14. भगवान श्रीकृष्ण चरित्र भाग १, (१ ते ५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️


कालगणनेनुसार ५१७३ वर्षापुर्वी द्वापार युगाच्या शेवटच्या पर्वात घडलेली ही चरित्रकथा, इतिहास..! त्यादिवशी यमुनाकिनारी वसलेल्या मथुरा नगरीतील भोजराज कंसाची लाडकी चुलत बहिण देवकीच्या विवाहाची पुर्वतयारीची मोठीच धामधुम सुरु होती. कंसराजवाड्याच्या विस्तिर्ण प्रांगणात भव्य विवाहमंडप उभारला होता. निमंत्रीत पाहुण्यांसाठी व आप्तांसाठी सोईयुक्त वसतीस्थाने बांधण्यात आली होती.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!भगवान श्रीकृष्ण चरित्र !!

!! प्रस्तावणा !!

 नमस्कार!

 माझ्या चरित्रलेखणाची सुरुवातच मुळी श्रीकृष्णाचे ऑल ओव्हर चरित्र लिहिण्यापासुन झाली.आता त्याचेविषयी सविस्तर लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. नेहमीप्रमाणे आपण गोड मानुन चुकभुल क्षमा करुन आपले आशिर्वाद असु देत.आपल्या क्रीया-प्रक्रीयेच्या अपेक्षेत!

 आपण इतर देवांना “तुम्ही” म्हणुन संबोधतो, पण श्रीकृष्णच असा देव आहे की, त्याला आपण “तू” म्हणुन संबोधतो, कारण तो आपल्या अगदी ह्रदया जवळचा वाटतो.श्रीकृष्ण! गेली पांच हजार वर्षे भारतीय स्री-पुरुषांच्या व्यक्त अव्यक्त मनांचा तळठाव व्यापुन एक सशक्त विभूतीरेखा- एक युगपुरुष! म्हणुनच तो सर्वांच्या मनांत वावरत आहे.

 श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सांपडतात ते मुख्यतः श्रीमद्भागवत,महा भारत,हरिवंश आणि कांही पुराणात!आज तर श्रीकृष्ण वास्तव्यापासुन शेकडों योजने दूरदूर असुन सुध्दा आजचा भारतीय म्हणुन असलेल्या जीवनप्रणाली चा श्रीकष्ण हा पहिला उद्गारआहे. जसं आभाळातील सूर्य कधी शिळा वा बासा होत नाही तद्वतच हा महाभारचा कथाकणा असलेला तत्वज्ञवीर,आजच नाही तर,कधीच शिळा होणार नाही.त्याचं वास्तव आचमन घेतांना,श्रीकृष्णकृपेने पुर्ण विश्वास आहे की, हे मनोगताचे प्रकट-अप्रकट लिहिलेले शब्द आचमन असेल,

 शोध होता श्रीकृष्णाचा! एका बहुआयामी व स्वतःलाच दर क्षणागणिक स्पष्ट जाणवणार्‍या जिवलगाचा!क्षणांत निळाभोर आकाश व्यापणार्‍या एका उर्जेचं केंद्र असलेल्या मोरपंखी, कालजमी अजर व्यक्तीमत्वाचं! श्रीकृष्ण आपल्यात अंशरुयात असुनही, तो गेली पांच हजार वर्षे अनेक चमत्कारांनी व भाबड्या अंधभावनांनी अडकुन पडलाय

अनेक तज्ञ व भविष्यकारांनी सांगीतल्या नुसार श्रीकृष्ण १०१वर्षे जगला.त्याच्या या प्रदीर्घ जीवनातील अगदी त्याच्या जन्मापासुन असा एकही दिवस,क्षण नाही की, कांही ना कांही चमत्कार घडला नाही,असा हा श्रीकृष्ण सर्वार्थानं जीवन घडवणारी विभूती आहे. जिथं जिथं दुष्ट व अशिव शक्ती आडव्या आल्यात, त्या निपटतांना दरवेळी थक्क करणार्‍या नवनव्या अकल्पित अविश्कार, शिवाय एकच शस्र,एकच उपाय नाही तर प्रत्येक प्रसंगी वातावरणानुसार योग्य उपाय व ऐतिहासिक,सांस्कृतिक,सामाजिक आणि एकुनच भारतीय जीवणाला वळण देणारं,चाणाक्ष दूर दृष्टीच्या बुध्दीप्रयोगाने विनाविलंब त्या समुळ निपटुन काढल्यात

 श्रीकृष्ण चरित्रातील तत्वज्ञानाचा सर्वश्रेष्ठ अविष्कार “गीता” आहे.भारतीय जीवनप्रनालीचा प्रमाणभूत ग्रंथ म्हणुन विश्वविख्यात आहे.गीता ही महाभारता च्या कथासागरातील मौल्यवान घागर असुन जीच्यातील थेंबाथेंबात मानवी जीवन शब्दशः घुसळून काढला आहे. त्याने व्यक्तीगत जीवनात “चातुर्वण्यं मया सुष्टम्” या न्यायाने जाबवंती या आदिवासी कन्येशी विवाह करुन द्वारकेत आणुन मुख्य अष्टराण्यांत गौरवपुर्ण समावेश करणारा एकमेव श्रीकृष्णच आहे.राजसूय यज्ञात आमत्रितांची उष्टी पात्रं उचलणारा,आपल्या गरुडध्वज रथाच्या चारही घोड्यांचा स्वतः खरारा करणारा,सारथी दारुकाला रथात बसवुन स्वतः सारथ्य करणारा,असे कोणतेच कर्म तो निषिध्द मानत नव्हता.त्याचा गरीब मित्र सुदामाशी निरपेक्ष स्नेह, सारथी दारुकाशी असलेला मनोभाव, गोकुळातील गोप गोपांशी त्याचा मनमेळ निकोप मनांत वागणारा फक्त श्रीकृष्णच होता.श्रीकृष्णाने मानलेले अनेक सखे, पेंद्यासहसर्व गोप व इतरांची मोठी नामावली आहे,त्यातच त्याचा चुलत बंधु उध्वव हा तर भावविश्वस्त असुन भारतीय युध्दानंतर शेवटपर्यंत श्रीकृष्णाची सेवा केली आणि याच उध्ववाकडुन उध्वव गीता लिहवुन घेतली, तेच श्रीमद् भागवत

 श्रीकृष्णाला अनेक सखे,दोन गुरु, तीन भगिनी, दोन मातापिता,आठ भार्या, ऐंशी पुत्र,चार कन्या,पण सख्या मात्र दोनच- एक राधा व दुसरी द्रौपदी! शतकांनुशतके कृष्णभक्त हा राधेकृष्ण जयघोष घुमवित आला आहे.राधा या शब्दाचा नेमका अर्थ – रा म्हणजे लाभो, मिळो आणि धा म्हणजे मोक्ष,जीवनमुक्ती राधा म्हणजेच जीवनमुक्तीसाठी तळमळणारा जीव! श्रीकृष्णाच्या दोन भगिनी तर प्रसिध्द आहेत,पण अनुल्ले खीत पालक भगिनि नंद यशोदांना नंतर झालेली एकांनगा, याशिवाय सहस्रावधी स्रीपुरुषांनी केंद्रस्थानी मानलेल्या वासुदेव म्हणुन वंदनीय श्रीकृष्ण हा योगयोगेश्वर पुर्णरुप आजही तुम्हा आम्हाला ह्रदयस्थ वाटतो व वाटतच राहणार

 श्रीकृष्णार्पणमस्तु!!

 क्रमशः
 मिनाक्षी देशमुख.

!!! श्रीकृष्ण !!! भाग – १.

कालगणनेनुसार ५१७३ वर्षापुर्वी द्वापार युगाच्या शेवटच्या पर्वात घडलेली ही चरित्रकथा, इतिहास..! त्यादिवशी यमुनाकिनारी वसलेल्या मथुरा नगरीतील भोजराज कंसाची लाडकी चुलत बहिण देवकीच्या विवाहाची पुर्वतयारीची मोठीच धामधुम सुरु होती. कंसराजवाड्याच्या विस्तिर्ण प्रांगणात भव्य विवाहमंडप उभारला होता. निमंत्रीत पाहुण्यांसाठी व आप्तांसाठी सोईयुक्त वसतीस्थाने बांधण्यात आली होती. यमुनाकाठचा सर्व प्रदेश अत्यंत सुपिक,सधन असलेमुळे कुरु, मत्स्य, पांचाल, शूरसेन, चेदी आणि मगघ अश्या क्षत्रियांची राज्ये वसलेली होती. या सर्वांमधे मथुरा राज्याचा इतिहास उज्वल व प्राचीन होता. फार पुर्वी मथुरेचा हा भाग अगदी घनदाट अरण्याने वेढलेला असुन तिथे मधु राक्षसाचे राज्य होते. तो राक्षस असुनही वृत्तीने देवसमान होता. त्याच्या या राज्याला मधुपुरी किंवा मधुवन म्हणुन ओळखले जात असे. या अरण्यांत अनेक ऋषी मुनी निर्वेधपणे तपश्चर्या यज्ञयागादी कार्ये करीत असे प्रजाही सुखी आनंदी समाधानी होती.

मधुच्या मृत्युनंतर त्याचा पुत्र लवण, जो अत्यंत दुष्ट, जुलमी व असुरी वृत्तीने वागणारा असुन ऋषीमुनींच्या तपश्चर्येत यज्ञयाग कार्यात विध्वंश करु लागल्या मुळे त्रस्त झालेले प्रमुख ऋषींमुनी अयोध्येच्या प्रभु रामचंद्रांकडे गार्‍हाणे नेल्यावर त्यांना अभय देऊन आपला भ्राता शत्रृघ्नला ससैन्य ‘लवणचे’ पारिपत्य करण्यास पाठविले. लवणचा पराभव करुन त्यास ठार मारुन मधुवनाचा सगळा भाग निर्भय केला आणि प्रभु रामचंद्रांच्या आज्ञेनुसार शत्रृघ्ननने तिथे आपले राज्य स्थापण केले. तेथील घनदाट जंगल तोडुन सुंदर वसाहत निर्माण करुन त्या वसाहतीला ‘शूरसेन’ नांव देऊन मथुरा राजधानी निर्माण केली. या नगरीभोवती उंच तटबंदी, मोठमोठ्या नगरवेशी उभारुन दुसरी अयोध्यानगरीच जणुं मथुरा निर्माण केली.

पुढे वंशपरंपरा लयाला जाऊन यादव, अंधक, भोज, इत्यादी सोमवंशीय क्षत्रियांची वस्ती झाली. भोजकुलातील शूरसेन क्षत्रियाने तेथे आपले राज्य स्थापण केले. त्याच्या कारकीर्दीत मथुरा नगरी पुन्हा भरभराटीस आली. शूरसेन अत्यंत कर्तुत्ववान, राजकारण कुशल, राजधर्म जाणणारा व प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारा होता. त्यावेळी भौम, कुकर, अंधक, दार्शाह, यादव, वृष्णी आणि भोज ह्या सात जाती आपापला व्यवसाय करीत वसाहती करुन आनंदाने राहत होते. या सात जातींमधे यादव प्रमुख असुन यादववंशाची वंशवेल थेट ययातीपुत्र यदुपर्यंत पोहोचली होती.

प्रस्तुत कथानकातील ‘वसुदेव’ यादवांचा मुख्य सरदार म्हणुन भोजराजाचा मांडलिक, यमुनानदी पलीकडे गोवर्धन टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या अत्यंत सुपीक, वनराजींनी नटलेल्या, विपुल चराऊ कुरण असलेल्या जहागिरीच्या गावी राहत होता. शिवाय मथुरेतही त्याचा वाडा होता. भोजराजाचा तो प्रमुख सल्लागार असुन राजा ऊग्रसेनचा खास मित्र होता. यादवांना राज्याचा अधिकार नाही ही पुर्वापार समजुत असल्यामुळे यादववंशीय क्षत्रिय बहुधा गोपांचा धंदा करीत असत. तिथल्या वातावरणामुळे वैश्यही वाणिज्य व्यवसाय न करतां गवळ्याचाच धंदा करीत असत. या सर्व यादवांचा प्रमुख वासुदेव भोजराजाचा पहिल्या प्रतिचा सरदार असुन त्याचेवर विशेष मर्जी होती. उग्रसेनच्या कारकिर्दीत मथुरा भरभराटीस असुन प्रजा सुखी होती.

उग्रसेनचा पुत्र कंस युवराज झाला. तो शूर, पराक्रमी तेवढाच क्रुर, कठोर आणि सत्तालोभी असल्यामुळे मथुराच नव्हे तर, आसपासचे सारे राजे सुध्दा त्याला वचकुन होते. बाजुच्या सात राज्यातील “मगध” राष्र्ट सर्वात बलाढ्य असुन जरासंध सम्राटाचा सगळीकडे चांगलाच दबदबा होता पण मथुरेचे भरभराटीस आलेले राज्य त्याच्या डोळ्यात खुपत होते. त्याने राजकारण लढवुन अस्ति व प्राप्ती या आपल्या दोन कन्या युवराज कंसाला देऊन भोज घराण्याशी निकट संबध जोडले. जरासंधाचा पाठींबा मिळताच कंस उन्मत्त होऊन, बंडाळी माजवुन, मंत्र्यांना वश करुन बाप उग्रसेनला बंदीवासात टाकुन स्वतः राज्य करुं लागला.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!! श्रीकृष्ण !!! भाग – २.

कंसाचा जुलमी कारभार सुरु झाला.सगळे दबकुन वचकुन त्याची आज्ञा पाळत, तरी सुध्दा मनांतुन कंस अस्वस्थ होता.कारण वासुदेव त्याच्या पित्याचा जिवलग मित्र,सर्व सरदारांचा प्रमुख,यादवांचा अधिपती असुन आपल्या सौजन्यशील वागणुकीने तो प्रजेचा प्रिय होता.उद्या आपल्याविरुध्द कट करुन पित्याला कैदेतुन मुक्त करण्या चा प्रयत्न केला तर? सगळे यादव बंड करुन आपल्या विरोधात जाऊन आपल्याला पदच्युत करेल. यासाठी त्याचे प्रेम संपादन करुन खुष ठेवणे भाग आहे.

त्यासाठी देवकाची मुलगी,कंसा ची चुलत बहिण देवकी जी दिसायला अतिसुंदर आहे.तिच्या बाकीच्या बहिणीं चा विवाह आधीच वासुदेवाशी झालेला होता.देवकीचाही विवाह वसुदेवाशी करुन स्नेह जोडावा, हा विचार वसुदेवास सांगीतल्यावर त्याने स्विकार केला,आणि आपण एक शत्रु कायमचा दाबुन टाकला म्हणुन कंस मनोमन सुखावला.

वसुदेव-देवकीचा विवाह अत्यंत थाटात पार पडला.सालंकृत देवकी सोबत भरपुर धन, जडजवाहर, दास दासी सहित सजविलेल्या सुवर्ण रथात बसलेल्या देवकीच्या रथाचे सारथ्य करण्यास स्वतः कंस बसला हे पाहुन प्रजेचे मन त्याच्या विषयी अनुकुल झाले.आणि कंस निश्चिंत व निर्भय झाला.देवकीने वसुदेवाच्या घराच्या उंबरठ्याचे माप ओलांडुन प्रवेश केला.दुसरे दिवशी कंस राजसभेत जाण्यास तयार होत असतांना, सेवकाने नारदमुनी आल्याचा निरोप दिल्याने,कंस नारदाच्या भेटीस गेला. नारदमुनी नित्य स्वर्ग,पृथ्वी,पाताळ लोकी भ्रमण करीत असे.कितीही गुप्त गोष्ट असो ती फोडण्यात हातखंडा असल्यामुळे त्यांना कळलाव्या म्हणत! वास्तविक त्यांची गणना महर्षित असुन ज्ञाता,गायनात निपुन,वीणा तर त्यांचा अविभाज्य अंग, अशा या नारदांना कलागती लावण्याची फार आवड. आज अचानक नारद कां बरं आले असेल? आपण वसुदेवाशी सबंध जोडुन यादवांशी सख्य केलय, आणि हे कसली कलागत लावणार? असा विचार करीत नारदांना विनम्र अभि वादन करुन सेवकाने आणलेल्या साहित्याने यथाविधी पुजन करुन त्यांना वंदन केले.

नारद म्हणाले,वसुदेवाचा जन्म झाला तेव्हा स्वर्गात पडघम व दुंदुभी वाजुन त्याचेवर पुष्पवृष्टी झाली होती.तो एवढा देखणा व कांतीमान पुरुष की, इंद्रा ला सुध्दा हेवा वाटावा.खरं आहे मुनिवर्य! वसुदेवाचे कुणाशीही शत्रुत्व नाही आणि या विवाहाने तर तो माझा घनिष्ट मित्र बनला आहे.तू माझे विधिवत पुजन केल्याने मी तुझ्यावर संतुष्ट झाल्याने तुझ्या हिताच्या कांही गुप्त गोष्टी सांगतोय मी भ्रमण करीत असतां तिथे समस्त देवगण ब्रम्हदेवा सह जमलेले असुन तुझ्यासंबंधी गुप्त खलबतं सुरु होती ते तुझ्या अनुचरा सह वधाचा! कालच वसुदेवाशी देवकीचा विवाह झाला,तिच्या पोटी जो आठवा गर्भ राहिल तो तुझा काळ ठरणार आहे.मुनिवर्य! आठवा गर्भ? माझा काळ होणार?थांब भोज राजा! हा आठवा गर्भ सामान्य नाही.तो सर्व देवांचा व स्वर्गाचा मुख्य आधार,देवां ना स्वर्ग किंवा मोक्ष देणारा असेल तरी तूं सावध रहा….यावर उपाय सांगतो…. देवकीचा प्रत्येक गर्भ नष्ट केल्यास कदाचित तुझ्यावरील अरिष्ट टळेल. असे सांगुन महर्षी नारद निघुन गेले.

राजवाड्यात येऊन खास विश्वासातील मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावुन नारदांनी सांगीतले कथन व उपाय सांगुन म्हणाला देवकीचे पुत्र मारण्या पेक्षा सरळ मुळावरच घाव घालुन देवकीचाच वध करतो,मंत्री म्हणाले, महाराज असा अविचार नका करु. कनिष्ठ भगिनी कन्ये प्रमाणे असते. तेवढ्यात सेवकाने येऊन, वसुदेव- देवकी गोवर्धनला जाण्यापुर्वी आपल्या भेटीस येत असल्याचे सांगीत ल्यावर स्वतः कंसच त्यांना भेटीस गेला. वसुदेवाला म्हणाला,गोवर्धनला जाण्याचा बेत रद्द कर, मला महत्वाचे गुप्त बोलायचे आहे.दालनांत तिघेही बसल्या वर कंसाने नारदांचे म्हणने कथन केल्या वर,वसुदेवाने त्यांना होणारा प्रत्येक पुत्र त्याच्या स्वाधीन करण्याचे अभिवचन दिल्यावरही कंसाने मथुरेच्या वाड्यात चौकी पहार्‍यात वसुदेव देवकीला बंदी केले.त्यांचा बाहेरचा संपर्क तोडुन टाकला विष्णुभक्त वसुदेव खचुन न जातां विष्णु भक्तीत लीन होऊन शांतपणे सर्व अन्याय सहन करीत दिवस कंठु लागले.

*क्रमशः*
संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!! श्रीकृष्ण !!! भाग – ३.

दिवस जाऊ लागले.देवकीला पुत्र झाल्याचे कळले की, पुत्राला बाहेर आणुन कंस त्याला मारुन टाकीत,अशा प्रकारे विधात्याच्या योजनेनुसार देवकीचे सहा पुत्र,दुष्ट दुराग्रही,कोपिष्ट कंसाने जन्मतःच मारुन टाकले. वसुदेव देवकी ला जेव्हा कंसाने बंदीगृहात टाकले तेव्हा वसुदेवाने आपली दुसरी पत्नी रोहिणीला तिच्या भावाकडे म्हणजे नंदगृही गोकुळा त पाठविले होते.देवकीचा सातवागर्भ देवाने गुप्तपणे रोहिणीच्या उदरी ठेवुन दिला.यथावकाश झालेला पुत्र म्हणजेच बलराम होय.कंसाला वाटले,आपल्या धाकानेच देवकीचा सातवा गर्भ जिरला.

देवकी आठव्यावेळी गर्भवाशी झाल्या चे कळताच कंसाने त्यांच्यावरील चौकी पहारे कडक केले.श्रावण महिन्यातील कृष्णपक्ष अष्टमी बुधवारला देवाने अवतार घेतला.मागील जन्मी वसुदेव देवकीने आपल्यापोटी परमेश्वराने अवतार घ्यावा म्हणुन घोर तपश्चर्या केली होती.त्यांना सत्यता पटावी म्हणुन जन्मल्याबरोबर किरीट कुंडलादी अलंकारासहित शंख,चक्र,गदा,पद्मधारी चतुर्भुज बालमुर्तीच्या रुपाने परमेश्वर त्यांच्यापुढे प्रगटले.हर्षभराने दोघांनीही मनोभावे हात जोडले व पुढील भितीने त्यांचे ह्रदय थरारले.हे जाणुन परमेश्वर म्हणाले, बाबा! क्षणाचाही विलंब न लावतां मला गोकुळात नेऊन तिथे नुकतीच यशोदेमाताच्या पोटी जन्मलेली कन्या घेऊन लगेच परत या.परमेश्वर परत बालरुपात आले,आणि वसुदेवाच्या पायांतील बेड्या आपोआप तुटल्या.बंदी शाळेचे दारं उघडल्या गेले.कंसासहित सर्व द्वार रक्षक मायेने झोपी गेलेत. आणि बाळाला कापडात गुंडाळून यमुनातीरी पोहोचला.बाहेर धो धो पाऊस पडत होता यमुना भयंकर पुराने दुथडी वाहत होती. येवढ्या महाभयंकर पुरातुन यमुनापार कसे जावे या विचारात वसुदेव असतांना प्रभुने आपले पाय हळुच बाहेर काढुन यमुनेला स्पर्श केल्याबरोबर तीने वाट मोकळी करुन दिली.

त्यानंतर निर्विघ्नपणे वसुदेवांने नंदा च्या घरात प्रवेश केला.यशोदा नुकतीच बाळंत झालेली,देवाने आपल्या मायेने सर्वांना गुंगवुन ठेवल्याने,यशोदेला झालेले बाळ पुत्र कि, कन्या? हे कोणाला समजु शकले नाही.प्रभुच्या सुचनेनुसार वसुदेवाने बाळाला यशोदेच्या कुशीत निजवले व तिची कन्या घेऊन लगेच बंदी शाळेत पोहचल्याबरोबर, त्याच्या पायात बेड्या पडल्यात,दाराची कुलपे पुर्ववत लागलीत.इतक्यात ती कन्या मोठ्याने रडु लागल्यामुळे,कंसासहित सर्वजण खडबडुन जागे झालेत.कंस आत येऊन मुलीला उचलले व आता तो शिळेवर आपटणार येवढ्यात ती योगमाया त्याच्या हातुन निसटुन आकाशमार्गे जातां ना विजेसारखी कडाडली, कंसा! तुझा वैरी गोकुळात आहे असं म्हणुन अदृष्य झाली.

इकडे यशोदेला जाग आल्यावर आपल्या पायाचे अंगुष्ट तोंडात घालुन निजानंदात निमग्न होऊन हसत बालरुपा त निजलेला पुराण पुरुष तिच्या दृष्टीस पडल्याबरोबर तिला अपार आनंद झाला, देहभान विसरुनच गेली.इकडे कंस दिवसागणिक अस्वस्थ होऊन त्याची झोप उडाली.देवकीचा आठवा पुत्र,माझा काळ,मृत्यु? याच विचाराने त्याला एक एक दिवस वर्षासारखा दीर्घ वाटु लागला.योगमायेच्या वाणीने त्याला पश्चाताप होऊन,बंदीशाळेतील वसुदेव देवकीची मुक्तता केली.पृथ्वीवर मातले ल्या असुरांचा संहार करण्यासाठी भगवान विष्णुंनी मानव रुपात जन्म घेऊन गोकुळात नंदाघरी आपल्या बाल लिलांनी आनंदित करु लागला.यशोदेला तर त्याच्या बाललिलांत दिवस कधी उजा डतो व मावळतो हेही कळेनासे झाले.

मथुरेचा कंसला गोकुळचा करभार देण्यासाठी पुत्राला घेऊन नंद व यशोदा मथुरेकडे निघालेत.मथुरेला पोहोचल्यावर नंदाने वसुदेवाची गळाभेट झाल्यावर वसु देव म्हणाला,नंदा! करभार भरुन तात्काळ पुत्राला घेऊन निघुन जा!मित्रा.. पुत्राला जिवापाड सांभाळ. इतर मंडळी सह नंद मार्गस्थ झाला.

गोकुळात यशोदापुत्र व रोहिणीपुत्र कलेकलेने वाढत होते.दोघांच्या बाल लिलांत व त्यांना वाढविण्यात नंद यशोदे चा वेळ मोठ्या आनंदात जात होता.अशा

तच एके दिवशी मथुरेहुन यादवांचे आचार्य अतिद्रींय प्राप्त ज्ञान,ज्योतीष्य शास्र पारंगत अशा गर्गमुनींचे नंदाघरी आगमण झाले.त्यांचे यथोचित स्वागत व पुजन झाल्यावर,नम्रपणे येण्याचे प्रयोजन विचारले असतां,आपण वसुदेवा च्या सांगण्यानुसार आलोय!

क्रमशः संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!! श्रीकृष्ण !!! भाग – ४.

अश्या या ब्रम्हविद्येत श्रेष्ठ ब्रम्हवेत्ता मुनींकडुन आपल्या पुत्रांवर संस्कार करण्याची विनंती केल्यावर, ते म्हणाले, मी जर यांचेवर संस्कार केले तर हाच तो वसुदेव देवकीनंदन आहे हे त्या दुष्ट कंसाला कळेल.मग नंदाने त्यांना गुप्तपणे संस्कार करण्याची विनंती केल्यावर एकांतात यशोदा व रोहीणी पुत्रांवर विधिपुर्वक संस्कार व नामकरण केल्यावर ते नंदाच्या घरांत आले.यशोदा व रोहिणीनी गुरुदेवांची पुजा करुन दोन्ही मुलांच्या नांवाची उत्सुकतेने एकाग्रतेने प्रतिक्षा करुं लागल्या.हा रोहिणीपुत्र आपल्या सद्गुणांनी सर्वांना रमविणारा असेल म्हणुन ‘राम’ व बलशाली असल्या ने तो बलराम म्हणुन ओळखल्या जाईल. याच्यामुळेच यादवांत ऐक्य प्रस्थापित होणार असल्याने ‘संकर्षण’ असेही म्हणतील. नंद-यशोदा! तुझा हा पुत्र प्रत्येक युगांत अवतार धारण करणारा आहे,यापुर्वी याचे श्र्वेत,गौर,रम्य व पीत असे वर्ण होऊन गेलेत.सांप्रत हा कृष्ण वर्ण झाला म्हणुन याचे नांव कृष्ण ! हा वसुदेवपुत्र असल्याने वासुदेव असेही म्हणतील.हा समयानुसार व कार्यानुसार अनेक नांवाने ओळखल्या जाईल.गोप गोपाळांना आनंद देईल.याच्या योगाने तुमच्यावरचे संकटे नष्ट होऊन तुमचे कल्याण करील.हा तुझा पुत्र साक्षात नारायण आहे.तू फक्त सावध व दक्ष राहुन याचे रक्षण कर,असे सांगुन गर्गमुनी मथुरेस निघुन गेले.

तुझ्या या पुत्राचे नीट रक्षन कर… नित्य दक्ष रहा हे गर्गमुनींचे, व मथुरेत कर भरायला गेले असतां वसुदेवानेही हेच सांगीतल्याने नंद नेहमी सावध असे.

एकदा कांही कामानिमित्य नंदाला मथुरेस जावे लागले.जातांना पुन्हा पुन्हा कृष्णाचा नीट सांभाळ कर,त्याचेवर व्यवस्थीत लक्ष ठेव म्हणुन बजावुन गेले. नंद गेले,इतर गोप आपल्या कामात व्यस्त,यशोदा स्वयंपाक घरांत गुंतलेली, कृष्ण अंगणांत मुठी चोखीत,हातपाय हलवित पडलेला,आंतुन यशोदा त्याच्याशी बोलत होती व तोही हुंकारे देत होता.तेवढ्यात बाहेर कुणाची तरी चाहुल लागल्याने यशोदेने आंंतुनच कोण ग? म्हणुन विचारल्यावर,”मी” असा मंजुळ पण अपरिचित आवाज आल्याने ती चटकण बाहेर आली.एक अत्यंत सुंदर, रेशमी वस्रालंकारांनी युक्त स्री कृष्णाला मांडीवर घेऊन आपली काळेभोर बुबुळे त्याच्यावर रोखुन बसलेली दिसली.कोण तुम्ही? गोकुळ सुंदर असल्याची किर्ती ऐकुन मुद्दाम पहायला आले.तुमचा हा सुंदर पुत्र पाहुन कोणालाही आई व्हावेसे वाटते असे म्हणुन तिने आपला स्तन कृष्णाच्या तोंडात दिला. कृष्णही स्तन जोरात चोखुं लागला.यशोदा निश्चिंत होऊन स्वयंपाक घरांत गेली.इकडे कृष्ण तिचे स्तन चिमुकल्या हातात धरुन दुध ओढीतच होता.असह्य वेदनेने ती ओरडु लागली,पण कृष्ण कांही केल्या तोंडात धरलेला स्तन सोडत नव्हता.लगबगीने यशोदा बाहेर येऊन पाहते तर, वेदनांनी ओरडणार्‍या स्रीचे डोळे गरगरा फिरत, हातपाय ताठ झाले तरी कृष्णाचे स्तन पान चालुच होते.हे दृष्य पाहुन यशोदाने केलेला आरडाओरडा ऐकुन आसपासचे स्री पुरुष गोळा झाले.ती सुंदर स्री आतां भयानक दिसुं लागली.ती निर्जिव,मृत होऊन पडली तरी कृष्ण तिच्या अंगावर खेळतच होता.

तेवढ्यात एका वृध्द गोपाने तिला ओळखले.अरेss ही तर कंसाची पुतना.. कृष्णाला मारण्याच्या उद्देशाने आलेली, या राक्षसांना कोणतेही रुप धारण करतां येते.गोपांनी तिचे प्रेत ओढत गहन अरण्यात श्वापदांच्या भक्षणांसाठी टाकुन दिले.आवेगाने यशोदेने कृष्णाला छातीशी कवटाळुन अश्रु ढाळूं लागली.केवढं अरिष्ट टळले!गोपींनी कृष्णाचा रक्षाविधि केल्यावर नेहमीप्रमाणे कृष्ण खेळु लागला.संध्याकाळी नंद मथुरेहुन आल्या वर हे वृत्त समजल्यावर तो कांहीसा चिंतित होऊन म्हणाला,यापुढे आपल्या ला अधिक सजग रहायला हवय!

बलराम कृष्ण वाढत होते.तीन महिन्याचा कृष्ण उपडा पडु लागला.गोपीं नी त्याची उपडी पडण्याचा उत्सव साजरा केला.त्यानिमित्य नंदाने गोपगोपींना मेजवाणी,ब्राम्हणांना दान दक्षिणा दिली. घरांत पंगती बसल्या असल्याने घरांत कृष्णाला झोपायला जागा नसल्यामुळे बाहेर उभ्या असलेल्या गाड्याखाली सावलीत त्याला झोपवले.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!! श्रीकृष्ण !!! भाग – ५.

त्या गाड्यात समारंभाच्या भोजना साठी आणलेल्या दही,दुध व अन्य मिष्टांनांची अवजड रिकामी भांडी ठेवली होती.इकडे नंद यशोदा पंगतीत सर्वांना आग्रहाने वाढत असतांना,कांही मुलं ओरडा करत धावत येऊन कृष्ण पाय झाडत रडत असुन त्याने पायाने गाडा उलथवल्याचे सांगीतल्या बरोबर, यशोदा तशीच धावत बाहेर आली.पाहते तो काय कृष्ण कळवळुन रडत आहे,अवाढव्य गाडा पलीकडे उलथुन पडला आहे,त्या तील सर्व अवजड भांडी अस्ताव्यस्त पसरली आहेत.तिचा जिव गलबलुन गेला नंदाने ब्राम्हणाकरवी रक्षोहन होम करुन कृष्णाला अभिषेक केला.गर्गमुनी व वसुदेवाचे “सतत दक्ष रहा” हे वाक्याची नंदाला आठवण झाली.आतां असे उत्पात घडतच राहतील.

