आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२९ एप्रिल, दिवस ११९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा, ओवी १२६ ते १५० सार्थ तुकाराम गाथा अभंग १४१७ ते १४२८
“29 एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २९ Apirl
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २९ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १४१७ ते १४२८ चे पारायण आपण करणार आहोत.
२९ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी १२६ ते १५०,
126-10
पै गुरुशिष्यांचा एकांती । जे अक्षरा एकाची वदंती । ते मेघाचियापरी त्रिजगती । गर्जती सैंघ ॥126॥
तसेच गुरुशिष्याच्या एकांतात, ज्या एका अविनाशी वस्तुविषयींच्या रहस्याची चर्चा होते, ती चर्चा ते भक्त मेघगर्जनेप्रमाणे त्रैलोक्यात गर्जून सांगतात.
127-10
जैसी कमळकळिका जालेपणे । हृदयीचिया मकरंदाते राखो नेणे । दे राया रंका पारणे । आमोदाचे ॥127॥
ज्याप्रमाणे कमळाची कळी उमलून विकसित झाली असता, आपल्या ठिकाणचा सुवास ती गुप्त ठेउ शकत नाही आणि राजापासून रंकापर्यंत ती आपल्या सुवासाचे भोजन घालते.
128-10
तैसेचि माते विश्वी कथित । कथितेनि तोषे कथू विसरत । मग तया विसरामाजी विरत । आंगे जीवे ॥128॥
त्याप्रमाणेच ते ज्ञानीभक्त, सर्व विश्वांत मोकळ्या मनाने, माझ्या गुणादि वर्णनाचे द्वारा, माझ्या सगुण स्वरूपाचे जगात निरूपण करतात. निरूपण करता करता प्रेम दाटून येऊन, ते निरूपण करणेहि विसरतात व त्यात जीवभाव व शरीरभावही विसरतात.
129-10
ऐसे प्रेमाचेनि बहुवसपणे । नाही राती दिवो जाणणे । केले माझे सुख अव्यंगवाणे । आपणपेया जिही ॥129॥
अशा निःसीम प्रेमामुळे त्यांना रात्र व दिवस यांचाही विसर पडतो व असे ते आपणच आपले ठिकाणी संपूर्ण सुखरूप होऊन राहतात.
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥10. 10॥
130-10
तया मग जे आम्ही काही । द्यावे अर्जुना पाही । ते ठायीचीच तिही । घेतली सेल ॥130॥
मग जी काही स्थिती, अर्जुना ! आम्ही त्यांना प्राप्त करून द्यायची, ती मुळात असलेली निःसीम स्थिती त्यांनीच प्राप्त करून घेतली असते, पहा.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
131-10
का जे ते जिया वाटा । निगाले गा सुभटा । ते सोय पाहोनि अव्हांटा । स्वर्गापवर्ग ॥131॥
कारण थोर योध्द्या अर्जुना ! ते ज्या मार्गाने जायला निघाले, त्या मार्गाची सुखरूपता पाहिली असता स्वर्ग व मोक्ष ह्या आडवाटा ठरतात.
132-10
म्हणोनि तिही जे प्रेम धरिले । तेचि आमुचे देणे उपाइले । परि आम्ही देयावे हेहि केले । तिहीची म्हणिये ॥132॥
म्हणून भक्तांनी जे प्रेम धरले, ते आमचे देणे होय असे प्रसिध्द झाले, पण प्रेम आम्ही द्यायचे असते, हेहि त्यांनीच रूढ केले, असे म्हणावे लागतें.
133-10
आता यावरी येतुले घडे । जे तेचि सुख आगळे वाढे । आणि काळाची दिठी न पडे । हे आम्हा करणे ॥133॥
आता यानंतर एवढे व्हावे की, ज्यांचे माझे ठिकाणी असलेले प्रेम निःसीम वाढेल आणि कालांतरानेहि ते प्रेम क्षीण होणार नाही, इतकेच आम्हाला करायचे असते.
134-10
लळेयाचिया बाळका किरीटी । गवसणी करूनि स्नेहाचिया दिठी । जैसी खेळता पाठोपाठी । माउली धावे ॥134॥
अर्जुना ! अत्यंत लाडक्या मुलाला, आई आपल्या प्रेमळ दृष्टीची खोळ करून, मूल खेळत असता जशी ती त्याच्या पाठीमागे धावत असते,
135-10
ते जो जो खेळ दावी । तो तो पुढे सोनयाचा करूनि ठेवी । तैसी उपास्तीची पदवी । पोषित मी जाये ॥135॥
व ते लाडके मूल जो जो खेळ बोटाने दाखवून मागेल, तो तो खेळ ती तान्हुल्याच्या स्वाधीन ज्याप्रमाणे करते, त्याप्रमाणे मीहि आपल्या भक्ताच्या भक्तिप्रेमाच्या निःसीम भूमीकेचे संरक्षण करीत असतो.
136-10
जिये पदवीचेनि पोषके । ते माते पावती यथासुखे । हे पाळती मज विशेखे । आवडे करू ॥136॥
ज्याप्रेमस्थितीचे पोषण केले असता ते मला सुखाने प्राप्त होतील, अशा रितीने तिचे पालन पोषण करणे हेच मला विशेषतः आवडते.
137-10
पै गा भक्तासि माझे कोड । मज तयाचे अनन्यगतीची चाड । का जे प्रेमळाचे सांकड । आमुते घरी ॥137॥
असो पण बा अर्जुना ! भक्ताला माझे अत्यंत प्रेम असते व मलाहि त्याचा अनन्यतेची गोडी असते. कारण आमच्या घरी, म्हणजे माझ्या सगुण स्वरूपाचे ठिकाणी निःसीम प्रेम करणार्या प्रेमळ भक्तांचाच दुष्काळ आहे.
138-10
पाहे पा स्वर्ग मोक्ष उपायिले । दोन्ही मार्ग तयाचिये वाहणी केले । आम्ही आंगही शेखी वेचिले । लक्ष्मियेसी ॥138॥
हे पहा अर्जुना ! स्वर्ग व मोक्ष हे दोन मार्ग मी प्रगट केले असून, ते दोन्ही मार्ग त्यांच्या— म्हणजे माझी सकाम व निष्काम उपासना करणार्यांच्या — आचरणांच्या प्रवाहांत ठेविले. आणखी लक्ष्मीसह त्यांच्या कामना पूर्ण करण्याकरिता शरीरहि झिजविलें.
139-10
परि आपणपेवीण जे एक । ते तैसेचि सुख साजुक । सप्रेमळालागी देख । ठेविले जतन ॥139॥
पण मीपणाचे जाणीवेवाचून असणारे व न विटणारे असे जे केवळ प्रेमसुख आहे, ते तसेच आपल्या प्रेमळ भक्ताला देण्याकरिता जपून ठेविलेले असते.
140-10
हा ठायवरी किरीटी । आम्ही प्रेमळु घेवो आपणपयासाठी । या बोली बोलिजत गोष्टी । तैसिया नव्हती गा ॥140॥
अर्जुना ! आम्ही आपल्या प्रेमळ भक्तावर आपल्यासाठीच इतके प्रेम करतो, पण ह्या, शब्दाने सांगण्यासारख्या गोष्टी नव्हेत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः ।
नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥10. 11॥
141-10
म्हणोनि मज आत्मयाचा भावो । जिही जियावया केला ठावो । एक मीवाचूनि वावो । येर मानिले जिही ॥141॥
अर्जुना ! मज सगुणस्वरूप झालेल्या आत्माचे प्रेम, हेच ज्यांनी आपल्या जीवंत राहण्याचे ठिकाण केले आणि माझ्यावाचून जेवढे काही आहे असे वाटते, ते सर्व खोटे मानलें.
142-10
तया तत्त्वज्ञा चोखटा । दिवी पोतासाची सुभटा । मग मीचि होऊनि दिवटा । पुढा पुढा चाले ॥142॥
हे उत्तम योध्द्या अर्जुना ! या त्याच्या यथार्थ विवेक ज्ञानरूप कापराच्या अल्पज्योतीचा, मग मीच मोठा टेंभा होऊन पुढे पुढे चालतो.
143-10
अज्ञानाचिये राती- । माजी तमाचि मिळणी दाटती । ते नाशूनि घाली परौती । करी नित्योदयो ॥143॥
आत्मविस्मृतिरूप अज्ञानाचे रात्रीमध्ये नानाप्रकारच्या अज्ञानरूप अंधःकाराच्या मिळणीची दाटी होत असते, ती निःशेष नाहीशी करून, मी भक्ताचे ठिकाणी नित्य अशा ज्ञानरूप प्रकाशाचा उदय करून देतों.
144-10
ऐसे प्रेमळाचेनि प्रियोत्तमे । बोलिले जेथ पुरुषोत्तमे । तेथ अर्जुन मनोधर्मे । निवालो म्हणतसे ॥144॥
याप्रमाणे सर्व प्रेमळ भक्तांचा प्रियतम जो परमात्मा श्रीकृष्ण, त्याने अर्जुनाला असे म्हटले असता अर्जुन म्हणतो, देवा ! माझे मन अत्यंत समाधान पावले आहे.
145-10
अहो जी अवधारा । भला केरु फेडिला संसारा । जाहलो जननीजठरजोहरा- । वेगळा प्रभू ॥145॥
अहो जी भगवंता ! ऐका. माझ्या अंतःकरणात जो संसाररूपी केरकचरा साचला होता, तो तुम्ही झाडून नाहीसा केला, म्हणून मी आईच्या जठररूपी लाक्षागृहांतून मुक्त झालो म्हणजे जन्ममरणापासून मुक्त झालो.
146-10
जी जन्मलेपण आपुले । हे आजि मिया डोळा देखिले । जीवित हाता चढले । आवडतसे ॥146॥
हे श्रीकृष्ण प्रभो ! आज मी आपल्या डोळ्यांनी आपला जन्म दिवस पाहिला आणि वाटेल तसे आयुष्य माझ्या हाती आले — म्हणजे मी जन्ममरणरहित अविनाशीस्वरूप झालो.
147-10
आजि आयुष्या उजवण जाहली । माझिया दैवा दशा उदयली । जे वाक्यकृपा लाधली । दैविकेनि मुखे ॥147॥
देवाच्या मुखाने माझ्यावर बोधामृतरूपी वचनाची कृपा झाली, म्हणून ते वचन ऐकून आज माझ्या आयुष्याची सफलता झाली व माझ्या दैवाच्या भाग्यदशेस प्रारंभ झाला.
148-10
आता येणे वचन तेजाकारे । फिटले आतील बाहेरील आंधारे । म्हणोनि देखतसे साचोकारे । स्वरूप तुझे ॥148॥
आता तुझ्या या वचनाच्या अर्थरूप ज्ञानप्रकाशाने आतील व बाहेरील अज्ञान- अंधःकार नाहीसा झाला, म्हणून आता तुझे खरे स्वरूप मी पाहात आहे.
अर्जुन उवाच ।
परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् ।
पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ॥10. 12॥
149-10
तरी होसी गा तू परब्रह्म । जे या महाभूता विसंवते धाम । पवित्र तू परम । जगन्नाथा ॥149॥
ज्या ठिकाणी संपूर्ण महाभूते विश्राम पावतात ते परब्रह्म तूच आहेस. हे जगन्नाथा ! तू अत्यंत पवित्र आहेस.
150-10
तू परम दैव त तिही देवा । तू पुरुष जी पंचविसावा । दिव्य तू प्रकृतिभावा- । पैलीकडील ॥150॥
ब्रह्मा, विष्णु, महेश्वर या तिन्ही देवाचे श्रेष्ठ दैवत तूच आहेस. सांख्यांचा पंचविसावा असंग पुरुष तूच आहेस आणि प्रकृतीच्या पलीकडे जी दिव्य तेजोमय वस्तु सांगितली आहे, तीहि तूच आहेस.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ११८ वा, २९, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १४१७ ते १४२८
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. १४१७
देव सखा आता केले नव्हे काई । येणे सकळई सोइरींच ॥१॥
भाग्यवंत जालो गोते सपुरती । आता पुण्या नीती पार नाही ॥धृपद॥
पाहाता दिसती भरलिया दिशा । ठसावला ठसा लोकत्रयी ॥२॥
अविनाश जोडी आम्हा भाग्यवंता । जाली होती सत्ता संचिताची ॥३॥
पायावरी डोई ठेवाया अरोथा । जाली द्यावी सत्ता क्षेम ऐसी ॥४॥
तुका म्हणे जीव पावला विसावा । म्हणविता देवा तुमचींसी ॥५॥
अर्थ
आम्ही देव सखा केला आहे त्यामुळे आम्हीला कोणाता पुरुषार्थ प्राप्त झाला नाही ? देव सखा झाला त्यामुळे सर्व विश्वच आमचे सोयरे झाले आहेत. सर्व विश्वच आमचे सोयरे झाले त्यामुळे आम्ही भाग्यवंत झालो आहोत त्या कारणाने आमच्या नीतिमत्तेला आणि पुण्याला अंत पारच राहिलेला नाही. जिकडे पहावे तिकडे सर्व दिशेला देव दिसत आहे सर्व दिशा देवानेच भरून गेलेल्या दिसतात आणि संपूर्ण त्रैलोक्यात देवाच्या रूपाचा ठसा उमटलेला दिसतो. आम्हा भाग्यवंतांना अविनाश हरीचा लाभ झाला कारण आमचे पूर्वसंचित चांगले होते म्हणून. देवाच्या पायाला मिठी मारावी, त्याच्या पायावर डोके ठेवावे असे आमचे पूर्वसंचित चांगले होते त्यामुळे आमच्यामध्ये हे सामर्थ्य निर्माण झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही तुमचे आहोत असे म्हणून घेतल्यामुळे आमच्या जीवाला ही समाधान प्राप्त झाले आहे.
अभंग क्र. १४१८
कोण आता कळिकाळा । येऊ बळा देईल ॥१॥
सत्ता झाली त्रिभुवनी । चक्रपाणी कोंवसा ॥धृपद॥
लडिवाळांचा भार वाहे । उभा आहे कुढावया ॥२॥
तुका म्हणे घटिका दिस । निमिश ही न विसंभे ॥३॥
अर्थ
आता आमच्यापुढे कळीकाळाची सामर्थ्य कोण चालून देणार आहे ? आमची सत्ता त्रिभुवन वर झाली आहे कारण देवाने आमच्यावर कृपा केली आहे. आम्ही देवाचे लाडके भक्त आहोत या कारणाने देवा आमच्या योगाक्षेमाचा भार वाहण्यास आणि आमचा सांभाळ करण्यासाठी सतत तयार आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही देव आणि भक्त एकमेकांना एक दिवस, एक घटकाच काय परंतु एक क्षणभर देखील विसरत नाही.
अभंग क्र. १४१९
आम्हा आवडे नाम घेता । तो ही पिता संतोषे ॥१॥
उभयता एकचित्त । तरी प्रीत वाढली ॥धृपद॥
आम्ही शोभे निकटवासे । अनारिसे न दिसो ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगे । अवघी अंगे निवाली ॥३॥
अर्थ
आम्हाला आमच्या पित्याचे म्हणजे हरीचे नाम घेण्यास फार आवडते आणि आमचा पिता ही त्यामुळे संतोषी होतो. आमचे दोघाचेही एकचित्त असल्यामुळे आमच्यात एकमेकांमध्ये प्रेम वाढले आहे. आम्ही एकमेकांच्या जवळ असल्यावर शोभून दिसतो, कधीही वेगवेगळे आम्ही दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाने आमचे सर्वांग शांत केली आहे.
अभंग क्र. १४२०
देह तव असे भोगाचे अधीन । याचे सुख सीण क्षीणभंगर ॥१॥
अविनाश जोडी देवापायी भाव । कल्याणाचा ठाव सकळही ॥धृपद॥
क्षणभंगुर हा तेथील पसारा । आलिया हाकारा अवघे नासे ॥२॥
तुका म्हणे येथे सकळ विश्रांति । आठवावा चित्ती नारायण ॥३॥
अर्थ
हा देह प्रारब्ध भोगाच्या आधीन आहे त्यामुळे होणारे सुख दुःख क्षणभंगुर आहे. अविनाशी पांडुरंगाच्या चरणावर निष्ठायुक्त भक्ती केली तर अविनाशी सुख प्राप्त होते कारण हरिचरण सर्व कल्याणाचे ठिकाण आहे. या विश्वातील सर्व म्हणजे जेवढा काही पसारा आहे तो क्षणिक आहे कारण विश्वातील जे काही आकाराला आलेले आहे ते सर्व नष्ट होणारे आहे. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या चित्तामध्ये नेहमी नारायणाचे चिंतन करावे कारण त्याच्या चिंतना मध्येच सर्वकाही समाधान आहे.
अभंग क्र. १४२१
आता आवश्यक करणे समाधान । पाहिले निर्वाण न पाहिजे ॥१॥
केले तरी आता सुशोभ्य करावे । दिसते बरवे संतांमधी ॥धृपद॥
नाही भक्तीराजी ठेविला उधार । नामाचा आकार त्यांचियाने ॥२॥
तुका म्हणे माझ्या वडिलांचे ठेवणे । गोप्य नारायणे न करावे ॥३॥
अर्थ
देवा माझे समाधान करणे फार आवश्यक आहे आता माझा अंत तुम्ही पाहू नका. देवा मी तुमचा दास झालो आहे आणि तुमचा दास म्हणून मी शोभेल असेच तुम्ही करा, म्हणजे संतांमध्ये ते बरे दिसेल. पूर्वीच्या भक्तांनी तुझे कोणते उधार बाकी ठेवले नाही आणि त्यांच्यामुळेच तर तू नामारूपाला, आकाराला आला आहेस.
अभंग क्र. १४२२
काया वाचा मने श्रीमुखाची वास । आणीक उदास विचारांसी ॥१॥
काय आता मोक्ष करावा जी देवा । तुमचिया गोवा दर्शनासी ॥धृपद॥
केलिया नेमासी उभे ठाऊ व्हावे । नेमले ते भावे पालटेना ॥२॥
तुका म्हणे जो जो कराल उशीर । तो तो मज फार रडवील ॥३॥
अर्थ
मी काया, वाचा, मनाने हरी च्या श्रीमुखाच्या दर्शनाची वाट पाहत आहे आणि त्यामुळेच मी बाकी विचारांविषयी उदास आहे. मी मोक्ष घेऊन तरी काय करू, देवा मी जर मोक्ष घेतला तर मला तुमचे सगुण दर्शन होणार नाही. मी खऱ्या निश्चयाने तुमचे दर्शन घेणार आहे आणि माझ्या निश्चयामध्ये कोणताही बदल मी करणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला दर्शन देण्याविषयी तुम्ही जसजसा उशीर कराल तर तो उशीर मला फार रडवेल कारण मला आता धीर धरवत नाही.
अभंग क्र. १४२३
पुढीलांचे सोयी माझ्या मना चाली । मताची आणिली नाही बुद्धी ॥१॥
केलासी तो उभा आजवरी संती । धरविले हाती कट देवा ॥धृपद॥
आहे ते ची मागो नाही खोटा चाळा । नये येऊ बळा लेकराशी ॥२॥
तुका म्हणे माझा साक्षीचा वेव्हार । कृपण जी थोर परी तुम्ही ॥३॥
अर्थ
देवा मागे संतांनी जो मार्ग तयार करून ठेवला आहे त्याच मार्गाने मी चालत आहे. मी माझ्या बुद्धीने कोणतेही स्वतंत्र मतभेद तयार केलेले नाही. तुला संतांनी कमरेवर हात ठेवून उभे केले आहे व आम्ही तुझ्या त्या स्वरूपाच्या दर्शनाचा हट्ट करत आहोत. आम्ही तुझी लेकरे आहोत त्यामुळे तुम्ही आमचा हट्ट पूर्ण करा. आम्हाला दर्शन न देण्याच्या हट्टाला तुम्ही येऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझे सर्व व्यवहार साक्षी पुराव्यानिशी आहे आणि त्याच जोरावर मी म्हणतो की तुम्ही जरी फार थोर आहात तरी पण फार कंजूस आहात कृपण आहात.
अभंग क्र. १४२४
बहुता करूनि चाळवाचाळवी । किती तुम्ही गोवी करीतसा ॥१॥
लागटपणे मी आलो येथवरी । चाड ते दुसरी न धरूनि ॥धृपद॥
दुजियाचा तव तुम्हासी काटाळा । राहासी निराळा एकाएकी ॥२॥
तुका म्हणे आता यावरी गोविंदा । मजशी विनोदा येऊ नये ॥३॥
अर्थ
देवा आज पर्यंत तुम्ही खूप चाळवाचाळवी केली आहे पण आम्हा भक्तांना तुम्ही किती दिवस या भवसागरात गुंतून ठेवणार आहात ? देवा तुमच्या दर्शना वाचून मला दुसरी कोणतीही इच्छा नाहीये, माझा उद्धार व्हावा या कारणामुळे मी लाचार पणाने इथपर्यंत आलो आहे. तुम्हाला दुसऱ्यांचा कंटाळा आहे त्यामुळे तुम्ही एकटे एकटे राहत असतात. तुकाराम महाराज म्हणतात हे गोविंदा आता माझ्याशी चाळवाचाळवीचा विनोद करू नका एकदा मन उदार करून तुमचे दर्शन मला तुम्ही द्यावे.
अभंग क्र. १४२५
तीर्थ जळ देखे पाषाण प्रतिमा । संत ते अधमा माणसाऐसे ॥१॥
वांजेच्या मैथुनापरी गेले वाया । बांडेल्याचे जाया जाले पीक ॥धृपद॥
अभाविक सदा सुतकी चांडाळ । सदा तळमळ चुकेचि ना ॥२॥
तुका म्हणे वरदळी ज्याची दृष्टी । देहबुद्धि कष्टी सदा दुःखी ॥३॥
अर्थ
अधम मनुष्य तीर्थ जळाला पाणी समजतो, देवाच्या प्रतिमेला पाषाण समजतो आणि संतांना सामान्य मनुष्य समजतो. अशा मनुष्याने कितीही चांगले कर्म केले तरी ते वांजेच्या मैथुना प्रमाणे व कंसे न आलेल्या पिकाप्रमाणे वाया जातात. असा अभागी मनुष्य सदा सुतकी चांडाळ असतो. त्याने कितीही चांगले कर्म केले तरी त्याला कोणतेही अधिष्ठान नसल्यामुळे त्याच्या मनातील तळमळ जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्याची दृष्टी नुसती वर्दळी म्हणजे वरवर पाहण्याची आहे ज्याला देहाचा अभिमान असतो त्याची देहबुद्धी नेहमीच कष्टी व दुखी असते.
अभंग क्र. १४२६
नव्हे मतोळ्याचा बाण । नित्य नवा नारायण ॥१॥
सुख उपजे श्रवणे । खरे टांकसाळी नाणे ॥धृपद॥
लाभ हाहोहाती । अधिक पुढतोंपुढती ॥२॥
तुका म्हणे नेणो किती । पुरानि उरले पुढती ॥३॥
अर्थ
नारायणरुपी माल जुना नसून नित्य नवा आहे. नारायणाच्या नामाचे श्रवण केले तरी सुख होते. असे हे नारायण रुपी माल टाकसाळीतील खऱ्या नाण्याप्रमाणे आहे. नारायण रुपी मालाचा लाभ हातोहात आणि अधिकाधिक वाढतच जातो. तुकाराम महाराज म्हणतात नारायण रुपी माल किती आहे याची गणती नाही कारण आज पर्यंतच्या सर्व संतांना हा माल पुरून उरला व पुढेही किती आहे याची गणती नाही.
अभंग क्र. १४२७
घातला दुकान । देती आलियासी दान ॥१॥
संत उदार उदार । भरले अनंत भांडार ॥धृपद॥
मागत्याची पुरे । धणी आणिकासी उरे ॥२॥
तुका म्हणे पोते । देवे भरिले नव्हे रिते ॥३॥
अर्थ
संतांनी परमार्थिक दुकान टाकले आहे व त्या दुकानांमध्ये भक्तरूप ग्राहक येतात. त्यांना संत हरिनामरुपी माल दान म्हणून देतात. संत फार उदार आहेत त्यांच्या दुकानांमध्ये हरिनाम रुपी माल अगणित भरलेला आहे त्यामुळे दान मागण्यास आलेल्या भक्त रुपी ग्राहकाला माल देऊन ते तृप्त करतात आणि पुढे येणार्या ग्राहकांसाठी हा माल जसाच्या तसा पुन्हा राहतो. तुकाराम महाराज म्हणतात संतांचे हृदयरुप पोती देवाच्या मालाने गच्च भरलेली आहेत ती कधीच रिकामे होत नाही.
अभंग क्र. १४२८
नरस्तुति आणि कथेचा विकरा । हे नको दातारा घडो देऊ ॥१॥
ऐसिये कृपेचि भाकितो करुणा । आहेसि तू राणा उदाराचा ॥धृपद॥
पराविया नारी आणि परधना । नको देऊ मनावरी येऊ ॥२॥
भूतांचा मत्सर आणि संतनिंदा । हे नको गोविंदा घडो देऊ ॥३॥
देहअभिमान नको देऊ शरीरी । चढो काही परी एक देऊ ॥४॥
तुका म्हणे तुझ्या पायाचा विसर । नको वारंवार पडो देऊ ॥५॥
अर्थ
हे दातारा संसारी माणसाची स्तुती व हरीकथेची विक्री माझ्या हाताने कधी ही घडू देऊ नकोस. अशा कृपेची करूणा मी तुला भाकत आहे आणि तू माझी इच्छा पूर्ण करशील याची मला खात्री आहे कारण तू दारांचा राजा आहे. परस्त्री आणि परधन यांच्या विषयी माझ्या मनाला असक्ती होऊ देऊ नकोस. हे गोविंदा माझ्या हातून प्राणीमात्रांचा मत्सर व संतांची निंदा केव्हाही होऊ देऊ नकोस. देवा माझ्या अंगी देहाविषयी अभिमान निर्माण होऊ देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या पायाचा विसर मला वारंवार पडू देऊ नकोस.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















