आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२८ एप्रिल, दिवस ११८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा, ओवी १०१ ते १२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १४०५ ते १४१६
“२८ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २८ Apirl
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २८ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
२८ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा, ओवी १०१ ते १२५,
101-10
ऐसे मी एकचि पहिले । मग मी ते मनाते व्याले । तेथ सप्तऋषि जाहाले । आणि चारी मनु ॥101॥
याप्रमाणे सृष्टीच्या पूर्वी मीच एक असतो. मग त्या माझ्यापासून मनाची उत्पत्ती होते व त्या मनापासून सप्तर्षी व चार मनु उत्पन्न होतात.
102-10
इही लोकपाळ केले । लोकपाळी विविध लोक सृजिले । लोकांपासूनि निपजले । प्रजाजात ॥102॥
मग लोकपालांना उत्पन्न करतात लोकपाल तेथील जनांना उत्पन्न करतात. अशा प्रकारे लोकांपासून अनेक प्रकारची प्रजा निर्माण होते.
103-10
ऐसेनि हे विश्व येथे । मीचि प्रसवला ना निरुते । परी भावाचेनि हाते । माने जया ॥103॥
याप्रमाणे येथे हे जग म्हणजे मीच खरोखर विस्तारलो आहे, पण हैं, माझ्या वचनावर दृढ विश्वास असल्यामुळे ज्याला पटेल, त्यालाच कळेल.
एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः ।
सोऽविकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥10. 7॥
104-10
यालागी सुभद्रापती । हे भाव इया माझिया विभूती । आणि यांचिया व्याप्ती । व्यापिले विश्व ॥104॥
म्हणून सुभद्रापते अर्जुना ! हे सर्व अस्तित्वात आलेले कार्यपदार्थ माझ्या विभूती आहेत व त्यांच्या योगानेच सर्व जग व्यापिले आहे.
105-10
म्हणोनि गा यापरी । ब्रह्मादिपिपीलिकावरी । मीवाचूनि दुसरी । गोठी नाही ॥105॥
म्हणून बा अर्जुना ! याप्रमाणे ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत माझ्यावाचून दुसर्या वस्तूची गोष्ट देखील नाही.
106-10
ऐसे जाणे जो साचे । तया चेइरे जाहाले ज्ञानाचे । म्हणोनि उत्तम मध्यम भेदाचे । दुःस्वप्न तया ॥106॥
जड-विनाशीभाव जाऊन ज्याला सर्व सच्चिदानंदस्वरूप दिसते त्याला शुध्द ब्रह्मज्ञान झाले असे समज, म्हणून तो उत्तम, मध्यम, कनिष्ठ या भावाचे स्वप्न पाहत नाही.
107-10
मी माझिया विभूती । विभूती अधिष्ठिलिया व्यक्ती । हे आघवे योगप्रतीती । एकचि मानी ॥107॥
मी, माझ्या विभूती व त्या विभूतीला अधिष्ठानभूत व्यक्ति ह्या सर्वाचे माझ्याशी ऐक्य आहे, या अनुभवाने तो सर्व मद्रूपच मानतो.
108-10
म्हणोनि निःशंके येणे महायोगे । मज मीनला मनाचेनि आंगे । एथ संशय करणे न लगे । तो त्रिशुद्धी जाहला ॥108॥
म्हणून अशा या अद्वैतदृष्टिरूप श्रेष्ठ योगाने जो माझ्याशी मनाने ऐक्य पावला तो मद्रूप होतो, हे मी त्रिवार प्रतिज्ञा करून सांगतो. येथे संशय घेण्याचे कारणच नाही.
109-10
का जे ऐसे किरीटी । माते भजे जो अभेदा दिठी । तयाचिये भजनाचिये नाटी । सूती मज ॥109॥
कारण अर्जुना ! जो अभेददृष्टीने माझे याप्रमाणे भजन करतो, तो त्याच्या भजनाचे व्यवहारात एक मलाच घेतलेले असते.
110-10
म्हणऊनि अभेदे जो भक्तियोगु । तेथ शंका नाही नये खंगु । करिता ठेला तरी चांगु । ते सांगितले षष्ठी ॥110॥
म्हणून अभेदाने होणारा जो भक्तियोग, त्यात पूर्णब्रह्मस्थिती प्राप्त होईल किंवा नाही, ही शंका घेण्याचे कारणच राहत नाही व तो खंडितही होत नाही आणि खंड पडला तरी ते कल्याणाचे असते, कारण तो भगवंताच्या कृपेने पुनः सुरू होतो, हे सहाव्या अध्यायात सांगितलेंच आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
111-10
तोचि अभेदु कैसा । हे जाणावया मानसा । साद जाली तरी परियेसा । बोलिजेल ॥111॥
ज्या अभेदाने भक्ति केली जाते म्हणून मी सांगितले, तो अभेद कसा आहे हे जाणावे असा जर तुझ्या मनात ध्वनि उमटला असेल, तर सांगतो, ऐक.
अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते ।
इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥10. 8॥
112-10
तरि मीचि एक सर्वा । या जगा जन्म पांडवा । आणि मजचिपासूनि आघवा । निर्वाहो यांचा ॥112॥
तरी या सर्व जगाला अर्जुना ! मीच एक जन्म देणारा आहे आणि या सर्व जगाची स्थितिहि मज पासूनच होते.
113-10
कल्लोळमाळा अनेगा । जन्म जळीचि पै गा । आणि तया जळचि आश्रयो तरंगा । जीवनही जळ ॥113॥
लाटांच्या माळा म्हणजे लाटापाठी लाटा, अशा अनेक लाटा असल्या, तरी त्या सर्वाचा जन्म एका पाण्यापासूनच होतो. ते पाणीच त्यांना आधार असते व त्यातही केवळ पाणीच असते.
114-10
ऐसे आघवाचि ठायी । तया जळचि जेवि पाही । तैसा मीवाचूनि नाही । विश्वी इये ॥114॥
ज्याप्रमाणे त्या लाटांच्या सर्व ठिकाणी पाणीच असते, दुसरे काहीच नसते, त्याप्रमाणे या जगात माझ्यावाचून दुसरे लवमात्र काही नाही. संपूर्ण मीच आहे.
115-10
ऐसिया व्यापका माते । मानूनि जे भजती भलतेथे । परि साचोकारे उदिते । प्रेमभावे ॥115॥
एकदेशीय सगुण साकार स्वरूपाने मी दिसत असलो तरी आता सांगितल्याप्रमाणे मीच व्यापकहि आहे असे जाणून जे प्रगट झालेल्या निष्कपट प्रेमाने माझे कोठेहि भजन करतात.
116-10
देशकाळवर्तमान । आघवे मजसी करूनि अभिन्न । जैसा वायु होऊन गगन । गगनीचि विचरे ॥116॥
ज्याप्रमाणे वायु आकाशाशी एकरूप होऊन आकाशांतच संचार करतो, त्याप्रमाणे देश, काळ व वर्तमान हे सर्व माझ्याशी अभिन्न करून म्हणजे भगवत्स्वरूपच आहेत असे समजून.
117-10
ऐसेनि जे निजज्ञानी । खेळत सुखे त्रिभुवनी । जगद्रूपा मनी । सांठऊनि माते ॥117॥
त्याप्रमाणे आत्मस्वरूपालाहि जाणून व जगद्रूप असा जो मी. त्या मला अंतःकरणात सांठवून जे आनंदाने त्रिभुवनात भक्तिप्रेमलीला करतात.
118-10
जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत । हा भक्तियोगु निश्चित । जाण माझा ॥118॥
जो जो प्राणी समोर येईल तो तो प्राणी साक्षात् भगवंत आहे, असे मानणे हाच, अर्जुना ! माझा भक्तियोग होय असे निश्चित जाण.
मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् ।
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥10. 9॥
119-10
चित्ते मीचि जाहाले । मियाचि प्राणे धाले । जीवो मरो विसरले । बोधाचिया भुली ॥119॥
जे चित्ताने मद्रूप झाले, जे मलाच आपला प्राण समजून तृप्त असतात, जे माझे सगुणस्वरूपहि पूर्ण ब्रह्म आहे या ज्ञानात तल्लीन राहत असल्यामुळे जन्ममरणाचाहि त्यांना विसर पडतो.
120-10
मग तया बोधाचेनि माजे । नाचती संवादसुखाची भोजे । आता एकमेका घेपे दीजे । बोधचि वरी ॥120॥
मग माझ्या स्वरूपाच्या ज्ञानाने उन्मत्त होऊन संवादाने उत्पन्न होणार्या सुखाच्या मूर्ती होऊन नाचतात आणि परस्पर एकमेकास माझ्या स्वरूपाचाच बोध घेतात व देतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-10
जैशी जवळिकेची सरोवरे । उचंबळलिया कालवती परस्परे । मग तरंगासि धवळारे । तरंगचि होती ॥121॥
ज्याप्रमाणे अत्यंत जवळ असलेल्या दोन सरोवरांतील पाणी उचंबळून आले असता दोन्ही सरोवरे परस्परात मिसळतांत व तरंगच तरंगाची घरे होतात.
122-10
तैसी येरयेरांचिये मिळणी । पडत आनंदकल्लोळांची वेणी । तेथ बोध बोधाची लेणी । बोधेचि मिरवी ॥122॥
त्याप्रमाणे ज्ञानीभक्त, परस्पराना भेटले असता ब्रह्मानंदाचे कल्लोळ उठून त्यांची वेणीच गुंतली जाते आणि तेथे बोधबोधांचे अलंकार बोधांनीच घातले जातात.
123-10
जैसे सूर्ये सूर्याते वोवाळिले । की चंद्रे चंद्रम्या क्षेम दिधले । ना तरी सरिसेनि पाडे मीनले । दोनी वोघ ॥123॥
ज्याप्रमाणे एका सूर्याने दुसर्या सूर्याला ओवाळावे किंवा एका चंद्राने दुसर्या चंद्राला अलिंगन द्यावे. अथवा दोन ओघ सारखे एकमेकांत मिसळावे.
124-10
तैसे प्रयाग होत सामरस्याचे । वरी वोसाण तरत सात्त्विकाचे । ते संवादचतुष्पथींचे । गणेश जाहले ॥124॥
त्याप्रमाणे दोन भक्तांच्या प्रेमसंवादात दोन प्रेमळ भक्तांचे प्रेम व परमेश्वररूप भगवान या तिघांच्या प्रेमाचा संगम होऊन ते एक समरस प्रेमाचे प्रयाग झाले व त्या प्रेमाच्या संगमावर अष्टसात्विकभावरूपी जाणीवेचा केरकचरा वर तरंगत राहून, भक्त त्या संवादरूपी चव्हाट्यावर गणेश होऊन राहतात.
125-10
तेव्हा तया महासुखाचेनि भरे । धावोनि देहाचिये गावाबाहेरे । मिया धाले तेणे उद्गारे । लागती गाजो ॥125॥
तेव्हा त्या भगवत्प्रेमाच्या अत्यंत सुखामुळे ते देहगावाच्या बाहेर धावतात आणि माझ्या प्रेमाने आकंठ तृप्त होऊन तृप्तीमुळे येणार्या ढेंकराने गाजू लागतात.
