२४ मे, दिवस १४४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ४२६ ते ४५० सार्थ तुकाराम गाथा अभंग १७१७ ते १७२८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२४ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २४ May
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २४ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १७१७ ते १७२८ चे पारायण आपण करणार आहोत.
२४ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ४२६ ते ४५०,

426-11
परि जेतुले येथ प्रवेशले । ते तातलिया लोहे पाणीचि पा गिळिले । वहवटीहि पुसिले । नामरूप तयांचे ॥426॥
पण तुझ्या मुखात जेवढे काही गेले, तेवढे सर्व तापलेल्या लोखंडावर टाकलेल्या पाण्याप्रमाणे गिळले गेले. त्यांचे वहिवाटीपुरते देखील नामरूप राहिले नाही.
लेलिह्यसे ग्रसमानः समन्ताल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वद्भिः ।
तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो ॥11-30॥

अर्थ जळत असणार्‍या मुखांनी सर्व लोकांना सर्व बाजूंनी गिळीत असणारा तू (अतितृप्तीमुळे) जिभा चाटीत आहेस. हे विष्णो, आपल्या तेजाने सर्व जग व्यापून तुझी प्रखर तेजे जगाला ताप देत आहेत. ॥11-30॥
427-11
आणि येतुलाही आरोगण । करिता भुके नाही उणेपण । कैसे दीपन असाधारण । उदयले यया ॥427॥
आणि इतकेहि भक्षण करून याची भूक यत्किंचितही शांत झाली नाही. कसा याचा जठराग्नी अत्यंत प्रदिप्त झाला आहे.
428-11
जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । का भणगा दुकाळु पाहला । तैसा जिभांचा लळलळाटु देखिला । आवाळुवे चाटिता ॥428॥
ज्याप्रमाणे ज्वरातून उठलेला रोगी किंवा दुष्काळात सापडलेला भिकारी खाय खाय करतो, त्याप्रमाणे ओठ चाटतांना जिभेची वळवळ दिसत आहे.
429-11
तैसे आहाराचे नांवे काही । तोंडापासूनि उरलेचि नाही । कैसी समसमीत नवाई । भुकेलेपणाची ॥429॥
तसेच तुझ्या खाण्याचा नव्हे असा कोणताच पदार्थ तुझ्या तोंडातून सुटला नाही. अत्यंत भुकेचे नवल कसे आहे !
430-11
काय सागराचा घोटु भरावा ? । की पर्वताचा घासु करावा ? । ब्रह्मकटाहो घालावा । आघवाचि दाढे ॥430॥
संपूर्ण समुद्राचा घोट घ्यावा की सगळ्या पर्वताचा एकच घास करावा अथवा हे सर्व ब्रह्मांड असेच्या असेच दाढेखाली घालावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

431-11
दिशा सगळियाचि गिळाविया । चांदिणिया चाटूनि घ्याविया । ऐसे वर्तत आहे साविया । लोलुप्य बा तुझे ॥431॥
सगळ्या दिशा गिळून टाकाव्या की चांदण्या चाटून घ्याव्या, अशा प्रकारचा खरोखर तुझा हावरेपणा दिसत आहे.
432-11
जैसा भोगी कामु वाढे । का इंधने आगीसि हाकाक चढे । तैसी खातखाताचि तोंडे । खाखांते ठेली ॥432॥
ज्याप्रमाणे भोगाने भोगवासना वाढत जाते किंवा लाकडे घातल्याने अग्नि भडकतो, त्याप्रमाणे ही सर्व तुझी मुखे खाताखाताच खाखावलेली आहेत.
433-11
कैसे एकचि केवढे पसरले । त्रिभुवन जिव्हाग्री आहे टेकले । जैसे का कवीठ घातले । वडवानळी ॥433॥
तुझे एकच मुख कसे विस्तीर्ण पसरले आहे, पहा ! ज्याप्रमाणे वडवाग्नीमध्ये कवठ घालावे, त्याप्रमाणे हे संपूर्ण त्रिभुवन तुझ्या नुसत्या जिभेच्या टोकाला लागले आहे.
434-11
ऐसी अपार वदने । आता येतुली कैची त्रिभुवने । का आहारु न मिळता येणे माने । वाढविली सैंघ ॥434॥
अशी ही असंख्य मुखे आहेत. आता तितकी त्रिभुवने कोठली आणणार ?पुरेसा आहार मिळत नसतांना ज्यांचा ताप असहाय्य होतो, अशी मुखे का असंख्य वाढविलीस ?
435-11
अगा हा लोकु बापुडा । जाहला वदनज्वाळा वरपडा । जैसी वणवेयाचिया वेढा । सांपडती मृगे ॥435॥
देवा ! ज्याप्रमाणे वणव्याचा वेढा पडून, त्यात जनावरे सापडतात, त्याप्रमाणे तुझ्या मुखातील पेटलेल्या ज्वालांना बिचारे हे ब्रह्मांड बळी पडले आहे.