दिवस जात होते.राम-कृष्ण कलेकलेने वाढत होते.उभे राहु लागले, चालु लागले.आतां ते पांच वर्षाचे झाले. बलराम तसा शांत,पण कृष्ण अति खोड कर,भारी चपळ.यशोदा घरातील कामे करुन व त्याला सांभाळतांना ति अगदी थकुन जात असे.कृष्णाच्या जास्त खोड्या वाढल्याने एक दिवस त्याला न हलतां गुपचाप बसुन राहण्यास सांगुन ती घरांतील कामात गुंतली,पण आंतुन त्याच्याशी बोलणे सुरु होते.व तो ही प्रत्यु त्तरे देत होता.कांही वेळाने त्याचा आवाज येईनासा झाला म्हणुन बाहेर येऊन त्याला मांडीवर घेतले.त्याने तोंडभर माती खाल्लेली,ती माती काढायचा प्रयत्न करी तो तेवढेच ओठ घट्ट मिटुन घेई.शेवटी त्याचे नाक दाबुन म्हणाली,चल उघड बरं तोंड. त्याने पुर्ण आ करुन तोंड उघडले तर तिला काय दिसले? पुर्ण विश्वदर्शन झाले.ती विलक्षण गोंधळली.तेवढ्यात त्याने तोंड मिटुन तिच्या कुशीत शिरला. तिच्या स्तनातुन जणुं पान्हा फुटुन दुध ओघळु लागले.वात्सल्याने ह्रदय भरुन आले.ते अर्धरितं स्वप्न तिच्या मनातुन विरुन गेलं. तो पळुन गेला म्हणुन ती ही त्याच्या मागे धावली.शेवटी पकडुन अंग णात असलेल्या उखळाला बांधुन टाकले. व ती घरातल्या कामात गुंतुन गेली.बराच वेळ झाला व त्याला भूक लागली असेल असे वाटल्याने बाहेर येऊन बघते तर, बांधलेला कृष्णही नाही व उखळही नाही. चौकशीअंती गावाबाहेरच्या दोन प्रचंड अर्जुन वृक्षास अडकुन पडला व पिढ्यान पिढ्यांची ती दोन्ही जुनी वृक्ष दोन बाजुंनी उन्मळुन पडलेली,आणि दोरासकट उखळाला बांधलेला कृष्ण वृक्षांच्यामधे कावरा बावरा होऊन उभा असलेला पाहुन तीने धावत जाऊन बंधनमुक्त केले व पश्चातापाने विदीर्ण ह्रदयाने त्याला छातीशी कवटाळले. संध्याकाळी मथुरेहु न नंद घरी आल्यावर ही हकीकत कळल्यावर म्हणाला गेल्या पांच वर्षात पांच मोठे उत्पात झालेत. दुसर्‍या दिवशी त्याची शांती केली.त्याला दाव्याने बांधले म्हणुन लोक त्याला दामोदर म्हणु लागले.

बलराम कृष्णची बालदशा संपुन किशोरावस्थेत आलेत.निळासावळा कृष्ण नेहमी पीत वस्रे व गौर वर्णीय संकर्षण नील वस्रे परिधान करीत असे. दोघांचेही सौंदर्य अनुपम होते.पण त्यातही कृष्णाचे सौंदर्य? त्याच्या निळ्या सावळ्या,खोडकर,मिश्कील,हसर्‍या चेहर्‍यावर एकदा का नजर गेली की, ती खिळून बसे.आतां ते गोपांबरोबर रानांत गाईवासरे चारण्यास सोबत न्याहारी घेऊन जाऊ लागले.सात वर्षाचा नटखट, खोडकर,पिवळे वस्र नेसलेला,कानात मोरांची पिसे,तर कधी पल्लवांचा गुच्छ मुकुटासारखा मस्तकी ठेवलेला,गळ्यात वनमाला घातलेल्या कृष्णाला पहायला गोपी आपापल्या दारात खिळुन उभ्या राहत वेणूचा आवाज ऐकु येईनासा होई पर्यंत!

दिवस जात होते,ऋतु बदलत होते. आतां पुर्वीसारखे उत्पातही होत नव्हते. पण दुरवरच्या जंगलातुन येणार्‍या लांडग्यांचा ऊपद्रव सुरु झाला. शिवाय गोकुळ परिसरही उजाड झाला.जाळण्या साठी बरेच जुने वृक्ष तोडल्या गेले.गुरां साठी मिळणारे गवत कमी झाले.पुर्वी मोठ्या वृक्षांचे भींतीसारखे संरक्षण होते, ते जळतनासाठी वापरल्या गेले.जमीनी चा कस कमी झाल्याने गवत उगवेनासे झाले.एके दिवशी नंदाने वृध्द व अनुभवी गोपांची सभा घेऊन म्हणाला, हे व्रज गोकुळ पुर्णतः उजाड झाल्याने इथल्या ब्राम्हणांना द्विजकर्म करणे अशक्य झाल्याने तेही दुसरीकडे निघुन गेले. गुर, माणसं सर्वांचेच हाल होत असल्यामुळे हे स्थान बदलण्याची वेळ येऊन ठेपलीआहे

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

                         

भगवान श्रीकृष्ण चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading