आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२४ एप्रिल, दिवस ११४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा, ओवी १ ते २५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १३५७ ते १३६८
“२४ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 24 Apirl
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २४ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील २४ ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
24
24 एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा, ओवी १ ते २५,
॥ सार्थ श्रीज्ञानेश्वरी
॥ अथ दशमोऽध्यायः अध्याय दहावा ॥
विभूतियोग ॥
अध्याय दहावा
1-10
नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा । पराप्रमेयप्रमदा । विलासिया ॥1॥
स्पष्ट ब्रह्मबोध करून देण्यात निपुण असणारे, ब्रह्मविद्यारूपी कमलाला विकसित करणारे, पराविद्येचे प्रमेय जे परब्रह्म- तीच कोणी स्री- तिच्याशी विलास करणारे, अशा तुम्हाला, हे श्रीगुरो ! माझा नमस्कार असो.
2-10
नमो संसारतमसूर्या । अप्रतिमपरमवीर्या । तरुणतरतूर्या । लालनलीला ॥2॥
जे अज्ञानरूपी अंधःकाराचा नाश करणारे सूर्य आहेत, उपमा देता येणार नाही असे जे अगाध सामर्थ्यवान आहेत, तरूण म्हणजे उत्पत्तिनाशरहित व तरुणतर म्हणजे प्रयत्नावाचून अखंड कायम राहणार्या अशा तूर्यांवस्थेचे जे पालन करण्याची लीला करणारे आहेत, अशा श्रीगुरो ! तुम्हाला नमस्कार असो.
3-10
नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना । सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥3॥
जे संपूर्ण जगाचे पालन करणारे आहेत, जे संपूर्ण कल्याणरूपी रत्नांचा सांठा आहेत किंवा सर्व कल्याणात श्रेष्ठ असे जे आत्मकल्याणाचा सांठा आहेत, जे सज्जनरूपी वनास चंदनासारखे सुगंधित करून सोडणारे आहेत, ब्रह्मादिकांना सेव्य हेच ज्यांचे चिन्ह आहे, हे श्रीगुरो ! अशा तुम्हाला माझा नमस्कार असो.
4-10
नमो चतुरचित्तचकोर चंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा । श्रुतिसार समुद्रा । मन्मथमन्मथा ॥4॥
जे चतुरांच्या चित्तरूपी चकोराला चंद्राप्रमाणे आल्हादकारक आहेत, जे आत्मानुभवाचे राजे आहेत, श्रृतीचे सार जे ब्रह्मज्ञान, त्याचा जे समुद्र आहेत व जे कामालाहि मोहून घेणारे किंवा जिंकणारे आहेत, अशा श्रीगुरुराया ! तुम्हाला माझा नमस्कार असो.
5-10
नमोसुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना । विश्वोद्भवभुवना । श्रीगुरुराया ॥5॥
जे निष्काम प्रेमाने भजन करण्यास योग्य आहेत, जे संसाररूपी हत्तीचे गंडस्थल फोडणारे आहेत, जे सर्व जगताच्या उत्पत्तीला किंवा भासाला अधिष्ठानभूत आहेत, अशा श्रीगुरुनाथा ! तुम्हाला नमस्कार असो.
6-10
तुमचा अनुग्रहो गणेशु । जै दे आपुला सौरसु । तै सारस्वती प्रवेशु । बाळकाही आथी ॥6॥
श्रीगुरुनाथा ! तुमची कृपा हीच गणेश देवता होय. तिने आपला प्रसाद केला असता, अज्ञ नेणता बालक देखील सर्वविद्यापारंगत होतो.
7-10
जी दैविकी उदार वाचा । जै उद्देशु दे नाभिकाराचा । तै नवरससुधाब्धीचा । थावो लाभे ॥7॥
अहो जी गुरुनाथा ! तुम्हा देवाच्या थोर औदर्याने संपन्न असलेल्या वाणीकडून ” भिऊ नकोस ” असे अभय वचन मिळाले असता, श्रृंगारादि नवरसरूपी अमृताच्या समुद्राचाही थांग घेता येतो.
8-10
जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी । जरी मुकेयाते अंगिकारी । तो वाचस्पतीशी करी । प्रबंधुहोडा ॥8॥
श्रीगुरुनाथा ! आपले प्रेम हीच कोणी सरस्वती होय. हिने जर मुक्याचा अंगीकार केला, तर तो बृहस्पतीशी देखील ग्रंथरचनेत पैज लावू शकेल.
9-10
हे असो दिठी जयावरी झळके । की हा पद्मकरु माथा पारुखे । तो जीवचि परि तुके । महेशेसी ॥9॥
हे असो, श्रीगुरुराया ! तुमची कृपादृष्टी ज्याच्यावर आपला ज्ञानप्रकाश पाडील किंवा तुमचे हस्तकमल ज्याच्या डोक्यावरा जाईल, तो जीव जरी असला, तरी तो शंकरासमान होतो.
10-10
एवढे जिये महिमेचे करणे । ते वाचाबळे वानू मी कवणे । का सूर्याचिया आंगा उटणे । लागत असे ? ॥10॥
श्रीगुरुच्या महिम्याचे असे अगाध सामर्थ्य मी कोणत्या वाणीच्या बळाने वर्णन करू ! सूर्याच्या अंगाला उटणे लावून स्वच्छ करावे लागते काय ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
11-10
केउता कल्पतरुवरी फुलौरा ? । कायसेनि पाहुणेरु क्षीरसागरा ? । कवणे वासी कापुरा । सुवासु देवो ? ॥11॥
कामनापूर्तीकरिता नमरसाचा फुलवरा (नवसाप्रीत्यर्थ देवतेवर पात्या, करंज्या लावून फुलवरा बांधतात तो प्रकार) बांधायला पाहिजे काय ? क्षीरसागराला कशाचा पाहुणचार करता येईल ? कापराला कोणत्या सुवासाने सुवासित करता येईल ?
12-10
चंदनाते कायसेनि चर्चावे । अमृताते केउते रांधावे । गगनावरी उभवावे । घडे केवी ? ॥12॥
चंदनाला कशाची उटी लावावी ? अमृताला शिजविण्याचे काय प्रयोजन आहे ? आकाशापेक्षा उंच होणे कसे घडणार ?
13-10
तैसे श्रीगुरूचे महिमान । आकळिते के असे साधन ? । हे जाणोनि मिया नमन । निवांत केले ॥13॥
त्याप्रमाणे श्रीगुरुचे महात्म्य आकलन करता येण्याजोगे कोणते साधन आहे ? (कोणतेच नाही. ) हे जाणून मी मुकाट्याने तुमच्या पायावर डोके ठेविले आहे.
14-10
जरी प्रज्ञेचेनि आथिलेपणे । श्रीगुरूसामर्थ्या रूप करू म्हणे । तरि ते मोतिया भिंग देणे । तैसे होईल ॥14॥
जर बुध्दिच्या व्युत्पत्त्यादि सामर्थ्याने श्रीगुरुच्या सामर्थ्याचे वर्णन करीन, असे कोणी म्हणेल, तर ते त्याचे करणे, पाणीदार मोत्याला अभ्रकाचे पुट लावण्यासारखे होईल.
15-10
का साडेपंधरया रजतवणी । तैशी स्तुतींची बोलणी । उगियाचि माथा ठेविजे चरणी । हेचि भले ॥15॥
किंवा श्रीगुरुची शब्दाने स्तुती करणे, हे शुध्द सोन्याला रूप्याचे पाणी देण्यासारखे होणार आहे, म्हणून मुकाट्याने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवणे हेच मी उत्तम समजतो.
16-10
मग म्हणितले जी स्वामी । भलेनि ममत्वे देखिले तुम्ही । म्हणौनि कृष्णार्जुनसंगमी । प्रयागवटु जाहलो ॥16॥
नंतर श्रीज्ञानेश्वर महाराज श्रीगुरुनिवृत्तिनाथांना म्हणतात, अहो जी गुरुनाथा ! माझ्यावर तुम्ही अत्यंत ममता करीत आहा, म्हणूनच श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादरूपी संगमाच्या ठिकाणी मी, प्रयागातील (त्रिवेणी संगमावरील) वटवृक्षाप्रमाणे झालो.
17-10
मागा दूध दे म्हणतलियासाठी । आघविया क्षीराब्धीची करूनि वाटी । उपमन्यूपुढे धूर्जटी । ठेविली जैसी ॥17॥
मागे उपमन्युने दुध मागितले असता क्षीरसागराचीच वाटी करून ज्याप्रमाणे शंकराने त्याच्या पुढे ठेवली,
18-10
ना तरी वैकुंठपीठनायके । रुसला ध्रुव कवतिके । बुझाविला देऊनि भातुके । ध्रुवपदाचे ॥18॥
किंवा वैकुंठलोकाचा स्वामी जो भगवान विष्णू, त्याने रूसलेल्या ध्रुवाला ध्रुवपदाचे भातुके देऊन त्याचे सहज सांत्वन केले,
19-10
तैसी जे ब्रह्मविद्यारावो । सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो । ते भगवद्गीता वोविये गावो । ऐसे केले ॥19॥
त्याप्रमाणे ब्रह्मविद्येचा राजा आणि सर्व शास्रांचे विश्रांतिस्थान अशी जी भगवद्गीता, ती माझ्याकडून ओवीरूप छंदात गाववून दाखविली.
20-10
जे बोलणियाचे रानी हिंडता । नायकिजे फळलिया अक्षराची वार्ता । परि ते वाचाचि केली कल्पलता । विवेकाची ॥20॥
येथे वाणीने बोलल्या जाणार्या शब्दांच्या जंगलात हिंडत असता, आत्मज्ञानरूप अर्थफळाने फळणार्या अक्षराची वार्ता देखील ऐकायला येत नाही, पण आपण माझी वाणी विवेक- ज्ञानरूप अर्थफळाने फळणारी कल्पलताच केली.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
21-10
होती देहबुद्धी एकसरी । ते आनंद भांडारा केली वोवरी । मन गीतार्थ सागरी । जळशयन जाले ॥21॥
माझ्या ठिकाणी एकसारखी जी देहबुध्दी – म्हणजे मी देह आहे, अशी बुध्दी – होती, ती आपण आज ब्रम्हानंदाची भंडार साठविलेली खोली केली आणि म्हणूनच निरनिराळ्या पदार्थांचा संकल्प विकल्प करणार्या मनाचे – गीतेचा अर्थ जो ब्रह्मानंद, हाच कोणी सागर – त्या सागराच्या जलामध्ये निजणे झाले म्हणजे ते निमग्न झाले.
22-10
ऐसे एकेक देवाचे करणे । ते अपार बोलो केवी मी जाणे । तऱ्ही अनुवादलो धीटपणे । ते उपसाहिजो जी ॥22॥
ही आपली एक एक कृती अगाध सामर्थ्याने भरलेली आहे, ती मी शब्दाने कशी वर्णन करू ? असे असूनही धीट होऊन, मी तिचा अनुवाद केला, तो माझा अपराध सहन करा.
23-10
आता आपुलेनि कृपाप्रसादे । मिया भगवद्गीता वोवीप्रबंधे । पूर्वखंड विनोदे । वाखाणिले ॥23॥
आता आपल्या कृपाप्रसादाने मी ओवीबध्द छंदात गीतेच्या पूर्वखंडाचे सहज स्पष्टीकरण केले आहे.
24-10
प्रथमी अर्जुनाचा विषादु । दुजी बोलिला योगु विशदु । परि सांख्यबुद्धीसि भेदु । दाऊनिया ॥24॥
पहिल्या आध्यायात अर्जुनाला झालेल्या विषादाचे वर्णन असून, दुसर्या अध्यायात सांख्य बुध्दी व योगबुध्दी यात काय भेद आहे हे बाखवून कर्मयोगाचे स्वरूप स्पष्ट केले आहे.
25-10
तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले । तेचि चतुर्थी ज्ञानेशी प्रगटिले । पंचमी गव्हरिले । योगतत्त्व ॥25॥
तिसर्या अध्यायात केवळ कर्ममार्गाचेच वर्णन केलेले असून, चौथ्या अध्यायात तेच कर्म ज्ञानपूर्वक कसे करावे हे सांगितले. पाचव्या अध्यायात योगतत्वाचे (म्हणजे परमेश्वराचे ठिकाणी स्थिर बुध्दी करण्याचे जे तत्व त्याचे) गूढपणाने निरूपण केले.
दिवस ११४ वा, २४, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १३५७ ते १३६८
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. १३५७
देईल ते उणे नाही । याचे काही पदरी ॥१॥
पाहिजे ते संचित आता । येथे सत्ता करावया ॥धृपद॥
गुणा ऐसा भरणा भरी । जो जे चारी ते लाभे ॥२॥
तुका म्हणे देवी देव । फळे भव आपुला ॥३॥
अर्थ
हा देव काहीही देऊ शकेल करण्याच्या पदरात कशाचीही कमतरता नाही. परंतु देवावर येवढी सत्ता करण्यासाठी आपल्याजवळ ही काही पुण्यकर्म असायला हवे. जो मनुष्य गाईला पुष्कळच चारा खाऊ घालतो त्या गुणा प्रमाणे ती गाय त्याला तो जेवढा चारा खाऊ घालेल तेवढे दूध देते. तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या ठिकाणी आपला जसा भक्तिभाव असेल त्याप्रमाणे आपल्याला भक्तीचे फळ मिळते.
अभंग क्र. १३५८
तेव्हा होतो भोगाधीन । तुम्हा भिन्न पासूनि ॥१॥
आता बोलो नये ऐसे । आनारिसे वेगळे ॥धृपद॥
सन्मुख जालो स्वामीकडे । भव आंगडे निराळे ॥२॥
चिंतिले ते चिंतामणी । फिटे धणी तो द्यावे ॥३॥
सहज स्थिती आहे अंगी । प्रसंगी ते वंचेना ॥४॥
तुमची देवा धरिली कास । केला नास प्रपंचा ॥५॥
तुका म्हणे जाणोनि वर्म । कर्माकर्मे ठेविली ॥६॥
अर्थ
देवा मी ज्यावेळी तुमच्या पासून भिन्न होतो त्यावेळी मी भोगाच्या आधीन होतो. आता मी तुमच्या जवळ आलो आहे मी मागचे काहीच बोलत नाही. आता मी माझ्या स्वामीच्या पांडुरंगाच्या पुढे आलो आहे त्यामुळे मी माझ्या अंगावरील संसाराचे उपाधी रूप कपडे काढून टाकत आहे. मनात जी इच्छा असेल ती चिंतामणी पूर्ण करतो, देवा तुमच्या अंगी अशीच सहजच स्थिती आहे ती प्रसंगानुसार लपविली जरी असली तरीही भक्तांची इच्छेनुसार उघडकिस येतेच. म्हणून मी तुमची कास धरली आहे देवा आणि प्रपंचाचा नाश केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी तुमची सर्व वर्म जाणली आहे त्यामुळे सर्व कर्म अकर्म बाजूला ठेवून मी तुम्हाला शरण आलो आहे.
अभंग क्र. १३५९
केला कइवाड संतांच्या आधारे । अनुभवे खरे कळो आले ॥१॥
काय जीवित्वाची धरुनिया आशा । व्हावे गर्भवासा पात्र भेणे ॥धृपद॥
अबाळीने जावे निश्चिंतीच्या ठाया । रांडा रोटा वाया करू नये ॥२॥
तुका म्हणे बळी देता ते निधान । भिकेसाठी कोण राज्य देतो ॥३॥
अर्थ
मी भक्ती करण्याचा निर्धार केला आहे तो केवळ संतांच्या आधाराने कारण संतांना जो अनुभव आला आहे तोच अनुभव मला आला आहे. आता मी जीवित्वाची इच्छा कशासाठी धरू आणि तशी इच्छा मी धरलीच तर मी गर्भवास भाग घेण्यास पात्र आहे. भक्ती करताना कितीही मान-अपमान झाला तरीही भक्ती करावी व निश्चिंत अशा ठिकाणी जावे. नाहीतर उगीचच रांडा सारखे पोट भरून जीवन जगण्याची अपेक्षाच करू नये. तुकाराम महाराज म्हणतात जर मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर देवाच्या पायावर आपला जीव बळी द्यावा लागतो भीक मागून कोणी राज्य देते का तर नाही युद्ध करूनच राज्य मिळावे लागते.
अभंग क्र. १३६०
संगतीने होतो पंगतीचा लाभ । अशोभी अनुभव असिजेते ॥१॥
जैसी तैसी असो पुढिलांचे सोई । धरिती हाती पायी आचारिये ॥धृपद॥
उपकार नाही देखत आपदा । पुढिलांची सदा दया चित्ती ॥२॥
तुका म्हणे तरी सज्जनाची कीर्ती । पुरवावी आर्ती निर्बळांची ॥३॥
अर्थ
संतांच्या संगतीने त्यांच्या म्हणजे संतांच्या पंगतीचा लाभ होतो. परंतु नुसताच पंगतीचा लाभ होतो म्हणून त्यांची संगत करणे साधकाला अशोभनीय गोष्ट आहे. त्याकरिता ब्रम्ह रसाचा अनुभव येणे गरजेचे आहे. जसे असतील तसे पुढे गेलेल्या संतांच्या आधाराने चालावे त्यामुळे संत साधकाच्या हाताला धरून पुढे नेतात. जो खरा परोपकारी असतो त्याला दुसर्याचे दुःख दारिद्र्य पहावत नाही त्याच्या चित्तामध्ये नेहमी दया असते. तुकाराम महाराज म्हणतात संतांचे चित्तही तसेच असते ते नेहमी दुर्बळ भक्तांची मदत करतात.
अभंग क्र. १३६१
करिता विचार सापडले वर्म । समूळ निश्रम परिहाराचे ॥१॥
मज घेऊनिया आपणासी द्यावे । साठी जीवे भावे नारायणा ॥धृपद॥
उरी नाही मग पडदा का आला । स्वमुखेचि भला करिता वाद ॥२॥
तुका म्हणे माझे खरे देणे घेणे । तुम्ही साक्षी जाणे अंतरीचे ॥३॥
अर्थ
देवा खूप विचार केला तेव्हा मला एक वर्म सापडले ज्या योगाने समुळ दुःखाचा परिहार होईल, हे देवा, हे नारायणा ते वर्म म्हणजे माझा जीव अभाव तुम्हाला घ्या आणि त्या बदल्यात मला तुमच्यात विलीन करून घ्यावे. देवा तुमच्यात आणि माझ्यात भेद नाही. हा मायेचा पडदा आपल्या दोघामध्ये अडवा का आला आहे ? तुम्हीच तुमच्या मुखाने भगवद्गीतेत अर्जुनाशी संवाद करताना हे सांगितले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी माझा जीव भाव तुम्हाला अर्पण करणे आणि तुमच्या स्वरूपात मला विलीन करून घेणे हा माझा व्यवहार खरा आहे आणि त्याला साक्षीदार तुम्हीचे अंतरंग व साक्षी तुम्हीच आहात.
अभंग क्र. १३६२
आता देह अवसान । हे जतन तोवरी ॥१॥
गाऊ नाचो गदारोळे । जिंको बळे संसार ॥धृपद॥
याचि जीऊ अभिमाने । सेवाधने बळकट ॥२॥
तुका म्हणे न सरे मागे । होईन लागे आगळा ॥३॥
अर्थ
आता देहावसन होईपर्यंत हरिनाम, रूप, ध्यानाचे रक्षण करू. मोठ्या गदारोळाने आणि आणि हरिनाम गाऊन आनंदात नाचत व त्याच्याच बळावर या संसाराला जिंकून घेऊ. आणि याच सेवा दानाच्या बळकट अभिमानाने जगू. तुकाराम महाराज म्हणतात मी माझ्या या निश्चयापासून मागे सरकणार नाही भक्तीच्या जोरावर मी आगळ्यावेगळ्या आढळ अवस्थोला प्राप्त होईल.
अभंग क्र. १३६३
कुळीची हे कुळदेवी । केली ठावी संतांनी ॥१॥
बरवे जाले शरण गेलो । उगवलो संकटी ॥धृपद॥
आणिला ही रूपा बळे । करूनि खळे हरीदासी ॥२॥
तुका म्हणे समागमे । नाचो प्रेमे लागलो ॥३॥
अर्थ
आमच्या कुळातील कुळदेवी संतांनी आम्हाला माहीत करून दिली. बरे झाले मी त्यामुळे देवीला शरण गेलो त्यामुळे माझी सर्व संकटे नाहीशी झाली आहे. मोठ्या भक्तीच्या बळावर या संतांनी देवीला नावारूपाला आणले आहे. तुकाराम महाराज म्हणतात संत संगतीनेच मी त्या कुळदेवी पुढे नाचु लागलो.
अभंग क्र. १३६४
ज्याने आड यावे काही । त्याचे नाही बळ आता ॥१॥
मन येथे साह्य जाले । हरीच्या धाले गुणवादी ॥धृपद॥
चुकुर तो गेला काळ । जाले बळ संगाचे ॥२॥
तुका म्हणे धरू सत्ता । होईल आता करू ते ॥३॥
अर्थ
जे विकार परमार्थाला आड येत होते आता त्यांचे बळ नाहीशे झाले आहे. कारण मनच मला परमार्थ करण्यासाठी सहाय्य करत आहे व हरिनामाच्या गुणानुवादाने ते तृप्त झाले आहे. मनाने आता परमार्था विषय चुकारपणा करणारा काळा गेला आहे कारण संतांचे संगती नेत्याला बळ प्राप्त झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या हाती सत्ता आली आहे आता आम्ही करू तेच होईल.
अभंग क्र. १३६५
देवासी तो पुरे एकभाव गाठी । तोचि त्याचे मिठी देईल पायी ॥१॥
पाहोनि राहीन कवतुक निराळा । मी मज वेगळा होऊनिया ॥धृपद॥
काही नेघें शिरी निमित्ताचा भार । न लगे उत्तर वेचावेचि ॥२॥
तुका म्हणे जीवे पडिलिया गाठी । मग नाही मिठी सुटो येत ॥३॥
अर्थ
देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकनिष्ठ भक्तिभाव असणे हे पुष्कळ आहे आणि त्यानेच देवाच्या पायाला मिठी देणे शक्य होईल. मी माझ्या देहापासून वेगळा होऊन या जगाला कौतुकाने पाहत आहे. मी माझ्या शरीरावर कोणत्याही निमित्त चा भार घेणार नाही आणि त्याविषयी कोणी काही विचारले तर मी काहीच उत्तर देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात एकदा कि देवाची आणि जीवाची गाठ झाली कि मग ती काही केल्या सुटणार नाही.
अभंग क्र. १३६६
लौकिकासाठी या पसाऱ्याचा गोवा । काही नाही देवा लागो येत ॥१॥
ठेवावा माथा तो नुचलावा पायी । ठांयींचिये ठांयी हालो नये ॥धृपद॥
डहुळिल्या मने वितुळले रूप । नावऐसे पाप उपाधीते ॥२॥
तुका म्हणे देव प्रीतीने कवळी । ठेवील जवळी उठवूनि ॥३॥
अर्थ
काही लोक लौकिका साठी परमार्थाचा पसारा घालतात परंतु देवाला त्या गोष्टी आवडत नाही. देवाच्या चरणावर एकदा की मस्तक ठेवले की ते पुन्हा उचलू नये त्याच ठिकाणी एकनिष्ठ भक्तीभाव करून ठेवावा. देवाच्या ठिकाणी आनंदी राहावे. मन चंचल आहे आणि ते जर उपाधीत गुंतले तर मनातील हरिरूप प्रतिबिंब वितळले जाते व त्याचेच नांव पाप आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवाविषयी एकनिष्ठ भक्ती भाव ठेवून जो कोणी वागेल त्याला देव त्याला प्रेमाने मिठी मारेल व त्याला जवळ घेईल.
अभंग क्र. १३६७
नाही होत भार घातल्या उदास । पुरवावी आस सकळ ही ॥१॥
ऐसा नाही मज एकाचा अनुभव । धरिला तो भाव उद्धरले ॥धृपद॥
उतावीळ असे शरणागत काजे । धावा केशीराजे आइकता ॥२॥
तुका म्हणे हित चिंतन भरवसा । नेदी गर्भवासा येऊ देऊ ॥३॥
अर्थ
देवावर जो कोणी आपला सर्व भार घालील त्याविषयी देव उदास राहत नाही. त्याचे सर्व इच्छा मनापासून देव पूर्ण करतो. एखाद्या कोण्या भक्ताची देवाने उपेक्षा केली असा मला एकाचाही अनुभव आलेला नाही याउलट जो कोणी खरा भक्तिभाव देवाच्या ठिकाणी ठेवतो त्याचा उद्धार हा देव करतो. केशव राजाला भक्ताने धाव घातली की तो लगेच धावत येतो आणि भक्ताचे काम करण्यासाठी उतावीळ होतो. तुकाराम महाराज म्हणतात देवाला भक्तांच्या हिताची चिंता आहे आणि देव भक्तांना पुन्हा पुन्हा गर्भ वासाला येऊ देत नाही याविषयी मला भरवसा आहे.
अभंग क्र. १३६८
उपजो मरो हे तो आमुची मिरासी । हे तू निवारिसी तरी थोर ॥१॥
उभा राही करी खरा खोटा वाद । आम्ही जालो निंद लंडपणे ॥धृपद॥
उभयता आहे करणे समान । तुम्हा ऐसा म्हणे मी ही देवा ॥२॥
तुका म्हणे हाती सापडले वर्म । अवघाची भ्रम फेडिन आता ॥३॥
अर्थ
देवा जन्माला यावे आणि मरावे हीच आमची वतनदारी आहे. याचे निवारण तू केलेस तर तू थोर आहे असे मी समजेन. देवा तुला याविषयी वाद करायचा असेल तर माझ्या समोर ये आणि काय असेल ते खरा खोटा निकाल लाव. आम्ही अगोदरच निंद्य ठरलो आहोत. देवा आपण दोघेही समान आहोत त्यामुळेच मी म्हणत असतो, मी ही तुझ्या सारखाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुझ्यासारखाच आहे याचे वर्म माझ्या हाती सापडले आहे त्यामुळे मी आता सर्व भ्रम नाहीसा करून टाकणार आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