436-11
आता तैसे या विश्वा जाहाले । देव नव्हे हे कर्म आले । का जग चळचळा पांगिले । काळजाळे ॥436॥
आता तसेच या विश्वाला झाले. हे विश्वरूप म्हणजे देव नव्हे, हे लोकांचे दुर्दैव आहे किंवा जगरूपी जलचरांना पकडण्याकरिता काळाने आपलेच जाळे पसरले आहे.
437-11
आता इये अंगप्रभेचिये वागुरे । कोणीकडूनि निगिजैल चराचरे । ही वक्त्रे नोहेती जोहारे । वोडवली जगा ॥437॥
आता या अंगकांतीरूप पाशातून, हे चराचर प्राणी कोणीकडून बाहेर पडतील ?ही तुझी मुखे नसून, ही जगाला लाक्षागृहे झाली आहेत.
438-11
आगी आपुलेनि दाहकपणे । कैसेनि पोळिजे ते नेणे । परी जया लागे तया प्राणे । सुटिकाची नाही ॥438॥
अग्नीला आपल्या दाहकशक्तीने दुसर्‍याला मी कसा जाळतो, हे समजत नाही; पण ज्याला अग्नी लागतो तो मात्र जिवंत राहात नाही.
439-11
नातरी माझेनि तिखटपणे । कैसे निवटे हे शस्त्र कायि जाणे । का आपुलिया मारा नेणे । विष जैसे ॥439॥
किंवा माझ्या तीक्ष्णपणाने पदार्थ कसा कापला जातो, हे शस्राला माहीत नसते. किंवा माझ्याने मनुष्य कसा मरतो हे विषाला ज्याप्रमाणे कळत नाही,
440-11
तैसी तुज काही । आपुलिया उग्रपणाची सेचि नाही । परी ऐलीकडिले मुखी खाई । हो सरली जगाची ॥440॥
त्याप्रमाणे तुझे हे विश्वरूप कसे उग्र व भयंकर आहे याची तुला जाणीव नाही; पण अलीकडील मुखरूपी खाईत संपूर्ण जगच नाहीसे झाले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

441-11
अगा आत्मा तू एकु । सकळ विश्वव्यापकु । तरी का आम्हा अंतकु । तैसा वोडवलासी ? 41
सर्व ब्रह्मांडाचा एक अंतरात्मा असून सर्व जगतांत भरला आहेस, मग आम्हाला का असा प्राण घेणारा मृत्यु झालास ?
442-11
तरी मिया सांडिली जीवित्वाची चाड । आणि तुवांही न धरावी भीड । मनी आहे ते उघड । बोल पा सुखे ॥442॥
तरी मी जिवंत राहण्याची आशा सोडली आहे. आणखी तूंहि काही संकोच करू नकोस. तुझ्या मनात जे काही असेल ते स्पष्ट सांग.
443-11
किती वाढविसी या उग्ररूपा । आंगीचे भगवंतपण आठवी बापा । नाही तरी कृपा । मजपुरती पाही ॥443॥
आता या आपल्या रूपाचा भयंकरपणा किती वाढवितौस ? तुझ्या स्वतःच्या अंगी असलेल्या भगवंतपणाचे स्मरण ठेव. नाही तर माझ्यापुरती तरी कृपा कर.
(यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य व ऐश्वर्य असे हे लोकांना सुखच देणारे, सहा श्रेष्ठ गुण भगवंताचे ठिकानी नित्य असतात; म्हणून त्याला भगवान म्हणतात. यात संहार करण्याचा गुण नाही याची आठवण करून देण्याकरिता अर्जुनाने येथे ” आंगीचे भगवंतपण आठवी बापा ” असे म्हटले आहे. )

आख्याहि मे को भवानुग्ररूपो
नमोऽस्तु ते देववर प्रसीद ।
विज्ञातुमिच्छामिभवन्तमाद्यं
न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् ॥11. 31॥

अर्थ हे उग्र रूप धारण केलेला तू कोण आहेस मला सांग. हे देवश्रेष्ठा मी तुला नमस्कार करतो. माझ्यावर अनुग्रह कर. अगोदर मी तुला पूर्णत्वाने जाणण्याची इच्छा करीत आहे, कारण तुझीही प्रवृत्ति मला समजत नाही31॥
444-11
तरी एक वेळ वेदवेद्या । जी त्रिभुवनैक आद्या । विनवणी विश्ववंद्या । आइके माझी ॥444॥
वेदानेच जाणला जाणार्‍या, त्रैलोक्याच्या मूळ कारणा व त्रैलोक्याला पूज्य अशा भगवंता ! एक वेळ माझी प्रार्थना ऐक.
445-11
ऐसे बोलोनि वीरे । चरण नमस्कारिले शिरे । मग म्हणे तरी सर्वेश्वरे । अवधारिजो ॥445॥
असे बोलून, त्या श्रेष्ठ अर्जूनाने भगवंताच्या पायावर मस्तक ठेवले व म्हणाला, हे सर्वेश्वरा ! ऐक

446-11
मिया होआवया समाधान । जी पुसिले विश्वरूपध्यान । आणि एकेचि काळे त्रिभुवन । गिळितुचि उठिलासी ॥446॥
माझे समाधान व्हावे म्हणून मी तुला विश्वरूप दाखविण्याची प्रार्थना केली आणि तू तात्काळ संपूर्ण ब्रह्मांड गिळितच प्रगट झालास.
447-11
तरी तू कोण का येतुली । इये भ्यासुरे मुखे का मेळविली । आघवियाचि करी परिजिली । शस्त्रे काह्या ॥447॥
तरी तू कोण आहेस ?अशी एवढीं मुखे कशाकरिता घेतलीस ?व संपूर्ण हातामध्ये परजलेली शस्रे कशाला धारण केलीस ?
448-11
जी जव तव रागीटपणे । वाढोनि गगना आणितोसि उणे । का डोळे करूनि भिंगुळवाणे । भेडसावीत आहासी ॥448॥
आणि देवा ! जेव्हा तेव्हा क्रुध्दपणाने वाढून आकाशाला का मागे टाकतोस आणि अत्यंत लाल डोळे वटारून आम्हाला का भीति दाखवितोस ?
449-11
एथ कृतांतेसि देवा । कासया किजतसे हेवा । हा आपुला तुवा सांगावा । अभिप्राय मज ॥449॥
देवा ! या ठिकाणी महामृत्यूशी तू कशाला स्पर्धा करीत आहेस ? असे करण्यात तुझ्या मनातील हेतु काय आहे, तो मला सांग.
450-11
या बोला म्हणे अनंतु । मी कोण हे आहासी पुसतु । आणि कायिसयालागी असे वाढतु । उग्रतेसी ॥450॥
हे अर्जुनाचे म्हणणे ऐकून, भगवंत म्हणतांत, मी कोण आहे व आपले ऐवढे उग्र स्वरूप का वाढवित आहे, हेच तू विचारित आहेस.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
श्रीभगवानुवाच ।
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो
लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः॥
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे
येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥11. 32॥

अर्थ श्रीकृष्ण म्हणाले, लोकाचा संहार करणारा व त्यासाठी वृद्धि पावलेला मी काळ आहे. येथे मी लोकाचा संहार करण्यासाठी प्रवृत्त झालो आहे. तुझ्याकखेरीज दोन्ही पक्षांच्या प्रत्येक समुदायामध्ये जे योद्धे आहेत ते सर्व नाहीसे होतील ॥11-32॥

दिवस १४४ वा, २४, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १७१७ ते १७२८
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. १७१७
धन्य मी मानीन आपुले संचित । राहिलीसे प्रीत तुझे नामी ॥१॥
धन्य जालो आता यासि संदेह नाही । न पडे या वाही काळा हाती ॥धृपद॥
ब्रम्हरस करू भोजन पंगती । संतांचे संगती सर्वकाळ ॥२॥
तुका म्हणे पोट धालेचि न धाये । खादलेचि खाये आवडीने ॥३॥
अर्थ

मी माझे संचित धन्य मानिन कारण हरीच्या नामा विषयी माझे प्रेम जडले आहे. मी धन्य झालो यात कोणताही संदेह नाही आता मी कधीही काळाच्या हाती सापडणार नाही. आता केवळ संतांच्या संगतीत बसून ब्रम्‍हरसाचे भोजन करू. तुकाराम महाराज म्हणतात ब्रम्हरस भोजन कितीही सेवन केले तरी पोट भरतच नाही कितीही खाल्ले तरी अजून खावेसेच वाटते.
अभंग क्र. १७१८
आवडी न पुरे सेविता न सरे । पडियेली धुरेसवे गाठी ॥१॥
न पुरे हा जन्म हे सुख साठिता । पुढती ही आता हे चि मागो ॥धृपद॥
मारगाची चिंता पालखी बैसता । नाही उसंतिता कोसपेणी ॥२॥
तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । जाणे ते लागली भूक तहान ॥३॥
अर्थ

हरीचे नाम कितीही सेवन केले तरी पोट भरल्यासारखे वाटत नाही आणि भूकही भागत नाही त्यामुळे मी हरीचे नाम घेतो आणि त्या कारणाने मला हरीची भेट झाली आहे. हरीचे सुख साठवण्या करिता हा मनुष्य जन्म पुरेसा पडणार नाही त्यामुळे पुन्हा हरीचे सुख साठविण्या करता आपण हरीला मनुष्यजन्मच मागु. पालखीत बसल्यानंतर किती कोस चालावे लागते याची चिंता पालखीत बसणाऱ्याला नसते कारण त्याला चालण्याचे श्रम नसते. त्याप्रमाणे हरीचे सुख भोगण्यासाठी आम्हाला कितीही जन्म घ्यावे लागले तरी आम्हाला त्याचे काहीच वाटणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात माझी विठ्ठल माऊली मला तहान भूक लागली की सर्व काही जाणून घेते.
अभंग क्र. १७१९
नाही त्रिभुवनी सुख या समान । म्हणऊनि मन स्थिरावले ॥१॥
धरियेली जीवी पाउले कोमळी । केली एकावळी नाममाळा ॥धृपद॥
शीतळ होऊनिया पावलो विश्रांती । न साहे पुढती चाली चित्ता ॥२॥
तुका म्हणे जाले सकळ सोहळे । पुरविले डोहळे पांडुरंगे ॥३॥
अर्थ
हरी भजनाच्या सारखे सुख या त्रिभुवनात हि नाही त्यामुळे त्या ठिकाणीच माझे मन स्थिरावले आहे. विठ्ठलाचे पाऊले देखील या त्रिभुवनात ही त्याच्या समान काहीच नाही त्यामुळे मी विठ्ठलाची कोवळी पाऊले तसेच विठ्ठलाचे नाम माळ माझ्या कंठातच स्थापन केले आहे. त्यामुळे माझे शरीर त्रिविधतापासून अतिशय शितल होऊन मी विश्रांत पावलो आहे आणि या कारणामुळे मला आता संसार मधील झालेली प्रवृत्ती देखील सहन होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता माझे सर्व सुखसोहळा पूर्ण झाले असून पांडुरंगाने माझे संपूर्ण डोहाळे म्हणजे इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.
अभंग क्र. १७२०
मायबापापुढे लाडीके लेकरू । तैसे बोल करू कवतुके ॥१॥
कृपावंता घाली प्रेमपान्हारस । वोळली वोरस पांडुरंगे ॥धृपद॥
नाही धीर खुंटी जवळी हुंबरे । ठायी च पाखर कवळिती ॥२॥
तुका म्हणे मज होऊ नेदी सीण । कळो नेदी भिन्न आहे तैसे ॥३॥
अर्थ

देवा आई-बापा पुढे लहान मुल आवडीने व लाडाने बोलते अगदी त्याप्रमाणे मी तुझ्याशी कौतुकाने बोलत आहे मी लाडाने बोलत आहे. हे कृपावंता पांडुरंगा तुही आम्हाला प्रेम रसपानहा पाजावे. अहो खुंटीला बांधलेले वासरू स्तनपान करण्यासाठी गाई कडे बघून सारखे हुंबरत असते आणि गाय देखील त्या वासराकडे प्रेमाने पाहून त्यालासारखे पाहून प्रेमाने साटत असते. तुकाराम महाराज म्हणतात देवा अगदी त्याप्रमाणे तू आणि मी आपण दोघेही भिन्न आहोत असे मला कधीही वाटू देऊ नकोस आणि तुझ्या वियोगाचा व्यर्थ शिण मला होऊ देऊ नकोस.
अभंग क्र. १७२१
उत्तम घालावे आमुचिये मुखी । निवारावे दुःखी होऊ नेदी ॥१॥
न बैसे न वजे जवळूनि दुरी । मागे पुढे वारी घातपात ॥धृपद॥
नाही शंका असो भलतिये ठायी । मावळले पाही द्वैताद्वैत ॥२॥
तुका म्हणे भार घेतला विठ्ठले । अंतरी भरले बाह्य रूप ॥३॥
अर्थ

हा पाडूरंग जे उत्तम आहे तेच आमच्या मुखामध्ये घालतो ते म्हणजे हरीनाम आणि आम्हाला कधीही हा पाडूरंग दु:खी होऊ देत नाही आमचे सर्व दु:ख निवारण करतो. हा पाडूरंग कधी बसत नाही व कधीही आमच्याजवळून दूर जात नाही केवळ आमच्यासाठी व आमच्यावर मागेपुढे होणाऱ्या घातपाताचे निवारणही हा करतो. आता आम्हाला कसल्याही प्रकारचे भय राहीले नाही कारण आमच्या मनातील द्वैत अद्वैत मावळले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “या पाडूरंगानेच आमच्या योगक्षेमाचा भार घेतला आहे व त्याचेच रुप आमच्या अंतरंगात व बाह्यरंगात भरले आहे. ”
अभंग क्र. १७२२
आठवूंचि नेंदी आवडी आणीक । भरूनिया लोक तिन्ही राहे ॥१॥
मन धावे तेथे तिचेचि दुभते । संपूर्ण आइते सर्वकाळ ॥धृपद॥
न लगे वोळावी इंद्रिये धावता । ठाव नाही रिता उरो दिला ॥२॥
तुका म्हणे समपाउलाचा खुंट । केला बळकट हालो नेदी ॥३॥
अर्थ

हा पाडूरंग मला इतर कोणत्याही व्यर्थ गोष्टी आठवू देत नाही व त्याविषयी आवडही निर्माण होऊ देत नाही कारण हा तीन्ही लोकांमध्ये भरुन राहीला आहे. माझे मन जिथे जिथे धावते तिथे तिथे या विठाईचेच प्रेमरुपी दूध मला मिळते व ते संपूर्ण सर्वकाळ आयते मिळते. आता माझ्या इंद्रियांना वळवण्याची गरज मला लागत नाही कारण सर्वत्र ही विठाईच भरुन उरली आहे त्यामुळे कोठेही जावे तेथे विठाईच राहाते मग इंद्रियांना इतर कोणत्याही विषयांकडे वळण्यास गरजच पडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “हा विठ्ठल आपले समचरण पाऊल विटेवर ठेवून बळकटपणे उभा आहे व आम्हीही त्याला कधी हलू देणार नाही. ”
अभंग क्र. १७२३
आम्हा अळंकार मुद्रांचे शृंगार । तुळसीचे हार वाहो कंठी ॥१॥
लाडिके डिंगर पंढरिरायाचे । निरंतर वाचे नामघोष ॥धृपद॥
आम्हा आणिकाची चाड चित्ती नाही । सर्व सुख पायी विठोबाच्या ॥२॥
तुका म्हणे आम्ही नेघोंचि या मुक्ती । एकाविण चित्ती दुजे नाही ॥३॥
अर्थ

आम्हा हरीभक्तांना आमचे अलंकार म्हणजे मुद्रांचे श्रृंगार तसेच तुळशीचे हार कंठी धारण करणे हेच आहे. आम्ही या पंढरीरायाचे लाडके सेवक आहोत व आमच्या वाचेने त्याचे नामघोष आम्ही निरंतर करत राहू. आता इतर कोणाविषयी आमच्या चित्तामध्ये आवड नाही सर्व सुखच या विठोबाच्या पायामध्ये आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “या विठोबावाचून दुसरे कोणी आमच्या चित्तामध्ये नाही आम्हाला कोणी मुक्ती घ्या म्हटले तरी आम्ही मुक्ती घेणार नाही. ”
अभंग क्र. १७२४
चला पंढरीसी जाऊ । रखुमादेवीवरा पाहू ॥१॥
डोळे निवतील कान । मना तेथे समाधान ॥धृपद॥
संता महंता होतील भेटी । आनंदे नाचो वाळवंटी ॥२॥
ते तीर्थांचे माहेर । सर्वसुखाचे भांडार ॥३॥
जन्म नाही रे आणीक । तुका म्हणे माझी भाक ॥४॥
अर्थ

हे जनहो चला आपण पंढरीस जावू आणि रुक्मादेवीचा वर पाडूरंग याला पाहू या. त्याच्या दर्शनाने डोळे आणि कथा श्रवणाने कान तृप्त होतील आणि तेथे मनालाही समाधान मिळेल. तेथे गेल्यानंतर आपल्याला संत महंत याची भेट होईल व आनंदाने आपण वाळवंटात नाचू. पंढरपूर म्हणजे सर्व श्रेत्रांचे माहेर तसेच सर्व सुखाचे भांडार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे जो कोणी तेथे जातो त्याला पुन: जन्ममरण नाही हे मी प्रतिज्ञेने सांगतो. ”
अभंग क्र. १७२५
पैल घरी जाली चोरी । देह करी बोंब ॥१॥
हाबा हाबा करिसी काय । फिराऊनि नेटया वाय ॥धृपद॥
सांडुनिया शुद्धी । निजलासी गेली बुद्धी ॥२॥
चोरी तुझा काढिला बुर । वेगळा भावा घातले दूर ॥३॥
भलतियासी देसी वाव । लाहेसि तू एवढा ठाव ॥४॥
तुका म्हणे अझुनि तरी । उरले ते जतन करी ॥५॥
अर्थ

देहाच्या पलीकडे असलेल्या आत्मवस्तूची चोरी झाली व त्यामुळे अज्ञान निर्माण होऊन जीव “मी व माझे” असे बोंब मारीत आहे. अरे तू पुन्हा फिरुन या भवसागरातील गोष्टींसाठी हाव का करतो आहेस ? ज्ञान विसरुन गेलास त्यामुळे तुझी शुध्द हरपली आणि त्या कारणानेच तुझी आत्मभूती नष्ट झाली आहे. तुझी आत्मवस्तू चोरीला त्यामुळे तुझे ऊर दडपून गेले आहे खरे तर तुला आत्मभावापासून वेगळे करुन प्रकृतीभावात दूर नेऊन टाकले आहे. अरे तू भलत्याच गोष्टींना वाव देत बसलास त्यामुळे तुला अशी स्थिती प्राप्त झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “मागे जे झाले ते झाले आता तुझ्याकडे जे आत्मप्राप्तीचे साधने उरले आहेत तेवढे तू जतन कर. ”
अभंग क्र. १७२६
किती वेळी खादला दगा । अझून का जागसी ना ॥१॥
लाज नाही हिंडता गावे । दुःख नवे नित्य नित्य ॥धृपद॥
संवचोरा हाती फासे । देखता कैसे न देखसी ॥२॥
तुका म्हणे सांडिती वाट । तळपट करावया ॥३॥
अर्थ

अरे तू जन्ममरणरुपी दगा किती वेळा खाल्ला आहेस मग तू अजूनही जागा हा होत नाहीस ? चौऱ्याऐंशी लक्ष योनीचे गाव फिरताना आणि अनेक प्रकारचे नित्य नवेनवे दु:ख भोगताना तुला लाज तरी कशी वाटत नाही. अरे तुझ्याबरोबर त्रिगुण काम क्रोध इत्यादी चोर फिरतात तुझ्या हातात नको ती विषयाचे सुखाचे फासे तुला देतात ते तुला प्रत्यक्ष दिसत असतानाही तू न दिसल्यासारखे का करतो आहेस ? तुकाराम महाराज म्हणतात, “अरे तुझे वाटोळे करण्यासाठीच हे त्रिगुणरुपी चोर तुझी परमार्थाची वाट सोडण्यास तुला प्रवृत्त करत आहेत. ”
अभंग क्र. १७२७
मुदलामध्ये पडे तोटा । ऐसा खोटा उदीम ॥१॥
आणिकाची का लाज नाही । आळसा जिही जिंतिले ॥धृपद॥
एके सांते सरिखी वित्ते । हानि हिते वेगळाली ॥२॥
तुका म्हणे हित धरा । नव्हे पुरा गावढळ ॥३॥
अर्थ

ज्या व्यापारामुळे मुद्दलामधे तोटा होतो तो व्यापार खोटा आहे. अरे ज्यांनी आळसाला जिंकले आहे त्यांना पाहून तरी तुला लाज कशी वाटत नाही ? या जगामध्ये भगवंताने सर्वाना मन, बुध्दी, इंद्रिय आणि मनुष्यदेह हे भांडवल सारखेच दिले आहे असे असून देखील एकाला फायदा व एकाला तोटा का होतो आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, “याकरता आपले हित होण्यासाठी तुम्ही काहीतरी विचार करा एकदमच असे गावंढळ सारखे राहू नका. ”
अभंग क्र. १७२८
निरोप सांगता । न धरी भय न करी चिंता ॥१॥
असो ज्याचे त्याचे त्याचे माथा । आपण करावी ते कथा ॥धृपद॥
उतरावा भार । किंवा न व्हावे सादर ॥२॥
तुका म्हणे धाक । तया इह ना परलोक ॥३॥
अर्थ

मी देवाचा आणि संतांचा निरोप सांगताना मनामध्ये कोणत्याही प्रकारचे भय किंवा चिंता अजिबात बाळगणार नाही. आता आपण केवळ आनंदाने हरिकथा करण्याचे काम करावे कोणी कथा ऐको किंवा न ऐको ज्याचे त्याचे गुणदोष ज्याच्या त्याच्या माथ्यावर राहतील त्यामुळे आपण ती चिंता करू नये आपण केवळ आनंदाने हरिकथा करावी. आपण आपल्या माथ्यावरील देवाचा निरोप सांगण्याचा भार उतरावा मग तो निरोप म्हणजे हरिकथा ऐकण्यासाठी कुणी तत्पर असो किंवा नसो आपण आपले कर्तव्य करावे. तुकाराम महाराज म्हणतात जो हरीचा निरोप म्हणजे हरिकथा करताना हरिने सांगितलेले कार्य सांगण्यास मनामध्ये कोणाचे भय बाळगत असेल तर त्याला इहलोकातही व परलोकात ही सुख मिळत नाही.

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading