३० एप्रिल, दिवस १२० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा, ओवी १५१ ते १७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १४२९ ते १४४०

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“३० एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ३० Apirl
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ३० एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
xxxx एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी १५१ ते १७५,

151-10
अनादिसिद्ध तू स्वामी । जो नाकळिजसी जन्मधर्मी । तो तू हे आम्ही । जाणितले आता ॥151॥
प्रभो श्रीकृष्णा ! तू अनादि व स्वतःसिध्द ब्रह्मांडाचा स्वामी आहेस. तू जन्मादिधर्मात सांपडत नाहीस— म्हणजे तुला जन्मादिक नाहीत असा तू आहेस, हे आज मी जाणलें.
152-10
तू या कालयंत्रासि सूत्री । तू जीवकळेची अधिष्ठात्री । तू ब्रह्मकटाहधात्री । हे कळले फुडे ॥152॥
तू कालरूपी यंत्राचा सूत्रधार आहेस. तू या जीवरूपी चैतन्यांशाला अधिष्ठान आहेस. तूच या सर्व ब्रम्हांडाला धारण करणारा आहेस हे मला स्पष्ट कळून आले.

आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिनारदस्तथा ।
असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥10. 13॥

153-10
पै आणिकही एक परी । इये प्रतीतीची येतसे थोरी । जे मागे ऐसेचि ऋषीश्वरी । सांगितले तूते ॥153॥
तुझ्या वाक्याने जो अनुभव आला त्याची आणखीहि एका दृष्टीने थोरवी माझ्या अनुभवास आली कारण मागे मोठमोठ्या ऋषींनी असेच तुझ्याविषयी सांगितले होते.
154-10
परि तया सांगितलियाचे साचपण । हे आता माझे देखतसे अंतःकरण । जे कृपा केली आपण । म्हणोनि देवा ॥154॥
पण त्या सांगितलेल्याची सत्यता, आज माझ्या अंतःकरणाला पटली, याचे कारण देवा ! आपण माझ्यावर कृपा केली हे होय.
155-10
एऱ्हवी नारदु अखंड जवळा ये । तोही ऐसेचि वचनी गाये । परि अर्थ न बुजोनि ठाये । गीतसुखचि ऐको ॥155॥
नाही तरी नारदमुनि नेहमी आमचेकडे येत असत. तेहि अशारीतीने तुझे वर्णन करीत असत, पण त्यावेळी त्यांच्या वचनांचा अर्थ न समजता तुझ्या गायनाचे सुखच आम्हाला प्राप्त होत असे.


156-10
जी आंधळेयांचा गावी । आपणपे प्रगटले रवी । तरी तिही वोतपलीचि घ्यावी । वाचूनि प्रकाशु कैचा ? ॥156॥
अहो जी भगवंता ! आंधळ्यंच्या गावात जर सूर्य आपण होऊन प्रकाशित झाला तर त्या आंधळ्यांना सूर्याची कोवळी ऊनच घेता येईल. त्याशिवाय प्रकाश मिळणे कसे शक्य आहे ?
157-10
येरवी देवर्षि अध्यात्म गाता । आहाच रागांगेंसी जे मधुरता । तेचि फावे येर चित्ता । नलगेचि काही ॥157॥
त्याप्रमाणेच देवर्षि नारदमुनि देखील तुझ्या आध्यात्मस्वरूपाचेच वर्णन करीत असत, पण त्या वर्णनाला रागरागिणीमुळे जी वरवर गोडी येत होती, तिचाच आमच्या चित्ताला लाभ होत होता, दुसरा कोणताहि लाभ होत नव्हता.
158-10
पै असिता देवलाचेनिहि मुखे । मी एवंविधा तूते आइके । परी तै बुद्धि विषयविखे । घारिली होती ॥158॥
तसेंच असित, देवल, या ऋषीच्या मुखाने असेच तुझे वर्णन आम्ही ऐकत असूं, पण त्यावेळी आमचे अंतःकरण विषयरूपी विषाने व्यापिले होते.
159-10
विषयविषाचा पडिपाडू । गोड परमार्थु लागे कडू । कडू विषय तो गोडू । जीवासी जाहला ॥159॥
विषयरूपी विषाचा एवढा प्रताप आहे की जीवाला, परमार्थ गोड असून कडू वाटतो व विषय कडू असूनहि गोड वाटतात.
160-10
आणि हे आणिकांचे काय सांगावे । राउळा आपणचि येऊनि व्यासदेवे । तुझे स्वरूप आघवे । सर्वदा सांगिजे ॥160॥
भगवंता ! दुसर्‍याचे कशाला सांगू ! पुष्कळदां स्वतः भगवान व्यासांनी आमच्या राजवाड्यात येऊन तुझ्या स्वरूपाचे सदा संपूर्ण वर्णन करीत असावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


161-10
परि तो अंधारी चिंतामणि देखिला । जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला । पाठी दिनोदयी वोळखिला । होय म्हणौनि ॥161॥
पण ज्याप्रमाणे आंधारांत चिंतामणि पडला असता तो चिंतामणि नव्हे या बुध्दीने उपेक्षा होते. नंतर उजाडल्यावर, तो चिंतामणिच होय ओळखला जातो.
162-10
तैसी व्यासादिकांची बोलणी । तिया मजपाशी चिद्रत्‍नांचिया खाणी । परि उपेक्षिल्या जात होतीया तरणी । तुजवीण कृष्णा ॥162॥
त्याप्रमाणे व्यासादिकांची बोलणी म्हणजे मला प्राप्त झालेल्या चैतन्यरूपी रत्नांच्या खाणीच होत्या, पण हे श्रीकृष्णा ! तुझ्या सूर्यप्रकिशाच्या अभावी त्यांची उपेक्षाच होत होती.

सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव ।
न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥10. 14॥

163-10
ते आता वाक्यसूर्यकर तुझे फाकले । आणि ऋषी मार्ग होते जे कथिले । तया आघवियांचेचि फिटले । अनोळखपण ॥163॥
तेच आता तुझे वाक्यरूपी सूर्यकिरण माझ्या अंतःकरणात फांकल्यामुळे पूर्वी ऋषींनी जे मार्ग सांगून ठेविले आहेत त्या सर्वाची आज ओळख पटली — म्हणजे त्यांनी जे तुझ्या स्वरूपाचे पूर्ण ब्रह्मत्वाने वर्णन केले होते ते सर्व यथार्थ होते, याचा आज मला अनुभव आला.
164-10
जी ज्ञानाचे बीज तयांचे बोल । माजी हृदयभूमिके पडिले सखोल । वरि इये कृपेची जाहाली वोल । म्हणोनि संवादफळेशी उठले ॥164॥
देवा ! त्या ऋषींचे बोलणे हे आत्मज्ञानाचे बीज होय. ते माझ्या ह्रदयरूपी भूमीत खोल पडले व त्यावर तुझ्या कृपेचा ओलावा मिळाल्यामुळे ते बीज अंकुरित होऊन ते सर्व संवादरूपी यथार्थबोधाने फलद्रूप झाले.
165-10
अहो नारदादिका संता । त्यांचिया उक्तिरूप सरिता । मी महोदधी जाला अनंता । संवादसुखाचा ॥165॥
देवा ! नारदादि संतांच्या वचनरूप नद्यांना मी एकवाक्यतारूप संवादसुखाचा समुद्र झालो.


166-10
प्रभु आघवेनि येणे जन्मे । जिये पुण्ये केली मिया उत्तमे । तयांची न ठकतीचि अंगी कामे । सद्‍गुरु तुवा ॥166॥
देवा ! या आणि मागील सर्व जन्मात जेवढे काही निष्काम पुण्य केले असेल त्याचे, सद्गुरुप्राप्ती हे जे फळ, ते कधी होत नाही असे नाही. म्हणूनच तू मला सद्गुरू प्राप्त झालास.
167-10
एऱ्हवी वडिलवडिलांचेनि मुखे । मी सदा तूते कानी आइके । परि कृपा न कीजेचि तुवा एके । तव नेणवेचि काही ॥167॥
वस्तुतः वाडवडिलांच्या मुखाने मी तुझ्या स्वरूपाचा महिमा सदा कानाने ऐकत होतो, पण जोपर्यंत तुझी कृपा झाली नव्हती, तोपर्यंत मला तुझा महिमा कळू शकला नाही.
168-10
म्हणोनि भाग्य जै सानुकूळ । जालिया केले उद्यम सदा सफळ । तैसे श्रुताधीत सकळ । गुरुकृपा साच ॥168॥
म्हणून ज्याप्रमाणे आपले दैव जेव्हा अनुकूल होते, तेव्हा केलेले सर्व प्रयत्न सफळ होतात, त्याप्रमाणे श्रीगुरुकृपेनेच संपूर्ण श्रवण व पठण केलेल्या वचनांचा यथार्थ बोध होतो.
169-10
जी बनकरु झाडे सिंपी जीवेसाटी । पाडूनि जन्मे काढी आटी । परि फळेसी तैचि भेटी । जै वसंतु पावे ॥169॥
देवा ! माळ्याने आपल्या जिवाच्या मोबदल्याने— म्हणजे झाडाचे जगणे तेच आपले जगणे असे समजून— झाडाना पाणी घातले आणि जन्मापाठी जन्म घेऊन असेच कष्ट केले, तरीपण एवढ्या कष्टानेही झाडाना फळे येतातच असे नाही, ते वसंतऋतूच्या स्वाधीन आहे.
170-10
अहो विषमा जै वोहट पडे । तै मधुर ते मधुर आवडे । पै रसायने तै गोडे । जै आरोग्य देही ॥170॥
त्याचप्रमाणे देवा ! त्रिदोषाची विषमता कमी झाली असता, मधुररस मधुर लागतो, आणि देहाच्या ठिकाणी आरोग्य असले तरच रसायन परिणामकारक होते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


171-10
का इंद्रिये वाचा प्राण । या जालियांचे तैचि सार्थकपण । जै चैतन्य येऊनि आपण । संचरे माजी ॥171॥
चैतन्य शरीरांत प्रवेश करीते तेव्हाच इंद्रिये, वाणी, प्राण यांचे असण्याचे सार्थक होते.
172-10
तैसे शब्दजात आलोडिले । अथवा योगादिक जे अभ्यासिले । ते तैचि म्हणो ये आपुले । जै सानुकूल गुरु ॥172॥
त्याप्रमाणे मनुष्य जेवढे काही शास्रावलोकन करतो किंवा योगादिक मार्गाचा अभ्यास करतो, तेवढे सर्व श्रीगुरुची कृपा झाली तरच खरोखर स्वाधीन होते.
173-10
ऐसिये जालिये प्रतीतीचेनि माजे । अर्जुन निश्चयाचि नाचतुसे भोजे । तेवीचि म्हणे देवा तुझे । वाक्य मज मानले 173॥
(श्रीगुरुकृपेनेच शब्द यथार्थ समजू शकतात. ) या आलेल्या अनुभवाने अर्जुन मत्त होऊन, दृढ निश्चयाची मूर्ती होऊन, नाचूं लागला व तसेंच, ‘देवा ! तुझे म्हणणे मला पटले’ असे म्हणू लागला.
174-10
तरि साचचि हे कैवल्यपती । मज त्रिशुद्धी आली प्रतीती । जे तू देवदानवांचिये मती- । जोगा नव्हसी ॥174॥
हे कैवल्याचे स्वामी भगवंता ! तरी तू खरोखरच देवदानवांच्या बुध्दीस आकलन होण्यासारखा नाहीस, हे त्रिवार सत्य आहे, असा मला अनुभव आला.
175-10
तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा । जो आपुलिया जाणे जाणिवा । तो कहीचि नोहे हे स‍द्भावा । भरवसेनि आले ॥175॥
तुझ्या कृपेने जोपर्यंत तुझ्या वचनाचा यथार्थ स्पष्ट बोध होत नाही, तोपर्यंत आपल्या बुध्दीनेच जाणण्याचा एखाद्याने कितीहि प्रयत्न केला, तरी त्याला त्यांचा यथार्थ बोध होणे कधीहि शक्य नाही, हे मला निश्चित कळून आले.

दिवस ११९ वा, ३०, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १४२९ ते १४४०
सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. १४२९
लौकिकापुरती नव्हे माझी सेवा । अनन्य केशवा दास तुझा ॥१॥
म्हणऊनि करी पायासवे आळी । आणीक वेगळी नेणे परी ॥धृपद॥
एकविध आम्ही स्वामिसेवेसाठी । वरी तोचि पोटी एकभाव ॥२॥
तुका म्हणे करी सांगितले काम । तुम्हा धर्माधर्म ठावे देवा ॥३॥
अर्थ

हे केशवा लोकांना दाखविण्या पुरतीच मी तुझी सेवा करत नाही. तर मी तुझा अनन्य दास आहे. त्यामुळे मी तुझ्या पायाच्या सेवेचा हट्ट धरला आहे व या वाचून मी दुसरे काहीही जाणत नाही. स्वामीची सेवा करण्याची आमची आवड आहे व एकनिष्ठ भक्ती भाव आहे आणि जसा वरवर एकनिष्ठ भक्तीभाव आहे तसाच अंतकरणात देखील आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही मला जे काम सांगितले आहे ते मी करत आहे देवा, आता त्यामध्ये धर्म काय आहे की अधर्म काय आहे ते तुम्हालाच माहित.
अभंग क्र. १४३०
ज्यांच्या संगे होतो पडिलो भोवनी । ते केली धोवनी झाडूनिया ॥१॥
आता एकाएकी मनासी विचार । करू नाही भार दुजियाचा ॥धृपद॥
प्रसादसेवने आली उष्टावळी । उचित ते काळी अविचित ॥२॥
तुका म्हणे वर्म सापडले हाती । सांडिली ते खंती चिंता देवा ॥३॥
अर्थ

मी ज्या संसाराच्या संगतीने जन्म-मरण रूप दुखात पडलो होतो आता त्या संसाराला मी धुऊन झाडून टाकले आहे. आता मी माझ्या एकट्या मनाशीच विचार करणार इतर कोणतेही ओझे बाकी राहिले नाही. मी प्रसाद सेवन करणार, तोच मला योग्य वेळी संतांच्या उचिष्ट प्रसादाचा लाभ झाला. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या हाती तुला प्राप्त करून घेण्याचे वर्म सापडले आहे त्यामुळे मी सर्व चिंता खंत करण्याचे टाकून दिले आहे.
अभंग क्र. १४३१
आवडीभोजन प्रकार परवडी । भिन्नाभिन्न गोडी एक रसा ॥१॥
भोगित्या पंगती लाधलो प्रसाद । तिही नाही भेद राखियेला ॥धृपद॥
पाकसिद्धि स्वहस्तके विनियोग । आवडीचे भाग सिद्ध केले ॥२॥
तुका म्हणे आला उच्छिष्ट प्रसाद । तेणे हा आनंद माझ्या जीवा ॥३॥
अर्थ

उत्तम प्रकारच्या पक्वान्ना मध्ये अनेक प्रकारचे पदार्थ असतात व त्यांची चव देखील भिन्नभिन्न असते. संत त्यांच्या आवडीने भोजन घेत होते त्यावेळी त्यांनी मला तिथे त्यांच्याबरोबर भोजनास बसविले. त्यांनी पंक्ती भेद न करता मला जेवायला बसविले त्यामुळे मला तेथे बसता आले. संतांनी हे परमार्थ रूप भोजन तयार केले आहे व ज्याचा जसा अधिकार असेल तसे त्याला ज्ञान, भक्ती, वैराग्य असे अन्न वाढले आहे. तुकाराम महाराज म्हणतात संतांनी केलेल्या परमार्थ रूप स्वयंपाक मला मिळले व त्यामुळे मला फार आनंद झाला.
अभंग क्र. १४३२
समर्थाचा ठाव संचलाचि असे । दुर्बळाची आस पुढे करी ॥१॥
फावले घेईन पदरी हे दान । एकांती भोजन करू जाऊ ॥धृपद॥
न लगे पाहावी उचिताची वेळ । अयाचित काळ साधला तो ॥२॥
तुका म्हणे पोट धालिया उपरी । गौरवा उत्तरी पूजू देवा ॥३॥
अर्थ

संतांकडे नेहमी भक्ती, वैराग्य आणि ज्ञान हे गुण आसतात, त्यामुळे मी दरिद्री, मला काहीतरी लाभ होईल या अपेक्षेने त्यांच्याकडे धाव घेत आहे. आता समर्थ संतांकडून जे दान मिळाले ते दान घेऊ आणि एकातात जाऊन ते सेवन करू. संतांना दान मागण्यासाठी वेळ काळ पाहण्याची गरज नसते तर संत दान देण्यास नेहमीच तत्पर असतात. कधी कधी तर असे होते की संत आपण होऊन दान देतात. तुकाराम महाराज म्हणतात समर्थ संतांनी दिलेल्या भोजनाने पोट भरल्यानंतर देवाचे गौरवास्पद शब्दांनी स्तुती करून मी देवाची पूजा करीन.
अभंग क्र. १४३३
आपुल्यांचा करीन मोळा । माझ्या कुळाचारांचा ॥१॥
अवघियांचे वंदिन पाय । ठायाठाया न देखे ॥धृपद॥
नेदी तुटो समाधान । थांबों जन सकळ ॥२॥
तुका म्हणे झाडा होय । तो हे सोय न संडी ॥३॥
अर्थ

हे संतांनो मी माझ्या कुळाचाराप्रमाणे तुमची पूजा करीन. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे काही न पाहता मी संतांच्या पायाला वंदन करीन. मी संतांचे समाधान भंगु देणार नाही व लोकाचा खोळंबा होऊ देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या पापाचा जोपर्यंत झाडा होणार नाही तोपर्यंत माझे, म्हणजे वरील वर्णन केलेले प्रमाणे कर्म मी सोडणार नाही.
अभंग क्र. १४३४
जन्ममरणांची विसरलो चिंता । तू माझा अनंता मायबाप ॥१॥
होतील ते डोळा पाहेन प्रकार । भय आणि भार निरसली ॥धृपद॥
लिगाडाचे मूळ होती पंच भूते । ज्याचे त्या पुरते विभागिले ॥२॥
तुका म्हणे जाला प्रपंच पारिखा । जिवासी तू सखा पांडुरंग ॥३॥
अर्थ

हे अनंता तूच माझा माय बाप आहे त्यामुळे मी जन्ममरणाची चिंता करणे विसरून गेलो आहे. आता यापुढील जे काही प्रकार होतील ते फक्त पाहण्याचे काम मी करणार आहे कारण माझे भय आणि संसाराचा भार यांचा नाश झाला आहे. सर्व उपाधीचे कारण म्हणजे माझा देह आहे, आता मी पाचही तत्वा मध्ये देहाची विभागणी आपापल्या ठिकाणी केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता हा सर्व दुःखमय प्रपंच माझ्यासाठी पारीख म्हणजे परका झाला कारण तू माझा सखा झाला आहे.
अभंग क्र. १४३५
उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी । अनंत हे थोरी गर्जतील पवाडे ॥१॥
तुझे लागो पायी माझा भाव पुसी जन्ममरणा ठाव । देवाचा तू देव स्वामी सकळा ब्रम्हांडा ॥धृपद॥
मागणे ते तुज मागो जीवभाव तुज सांगो । लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा ॥२॥
दिसो देसी केविलवाणे तरी तुज चि हे उणे । तुका म्हणे जिणे माझे तुज आधीन ॥३॥
अर्थ

हे हरी तू उदार आहे अशी तुझी कीर्ती चराचरामध्ये आहे. आणि हे अनंत तुझी थोरी वेदशास्त्रे, पुराणे गर्जून गात असतात. देवा माझा तुझ्या पायी एकनिष्ठ भक्ती भाव आहे त्यामुळे तू माझे जन्ममरण नष्ट करून टाक. तू देवाचाही देव आहेस सगळ्या ब्रह्मांडाचा स्वामी आहेस जे काही मागायचे असेल ते तुला आम्ही मागू व आमच्या अंतःकरणातील गोष्टी तुलाच सांगू. हे दातारा जर आम्हाला कोणाच्या पायाचा आश्रय घ्यायचा असेल तर तुझ्याच पायाचा आश्रय आम्ही घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू आम्हाला केविलवाणा दिसू देशील तर तुझाच कमीपणा यामध्ये होईल आता माझे जीने हे तुझ्या स्वाधीन आहे.
अभंग क्र. १४३६
पाहा किती आले शरण समानचि केले । नाही विचारिले गुण दोष कोणांचे ॥१॥
मज सेवटींसा द्यावा ठाव तयांचिये देवा । नाही करीत हेवा काही थोरपणाचा ॥धृपद॥
नाही पाहिला आचार कुळगोत्रांचा विचार । फेडू आला भार मग न म्हणे दगड ॥२॥
तुका म्हणे सर्वजाणा तुझ्या आल्यावरी मना । केला तो उगाणा घडल्या महादोषाचा ॥३॥
अर्थ

देवा तुला आजपर्यंत कितीतरी भक्त शरण आलेले आहेत आणि तू त्यांना तुझ्या सारखेच केले आहे. व तसे करताना कोणाचाही गुणदोष तू पाहिले नाही. ज्या संतांना तू आश्रय दिला आहे त्यांच्या पेक्षाही खालचा आश्रय मला दे. मला संतांच्या पेक्षाही खालचे स्थान मिळाले तरी चालेल, मी संतांच्या थोरपणाचा हेवा करत नाही. ज्यावेळी तू भक्तांच्या संसाराचा भार नाहीसा करण्यासाठी धाव घेतो त्यावेळी तु त्यांचा आचार, कुळ, गोत्र यांचा विचार करत नाही. मी दगडासारखा आहे कि कसा आहे, हे तू पाहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू सर्व जाणता आहेस तुझ्या मनात आले तर तू सर्व घडलेल्या पतकाचे नाश करू शकतोस असे तुझे सामर्थ्य आहे.
अभंग क्र. १४३७
आता चुकले बंधन गेले विसरोनि दान । आपुले ते वाण सावकाश विकावे ॥१॥
लाभ जोडला अनंत घरी सापडले वित्त । हातोहाती थीत उरो तळ नल्हाचि ॥धृपद॥
होते गोविले विसरे माप जाले एकसरे । होते होरे वारे तोचि लाहो साधिला ॥२॥
कराया जतन तुका म्हणे निजधन । केला नारायण साह्य नेदी विसंबो ॥३॥
अर्थ

आता जन्ममरण नाहीसे झाले आहे कोणतेही कर्म राहिले नाही. आता देवाला मी काया, वाचा, मन अर्पण करण्याचे विसरून गेलोय. आता आत्मज्ञान रुपमाल विकणे एवढे बाकी राहिले आहे. मला अनंत रूप मोठा माल सापडला आहे आणि हा अनंत रूप आल मला माझ्या घरीच सापडला आहे. माझ्याकडे आलेला माल हातोहात विकला जात आहे. आणि खाली काहीच शिल्लक राहत नाही. मी काया वाचा मनाचा विसार देवाला देऊन आत्मज्ञानाचा माल घेतला आहे. या माला विषयी बरेच दिवस वादविवाद चालू होता परंतु त्वरा करून मी हा माल हाती घेतला आहे. तुकाराम महाराज म्हणतात निजधन जतन करण्याकरिता मी नारायणाला सहाय्य केले होते त्यामुळे आम्ही दोघेही एकमेकाला कधीही विसरू देत नाही.
अभंग क्र. १४३८
तुझ्या रूपे माझी काया भरो द्यावी पंढरीराया । दर्पणींची छाया एकरूपे भिन्नत्वे ॥१॥
सुख पडिले साटवण सत्ता वेचे शने शने । अडचणीचे कोन चारी मार्ग उगवले ॥धृपद॥
वसो डोळ्यांची बाहुली कवळे भिन्न छाया आली । कृष्णांजन चाली नव्हे प्रति माघारी ॥२॥
जीव ठसावला शिवे मना आले तेथे जावे । फाटा पहिला नावे तुका म्हणे खंडले ॥३॥
अर्थ

हे पंढरीराया तुझ्या रूपाने माझी काया म्हणजे शरीर भरून टाकावे. आरशामध्ये प्रतिबिंब जरी दिसले आणि ते दिसण्यास एकसारखे जरी असले तरी त्या दोघामध्ये भिन्नत्व असते. तुझ्याशी माझे जे एक्यत्व झाले आहे त्याचे सुख माझ्याकडे पुष्कळ आहे आणि तुझ्याच सत्तेने त्या सुखाचा उपभोग मी हळूहळू घेत आहे. अडचणीचे चार कोपरे व सर्व मार्ग मोकळे झाले आहे व सर्वत्र सुख आहे. डोळ्यात जेव्हा काविळ असते तेव्हा आरशातील प्रतिबिंब देखील पिवळे दिसते पण कृष्णांजनं डोळ्यात घातले तर पिवळेपणा नाहीसा होऊन भेद नष्ट होतो. तुकाराम महाराज म्हणतात एकदा की मनात “अहंम ब्रह्मास्मी” या बोधाचा ठसा अंतरंगात उमटला की मनाला वाटेल तेथे मनाने जावे. आता द्वैताचा फाटा नाहीसा झाल्यामुळे भ्रमाचे खंडन झाले आहे.
अभंग क्र. १४३९
सोसे सोसे मारू हाका । होईल चुका म्हणऊनि ॥१॥
मागे पुढे क्षणभरी । नव्हे दुरी अंतर ॥धृपद॥
नाम मुखी बैसला चाळा । वेळोवेळा पडताळी ॥२॥
तुका म्हणे सुखी केले । या विठ्ठले बहुतांसी ॥३॥
अर्थ

हे देवा तुमच्यात व आमच्यात चुकामुक होईल त्यामुळे तुम्ही आम्ही हरिनाम चिंतनाने वेळोवेळी तुला हाक मारू. भविष्यात आणि चालू घडीला तुमच्यात व आमच्यात कधीच अंतर पडू नये. माझ्या वाणीने तुझ्या नामाचा वेळोवेळी छंद घेतला आहे व त्याविषयी मी प्रत्येक्ष परीक्षण करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलने त्याच्या पुष्कळ भक्तांना सुखी केले आहे.
अभंग क्र. १४४०
धरूनिया चाली हावा । येइन गावा धावत ॥१॥
पाठविसी मूळ तरी । लवकरी विठ्ठले ॥धृपद॥
नाचेन त्या प्रेमसुखे । कीर्ती मुखे गाईन ॥२॥
तुका म्हणे संतमेळी । पायधुळी वंदीन ॥३॥
अर्थ

देवा मी तुझ्या भेटीची इच्छा मनात धरून तुझ्या गावाला धावत येईल आणि हे विठाई तू जर मला बोलावणे पाठवले तर लवकरच मी तुझ्याकडे धावत येईल. मी त्या प्रेम सुखाने नाचेन आणि तुझी कीर्ती गाईन. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या मेळ्यामध्ये राहून मी संतांच्या पायाला वंदन करीन.

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading