आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

4. महर्षी अगस्त्यऋषी संपूर्ण चरित्र भाग १, (१ ते ५)
MAHARSHI AGASTYA RUSHI (RISHI) CHARITRA BHAG 1
…….पूर्वाश्रमीचे मांदार्य नांव असलेले, त्यांच्या अगाध कर्तुत्वाने प्रभावित होऊन महर्षी विश्वामित्रांनी त्यांचे अगस्त्य ऋषी असे नामाधिकरण केले.अगस्त्यऋषींचे पूर्वायुष्य उत्तरेकडे असलेल्या वसिष्ठ आश्रमात गेले.उपनयनविधीनंतर त्यांच्या विद्याभ्यासाला प्रारंभ झाला.अतिशय तीक्ष्ण बुध्दी,चौकस दृष्टी आणि ……..
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
महर्षी अगस्त्यऋषी ! !
!!! प्रस्तावना !!!
!! नमस्कार !!
आतापर्यंत मी ३८ निरनिराळ्या विषयांवर व्यक्तीरेखा रेखाटून आपल्या समोर प्रस्तुत केल्या आहेत.आणि आपण सर्वांनी भरभरुन कौतुक करुन मला प्रोत्साहित केले.त्यामुळे मला ऊर्जा मिळत गेली आणि मी लिहित गेले.
आता एक आगळा वेगळा विषय घेऊन आपल्या समोर येत आहे.नेहमी प्रमाणे आपल्या क्रीयाप्रतिक्रीया अपेक्षित
चुकभुल क्षमस्व!
पूर्वाश्रमीचे मांदार्य नांव असलेले, त्यांच्या अगाध कर्तुत्वाने प्रभावित होऊन महर्षी विश्वामित्रांनी त्यांचे अगस्त्य ऋषी असे नामाधिकरण केले.अगस्त्यऋषींचे पूर्वायुष्य उत्तरेकडे असलेल्या वसिष्ठ आश्रमात गेले.उपनयनविधीनंतर त्यांच्या विद्याभ्यासाला प्रारंभ झाला.अतिशय तीक्ष्ण बुध्दी,चौकस दृष्टी आणि विचारी मन असल्यामुळे ऋग्वेद व वैदिक शास्रां बरोबरच आयुर्विज्ञान,धनुर्विद्या,वेद,वेदांग आणि भौतिकविज्ञान इत्यादी ज्ञान त्यांनी फारच थोड्या कालावधीत आत्मसात केल्यानंतर ज्ञातीबंधू वसिष्ठांचा निरोप घेऊन ते हिमवान प्रदेशाकडे पायी वाटचाल करतांना मार्गात लागणारे रानटी मनुष्य वस्त्यांमधे वैदिक विचारांचे सिंचन करत,पुढे पुढे जात राहिले.
ऋषींच्या कार्याचं पुनरुजीवन करण्यासाठी वैदिक ऋषींच्या सर्वसम वेक्षक मार्गाने अगस्त्य ऋषींना जावे लागले.त्यासाठी त्यांना इंद्रदेवाचा शाप व राक्षसांचे आव्हान स्विकारावे लागले. ते पूर्वाश्रमीचे देवलोकातील अग्निदेव असलेले,त्यांच्याकडून न झालेल्या अपराधाबद्दल इंद्राने त्यांना शाप देऊन मृत्युलोकी पाठवले.पण त्यांनी कोणताही वाईट विचार मनाला शिवू न देतां सकारात्मक विचाराने आपल्या कार्याची दिशा ठरविली.त्याप्रमाणे वन्यजीव व नर भक्षक लोकांना नरभक्षण करण्यापासून परावृत्त करुन,शेती कशी करावी हे शिकवले.आणि पूर्वीचे नरभक्षक शाकाहारी बनवले.लक्षावधी विद्यार्थी, स्नातक तयार करुन सार्या भारतवर्षात पसरवून त्यांचेकडून विकासाचे कार्य करवून घेतले.
कालकेय सारख्या भयंकर दानवां चा नाश करण्यासाठी त्यांनी विशाल सागर प्राशन करुन त्याला नष्ट केले.त्यांचे हे अफाट कर्तृत्व बघून इंद्रदेवाने देवलोकात परत येण्याविषयी केलेली विनंती नाकारुन,आपले सारे जीवन लोक कल्यानार्थ झिजवले. मारण्यापेक्षा विचारांनी परिवर्तन करण्यावर त्यांचा जास्त भर होता.
वयाच्या ६० व्या वर्षी त्यांना प्राप्त झालेलं तारुण्य भोगवादासाठी न वापरतां आणखी कठोर तपसाधनेची गती आणि व्याप्ती वाढवण्याच्या कामी लावली.साठी उलटल्यावर ते विवाह बंधनात अडकल्यावर सुध्दा कितीतरी वर्षे पत्नीसुखापासून ते अपर्शित व संयमी राहिलेत.विवाहामुळे त्यांच्या कार्यात किंचितही बाधा आला नाही.
