२२ जून, दिवस १७३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी २०१ ते २२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २०६५ ते २०७६

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“22 जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 22 June
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक 22 जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २०६५ ते २०७६ चे पारायण आपण करणार आहोत.
22 जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी २०१ ते २२५,

201-13
किंबहुना ऐसी । चिन्हे जया देखसी । जाण तया ज्ञानेसी । शेज जाहली ॥13-201॥
फार काय सांगावे ? अशी लक्षणे तू ज्या पुरुषाच्या ठिकाणी पाहशील त्या पुरुषाचे व ज्ञानाचे एकच अंथरूण झाले आहे असे तू समज.
202-13
पै अमानित्व पुरुषी । ते जाणावे इही मिषी । आता अदंभाचिया वोळखीसी । सौरसु देवो ॥13-202॥
साधकामधे असणारा अमानित्व हा जो गुण म्हणतात तो या लक्षणांनी जाणावा.
2) अदंभित्व, आता अदंभाच्या ओळखीकरता त्याच्या लक्षणांचा अभिप्राय सांगतो.
203-13
तरी अदंभित्व ऐसे । लोभियाचे मन जैसे । जीवु जावो परी नुमसे । ठेविला ठावो ॥13-203॥
तर ऐक. अदंभित्व असे आहे, ज्याप्रमाणे लोभ्याचे मन आपल्या धनाविषयी इतके आसक्त असते की जीव गेला तरी तो आपली धन ठेवलेली जागा सांगत नाही.
204-13
तयापरी किरीटी । पडिलाही प्राणसंकटी । तरी सुकृत न प्रकटी । आंगे बोले ॥13-204॥
अर्जुना, त्याप्रमाणे त्याच्या प्राणावर जरी संकट आले तथापि आपण केलेले पुण्यकर्म हे देहचेष्टेने अथवा वाचेने उघड करत नाही.
205-13
खडाणे आला पान्हा । पळवी जेवी अर्जुना । का लपवी पण्यांगना । वडिलपण ॥13-205॥
खोड्याळ गाईला आलेला पान्हा ती गाय जशी चोरते अथवा उतार वयाला आलेली वेश्या उतार वयाने रहाते काय ? तर नाही, मग ती आपले उतार वय झाकते.


206-13
आढ्यु आतुडे आडवी । मग आढ्यता जेवी हारवी । नातरी कुळवधू लपवी । अवेवांते ॥13-206॥
श्रीमंत मनुष्य एकटा अरण्यात सापडला असता तो जसा आपली श्रीमंती लपवतो अथवा कुलीन स्त्री जशी आपले अवयव झाकते,
207-13
नाना कृषीवळु आपुले । पांघुरवी पेरिले । तैसे झांकी निपजले । दानपुण्य ॥13-207॥
अथवा शेतकरी पेरलेले बीज जसे माती टाकून झाकतो, तसेच तो आपण केलेले दान पुण्य झाकून ठेवतो.
208-13
वरिवरी देहो न पूजी । लोकाते न रंजी । स्वधर्मु वाग्ध्वजी । बांधो नेणे ॥13-208॥
वरवर देहाची पूजा करत नाही, (लोकांना फसवणारा बाह्यवेष धारण करून देहाला सजवीत नाही) व लोकांच्या मनाजोगते बोलून त्यांचे मनोरंजन करत नाही व आपण केलेला धर्म आपल्या वाचारूपी ध्वजेवर बांधण्याचे त्यास माहीत नसते. आपण केलेला धर्म तो आपल्या तोंडाने बोलून दाखवत नाही.
209-13
परोपकारु न बोले । न मिरवी अभ्यासिले । न शकेविकू जोडले । स्फीतीसाठी ॥13-209॥
आपण दुसर्‍यावर केलेल्या उपकाराचा तोंडाने उच्चार करत नाही, आपण जो काही वेदशास्त्र वगैरेचा अभ्यास केला असेल त्याचा डौल मिरवीत नाही व आपली भरभराट व्हावी म्हणून जो आपण मिळवलेले पुण्य विकण्यास धजत नाही,
210-13
शरीर भोगाकडे । पाहता कृपणु आवडे । एऱ्हवी धर्मविषयी थोडे । बहु न म्हणे ॥13-210॥
तो आपल्या शरीराला जे विषय भोग देतो त्यावरून त्याच्या उदारपणाचा अंदाज केला तर तो कृपण आहे असे वाटेल. परंतु धर्माच्या कामी त्याचे औदार्य पाहिले तर तो आपल्या जवळचे धन वगैरे खर्च करण्यास कमीपणा करत नाही थोडेफार असे म्हणत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


211-13
घरी दिसे सांकड । देहीची आयती रोड । परी दानी जया होड । सुरतरूसी ॥13-211॥
घरामधे सर्व गोष्टीची टंचाई दिसते, परंतु दानाच्या बाबतीत तो कल्पतरूशी प्रतिज्ञेने चढाओढ करतो.
212-13
किंबहुना स्वधर्मी थोरु । अवसरी उदारु । आत्मचर्चे चतुरु । एऱ्हवी वेडा ॥13-212॥
फार काय सांगावे ? स्वधर्मामधे तो थोर असतो. योग्य प्रसंगी तो उदार असतो, आत्मचर्चा करण्यात हुशार असतो. एरवी इतर गोष्टीत तो वेडा असतो.
213-13
केळीचे दळवाडे । हळू पोकळ आवडे । परी फळोनिया गाढे । रसाळ जैसे ॥13-213॥
केळीचे सर्व अंग हलके व पोकळ असे वाटते, पण या केळीला फळे आल्यावर ते केळीचे सर्व अंग रसाने दाट भरलेले असे वाटते.
214-13
का मेघांचे आंग झील । दिसे वारेनि जैसे जाईल । परी वर्षती नवल । घनवट ते ॥13-214॥
अथवा मेघाचे अंग पाहिले तर ते अगदी हलके व दिसण्यात वार्‍याने नाहीसे होईल असे वाटते, पण तेच मेघ एकदा का वर्षाव करायला लागले की जिकडे तिकडे आश्चर्यकारक रीतीने एकसारखे जलमय करून टाकतात.
215-13
तैसा जो पूर्णपणी । पाहता धाती आयणी । एऱ्हवी तरी वाणी । तोचि ठावो ॥13-215॥
त्याप्रमाणे पूर्णतेच्या दृष्टीने तो पुरुष पाहिला तर इच्छा तृप्त होतात, एरवी पाहिले तर कमीपणाला तोच जागा आहे, त्याच्या येथे सर्व गोष्टींचे दारिद्र्य आहे.


216-13
हे असो या चिन्हांचा । नटनाचु ठायी जयाच्या । जाण ज्ञान तयाच्या । हाता चढे ॥13-216॥
हे वर्णन पुरे. या वर सांगितलेल्या गुणांचा उत्कर्ष ज्याचे ठिकाणी असेल त्याच्या हाताला ज्ञान आले असे समज.
217-13
पै गा गति अदंभपण । म्हणितले ते हे जाण । आता आईक खूण । अहिंसेची ॥13-217॥
अर्जुना अदंभपण ते हे समज.
3) अहिंसा, पूर्वमीमांसेने सांगितलेली अहिंसा -आता अहिंसेचे लक्षण ऐक.
218-13
तरी अहिंसा बहुती परी । बोलिली असे अवधारी । आपुलालिया मतांतरी । निरूपिली ॥13-218॥
आपापल्या निरनिराळ्या मतांचे निरूपण करताना पुष्कळ प्रकारांनी अनेक लोकांनी अहिंसा सांगितली आहे. ऐक.
219-13
परी ते ऐसी देखा । जैशा खांडूनिया शाखा । मग तयाचिया बुडुखा । कूंप कीजे ॥13-219॥
परंतु त्यांनी सांगितलेली ही अहिंसा ही जशा वृक्षाच्या फांद्या तोडून मग त्या शाखांनी वृक्षाच्या बुडाशी त्या वृक्षाच्या रक्षणार्थ कुंपण करावे तशी आहे.
220-13
का बाहु तोडोनि पचविजे । मग भूकेची पीडा राखिजे । नाना देऊळ मोडोनि कीजे । पौळी देवा ॥13-220॥
किंवा हात तोडून तो विकावा व जे पैसे मिळतील त्यांनी भुकेची पीडा शांत करावी अथवा देऊळ मोडून देवाच्या रक्षणाकरता देवळाच्या सामानाने आवाराची भिंत बांधावी.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


