आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१६ जून, दिवस १६७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ५१ ते ७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १९९३ ते २००४
“16 जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 16 June
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक 16 जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १९९३ ते २००४ चे पारायण आपण करणार आहोत.
16 जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ५१ ते ७५,
51-13
यापरी मत्तमुगुतकी । तेथ पडिघायिले आणिकी । म्हणती हा हो विवेकी । कैसे तुम्ही ॥51॥
याप्रमाणे निराधार मतांची मौक्तिके मुखातून बाहेर काढणार्यावर दुसर्यांनी प्रहार केले. ते म्हणतात, ” अहो ! तुम्ही कसा विचार करता ? “
52-13
परतत्त्वाचिया गावी । संकल्पसेज देखावी । तरी का पा न मनावी । प्रकृति तयाची ? ॥52॥
प्रकृतीच्या पलीकडे असणार्या तत्वांच्या ठिकाणी तुम्ही जर संकल्पशय्या पाहता तर मग त्याची प्रकृतीच का मानू नये ?
53-13
परि असो हे नव्हे । तुम्ही या न लगावे । आताचि हे आघवे । सांगिजैल ॥53॥
पण असो. तुमचे म्हणणे बरोबर नाही. तुम्ही या मताचे भ्रांतीत पडू नये हे सर्व आता आम्ही सांगतो.
54-13
तरी आकाशी कवणे । केली मेघाची भरणे । अंतरिक्ष तारांगणे । धरी कवण ? ॥54॥
आकाशामध्ये मेघांचा भरणा कोण करतो ?अंतरिक्षात नक्षत्रे कोण धारण करतो ?
55-13
गगनाचा तडावा । कोणे वेढिला केधवा । पवनु हिंडतु असावा । हे कवणाचे मत ? ॥55॥
हे आकाशाचे छत कोणी केव्हा ताणून लावले ? वार्याने वाहत असावे ही कोणाची आज्ञा होय ?
56-13
रोमा कवण पेरी । सिंधू कवण भरी । पर्जन्याचिया करी । धारा कवण ॥56॥
शरीराचे ठिकाणी रोमरंध्रे कोण करतो ? समुद्र कोण भरतो ? पावसाच्या धारा कोण करतो ?
57-13
तैसे क्षेत्र हे स्वभावे । हे वृत्ती कवणाची नव्हे । हे वाहे तया फावे । येरा तुटे ॥57॥
याप्रमाणे क्षेत्र हे स्वभावतः कोणाच्या मालकीचे नसताना त्याची जो मालकी वागवितो, त्याला ते प्राप्त होते, जो मालकी वागवित नाही त्याचा संबंध तुटतो.
( ” ईश्वरः कारणं पुरुषकर्माफल्यदर्शनात् ” न्या. सू. 19-4-1 पुरुषाचे प्रयत्नरूप कर्म निष्फळ होताना दिसत असल्यामुळे ईश्वर निमित्तकारण आहे
न्यायमतांत परमेश्वर सृष्टीचे निमित्तकारण आहे व त्याच्या इच्छामात्रेकरून चतुर्विध भूतांच्या परमाणूंचा संयोग होऊन द्रव्याणुकादि क्रमाने सृष्टी उत्पन्न होते, असे मानले जाते.
याही मतांत शरीरादिक क्षेत्र सत्य असून त्याचा असंग अशा क्षेत्रज्ञाशी संबंध होतो व क्षेत्रज्ञाचे ठिकाणी इच्छा, द्वेष, प्रयत्न, सुख, दुःख हे धर्म मानले असल्यामुळे या मतांतही क्षेत्रक्षेत्रज्ञाचा योग्य विवेक झाला नाही. )
यानंतर माउलि क्षेत्राविषयी वैशेषिकांचे मत सांगत आहेत.
58-13
तव आणिके एके । क्षोभे म्हणितले निके । तरी भोगिजे एके । काळे केवी हे ? ॥58॥
तेव्हा हे ऐकून, दुसरे कित्येक क्षुब्ध होऊन म्हणतात, तुमचे म्हणणे जर खरे मानले, तर ते क्षेत्र एका काळाचेच स्वाधीन का दिसून येते ?
59-13
तरी ययाचा मारु । देखताति अनिवारु । परी स्वमती भरु । अभिमानियां ॥59॥
या काळाचा सर्वावर अचूक घाला पडतो; पण ते अभिमानाने आपल्या मतांवरच भर देतात.
60-13
हे जाणो मृत्यु रागिटा । सिंहाडयाचा दरकुटा । परी काय वांजटा । पूरिजत असे ॥60॥
शरीर हे मृत्यूरूपी क्रुध्द सिंहाच्या राहण्याची दरी आहे, हे आपण सर्व जाणतो, पण काय करावे ? व्यर्थ बडबड करणार्याशी कधी पुरे पडता येते काय ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
61-13
महाकल्पापरौती । कव घालूनि अवचिती । सत्यलोकभद्रजाती । आंगी वाजे ॥61॥
या मृत्यूरूपी काळाने महाकल्पाच्या पलिकडेही अकस्मात मिठी मारून ब्रह्मलोकरूपी जो हत्ती त्याच्या ठिकाणीही तो प्राप्त झाला आहे.
62-13
लोकपाळ नित्य नवे । दिग्गजांचे मेळावे । स्वर्गीचिये आडवे । रिगोनि मोडी ॥62॥
स्वर्गरूपी अरण्यात शिरून नवे लोकपाळ व दिग्गजांचे समुदाय नाहीसे करतो.
63-13
येर ययाचेनि अंगवाते । जन्ममृत्यूचिये गर्ते । निर्जिवे होऊनि भ्रमते । जीवमृगे ॥63॥
बाकीचे जीवरूपी पशु यांच्या अंगच्या वार्यानेच निर्जीव होऊन जन्ममृत्यूच्या खोड्यात भ्रमत राहतात.
64-13
न्याहाळी पा केव्हडा । पसरलासे चवडा । जो करूनिया माजिवडा । आकारगजु ॥64॥
कालरूपी सिंहाने संपूर्ण आकाररूपी हत्ती आत साठवून केवढा मोठा चवडा पसरला आहे, पहा !
65-13
म्हणौनि काळाची सत्ता । हाचि बोलु निरुता । ऐसे वाद पंडुसुता । क्षेत्रालागी ॥65॥
म्हणून या क्षेत्रावर काळाचीच सत्ता आहे, हेच म्हणणे योग्य आहे. अर्जुना ! या प्रमाणे क्षेत्राविषयी मते आहेत.
66-13
हे बहु उखिविखी । ऋषी केली नैमिषी । पुराणे इयेविषी । मतपत्रिका ॥66॥
असा हा पुष्कळ प्रकारचा वादविवाद ऋषींनी नैमिषारण्यात केला असून पुराणेही, या विषयीची मते दर्शविणार्या पत्रिका आहेत- म्हणजे पुराणांतूनही ही भिन्न भिन्न मते दर्शविली आहेत.
67-13
अनुष्टुभादि छंदे । प्रबंधी जे विविधे । ते पत्रावलंबन मदे । करिती अझुनी ॥67॥
(पुराणादि) प्रबंधांतून अनुष्टुभादि अनेक छंदांनी ह्या ज्या मतपत्रिका ग्रंथित केलेल्या आहेत, त्यांचे लोक आग्रहाने अवलंब करतात.
68-13
वेदींचे बृहत्सामसूत्र । जे देखणेपणे पवित्र । परी तयाही हे क्षेत्र । नेणवेचि ॥68॥
(ज्यात इंद्रादिकांचे परमेश्वररूपाने वर्णन आले तें. ) सामवेदांतील बृहत्सामसूत्र ईश्वराला अनुलक्षून स्तवन करणारे असल्यामुळे सर्व धर्मांपेक्षा ते अत्यंत पवित्र करणारे आहे, हे खरे; पण त्यालाही या क्षेत्रक्षेत्रज्ञाचा निवाडा बरोबर समजला नाही.
69-13
आणीक आणीकीही बहुती । महाकवी हेतुमंती । ययालागी मती । वेचिलिया ॥69॥
आणखी उपपत्तिपूर्वक प्रतिपादन करणार्या पुष्कळ महान् कवींनी या क्षेत्राचा ऊहापोह करण्यात आपली बुद्धी चालविली आहे.
70-13
परी ऐसे हे एवढे । की अमुकेयाचेचि फुडे । हे कोणाही वरपडे । होयचिना ॥70॥
पण क्षेत्र हे असे आहे, एवढे आहे किंवा अमक्याचे आहे, हे कोणालाही निःसंशय कळून आले नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
71-13
आता यावरी जैसे । क्षेत्र हे असे । तुज सांगो तैसे । साद्यंतु गा ॥71॥
अर्जुना ! आता यानंतर हे क्षेत्र जसे आहे तसे तुला संपूर्ण सांगतो.
महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च ।
इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचराः ॥13. 5॥
इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः ।
एतत्क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् ॥13. 6॥
अर्थ पाच महाभूते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त (मूलप्रकृती) दहा इंद्रिये व अकरावे मन आणि इंद्रियांना गोचर असे शब्दादि दहा विषय, ॥13-5॥
अर्थ इच्छा, द्वेष, सुख, दु:ख, चेतना, धैर्य आणि संघात हे विकारांसह क्षेत्र आहे असे संक्षेपाने सांगितले आहे. ॥13-6॥
(क्षेत्राची सामान्य माहिती, छत्तीस तत्वांनी क्षेत्र बनले आहे)
72-13
तरि महाभूतपंचकु । आणि अहंकारु एकु । बुद्धि अव्यक्त दशकु । इंद्रियांचा ॥72॥
तरी पाच सूक्ष्म महाभूते आणि एक अहंकार, बुद्धी, अव्यक्त व दहा इंद्रिये,
73-13
मन आणीकही एकु । विषयांचा दशकु । सुख दुःख द्वेषु । संघात इच्छा ॥73॥
आणखी एक मन दहा इंद्रियांचे दहा विषय, द्वेष, सुख, दुःख, संघात, इच्छा,
74-13
आणि चेतना धृती । एवं क्षेत्रव्यक्ती । सांगितली तुजप्रती । आघवीची ॥74॥
चेतना व धृती याप्रमाणे क्षेत्राचे संपूर्ण स्वरूप सांगितले.
75-13
आता महाभूते कवणे । कवण विषयो कैसी करणे । हे वेगळालेपणे । एकैक सांगो ॥75॥
आता महाभूते कोणती, विषय कोणते व इंद्रिये कशी आहेत हे तुला एक एक वेगवेगळेपणाने सांगतो.
दिवस १६७ वा, १६, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १९९३ ते २००४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. १९९३
करिता या सुखा । अंतपार नाही लेखा ॥१॥
माथा पडती संतपाय । सुख कैवल्य ते काय ॥धृपद॥
ऐसा लाभ नाही । दुजा विचारिता काही ॥२॥
तुका म्हणे गोड । तेथे पुरे माझे कोड ॥३॥
अर्थ
संतांचे चरण रज माझ्या मथ्यावर पडो आणि हरीची कथा त्यांच्या मुखाने ऐकावी या सुखाला अंतपार नाही. संतांच्या पायावर मी माझा माथा टेकून त्यांच्या चरणावर पडलो त्या सुखापुढे मग ते कैवल्याचे सुख केवढे आहे ? विचार करून पाहिले तर यापेक्षा दुसरा श्रेष्ठ लाभ नाही. तुकाराम महाराज म्हणतात हा लाभ अतिशय गोड आहे आणि संतांच्या चरणाजवळ माझे सर्व लाड पूर्ण होतील.
3
अभंग क्र. १९९४
वेद जया गाती । आम्हा तयाची संगति ॥१॥
नाम धरियेले कंठी । अवघा सांटविला पोटी ॥धृपद॥
ॐकाराचे बीज । हाती आमुचे ते निज ॥२॥
तुका म्हणे बहु मोटे । अणुरेणु या धाकुटे ॥३॥
अर्थ
वेद ज्याचे गीत गातात अशा हरीची आम्हाला संगती आहे. अशाच हरीचे आम्ही नाम कंठात धारण केले आहे आणि त्यालाच आम्ही आमच्या हृदयात साठवून ठेवले आहे. निज स्वरूपाचे बीज म्हणजे हरी आहे आणि ते आमच्या हातात आहे. तुकाराम महाराज म्हणतात हा हरी सर्वापेक्षा मोठा आणि अनु रेणू पेक्षाही लहान आहे.
3
अभंग क्र. १९९५
तुम्ही तरी हो श्रीपती । माझी बहु हीन याती ॥१॥
दोघे असो एके ठायी । माझा माथा तुझे पायी ॥धृपद॥
माझ्या दीनपणा पार । नाही बहु तू उदार ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । मी ओहोळ तू गंगा ॥३॥
अर्थ
अहो देवा तुम्ही लक्ष्मिपती आहात पण मी तर खुप खालच्या जातीचा आहे. तरी ही देवा आपण दोघे एकाच ठिकाणी राहू आणि मी माझा माथा तुझ्या पायावर सतत ठेवील. माझ्या दीन पणाला अंतपार नाही परंतु देवा तु फार उदार आहेस. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा मी ओहळ तर देवा तु गंगा आहेस.
3
अभंग क्र. १९९६
मी याचक तू दाता । काय सत्य पाहो आता ॥१॥
म्या तो पसरिला हात । करी आपुले उचित ॥धृपद॥
आह्मी घ्यावे नाम । तुम्हा समाधान काम ॥२॥
तुका म्हणे देवराजा । वाद खंडी तुझा माझा ॥३॥
अर्थ
देवा मी याचक आहे तू दाता आहेस आता मी तुझ्या कडे दान मागण्यास आलो आहे तु दान देऊन तुझे वाक्य सत्य करतो की नाही आता ते पाहू. देवा मी तुमच्यापुढे तर आता निर्लज्ज होऊन हात पसरला आहे परंतु उचित दान देणे हे तुमचे कर्तव्य आहे. आम्ही तुमचे नाम प्रेमाने घ्यावे त्यामुळे तुम्ही आमचे समाधान करावे हे तुमचे कामच आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे देवराया आता तुम्ही आणि आम्ही वेगवेगळे आहोत हा आपल्यातला वाद खंडित करा.
3
अभंग क्र. १९९७
तुझे पोटी ठाव । व्हावा ऐसा माझा भाव ॥१॥
करी वासने सारिखे । प्राण फुटे येणे दुःखे ॥धृपद॥
अहंकार खोटे । वाटे श्वापदांची थाटे ॥२॥
तुका म्हणे आई । हाती धरूनि संग देई ॥३॥
अर्थ
देवा तुझ्या हृदयात आम्हाला स्थान मिळावे असा माझा खरा भक्ती भाव आहे. देवा अशी माझी वासना आहे तरी तु ती पूर्ण कर कारण तुझ्या वियोगाने मला दुःख होत आहे व माझे प्राण ही कासावीस होत आहे. देवा अहंकार, काम, क्रोध अशी भयानक श्वापदे ज्या वाटेने चालल्यावर तुझी प्राप्ती होईल त्या वाटेवरच मला आडवण्यास उभे राहिले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठले आई तु माझ्या हाताला धरून मला तुझी नेहमी संगती घडू द्यावी.
3
अभंग क्र. १९९८
दारी परोवरी । कुडी कवाडी मी घरी ॥१॥
तुमच्या लागलो पोषणा । अवघे ठायी नारायणा ॥धृपद॥
नेदी खाऊ जेवू । हातींतोंडींचे ही घेऊ ॥२॥
तुका म्हणे अंगी । जडलो ठायीचा सलगी ॥३॥
अर्थ
देवा मी दारात कूडात कवाडात किंवा घरात कोठेही असलो तरी देखील, मी कुठेही जरी असलो तरी हे नारायणा तुम्हाला माझे पोषण करण्याचे काम तुमच्या पाठीमागे लागले आहे. देवा मला जेऊ घातल्याशिवाय तुमच्या हातात घास असो किंवा तोंडात घास असो तरी देखील मी तुम्हाला जेऊ देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा आपल्या दोघामध्ये सलगी आहे त्यामुळेच मी तुमच्याशी इतका चिटकलो आहे.
3 3
अभंग क्र. १९९९
मज कोणी काही करी । उमटे तुमचे अंतरी ॥१॥
व्याला वाडविले ह्मुण । मज सुख तुज सीण ॥धृपद॥
माझे पोट धाले । तुझे अंगी उमटले ॥२॥
तुका म्हणे खेळे । तेथे तुमचिया बळे ॥३॥
अर्थ
देवा मला कोणी सुख किंवा दुःख जरी दिले तरी ते तुमच्या अंतकरणात उमटते. मी जन्माला आलो मला तुम्ही वाढविले माझे पालनपोषण केले म्हणूनच मला सुख व्हावे याकरता तुम्ही खटपट करता आहात देवा. देवा माझे पोट तृप्त झाले तर माझ्या तृप्तीचा आनंद तुमच्या अंगावर उमटतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुमच्या बळावरच तर खेळ खेळत आहे.
3
अभंग क्र. २०००
जोडोनिया कर । उभा राहिलो समोर ॥१॥
हे चि माझे भांडवल । जाणे कारण विठ्ठल ॥धृपद॥
भाकितो करुणा । आता नुपेक्षावे दीना ॥२॥
तुका म्हणे डोई । ठेवी वेळोवेळा पायी ॥३॥
अर्थ
मी देवासमोर हात जोडून उभा राहिलो आहे. हेच माझे भांडवल आहे मला काही द्यायचे किंवा नाही द्यायचे हे सर्व विठ्ठल जानतो आहे. मग विठ्ठलाला वाटेल की हा दीन आहे दुर्बळ आहे हा मला करूणा भाकित आहे, त्याची उपेक्षा करून चालणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी माझी डोई वेळोवेळी या देवाच्या पायावर ठेवत आहे.
अभंग क्र. २००१
आम्ही घ्यावे तुझे नाम । तुम्ही आम्हा द्यावे प्रमे ॥१॥
ऐसे निवडिले मुळी । संती बैसोनि सकळी ॥ध्रु
माझी डोयी पायावरी । तुम्ही न धरावी दुरी ॥२॥
तुका म्हणे केला । खंड दोघाचा विठ्ठला ॥३॥
अर्थ
आम्ही तुझे नांव घ्यावे आणि तू आम्हाला प्रेम द्यावे. तुझे प्रेम आमच्या ठिकाणी उत्पन्न व्हावे असा सर्व संतांनी बसून पूर्वीच ठराव केला आहे. मी माझे डोके तुमच्या पायावर ठेवले आहे. तुम्ही आम्हाला दूर करू नये. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला असा तुमच्यात आणि आमच्यात करारच झाला आहे.
अभंग क्र. २००२
वारिले लिगाड । बहुदिसांचे हे जाड ॥१॥
न बोलावे ऐसे केले । काही वाउगे तितुले ॥धृपद॥
जाला चौघांचार । गेला खंडोनि वेव्हार ॥२॥
तुका म्हणे देवा । करीन ते घ्यावी सेवा ॥३॥
अर्थ
देवा तुम्हीच्या सेवेचे जड झालेले बहुत दिवसांचे लिगाड तुम्ही दूर केले आम्ही आता काहीच बोलू नये अशी कृपा तुम्ही केली आहे. चार संतांनी एकत्र येऊन आपल्या कराराचा निकाला लावला आहे आणि तंटा मिटविला आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता मी तुमची सेवा करीन ती सेवा मान्य करावी.
अभंग क्र. २००३
पायरवे अन्न । मग करी खेदक्षीण ॥१॥
ऐसे होती घातपात । लाभे विण संगे थीत ॥धृपद॥
जन्माची जोडी । वाताहात एके घडी ॥२॥
तुका म्हणे शंका । हित आड या लौकिका ॥३॥
अर्थ
जेवताना जर कोणाच्या पायाचा आवाज आला तर जेवणाऱ्याला त्याचा विक्षेप होतो आणि मग लाभाशिवाय घात पात केल्या सारखे होते. जसे जन्म भर काही गोष्टीची जमवा जमव करावी आणि काही वेळात त्याचा नाश व्हावा तसातुकाराम महाराज म्हणतात मनातील शंका मोक्ष रुपी हिताच्या आड येते.
अभंग क्र. २००४
आम्हा वैष्णवाचा । नेम काया मने वाचा ॥१॥
धीर धरु जिवासाठी । येऊ नेदू लाभा तुटी ॥ध्रु॥
उचित समय । लाज निवारावे भय ॥२॥
तुका म्हणे कळा । जाणो नेम नाही बाळा ॥३॥
अर्थ
आमचा वैष्णवाचा असा नियम आहे कि काय वाचा मानाने परमार्थासाठी आम्ही स्वतःचा प्राणही अर्पण करू. पण स्वहिता मध्ये कधीही अंतर पडू देणार नाहि. किंवा उचित प्रसंगा मध्ये आम्ही आमची लाज सोडण्यास भयभीत होणार नाहि. तुकाराम महाराज म्हणतात जे नियम आम्ही जाणतो आहोत ते अज्ञानी माणसांना नियम माहित नाही.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