दिवस ११७ वा, २८, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १४०५ ते १४१६
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. १४०५
देवाचिये चाडे प्रमाण उचित । नये वाटू चित्त निषेधासी ॥१॥
नये राहो उभे कसमळापाशी । भुंकतील तैसी सांडावी ती ॥२॥
तुका म्हणे क्षमा सुखाची हे रासी । सांडूनि का ऐसी दुःखी व्हावे ॥३॥
अर्थ
हरी भक्ताने नेहमी देवाचीच चाड म्हणजे आवड धारावी वेद आणि संत यांना प्रमाण धरून इतर कोणत्याच निषिद्ध कर्माकडे चित्त जाऊ देऊ नये. वाईट कर्म करणाऱ्या माणसांजवळ उभे सुद्धा राहू नये आणि ते कोणाची निंदा करत असतील तर जसे कुत्रे भुंकतात तसेच ते आहेत असे समजावे व त्यांचा त्याग करावा. तुकाराम महाराज म्हणतात जर साधका जवळ “क्षमा” नावाचे शस्त्र असले तर दुर्जन मनुष्य त्या पुढे काय टिकणार आहे आणि एवढे प्रबळ शस्त्र साधका जवळ असेल तर त्याने दुखी का व्हावे ?
अभंग क्र. १४०६
खळा सदा क्षुद्री दृष्टी । करी कष्टी सज्जना ॥१॥
करिती आपुलाले परी । धणीवरी व्यापार ॥धृपद॥
दया संता भांडवल । वेची बोल उपकार ॥२॥
तुका म्हणे आपुलाले । उसंतिले ज्यांणी ते ॥३॥
अर्थ
दुष्ट मनुष्याची दृष्टीने नेहमीच नीच असते त्यामुळे तो संतांची निंदा करून त्यांना दुखी करतो. संत आणि दुष्ट हे दोघेही आपापल्या परीने व्यवहार करतात संता जवळ “दया” नामक भांडवल आहे. ते जरी इतरांना बोलले तरी दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठीच ते बोलत असतात. तुकाराम महाराज म्हणतात त्याचा व्यवहार हा ज्याच्या त्याच्या नुसार ज्याला त्याला चांगलाच वाटतो परंतु फरक फक्त एवढाच आहे की दुष्टांचा व्यवहार त्यांना नंतर दुःख देत असतो तर संतांचा व्यवहार त्यांना सुख देत असतो.
अभंग क्र. १४०७
जग ऐसे बहुनावे । बहुभावे भावना ॥१॥
पाहो बोलो बहु नये । सत्य काय सांभाळा ॥धृपद॥
कारियासी जे कारण । ते जतन करावे ॥२॥
तुका म्हणे संतजनी । हे चि मनी धरावे ॥३॥
अर्थ
त्रिविध गुण, अनेक नावे, अनेक रूपे ज्या ठिकाणी आहे त्याला जग म्हणतात. त्यामुळे इतर काही पाहू नये, जास्त बोलू नये आणि जे सत्य आहे त्याचे रक्षण करावे. जगामध्ये उदार निर्वाहा पुरताच व्यवहार करावा किंवा आपले जे मुख्य कार्य आहे (हरी प्राप्ती) या कार्याचे कारण हरिभक्ती चेच जतन करावे. तुकाराम महाराज म्हणतात मी जे काही तुम्हा संत जणांना सांगितले आहे तेच तुम्ही जतन करा.
अभंग क्र. १४०८
निघाले ते आगीहूनि । आता झणी आतळे ॥१॥
पळवा परपरते दुरी । आता हरी येथूनि ॥धृपद॥
धरिले तैसे श्रुत करा हो । येथे आहो प्रपंची ॥२॥
अबोल्याने ठेला तुका । भेउनि लोका निराळा ॥३॥
अर्थ
देवा मी आता ज्या अग्नीतून ( संसार अग्नीतून) बाहेर निघालो आहे ते मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतील पण तसे तुम्ही होऊ देऊ नका. देवा ते सर्वदूर फेटाळून लावावा अशी मी तुम्हाला विनंती करत आहे. देवा तुमच्या ब्रिदाचे म्हणजे पतितपावन या ब्रिदाचे तुम्ही रक्षण करा व तुम्ही ते कृतीत आणा आणि माझा उद्धार करा, मी अजून इथेच आहे म्हणजे प्रपंचात. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी सर्व लोकांना भिऊन सर्वापेक्षा वेगळा राहून अबोला राहिलो आहे.
अभंग क्र. १४०९
आता दुसरे नाही मनी । निरंजनी पडिलो ॥१॥
तुमची च पाहे वास । अवघी आस निरसली ॥धृपद॥
मागिलांचा मोडला माग । घडला त्याग अरुची ॥२॥
तुका म्हणे करुणाकरा । तू सोयरा दिनांचा ॥३॥
अर्थ
देवा मी निर्जन वनात पडलो आहे तरी पण अशा वेळी माझ्या मनात तुमच्या वाचून कोणीच नाही. मी तुमची वाट पाहत आहे आणि माझी इच्छा, अपेक्षा, हाव नाहीशी झाली आहे. देवा मागे असलेल्या संसाराचा मला वीट आला असून मी त्याच्याशी संबंध तोडला असून त्याचा त्याग केला. तुकाराम महाराज म्हणतात हे करुणाकरा तू दिनाचा सोयरा आहेस.
अभंग क्र. १४१०
धरूनिया सोई परतले मन । अनुलक्षी चरण करूनिया ॥१॥
येई पांडुरंगे नेई सांभाळूनि । करुणावचनी आळवितो ॥धृपद॥
बुद्धि जाली साह्य परि नाही बळ । अवलोकितो जळ वाहे नेत्री ॥२॥
न चलती पाय गिळत जाली काया । म्हणऊनि दया येऊ द्यावी ॥३॥
दिशेच्या करितो वारियासी मात । जोडुनिया हात वाट पाहे ॥४॥
तुका म्हणे वेग करावा सत्वर । पावावया तीर भवनदीचे ॥५॥
अर्थ
देवा माझे मन संसारापासून परतले आहे आणि माझ्या मनाने तुम्हाला शरण जाणे हाच एक मार्ग पत्करला आहे. त्यामुळे हे पांडुरंगा विठाबाई तू मला तुझ्या जवळच सांभाळून ने अशी करून वचने मी तुला आळवित आहे. देवा आता माझी बुद्धी परमार्था विषयी साह्य झाली आहे पण माझ्या शरीरामध्ये शक्ती राहिली नाही मी तुझी वाट पाहत आहे आणि तू मला दिसला नाही तर मला दुःख होते व माझ्या डोळ्यातून पाणी येते. देवा मला माझ्या पायाने चालत नाही माझे शरीर थकून गेले आहे त्यामुळे तुम्हाला माझी दया येऊ द्या, देवा ज्या दिशेने वारा येतो त्या दिशेने तोंड करून मी त्या वार्याला विचारतो अरे वाऱ्या माझा पांडुरंग माझ्या भेटीला केव्हा येणार आहे, आणि पुन्हा मी हात जोडून तुझी वाट पाहतो. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा मला भवन नदीच्या पहिल्या तीराला नेण्यासाठी त्वरा करा.
अभंग क्र. १४११
कौले भरियेली पोट । निग्रहाचे खोटे तंट ॥१॥
ऐसे माता जाणे वर्म । बाळ वाढविता धर्म ॥धृपद॥
कमविता लोहो कसे । तांतडीने काम नासे ॥२॥
तुका म्हणे खडे । देता अक्षरे ते जोडे ॥३॥
अर्थ
सुज्ञ माता आपल्या लहान लेकराला एक एक घास करून खाऊ घालते व त्याचे पोट भरविते पण मूर्ख माता बालकाला एकदमच जेवु घालण्याचा प्रयत्न करते त्याप्रमाणे सामान्य माणसाने योगाभ्यास करण्यासारखे निग्रहाची साधने करू नये. संतांनी सामान्य लोकासाठी हरिभक्ती ची सोपी साधना सांगितलेली आहे. सुज्ञ माता आपल्या लहान मुलाचे पालनपोषण कसे करावे हे उत्तम प्रकारे जाणत असते. कोणतेही काम हे दीर्घ काळाने, निग्रहाने व अखंडपणे केल्याने फळाच्या दृष्टीने कसाला येते, अन्यथा एखाद्या कामाविषयी तातडी केल्यास त्या कामाचा नाशही होतो. तुकाराम महाराज म्हणतात लहान मुलांना खडे जोडून अक्षरांची माहिती दिली तर त्यांना अक्षराची ओळख लवकर होते.
अभंग क्र. १४१२
चालिले न वाटे । गाऊनिया जाता वाटे ॥१॥
बरवा वैष्णवाचा संग । येतो सामोरा श्रीरंग ॥धृपद॥
नाही भय आड । काही विषमांचे जड ॥२॥
तुका म्हणे भक्ती । सुखरूप आदी अंती ॥३॥
अर्थ
हरिनाम गात पंढरीच्या वाटेने चालले तर नाम सहवासाने चालण्याचा श्रम वाटत नाही. त्यातल्यात्यात वैष्णवाचा संग असेल तर अति उत्तम कारण वैष्णवांच्या संगतीत राहिल्याने श्रीरंग आपल्यासमोर आपोआप येतो. पंढरीच्या वाटेने चालत असताना हरिनाम व वैष्णवांची संगती असेल तर कसलेच भय आडवे येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हरी नामाची भक्ती आधीपासून अंती पर्यंत सुखरूप आहे.
अभंग क्र. १४१३
करिता विचार तो हा दृढ संसार । ब्रम्हांदिका पार नुलंघवे सामर्थे ॥१॥
शरण शरण नारायणा मज अंगीकारी दीना । आले ते वचनांपासी माझ्या सामर्थ्य ॥धृपद॥
पाठीवरी मोळी तोचि कळवा पायी तळी । सापडला जाळी मत्स्य जाला तो न्याय ॥२॥
आता करीन तांतडी लाभाची ते याच जोडी । तुका म्हणे ओढी पाया सोई मनाची ॥३॥
अर्थ
मी जसा जसा हा संसार तरुन जाण्याचा प्रयत्न व विचार करतोय तसा तसा हा संसार तरून जाण्यास कठीण होत आहे. ब्रह्मादिक देवांना देखील हे पार करण्याचे सामर्थ्य नाही असेच दिसत आहे. त्यामुळे नारायणा मी तुम्हाला शरण आलो आहे मज दिनाचा तुम्ही अंगीकार करा. तुमच्याकडून मला जे आज्ञा वचन आले आहे त्याचे पालन मी माझ्या शक्तीप्रमाणे करत आहे. पाठीवर मोळी घेतली तर त्याचे ओझे फक्त पाठवलाच नाही तर त्याची कळ तळपायापर्यंत होते. जसा मासा जाळ्यात सापडला जातो त्याच प्रमाने मी या भवसागरात सापडलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता मी तातडी करून तुझी प्राप्ती करून घेईन व माझे मन तुझ्या पायाकडे ओढ घेत आहे.
अभंग क्र. १४१४
बहुता जातीचा केला अंगीकार । बहुत ही फार सर्वोत्तमे ॥१॥
सरलाचि नाही कोणांचिये वेचे । अक्षोभ्य ठायीचे ठायी आहे ॥धृपद॥
लागतचि नाही घेता अंतपार । वसवी अंतर अणुचे ही ॥२॥
तुका म्हणे केला होय ठाकीऐसा । पुरवावी इच्छा धरली ते ॥३॥
अर्थ
सर्वोत्तम हरीने पुष्कळ जातीच्या भक्तांचा सांभाळ केला आहे व त्यांचा उद्धारही केला आहे. पण असे असले तरी हा देव कोठे कमी पडला आहे काय ? तर नाही तो आपल्या स्वरुपस्थित आहे व हरीचा अंतपार आजपर्यंत कोणालाही लागलेला नाही व घेताही आलेला नाही. हरी इतका सूक्ष्म आहे की तो अणुच्या ही पोटात समजावतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात भक्तांना देव ज्या आकारात पाहिजे असेल देव त्या आकाराचे रूप धारण करतो आणि भक्तांच्या मनातील इच्छा देव पूर्ण करतो.
