२५ मे, दिवस १४५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ४५१ ते ४७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १७२९ ते १७४०

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२५ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २५ May
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २५ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १७२९ ते १७४० चे पारायण आपण करणार आहोत.
२५ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ४५१ ते ४७५,

451-11
तरी मी काळु गा हे फुडे । लोक संहारावयालागी वाढे । सैंघ पसरिली आहाती तोंडे । आता ग्रासीन हे आघवे ॥451॥
तर अर्जुना ! मी(खरोखर काळ) आहे, हे स्पष्ट जाण. सर्व लोकाचा संहार करण्यकरिता मी वाढत आहे. ही जिकडे तिकडे सर्वत्र माझी उग्र मुखे पसरली असून, या सर्व विश्वाला आता मी गिळून टाकींन.
452-11
एथ अर्जुन म्हणे कटकटा । उबगिलो मागिल्या संकटा । म्हणौनि आळविला तव वोखटा । उवाइला हा ॥452॥
तेव्हा अर्जुन म्हणतो, अरेरे ! अगोदर विश्वरूपाच्या मुखात होत असलेल्या सर्व लोकांच्या संहाराला पाहून मी त्रस्त झालो होतो; म्हणून भगवंताची प्रार्थना केली, तो तो अधिकच निष्ठुरपणाने प्रगट झाला.
453-11
तेवीचि कठिण बोले आसतुटी । अर्जुन होईल हिंपुटी । म्हणौनि सवेचि म्हणे किरीटी । परि आन एक असे ॥453॥
तसेच जीवाची आशा नाहीशी करणार्‍या निष्ठूर बोलण्याने अर्जुन अत्यंत कष्टी होईल, म्हणून भगवान लगेच म्हणाले, अर्जुना ! पण त्यात दुसरे एक आहे.
454-11
तरी आताचिये संहारवाहरे । तुम्ही पांडव असा बाहिरे । तेथ जातजाता धनुर्धरे । सांवरिले प्राण ॥454॥
तुम्ही पांडव मात्र आता होणार्‍या या संहाररूपी बाधेच्या बाहेर आहांत. हे ऐकताच अर्जुनाने जात असलेले प्राण सावरले
455-11
होता मरणमहामारी गेला । तो मागुता सावधु जाहला । मग लागला बोला । चित्त देऊ ॥455॥
अर्जुन मरणाच्या महामारीत सापडला होता; पण भगवंताच्या अश्वासनाने पुनः देहावर आला आणि मग भगवंताच्या बोलण्याकडे चित्त देऊ लागला.

456-11
ऐसे म्हणिजत आहे देवे । अर्जुना तुम्ही माझे हे जाणावे । येर जाण मी आघवे । सरलो ग्रासू ॥456॥
देव असे म्हणू लागले की, अर्जुना ! तुम्ही माझे आहांत, हे लक्षात असू दे. बाकीच्या सर्वाना ग्रासण्याकरीता मी प्रवृत्त झालो आहे.
457-11
वज्रानळी प्रचंडी । जैसी घापे लोणियाची उंडी । तैसे जग हे माझिया तोंडी । तुवा देखिले जे ॥457॥
प्रलयकालाच्या अग्निमध्ये, ज्याप्रमाणे लोण्याचा गोळा घालावा, त्याप्रमाणे हे संपूर्ण जग, माझ्या तोंडात जात आहे, हे जे तू पाहिलेस
458-11
तरी तयामाझारी काही । भरवसेनि उणे नाही । इये वायाचि सैन्ये पाही । बरवते आहाती ॥458॥
त्यात तर यत्किंचितहि अन्यथा होणार नाही. दोन्हीकडील सैन्ये व्यर्थच आपल्या पराक्रमाची फुशारकी मारत आहेत.
459-11
ऐसा चतुरंगाचिया संपदा । करित महाकाळेसी स्पर्धा । वांटिवेचिया मदा । वघळले जे ॥459॥
असे हे सैन्याचे मिळालेले समुदाय, पराक्रमाचे बळ आणून कुंथु लागले आहेत आणि यमापेक्षाहि आमचे गजदळ श्रेष्ठ आहे अशी त्याची प्रशंसा करतात.
460-11
हे जे मिळोनिया मेळे । कुंथती वीरवृत्तीचेनि बळे । यमावरी गजदळे । वाखाणिजताती ॥460॥
हे म्हणतातकी, यासृष्टीवर दुसरीसृष्टि निर्माण करू. पैजबांधून मृत्युलामारू आणि या सर्व जगाचा घोट भरू.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

461-11
म्हणती सृष्टीवरी सृष्टी करू । आण वाहूनि मृत्यूते मारू । आणि जगाचा भरू । घोटु यया ॥461॥
सर्व पृथ्वी गिळू. वरच्यावरच आकाश जाळु. वार्‍याला देखील बाणाने जखडून टाकू
462-11.
पृथ्वी सगळीचि गिळू । आकाश वरिच्यावरी जाळू । का बाणवरी खिळू । वारयाते ॥462॥
पराक्रमाच्या मदाने मत्त होऊन अशा या चतुरंग सैन्यसंपत्तीच्या बळावर जे कृतांताशी स्पर्धा करीत आहेत.
463-11
बोल हतियेराहूनि तिखट । दिसती अग्निपरिस दासट । मारकपणे काळकूट । महुर म्हणत ॥463॥
यांचे हे सर्व शब्द शस्रांपेक्षां तीक्ष्ण आणि अग्निपेक्षा दाहक दिसतात आणि प्राण घेण्यात यांच्यापेक्षा काळकूटही मधूरच म्हणावे लागेल.
464-11
तरी हे गंधर्वनगरींचे उमाळे । जाण पोकळीचे पेंडवळे । अगा चित्रीव फळे । वीर हे देखे ॥464॥
परंतु अर्जुना ! हे सर्व योध्दे गंधर्वनगरीचे देखावे किंवा भेंडोळे अथवा चित्रांतील पुतळे आहेत, पहा !
465-11
हा गा मृगजळाचा पूर आला । दळ नव्हे कापडाचा साप केला । इया शृंगारूनिया खाला । मांडिलिया पैंजण 465
अरे ! ही सर्व सैन्ये म्हणजे मृगजळाचा पूर होय, ही सैन्ये नसून कापडाचा साप आहे किंवा कातड्यात भुसा भरून तयार केलेल्या व श्रृंगारलेल्या ह्या बाहुल्या मांडल्या आहेत.

तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व
जित्वा शत्रून्भुंक्ष्व राज्यं समृद्धम् ।
मयैवैते निहताः पूर्वमेव
निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥11. 33॥

अर्थ म्हणून तू युद्धाला उभा रहा. यश संपादन कर. शत्रूंना जिंकून समृद्धियुक्त अशा राज्याचा उपभोग घे. हे सर्व मी पूर्वीच मारून टाकलेले आहेत. हे सव्यसाचिन् (तू) केवल निमित्तमात्र हो. ॥11-33॥

466-11
येर चेष्टविते जे बळ । ते मागाचि मिया ग्रासिले सकळ । आता कोल्हारिचे वेताळ । तैसे निर्जीव हे आहाती ॥466॥
बाकी हालचाल करविणारे जे बळ मी पहिलेच गिळून टाकले आहे. आता हे सर्व सैन्य कुंभाराने केलेल्या मातीच्या वेताळाप्रमाणे निर्जीव आहे.
467-11
हालविती दोरी तुटली । तरी तिये खांबावरील बाहुली । भलतेणे लोटिली । उलथोनि पडती ॥467॥
बाहुलिला नाचविणारी दोरी तुडली तर, खांबावरील बाहूल्या वाटेल त्याने लोटल्या की उलथून पडतात.
468-11
तैसा सैन्याचा यया बगा । मोडता वेळू न लगेल पै गा । म्हणौनि उठी उठी वेगा । शाहाणा होई ॥468॥
त्याप्रमाणे सैन्याची ही रचना मोडण्याला, अर्जुना वेळ लागणार नाही; म्हणून एकदम उठ, शहाणा हो.
469-11
तुवा गोग्रहणाचेनि अवसरे । घातले मोहनास्त्र एकसरे मग विराटाचेनि महाभेडे उत्तरे । आसडूनि नागाविले ॥469॥
गोग्रहणाचे वेळी तू संपूर्ण सैन्यावर मोहनास्र घातलेंस व मग विराटराजाच्या अति भित्र्या उत्तराने सैन्याची वस्रे हिसकावून त्यांना नग्न केले.
470-11
आता हे त्याहूनि निपटारे जहाले । निवटी आयिते रण पडिले । घेई यश रिपु जिंतिले । एकलेनि अर्जुने ॥470॥
आता हे सैन्य त्याच्याहूनहि निकृष्ट दर्जाचे झाले आहे. आधीच मरून पडलेले सैन्य नाहीसे कर व एकट्या अर्जुनाने शत्रूला जिंकले असे यश घें.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

471-11
आणि कोरडे यशचि नोहे । समग्र राज्यही आले आहे । तू निमित्तमात्रचि होये । सव्यसाची ॥471॥
नुसते यशच नाही तर संपूर्ण राज्यहि तुला प्राप्त झाले आहे. अर्जुना ! यांच्या नाशाला तू नुसता निमित्तमात्रच होणार आहे.

