आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१ फेब्रुवारी, दिवस ३२, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा, ओवी १२६ ते १५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३७३ ते ३८४
“१ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 1 feburvari
राम कृष्ण हरी आज दिनांक १ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
दिवस ३२ वा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
126-3
हे वाचूनि पार्था । राहाटो नये अन्यथा । ऐसी आद्य ही कथा । मुरारी सांगे ॥126॥
हे अर्जुना ! अशा या नियमाशिवाय (वागण्याखेरीज) दुसऱ्या तऱ्हेने वागू नये (अन्य आचरण करू नये). अशी ही पुरातन काळापासूनची कथा भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. (किंवा सांगितली आहे)
127-3
जे देहचि आपणपे मानिति । आणि विषयाते भोग्य म्हणती । यापरते न स्मरती । आणिक काही ॥127॥
आपण म्हणजे देह आहोत असे जे मानतात आणि विषयांना हे भोग्य समजतात आणि ज्यास यापलीकडे दुसरी काहीचं कल्पना नसते (काहीच जाणत नाहीत),
128-3
हे यज्ञोपकरण सकळ । नेणसांते बरळ । अहंबुद्धी केवळ । भोगू पाहती ॥128॥
ते बहकलेले लोक आपल्याजवळ असलेली संपत्ती वगैरे सर्व काही यज्ञाची सामग्री आहे असे न समजता, त्या सर्व संपत्तीचा केवळ (देहाच्या ठिकाणी अहंकार बुद्धी ठेऊन) स्वतःसाठी भोग घेण्यास प्रवृत्त होतात,
129-3
इंद्रियरुचीसारखे । करविती पाक निके । ते पापिये पातके । सेविती जाण ॥129॥
इंद्रियांना आवडणारे चविष्ट पदार्थ तयार करतात आणि त्याचे सेवन करतात, ते पापी लोक जणू काही (वस्तुतः या पदार्थाच्या रूपाने) पातकांचेच सेवन करत असतात. असे समज.
130-3
जे संपत्तिजात आघवे । हे हवनद्रव्य मानावे । मग स्वधर्मयज्ञे अर्पावे । आदिपुरुषी ॥130॥
वास्तविक पाहता जेवढी आपली संपत्ती आहे, ती सर्व यज्ञात उपयोगी पडणारी सामग्री आहे, असे समजावे. मग ती संपत्ती स्वधर्मयज्ञाने आदिपुरुषाला अनासक्त भावनेने अर्पण करावी.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टां
131-3
हे सांडोनिया मूर्ख । आपणपेयालागी देख । निपजविती पाक । नानाविध ॥131॥
हे सर्व न जाणता अज्ञानी लोक स्वतःच्या भोगाकरिता नाना प्रकारचे अन्नाचे पदार्थ निर्माण करतात.
132-3
जिही यज्ञु सिद्धी जाये । परेशा तोषु होये । ते हे सामान्य अन्न न होये । म्हणोनिया ॥132॥
ज्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धीस जातो आणि परमेश्वरही संतोष पावतो, ते हे अन्न कमी योग्यतेचे नाही. म्हणून,
132-3
हे न म्हणावे साधारण । अन्न ब्रह्मरूप जाण । जे जीवनहेतु कारण । विश्वा यया ॥133॥
या अन्नाला साधारण, सामान्य समजू नये. अन्न हे ब्रम्हरूप आहे असे समज; कारण की अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन आहे.
अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नस्संभवः ।
यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥3. 14॥
भावार्थ :-
अन्नापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात, अन्नाची उत्पत्ती पावसापासून होते, पाऊस हा यज्ञापासून उत्पन्न होतो आणि तो यज्ञ कर्मापासून उत्पन्न होणारा आहे.
133-3
अन्नस्तव भूते । प्ररोह पावति समस्ते । मग वरिषु या अन्नाते । सर्वत्र प्रसवे ॥134॥
अन्नपासून सर्व प्राणिमात्रांची वाढ होत असते आणि पावसापासून सर्व ठिकाणी अन्न निर्माण होत असते.
