आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२४ जून, दिवस १७५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी २५१ ते २७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २०८९ ते २१००
“24 जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 24 June
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक 24 जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २०८९ ते २१०० चे पारायण आपण करणार आहोत.
24 जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी २५१ ते २७५,
251-13
ऐसिया जतना । चालणे जया अर्जुना । हे अनिर्वाच्य परिमाणा । पुरिजेना ॥13-251॥
अर्जुना, अशा रीतीने जपून ज्याचे चालणे असते त्या चालण्याचे वर्णन करता येत नाही आणि ते चालणे अमक्यासारखे आहे म्हणून प्रमाण दिले तर ते पुरे पडत नाही.
252-13
पै मोहाचेनि सांगडे । लासी पिली धरी तोंडे । तेथ दांतांचे आगरडे । लागती जैसे ॥13-252॥
जेव्हा मांजरी मोहाच्या योगाने आपले पिल्लू आपल्या तोंडात धरते त्यावेळी त्या पिल्लास जशी तिच्या दातांची टोके लागतात (मांजरीने दातांनी पिल्लू जरी बळकट धरलेले असते, त्यावेळी त्या पिल्लास जशी तिच्या दाताची टोके लागत नाहीत)
253-13
का स्नेहाळु माये । तान्हयाची वास पाहे । तिये दिठी आहे । हळुवार जे ॥13-253॥
अथवा प्रेमळ आई जशी आपल्या तान्ह्या मुलाची वाट पहाते, त्या दृष्टीमधे जो नाजुकपणा असतो,
254-13
नाना कमळदळे । डोलविजती ढाळे । तो जेणे पाडे बुबुळे । वारा घेपे ॥13-254॥
अथवा वारा घेण्याकरता कमळाचे फूल हळू हळू हलवले असता, त्यापासून निघालेला वारा तो ज्याप्रमाणे डोळ्याच्या बुबुळास मोठा सुखकर वाटतो (बुबुळास खुपत नाही)
255-13
तैसेनि मार्दवे पाय । भूमीवरी न्यसीतु जाय । लागती तेथ होय । जीवा सुख ॥13-255॥
तितक्या मऊपणाने भूमीवर पाय ठेवीत तो जातो. ते पाय जेथे लागतील तेथे लोकांना सुख होते.
256-13
ऐसिया लघिमा चालता । कृमि कीटक पंडुसुता । देखे तरी माघौता । हळूचि निघे ॥13-256॥
अर्जुना, अशा हळूवारपणाने चालत असतांना कृमीकीटक पाहिले तर, हळूच माघारा फिरतो.
257-13
म्हणे पावो धडफडील । तरी स्वामीची निद्रा मोडैल । रचलेपणा पडैल । झोती हन ॥13-257॥
तो म्हणतो पाय जोराने पडल्यामुळे आवाज निघाला तर (सर्व भूतांना व्यापून असलेल्या) प्रभूची झोप मोडेल व असलेल्या सुखरूपतेस विक्षेप येईल.
258-13
इया काकुळती । वाहणी घे माघौती । कोणेही व्यक्ती । न वचे वरी ॥13-258॥
या करुणेने मागे परततो वकोणत्याही व्यक्तीवर (प्राण्यावर) पाय ठेवीत नाही.
259-13
जीवाचेनि नांवे । तृणातेही नोलांडवे । मग न लेखिता जावे । हे के गोठी ? ॥13-259॥
गवताच्या काडीत जीव आहे असे समजून ती ओलांडीत नाही (तुडवून जात नाही). मग समोर प्राणी पाहिल्यावर त्याला न जुमानता तो त्याला तुडवीत जाईल ही गोष्ट कोठली ?
260-13
मुंगिये मेरु नोलांडवे । मशका सिंधु न तरवे । तैसा भेटलिया न करवे । अतिक्रमु ॥13-260॥
मुंगीला ज्याप्रमाणे मेरु पर्वताचे उल्लंघन करता येत नाही, चिलटाला ज्याप्रमाणे समुद्र तरून जाता येत नाही, त्याप्रमाणे कोणताही प्राणी भेटला असता त्याच्याने उल्लंघन करवत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
261-13
ऐसी जयाची चाली । कृपाफळी फळा आली । देखसी जियाली । दया वाचे ॥13-261॥
अहिंसकाचे बोलणे याप्रमाणे ज्याची चालण्याची रीत कृपारूपी फळांनी फळाला आली, व जेथे वाचेमधे दया जगलेली तू पहाशील.