द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णा तथान्यानपि योधवीरान् ।
मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्‌नान् ॥11. 34॥

अर्थ द्रोण, भीष्म, जयद्रथ, कर्ण तसेच इतरही युद्धातले वीर मी मारलेले आहेत. त्यांना तू ठार कर. भिऊ नको. युद्ध कर. प्रतिपक्षीयांना तू जिंकशील ॥11-34॥

472-11
द्रोणाचा पाडु न करी । भीष्माचे भय न धरी । कैसेनि कर्णावरी । परजू हे न म्हण ॥472॥
द्रोणाच्या बरोबरीचा मी नाही असे मनात आणू नकोस. भीष्माची भीति बाळगू नकोस. कर्णावर शस्र कसे चालवू असे म्हणू नकोस.
473-11
कोण उपायो जयद्रथा कीजे । हे न चिंतू चित्त तुझे । आणिकही आथि जे जे । नावाणिगे वीर ॥473॥
वजयद्रथाला मारण्याकरिता कोणता उपाय करावा, याचे चिंतन मनात करू नकोस. आणखी जे जे नांवाजलेले पराक्रमी वीर आहेत,
474-11
तेही एक एक आघवे । चित्रींचे सिंहाडे मानावे । जैसे वोलेनि हाते घ्यावे । पुसोनिया ॥474॥
ते सर्व ओल्यृ हातांनी पुसून घेण्यासारखे भिंतीवर काढलेल्या सिंहाची चित्रे आहेत असे मान.
475-11
यावरी पांडवा । काइसा युद्धाचा मेळावा ? । हा आभासु गा आघवा । येर ग्रासिले मिया ॥475॥
अशा स्थितीत अर्जुना ! हे काय युध्दाकरिता जमलेले सैन्य आहे ? हा सर्व भास असून, बाकीचे हे सर्व मी गिळून टाकले आहेत.

दिवस १४५ वा, २५, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १७२९ ते १७४०
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. १७२९
शूरत्वासी मोल । नये कामा फिके बोल ॥१॥
केला न संडी कैवाड । जीवेसाठी तो हे होड ॥धृपद॥
धीर तो कारण । साह्य होतो नारायण ॥२॥
तुका म्हणे हरी । दासा रिक्षतो निर्धारी ॥३॥
अर्थ
कोठेही जा शुरत्वाला किंमत आहे केवळ व्यर्थ बडबड फिके बोल का उपयोगी येत नाही. केलेली प्रतिज्ञा जीवावर उदार होऊन पूर्ण करतो तोच खरा धैर्यशाली आहे. कोणतेही कार्य करताना धैर्य अतिशय महत्वाचे आहे आणि ज्याच्या अंगी धैर्य आहे त्यालाच नारायण सहकार्य करतो. तुकाराम महाराज म्हणतात, “तो हरी त्याच्या भक्तांचे त्याच्या दासांचे निर्धाराने रक्षण करत असतो. ”
अभंग क्र. १७३०
हरीच्या दासा भये । ऐसे बोलो ते ही नये ॥१॥
राहोनिया आड । उभा देव पुरवी कोड ॥धृपद॥
हरीच्या दासा चिंता । अघटित हे वार्ता ॥२॥
खावे ल्यावे द्यावे । तुका म्हणे पुरवावे ॥३॥
अर्थ

हरीच्या दासांना भय असते असे बोलू देखील नये. देव त्यांच्या आड उभा राहून त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असतो. हरीच्या दासांना चिंता उत्पन्न होते ही वार्ता कधीही घडणे शक्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात अहो देव हरीच्या दासांना म्हणजे त्याच्या दासांना खाण्यासाठी अन्न, अंगावर पाघरण्यासाठी वस्त्र देऊन सर्व त्यांचे मनोरथ पूर्ण करत असतो.
अभंग क्र. १७३१
दासा सर्वकाळ । तेथे सुखाचे कल्लोळ ॥१॥
जेथे वसती हरीचेदास । पुण्य पिके पापा नास ॥धृपद॥
फिरे सुदर्शन । घेऊनिया नारायण ॥२॥
तुका म्हणे घरी । होय म्हणियारा कामारी ॥३॥
अर्थ
हरीदास जेथे असतात तेथे त्यांना सर्वकाळ सुखाच्या लाटा येत असतात. जेथे हरीचे दास राहातात तेथे पुण्य पिकते आणि पापाचा नाश होत असतो. हा नारायण भक्तांचे रक्षण करण्याकरता सदा सर्वकाळ सुदर्शन हातात घेऊन त्यांच्याभोवती फिरत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “हा हरी भक्तांचे सेवकत्व पत्करतो. ”
अभंग क्र. १७३२
आमचा स्वदेश । भुवनत्रयामध्ये वास ॥१॥
मायबापाची लाडकी । कळो आले हे लौकिकी ॥धृपद॥
नाही निरपराध । कोणा आम्हामध्ये भेद ॥२॥
तुका म्हणे मान । अवघे आमचे हे धाम ॥३॥
अर्थ
त्रिभूवन म्हणजे आमचा स्वदेश आहे व त्यामध्येच आम्ही वास्तव्य करत आहोत. आम्ही रखुमाईचे आणि‍ विठ्ठलाचे लाडके लेकरे आहोत हे सर्वानाच कळून आले आहे. आम्ही कोणामध्येही भेद मानत नाही व कोणालाही दुष्ट समजत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “सर्व धाम म्हणजे हे केवळ आमच्यासाठी हरीनामच आहे. ”
अभंग क्र. १७३३
काय ढोरापुढे घालूनि मिष्टान्न । खरासी लेपन चंदनाचे ॥१॥
नको नको देवा खळाची संगति । रस ज्या पंगती नाही कथे ॥धृपद॥
काय सेज बाज माकडा विलास । अळंकारा नास करुनी टाकी ॥२॥
तुका म्हणे काय पाजूनि नवनीत । सर्पा विष थीत अमृताचे ॥३॥
अर्थ

जनावरापुढे मिष्टान्न ठेवून त्यांना त्याची चव कळणार आहे काय त्याचा काही उपयोग होणार आहे का आणि चंदनाची उटी गाढवाला लावली तरी काही उपयोग होणार आहे का ते पुन्हा उकिरडयातच जाऊन लोळणार आहे. त्याप्रमाणे देवा मला दुष्टांची संगती नको अजिबातच नको कारण ज्यांना हरीकथेतील ब्रम्हरसच समजत नाही त्यांच्या पंगतीला बसणे देखील मला नको वाटते. जर वानराला बसण्यास चांगल्या प्रकारचा बाज ज्यावर चांगल्या प्रकारची गादी टाकली त्याला अलंकार घालावयास दिले आणि खाण्यापिण्यासाठी उत्तम पदार्थही दिले तरी त्याच्या स्वभावगुणाप्रमाणे तो त्या सर्व गोष्टींचा नाशच करुन टाकणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो सर्पाला दूध किंवा अमृत पाजले तरी त्याचा काही उपयोग होत नाही कारण ते शेवटी पोटात गेल्यानंतर विषच तयार होते. ”
अभंग क्र. १७३४
आनंदे एकांती प्रेमे वोसंडत । घेऊ अगणित प्रेमसुख ॥१॥
गोप्य धन नये वारा लागो यास । पाहो नेदू वास दुर्जनासी ॥धृपद॥
झणी दृष्टि लागे आवडीच्या रसा । सेवू जिरे तैसा आपणासी ॥२॥
तुका म्हणे हे बहु सकुमार । न साहावे भार वचनाचा ॥३॥
अर्थ
आम्ही आनंदाने एकातात बसू व अगणित हरीचे सुख आवडीने घेवू. हरीचे प्रेमसुख म्हणजे गुप्तधन आहे आणि याला बाह्य अहंकाराचा वारा देखील लागू देवू नये आणि दुर्जनाला तर हे सुख दिसू सुध्दा देवू नये. हरीच्या प्रेमसुखला कोणाची नजर लागू नये याकरता आपण एकातात जाऊन हे हरीचे प्रेमसुख सेवन करु जेणे करुन याला कोणाचीही दृष्ट लागणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “हे हरीचे प्रेमसुख म्हणजे फार सुकुमार आहे हे असे प्रकारचे आहे किंवा हे तसे प्रकारचे आहे असा वर्णनाचा शाब्दिक भार देखील सहन होत नाही. ”
अभंग क्र. १७३५
मोक्षपदे तुच्छ केली याकारणे । आम्हा जन्म घेणे युगायुगी ॥१॥
विटे ऐसे सुख नव्हे भक्तीरस । पुडतीपुडती आस सेवावे हे ॥धृपद॥
देवा हाती रूप धरविला आकार । नेदू निराकार होऊ त्यासी ॥२॥
तुका म्हणे चित्त निवांत राहिले । ध्याई ती पाउले विटेवरी ॥३॥
अर्थ

हरीचे प्रेमसुख भोगण्याकरता व हरीच्या प्रेमसुखापुढे आम्हाला मोक्षपद देखील तुच्छ आहे आणि ते प्रेमसुख पुन्हा पुन्हा मिळावे याकरता आम्ही पुन्हा पुन्हा युगानुयुगे जन्म घेवू. हरी प्रेमसुख व हरीच्या भक्तीचा रस हा अवीट आहे आणि याचे पुन्हा पुन्हा सेवन करावे अशीच इच्छा मनात असते. याकरताच आम्ही देवाच्या हाताला धरुन त्याला आकार धारण करायला लावला आहे आता त्यास आम्ही निराकार होऊ देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “विटेवर असलेले हरीचे समचरण हेच माझ्या चित्तामध्ये निश्चिंतपणे आहे व त्याच ठिकाणी माझे चित्त रमले आहे व त्याच विटेवरील पावलाचे मी ध्यान करीत आहे. ”
अभंग क्र. १७३६
नको बोलो भांडा । खीळ घालून बैस तोंडा ॥१॥
ऐक विठोबाचे गुण । करी सादर श्रवण ॥धृपद॥
प्रेमसुखा आड । काय वाजाते चाभाड ॥२॥
तुका म्हणे हिता । का रे नागवसी थीता ॥३॥
अर्थ

हे भांडखोर मनुष्या येथे हरिकथा चालू आहे त्यामुळे व्यर्थ बडबड करु नकोस तोंडाला खिळ घालून गप बस. आता विठोबाचे गुणगान ऐकण्यास तू सावध राहा आणि हरी कथा ऐकण्यास तत्पर रहावे. अरे येथे हरिकथा चे सुख चालू आहे आणि असे प्रेमसूख चालू असताना तू बडबड करून त्या प्रेम सुखाच्या आड का येत आहेस ? तुकाराम महाराज म्हणतात अरे तू हरी कथा ऐकून स्वतःचे हित करून घ्यावेस व्यर्थ बडबड करून स्वतःचा हिताला का अडवत आहेस.
अभंग क्र. १७३७
अति जाले उत्तम वेश्येचे लावण्य । परि ते सवासीण न म्हणावी ॥१॥
उचित अनुचित केले ठाया ठाव । गुणा मोल वाव थोरपण ॥धृपद॥
शूरत्वावाचूनि शूरांमाजी ठाव । नाही आयुर्भाव आणिलिया ॥२॥
तुका म्हणे सोंग पोटाचे उपाय । कारण कमाईविण नाही ॥३॥
अर्थ

वेश्येने कितीही उत्तम प्रकारे लावण्य केले तरी पण तिला कोणीही सुवासीनी म्हणू नये. त्याप्रमाणे या हरीने प्रत्येकाच्या ठिकाणी उचित अनुचित असा भेद निर्माण केला आहे त्यामुळे नेहमी सद्गुणालाच वाव दयावा. केवळ शूरपणाचा आव आणला तर जमत नाही तर प्रत्यक्षात शूराप्रमाणे वागावे लागते तरच लोकांच्या मनामध्ये त्याच्या शूरपणाचे स्थान निर्माण होते. तुकाराम महाराज म्हणतात, “पोट भरण्याकरता विविध प्रकारचे सोंग करुन अनेक उपायाने पोट भरता येईल परंतू परमार्थ करण्याविषयी दैवी संपत्ती प्राप्त झाल्याशिवाय कार्य पूर्ण होत नाही. ”
अभंग क्र. १७३८
शूरा साजती हतियारे । गांढया हासतील पोरे ॥१॥
काय केली विटंबण । मोती नासिकावाचून ॥धृपद॥
पतिव्रते रूप साजे । सिंदळ काजळ लेता लाजे ॥२॥
दासी पत्नी सुता । नव्हे सरी एकची पिता ॥३॥
मान बुद्धिवंता । थोर न मनिती पिता ॥४॥
तुका म्हणे तरी । आता शुद्ध दंडे वरी ॥५॥
अर्थ

शूराने जर आपल्या हातात शस्त्र धरले तर त्यालाच ते शोभून दिसतात परंतू एखादया भित्र्या व्यक्तीने हातात शस्त्र धरले तर लहान मुले देखील त्याला हसतात. नाक व्यवस्थित नसलेल्या स्त्रीने जर मोत्याची नथ नाकात घातली तर तिने स्वत:चीच फजिती केली असे होत नाही काय ? पतिव्रता स्त्रीने अनेक प्रकारचे अलंकार करुन स्वत:ला सजविले तर ते तिला साजेसे असते परंतू एखादी व्याभिचारीण स्त्री काजळ देखील डोळयात घालताना लाजत असते. दासीचा पुत्र आणि पत्नीचा पुत्र या दोघाचा बाप जरी एकच असला तरी त्या दोघाची योग्यता एकसारखी नसते. बुध्दिमंत लोकांना जनमाणसामध्ये मानसन्मान मिळतो परंतू त्याचाच पिता वयाने मोठा असल्यामुळे त्याला मान देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “जो अंत:करणातून शुध्द आहे त्यालाच त्याने वरती वर वर केलेले वस्त्र शोभतात. ”
अभंग क्र. १७३९
काय केले जळचरी । ढीवर त्यांच्या घातावरी ॥१॥
हा तो ठायीचा विचार । आहे यातिवैराकार ॥धृपद॥
श्वापदाते वधी । निरपराधे पारधी ॥२॥
तुका म्हणे खळ । संता पीडिती चांडाळ ॥३॥
अर्थ

जलचर प्राण्यांनी कोळयांचे काही अपराध केलेले असतात का तर नाही तरी देखील ते कोळी लोक त्यांचा घात करतात. हा प्रकार म्हणजे पहिल्यापासूनच चालत आलेला असतो काही जातींचा काही जातींशी वैर असते. रानातील श्वापदे निरापराध असतात असे असून देखील पारधी लोक त्यांचा वध करतात. तुकाराम महाराज म्हणतात, “अगदी त्याप्रमाणे दुष्ट नालायक चांडाळ माणसे संतांनाही काही कारण नसताना त्रास देतच असतात. ”
अभंग क्र. १७४०
वाईटाने भले । हीने दाविले चांगले ॥१॥
एकाविण एका । कैचे मोल होते फुका ॥धृपद॥
विषे दाविले अमृत । कडू गोड घाते हित ॥२॥
काळिमेने ज्योती । दिवस कळो आला राती ॥३॥
उंच निच गारा । हिरा परिस मोहरा ॥४॥
तुका म्हणे भले । ऐसे नष्टांनी कळले ॥५॥
अर्थ

जगात जे काही वाईट म्हणून प्रवृत्ती आहेत त्यांनी जगातील सर्व चांगल्या प्रवृत्ती दाखवल्या त्या म्हणजे अशा प्रकारे कारण वाईट प्रवृत्ती घडल्या की चांगल्या प्रवृत्ती आपोआप दिसून येतात. एकावाचून दुसऱ्याची किंमत होईलच कशी ? विषामुळेच अमृताची किंमत आहे कडूपणामुळेच गोडपणालाही किंमत आहे त्याप्रमाणे घातामुळेच हिताची किंमत आहे. अंधारामुळेच प्रकाशाला किंमत आहे आणि दिवसानेच रात्रीची कल्पना आहे. गारामुळे हिरा परीस तसेच मोहरा यांची उत्कृष्टता दिसते जरी गारा हिऱ्याप्रमाणे मोहऱ्याप्रमाणे दिसत असली तरी देखील. तुकाराम महाराज म्हणतात, “जगात जेवढे काही दुष्ट आणि नष्ट व्यक्ती आहेत त्यांच्यामुळेच सज्जन लोकांना किंमत आहे. ”

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading