आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

३० जून, दिवस १८१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ४०१ ते ४२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २१६१ ते २१७२
“30 जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 30 June
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक 30 जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २१६१ ते २१७२ चे पारायण आपण करणार आहोत.
30 जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ४०१ ते ४२५,
401-13
गुरूते पक्षिणी करी । चारा घे चांचूवरी । गुरु तारू धरी । आपण कास ॥401॥
गुरूला पक्षिणी करतो व आपण (पिल्लू बनलेला) तिच्या चोचेतून चारा घेतो. गुरूला पोहणारा करून आपण त्यांच्या कासेला लागतो.
402-13
ऐसे प्रेमाचेनि थावे । ध्यानचि ध्यानाते प्रसवे । पूर्णसिंधु हेलावे । फुटती जैसे ॥402॥
ज्याप्रमाणे पूर्ण भरलेल्या समुद्रात लाटामागून लाटा उत्पन्न होतात त्याप्रमाणे अशा प्रेमाच्या बळाने ध्यानच ध्यानाला प्रसवते.
403-13
किंबहुना यापरी । श्रीगुरुमूर्ती अंतरी । भोगी आता अवधारी । बाह्यसेवा ॥403॥
फार काय सांगावे ? याप्रमाणे तो गुरुमूर्ती आपल्या अंत:करणात भोगतो. आता त्याची बाहेरील (शारीरिक) सेवा ऐक.
404-13
तरी जिवी ऐसे आवांके । म्हणे दास्य करीन निके । जैसे गुरु कौतुके । माग म्हणती ॥404॥
गुरूंची शारीरिक सेवा –
तर त्याच्या मनात असा विचार असतो की मी गुरूचे असे चांगले दास्य करीन की जेणेकरून गुरू मला प्रेमाने ‘माग ” म्हणून म्हणतील.
405-13
तैसिया साचा उपास्ती । गोसावी सुप्रसन्न होती । तेथ मी विनंती । ऐसी करी न ॥405॥
तशा खर्या उपासनेने प्रभू सुप्रसन्न होतील, त्या वेळी मी अशी विनंती करीन.
406-13
म्हणेन तुमचा देवा । परिवारु जो आघवा । तेतुले रूपे होआवा । मीचि एकु ॥406॥
मी असे म्हणेन की देवा हा जो तुमचा सर्व परिवार आहे, तितक्या रूपाने मी एकट्यानेच बनावे.
407-13
आणि उपकरती आपुली । उपकरणे आथि जेतुली । माझी रूपे तेतुली । होआवी जी ॥407॥
आणि आपल्या उपयोगी पडणारी जेवढी उपकरणे (पूजेची भांडी वगैरे वस्तू) आहेत, महाराज, तेवढे सर्व मी व्हावे.
408-13
ऐसा मागेन वरु । तेथ हो म्हणती श्रीगुरु । मग तो परिवारु । मीचि होई न ॥408॥
असा मी (श्रीगुरूला) वर मागेन, की ते हो म्हणतील मग मी त्यांच्या परिवाराचा होईन.
409-13
उपकरणजात सकळिक । ते मीचि होईन एकैक । तेव्हा उपास्तीचे कवतिक । देखिजैल ॥409॥
श्रीगुरूच्या सेवेमध्ये जेवढीं उपकरणे लागतात, त्यापैकी प्रत्येक वस्तू मीच होईन तेव्हाच मला सेवेचे सुख प्राप्त होईल. तेंव्हाच माझ्या उपासनेचे खरे कौतुक होईल.
410-13
गुरु बहुतांची माये । परी एकलौती होऊनि ठाये । तैसे करूनि आण वाये । कृपे तिये ॥410॥
श्रीगुरू हे पुष्कळांची आई आहेत पण ते माझी एकट्याची आई होऊन रहातील असे करून (म्हणजे अनन्यभावाने त्यांची सेवा करून) त्यांच्या कृपेकडून शपथ वाहवीन.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
411-13
तया अनुरागा वेधु लावी । एकपत्नीव्रत घेववी । क्षेत्रसंन्यासु करवी । लोभाकरवी ॥411॥
श्रीगुरूंच्या प्रेमाला माझा छंद लावीन व त्या प्रेमाकडून एकपत्नीव्रत घेववीन आणि त्यांच्या लोभाकडून क्षेत्रसंन्यास करवीन, (म्हणजे त्यांचा लोभ मला सोडून दुसरीकडे कोठे जाणार नाही असे करीन),
412-13
चतुर्दिक्षु वारा । न लाहे निघो बाहिरा । तैसा गुरुकृपे पांजिरा । मीचि होईन ॥412॥
वारा कितीही धावला तरी तो जसा चार दिशांच्या बाहेर निघू शकत नाही, त्याप्रमाणे मीच गुरुकृपेला पिंजरा होईन.
413-13
आपुलिया गुणांची लेणी करीन गुरुसेवे स्वामिणी । हे असो होईन गंवसणी । मीचि भक्तीसी ॥413॥
गुरुसेवा जी माझी मालकीण तिला मी आपल्या गुणांचे अलंकार करीन, हे असो. (एवढेच काय पण) गुरुभक्तीला मीच गवसणी होईन.
414-13
गुरुस्नेहाचिये वृष्टी । मी पृथ्वी होईन तळवटी । ऐसिया मनोरथांचिया सृष्टी । अनंता रची ॥414॥
गुरूंच्या स्नेहाच्या वृष्टीला मीच खाली पृथ्वी होईन, याप्रमाणे मनोरथांच्या अनंत सृष्टीला तयार करतो.
415-13
म्हणे श्रीगुरूंचे भुवन । आपण मी होईन । आणि दास होऊनि करीन । दास्य तेथिचे ॥415॥
तो म्हणतो, गुरूंचे रहाते घर, मी स्वत: होईन व त्यांच्या घराचा चाकर होऊन तेथील चाकरी मीच करीन.
416-13
निर्गमागमी दातारे । जे वोलांडिजती उंबरे । ते मी होईन आणि द्वारे । द्वारपाळु ॥416॥
श्रीगुरू बाहेर जाते वेळी व घरात येतेवेळी जे उंबरे ओलांडतात ते उंबरे मीच होईन. आणि घराची द्वारे व द्वारांवरील राखण करणारे गडी मीच होईन.
417-13
पाउवा मी होईन । तिया मीचि लेववीन । छत्र मी आणि करीन । बारीपण ॥417॥
श्रीगुरूंच्या खडावा मीच होईन व त्या खडावा त्यांच्या पायात मीच घालीन व त्याचे छत्र मी होईन व छत्र धरण्याचे काम मीच करीन.
418-13
मी तळ उपरु जाणविता । चंवरु धरु हातु देता । स्वामीपुढे खोलता । होईन मी ॥418॥
श्रीगुरूंना खालीवर जाणवणारा (चोपदार) मीच होईन, त्यांच्यावर चवरी धरणारा मीच होईन, त्यांना हात देणारा मीच होईन व श्रीगुरूंपुढे चालणारा वाटाड्या मीच होईन.
419-13
मीचि होईन सागळा । करू सुईन गुरुळा । सांडिती तो नेपाळा । पडिघा मीचि ॥419॥
श्रीगुरूंचा झारी धरणारा शागीर्द मीच होईन व त्यास चूळ भरण्याकरता पाणी मीच घालीन व ती चूळ ते ज्या तस्तात टाकतील ते तस्त मीच होईन.
420-13
हडप मी वोळगेन । मीचि उगाळु घेईन । उळिग मी करीन । आंघोळीचे ॥420॥
श्रीगुरूला विडा देण्याची सेवा मीच करीन, त्यांनी पान खाऊन थुंकलेला थुंका मीच घेईन आणि त्यांना स्नान घालण्याची खटपट मीच करीन.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
421-13
होईन गुरूंचे आसन । अलंकार परिधान । चंदनादि होईन । उपचार ते ॥421॥
गुरूंचे आसन मी होईन, त्यांचे अंगावर घालण्याचे अलंकार व नेसावयाचे वस्त्र आणि चंदनादि उपचार मीच होईन.
422-13
मीचि होईन सुआरु । वोगरीन उपहारु । आपणपे श्रीगुरु । वोवाळी न ॥422॥
श्रीगुरूंचा स्वयंपाक करणारा मी आचारी होईन व त्यास फराळाचे वाढीन व मी आपल्या आपलेपणाने श्रीगुरूंस ओवाळीन.
423-13
जे वेळी देवो आरोगिती । तेव्हा पांतीकरु मीचि पांती । मीचि होईन पुढती । देईन विडा ॥423॥
श्रीगुरू जेव्हा भोजन करतील तेव्हा त्यांच्या पंक्तीला बसणारा मीच होईन व (भोजन झाल्यानंतर त्यांना) मीच पुढे होईन आणि विडा देईन.
424-13
ताट मी काढीन । सेज मी झाडीन । चरणसंवाहन । मीचि करीन ॥424॥
श्रीगुरूंचे भोजन केलेले पात्र मीच काढीन व त्यांचा बिछाना मी झाडीन व त्यांचे पाय चेपीन.
425-13
सिंहासन होईन आपण । वरी श्रीगुरु करिती आरोहण । होईन पुरेपण । वोळगेचे ॥425॥
मी स्वत: सिंहासन होईन, त्यावर श्रीगुरू बसतील व सेवेचे पुरेपण होईन (म्हणजे संपूर्ण सेवा करीन).
दिवस १८१ वा, ३०, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २१६१ ते २१७२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २१६१
बहु बरे एकाएकी । संग चुकी करावा ॥१॥
ऐसे बरे जाले ठावे । अनुभवे आपुल्या ॥धृपद॥
सांगावे ते काम मना । सलगी जना नेदावी ॥२॥
तुका म्हणे निघे आगी । दुजे संगी आतळता ॥३॥
अर्थ
वाईट लोकांची संगती चुकवावी आणि एकातात राहणे हेच खूप चांगले आहे. असे मला माझ्या अनुभवाने कळले माहीत झाले हे बरे झाले. काही जर काम सांगायचे झाले तर ते स्वतःच्या मनाला सांगावे परंतु लोकांची संगती करू नये. तुकाराम महाराज म्हणतात एक काष्ट जर दुसऱ्या कष्टाला घासले तर त्यामधून अग्नी उत्पन्न होतो त्याप्रमाणे आपले व लोकांचे विचार एक झाले तर त्यामधून षड विकार निर्माण होतात त्यामुळे एकातात राहणे हेच चांगले आहे.
अभंग क्र. २१६२
बरे आह्मां कळो आले देवपण । आता गुज कोण राखे तुझे ॥१॥
मारिले का मज सांग आजिवरी । आता सरोबरी तुज मज ॥धृपद॥
जे आह्मी बोलो ते आहे तुझ्या अंगी । देईन प्रसंगी आजि शिव्या ॥२॥
निलाजरा तुज नाही याति कुळ । चोरटा शिंदळ ठावा मज ॥३॥
खासी धोंडे माती जीव जंत झाडे । एकले उघडे परदेसी ॥४॥
गाढव कुतरा ऐसा मज ठावा । बाईल तू देवा भारवाही ॥५॥
लटिका तू मागे बहुतांसी ठावा । आले अनुभवा माझ्या ते ही ॥६॥
तुका म्हणे मज खविळले भांडा । आता धीर तोंडा न धरवे ॥७॥
अर्थ
देवा आता बरे झाले तुझे देवपण आम्हाला कळून आले त्यामुळे आता तुझी गुप्त माहितीचे रक्षण कोण बरे करेन. देवा तू मला आज पर्यंत जन्ममरणाच्या दुःखाने का मारले आहे आता तुला काही भिण्याचे कारण नाही कारण तुझी आणि माझी बरोबरी झाली आहे. जे जे आम्ही बोललो आहे ते ते सर्व दुर्गुण तुझ्या अंगी आहेतच त्यामुळे आज प्रसंगी मी तुला शिव्या देखील देण्यास घाबरणार नाही. देवा अरे तू निर्लज्ज आहेस तुला जात नाही आणि कुळ ही नाही तू चोरटा आणि शिंदळ आहे हे देखील मला ठाऊक आहे. तू प्रलय काळी जीव, जंतू, धोंडे, माती, झाडे काहीही खातोस परंतु तू मात्र परदेशी आहेस. देवा तू सर्वत्र व्यापक आहेस त्यामुळे गाढव, कुत्रा भार वाहणारा बैल देखील तूच आहेस हे मला माहित आहे. देवा तू खोटा आहेस हे तर मागे बहुत लोकांना माहीतच आहे परंतु माझ्या अनुभवाने ने ही ते मला माहिती झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता तू मला भांडण्यासाठी खवळीले आहे त्यामुळे आता माझ्या तोंडाला धीर धरवत नाही.
अभंग क्र. २१६३
आम्ही भांडो तुजसवे । वर्मी धरू जाले ठावे ॥१॥
होसी सरड बेडुक । वाघ गाढ्याही पाईक ॥धृपद॥
बळ करी तया भ्यावे । पळो लागे तया घ्यावे ॥२॥
तुका म्हणे दूर परता । नर नारी ना तू भूता ॥३॥
अर्थ
देवा आम्हाला तुझे वर्म चांगले समजले आहे त्यामुळे त्या वर्माला धरून तुझ्याशी आम्ही भांडत आहोत. देवा जसा प्रसंग असेल तसा तू होतोस सरडा, बेडूक, वाघ भित्रा किंवा एखाद्याचा पाईक देखील होतोस. जे फक्त तुझ्यावर बळजबरी करतात त्यांनाच तू भीतो आणि जे तुला भितात त्यांच्यामागे तू लागत असतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा तु नर ही नाही आणि नारी ही नाहीस एवढेच काय पंच भूतान पैकी कोणीही नाहीस त्यामुळे तु सर्वापेक्षा दूरच आहेस.
अभंग क्र. २१६४
काय साहतोसी फुका । माझा बुडविला रुका ॥१॥
रीण घराचे पागिले । ते न सुटे काही केले ॥धृपद॥
चौघांचिया मते । आधी खरे केले होते ॥२॥
तुका म्हणे यावरी । आता भीड कोण धरी ॥३॥
अर्थ
देवा माझे सेवा रुपी धन तू तुझ्याजवळ ठेवले आणि आता फुकट माझे बोलणे का बरं तु सहन करत आहेस. देवा एक लक्षात ठेव एकदा की ऋण घरात शिरले ना कि ते घराचे वाटोळे करते ते काही केल्या सुटत नसते. देवा माझे सेवा रुपी ऋण तुझ्याकडे आहे हे आपण याआधी चारचौघा संतामध्ये खरे केले होते. तुकाराम महाराज म्हणतात देवा यापुढे आता तुझी भीड कोण धरील.
अभंग क्र. २१६५
प्रीतीचा कलहे पदरासी घाली पीळ । सरो नेदी बाळ मागे पुढे पित्यासी ॥१॥
काय लागे त्यासी बळ हेडाविता कोण काळ । गोविते सकळ जाळी स्नेहसूत्राची ॥धृपद॥
सलगी दिला लाड बोले ते ते वाटे गोड । करी बुझावोनि कोड हाती देऊनि भातुकें ॥२॥
तुका म्हणे बोल कोणा हे का नेणा नारायणा । सलगीच्या वचना कैचे उपजे विषम । ॥ ॥४॥
अर्थ
लहान मूल आपल्या बापाच्या धोतराला धरते आणि त्याला पीळ घालून तेथेच उभा राहते. मग ते बाळ आपल्या बापाला मागेही होऊ देत नाही पुढे होऊ देत नाही. त्या मुलाकडून तो धोतराचा पदर सोडून घेण्यास त्या बापाला काही ताकत लागणार आहे काय आणि किती वेळ लागेल ? परंतु तो बाप मुलाच्या स्नेह रुपी तंतूच्या जाळ्यात गुंतलेला असतो. कारण तो बाप त्या मुलाच्या स्नेहात गुंतलेला असतो आणि त्यामुळे तो त्याला हवे तसे लाड देतो मग त्या मुलाने काहीही करो बरोबर अथवा चुकीचे कसेहि असो त्या बापाला गोड वाटते. मग तो मुलगा हट्ट करू लागतो आणि त्याचा हट्ट बापा पुढे मांडतो मग तो बाप त्याला काहीतरी खाऊ देऊन त्याची समजूत काढतो. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा मी आता जे काही बोलत आहे ते कोणाला बोलत आहे ? का बोलत आहे ? कशाकरता बोलत आहे ? हे काय तुम्हाला कळत नाही काय ? हे नारायणा मी हे सर्व तुम्हालाच बोलत आहे कारण मी तुमचा लाडका मुलगा आणि तुम्ही माझे कौतुक पुरवणारे बाप आहात मग मी जरी काही बोललो तर तुम्हाला त्याचा राग तरी कसा येईल ?
अभंग क्र. २१६६
भार देखोनि वैष्णवाचे । दूत पळाले यमाचे ॥१॥
आले आले वैष्णववीर । काळ कापती असुर ॥धृपद॥
गरुडटकयाच्या भारे । भूमी गर्जे जेजेकारे ॥२॥
तुका म्हणे काळ । पळे देखोनिया बळ ॥३॥
अर्थ
वैष्णवाचा समुदाय पाहताच यमदुत पळून गेले. वैष्णव शूरवीर योद्धे आहेत आणि ते आले असे म्हटले की काळ आणि असुर हे भीतीने थरथर कापतात. गरुड चिन्हाकित असलेल्या पताकाच्या भाराने भूमी वर असणारे वैष्णव हरिनामाचा जय जय कारची गर्जना करत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात हा काळ वैष्णवाचा एवढा बलाढ्य समुदाय पाहून आणि त्यांचे एवढे बल पाहून पळत सुटतो.
अभंग क्र. २१६७
रंगी रंगे रे श्रीरंगे । काय भुललासी पतंगे ॥१॥
शरीर जायांचे ठेवणे । धरिसी अभिळास झणे ॥धृपद॥
नव्हे तुझा हा परिवार । द्रव्य दारा क्षणभंगुर ॥२॥
अंतकाळींचा सोइरा । तुका म्हणे विठो धरा ॥३॥
अर्थ
अरे मानवा श्री रंगाच्या रंगात रंगून जा पतंग जसा दिव्याला भुलुन मरण पावतो तसा तु विषयाच्या नादी का लागला आहेस ? अरे हे शरीर म्हणजे जाण्याचे ठेवणेच आहे ते जाणारच आहे त्यामुळे त्याविषयी तू अभिलाषा धरू नको. अरे हा संसार हा द्रव्य दारा आधी परिवार हा क्षणभंगुर आहे हा तुझा नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात अरे हा विठोबा तुमचा अंत काळीचा सोयरा आहे त्यामुळे तुम्ही त्याला हृदयात धरा.
अभंग क्र. २१६८
जन्मा येउनि काय केले । तुवा मुदल गमाविले ॥१॥
का रे न फिरसी माघारा । अझुनि तरी फजितखोरा ॥धृपद॥
केली गांठोळीची नासी । पुढे भीके चि मागसी ॥२॥
तुका म्हणे ठाया । जाई आपुल्या आलिया ॥३॥
अर्थ
अरे नरा तू जन्माला येऊन काय केलेस व्यर्थ विषयांच्या पाठीमागे लागून आयुष्य रुपी आणि देहरूपी मूद्दल मात्र गमविलेस. अरे फजित खोर माणसा तू अजूनही या विषयाच्या आणि संसाराच्या पाठीमागे लागला आहेस तू अजूनही देवा मागे का नाही फिरत ? अरे तू तुझ्या पदरात एवढे मोठे आयुष्य रुपी आणि देहरूपी धन पडले आहे तरी त्याचा तु फायदा करून का घेतला नाहीस तर पुढे जन्मोजन्मी भिकच मागत बसशील. तुकाराम महाराज म्हणतात अरे तू या हरी च्या कृपेने देहरूपी जीवाला प्राप्त झाला आहेस त्याचा फायदा करून घे आणि आपले मूळ ठिकाण म्हणजे नीज स्वरूप प्राप्त करुन घ्यावे.
अभंग क्र. २१६९
पंढरीस जाते निरोप आइका । वैकुंठनायका क्षेम सांगा ॥१॥
अनाथांचा नाथ हे तुझे वचन । धावे नको दीन गांजो देऊ ॥धृपद॥
ग्रासिले भुजंगे सर्पे महाकाळे । न दिसे हे जाळे उगवतां ॥२॥
कामक्रोधसुनी श्वापदी बहुती । वेढलो आवर्ती मायेचिये ॥३॥
मृगजलनदी बुडविना तरी । आणूनिया वरी तळा नेते ॥४॥
तुका म्हणे तुवा धरिले उदास । तरि पाहो वास कवणाची ॥५॥
अर्थ
हे पंढरी ला जाणाऱ्या हो माझा एक निरोप आहे तो वैकुंठ नायक पांडुरंगाला सांगा माझे त्याला आलिंगन पूर्वक निरोप सांगा. मी अनाथांचा नाथ आहे असे तुझेच वचन आहे त्यामुळे आता तू दिन लोकांना अधिक दुःख भोग भोगू देऊ नकोस त्यांच्यासाठी तू लवकर धाव घे. महाकाळ रुपी भुजगाने व लोभ रुपी सर्पाने मला ग्रासले आहे त्यांच्या तावडीतून मला सुटणे शक्य होत नाही. देवाला सांगा की मला येथे काम क्रोध रुपी कुत्र्यांनी व षड विकाररुपी हींस्र श्वापदांनी वेढलो आहे आणि मायेच्या चक्रात मी पडलो आहे. अहो देवा मला ही भवनदी तारित ही नाही आणि बुडवितही नाही पुण्य केले की स्वर्गलोकात नेते आणि पुण्य संपले की पापा च्या साह्याने या भूतलावर आणते. अशाप्रकारे सारखे वर जा खाली ये जा करत आहे. तुकाराम महाराज म्हणतात या पांडुरंगाने माझ्याविषयी जर उदासीनता धरली तर मी कोणाची वाट पाहणार म्हणून त्या पांडुरंगाला निरोप सांगा की मी त्याची वाट पाहत आहे.
अभंग क्र. २१७०
कृपाळू सज्जन तुम्ही संतजन । हेचि कृपादान तुमचे मज ॥१॥
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा । कीव माझी सांगा काकुलती ॥धृपद॥
अनाथ अपराधी पतिताआगळा । परि पायावेगळा नका करू ॥२॥
तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी । मग मज हरी उपेक्षीना ॥३॥
अर्थ
¬¬ हे संत जन हो तुम्ही कृपाळू आहात सज्जन आहात आणि तुमच्याकडून मला एवढेच कृपा दान पाहिजे. ते कृपादान म्हणजे असे आहे की माझी आठवण तुम्ही पांडुरंगाला करून द्या आणि माझ्याविषयी त्यांने दया करावी अशी विनंती त्याला करा. तुम्ही संत जन हो पांडुरंगाला असे सांगा की हा तुकाराम अनाथ अपराधी आणि पतीता पेक्षाही पतीत असला तरी तुमच्या पाया पासून त्याला वेगळे करू नका. तुकाराम महाराज म्हणतात हे संत हो तुम्ही तुमच्या मदतीने जर मला हरीच्या स्वाधीन केले तर तो हरी माझी कधीही उपेक्षा करणार नाही.
अभंग क्र. २१७१
संताचिया पायी हा माझा विश्वास । सर्वभावे दास झालो त्यांचा ॥१॥
तेचि माझे हित करिती सकळ । जेणे हा गोपाळ कृपा करी ॥धृपद॥
भागलिया मज वाहतील कडे । त्यांचियाने जोडे सर्व सुख ॥२॥
तुका म्हणे शेष घेईन आवडी । वचन न मोडी बोलिलो ते ॥३॥
अर्थ
संतांच्या पायावर माझा पूर्ण विश्वास आहे त्यामुळेच तर मी त्यांचा सर्वभावे दास झालो आहे. जेणेकरून गोपाळ माझ्यावर कृपा करेल अशाच प्रकारचे सर्व हित हे संत माझे करत आहेत. मी जर परमार्थामध्ये थकलो तर ते संत मला लहान मुलासारखे कडेवर घेतात आणि पुन्हा परमार्थ करण्यास प्रोत्साहन देतात. आणि त्यांच्या कृपेनेच तर सर्व मला सुख प्राप्त होणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात संतांचे उचिष्ट मी आवडीने सेवन करेल आणि त्यांनी केलेली आज्ञा मी कधीही मोडणार नाही.
अभंग क्र. २१७२
लाघवी सूत्रधारी दोरी नाचवी कुसरी । उपजवी पाळूनि संहारी नानापरिची लाघवे ॥१॥
पुरोनि पंढरिये उरले भक्तीसुखे लांचावले । उभे चि राहिले कर कटी न बैसे ॥धृपद॥
बहु काळे ना सावळे बहु कठिण ना कोवळे । गुणत्रया वेगळे बहुबळे आथीले ॥२॥
असोनि नसे सकळांमधी मना अगोचर बुद्धी । स्वामी माझा कृपानिधि तुका म्हणे श्रीविठ्ठल ॥३॥
अर्थ
हा देव मोठा चमत्कारिक आहे सृष्टी उत्पन्न करतो आणि सर्वाचे संचित कर्माची दोरी हातात घेऊन सर्वाना चतुरतेने नाचवत असतो. सृष्टी उत्पन्न करून त्याचे पालन करून पुन्हा त्याचा संहार करण्याचे विविध प्रकारचे चमत्कार तो करत असतो. विविध प्रकारचे चमत्कार करून हा देव सर्वत्र व्यापक राहून पंढरीत उरला आहे आणि भक्ती सुखासाठी लाचवलेला आहे. त्यामुळे तर हा देव कर कटेवर ठेवून उभा राहिलेला आहे तो कधीही बसत नाही. हा देव फार काळा नाही किंवा फार सावळाही नाही फार कठीण नाही किंवा फार कोवळा म्हणजे मृदू नाही तो सत्त्व, रज, तम या तीन गुणापेक्षा वेगळा असून फार बलवान आहे. तुकाराम महाराज म्हणतात तो सर्वामध्ये असूनही नसल्यासारखाच आहे मनाला आणि बुद्धिलाही देखील तो समजत नाही. असा हा माझा स्वामी कृपा निधी श्री विठल आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















