आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१० एप्रिल, दिवस १०० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी १७६ ते २०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ११८९ ते १२००
“१० एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १० Apirl
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १० एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ११८९ ते १२०० चे पारायण आपण करणार आहोत.
१० एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी १७६ ते २००,
176-9
मग जे काही ते पढिन्नले । ते मर्कटे नारळ तोडिले । का आंधळ्या हाती पडिले । मोती जैसे ॥176॥
मग त्या मूर्खांनी जे काही शास्त्राध्ययन केले असेल, ते म्हणजे माकडाने नारळ तोडल्याप्रमाणे किंवा अंधळ्याला मोती सांपडावे त्याप्रमाणे होय.
177-9
किंबहुना तयांची शास्त्रे । जैशी कुमारी हाती दिधली शस्त्रे । का अशौच्या मंत्रे । बीजे कथिली ॥177॥
किंबहुना त्यांनी म्हटलेली ती शास्त्रे लहान मुलीच्या हातात दिलेल्या शस्त्राप्रमाणे, अथवा अशुचिर्भूताला बीजांसह शिकवलेल्या मंत्राप्रमाणे निरर्थक होत.
178-9
तैसे ज्ञानजात तया । आणि जे काही आचरले गा धनंजया । ते आघवेचि गेले वाया । जे चित्तहीन ॥178॥
धनंजया, त्याचप्रमाणे, ज्यांचे चित्त स्वाधीन नाही, त्यांचे सर्व ज्ञान व आचरण ही व्यर्थ होत.
179-9
पै तमोगुणाची राक्षसी । जे सद्बुद्धीते ग्रासी । विवेकाचा ठावोचि पुसी । निशाचरी ॥179॥
याप्रमाणे तमोगुणरूप राक्षसी सद्बुद्धीला ग्रासून ज्ञानाचा ठाव-ठिकाण नाहीसा करणारी आहे. .
180-9
तिये प्रकृती वरपडे जाले । म्हणऊनि चिंतेचेनि कपोले गेले । वरि तामसीयेचिये पडिले । मुखामाजी ॥180॥
त्या प्रकृतीने जे ग्रस्त होतात, ते सदोदित चिंताक्रांत असून शिवाय तामस प्रकृतीच्या आयतेच घशात उतरतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
181-9
जेथ आशेचिये लाळे । आंतु हिंसा जीभ लोळे । तेवीचि संतोषाचे चाकळे । अखंड चघळी ॥181॥
जी राक्षसी प्रकृति आशारूप लाळेत हिंसारूप जीभ लोळवून असंतोषरूप मांसाचे गोळे निरंतर चघळते;
182-9
जे अनर्थाचे कानवेरी । आवाळुवे चाटीत निघे बाहेरी । जे प्रमादपर्वतीचि दरी । सदाचि मातली ॥182॥
जी अनर्थरूप कानापर्यंत ओठ चाटीत बाहेर निघते; जी प्रमादरूपी म्हणजे भूलरूपी पर्वताची मोठी माजलेली दरी आहे;
183-9
जेथ द्वेषाचिया दाढा । खसखसा ज्ञानाचा करिती रगडा । जेअगस्ती गवसणी मूढा । स्थूलबुद्धी ॥183॥
जिच्या द्वेषरूप दाढा खसखसा चावून ज्ञानाचा चुराडा करतात, व जी अगस्ति ऋषीला असलेल्या कुंभाच्या आवरणाप्रमाणे स्थूलबुद्धि लोकांना आसुरी मायेची गवसणी आहे;
184-9
ऐसे आसुरिये प्रकृतीचा तोंडी । जे जाले गा भूतोंडी । ते बुडोनि गेले कुंडी । व्यामोहाचा ॥184॥
अशा प्रकारच्या त्या आसुरी प्रकृतीच्या तोंडात जे बळी होऊन पडतात, ते भ्रांतिरूप कुंडांत बुडून जातात.