262-13
स्वये श्वसणेचि सुकुमार । मुख मोहाचे माहेर । माधुर्या जाहले अंकुर । दशन तैसे ॥13-262॥
स्वत: श्वासोच्छ्वास नाजूक रीतीने करतो, त्याचे मुख प्रीतीचे माहेर असते व त्याचे दात हे जणुकाय मधुरपणाला अंकुरच फुटले आहेत !
263-13
पुढा स्नेह पाझरे । माघा चालती अक्षरे । शब्द पाठी अवतरे । कृपा आधी ॥13-263॥
(तो कोणाशी बोलत असताना) पुढे प्रेम पाझरते व मागून अक्षरे चालतात आणि कृपा आधी प्रगट होते व शब्द मागून प्रगट होतात.
264-13
तव बोलणेचि नाही । बोलो म्हणे जरी काही । तरी बोल कोणाही । खुपेल का ॥13-264॥
अगोदर त्याचे कोणाशी बोलणेच नसते आणि जर काही कोणाशी बोलू म्हणेल (बोलण्याचे मनात आणेल) तर आपले बोलणे कोणाला खुपेल का (लागेल का) (अशी त्याच्या मनात शंका येते).
265-13
बोलता अधिकुही निघे । तरी कोण्हाही वर्मी न लगे । आणि कोण्हासि न रिघे । शंका मनी ॥13-265॥
(त्याला असे वाटत असते की) यदा कदाचित बोलतांना काही जास्त बोलणे झाले तर ते कोणाच्या वर्मी तर लागणार नाही ना ? आणि त्या जास्त बोलण्याने कोणाच्या मनात शंका तर येणार नाही ना ?
266-13
मांडिली गोठी हन मोडैल । वासिपैल कोणी उडैल । आइकोनिचि वोवांडिल । कोण्ही जरी ॥13-266॥
कोणी एखाद्या गोष्टीविषयी आरंभलेल्या बोलण्याचा रंग आपल्या बोलण्याने बिघडेल, कोणी भिईल, कोणी दचकून उठेल आणि आपले बोलणे ऐकूनच कोणी त्या बोलण्याची उपेक्षा करील.
267-13
तरी दुवाळी कोणा नोहावी । भुंवई कवणाची नुचलावी । ऐसा भावो जीवी । म्हणौनि उगा ॥13-267॥
तरी आपल्या बोलण्याने कोणासही क्लेश होऊ नयेत (अथवा रागाने) कोणाचीही भिवई उचलू नये, असा त्याच्या मनात अभिप्राय असतो, म्हणून तो उगा असतो.
268-13
मग प्रार्थिला विपाये । जरी लोभे बोलो जाये । तरी परिसतया होये । मायबापु ॥13-268॥
मग आपण बोलावे, अशी कोणी कदाचित प्रार्थना केल्यास, तो प्रेमाने बोलायला लागला, तर त्याचे बोलणे जे ऐकतात, त्यांना तो आपला आईबापच आहे की काय ? असे वाटते.