एक दिवस त्यांना कामज्वर उत्पन्न झाल्यावर ऐनवेळी पत्नी लोपमुद्रेने होणार्या अपत्याच्या भविष्यासाठी भरपूर द्रव्य आणण्याची विचित्र अट घातली.वास्तविक ही भावना लोपमुद्रेच्या मनांत इंद्रदेवाने निर्माण केली होती. कारण त्यांच्याकरवी दानवांचा राजा इल्वालाचा अंत करायचा होता.ते पांच राज्यांना सोबत घेऊन इल्वालाकडे धना ची मागणी करण्याकरीता गेले असतां, त्यांना व सोबतच्या पांच राजांना संपवण्यासाठी,कपटाने त्या सर्वांच्या थाळीत विषयुक्त मासांहारी पदार्थ वाढलेले त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणून कधीही मांस भक्षण न केलेल्या या महान ऋषीने सर्वांच्या थाळीतील ते मास स्वतः भक्षण करुन त्या पांच राजांचे प्राण रक्षण केले.ते केवळ सिध्द साधक,तपस्वीच नव्हते तर अस्रशस्रयुक्त उत्तम,समर्थ योध्दाही होते. इंद्राच्या योजनेनुसार इल्वाला राजाचा शेवट केला.पेदियाल पर्वतातील तामिळ प्रातांत तामिळ भाषा अवगत करुन पुरातन भाषेचं व्याकरण सिध्द केल.तिथेच त्यांनी नाडीग्रंथाची निर्मिती केली.
दक्षिण भारतात मोठा दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी अनेक नद्या जोडून ब्रम्हगिरी ते तामिळ प्रातांपर्यत जलस्तोस्र निर्माण करुन लोकांची समस्या सोडवली
शूरपद्म युध्द करुन तो नमल्यावर तो अगस्त्यांच्या तपःसाधनेत सहभागी झाला.रावणनाशासाठी त्यांनी रामाला दिव्यास्रे,शस्रे दिली.
कालकेय संहार,इल्वाला राजाचा नाश,प्राशन केलेला सागर,नाडीग्रंथ, गाजवलेला पराक्रम,वेळोवेळी मिळवले ल्या अनेक सिध्दी या सर्वांमुळे अगस्त्य ऋषी पुजनीय आहेत….
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ७-११-२०२१.
!!! अगस्त्यऋषी !!!
भाग – १.
अगस्त्यऋषी सुमारे ९,५०० वर्षा पूर्वी होऊन गेलेत.त्यांचा संदर्भ आला की त्यांची दोन कार्ये प्रामुख्याने दृष्टीसमोर येतात.पहिलं समुद्र प्राशन व दुसरे नाडी ग्रंथ! नासिक जिल्ह्यातील प्रवरा नदी काठी त्यांचा आश्रम होता.त्या परिसरात आजही अतिप्राचीन काळातील धातूंची भांडी,मनुष्यांचे सांगाडे सांपडतात. अगस्त्यांचे पूर्वीचे नांव मांदार्य होते.
आज एकटेच अगस्त्यऋषी अस्वस्थ, व्यथीत मनाने आजुबाजुचे भान हरपून सागरकिनारी बसले होते.आणि दोन तपातला सारा इतिहास त्यांच्या मनःचक्षु पुढे साकार होऊ लागला.वाराणसी जवळील आश्रमात तीन दिवसांचे शिबिर आयोजित केले होते.छोट्या मोठ्या पाठ शाळांमधून तरुण विद्यार्थी व कांही निवडक आचार्य शिबिरासाठी आले होते. या तीन दिवसांत विविध विषयावर, वेदोपनिषदांसह शास्रार्थ चर्चा झाली. अनेकांनी आपापले मतप्रदर्शन केले. आज निरोपाचा समारोप करतांना अगस्त्य म्हणाले,शेकडो वर्षापासून संस्कृतीचे जतन करण्यासाठी अनेक ऋषींनी आत्मसमर्पण केले.अत्री,कश्यप, भृगू,अंगिरस,कौशिक ऋषींच्या ३५-३५ पिढ्यांनी या भूमित तप केले.त्यांच्या प्रत्येक पिढीतील कित्येकांनी संस्कृती कार्य करतांना अनेक आव्हानांना तोंड देत,मानवी संस्कृती विकसित केली पण पुढे सातत्य राहिले नाही.त्यामुळे पुनरु जीवन करण्याचे काम आपल्या सगळ्यां ना करायचे आहे.
शेकडो वर्षाच्या त्यागातून,बलिदाना तून आतां कुठे आर्यवर्त निर्माण झाला. पुरु,जनक,काशी,मिथिला,अयोध्या सारखी राज्ये निर्माण होऊन सुव्यवस्था, सुसंस्कृत समाजव्यवस्था अस्तित्वात आली,परंतु उर्वरीत पूर्व पश्मिम,दक्षिण सागरापर्यंतचा भाग शेकडो वर्षापासून संस्कृतीपासून वंचित राहिला आहे. त्यांच्याच उध्दाराचं काम आपल्याला करायचं आहे.आचार्य भद्रदेवाकडे वळून म्हणाले,आपण गेली ३-४ दशकं या काशीक्षेत्री अध्यापनाचे कार्य केले.शेकडो विद्यार्थी तयार झालेत,त्यांनी संस्कृती संवर्धनासाठी काय केले?मी गंगोत्री, रुद्र प्रयाग आणि आता ही वाराणसी पर्यत पायी प्रवास केला.अनेक गावं वस्त्या फिरलो पण कुठेही एकही स्नातक कार्य करतांना दिसला नाही.
भद्रदेव आपल्याला कांही कार्य करायचे असेल तर,आकाशातील देव नव्हे तर,मनुष्य रुपाच्या माध्यमातूनच करावे लागेल.नाहीतर सारे भोगवादी बनतील.वाईट गोष्ट तात्काळ उचलल्या जाते.मानवता जपणारी संस्कृती कष्ट करुनच रुजवावी लागते.अगस्त्यांचे विचार ऐकून,समोर बसलेल्या तरुण स्नातकांना वास्तव्याची जाणीव झाली.हे कार्य करतांना अनेकांना आपले प्राण गमवावे लागले,परंतु आता नाही. नियोजितपूर्वक काम करण्यासाठी काशी राजाच्या सहकार्याने एका यज्ञाचे आयोजन करण्याचे मी ठरवले आहे.
अगस्त्यऋषी आपल्यासोबत अनेक वाद्यांसह वादक,तरुण स्नातक, पुरोहित,तसेच जत्थ्याच्या दोन्ही बाजूंनी भाला,ढाल,तलवारी,धनुष्यबाण घेतलेले
काशीराजाचे पदाती सैनिक अरण्यात आले असतां,आपल्यावर आक्रमण करायलाच येत आहेत असे वाटून झाडा वर लपून बसलेल्या अरण्यवासियांनी एकाएकी तीरांचा वर्षाव सुरु केल्यामुळे सर्वांची धावाधाव झाली.अंगात तीर घुसु लागले.संरक्षण दलांनही झाडावर लपून बसलेल्यांवर शस्रांचा मारा केल्याने तेही खाली कोसळू लागले.अगस्त्यऋषींनी संरक्षण तुकडी केवळ धाक दाखवण्या साठी आणली होती.संहार नव्हता करायचा.म्हणून ओरडून शस्रें चालवण्या स मनाई केली.आज्ञेसरशी दोन्हीकडच्या लोकांनी शस्रमारा थांबवला.लगबगीने घायाळ रानटी अरण्यवासीयांजवळ जाऊन अंगात घुसलेले तीर काढले. त्यांच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला. सोबतच्या वैद्यांनी तात्काळ उपचार सुरु केला.ते स्वतःशीच पुटपुटले,मोठ्या प्रमाणावर सहिष्णुता प्रस्थापित करतांना थोडाफार संघर्ष आलाच!
अगस्त्यऋषी अनेक वनातून फिरलेले असल्यामुळे त्यांना वनवासीयां ची भाषा अवगत होती.ते अरण्यवासीयां ना म्हणाले,आम्ही तुमच्यावर किंवा अरण्यावर इजा करण्यासाठी आलेलो नसून तुमच्या देवांना नमस्कार करायला आलोय.तुमचं सर्वांच सहकार्य व प्रेम हवय!या खाली सर्वजण!मग त्यांनी आपल्या सैनिकांना इशारा केल्याबरोबर आपापली सर्व शस्रे जमीनीवर टाकली.हे पाहून,व आपल्या जखमी लोकांवर उपचार होत असल्याने त्यांचे भय कमी होऊन,बिचकत बिचकत वृक्षांवर लपलेले अरण्यवासी खाली उतरुन एका बाजूला उभे राहिले.अगस्त्यांच्या प्रेमळ वागण्याने पुढे जाण्यासाठी त्यांना वाट दिली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ७-११-२०२१.
!!! अगस्त्यऋषी !!!
भाग – २.
थोड्या वेळात तो यज्ञीय जत्था एका मोकळ्या जागेत आला.गेल्या दोन दिवसाच्या अनेक कोसांच्या प्रवासाने सारे थकले होते.राहुट्या उभारुन,अन्न तयार करुन भोजन झाल्यावर सार्यांनी अंग टाकले.दुसर्या दिवसाच्या यज्ञाच्या नियोजनासाठी एका प्रशस्त राहुटीत जेष्ठ श्रेष्ठ व मुख्य लोकं जमून चर्चा करु लागले.हवनाचा पहिला मान भगवान विष्णूंना देण्याचे ठरवले त्यासाठी अध्वर्यू आणि होता यांची नियुक्ती झाली.”ब्रम्हा” च्या नियुक्तीसाठी सर्वानुमते, तपसामर्थ्य, विद्वत्ता,त्यागवृत्ती विशेष म्हणजे ढेपाळलेली संस्कृती पुन्हा प्रस्थापित करण्याची कळकळ असणार्या अगस्त्यांना ब्रम्हपद स्विकारण्याची विनंती केली.शिवाय त्यांना अनेक भाषा अवगत असल्यामुळे हवनानंतर रानटीलोकांना संबोधीत करायची विनंती केली.सर्वांच्या प्रेमळ आग्रहाने ब्रम्हपद स्विकारुन अगस्त्य म्हणाले, सुविचारांच्या सततच्या मार्याने सुपरिवर्तन होऊन स्वयंशासित समाज निर्माण होऊ शकतो आणि आजच्या यज्ञानाचा मुळ उद्देश हाच आहे.’यज’ म्हणजे जोडणे! समाजापासून दूर असणार्या या लोकांच्या मनावर बिंबवले की,त्यांच्या बुध्दीवर चढलेली जळमट दूर होतील.
तेवढ्यात एका स्नातकाने येऊन सांगीतले,कांही वन्यलोकं ४-५ जखमी तरुणांना घेऊन येत आहे.सैनिकांना शस्रे खाली टाकण्याची खूण केली.त्या अरण्य वासी जखमी तरुणांना आपल्या राहुटीत घेऊन गेले.पाव घटकेतच ते तरुण पूर्ण बरे होऊन अगस्त्यांच्या मागोमाग बाहेर आलेत.व उद्या सकाळी त्यांना येण्यास सांगीतले.सारे स्नातक,पुरोहित,वैद्य चकित होऊन हे कसं घडल,आश्चर्याने बघतच राहीले.
दुसर्या दिवशी सोबत आणलेल्या विटांनी यज्ञवेदी बांधली.गोमयनं(शेण) सारवण झाल्यावर बायांनी सुबक रांगोळ्या काढल्या.यज्ञवेदीवर ओंडके आणि गवताच्या सहाय्याने उंच स्तूप उभारला.यज्ञवेदीच्या बाजूने चार स्वाहाकार,त्यांच्या समोर ब्रम्हपद धारण केलेले अगस्त्यऋषी स्थानापन्न झाले. उगवत्या सूर्याच्या साक्षीने अग्नि प्रज्वलीत केला. अन्यधान्य विधीनंतर सूर्याची प्रार्थना करुन,पहिली आहुती विष्णूंना आव्हान करण्याची पडली.विष्णूं ना आव्हान करुन अनेक आहुत्या यज्ञवेदीत पडल्या.विष्णूयागाची शेवटची आहूती पडल्यावर सारे उच्च स्वरात अखेरचा मंत्रघोष म्हणू लागले….
“समानी व आकूतिः समाना ह्रदयानि वः।
समानमस्तु वोमनः यथा व सुसहासति।।” नंतर सर्वेत्र सुखिनः सन्तु… म्हणून कल्याण चिंतले गेले. “ब्रम्हा” रुपात असलेले अगस्त्य व कालचे त्यांचे अनुभव याने भारावून न कळत सारे अरण्यवासी त्यांचेकडे आकृष्ट झाले.या लोकांपासून आपल्याला भय नाही याची खात्री झाल्याने निश्चिंतमनाने कांही अंतरावर निर्भयपणे सारे अरण्यवासी बसले होते.
हवनविधी पूर्ण झाल्यावर अगस्त्य ऋषी बोलण्यास उभे राहिले.म्हणाले, हा यज्ञ फक्त आणि फक्त तुम्हा लोकांसाठी, समजण्यासाठी केला आहे.मनुष्यमात्रांना प्रेमाने जोडण्यासाठी,परस्परांमधे स्नेह संबंध निर्माण करण्यासाठीच आहे.यज्ञा चा खरा अर्थ उपस्थितांच्या मनात रुजवला.आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून परमेश्वराचं अस्तित्व प्रत्येक व्यक्तीच्या ह्रदयात असते हे छोट्या छोट्या गोष्टीतून अरण्यवासीयांना समजेल अशा त्यांच्या भाषेत समजावले. आणखी पुढच्या नऊ दिवसांत त्यांना थोडं थोडं समजावून परिवर्तन घडवायचे होते.प्रवचन संपल्यावर त्याच वन्य लोकां बरोबर त्यांना अधिक आत्मियता, जवळीक वाटावी या उद्देशाने,सैन्य न घेता सर्वजण त्यांच्या वस्तीवर गेलेत.
हां हां म्हणतां नऊ दिवस कसे संपले कुणाला समलेही नाही.दुपारी यज्ञकर्म, हवन,दुपारपूर्वी वनवासीयांच्या वस्तीवर जाणे,त्यांच्याशी हितगुज करणे,दुपारचं भोजन,विश्रांती,सायंप्रार्थना,अग्निहोत्र, यज्ञीय लोकं एकभुक्त असल्यामुळे थोड्या गप्पा गोष्टी झाल्यावर,दिवसभरा च्या भरगच्च कार्यक्रमाने थकून लवकरच सारे निद्राधिन झाले.दुसर्या दिवशी यज्ञा ची पूर्णाहुती!या नऊ दिवसांत अगस्त्यां नी आपल्या ओजस्वी वाणीने,देवाला बळी देणे,माणसानं माणसाला मारुन खाणे,दुसर्याचं धन लुबाडणे,चोरी करणे हे सर्व कसं निशिद्ध आहे हे समजावून सांगीतले.नरबळी ऐवजी प्राणीबळीचा पर्याय त्यांना समजावून सांगीतला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-११.२०२१.
!!! अगस्त्यऋषी !!!
भाग – ३.
आचार्य अगस्त्यांनी नरबळी ऐवजी प्राणीबळी सुचवल्याबद्दल त्यांचा शिष्य अक्षयने विचारले.आचार्य प्राणीबळी ऐवजी शाकाहार,फळाहार कां नाही सुचवला?मंद हसत समोर बसलेल्या प्रगाथा,अक्षय आणि शंख या तिन्ही शिष्यांकडे बघत म्हणाले,एकदम बदल केला तर परिणाम विपरित होण्याची जास्त शक्यता असते.आज ते नरमांस खातात,एकदम शाकाहारावर आणले असते तर…सहस्रो वर्षाचे संस्कार काढायला वेळ लागेल.प्रथम नरमासां पासून मासांपर्यंत आणि मग त्यांना समज आली की,शाकाहारावर आणावं लागेल.
शंखने वेगळाच प्रश्न उपस्थित केला आचार्य!अनेक विद्या,युध्दशास्रातील गहन मंत्र,तंत्र अंकित असूनही आज पर्यंत इतके बळी कां जाऊ दिलेत?शस्र धाकाने बळी वाचवू शकला असतां… दंडशाही किंवा दडपशाहीने निर्माण केलेले कायदे फार काळ टिकत नाही शंखा.मी जर त्यांना मारण्यास शस्रांचा आधार घेतला असतां तर,विद्वेष,विद्रोह वाढला असता आणि मला अपेक्षित संस्कृतीची स्थापना करुं शकलो नसतो. या असंस्कृत लोकांमधे विचारांनीच परिवर्तन साध्य होते.
त्यांंचे बोलणे सुरु असतांनाच एक सैनिक दोन अरण्यवासीयांना घेऊन आला.त्यांच्यापैकी गेमू नावाच्या अरण्य वासी अश्रूपूर्ण नेत्राने म्हणाला,देवा! आम्हाला राक्षसांपासून वाचवा.आताच वस्तीवर येऊन खुपजणांना मारलं.आम्ही तुमच्याकडे,तुम्ही आमच्या वस्तीवर येता म्हणून ते तुम्हास शत्रू मानतात.तुमच्या पासून दूर राहायला सांगतात.काय करावं आम्ही?ठीक आहे चिंता नका करु.उद्या यज्ञाची सांगता झाली की,संध्यासमयी तुमच्या वस्तीवर येतो.
मध्यरात्री यज्ञस्थळी हाहाकार माजला.रक्षक सैन्य सजग व्हायच्या आंत धिप्पाड रानटी लोकांनी यज्ञीय लोकांवर आक्रमण केल.१०-१५ राक्षसांनी रक्त मासांचे गोळे यज्ञकुंडात टाकले.सर्वत्र नासधूस केली.यज्ञवेदीची मोडतोड करुन स्तुपस्तंभ तोडून टाकला.राहुट्या उखाडल्या.भीषण आरोळ्या ठोकत सर्वां ना मारायला सुरुवात केली.किंकाळ्यांनी सारं वन आक्रंदून गेलं.वाट मिळेल तिकडे सर्वजन सैरावैरा पळू लागले. कोलाहल ऐकून समाधीस्त असलेले अगस्त्य बाहेर आले.त्यांनी आपले दिव्य धनुष्य हाती घेतले.तोवर रक्षक सैन्य भानावर येऊन तेही शस्रसज्ज झाले.उच्च स्वरात अगस्त्य सैनिकांना म्हणाले, हे राक्षस संस्कृती विघातक आहे.उन्मतांना ठार करणे धर्मसम्मत आहे.चालवा शस्र.. अगस्त्यांच्या धनुष्यातून सपासप बाण सुटु लागले.सैनिकही मागे राहिले नाही. १०-१२ अक्राळ विक्राळ राक्षस भूमीवर कोसळले.भयभीत सगळ्यांना शांतवत आचार्य म्हणाले,नशीबाने जीवित हानी झाली नाही,फक्त राहुट्याच उध्वस्त झाल्यात.अग्नित राहुट्या धगधगत असल्यामुळे सारा परिसरच जणूं अग्निकुंड बनला होता.
कांही पुरोहित आचार्यांजवळ येऊन म्हणाले,उद्या यज्ञाचा शेवटचा दिवस आणि हे विघ्न आले.आतां यज्ञिय देवांची शांती…कांही गरज नाही.पापपुण्याची मुळीच काळजी करुं नका.आपला यज्ञ यशस्वी झाला आहे.यज्ञकुंडाकडे बघा किती धगधगतोय,हीच पुर्णाहुती…उद्या पहाटेच आपण काशीराज्याकडे निघणा आहोत.नरभक्षिय प्रदेशात यज्ञीय परिक्रमेची मुहूर्तमेढ रोवून पहाटेची वाट न बघतां,सारं सामान बैलगाड्यांमधे भरुन मजल दर मजल करीत अगस्त्यां च्या काशी आश्रमात येऊन पोहोचले तेव्हा पश्चिम सागराकडून आलेला एक अभ्यागत अगस्त्यांच्या प्रतिक्षेत थांबला होता.
अक्षय त्याला घेऊन कुटीत आला. तो घाबरलेला पाहून कांही तरी कटू वार्ता असावी याची जाणीव आचार्यांना झाली.
तो खिन्नपणे सांगू लागला,मी धौम्यऋषी शिष्य आयुष,पश्चिम प्रातांतून आलोय. ऋषीवर,पश्चिमसागर मोठ्या संकटात आहे.दानव किनारपट्टीवरील सागरीजनां ना उपद्रव देतातच,पण नुकताच ह्रदयद्रावक प्रसंग धौम्यऋषी आश्रमात घडलेला सांगीतला.मध्यरात्री दोन स्नातक काठी व दीप घेऊन गस्त घालीत असतांना कांही मशालधारी वेगाने येतांना त्यांना दिसले.कुणी वाटसरु की राक्षस या विचारांत असतांनाच कांही कळायच्या आंत,ते मशालधारी आश्रमात घुसून विध्वंशास सुरुवात केली.नंग्या तलवारी चालवत नुसता हौदोस घातला. कित्येच निरपराध आश्रमवासी त्यांच्या अश्वांच्या टापेखाली चिरडल्या गेले.सर्वी कडे एकच आकांत माजला.कित्येक मुर्च्छित झाले,काही सैरावैरा पळू लागले. कांहींनी त्या कालकेय दानवांना अडवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ!धौम्यऋषींच्या आश्रमात राहून सागर किनारी तप करणारे तपस्वी ब्राम्हण त्यांच्या हाती सांपडले.त्यांच्या शिखा पकडून फरफट त्यांचे रक्तबंबाळ शरीर अश्वावर टाकून आले तसे निघून गेले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! अगस्त्यऋषी !!!
भाग – ४.
ऐन मध्यरात्री मानवतेचे धिंडवडे निघालेला अस्ताव्यस्त आश्रम हुंदके देत होता.आयुष पुढे म्हणाला,आतांपर्यत दोन आश्रमात अशा घटना घडल्या. ऋषीवर!आपलेही आश्रम त्या परिसरात असून आपलेही तपस्वी तिथे कार्यरत आहेत,म्हणून ही कटू वार्ता आपल्या कानावर घालण्यासाठी आलोय.धौम्य मुनींनी माझ्यासारख्या स्नातकांकरवी सावध करण्यासाठी इतर अनेक आश्रमात पाठविले आहे.ऐकुन अगस्त्यां ना अतिशय धक्का बसला.ब्राम्हणा खेरीज आणखी कुणाकुणाला नेल?की फक्त ब्राम्हणांनाच नेल.
अगस्त्य खंतावून गेले.त्यांनी हाती घेतलेल्या कार्यापुढे हे भीषण संकट उभं राहिलं.संस्कृती प्रसारक ब्राम्हणांना असे निवडून मारल्या जात असेल तर कसे परिवर्तन आणायचे?यज्ञीय कार्य कुणी करायच?आणखी किती आहुत्या या कार्यासाठी पडणार?आयुषला निरोप देत अगस्त्य म्हणाले,लवकरच वसिष्ठऋषींशी चर्चा करुन या आव्हानावर कशी मात करायची हे ठरवून धौम्य मुनींना भेटायला येत असल्याचा निरोप सांग.
आयुष निघून गेल्यावर अक्षयने विचारले,आचार्य! पश्चिम सागरतटावर कोणतं संकट आहे?कालकेय दानव कोण आहे? तो फार मोठा इतिहास आहे देवांशी संबंधीत…कालकेय दानवांच आव्हान एक ना एक दिवस उभं राहणारच होतं.आचार्य, मागेही आपण देवाचा उल्लेख केला होता.देवांचा संबंध काय?देव तर आकाशात….अक्षय तो फार मोठा विषय आहे.निवांतवेळी तुला सारं सांगेन…
आज गंगाजलांत अर्ध्य देत वेळ टळून गेला तरी ते बाहेर आले नाहीत. त्यांचे १५-२० शिष्यगण प्रतिक्षेत उभे होते.थोड्या वेळाने नेत्र उघडून सूर्यदेवा ला मनोभावे वंदन करुन धूतवस्राचा पिळा खांद्यावर टाकून शिष्यांसह कांही न बोलतां आश्रमाकडे निघाले.कांही अंतर चालून आल्यावर गभीरपणे शिष्यां ना म्हणाले,पश्चिम सागरतट धोक्यात आहे.आपल्याला तिथल्या कार्याची गती वाढवावी लागेल.गेल्या १-१॥ वर्षापासून अगस्त्यांनी त्या भागात स्नातक पाठवून, प्रसंगी स्वतः जाऊन कश्यपऋषींच्या सह कार्याने वायव्य प्रांतापासून पश्चिम सागर तटापर्यंत वैदिक कार्याचा विस्तार पसरविणे अविरत सुरु होते.तिथल्या लोकांचं जीवनमान,विचारपरिवर्तन, जीवनात सात्विकता यायला सुरुवात झाली होती.कार्य रुजवणं आणि कार्याची समज येणं ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. आपल्याला नुसता धावणारा, आज्ञा पालन करणारा समाज निर्माण करायचा नाही तर,गतिशील व मानवातावादी करायचा आहे.त्यासाठी वैदिक विचारांचा प्रसार पश्चिम परिसरात जास्त जोमाने करावा लागेल.सातत्य ठेवावे लागेल.
धौम्यऋषी शिष्य आयुषने आणले ल्या वार्तेने अगस्त्य स्वैरभैर झाले होते. म्हणून उत्तरेकडील बंधू वसिष्ठांना भेटण्यास त्यांच्या आश्रमात पोहोचले होते.योगायोगाने महर्षी विश्वामित्रही तिथे होते.कुटीमधे तिघांची चर्चा ऐन रंगात आली होती.रात्रीचा तिसरा प्रहर संपला तरी त्यांच्या चर्चेत खंड नव्हता.कुटीचं दार उघडून वसिष्ठ पत्नि उर्जाने दुध देऊन निघून गेली.दुध पितांनि विश्वामित्र म्हणाले,पूर्वीच्या वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची आठवण झाली.तिने वसिष्ठां च्या कार्यात केवढी मोलाची साथ दिली होती.ही उर्जाही तशीच नावाप्रमाणे आहे. भरुन आलेले नेत्र पुसत विश्वामित्र म्हणाले,त्या वसिष्ठांची महानता मी लवकर ओळखू शकलो नव्हतो.पूर्वीच्या वसिष्ठांचा फार द्वेष करीत होतो.खुप वाईट कृत्ये केलीत.कल्माषपाद राजाला माध्यम बनवून एक कृत्या म्हणजे दुष्कृत्य करणारी विनाशक शक्ती त्यांच्या वर सोडली होती.त्यांची कामधेनू पळवली होती.त्यांचे पुत्र मारले तरी देखील त्या महात्मा वसिष्ठ व त्यांची धीरोदत्त पत्नी अरुंधतीने कधीही माझेशी वैर केलं नाही.वयोवृध्द सत्तरी पार केलेल्या विश्वामित्रांच्या नेत्रातून अविरत अश्रू ओघळत होते.एवढे वयस्कर असून देखील तरुणालाही लाजवेल एवढी कार्य तत्परता त्यांच्यात होती.वैदिक संस्कृती चा प्रसार ते राज्यातून वनातून फिरत करत होते.कठोर तपश्चर्येने स्वतःची एक जीवनप्रणाली अर्थात प्रतिसृष्टी निर्माण केली होती.ऋषीय संस्कृती अंगीकारले ल्या सहस्रो जनांचा एक आगळा वेगळा समाज निर्माण केला होता.पूर्वीच्या वसिष्ठ,अरुंधतीच्या आठवणीने ते भाव विवश होत होते.
वसिष्ठकुळाची परंपरा फार मोठी आहे.वसिष्ठ आयव,वसिष्ठ चौकितानेय, वसिष्ठऋषी,वसिष्ठ देवराज,वसिष्ठ भोजराज,वसिष्ठ सुवर्चस आणि वसिष्ठ ब्रम्हर्षी!पूर्वी याच वसिष्ठ व पत्नी अरुंधतीशी विश्वामित्रांचा संबंध आला होता.आताचे वसिष्ठ समकालिन अगस्त्य बंधू व पत्नि उर्जा होय.हा सर्व इतिहास या दोन बंधूंनाही ज्ञात होता.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! अगस्त्यऋषी !!!
भाग – ५.
सध्याचे वसिष्ठऋषी,बंधू अगस्त्य व महर्षी विश्वामित्र शितल चंद्रप्रकाशात बाहेर फिरायला निघालेत.चालता चालतां अगस्त्य म्हणाले,भोगवादाची कीड जेव्हा मनुष्यामधे शिरते तेव्हा प्रथम त्याची जाणीव बोथट होऊन परमेश्वर प्रतिभेची आकलन क्षमताच गमावून बसतो.यात तृप्ती,मनःशांती तर मिळत नाहीच,पण स्वतः दुष्टचक्रात अडकून आयुष्याचा सत्यानाश करुन घेतो.खरय!मीही राजसी आणि तामसी वृत्तीची कास धरली होती.त्यामुळेच माझेकडून बरेच वाईट कृत्ये घडलीत.परंतु पूर्वीच्या वसिष्ठांमधे पराकोटीची सात्विक वृत्ती बघून नंतर मी त्यांचे अनुकरण केले. आज मी तृप्त आहे.
वसिष्ठ म्हणाले,महर्षी! यथा राजा तथा प्रजा!हिमवान प्रदेशातील राजा जनक व त्याची मिथिला नगरी याच मार्गाचे अनुसरण करीत आहे.मागील वसिष्ठऋषींनी अशीच एक स्वयंशासित राज्यव्यवस्था अपार तपातून प्रत्यक्षात आणली होती.आणि ती राज्यव्यवस्था अर्थात “कामधेनू” उध्वस्त करण्याचा मी प्रयत्न केला होता.ती कामधेनू वसिष्ठांनी इक्ष्वाकू कुळात अयोध्येकडे ही स्वयं शासित प्रणाली कामधेनू सोपवली होती. हा सारा इतिहास अगस्त्यांना माहित होता.अजिंक्य राज्य म्हणजे अयोध्या… इंद्राच्या अमरावती नगरीप्रमाणे राजा दशरथाने शोभिवंत केले होते.रघू,अज, दिलीप या पूर्वजांची परंपरा या तरुण दशरथाने पुढे चालवली.मनूऋषींच्या मार्गदर्शनाखाली ही सुंदर अयोध्या नगरी निर्माण केली होती.प्राचिन वसिष्ठऋषी व इतर ऋषींच्या विचाराने इक्ष्वाकूकुल राज्ययंत्रणा चालवित असत.अगस्त्य म्हणाले,या प्रबळ व सैन्याची स्वतंत्र व्यवस्था असणार्या अयोध्येचं आपल्या कार्यात निश्चितच सहकार्य मिळेल.तिघेही बरच अंतर चालल्यावर माघारी फिरले. विश्वामित्र म्हणाले, वसिष्ठा! “कण्वन्तो विश्वम् आर्य” ही म्हण सत्यात आणायची असेल आणि वैदिक संस्कृती या संपुर्ण भूमीवर प्रस्थापित करायची असेल तर सुनियोजन आवश्यक आहे.या कार्यात देवांचही सहाय्य मिळेल किंबहुना देवांनाच या कार्यात अधिक रस आहे. म्हणून तुम्ही त्वरीत देवेंद्राकडे संदेश रवाना करावा.
नंतर विश्वामित्र अगस्त्यांना म्हणाले,दक्षिण सागरापर्यत पसरलेल्या घनदाट अरण्यात दुष्ट राक्षसांनी आपलं बस्तान बसवलं आहे.आपण सामान्य अरण्यवासियांना यज्ञात सहभागी करणे, कित्येकांनी नरभक्षण सोडून प्राणीभक्षण करुं लागले. हळूहळू शेतीकडे पण वळतील.त्यासाठी सतत त्यांच्यामधे जाऊन यज्ञ केले पाहिजे.पण हे दुष्ट राक्षस यज्ञामधे विघ्न आणतात,ऋषी, ब्राम्हण,पुरोहितांना ठार मारतात. सुसंस्कृत,तृप्त,समृध्द,शांत समाजापेक्षा या राक्षसांना आपलं अधिपत्य अधिक महत्वाचे वाटते.या नरधमांचे एकच शासन ते म्हणजे त्यांचा संपूर्ण निःपात…
या कार्यात देवांचा आशिर्वाद आहेच त्यासाठीच देवेंद्राचं सहाय्य घेणार आहोत.तोपर्यत यज्ञीय कार्याचा वेग वाढवा.आणि मी स्वतः इक्ष्वाकू राजाशी संबंध स्थापित करतो.तसेच उत्तरेत गंधमादन पर्वत परिसरांत कार्यरत जमदग्नी आणि दण्डकारण्याच्या मुखाशी काम करणारे गौतमऋषी यानां ही या विशाल कार्यात सहभागी करणार आहोत.यापुढे आपण नेहमी संपर्कात राहूच!
अनायसे विश्वामित्र वसिष्ठाश्रमात आल्यामुळे ऋषीय कार्याची भावी सुनियोजित योजनि ठरवल्या गेली.वसिष्ठ आणि कश्यप ऋषींचा देवांशी नित्य संपर्क होता.संपूर्ण भारतवर्षात पाय रोवण्याच्या कार्यात देवांच्याही कांही योजना होत्या.वैदिक ऋषी,आर्य आणि देव यांचा परस्पर सहकार्यातून योजना आखल्या जात होत्या.प्राप्त आणि प्रस्थापित आव्हानावर मात करण्यासाठी ऋषीय योजना सुरु झाली.मिथिला,काशी अयोध्या इत्यादी आर्यवर्तातील राजांचेही सहाय्य मिळणार होते.ठीकठीकाणी दडून असलेले दुष्ट नरभक्षक,राक्षसां प्रमाणेच,पश्चिम सागरकिनारी तीच परिस्थिती असल्याने या कार्यासाठी घातक ठरणार होते.त्यामुळे तिथेही भ्रातृ भावनांचा समाज निर्माण करावा लागणार होता.अगस्त्यांप्रमाणेच इतर तपस्वी ऋषी आणि त्यांचे विद्यार्थी त्या प्रदेशात कार्यरत होतेच,पण तेवढं पुरेसं नव्हतं.पुढेमागे शस्रबळाचा वापर करावा लागणार हे वसिष्ठ अगस्त्य जाणून होते.
या संबंधीच अगस्त्यांना आपल्या बंधूशी गुप्त मसलत करायची होती. विश्वामित्र आपल्या कुटीत गेल्यावर दोघा भावांची गुप्त चर्चा सुरु झाली.या आव्हानाचा थेट संबंध या दोघांशी होता. देवांचीच तशी योजना होती.ते आव्हान पश्चिम सागरात पूर्णतः गाडून टाकायची होती.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.



