185-9
एवं तमाचिये पडिले गर्ते । न पविजतीचि विचाराचेनि हाते । हे असो ते गेले जेथे । ते शुद्धीचि नाही ॥185॥
याप्रमाणे जे अज्ञानाच्या खळग्यात पडतात, ते विचाररूपी हाताला सांपडत नाहीत; इतकेच नव्हें, तर ते कोठे जातात त्याचा देखील पत्ता लागत नाही.
186-9
म्हणोनि असोतु इये वायाणी । कायशी मूर्खाची बोलणी । वाया वाढविता वाणी । शिणेल हन ॥186॥
म्हणून ही निष्फल कथा राहू दे. कारण, मूर्खांचे व्यर्थ वर्णन केले असता वाणीला शीण मात्र होईल.
187-9
ऐसे बोलिले देवे । तेथ जी म्हणितले पांडवे । आइके जेथ वाचा विसवे । ते साधुकथा ॥187॥
असे श्रीकृष्ण बोलल्यावर अर्जुन ‘ हो हो ! ‘ असे म्हणाला. नंतर भगवान फिरून म्हणतात :- जिचे वर्णन केले असता सुख होते, ती साधूंची कथा ऐक
महात्मानस्तु मां पार्थ दैवी प्रकृतिमाश्रिता: ।
भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥9. 13॥
188-9
तरी जयाचिये चोखटे मानसी । मी होऊनि असे क्षेत्रसंन्यासी । जया निजेलियाते उपासी । वैराग्य गा 188॥
ज्या साधूंच्या निर्मळ अंतकरणात मी क्षेत्रसंन्यासी होऊन वास करितो; व जे निजले असतांही वैराग्य हे ज्यांची सेवा करिते, म्हणून ज्यांना स्वप्नात सुद्धां विषयवासना होत नाही;
189-9
जयाचिया आस्थेचिया सद्भावा । आंतु धर्म करि राणिवा । जयांचे मन ओलावा । विवेकासी ॥189॥
ज्यांच्या सद्वासनेत धर्म राज्य करतो, (ज्यांना अधर्माची इच्छा सुद्धां होत नाही) व ज्यांचे मन नेहमी सद्विचाराला पुष्टि देते;
190-9
जे ज्ञानगंगे नाहाले । पूर्णता जेऊनि धाले । जे शांतीसि आले । पालव नवे ॥190॥
जे ज्ञानरूप गंगेत स्नान करुन अंतर्बाह्य शुद्ध झाले, पूर्णब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीने तृप्त झाले, व शांतीला नवीन पालवी फुटल्याप्रमाणे शांत झाले,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
191-9
जे परिणामा निघाले कोंभ । जे धैर्यमंडपाचे स्तंभ । जे आंनदसमुद्री कुंभ । चुबकळोनि भरिले ॥191॥
जे ब्रह्माच्या रूपांतराला कोंब निघाल्याप्रमाणे आहेत, व जे धैर्यरूप मंडलाचे खांबच होत; त्याचप्रमाणे, जे आनंदसमुद्रांत बुडवून काढलेल्या कुंभाप्रमाणे ओतप्रोत भरलेले असून,
192-9
जया भक्तीची येतुली प्राप्ती । जे कैवल्याते परौते सर म्हणती । जयांचिये लीलेमाजी नीति । जियाली दिसे ॥192॥
ज्यांना भक्तीची इतकी योग्यता वाटते की, ते मोक्षालाही मागे सर असे म्हणतात, व ज्यांच्या सहज लीलेंत नीति जागृत दिसते,
193-9
जे आघवाचि करणी । लेइले शांतीची लेणी । जयांचे चित्त गवसणी । व्यापका मज ॥193॥
ज्यांनी आपल्या सर्व अवयवांत शांतिरूप अलंकार घातले आहेत (ज्यांच्या इंद्रियांची विषयावर कधीही वासना जात नाही), व ज्यांनी आपल्या चित्ताची मज सर्वव्यापकाला गवसणी केली आहे;
194-9
ऐसे जे महानुभाव । जे दैविये प्रकृतीचे दैव । जे जाणोनिया सर्व । स्वरुप माझे ॥194॥
असे जे महात्मे, ते भगवद्भक्तीला अनुकूल असणाऱ्या सात्त्विक प्रकृतीचे भाग्यच होत. ते माझ्या सर्व स्वरूपाला जाणतात
195-9
मग वाढतेनि प्रेमे । माते भजती जे महात्मे । परि दुजेपण मनोधर्मे । शिवतले नाही ॥195॥
आणि मग वाढत्या प्रेमाने ते महात्मे मला भजतात पण त्यांच्या मनोधर्माने द्वैताला स्पर्श सुद्धा केलेला नसतो.
196-9
ऐसे मीच होऊनि पांडवा । करिती माझी सेवा । परि नवलावो तो सांगावा । असे आइक ॥196॥
अर्जुना, अशा प्रकारे जे मद्रूप होऊन माझी सेवा करतात, त्यांच्या सेवेची आश्चर्यकारक गोष्ट सांगावयाची राहिली आहे ती ऐक.
सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता:॥
नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥9. 14॥
197-9
तरी कीर्तनाचेनि नटनाचे । नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे । जे नामचि नाही पापाचे । ऐसे केले ॥197॥
तरी हरिकीर्तनाच्या प्रेमाने ते नाचतात, त्यामुळे प्रायश्चित्ताचे सर्व व्यापार नाश पावले आहेत, व त्या किर्तनाने पापाचे नाव देखील राहू दिले नाही.
198-9
यमदमा अवकळा आणिली । तीर्थे ठायावरुनि उठविली । यमलोकी खुंटिली । राहाटी आघवी ॥198॥
यम म्हणजे मनोनिग्रह व दम म्हणजे इंद्रियनिग्रह यांना निकृष्ट दशा आणिली, तीर्थे आपापल्या जाग्यांवरून उठवून लावली, व यमलोकचे सर्व व्यापार बंद पाडले !
199-9
यमु म्हणे काय यमावे । दमु म्हणे कवणाते दमावे । तीर्थे म्हणती काय खावे । दोष ओखदासि नाही ॥199॥
यम म्हणू लागला की; कोणाचे नियमन करावे ? दम म्हणाला कोणाला जिंकावे ? व तीर्थे म्हणू लागली, ” आम्ही कशाचे क्षालन करावे ? कारण दोष औषधासही उरले नाहीत ! “
200-9
ऐसे माझेनि नामघोषे । नाही करिती विश्वाची दुःखे । अवघे जगचि महासुखे । दुमदुमित भरले ॥200॥
याप्रमाणे माझ्या नामघोषाने जगांतील सर्व प्राण्यांची दुःखे नाहीतशी होतात, व सर्व जग ब्रह्मसुखाने दुमदुमून जाते.
दिवस १०० वा, १०, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ११८९ ते १२००
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ११८९
लटिके हासे लटिके रडे । लटिके उडे लटिक्यापे ॥१॥
लटिके माझे लटिके तुझे । लटिके ओझे लटिक्याचे ॥धृपद॥
लटिके गाये लटिके ध्याये । लटिके जाये लटिक्यापे ॥३॥
लटिका भोगी लटिका त्यागी । लटिका जोगी जग माया ॥३॥
लटिका तुका लटिक्या भावे । लटिके बोले लटिक्यासवे ॥४॥
अर्थ
हे माणसे खोटे आहे खोटेच हसतात व रडतात. खोट्या माणसाजवळ खोट्याच उड्या मारतात, हे माझे, हे तुझे हे देखील खोटेच आहे. आणि खोट्या अभिमानाचे ओझे देखील खोटेच आहे. खोटेच गातात खोटे ध्यान करतात आणि खोट्याची संगतती देखील खोटेच करतात. भोगही खोटाच आहे आणि त्यागही खोटाच आहे आणि वनात जाणारा देखील खोटा आहे. या जगात सर्व मायाच आहे आणि सर्व व्यवहार खोटेच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात मी ही खोटा आहे आणि मी जो उपदेश करत आहे तो देखील खोट आहे आणि या खोट्या लोकांना मी जे काही सांगत आहे तेही खोटेच आहे.
अभंग क्र. ११९०
जालो म्हणती त्याचे मज वाटे आश्चर्य । ऐका नव्हे धीर वचन माझे ॥१॥
शिजलिया अन्ना ग्वाही दात हात । जिव्हेसी चाखत न कळे कैसे ॥धृपद॥
तापलिया तेला बावन चंदन । बुंदे एक क्षण शीतळ करी ॥२॥
पारखी तो जाणे अंतरीचा भेद । मूढजना छंद लावण्यांचा ॥३॥
तुका म्हणे कसी निवडे आपण । शुद्ध मंद हीन जैसे तैसे ॥४॥
अर्थ
काही लोक म्हणतात आम्ही कृतकृत्य झालो मला त्यांच्ये आश्चर्य वाटते. कारण कोणत्याही प्रकारची परमार्थिक साधने न करता हे कसे कृतकृत्य झाले, आता मला त्यांच्याविषयी काही धीर धरवत नाही मी त्यांच्याविषयी जे काही बोलतो आहे ते तुम्ही ऐका. जर अन्न शिजवले तर त्याची ग्वाही हात आणि दात देतात तर मग जीभेने चव घेतली तर जिभेला अन्नाची चव कळणार नाही काय ? उकळलेल्या तेलामध्ये बावन चंदन उगळून टाकले तर ते लगेच थंड होते. जे खरे पारखी असतात ते समोरच्याच्या अंतकरणातील सर्व विशेष भेद ओळखतात. परंतु जे अज्ञानी असतात ते सौंदर्यालाच भुलतात ते वरवरच पाहतात कारण त्यांना लावण्याचा छंद असतो. तुकाराम महाराज म्हणतात सोने कसाला लावले की त्यामध्ये उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असे प्रकार केले जातात त्याप्रमाणे जे लोक आम्ही कृतकृत्य झालो असे म्हणतात त्यांची खरी परीक्षा अनुभवी संत घेतात परंतु अज्ञानी मनुष्य तसे न करता त्या कृतकृत्य म्हणणाऱ्या मनुष्याच्या वरवरच्या पोशाखाला भुलतात आणि त्याच्याकडेच पळतात.
अभंग क्र. ११९१
हेचि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥
ठेविले अनंते तैसे चि राहवे । चित्ती असो द्यावे समाधान ॥धृपद॥
वाहिल्या उद्वेग दुःख चि केवळ । भोगणे ते फळ संचिताचे ॥२॥
तुका म्हणे घालू तयावरी भार । वाहू हा संसार देवा पायी ॥३॥
अर्थ
संसारातील माया देवाला अर्पण करावी हीच थोर भक्ती आहे आणि ती देवाला आवडते. अनंताने संसारांमध्ये जसे ठेवले असेल तसे राहावे आणि चित्तामध्ये समाधान असू द्यावे. जर संसारांमध्ये एखाद्या गोष्टीची हानी झाली आणि त्याचा उद्वेग वाटला तर त्यामुळे वेगवेगळे दुःख प्राप्त होतील आणि जसे संचित असेल तसेच भोग भोगले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे संसाराचा योगक्षेमाचा भार देवावर घालावा आणि हा संसार देवाच्या चरणावर वाहून द्यावा.
अभंग क्र. ११९२
जन्मा येणे घडे पातकाचे मूळ । संचिताचे फळ आपुलिया ॥१॥
मग वायाविण दुःख वाहो नये । रुसोनिया काय देवावरी ॥धृपद॥
ठाउकाचि आहे संसार दुःखाचा । चित्ती सीण याचा वाहो नये ॥२॥
तुका म्हणे नाम त्याचे आठवावे । तेणे विसरावे जन्मदुःख ॥३॥
अर्थ
जन्माला येण्याचे मूळ कारण म्हणजे आपले पाप आहे आणि आपल्या संचिताच्या फळा नुसार आपल्याला सुख दुःख भोग प्राप्त होतात. मग त्याविषयी कोणत्याही प्रकारचे दुःख मानून घेऊ नये आणि देवावर रुसून तरी काय उपयोग आहे ? सर्वाना माहीत आहे संसारात दुख आहेच मग कोणत्याही गोष्टीचा चित्तात व्यर्थ शिण करून घेऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात एका हरीच्याच नामाची आठवण ठेवावी आणि मग त्या नामाच्या ओघात जन्ममरणाचे दुख विसरून जावे.