269-13
का नादब्रह्मचि मुसे आले । की गंगापय असलले । पतिव्रते आले । वार्धक्य जैसे ॥13-269॥
त्याचे बोलणे म्हणजे जणु काय नादब्रह्मच आकार धरून आले, असे मधुर, किंवा गंगेचे पाणीच उसळले असे पवित्र, अथवा पतिव्रतेला जसे काही म्हातारपण आले आहे
270-13
तैसे साच आणि मवाळ । मितले आणि रसाळ । शब्द जैसे कल्लोळ । अमृताचे ॥13-270॥
त्याप्रमाणे खरे आणि मऊ (कोणास न खुपणारे) मोजके परंतु सरळ, त्याचे बोलणे म्हणजे जशा काही अमृताच्या लाटाच.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
271-13
विरोधु वादुबळु । प्राणितापढाळु । उपहासु छळु । वर्मस्पर्शु ॥13-271॥
उपरोधिक बोलणे, तंट्यास उत्तेजन देणे, प्राण्यात पाप उत्पन्न करण्यास वाहवणे, टर उडवणे, टाकून बोलणे, वर्मास झोंबणारे शब्द बोलणे,
172-13
आटु वेगु विंदाणु । आशा शंका प्रतारणु । हे संन्यासिले अवगुणु । जया वाचा ॥13-272॥
हट्ट, आवेश, कपट, आशा लावणे, संशयात पाडणे, फसवेगिरी (वगैरे) हे जे बोलण्यातील दोष आहेत त्या सर्वाचा ज्या वाचेने पूर्णपणे त्याग केलेला असतो.
273-13
आणि तयाचि परी किरीटी । थाउ जयाचिये दिठी । सांडिलिया भ्रुकुटी । मोकळिया ॥13-273॥
अहिंसकाची दृष्टी = आणि अर्जुना त्याचप्रमाणे ज्याच्या दृष्टीची स्थिती आहे व ज्याच्या भिवया मोकळ्या टाकलेल्या आहेत म्हणजे ज्याने रागाने भिवया चढवल्या नाहीत
274-13
का जे भूती वस्तु आहे । तिये रुपो शकेविपाये । म्हणौनि वासु न पाहे । बहुतकरूनी ॥13-274॥
प्राणिमात्रामधे वस्तु (परब्रह्म) आहे, तिला कदाचित आपली दृष्टी बोचण्याचा संभव आहे म्हणून बहुतकरून तो कोणाकडे पहात नाही.
275-13
ऐसाही कोणे एके वेळे । भीतरले कृपेचेनि बळे । उघडोनिया डोळे । दृष्टी घाली ॥13-275॥
असाही कोणी एका वेळेला आतल्या कृपेच्या जोराने डोळे उघडून त्याने कोणाकडे दृष्टी घातली.
दिवस १७५ वा, २४, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २०८९ ते २१००
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २०८९
आता गुण दोष काय विचारिसी । मी तो आहे रासी पातकांची ॥१॥
पतितपावनासवे समागम । अपुलाले धर्म चालवीजे॥धृपद॥
घनघाये भेटी लोखंडपरिसा । तरी अनारिसा न पालटे ॥२॥
तुका म्हणे माती कोण पुसे फुका । कस्तुरीच्या तुका समागमे ॥३॥
अर्थ
देवा आता माझ्या गुणदोषाचा तु काय विचार करतोस मी तर पातकांची राशीच आहे. मी पतीत आहे तरीदेखील तुझ्यासारखा पतितपावना सोबत मी राहावे आणि तु पतितपावन आहे त्यामुळे पतितांचा उद्धार करावे असे आपले एकमेकांचे जे धर्म आहेत तेच आपण चालवणे चांगले. लोखंडी घनाने परीस फोडण्याकरता परिसरावर घाव जरी घातला तरी परीस आपला स्वभाव सोडत नाही परिसाचा आणि लोखंडाचा संग झाला की परीस त्या घनाला देखील सोने करतेच. तुकाराम महाराज म्हणतात मातीला फुकट कोणी घ्या म्हटले तर कोणी घेणार नाही परंतु कस्तुरीच्या बरोबर राहून मातीलाही सुगंध प्राप्त होतो व कस्तुरी प्रमाणे तिचेही वजन करून तिला मोल येते.
अभंग क्र. २०९०
कृपावंता दुजे नाही तुम्हा पोटी । लाडे बोले गोठी सुख माते ॥१॥
घेउनि भातुके लागसील पाठी । लाविसील ओंठी ब्रम्हरस ॥धृपद॥
आपुलिये पाखे घालिसी पाखर । उदार मजवर कृपाळू तू ॥२॥
तुका म्हणे आम्हाकारणे गोविंदा । वागविसी गदा सुदर्शन ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही फार कृपावंत आहात आणि तुमच्या पोटी माझ्याविषयी कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही तुम्ही माझ्याशी लाडाने दोन शब्द बोललात तर मला फार सुख होते. देवा तू तुझ्या भक्तीच्या सुखाचे भातुके म्हणजे खाऊ घेऊन माझ्या पाठीमागे लागतोस आणि तुझ्या ब्रम्ह रसाचा आनंद माझ्या ओठाला लावतोस. तु आपल्या कृपेचा पंख माझ्यावर सावली म्हणून ठेवतोस असा तु उदार आणि कृपाळू माझ्या विषयी आहेस. तुकाराम महाराज म्हणतात हे गोविंदा तू आमचे रक्षण करण्याकरता च तुझ्या हातात सदासर्वकाळ गदा आणि सुदर्शन वागवीत आहे.
अभंग क्र. २०९१
पाळिलो पोसिलो जन्मजन्मांतरी । वागविलो करी धरोनिया ॥१॥
आता काय माझा घडेल अव्हेर । मागे बहु दूर वागविले ॥धृपद॥
नेदी वारा अंगी लागो आघाताचा । घेतला ठायीचा भार माथा ॥२॥
तुका म्हणे बोल करितो आवडी । अविट ते चि गोडी अंतरींची ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही माझ्या अनेक जन्मजन्मांतरी पासून हात धरून माझे पालनपोषण केले आहे. अहो देवा अनेक जन्मापासून तुम्ही मला वागवीत आला आहात मग आता तुम्ही माझा अव्हेर कसा करताल ? तुम्ही माझ्या अंगाला आघाताचा वारा देखील लागू देणार नाही कारण माझा सर्व भार तुम्ही तुमच्या माध्यावर घेतला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या अंतरंगात तुझ्याविषयी अवीट म्हणजे कधीही न वीटणारी अशी गोडी आहे आणि त्याच आवडीने मी तुझ्याशी प्रेमाने बोलत आहे.
अभंग क्र. २०९२
पांडुरंगा काही आइकावी मात । न करावे मुक्त आता मज ॥१॥
जन्मांतरे मज तैसी देई देवा । जेणे चरणसेवा घडे तुझी ॥धृपद॥
वाखाणीन कीर्ती आपुलिया मुखे । नाचेन मी सुखे तुजपुढे ॥२॥
करूनि कामारी दास दीनाहुनी । आपुला अंगणी ठाव मज ॥३॥
तुका म्हणे आम्ही मृत्युलोकी भले । तुझे चि अंकिले पांडुरंगा ॥४॥
अर्थ
पांडुरंगा मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे ती म्हणजे अशी की तुम्ही मला आता मुक्त करू नका. याउलट तु मला असे अनेक जन्म दे की त्या जन्मामध्ये मला तुझी चरण सेवा घडेल. देवा तुझी कीर्ती मी माझ्या मुखाने वर्णन करत राहिन आणि तुझ्यापुढे मी आनंदाने सुखाने नाचेन नृत्य करेल. अहो देवा मला तुमच्या घरचा काम करणारा दास म्हणून ठेवा दिना हुन दिन मला करा आणि तुमच्या अंगणात मला जागा द्यावा. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा आम्हालाही मृत्युलोकच चांगले आहे कारण येथे राहून आम्ही तुमचे दास झालो आहोत.
अभंग क्र. २०९३
माझे अंतरीचे तोचि जाणे एक । वैकुंठनायक पांडुरंग ॥१॥
जीव भाव त्याचे ठेवियेला पायी । मज चिंता नाही कवणेविशी ॥धृपद॥
सुखसमारंभे संतसमागमे । गाऊ वाचे नाम विठोबाचे ॥२॥
गाता पुण्य होय आइकता लाभ । संसारबंद तुटतील ॥३॥
तुका म्हणे जीव तयासी विकिला । आणीक विठ्ठलाविण नेणे ॥४॥
अर्थ
तोच एक वैकुंठ नायक पांडुरंग माझ्या अंतकरणातील सर्व इच्छा जाणतो आहे. आता मी माझा जीव भाव त्या पांडुरंगाच्या चरणी ठेवला आहे मला कसल्याही प्रकारची चिंता उरलेली नाही. कोणत्याही प्रकारचा सुख समारंभ असो किंवा वैष्णवांची संगती असो तेथे आम्ही विठोबाचे नाम आमच्या वाणीने गात राहू. विठोबाचे नाम गायले तर पुण्य होते, कानाने ऐकले तर मोठा लाभ होतो आणि सर्व प्रकारचे संसार बंधन तुटून जातात. तुकाराम महाराज म्हणतात मी माझा जीव या विठ्ठलाला विकला आहे आणि त्याच्यावाचून दुसरे मला काहीही कळत नाही.
अभंग क्र. २०९४
कथा सुख करी कथा मुक्त करी । कथा याची बरी विठोबाची ॥१॥
कथा पाप नासी उद्धरिले दोषी । समाधि कथेसी मूढजना ॥धृपद॥
कथा तप ध्यान कथा अनुष्ठान । अमृत हे पान हरीकथा ॥२॥
कथा मंत्रजप कथा हरी ताप । कथाकाळी काप कळीकाळासी ॥३॥
तुका म्हणे कथा देवाचे ही ध्यान । समाधि लागोन उभा तेथे ॥४॥
अर्थ
या विठोबाची कथा दुःख हरण करते तसेच मुक्त ही करते त्यामुळे विठोबाची कथा फार चांगली आहे. कथेमध्ये इतकी शक्ती आहे की ती सर्व प्रकारचे पाप नाश करते तसेच अनेक दोषी असे आहेत की त्यांचा केवळ कथेने उध्दार झाला आहे तसेच कितीही मूर्ख मनुष्य असला तरी तो एकाग्र चित्ताने कथेमध्ये बसला तर त्याला समाधी लागत असते. कथा तप आहे कथा ध्यान आहे, कथा अनुष्ठान ही आहे अमृत पानासारखी हरी कथा आहे. कथा म्हणजे एक प्रकारचे मंत्रजप आहे, त्रिविधताप हरणारी आहे आणि कथेच्या काळी काळला देखील भीती वाटते थरथर कळिकाळ कापत असतो. तुकाराम महाराज म्हणतात कथेच्या वेळी देवाला देखील ध्यान लागते आणि समाधी अवस्था लागून देव कथेत उभा असतो.
अभंग क्र. २०९५
काय ऐसा सांगा । धर्म मज पांडुरंगा ॥१॥
तुझे पायी पावे ऐसा । जेणे उगवे हा फासा ॥धृपद॥
करी कृपादान । तैसे बोलवी वचन ॥२॥
तुका म्हणे देवा । माझे हृदय वसवा ॥३॥
अर्थ
हे पांडुरंगा मला असा काही धर्म सांगावा जेणेकरून मला तुझ्या पायाची प्राप्ती होईल आणि या संसाराचा फासा माझ्या गळ्यातून सुटेल. अहो पांडुरंगा माझ्याकडून असे शब्द बोलून घ्या की जेणेकरून तुम्ही माझ्यावर कृपा कराल. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा कृपा करून तुम्ही माझ्या हृदयात येऊन वसावे.
अभंग क्र. २०९६
भला म्हणे जन । परि नाही समाधान ॥१॥
माझे तळमळी चित्त । अंतरले दिसे हित ॥धृपद॥
कृपेचा आधार । नाही दंभ जाला भार ॥२॥
तुका म्हणे कृपे । अंतराय कोण्या पापे ॥३॥
अर्थ
अहो देवा लोक मला चांगले म्हणतात. परंतु माझ्या चित्ताला समाधानच मिळत नाही. माझे चित्त सारखेच तळमळ करीत आहे मला असे वाटत आहे की माझे हित माझ्यापासून अंतरले आहे असेच मला दिसत आहे. देवा मला तुमच्या कृपेचा आधार अजुनही प्राप्त झालेला नाही परंतु जनमाणसांमध्ये माझा चांगले पणाचा दंभ मात्र खूप झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझी कृपा अजूनही माझ्यावर झाली नाही असे माझ्याकडून कोणते पाप झाले आहे मला काही समजत नाही.
अभंग क्र. २०९७
शिकविलो ते बोल । बोले तैसी नाही ओल ॥१॥
आता देवा संदेह नाही । वाया गेलो यासी काही ॥धृपद॥
एकाताचा वास । नाही संकल्पाचा नास ॥२॥
बुद्धी नाही स्थिर । तुका म्हणे शब्दा धीर ॥३॥
अर्थ
मी जसे शिकलो, जसा वेद अभ्यास केला तसे तर फार चांगले बोलतो परंतु अंतकरणात भक्ती प्रेमाविषयी ओलावाच नाही. यावरून असे सिद्ध होत आहे की मी पूर्णपणे वाया गेलेलो आहे याविषयी आता कोणत्याही प्रकारचा संदेह राहिलेला नाही. मला एकाताचा वासही अजून झालेला नाही कोणत्याही प्रकारचा संकल्पाचा नाश माझ्या अंतकरणातून झालेला नाही. तुकाराम महाराज म्हणतात माझी बुद्धी अजून स्थिर झालेली नाही आणि शब्दांमध्ये ही अजून स्थिरता आलेली नाही.
अभंग क्र. २०९८
उचिताचा दाता । कृपावंता तू अनंता ॥१॥
का रे न घालिसी धाव । तुझे उच्चारिता नांव ॥धृपद॥
काय बळयुक्ती । नाही तुझे अंगी शक्ती ॥२॥
तुका म्हणे तू विश्वंभर । ओस माझे का अंतर ॥३॥
अर्थ
हे कृपावंत अनंता तु भक्तांना उचित दान देणारा दाता आहेस. अरे मग तुझे नांव आम्ही उच्चार केले असता तु आमच्याकडे धाव का बर घेत नाही. माझी इच्छा पूर्ण करण्यास तुझ्या अंगी बळ नाही किंवा युक्ती व शक्ती नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा अनंता तु विश्वंभर आहे सर्व विश्व व्यापक आहे तर मग माझे अंतकरण तुझ्या वाचून ओस का पडले आहे.
अभंग क्र. २०९९
वाहवितो पुरी । आता उचित ते करी ॥१॥
माझी शक्ती नारायणा । कीव भाकावी करुणा ॥धृपद॥
आम्हा ओढी काळ । तुझे क्षीण झाले बळ ॥२॥
तुका म्हणे गोडी । जीवा मातेचिया ओढी ॥३॥
अर्थ
देवा मी या संसाराच्या पुरामध्ये वाहत चाललो आहे. त्यामुळे माझे उचित कशात आहे ते तू कर. हे नारायणा माझी शक्ती म्हणजे तुला काकुलतेला येऊन करुणा भाकावी एवढीच. अरे देवा आम्हाला काळ ओढीत आहे तरीही तू आमची मदत का करत नाहीस का तुझे बळ क्षीण झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात बालकाची गोडी मातेला त्याच्याकडे आकर्षित करत असते त्याप्रमाणे तुम्हालाही माझी गोडी माझ्या कडे आकर्षित करेल व त्यानिमित्ताने माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
अभंग क्र. २१००
आता घेई माझे । भार सकळ ही ओझे ॥१॥
काय करिसी होई वाड । आलो पोटासी दगड ॥धृपद॥
तू चि डोळे वाती । होई दीपक सांगाती ॥२॥
तुका म्हणे काही । विचाराया चाड नाही ॥३॥
अर्थ
हे आई पांडुरंगे आता माझ्या योगक्षेमांचा सर्व भार घे. मी जरी तुझ्या पोटाला दगडासारखा जड मूढ जन्माला आलो असलो तरी आता काय करतेस ? तूच आपले मन मोठे कर ; आणि माझा अंगीकार कर म्हणजे झाले. तूच माझे डोळे आहेस. तूच या अज्ञानांधकारात प्रकाश देणारा दिवा होऊन परमार्थ मार्गातील सोबतीण हो. तुकाराम महाराज म्हणतात आई एवढे माझे मनोरथ पूर्ण करण्याविषयी तुला विचार करण्याची गरजच काय ? कारण तू सर्वज्ञ सर्वशक्तीमान आहेस. ” “
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