221-13
तैसी हिंसाचि करूनि अहिंसा । निफजविजे हा ऐसा । पै पूर्वमीमांसा । निर्णो केला ॥13-221॥
त्याप्रमाणे हिंसाच करून अहिंसा उत्पन्न करावी असा हा निर्णय पूर्वमीमांसेने केला आहे.
222-13
जे अवृष्टीचेनि उपद्रवे । गादले विश्व आघवे । म्हणौनि पर्जन्येष्टी करावे । नाना याग ॥13-222॥
पाऊस न पडल्यामुळे अतिशय पीडा होऊन त्यामुळे सर्व प्राणी जर्जर झाले, म्हणजे त्यावर उपाय म्हणून पाऊस पाडणारे पर्जन्येष्टी यज्ञ करावेत.
223-13
तव तिये इष्टीचिया बुडी । पशुहिंसा रोकडी । मग अहिंसेची थडी । कैची दिसे ? ॥13-223॥
तर प्राण्यांच्या बचावाकरता करावयाच्या यज्ञामधे आरंभीच जनावरांचे प्रत्यक्षपणेच प्राण घेतले जातात, अशा स्थितीत अहिंसेचे पलीकडचे तीर कसे दिसणार ?
224-13
पेरिजे नुसधी हिंसा । तेथ उगवैल काय अहिंसा ? । परी नवल बापा धिंवसा । या याज्ञिकाचा ॥13-224॥
नुसती हिंसा पेरली असता तेथे अहिंसा उगवेल काय ? (तर नाही). परंतु याज्ञिकांचे धाडस आश्चर्यकारक आहे.
225-13
आणि आयुर्वेदु आघवा । तो याच मोहोरा पांडवा । जे जीवाकारणे करावा । जीवघातु ॥13-225॥
आयुर्वेदीय अहिंसा : आणि सर्व आयुर्वेदही (वैद्यकशास्त्रही) अर्जुना याच धोरणचा आहे. कारण की एका जीवाचे रक्षण करण्याकरता दुसर्‍या जीवाचा घात करावा असे तो प्रतिपादन करतो.

दिवस १७३ वा, २२, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २०६५ ते २०७६
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २०६५
विठ्ठल मुक्तीदाता । नव्हे मरो हे बोलता ॥१॥
मज न साहावे कानी । विष उत्तर लागे मनी ॥धृपद॥
हरीकथेते धीकारी । शत्रु माझा तो वैरी ॥२॥
सुना काळतोंडा । जो या देवा म्हणे धोंडा ॥३॥
अहं म्हणे ब्रम्ह । नेणे भक्तीचे ते वर्म ॥४॥
तुका म्हणे क्षण । नको तयाचे दर्शन ॥५॥
अर्थ

विठ्ठल हा मुक्तिदाता नाही असे जर कोणी बोलत असेल तर तो मरून जावो. जर असे कोणी बोलत असेल तर ते बोलणे माझ्या कानाला सहन होत नाही असे बोलणे माझ्या मनाला विषाप्रमाणे लागते. जो हरी कथेचा धिक्कार करतो तोच माझा शत्रू आणि वैरी आहे. जो या विठ्ठलाला धोंडा म्हणेल तो काळ्या तोंडाचा कुत्राच आहे असे मी समजतो. जे स्वतःला मी ब्रम्‍ह आहे असे म्हणून घेतात त्यांना भक्तीचे वर्मच कळत नसते. तुकाराम महाराज म्हणतात आशा अहंकारी लोकांचे मला एकक्षण देखील दर्शन नको आहे

अभंग क्र. २०६६
यमपुरी त्यांणी वसविली जाणा । उच्छेद भजना विधी केला ॥१॥
अवघड कोणी न करी सांगता । सुलभ बहुता गोड वाटे ॥धृपद॥
काय ते नेणते होते मागे ॠषी । आधार लोकासी ग्रंथ केले ॥२॥
द्रव्य दारा कोणे स्थापियेले धन । पिंडाचे पाळण विषयभोग ॥३॥
तुका म्हणे दोही ठायी हा फजित । पावे यमदूतजना हाती ॥४॥
अर्थ

ज्यांनी भजन या विधीचा उच्छेद केला आहे त्यांनीच खरी यमपुरी वसविलेली आहे असे जाणवावे. जे अवघड आहे ते कोणीही करत नाही परंतु जे खूप सोपे आहे म्हणजे दुसर्‍याला त्रास देणे दुष्टपणाने वागणे हे करताना फार गोड वाटते. पूर्वी ऋषीनी लोकांनी कसे वागावे कसे आचरण करावे हे ग्रंथात लिहून ठेवले मग ते ऋषी काय अज्ञानी होते काय ? द्रव्य कमवावे आप्तेष्ट नातेवाईकाना जपावे धन कमवावे देहाचे पालन पोषण करावे विषय भोग घ्यावे असे कोणत्याही ऋषीने यापूर्वी कोणत्याही साधनेद्वारा स्थापना केली होती की काय ? तुकाराम महाराज म्हणतात अशा मनुष्याची दोन्हीही ठिकाणी फजिती होते म्हणजे संतांच्या ठिकाणी चांगले कर्म न केले म्हणून आणि यमदुताच्या ठिकाणी या पूर्वी खूप पाप केले म्हणून फजिती होते.

