ते सर्व ठिकाणी व्याप्त आहे, 419
420-18
तैसे जे तेणे करावे । तो तेचि आहे स्वभावे । मा कोणे कर्मी वेष्टावे । कर्तेपणे ? ॥420॥
तसे तो जे जे करितो, ते आत्मस्वरूप आहे; मग कोणत्या क्रमाने तो आपलेकडे कर्तेपणा घेईल ? 420
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


421-18
नुरेचि गगनावीण ठावो । नोहेचि समुद्रा प्रवाहो । नुठीचि ध्रुवा जावो । तैसे जाहाले ॥421॥
गगनाशिवाय कोणतेही ठिकाण नाही, समुद्राला प्रवाह नाही व ध्रुव नक्षत्राला कुठेही जाता येत नाही, तशी या मनुष्याची स्थिती झाली आहे. 421
422-18
ऐसेनि अहंकृतिभावो । जयाचा बोधी जाहला वावो । तऱ्ही देहा जव निर्वाहो । तव आथी कर्मे ॥422॥
अशाप्रकारे ज्याला आत्मज्ञानाच्या योगे कर्माचा कर्तेपणाचा अभिमान बाधित म्हणजे मित्र आहे; तथापि त्याचा देह आहे, तोपर्यंत त्याच्याकडून करणे होणारच; 422
423-18
वारा जरी वाजोनि वोसरे । तरी तो डोल रुखी उरे । का सेंदे द्रुति राहे कापुरे । वेचलेनी ॥423॥
वारा वाहण्याचा जरी बंद झाला, तरी झाडाचे हालने बंद होत नाही अथवा कापूर जरी संपला, तरी करंड्यात वास शिल्लक असतो; 423
424-18
का सरलेया गीताचा समारंभु । न वचे राहवलेपणाचा क्षोभु । भूमी लोळोनि गेलिया अंबु । वोल थारे ॥424॥
अथवा गाण्याचा समारंभ संपला, तरी गाणी ऐकून मनास झालेल्या आनंदाचा भर जसा कमी होत नाही, किंवा पाण्याने जमीन ओली होऊन पाणी कमी झाले असता जशी त्याची ओल मागे राहते; 424
425-18
अगा मावळलेनि अर्के । संध्येचिये भूमिके । ज्योतिदीप्ति कौतुके । दिसे जैसी ॥425॥
अरे, सूर्य मावळल्यावर संध्याकाळी पश्चिमेकडे आकाशात सूर्य ज्योतिचे तेज (संधी प्रकाश) जसे दिसते, 425

दिवस ३०५ वा. १, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३६४९ ते ३६६०
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ३६४९ (सीताशोक)
रामरूप केली । रामे कौसल्या माउली ॥१॥
राम राहिला मानसी । ध्यानी चिंतनी जयासी ॥धृपद॥
राम होय त्यासी । संदेह नाही हा भरवसा ॥२॥
अयोध्येचे लोक । राम झाले सकळीक ॥३॥
स्मरता जानकी । रामरूप झाले कपि ॥४॥
रावणेसी लंका । राम आपण झाला देखा ॥५॥
ऐसा नित्य राम ध्याय । तुका वंदी त्याचे पाय ॥६॥
अर्थ
कौसल्या माऊलीने प्रभू रामचंद्र वनवासात असताना सतत राम प्रभूंचे चिंतन केले त्यामुळे रामचंद्र प्रभूने तिला ब्रम्हरुपच केले. ज्याच्या ध्यानी मनी चिंतनी प्रभू रामचंद्र आहे तो रामरुपच होतो. तो भक्त रामरुप होतो यात कोणताही संशय नाही याउलट पूर्णपणे भरवसाच आहे. अयोध्येचे सर्व लोक नेहमी रामाचे चिंतन करायचे त्यामुळे ते सर्व रामरुपच झाले होते. सीतामातेने अशोकवनात असताना प्रभू रामचंद्राचे नेहमी स्मरण केले म्हणून तीही रामरुपच झाली व वानर नेहमी रामचंद्र प्रभूच्या सेवेत मग्न होते म्हणून तेही रामरुपच झाले. रावण काय रावणाची लंका देखील भयाने रामाचे चिंतन करत होते त्यामुळे ते देखील सर्व रामरुपच झाले. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा प्रकारे कोणत्याही प्रकाराने का होईना परंतू रामाचे ध्यान जो नित्य करतो त्याचे चरण मी वंदन करतो. ”
12:26
अभंग क्र. ३६५० (सीताशोक)
आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ । अवघा जयजयकार आळंगिला भरत ॥१॥
आनंदले लोक नरनारी परिवार । शंखभेरीतुरे वाद्यांचे गजर ॥धृपद॥
करिती अक्षवाणे ओंवाळिती रघुवीरा । लक्ष्मीसहित लक्ष्मण दुसरा ॥२॥
झाले रामराज्य आनंदली सकळे । तुका म्हणे गाईवत्से नरनारी बाळे ॥३॥
अर्थ
ज्यावेळी प्रभू रामचंद्र, सीता व लक्ष्मण अयोध्येत आले त्यावेळी सर्व अयोध्यावासीयांना खूप आनंद झाला सर्वानी प्रभू रामचंद्रांच्या नामाचा जयजयकार केला व प्रभू रामचंद्र पुष्पक विमानातून उतरल्यावर पहिल्यांदा भरताला भेट आलिंगन देतात. प्रभू रामचंद्र अयोध्येत आले त्यामुळे सर्व लोकांना, स्त्री-पुरुषांना परिवारांना खूप आनंद झाला त्यांचे स्वागत करण्यासाठी शंख, भेरी, तुताऱ्या व इतर वादयांचे गजर लोक करु लागले. प्रभू रामचंद्र सीता व लक्ष्मण यांचे आगमन ज्यावेळी झाले त्यावेळी सर्व स्त्रीयांनी प्रभू रामचंद्राला सीतेला व लक्ष्मणाला अक्षय वाण करुन ओवाळले. तुकाराम महाराज म्हणतात, “त्यानंतर प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला व राज्य चालू झाले व या कारणामुळे पृथ्वीवरील सर्व जीव त्यामध्ये गाई, वासरे, स्त्री, पुरुष, लहान, वृध्द सर्वानाच आनंद झाला. ”
12:26
अभंग क्र. ३६५१ (सीताशोक)
झाले रामराज्य काय उणे आम्हासी । धरणी धरी पीक गाई वोळल्या म्‍हैसी ॥१॥
राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये । दिळता कांडिता जेविता गे बाइये ॥धृपद॥
स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा । नामाच्या गजरे भय सुटले कळीकाळा ॥२॥
तुका म्हणे रामे सुख दिले आपुले । तया गर्भवासी येणे जाणे खुंटले ॥३॥
अर्थ
सर्वत्र आता रामराज्य झाले आहे त्यामुळे आम्हाला कसली कमतरता आहे धरणी भरपूर पीक देत आहे गाई म्हशी भरपूर दुध देत आहेत. हे बायांनो आपण रामाच्या ओव्या वेळोवेळी म्हणजे दळताना, कांडताना, जेवताना गाऊ. स्वप्नातही कोणाच्या डोळयाला दु:ख काय आहे ते दिसणार नाही आणि रामनामाच्या गजराने तर कळीकाळाला देखील भय सुटले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “प्रभू रामचंद्राने आपले आत्मसुख आपणा सर्वाना दिले त्यामुळे जन्ममरणाचे गर्भवास व येरझारे खुंटले. ”
12:26
अभंग क्र. ३६५२ (सीताशोक)
अहल्या जेणे तारिली रामे । गणिका परलोका नेली नामे ॥१॥
रामहरे रघुराजहरे । रामहरे महाराजहरे ॥धृपद॥
कंठ शीतळ जपता शूळपाणी । राम जपे अविनाश भवाणी ॥२॥
तारकमंत्रश्रवण काशी । नाम जपता वाल्मीक ॠषि ॥३॥
नाम जप बीज मंत्र नळा । सिंधु तरती ज्याच्या प्रतापे शिळा ॥४॥
नामजप जीवन मुनिजना । तुकयास्वामी रघुनंदना ॥५॥
अर्थ
ज्या प्रभू रामचंद्रांनी अहिल्येचा उध्दार केला व नकळत रामाच्या नामाचा उच्चार केला त्या गणिकेला देखील वैकुंठाला नेले. असा प्रभू रामचंद्राच्या नामाचा उच्चार “राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे” असा करावा. ज्यावेळी भगवान शंकराने मंथनातून बाहेर आलेले विष प्राशन केले त्यावेळी त्यांच्या कंठाचा दाह होऊ लागला व त्यावेळी प्रभू रामचंद्रांच्या नामाचा त्यांनी उच्चार केला व त्यांचा कंठ शीतल झाला व भवानी पार्वती माता देखील अविनाशी रामनामाचा जप नेहमी करते. रामनाम मंत्र हे तारक मंत्र असून काशीमध्ये ते श्रवण केल्यास आपल्याला पुण्य लाभते व याच रामनामाचा उच्चार करुन महापापी वाल्या कोळयाचा वाल्मिकी ऋषी झाला. याच बीजमंत्राचा उच्चार हनुमंत, नल, नील, सुग्रीव, जांबुवंत यांनी केला व हे नाम दगडावर लिहिले असता समुद्रावर ते दगड तरले. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या मुनीजनांचे जीवन म्हणजे रामनाम जप आहे तोच माझा स्वामी रघुनंदन आहे. ”
12:26
अभंग क्र. ३६५३ (सीताशोक)
मी अल्पमतिहीन । काय वर्णु तुझे गुण । उदकी तारिले पाषाण । हे महिमान नामाचे ॥१॥
नाम चांगले चांगले । माझे कंठी राहो भले । कपिकुळ उद्धरिले । मुक्त केले राक्षसा ॥धृपद॥
द्रोणागिरी कपिहाती । आणविला सीतापती । थोर केली ख्याति । भरतभेटीसमयी ॥२॥
शिळा होती मनुष्य झाली । थोर कीर्ती वाखाणिली । लंका दहन केली । हनुमंते काशाने ॥३॥
राम जानकीजीवन । योगियांचे निजध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥४॥
अर्थ
हे प्रभू रामचंद्रा मी तर अल्पबुध्दी आहे मतिहीन आहे तुझे गुण मी कसे वर्णन करु ? अहो देवा तुमच्या नामाचा महिमा एवढा मोठा आहे की ते नाम दगडावर लिहिले व दगड पाण्यात तारले गेले. देवा तुझे नाम चांगले आहे खूप चांगले आहे आणि तेच माझ्या कंठामध्ये राहू दयावे. संपूर्ण वानरकुळाचा उध्दार या नामाने केला व सर्व राक्षसांचाही उध्दार या नामाने केला. या सीतापती रामचंद्राने ज्यावेळी लक्ष्मणाला शक्तीबाण लागला त्यावेळी हनुमंताच्या हाती द्रोणागिरी पर्वत आणविला. प्रभू रामचंद्राने रावणाचा वध करुन सर्वत्र रामराज्य निर्माण करुन मोठी ख्याती केली व अयोध्येत परत गेल्यानंतर प्रथमत: भरताला प्रेमाने मिठी दिली. गौतम ऋषीच्या शापाने अहिल्या शिळा झाली व प्रभू रामचंद्राच्या चरणस्पर्शाने ती पुन्हा मनुष्य झाली अशी मोठी किर्ती प्रभू रामचंद्रांनी केली. हनुमंताने लंकेचे दहन केले ते कोणाच्या जोरावर तर रामाच्याच जोरावर. तुकाराम महाराज म्हणतात, “राम जानकीचे जीव आहे, योगियांचे नीजध्यान आहे, राम राजीवलोचन आहे मी त्याचे चरण वंदन करतो. ”
12:27
अभंग क्र. ३६५४ (घोंगडीचीरूपके)
ठकिले काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनिया ॥१॥
पाघरलो बहु काळे । घोंगडे बळे सांडवले ॥धृपद॥
नये ऐसा लाग वरी । परते दुरी लपाले ॥२॥
तुका म्हणे आड सेवा । लाविला हेवा धांदली ॥३॥
अर्थ
या देहावर काळ झडप घालणार त्यावेळी मी ब्रम्हरुप अवस्थेत लपून राहिलो व या काळाला मी अशा प्रकारे फसविले. खूप दिवसापासून देहरुपी काळी घोंगडी टाकून बसलो होतो परंतू आता ती टाकून दिली आहे. माझा शोध त्या काळाला कोठेही लागणार नाही अशा दूर ठिकाणी मी जाऊन लपलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “मी काळाला हरीसेवेची आडकाठी लावली आहे त्यामुळे त्याची धांदल उडाली आहे. ”
12:27
अभंग क्र. ३६५५ (घोंगडीचीरूपके)
घोंगडियांचा पालट केला । मुलांमुलां आपुल्यात ॥१॥
कान्होबा तो मीच दिसे । लाविले पिसे संवगडिया ॥धृपद॥
तो बोले मी उगाच बैसे । आनारिसे न दिसे ॥२॥
तुका म्हणे दिले सोंग । नेदी वेग जाऊ देऊ ॥३॥
अर्थ
आम्ही मुलांनी एकदा एकमेकांच्या घोंगडींची अदलाबदल केली. आम्ही मुले मुले म्हणजे कान्होबा व आम्ही सर्व सवंगडी माझ्या अंगावर कान्होबाची घोंगडी आली व मी कान्होबासारखाच दिसू लागलो व सर्व मला कान्होबा समजू लागले मग मी सर्व सवंगड्यांना वेड लावले. तो कृष्ण बोलू लागला की, मी उगाच गप्प बसून राहायचो परंतू त्याच्यात आणि माझ्यात मला काहीच बदल वाटत नव्हता. तुकाराम महाराज म्हणतात, “जे हरीने मला घोंगडी देऊन सोंग दिले त्या सोंगाला मी व्यर्थ वाया जाऊ देणार नाही. ”
12:27
अभंग क्र. ३६५६ (घोंगडीचीरूपके)
खेळो लागलो सुरकवडी । माझी घोंगडी हारपली ॥१॥
कान्होबाचे पडिलो गळा । घेई गोपाळा देई झाडा ॥धृपद॥
मी तो हागे उघडा जालो । अवघ्या आलो बाहेरी ॥२॥
तुका म्हणे बुद्धी काची । नाही ठायीची मजपाशी ॥३॥
अर्थ
एकदा आम्ही सर्व मुले मुले भजन कीर्तन भक्तीचा सुरफोडीरुपी खेळ खेळू लागलो त्यावेळी माझी घोंगडीच हरवली माझा देहभाव नाहीसा झाला. त्यावेळी मी कान्होबाच्या गळयात पडलो आणि त्याला म्हणालो की हे गोपाळा तू माझा स्वीकार कर आणि माझ्याकडे कोणत्या उपाध्या राहिल्या आहेत याविषयी तू माझा संपूर्ण हिशोब घ्यावा. देवा मी आता कसा उघडा झालो आहे म्हणजे सर्व उपाधी विकारातून बाहेर पडलो आहे व सर्व उपाध्यांच्या बाहेर मी आलो आहे ते पाहा. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा माझी बुध्दी अगदी शुध्द आहे आणि जी स्थिती मी तुला सांगत आहे तीच अगदी सत्य आहे. ”
12:27
अभंग क्र. ३६५७ (घोंगडीचीरूपके)
घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशी ते ही होते ॥१॥
माझियाचा माग दावा । केला गोवा उगवो द्या ॥धृपद॥
व्हावे ऐसे निसंतान । घेईन आन तुजपाशी ॥२॥
तुका म्हणे लाहाण मोठा । सांडा ताठा हा देवा ॥३॥
अर्थ
सर्वाच्या घोंगडया पंचमहाभूतापासून तयार झालेल्या असतात व माझीही पंचमहाभूतापासूनच तयार झालेलो आहे. सर्व काही माझे आणि मी असा मिथ्याभिमान मी धरत आहे परंतू यामधून मी बाहेर कसे पडावे हे तुम्हीच मला सांगावे. अशा प्रकारे निसंतान व्हावे म्हणजे जन्ममरण रहित व्हावे अशीच आण मी देवा तुझ्यापाशी घेत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा हा लहान हा मोठा अशा खोटा अभिमान तुम्ही माझ्यापासून दूर टाकून दयावा त्यालाच सोडवावे. ”
12:27
अभंग क्र. ३६५८ (घोंगडीचीरूपके)
नाही तुझे उगा पडत गळा । पुढे गोपाळा जाऊ नको ॥१॥
चाहाड तुझे दाविन घरी । बोलण्या उरी नाही ऐसी ॥धृपद॥
तुम्हा आम्हा पडदा होता । सरला आता सरोबरी ॥२॥
तुका म्हणे उरती गोठी । पडिली मिठी न सुटे ॥३॥
अर्थ
हे गोपाळा मी आता माझा देहाभिमान टाकून दिला आहे त्यामुळे विनाकारण तुझ्या गळयाला मी पडणार नाही तुझ्या गळयाला उगाच मी पडत नाही त्यामुळे तू माझा स्वीकार केल्याशिवाय पुढे जाऊ नकोस. देवा तू जर माझा अंगीकार केला नाहीस तर मी तुझ्या चाहाडया संतांच्या घरी जाऊन सांगेन मग तुला बोलण्यासाठी काहीही मागे उरु देणार नाही. देवा तुमच्या व माझ्यामध्ये जो व्दैताचा पडदा होता तो आता बाजूला सरला आहे आता तुमच्यात व माझ्यात ऐक्य झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुझ्यात व माझ्यात आता केवळ बोलण्यापुरता भेद उरला आहे व आपल्यात जी मिठी पडली आहे ती आता सुटणे शक्य नाही. ”
12:28
अभंग क्र. ३६५९ (घोंगडीचीरूपके)
तुम्हा आम्हा उरी तोवरी । जनाचारी आहे तैसी ॥१॥
माझे घोंगडे टाकुन देई । एके ठायी मग असो ॥धृपद॥
विरोधाने पडे तुटी । कपट पोटी नसावे ॥२॥
तुका म्हणे तू जाणता हरी । मज वेव्हारी बोलविसी ॥३॥
अर्थ
देवा आपल्या दोघामध्ये भेद तोपर्यंतच आहे जोपर्यंत मी लोकांमध्ये व्यवहार करत आहे. देवा तू माझी घोंगडी टाकून दे मग पाहा आपल्या दोघात ऐक्य कसे होते व आपण कसे एकरुप होतो ते. देवा जर एकमेकामध्ये विरोध घडला तर दोघामध्ये अंतर पडते त्यामुळे कोणाच्याही पोटामध्ये कपट नसावे म्हणजे दोघाचेही ऐक्य होते. तुकाराम महाराज म्हणतात, “हे हरी तू सर्वकाही जाणता आहेस परंतू मला व्यवहारामध्ये गुंतवून व्यवहारासंबंधीच बोलण्यास लावतो. ”
12:28
अभंग क्र. ३६६० (घोंगडीचीरूपके)
मुळींचा तुम्हा लागला चाळा । तो गोपाळा न संडा ॥१॥
घ्यावे त्याचे देणेचि नाही । येचि वाहिं देखतसो ॥धृपद॥
माझी तरी घोंगडी मोठी । गांडीची लंगोटी सोडिस ना ॥२॥
तुका म्हणे म्या सांडिली आशा । हुंगिला फासा येथुनिया ॥३॥
अर्थ
हे गोपाळा तुम्हाला हा मूळचाच छंद लागलेला आहे तो काही केल्या तुम्ही सोडत नाहीत. की ज्याचे काही घेतले तर त्याला परत तुम्ही ते देतच नाहीत एखादयाचे काही घेतले की परत तुम्ही त्याला माघारी देत नाहीत हे मी तुमचे वागणे मी खूप दिवसापासून पाहात आहे. देवा माझी तर घोंगडी किती मोठी आहे ती तू घेतोस परंतू तुझ्या ढुंगणाची लंगोटी देखील तू सोडत नाहीस म्हणजे दर्शन तर सोड तुझा साधा अनुभवही आम्हाला येऊ देत नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात, “की मी आता माझ्या देहरुपी घोंगडीचा फासा हुंगून टाकला आहे म्हणजे माझ्या देहाचाच त्याग केला आहे. ”
12:28

नोव्हेंबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading