आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१८ जून, दिवस १६९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी १०१ ते १२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २०१७ ते २०२८
“18 जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 185 June
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक 18 जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २०१७ ते २०२८चे पारायण आपण करणार आहोत.
18 जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी १०१ ते १२५,
101-13
कर्मेंद्रिये म्हणिपती । ती इये जाणिजती । आइके कैवल्यपती । सांगतसे ॥101॥
कैवल्य देणारे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. अर्जुना ! ऐक. ज्यांना कर्मेंद्रिंय म्हणतात, ती ही जाण.
102-13
पै प्राणाची अंतौरी । क्रियाशक्ति जे शरीरी । तियेचि रिगिनिगी द्वारी । पांचे इही ॥102॥
प्राणाची पत्नी म्हणून जी क्रियाशक्ती या शरीराचे ठिकाणी आहे. जिचे आत येणे व बाहेर जाणे या पाच कर्मेंद्रियांच्या द्वारा होत असते.
103-13
एवं दाहाही करणे । सांगितली देवो म्हणे । परिस आता फुडेपणे । मन ते ऐसे ॥103॥
देव म्हणतात, याप्रमाणे तुला दहा इंद्रिये कोणती ती सांगितली. आता मन स्पष्टपणे असे आहे, ते ऐक.
104-13
जे इंद्रिया आणि बुद्धि । माझारिलिये संधी । रजोगुणाच्या खांदी । तरळत असे ॥104॥
जे मन इंद्रिये आणि बुद्धि यांच्या मधील जागेत रजोगुणाच्या खांद्यावर (आश्रयावर) चंचलपणे असते,
105-13
नीळिमा अंबरी । का मृगतृष्णालहरी । तैसे वायाचि फरारी । वावो जाहले ॥105॥
आकाशात जसा निळा रंग किंवा मृगाला तहानेमुळे भासणारी जशी जलाची लहरी, त्याप्रमाणे वायूचे जे व्यर्थ स्फुरण झाले (त्यालाच मन हे नाव आहे. )
106-13
आणि शुक्रशोणिताचा सांधा । मिळता पांचांचा बांधा । वायुतत्त्व दशधा । एकचि जाहले ॥106॥
आणि पुरुषाचे रेत व स्रियांचे शोणित यांचे मिश्रण होऊन पाच महाभूतांचा बांधा जे शरीर ते उत्पन्न झाले असता एकच वायूतत्व दहा प्रकारचे होते.
107-13
मग तिही दाहे भागी । देहधर्माच्या खैवंगी । अधिष्ठिले आंगी । आपुलाल्या ॥107॥
मग त्या दहा भागांनी आपापल्या अंगाचा, देहधर्माच्या सामर्थ्याला आश्रय दिला.
108-13
तेथ चांचल्य निखळ । एकले ठेले निढाळ । म्हणौनि रजाचे बळ । धरिले तेणे ॥108॥
तेथे त्या मनाचे ठिकाणी एक निव्वळ चंचलताच राहिली, म्हणून ते एकटेच राहिले त्याने रजोगुणाचेच बळ धरले.
109-13
ते बुद्धीसि बाहेरी । अहंकाराच्या उरावरी । ऐसा ठायी माझारी । बळियावले ॥109॥
ते बुध्दीच्या नंतर व अहंकाराच्या पूर्वी असे मध्यसंधीत बळकट झाले आहे. (ते बुद्धीसि बाहेरी । अहंकाराच्या उरावरी । – कल्पना करणारे मन बुध्दीच्या ज्ञानाने जाणले जाऊन बुध्दीचा विषय होते, म्हणून ते बुध्दीच्या बाहेर आणि कल्पनारूप मन स्फुरल्यानंतर त्याचा अहंकार धरला जातो, म्हणून उरावर अहंकाराच्या पूर्वी, असे बुध्दीच्या आणि अहंकाराच्या संधीत मनाची शक्ती बळकट होते, असे सांगितले आहे. )
110-13
वाया मन हे नांव । एऱ्हवी कल्पनाचि सावेव । जयाचेनि संगे जीव- । दशा वस्तु ॥110॥
त्याला मन हे व्यर्थच नाव आहे. खरोखर मन म्हणजे कल्पनाच होय. ज्याच्या संगतीने परब्रह्मवस्तूला जीवदशा प्राप्त झाली.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
111-13
जे प्रवृत्तीसि मूळ । कामा जयाचे बळ । जे अखंड सूये छळ । अहंकारासी ॥111॥
जे सर्व कर्मप्रवृत्तीचे कारण आहे, ज्याच्यामुळे कामवासना ही बलवान होते आणि जी अहंकाराला नेहमी उसळविते,
112-13
जे इच्छेते वाढवी । आशेते चढवी । जे पाठी पुरवी । भयासि गा ॥112॥
जे इच्छा वाढविते, आशेची वृध्दी करते, जे भयाला वाढविते,
113-13
द्वैत जेथे उठी । अविद्या जेणे लाठी । जे इंद्रियाते लोटी । विषयांमजी ॥113॥
केवळ ज्याच्या योगाने द्वैत भासते, ज्याच्या योगाने आत्मविस्मृतिरूप अविद्या दृढ होते, जे इंद्रियांना विषयात घालते,
114-13
संकल्पे सृष्टी घडी । सवेचि विकल्पूनि मोडी । मनोरथांच्या उतरंडी । उतरी रची ॥114॥
जे नुसत्या संकल्पाने म्हणजे ‘आहे’ या कल्पनेने- सृष्टी उत्पन्न करते व लगेच नाही अशी कल्पना करून सृष्टी नाहीशी करते, याप्रमाणे नानाप्रकारच्या मनोरथांच्या उतरंडी रचते व खाली करते,
115-13
जे भुलीचे कुहर । वायुतत्त्वाचे अंतर । बुद्धीचे द्वार । झाकविले जेणे ॥115॥
जे भ्रमाचे कोठार असून वायुतत्वाचे आतील अंग आहे आणि बुध्दीचे आत्मज्ञानरूपी द्वारे ज्याने झाकले आहे,
116-13
ते गा किरीटी मन । या बोला नाही आन । आता विषयाभिधान । भेदू आइके ॥116॥
अर्जुना, ते मन होय. यात अन्यथा नाही. आता विषयांची वेगवेगळी नावे ऐक.
117-13
तरी स्पर्शु आणि शब्दु । रूप रसु गंधु । हा विषयो पंचविधु । ज्ञानेंद्रियांचा ॥117॥(विषय 117 पासून)
तर शब्द आणि स्पर्श, रूप, रस व गंध हे पाच ज्ञानेद्रिंयांचे पाच प्रकारचे विषय आहेत.
118-13
इही पांचैं द्वारी । ज्ञानासि धाव बाहेरी । जैसा का हिरवे चारी । भांबावे पशु॥118॥
या पाच द्वारांनीच ज्ञान बाहेर धावते, ते कसे ? तर जसे हिरवेगार गवत उगवलेल्या कुरणामधे जनावरे भांबावतात (तसे ज्ञान भांबावते).
119-13
मग स्वर वर्ण विसर्गु । अथवा स्वीकार त्यागु । संक्रमण उत्सर्गु । विण्मूत्राचा ॥119॥
मग तोंडाने स्वर आणि अक्षरे व विसर्ग यांचा उच्चार करणे, अथवा हाताने घेण्याची व टाकण्याची क्रिया करणे, पायाने चालणे, उपस्थाने मूत्राचा त्याग करणे व गुदाने मलाचा त्याग करणे
120-13
हे कर्मेंद्रियांचे पांच । विषय गा साच । जे बांधोनिया माच । क्रिया धावे ॥120॥
हे पाच कर्मेद्रिंयांचे पाच प्रकारचे विषय खरे आहेत व यांचा पहाड बांधून त्यावरून क्रियेचा व्यवहार चालू रहातो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
(याप्रमाणे हे दहा विषय या देहामधे आहेत. इच्छा = 121-पासून)
121-13
ऐसे हे दाही । विषय गा इये देही । आता इच्छा तेही । सांगिजैल ॥121॥
याप्रमाणे हे दहा विषय या देहामधे आहेत. व आता इच्छा काय, तेही सांगण्यात येईल.
122-13
तरि भूतले आठवे । का बोले कान झांकवे । ऐसियावरि चेतवे । जेगा वृत्ती ॥122॥
तर मागील भोगलेल्या गोष्टीच्या आठवणीने अथवा दुसर्याच्या मुखातून ऐकलेल्या शब्दांनी कान झाकावेसे वाटतात, अशाने जी वृत्ती जागी होते
123-13
इंद्रियाविषयांचिये भेटी । सरसीच जे गा उठी । कामाची बाहुटी । धरूनिया ॥123॥
इंद्रिये व विषय यांची भेट होताक्षणीच कामाचा हात धरून जी वृत्ती वेगाने उठते
124-13
जियेचेनि उठिलेपणे । मना सैंघ धावणे । न रिगावे तेथ करणे । तोंडे सुती ॥124॥
जी वृत्ती उठली असता मन एकसारखे धावावयास लागते व जेथे प्रवेश करू नये तेथे इंद्रिये तोंडे खुपसतात,
125-13
जिये वृत्तीचिया आवडी । बुद्धी होय वेडी । विषया जिया गोडी । ते गा इच्छा ॥125॥
ज्या वृत्तीच्या प्रेमामुळे बुद्धी वेडी होते व ज्या वृत्तीला विषयांची गोडी असते, अरे अर्जुना, ती इच्छा (असे तू समज).
दिवस १६९ वा, १८, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २०१७ ते २०२८
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २०१७
वैद्य एक पंढरिराव । अंतर्भाव तो जाणे ॥१॥
रोगाऐशा द्याव्या वल्ली । जाणे जाली बाधा ते ॥धृपद॥
नेदी रुका वेचो मोल । पोहे बोल प्रीतीचे ॥२॥
तुका म्हणे दयावंता । सदा चिंता दीनांची ॥३॥
अर्थ
सर्वाच्या मनातील (अंतकरणातील) भक्तिभाव जाणणारा एक वैद्य पंढरीनाथच आहे. रोगी कोणत्या प्रकारचा आहे, त्याला कोणत्या प्रकारच्या औषधी, कोणत्या प्रकारच्या वनस्पती द्यावे लागतील हे पंढरी राव सर्व जाणतो व रोगाची बाधा ही तोच जाणतो. रोग्याकडून रोग बरा करण्याचा हा पंढरीराव एक रुपयादेखील मोल घेत नाही केवळ भक्ताने प्रेमाने हरिकीर्तन करण्याचीच तो वाट पहात असतो. तुकाराम महाराज म्हणतात या दयावंत हरीला सदा सर्वदा दीन दुर्बळ भक्तांची चिंता असते
अभंग क्र. २०१८
करिता कोणाचे ही काज । नाही लाज देवासी ॥१॥
बरे करावे हे काम । धरिले नाम दीनबंधु ॥धृपद॥
करुनि अराणूक पाहे । भलत्या साहय व्हावया ॥२॥
बोले तैसी करणी करी । तुका म्हणे एक हरी ॥३॥
अर्थ
देवाला कोणत्याही भक्ताचे कोणत्याही प्रकारचे काम करताना लाज वाटत नाही. भक्ताचे कोणतेही काम करणे हेच त्याला चांगले वाटते त्यामुळे त्याला दीनबंधू त्याने स्वतः नांव धारण केले. संकट प्रसंगी भक्तांना तो नेहमी मदत करतो आणि कोणताही भक्त असो त्याला संकट काळी हा देव साह्य करतोच. तुकाराम महाराज म्हणतात जसे बोलतो तसेच करणारा हा एक हरीच आहे.
अभंग क्र. २०१९
उभे चंद्रभागे तीरी । कट धरोनिया करी । पाउले गोजिरी । विटेविरी शोभली ॥१॥
त्याचा छंद माझ्या जीवा । काया वाचे मने हेवा । संचिताचा ठेवा । जोडी हाती लागली ॥धृपद॥
रूप डोळिया आवडे । कीती श्रवणी पवाडे । मस्तक नावडे । उठो पायावरोनि ॥२॥
तुका म्हणे नाम । ज्याचे नासी क्रोध काम । हरी भवश्रम । उच्चारिता वाचेसी ॥३॥
अर्थ
जो देव चंद्रभागेच्या तीरावर आपले दोन्ही कर कटेवर ठेवून उभा आहे, आणि त्याचे गोजिरे पाऊल विटेवर शोभून दिसत आहेत. त्याचा छंद माझ्या जीवाला लागला असून काया-वाचा-मनाला देखील त्याचाच हेवा लागला आहे. माझे पूर्व संचित चांगले होते त्यामुळे असा लाभ माझ्या हाती लागला आहे. डोळ्याला त्या हरीचे रुप पाहण्यास आवडते आणि कानाला त्याची कीर्ती आणि पोवाडे ऐकण्यास आवडते. आणि मस्तकाला एकदा की त्या विठोबाचे चरणांवर ठेवले की तेथून उठणे आवडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे नांव घेतल्यावर काम क्रोधाचा नाश होतो, आणि भव श्रमाचा देखिल नाश होतो अश्या हरी नामाची आवड मला लागली आहे.
अभंग क्र. २०२०
आम्हा हे चि भांडवल । म्हणो विठ्ठल विठ्ठल ॥१॥
सुखे तरो भवनदी । संग वैष्णवांची मांदी ॥धृपद॥
बाखराचे वाण । सांडू हे जेवू जेवण ॥२॥
न लगे वारंवार । तुका म्हणे वेरझार ॥३॥
अर्थ
विठ्ठल विठ्ठल वाचेणे म्हणणे हेच आम्हाला भांडवल आहे. वैष्णवांच्या मेळ्यामध्ये राहून वैष्णवांच्या मांदीत राहून विठ्ठल नाम उचारूण सुखाने आम्ही ही भव नदीत तरुण जाऊ. आम्ही बाखराचे वान म्हणजे करंजा पुरणपोळी इत्यादी पदार्थांचे वान बाजूला टाकून देऊ आणि विठ्ठल नाम हेच जेवण जेऊ. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल नाम घेतले की वारंवार जन्ममरणाचे येरझार करावे लागत नाही.
अभंग क्र. २०२१
आता माझ्या भावा । अंतराय नको देवा ॥१॥
आले भागा ते करितो । तुझे नाम उच्चारितो ॥धृपद॥
दृढ माझेमन । येथे राखावे बांधोन ॥२॥
तुका म्हणे वाटे । नका फुटो देऊ फाटे ॥३॥
अर्थ
देवा माझ्या भक्ती भावा विषयी तु आता आतर करू नकोस. देवा आता जे माझ्या भाग्यात येईल ते मी करतो आणि तुझे नाम भक्तिभावपूर्वक उच्चारतो. आणि माझे मन त्या भक्ती भवाविषायीच दृढ बांधून ठेवा. देवा आता मी जो भक्ती मार्ग स्वीकारला आहे त्या भक्तीमार्गामध्ये इतर कोणतेही फाटे तु फुटू देऊ नकोस.
अभंग क्र. २०२२
काय देवापाशी उणे । हिंडे दारोदारी सुने ॥१॥
करी अक्षरांची आटी । एके कवडी चे साठी ॥धृपद॥
निंदी कोणा स्तवी । चिंतातुर सदा जीवी ॥२॥
तुका म्हणे भांड । जलो जळो त्याचे तोंड ॥३॥
अर्थ
देवापाशी काय कमी आहे तरीदेखील देवाचे भजन न करता काही लोक अक्षरांचे पठण करून पैशासाठी दारोदारी कुत्र्यासारखे लोक हिंडतात. अक्षर पाठांतर करण्याचे कष्ट करतो केवळ एक कवडी मिळविण्यासाठी. हा मनुष्य कोणाची निंदा करतो तर कोणाची स्तुती करतो आणि पैसा कसा प्राप्त होईल याविषयी तो सदा चिंतातुर असतो. तुकाराम महाराज म्हणतात जो भांडण करतो त्यांचे तोंड जळून जावे.
अभंग क्र. २०२३
मागणे ते मागो देवा । करू भक्ती त्याची सेवा ॥१॥
काय उणे तयापाशी । रिद्धीसिद्धी ज्याच्या दासी ॥धृपद॥
कायावाचामन । करू देवा हे अर्पण ॥२॥
तुका म्हणे विश्वंभर । ज्याच्याने हे चराचर ॥३॥
अर्थ
आम्हाला जर काही पाहिजे असेल तर आम्ही ते देवाला मागु आणि त्याचीच भक्ती करू व सेवा करू. आहो त्याच्याजवळ काय कमी आहे रिद्धी सिद्धी तर त्याच्या दासी आहेत. आम्ही आमचे काया वाचा आणि मन हे देवाला अर्पण करू. तुकाराम महाराज म्हणतात विश्वंभरा मुळे हे चराचर आहे त्या विश्वंभरा जवळ काय कमी आहे ?
अभंग क्र. २०२४
चित्ती नाही आस । त्याचा पांडुरंग दास ॥१॥
असे भक्ताचिये घरी । काम न सांगता करी ॥धृपद॥
अनाथाचा बंधु । असे अंगी हा संबंधुं ॥२॥
तुका म्हणे भावे । देवा सत्ता राबवावे ॥३॥
अर्थ
ज्याच्या चित्तात कोणत्याही प्रकारची इच्छा नाहीये त्याचा पांडुरंगच दास होतो. अशा भक्ताच्या घरी तो देव राहतो आणि त्याच्या मनातील ओळखून त्याने कोणतेही काम न सांगता देव त्याचे सर्व काम करतो. कारण तो अनाथांचा बंधू आहे अशी ब्रीदे त्याच्या संपूर्ण अंगी आहे. तुकाराम महाराज म्हणतात भक्तीभावाचा असा हा महिमा आहे की देवावर देखील भक्त सत्ता करतो एवढेच नाही तर देवाला आपल्या घरी सुद्धा राबून घेतो.
अभंग क्र. २०२५
कर्कशसंगति । दुःख उदंड फजिती ॥१॥
नाही इह ना परलोक । मजुर दिसे जैसे रंक ॥धृपद॥
वचन सेंटावरी । त्याचे ठेवूनि धिक्कारी ॥२॥
तुका म्हणे पायी बेडी । पडिली कपाळी कुऱ्हाडी ॥३॥
अर्थ
कर्कष अश्या बायको संगे संगती करताना नवऱ्याला खूप प्रकारची फजिती आणि दुखः होते. तो इहलोकात आणि परलोकात सुखी राहत नाही दरिद्री मजूर असल्यासारखा तो दिसतो. नवऱ्याच्या वचनाला ती स्त्री अतिशय तुच्छ प्रमाणे मानते आणि त्याचा धिक्कार करते. तुकाराम महाराज म्हणतात अशा भांडखोर कर्कष स्त्रीसी जेव्हा बायको म्हणून गाठ पडली त्यावेळी पायात बेडी आणि कपाळावर कुर्हाड पडली असे समजावे.
अभंग क्र. २०२६
बीज पेरे सेती । मग गाडेवरी वाहाती ॥१॥
वाया गेले ऐसे दिसे । लाभ त्याचे अंगी वसे ॥धृपद॥
पाल्याची जतन । तरि प्रत्यया येती कण ॥२॥
तुका म्हणे आळा । उदक देता लाभे फळा ॥३॥
अर्थ
शेतीमध्ये बी थोड्या प्रमाणात पेरले जाते, मग एकदा की धान्य उगवले की तो माल गाड्यांमध्ये वाहीला जातो. जे धान्य शेतात पेरले ते वाया गेले असे दिसते परंतु खरे तर त्यांच्या अंगी लाभ असतो ते पेरले तरच धान्य मोठ्या प्रमाणात उगते. जोपर्यंत कणीस निघत नाही तोपर्यंत केवळ पाल्याचेच जतन करावे लागते मग त्या नंतर पाल्यातून कणीस बाहेर येताना दिसते. तुकाराम महाराज म्हणतात झाडाच्या आळ्याला चांगले पाणी दिले तर आपल्याला फळही चांगले मिळत असते.
अभंग क्र. २०२७
जाणावे ते सार । नाही तरी दगा फार ॥१॥
डोळे झांकिलिया रवि । नाही ऐसा होय जेवी ॥धृपद॥
बहु थोडया आड । निवारिता लाभे जाड ॥२॥
तुका म्हणे खरे । नेले हातीचे अंधारें ॥३॥
अर्थ
अर्थ-आयुष्याचे खरे उद्दिष्ट कशात आहे आणि ते साधण्याचे मुख्य सार कशात आहे हे जाणून घ्यावे नाहीतर दगा झालाच म्हणून समजा. म्हणजेच देवाला प्राप्त करून घ्यायचे मार्ग अनेक आहेत परंतु सर्वात सोपा आणि सुलभ मार्ग हा नामस्मरण आहे, परंतु हे न जाणता जे कर्मकांडात अडकतात त्यांची वाताहत झालीच म्हणून जाणा. ज्याप्रमाणे सूर्य असताना देखील डोळे झाकून जेवले असता जी गत होते तशी होते, म्हणजेच अन्न तोंडाऐवजी नाकात जाण्याची शक्यता अधिक असते. प्रत्येक मनुष्याच्या मार्गात थोडेबहुत अडथळे येतात परंतु एकदा का ते पार केले की गाढ असा म्हणजेच कधीही फिका न पडणारा लाभ पदरात पडलाच म्हणून समजा. तुकाराम महाराज म्हणतात परंतु माणसाने अज्ञानातच राहणे पसंत केले तर त्याच्या स्वतःच्या हातात असलेले त्याचे स्वतःचे हीत अंधाराने म्हणजेच अज्ञानाने हिरावून नेलेच म्हणुन समजा
अभंग क्र. २०२८
मुळी नेणपण । जाला तरी अभिमान ॥१॥
वाया जावे हे चि खरे । केले तेणे चि प्रकारे ॥धृपद॥
अराणूक नाही कधी । जाली तरि भेदबुद्धी ॥२॥
अंतरली नांव । तुका म्हणे नाही ठाव ॥३॥
अर्थ
मूळ स्वरूपाविषयी अज्ञान असेल तर सर्वकाही मी करतो असा अभिमान तयार होतो. आणि त्याच अभिमानामुळे मनुष्य खरोखर वायाला जातो. आणि भेदबुद्धी की एकदा निर्माण झाली की त्या ठिकाणी समाधान कधीही होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आपण नदीच्या काठी उभे आहोत आणि आपल्या मध्ये आणि नावे मध्ये जर अंतर असेल तर आपण लवकर नदीच्या पलीकडे पोहोचणार नाही त्याप्रमाणे जोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नाही तोपर्यंत आपल्या ठिकाणी अभिमान अज्ञान आणि द्वैतबुद्धी असणार आहे आणि त्यामुळे आपल्याला समाधान प्राप्त होणार नाही.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