अभंग क्र. १४१५
पोट आले आता जीवन आवडी । पुरवावे परवडी बहुतांचे ॥१॥
काय आंचवणा तांतडीचे काम । मागील ती श्रम न पवाचि ॥धृपद॥
वाढितिया पोटी बहु असे वाव । सांभाळिता ठाव काय वेचे ॥२॥
दाविल्यावाचूनि नाही कळो येत । तेथे ही दुश्चित एकपणे ॥३॥
नावेचा भार तो उदकाचे शिरी । काय हळू भारी तये ठायी ॥४॥
तुका म्हणे गीती गाऊनि गोविंद । करू ब्रह्मानंदु एकसरे ॥५॥
अर्थ
देवा आता आमचे पोट ब्रम्हानंद भोजनाने तृप्त झाले आहे आणि हेच भोजन तुम्ही इतर भक्तांना ही पुरवावे. पंगतीला बसलेल्या भक्तांना महाराज म्हणतात की तुम्ही हा ब्रम्हानंद भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी तातडी करू नका कारण याने तुमचा जन्म-मरणाचा श्रम नाहीसा होणार आहे, पुढे ते राहणारही नाही. ब्रह्मानंद भोजन पंगतीत उदार असे साधुसंत वाढण्याचे काम करत आहेत त्यामुळे आपण आपल्या स्थितीत बसून रहावे, शांत बसावे. संतांनी उपदेश केल्याशिवाय लोकांना परमार्थ कळणार नाही म्हणून तुम्ही उपदेश ग्रहण करावा. जर सामान्य लोकांनी संतांनी केलेल्या उपदेशाचे ग्रहण केले नाही तर त्यांना संसार दुःखात एकटे राहावे लागेल. नावेचा आणि नावेत असलेल्या सर्व वस्तूंचा भार पाण्यावर असतो त्यामुळे नावेत हलके भारी असे काही वाटत नसते त्याप्रमाणे संतांवर आपला सर्व भार सोपवावा. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही या गोविंदा चे गीत गाऊन सगळीकडे ब्रह्मानंद करू.
अभंग क्र. १४१६
एका हाती टाळ एका हाती चिपिळया । घालिती हुंबरी एक वाहाताती टाळिया ॥१॥
मातले वैष्णव नटती नाना छंदे । नाही मोक्षपदी चाड भजनी आवडी ॥धृपद॥
हाका अरोळिया गीतवादे सुखसोहळे । जाय ते न कळे केव्हा रजनी दिवस ॥२॥
तीर्थी नाही चाड न लगे जावे वनांतरा । तुका म्हणे हरीहरात्मकची पृथिवी ॥३॥
अर्थ
वैष्णवांच्या मेळ्यात कोणाच्या हातात टाळ असतो, तर कोणी टाळ्या वाजवीते, तर कोणी आनंदाने हुंबरी घालते. वैष्णव भक्ती सुखाने मस्तीत आले असून ते नानाप्रकारे नटलेले आहे. त्यांना मोक्ष पदाची आवड नसून केवळ भजनाची आवड आहे. हे वैष्णव देवाला हाक आरोळ्या देत हरी गीत गातात आणि विविध प्रकारचे वाद्य लागून भजन-कीर्तनाचे सुख सोहळे भोगतात. त्या आनंदात त्यांना रात्र आणि दिवस कोठे जाते हे कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात या वैष्णवांना कोठे तीर्थयात्रेला जावे किंवा वनात जाऊन तप करावे अशी आवड नसते त्यांना सर्व पृथ्वी हरीहरात्मक झाली आहे असे वाटते.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