अभंग क्र. ११९३
आता माझे नका वाणू गुण दोष । करितो उपदेश याचा काही ॥१॥
मानदंभासाठी छळीतसे कोणा । आण या चरणा विठोबाची ॥२॥
तुका म्हणे हे तो ठावे पांडुरंगा । काय कळे जगा अंतरीचे ॥३॥
अर्थ
आता मी तुम्हाला जो काही उपदेश करत आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा गुण किंवा दोष काढू नका. मी उपदेश करताना कठोर शब्द वापरतो परंतु ते कठोर शब्द जर कोणाचा अपमान करण्यासाठी किंवा कोणाचा छळ करण्यासाठी असेल तर मला विठोबाच्या पायाची शपत आहे. माझा तसा काही उद्देश नसतो. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या उपदेशांमध्ये काय हेतु आहे हे त्या पांडुरंगालाच माहित आहे जगाला माझ्या अंतरंगातील भक्तिभाव कळणारच नाही.
अभंग क्र. ११९४
वांजा गाई दुभती । देवा ऐसी तुझी ख्याति ॥१॥
ऐसे मागत नाही तुज । चरण दाखवावे मज ॥धृपद॥
चातक पाखरू । त्यासी वर्षे मेघधारु ॥२॥
पक्षी राजहंस । अमोलिक मोती त्यास ॥३॥
तुका म्हणे देवा । का गा खोचलासी जीवा ॥४॥
अर्थ
देवा तुझी ख्याती अशी आहे की तुझ्या कृपा आशीर्वादाने वांज गाय देखील दूध देते. पण देवा मी तुला अशी संसारिक गोष्ट मागणार नाही मला फक्त तुझ्या चरणांचे दर्शन दे एवढेच. चातक पक्षासाठी पावसाच्या एका थेंबाची गरज असते परंतु त्याच्यासाठी मेघ भरपूर प्रमाणात वृष्टी करतो. राजहंस नावाच्या पक्षाला अमोलिक मोती खाणे आवडते. तुकाराम महाराज म्हणतात हे ब्राम्हणदेवा मी असे बोलल्या मुळे तुम्हाला एवढे का बरे बोचले. . (तुकाराम महाराजांनी चिंचवडच्या चिंतामण पूजार्यांच्याशी हे भाषण केले आहे तेच ह्या अभंगात आहे. )
अभंग क्र. ११९५
परते मी आहे सहज चि दुरी । वेगळे भिकारी नामरूपा ॥१॥
न लगे रुसावे धरावा संकोच । सहज ते नीच आले भागा ॥धृपद॥
पडिलिये ठायी उच्छिष्ट सेवावे । आरते ते चि देवे केले ऐसे ॥२॥
तुका म्हणे तुम्ही आम्हा जी वेगळे । केले ते निराळे द्विज देवा ॥३॥
अर्थ
देवा मी तुमच्यापेक्षा दूर आहे तुमच्या पासून वेगळा आहे तसेच तुमच्या नाम रूपा पासून वेगळा असून मी व्यवहारत: भिकारी आहे. मी निच जातीतला आहे मी निच जातीत जन्माला आल्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा रुसवा आणि संकोच धरत नाही. बसल्या जागेवर मला संतांची उच्चिष्ट खाण्यास सेवन करण्यास मिळावी हीच माझी इच्छा आहे. आणि ती इच्छा देवाने पूर्ण करण्यासाठी व्यवस्थाही केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे ब्राम्हण देवा तुम्ही आम्ही वेगळे आहोत आणि तुम्हीच आमच्यापासून निराळे झाले आहात. (तुकाराम महाराजांनी चिंचवडच्या चिंतामण पूजार्यांच्याशी हे भाषण केले आहे तेच ह्या अभंगात आहे. )
अभंग क्र. ११९६
चिंतामणिदेवा गणपतीसी आणा । करवावे भोजना दुजे पात्री ॥१॥
देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी । अभिमानाभीतरी नागवलो ॥धृपद॥
वाडवेळ जाला सिळे जाले अन्न । तटस्थ ब्राम्हण बैसलेती ॥२॥
तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते । आणीन त्वरित मोरयासी ॥३॥
अर्थ
अहो चिंतामणी देवा तुमचे दैवत गणपती यांना जेवण्यास बोलवा आणि दुसरे पात्र तुमच्या शेजारी टाकून त्यांना भोजन करण्यास बसवा. त्यावेळी चिंतामणी म्हणाले अहो तुकोबा आमची एवढी मोठी थोरवी कसली आमची तर अभिमानाने फजिती झाली आहे. खूप उशीर झाला होता अन्न शिळे होत चालले होते ब्राम्हण आपल्या ताटावर तसेच तटस्थ बसलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात अहो चिंतामणी देवा मी तुमच्या पुण्याइने देवाला गणपती रायाला बोलावुन आनु शकतो आणि खरोखर महाराजांनी विनंती करतातच पांडुरंग राया गणपतीच्या अवतारात तेथे आले. . (तुकाराम महाराजांनी चिंचवडच्या चिंतामण पूजार्यांच्याशी हे भाषण केले आहे तेच ह्या अभंगात आहे. )
अभंग क्र. ११९७
भोक्ता नारायण लक्षुमीचा पति । म्हणोनि प्राणाहुती घेतलिया ॥१॥
भर्ता आणि भोक्ता कर्त्ता आणि करविता । आपण सहजता पूर्णकाम ॥धृपद॥
विश्वंभर कृपादृष्टी सांभाळीत । प्रार्थना करीत ब्राम्हणांची ॥२॥
कवळोकवळी नाम घ्या गोविंदाचे । भोजन भक्ताचे तुका म्हणे ॥३॥
अर्थ
तुकाराम महाराजांनी चिंचवडच्या गणपती मोरयाला अन्नग्रहण करण्यासाठी बोलावताच श्री विठ्ठल गणरायाच्या रूपात तेथे अन्नग्रहण करण्यासाठी आले आणि त्यांना पाहताच “लक्ष्मीचा पती नारायण जो सर्व अन्नाचा भोक्ता आहे” या अर्थचा मंत्र म्हणून महाराजांनी व सर्वानी प्राणहुती घेतली व देवच सर्वाचा पालन करता आहे, भोक्ता आहे, कर्ता आहे, करविता आहे आणि तोच पूर्ण काम आहे असा हा विश्वंभर सर्वावर कृपादृष्टी ठेवून सर्वाचा सांभाळ करणारा आहे, तो सर्व ब्राम्हणांना सावकाश होऊ द्या अशी प्रार्थना करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे देव आणि भक्तांचे एका पंगतिला भोजन होत आहे त्यामुळे प्रत्येक घासाला गोविंदाचे नाम घेत भोजन करावे.
अभंग क्र. ११९८
माझा स्वामी तुझी वागवितो लात । तेथे मी पतित काय आलो ॥१॥
तीर्थे तुमच्या चरणी जाहाली निर्मळ । तेथे मी दुर्बळ काय वाणू ॥२॥
तुका म्हणे तुम्ही देवा द्विजवंद्य । मी तो काय निंद्य हीन याती ॥३॥
अर्थ
ज्यावेळी चिंचवडच्या गणपतीस प्रार्थना करून महाराजांनी भोजन करविले आणि देव त्यांच्या विनंतीस मान देऊन भोजन करण्यास आले वमककगगग जेवण झाल्यावर तेथील चिंतामणी ब्राम्हणांनी तुकाराम महाराजांची स्तुती करण्यास सुरुवात केली त्यावेळी तुकाराम महाराज म्हणाले अहो चिंतामणी देवा माझा स्वामी पांडुरंग तुम्हा ब्राम्हणांची लाथ त्याच्या छातीवर धारण करतो मग माझ्यासारख्या पतीताचे तेथे काय चालणार आहे ? माझ्यासारखा पतीत कोण लागून गेला ? अहो ब्राम्हण देवा तुमच्या चरणस्पर्शाने तिर्थे पवित्र होतात मग माझ्यासारख्या दुर्बळाचा तेथे काय अधिकार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात अहो चिंतामणी देवा तुम्ही ब्राम्हण देवालाही वंद्य आहात मी हिन जातीत जन्माला आलो आहे. (अशा प्रकारचे विनयपूर्वक भाष्य तुकाराम महाराजांनी चिंचवडच्या गणपतीची सेवा करणाऱ्या चिंतामणी ब्राम्हण देवास केले. )
अभंग क्र. ११९९
वंदिले वंदावे जीवाचिये साठी । किंवा बरी तुटी आरंभीच ॥१॥
स्वहिताची चाड ते ऐका बोल । अवघेचि मोल धीरा अंगी ॥धृपद॥
सिंपिले ते रोप वरीवरी बरे । वाळलिया पुरे कोंभ नये ॥२॥
तुका म्हणे टाकीघाये देवपण । फुटलिया जन कुला पुसी ॥३॥
अर्थ
आरंभापासूनच आपण ज्या दैवताला, गुरूला वंदन करतो त्यांच्याविषयी नेहमी वंदनीय भावना ठेवली तरच चांगले, नाही तर त्यापेक्षा सुरुवातीला त्यांच्याशी संबंध न ठेवलेले चांगले. ज्याला आपले स्वहित करायचे आहे त्याने हे माझे आहे बोलणे ऐकावे. मनुष्याच्या अंगी धैर्य असणे हा मोठा मौल्यवान गुण आहे. एखाद्या रोपट्याला वरच्यावर पाणी घालावे लागते नाहीतर ते एकदा कि वाळले तर मग त्यावर कितीही पाणी वाहिले तरी त्याला कोंब फुटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात दगडाला देवपण येण्यासाठी अनेक टाकीचे घाव सोसावे लागते आणि मूर्ती तयार करत असताना मूर्तींमध्ये फुटली तर त्या मूर्तीचा दगड लोक ढुंगन पुसण्यासाठी करतात, तात्पर्य कोणतेही कार्य करतांना धीराने करावे.
अभंग क्र. १२००
आम्हा विष्णुदासा हे चि भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥१॥
वाणी नाही घ्यावे आपुलिया हाते । करोनिया चित्ते समाधान ॥२॥
तुका म्हणे द्रव्य मेळविले मागे । हे तो कोणासंगे आले नाही ॥३॥
अर्थ
आम्हा हरिदासांना विठ्ठल हेच भांडवल आहे आणि आमचे धन, वित्त सर्वकाही विठ्ठलचा आहे. आमच्या या भांडवलामध्ये कोणत्याही प्रकारचा तोटा नाही त्यामुळे चित्तामध्ये समाधान आहे आणि आम्ही चित्त समाधान करून लागेल तेवढे ते नाम सेवन करतो. तुकाराम महाराज यामागे अनेक लोकांनी द्रव्य मिळवले आहे पण ते द्रव्य कोण संगे गेलेले ही नाही व कोणा बरोबर आलेले देखील नाही पण आमच्या जवळचे विठ्ठल नाम रुपी भांडवल आहे, धन आहे, द्रव्य आहे, ते नेहमी आमच्या बरोबरच राहते.
सार्थ तुकाराम गाथा ११०१ ते १२०० समाप्त.
येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