134-3
त्या पर्जन्या यज्ञी जन्म । यज्ञाते प्रगटी कर्म । कर्मासि आदि ब्रह्म । वेदरूप ॥135॥
त्यापावसाची उत्पत्ती यज्ञापासून होते. तो यज्ञ कर्मापासून प्रकट होतो; कर्माची उत्पत्ती वेदरूप ब्रम्हापासून होते.
कर्म ब्रह्मोद्बभवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं ।
तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं ॥3. 15॥
भावार्थ :-
कर्म हे वेदांपासून उत्पन्न झालेले आहे, हे जाण. वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत; म्हणून सर्वव्यापी परमात्मा सदैव यज्ञामध्ये प्रतिष्टीत असतो.
135-3
मग वेदांते परापर । प्रसवतसे अक्षर । म्हणऊनि हे चराचर । ब्रह्मबद्ध ॥136॥
ह्या वेदांची उत्पत्ती अविनाशी अशा ब्रह्मपासून होते; म्हणून हे चराचर विश्व ब्रह्ममध्ये सामावलेले आहे.
136-3
परी कर्माचिये मूर्ति । यज्ञी अधिवासु श्रुती । ऐके सुभद्रापती । अखंड गा ॥137॥
हे सुभद्रापती अर्जुना ! ऐक. कर्माचे मूर्त स्वरूप जो यज्ञ, या यज्ञामध्ये सर्व वेद तात्पर्यरूपाने निरंतर राहत असतात.
137-3
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।
अघायुरिंद्रियारामो मोघं पार्थ स जीवती ॥3. 16॥
भावार्थ :-
हे अर्जुना, परमेश्वरापासून सुरु झालेल्या त्या स्वधर्मरूप चक्राला अनुसरून जो वागत नाही, त्याचे जीवन व्यर्थ होय. तो विषयांच्या ठिकाणी रममाण होऊन आपले आयुष्य व्यर्थ घालवितो.
138-3
ऐशी आदि हे परंपरा । संक्षेपे तुज धनुर्धरा । सांगितली या अध्वरा । लागौनिया ॥138॥
हे धनुर्धरा ! याप्रमाणे ही मुळातील कार्यकारण परंपरा तुला या स्वधर्म- यज्ञाकरता संक्षेपाने सांगितली.
139-3
म्हणून समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु । नानुष्ठी जो मत्तु । लोकी इये ॥139॥
म्हणून जो उन्मत्त असलेला मनुष्य या लोकांमध्ये उचित अशा या स्वधर्मरूप यज्ञाचे पूर्णपणे आचरण करणार नाही,
140-3
तो पातकांची राशी । जाण भार भूमीसी॥जो कुकर्मे इंद्रियांसी । उपेगा गेला ॥140॥
जो वाईट कर्माचे आचरण करून इंद्रियांचे लाड पुरवितो, तो केवळ पापांच्या राशी असून भूमीला केवळ भार आहे, असे समज.
141-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
ते जन्म कर्म सकळ । अर्जुना अति निष्फळ । जैसे का अभ्रपटळ । अकाळीचे ॥141॥
जसे भलत्याच वेळेला आलेली ढगांची फळी (आकाशात जमलेले ढग) निरुपयोगी असतात, त्याप्रमाणे हे अर्जुना ! त्या उन्मत्त मनुष्याचे जन्म व कर्म सर्व निष्फळ असतात.
142-3
का गळा स्तन अजेचे । तैसे जियाले देखे तयाचे । जया अनुष्ठान स्वधर्माचे । घडेचिना ॥142॥
किंवा ज्याच्या हातून आपल्या धर्माचे (स्वधर्माचे) आचरण होत नाही त्याचे जगणे म्हणजे शेळीच्या गळ्यास असलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक आहे असे समज.
143-3
म्हणोनि ऐके पांडवा । हा स्वधर्मु कवणे न संडावा । सर्वभावे भजावा । हाचि एकु ॥143॥
म्हणून पांडवा ! ऐक. हा स्वधर्म कोणीही सोडू नये. सर्व भावाने (भावाने :- काया, वाचा, मना पासून) स्वधर्माचे आचरण करावे.
144-3
हा गा शरीर जरी जाहले । तरी कर्तव्य वोघे आले । मग उचित का आपुले । वोसंडावे ॥144॥
असे पाहा की, शरीर जरी आपणास मिळाले आहे, तरी ते पूर्वकर्मानुसार मिळालेले आहे (म्हणजेच त्यामागे कर्तव्यकर्म आलेच असा अर्थ), तर मग आपणास विहित असलेले कर्म आपण का बरे त्यागावे ?
145-3
परिस पा सव्यसाची । मूर्ती लाहोनि देहाचि । खंती करिती कर्माची । ते गावंढे गा ॥145॥
हे अर्जुना ! मनुष्यशरीर प्राप्त झाले असता, जे लोक कर्म करण्याचा कंटाळा करतात, ते लोक अज्ञानी आहेत.
146-3
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः ।
आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्य न विद्यते ॥3. 17॥
भावार्थ :-
परंतु जो मनुष्य आत्म्याच्या ठिकाणी रममाण झालेला असतो, तो आत्मनंदाने तृप्त व संतुष्ट असतो, त्याला कोणतेही कर्तव्य कर्म राहत नाही.
देखे असतेनि देहकर्मे । एथ तोचि एकु न लिंपे कर्मे । जो अखंडित रमे । आपणपाचि ॥146॥
जो आत्मस्वरूपामध्ये (निरंतर आपल्या स्वरूपामध्ये गढलेला) अखंड रममाण असतो, तो आपल्या देह-इंद्रियांचे स्वाभाविक कर्म चालू असताना देखील त्यामध्ये लिप्त होत नाही.
147-3
जे तो आत्मबोधे तोषला । तरी कृतकार्यु देखे जाहला । म्हणोनि सहजे सांडवला । कर्मसंगु ॥147॥
कारण कि, पाहा, तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो; म्हणून त्याचा कर्माशी संबंध सुटलेला असतो.
148-3
नैव तस्य कृतेनार्थो माकृतेनेह कश्चन ।
न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥3. 18॥
भावार्थ :-
या लोकी त्याला कर्म केल्याने अथवा न केल्याने काही लाभ नाही. त्याला कोणत्याही प्राण्यापासून काही लाभ साधवयाचा नसतो.
तृप्ती झालिया जैसी । साधने सरती आपैसी । देखे आत्मतुष्टी तैसी । कर्मे नाही ॥148॥
पाहा, ज्याप्रमाणे पोट भरल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप आपोआप संपतो, त्याप्रमाणे आनंदस्वरूप आत्मतत्वाशी एकरूप झाल्यावर कर्म करण्याचे प्रयोजनच शिल्लक राहत नाही.
149-3
जंववरी अर्जुना । तो बोध भेटेना मना । तवचि यया साधना । भजावे लागे ॥149॥
हे अर्जुना ! जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही, तो पर्यंत कर्मादी साधने करावी लागतात.
तस्मादसक्तः सततं कार्य कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन् कर्म पमाप्नोति पुरूषः ॥3. 19॥
भावार्थ :-
म्हणून कर्मफळाविषयी सदैव अनासक्त राहून उत्तम प्रकारे कर्तव्यकर्म कर. अनासक्त राहून कर्म करणारा पुरुष परमात्म्याला प्राप्त होतो. (मोक्षपद मिळवितो)
150-3
म्हणऊनि तू नियतु । सकळ कामरहितु । होऊनिया उचितु । स्वधर्मे रहाटे ॥150॥
म्हणून सदैव फळाची आशा त्यागून तू उचित अशा आपल्या स्वधर्माचे आचरण कर.
दिवस ३२ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
1) अभंग ३७३ ते ३८४
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 373
मनोमय पूजा । हेचि पढीये केशीराजा ॥१॥
घेतो कल्पनेचा भोग । न मानेती बाह्य रंग ॥धृपद॥
अंतरीचे जाणे । आदिवर्तमान खुणे ॥२॥
तुका म्हणे कुडे । कोठे सरे त्याच्या पुढे ॥३॥
अर्थ
मनोमन केलेली पूजा त्या केशीराजाला फार आवडते. तुम्ही कल्पनेने जरी त्याला फल पुष्प नैवद्य अर्पण केले तरी त्याला ते मान्य आहे परंतू बह्योपाचाराचा थाट-माट केला तर ते देवाला मान्य नसते. हरी हा भक्तांच्या मनातील कायम शुद्ध स्वरूपाच्या भक्तीभावपूर्वक खुणा जाणतो. तुकाराम महाराज म्हणतात पण जर अंतकरणात खोटा भक्तीभाव असेल तर त्या हरी पुढे ते कसे चालेल ?
अभंग क्र. 374
जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोचि दैवाचा पुतळा ॥१॥
आणीक नये माझ्या मना । हो का पंडित शाहाणा ॥धृपद॥
नामरूपी जडले चित्त । त्याचा दास मी अंकित ॥२॥
तुका म्हणे नवविध । भक्ती जाणे तोचि शुद्ध ॥३॥
अर्थ
खरोखरच ज्याची भक्ती अतिशय जिव्हाळ्याचे आहे तो दैवाचा पुतळाच आहे. त्याच्या वाचून इतर कोणी शहाणा पंडित असेल, तरी ते मोठे दैववान आहेत असे माझ्या मनाला पटत नाही. हरीच्या नामारुपाच्या ठिकाणी ज्याचे मन जडले आहे, त्याच्या आधीन असा मी त्याचा दासच आहे. तुकाराम महाराज म्हणतात जो श्रवण, कीर्तन, मनन इत्यादी नऊप्रकारची भक्ती करणे जाणतो, तोच मनुष्य खरा शुद्ध मानवा.
अभंग क्र. 375
याजसाठी वनांतरा । जातो सांडुनिया घरा ॥१॥
माझे दिठावेल प्रेम । बुद्धी होईल निष्काम ॥धृपद॥
अद्वैताची वाणी । नाही ऐकत मी कानी ॥२॥
तुका म्हणे अहंब्रम्ह । आड येऊ नेदी भ्रम ॥३॥
अर्थ
मी घर सोडून याच कारणासाठी वनात जात आहे. कारण हरीच्या सगुण रुपाबद्दल माझ्या मना मध्ये असणाऱ्या प्रेमाला ऐरव्ही दृष्ठ लागेल आणि त्यायोगाने माझ्या मना मध्ये भजन पूजन इत्यादीची जी शुद्ध भावना आहे ती जाऊन माझी बुद्धी कोरडी निष्काम होईल. तसे होऊ नये म्हणून मी अद्वैतशास्त्राच्या गोष्टी ऐकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ”मी ब्रम्ह आहे”असे म्हणणे हा सुद्धा एक भ्रम आहे त्या भावनेचा भ्रम मी आपल्या मध्ये येऊ देणार नाही. (म्हणजे अद्वैत स्थितीमध्ये भक्ती घडत नाही असे महाराजांना म्हणायचं आहे.
अभंग क्र. 376
बुडता आवरी । मज भवाचे सागरी ॥१॥
नको मानू भार । पाहो दोषाचे डोंगर ॥धृपद॥
आहे ते सांभाळी । तुझी कैसी ब्रीदावळी ॥२॥
तुका म्हणे दोषी । मी तो पातकाची राशी ॥३॥
अर्थ
देवा री मी या भव सागरामध्ये बुडत आहे तरी तू माझे रक्षण कर. माझे पर्वतप्राय दोष तू पाहू नकोस. आणि माझा उद्धार करण्यासंबंधी भार पडतो असे माणू नकोस. पतितांना पावन करणे हे तुझे ब्रीदच आहे. ते तू पालन कर. तुकाराम महाराज म्हणतात मी मोठा दोषी आहे. पातकांची रसच आहे. तू उद्धार केल्या शिवाय माझा उद्धार होणार नाही.
अभंग क्र. 377
अक्षई ते झाले । आता न मोडे रचिले ॥१॥
पाया पडिला खोले ठायी । तेथे पुढे चाली नाही ॥धृपद॥
होते विखुरले । ताळा जमे झडती आले ॥२॥
तुका म्हणे बोली । पुढे कुंटितचि जाली ॥३॥
अर्थ
आम्ही अक्षय अशी परमार्थ रूप इमारत उभी केली आहे ती आता मोडली जाणे शक्य नाही. या इमारतीचा पाया फार खोल आहे. तो सर्वाधार ब्राम्हापर्यंत पोहोचला आहे. ते स्थान असे आहे की, आणखी खाली खणता येणार नाही. आमचा हिशोब थोडासा चुकत होता. काही अव्यवस्था झाली होती. तुकाराम महाराज म्हणतात पण आता ताळाबरोबर जमला आहे. परमार्था विषयी बोलण्यासारखे आणखी काही राहिले नाही.
अभंग क्र. 378
न मानावी चिंता । काही माझेविशी आता ॥१॥
ज्याणे लौकिक हा केला । तो हा निवारिता भला ॥धृपद॥
माझे इच्छे काय । होणार ते एके ठाय ॥२॥
सुखा आणि दुःखा । म्हणे वेगळा मी तुका ॥३॥
अर्थ
लोकांना तुम्ही आता माझ्याविषयी काही चिंता करू नका. ज्याने हा ऐवढा लौकिक वाढविला आज तो सर्व संकटाचे निवारण करण्यास समर्थ आहे. माझ्या इच्छेप्रमाणे कोणते काम होणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात सुखे आणि दुखे यापेक्षा मी वेगळा आहे.
अभंग क्र. 379
तुझे थोर थोर । भक्त करिती विचार ॥१॥
जपतपादि साधने । मज चिंतवेना मने ॥धृपद॥
करुणावचने । म्या भाकावी तुम्हा दीने ॥२॥
तुका म्हणे घेई । माझे थोडे फार ठायी ॥३॥
अर्थ
अहो देवा तुमचे थोर भक्त तुमच्या स्वरूपाचा विचार करतात. आणि जप, तप इत्यादी साधनेही ते करतात. पण मी इतका अज्ञ आहे की माझे मन त्या साधनांचा विचारसुद्धा करू शकत नाही. मी सर्व बाबतीत अतिशय दुबळा आहे. म्हणून मला ऐवढेच कळते कि, काकुळतीस येऊन केवळ तुमची प्रार्थना करावी. तुकाराम महाराज म्हणतात अहो देवा, मज कडू जी काही थोडी फार वेडीवाकडी सेवा होत असेल, तिचा आपण स्वीकार करावा.
अभंग क्र. 380
लावुनि काहाळा । सुखे करितो सोहोळा ॥१॥
सादावीत गेलो जना । भय नाही सत्य जाणा ॥धृपद॥
गाता नाचता विनोदे । टाळघागरीयांच्या छंदे ॥२॥
तुका म्हणे भेव । नाही पुढे येतो देव ॥३॥
अर्थ
झांज वाजून मोठ्या आनंदाने मी भजनाचा सुखसोहळा करीत आहे. आणि लोकांना मी अशी साद देत आहे की, अहो तुम्ही जर हरीचे भजन केले, तर तुम्हाला खरोखरच कोणाचेही भय नाही. हरीचे गुणानुवाद गाताना मी पायात चाळ बांधून व हातात टाळ घेऊन तालामध्ये मोठ्या कौतुकाने नाचत आहे. तुकाराम महाराज म्हणतात आणि पहा, पहा, या मध्ये कोणतेही भय नाही आणि देव प्रत्येक्ष समोर येत आहे.
अभंग क्र. 381
मुक्त कासया म्हणावे । बंधन ते नाही ठावे ॥१॥
सुखे करितो कीर्तन । भय विसरले मन ॥धृपद॥
देखिजेना नास । घालू कोणावरी कास ॥२॥
तुका म्हणे साह्य । देव आहे तैसा आहे ॥३॥
अर्थ
मुक्ती कशाला म्हणावे बंधन कशाला म्हणावे हे मला कळत नाही कारण स्वरुपत आहेच मी मुक्त आहे त्यामुळे मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठी किंवा बंधनातून मुक्त होण्यासाठी मला काही प्रयत्न करावे लागत नाही. माझी अशीच सुखरूप स्थिती झाली आहे आणि त्या स्थितीत मी कीर्तन करत आहे. माझे मन भयाला पूर्ण पणे विसरून गेले आहे. नाश करण्याला योग्य अशी कोणतीच वस्तू मला माझी पुढे दिसत नाही. तर कोणाचा नाश करण्यासाठी मी कास बळकट करून सज्ज होऊ ? तुकाराम महाराज म्हणतात सर्वोतपरी साहय्य करणारा देव अद्वैतपणे जसा आहे तसा आहे.
अभंग क्र. 382
ओनाम्याच्या काळे । खडे मांडविले बाळे ॥१॥
तेचि पुढे पुढे काई । मग लागलिया सोई ॥धृपद॥
रज्जु सर्प होता । तोवरीन कळता ॥२॥
तुका म्हणे साचे । भय नाही बागुलाचे ॥३॥
अर्थ
शिक्षक मुलांना शिकवण्यासाठी खडे मांडतात व खडे मांडून मुलांना धडे शिकवतात. आणि मुले खडे टाकून देतात खड्यांना वाचूनच त्यांना आकडे आणि अक्षरे ओळखता येतात. तसेच दोरी हि दोरीच आहे, असे जो पर्यंत समजत नाही तो पर्यंत दोरीवर सापाचा भास होतो. तुकाराम महाराज म्हणतात बागुल बुवा मुळात कोठेच नाही हे कळते तेंव्हा त्या बागुल बुवाचे भय राहत नाही
अभंग क्र. 383
आता पुढे धरी । माझे आठव वैखरी ॥१॥
नको बडबडू भांडे । काही वाउगे ते रांडे ॥धृपद॥
विठ्ठल विठ्ठल । ऐसे सांडुनिया बोल ॥२॥
तुका म्हणे आण । तुज स्वामीची हे जाण ॥३॥
अर्थ
हे माझी वैखरी वाणी तू आता यापुढे सतत हरिनामाचे स्मरण करत रहा. हे रांडे तू हरिनामा वाचून व्यर्थ काहीही बडबड करत जाऊ नकोस. विठ्ठल विठ्ठल हे नामस्मरण सोडून व्यर्थ बडबड करशील तर, तुकाराम महाराज म्हणतात तुला तुझा स्वामीविठ्ठलाची शपथ आहे.
अभंग क्र. 384
काय नव्हे करिता तुज । आता राखे माझी लाज ॥१॥
मी तो अपराधाची राशी । शिखा अंगुष्ट तोपाशी ॥धृपद॥
त्राहे त्राहे त्राहे । मज कृपादृष्टी पाहे ॥२॥
तुका म्हणे देवा । सत्य घ्यावी आता सेवा ॥३॥
अर्थ
देवा तुला काय करता येणार नाही, म्हणून माझे लज्जा रक्षण कर. हे काम तर तुला मुळीच कठीण नाही. मी तर अपराधाची मूर्ती आहे. देवा, माझ्या कडे कृपा दृष्टीने पहा आणि माझे रक्षण कर, असे मी त्रिवार सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात आता मज कडून खरी सेवा करुन घे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