अभंग क्र. २०६७
न कळता कोणी मोडियेले व्रत । तया प्रायिश्चत्त चाले काही ॥१॥
जाणतिया वज्रलेप जाले थोर । तयास अघोर कुंभपाक ॥धृपद॥
आता जरी कोणी नाइके सांगता । तया शिकविता ते चि पाप ॥२॥
काय करू मज देवे बोलविले । माझे खोळंबिले काय होते ॥३॥
तुका म्हणे जना पाहा विचारूनी । सुख वाटे मनी ते चि करा ॥४॥
अर्थ

नकळता जर एकादशी किंवा सोमवार व्रत मोडले गेले तर त्याला काहीतरी प्रायचित्त देता येते. पण एखाद्याला जर माहित आहे की आज एकादशी आहे किंवा सोमवार हे व्रत आहे तरीही त्याने जाणून व्रत मोडले तर त्याच्या हातून वज्रलेपासारखे पाप होते आणि अघोर असा कुंभीपाक नरकाला प्राप्त होतो. तर एखाद्या व्यक्तीला व्रत मोडणे हे पाप आहे हे शिकवण्याचा प्रयत्न केला आणि तरीदेखील ते ऐकले नाही तर पुन्हा पुन्हा त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला तर शिकवणार्‍याला देखील पाप लागते. आता मी काय करू मी जे काही बोलतो आहे ते मला देवच बोलत आहे नाहीतर माझे उपदेश करण्यावाचून काही खोळंबले होते काय कशाला ? तुकाराम महाराज लोकहो मी तुम्हाला जो काही उपदेश केला आहे तो चांगला आहे की वाईट आहे याविषयी तुमचे तुम्हीच विचार करून पहा आणि तुम्हाला ज्या कारणाने सुख वाटेल त्याचविषयी मनात विचार करा तोच उपदेश तुम्ही करा.

अभंग क्र. २०६८
वाचे विठ्ठल नाही । तोचि प्रेतरूप पाही ॥१॥
धिग त्याचे ज्यालेपण । भार न साहे मेदिन ॥धृपद॥
न बैसे कीर्तनी । गुण नाइके जो कानी ॥२॥
जाता काटाळे देउळा । तोचि सुना मुखकाळा ॥३॥
हरीभक्तीविण । त्याचे जळो शाहाणपण ॥४॥
तुका म्हणे तेणे । वंशा आणियेले उणे ॥५॥
अर्थ

ज्याच्या वाचेला विठ्ठल नामच येत नाही तो जिवंत नसून प्रेत रूपचं आहे. धिक्कार असो त्याच्या जिवंतपणाचा कारण त्याचा भार देखील पृथ्वीला सहन होत नाही. अहो हे काही लोक असे आहेत की जे कीर्तनातील बसत नाही आणि हरीचे गुणदेखील कानांनी ऐकत नाही. अशा माणसांना देवळात जाण्याचा देखील कंटाळा येतो त्याचे मुख म्हणजे काळ तोंड्या कुत्र्या प्रमाणे आहे. कोणी कितीही विद्वान असो पंडित असो वाचक असो परंतु त्याच्या जर चित्तात हरी भक्ती नसेल तर त्याच्या शहाणपणाला आग लागो. तुकाराम महाराज म्हणतात असे माणसे आपल्याला वंशाला कमीपणा आणतात.

अभंग क्र. २०६९
तारिली बहुते चुकवूनि घात । नाम हे अमृत स्वीकारितां ॥१॥
नेणता सायास शुद्ध आचरण । यातीकुळहीन नामासाठी ॥धृपद॥
जन्म नांव धरी भक्तीच्या पाळणा । आकार कारणा या च साठी ॥२॥
असुरी दाटली पाप होता फार । मग फेडी भार पृथिवीचा ॥३॥
तुका म्हणे देव भक्तपण सार । कवतुक- वेव्हार तयासाठी ॥४॥
अर्थ

ज्या भक्तांनी नामामृताचा स्वीकार केला आहे त्यांना अनेक संकटा पासून देवा ने वाचवले आहे व असे अनेक भक्त होऊनही गेले आहेत. देवाने भक्तांची शुद्ध भक्ती आणि त्यांचे शुद्ध आचरण पाहिले मग भक्ताने किती योगयागादी कष्ट केले आहेत याच्याकडे त्याने पाहिले नाही आणि भक्तांची जात व कुळ तर मुळीच देवाने पाहिले नाही केवळ जे भक्त नाम घेतात त्यांचा उध्दार या देवाने केला आहे. देव भक्तीच्या रक्षणार्थ आजन्म आसून जन्म धारण करतो अनाम असून नाम धारण करतो आणि निराकार असून देखील आकार धारण करतो. पृथ्वीवर ज्यावेळी असुरी वृत्ती जास्त प्रमाणात होते आणि जास्त प्रमाणात पाप उत्पन्न होते त्यावेळी हा देव अवतार धारण करून पृथ्वीवरचा दुष्ट लोकाचा भार कमी करतो. तुकाराम महाराज म्हणतात देव आणि भक्त यामधील मुख्य सार म्हणजे देवभक्त पणा आहे आणि भक्ताचे कोणतेही व्यवहार हा देव कौतुकाने करत असतो.

अभंग क्र. २०७०
याचिया आधारे राहिलो निश्चिंत । ठेवूनिया चित्त पायी सुखे ॥१॥
माझे सुखदुःख जाणे हित फार । घातलासे भार पांडुरंगा ॥धृपद॥
कृपेची पोसणी ठायीची अंकिली । म्हणऊनि लागली यास चिंता ॥२॥
मन राखे हाती घेऊनिया काठी । इंद्रिये तापटी फांको नेदी ॥३॥
तुका म्हणे यासी अवघड नाही । शरणागता काही रक्षावया ॥४॥
अर्थ

या देवाच्या पायी मी माझे चित्त ठेवून सुखी झालो आहे व त्याच्या पायाच्या आधाराने मी निश्चिंत राहिलो आहे. माझे सर्व सुख दुख व माझे हित हा पांडुरंग जाणतो कारण मी माझा सर्व भार त्या पांडुरंगावरच घातला आहे. मी मूळचीच या देवाच्या कृपेची पोसणी आहे त्याच्या ठिकाणची अनन्य दासीनी आहे त्यामुळे त्याला माझी चिंता लागली आहे. हा देव हातात निग्रहाची काठी घेऊन आमचे मन राखत असतो आणि इंद्रियांना सारखा थापडत असतो व सावध करत असतो व ते इतर कोणत्याही विषयाकडे फाकू देत नाही. तुकाराम महाराज महाराज जे भक्त या पांडुरंगाला आनन्य भक्तीने शरण आले आहेत त्यांचे रक्षण करणे हे पांडुरंगाला काही अवघड नाही.

अभंग क्र. २०७१
उभाउभी फळ । अंगी मंत्राचे या बळ ॥१॥
म्हणा विठ्ठल विठ्ठल । गोड आणि स्वल्प बोल ॥धृपद॥
कळी काळाची बाधा । नव्हे उच्चारिता सदा ॥२॥
तुका म्हणे रोग । वारे भवाऐसा भोग ॥३॥
अर्थ

विठ्ठल या मंत्रामध्ये अशी शक्ती आहे की ते आपल्याला तात्काळ कोणतेही फळ मिळवुन देते. त्यामुळे तुम्ही विठ्ठल विठ्ठल असा मंत्र जप करा तो अतिशय गोड आणि सोपा मंत्र आहे. विठ्ठल या मंत्राचा जप आपण सदासर्वकाळ केला तर कळी काळाची बाधा आपल्याला केव्हाच होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात या मंत्राने भवसागरातील सर्व रोग नाहीसे होतात केवळ तुम्ही विठ्ठल विठ्ठल मंत्र जपत रहा.

अभंग क्र. २०७२
पाहोनिया अधिकार । तैसे बोलावे उत्तर ॥१॥
काय वाउगी घसघस । आम्ही विठोबाचे दास ॥धृपद॥
आम्ही जाणो एका देवा । जैसी तैसी करू सेवा ॥२॥
तुका म्हणे भावे । माझे पुढे पडेल ठावे ॥३॥
अर्थ

हे उपदेश करणाऱ्या लोकांनो तुम्ही प्रत्येकाचा अधिकार पहा आणि त्याप्रमाणे तुम्ही उपदेश करा. अहो आम्ही विठोबाचे दास आहेत व्यर्थ तुमची बडबड आमच्यापूढे करू नका. आम्ही केवळ एका देवाला जाणंतो आहोत आणि जशी आम्हाला जमेल त्या प्रकारे आम्ही त्याची सेवा करू. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला माझा भावाअर्थ समजेल त्यांनाच माझी पुढील गती समजते.

अभंग क्र. २०७३
न वजाता घरा । आम्ही कोणाच्या दातारा ॥१॥
का हे छळू येती लोक । दाट बळे चि कंटक ॥धृपद॥
नाही आम्ही खात । काही कोणाचे लागत ॥२॥
कळे तैसी सेवा । तुका म्हणे करू देवा ॥३॥
अर्थ

हे दातारा आम्ही कोणाच्याही घरी जात नाही. तरीदेखील हे कंटक दुष्ट लोक बळेच आम्हाला छळण्याकरता आमच्या घरी का बरे येत असतील ? आम्ही कोणाचे काही खात ही नाही आणि कुणाचे कोणी आम्ही लागतही नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला जशी कळेल तसी आम्ही देवाची सेवा करू.

अभंग क्र. २०७४
मोहरोनी चित्ता । आणू हळू चि वरी हिता ॥१॥
तो हे पडती आघात । खोडी काढिती पंडित ॥धृपद॥
संवसारा भेणे । काही उसंती तो पेणे ॥२॥
एखादिया भावे । तुका म्हणे जवळी यावे ॥३॥
अर्थ

आम्ही आमच्या चित्ताला ज्या मार्गावर आमचे स्वहित आहे तिकडे हळूहळू त्या मार्गाला आम्ही नेत आहोत. परंतु त्यातही पंडित लोक आम्हाला त्रास देतात, त्यातही ज्या मार्गाने आम्ही चाललोत त्या मार्गातही आमच्या चुका हे लोक काढतात व आम्ही ज्या मार्गाने चाललो आहोत त्या मार्ग विषयी आम्हाला संदेह निर्माण करतात. आम्हाला या संसाराविषयी भीती निर्माण होत आहे त्यामुळे आम्हाला काहीही करून हळूहळू का होईना परंतु आम्हाला आमच्या नीजस्वरूपाचा मुक्काम गाठायचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात कोणत्याही भावनेने का होईना परंतु आम्ही देवाजवळ यावे.

अभंग क्र. २०७५
काय जाणो वेद । आम्ही आगमाचे भेद ॥१॥
एक रूप तुझे मनी । धरूनि राहिलो चिंतनी ॥धृपद॥
कोठे अधिकार । नाही रानट विचार ॥२॥
तुका म्हणे दीना । नुपेक्षावे नारायणा ॥३॥
अर्थ

हे देवा आम्ही वेद तरी काय जाणणार आहोत आणि शास्त्रातील प्रक्रिया देखील आम्हाला काय माहित आहेत ? अहो केवळ आम्ही देवा तुमचे ते एक रूपच आमच्या मनात धारण केले आहे आणि त्याचेच चिंतन आम्ही करत आहोत. अहो आम्हाला कसला अधिकार आहे आम्ही तर रानटी विचार करणारे आहोत. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही दिन आहोत त्यामुळे हे नारायणा तु आमची उपेक्षा करू नकोस.

अभंग क्र. २०७६
धर्माचे पाळण । करणे पाखांड खंडण ॥१॥
हे चि आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ॥धृपद॥
तिक्षण उत्तरे । हाती घेउनि बाण फिरे ॥२॥
नाही भीड भार । तुका म्हणे साना थोर ॥३॥
अर्थ

वेदशास्त्रांने जो धर्म सांगितला आहे त्या धर्माचे पालन करणे आणि पाखंड लोकांचे खंडन करणे, आणि हरीच्या नामाचे बीज वाढवणे हेच आमचे खरे कर्म म्हणजे काम आहे. अशा तीक्ष्ण स्वरूपाचे शब्द रुपी बाणे आम्ही हातात घेऊन फिरत असतो. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थाचा खरा उपदेश करताना आम्ही कोणाचीही भीडभाड धरत नाही मग तो आमच्या पेक्षा लहान असो किंवा मोठा असो.

जून नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading