आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२० मे, दिवस १४० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ३२६ ते ३५० सार्थ तुकाराम गाथा अभंग १६६९ ते १६८०
“२० मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २० May
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २० मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १६६९ ते १६८० चे पारायण आपण करणार आहोत.
२० मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ३२६ ते ३५०,
326-11
तैसे या जगासि जाहले । तूते देखोनि तळमळित ठेले । यामाजी पैल भले । ज्ञानशूरांचे मेळावे ॥326॥
त्याप्रमाणे या संपूर्ण त्रैलोक्याला झाले असून, तुला पाहून, ते अत्यंत तळमळत आहे. यामध्ये पलीकडे मोठमोठे ज्ञानियांचे मेळावेहि आहेत.
अमी हि त्वां सुरसंघा विशन्ति
केचिद्भीताः प्राञ्जलयो गृणन्ति ।
स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्घाः
स्तुवन्ति त्वां सुतिभिः पुष्कलाभिः ॥11. 21
अर्थ हे देवाचे समुदाय तुझ्यामधे प्रवेश करीत आहेत, कोणी भयभीत होत्साते अंजलि करून तुझे स्तवन करत आहेत. महर्षी व सिद्ध यांचे समुदाय ‘स्वस्ति ” असे म्हणून दीर्घ स्तोत्रांनी तुझी स्तुती करत आहेत. ॥11-21॥
327-11
हे तुझेनि आंगिके तेजे । जाळूनि सर्व कर्मांची बीजे । मिळत तुज आंतु सहजे । सद्भावेसी ॥327॥
हे देवाचे समुदाय, तुझ्या अंगाच्या तेजाने आपल्या सर्व कर्माची बीजे जळून आपल्या सद्भावाने तुझ्यात मिळत आहेत.
(चैतन्य प्रकाशरूप परमेश्वराचे ठिकाणी, त्यावाचून कर्म म्हणून दुसरी वस्तुच नाही, या ज्ञानाने किंवा कर्मरूपानेहि परमेश्वरच भासतो, या ज्ञानाने भगवाज्ञा समजून भगवत्प्रित्यर्थ निष्काम कर्मयोगानुष्ठान करून आपले कर्मकर्तृत्व निःशेष नाहीसे करतात. )
328-11
आणिक एक सावियाचि भयभीरु । सर्वस्वे धरूनि तुझी मोहरु । तुज प्रार्थिताति करु । जोडोनिया ॥328॥
आणि कित्येक खरोखरच भयभीत होऊन व सर्वस्वी तुझ्याकडे दृष्टि देऊन, हात जोडून तुझी प्रार्थना करीत आहेत की,
329-11
देवा अविद्यार्णवी पडिलो । जी विषयवागुरे आंतुडलो । स्वर्गसंसाराचिया सांकडलो । दोही भागी ॥329॥
देवा ! आम्ही तुला निःशेष विसरलो आहो व विषयसक्तिरूप जाळ्यात सांपडलो आहो. त्यामुळे स्वर्गसुख व संसारसुख या दोहोंच्या कात्रींत अडकून पडलो आहो.
330-11
ऐसे आमुचे सोडवणे । तुजवाचोनि कीजेल कवणे ? । तुज शरण गा सर्वप्राणे । म्हणत देवा ॥330॥
अशा आमची, येथून सुटका आता तुझ्यावाचून कोण करणार ? देवा ! आम्ही तुलाच पंचप्राण समर्पण करून शरण आलो आहो, असे म्हणत आहे
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
331-11
आणि महर्षी अथवा सिद्ध । का विद्याधरसमूह विविध । हे बोलत तुज स्वस्तिवाद । करिती स्तवन ॥331॥
आणि महर्षि अथवा सिध्द, तसेच नानाविध विद्याधरांचे समुदाय ” तुझे कल्याण असो ” असे म्हणून तुझे स्तवन करीत आहेत.
रुद्रादित्या वसवो ये च साध्या
विश्वेऽश्विनौ मरुतश्चोश्मपाश्च ।
गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्घा
वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ॥22॥
अर्थ अकरा रुद्र, बारा आदित्य, अष्ट वसु, साध्य, विश्वेदेव, अश्विनीकुमार, वायु, पितर, गंधर्व, यक्ष, राक्षस यांचे समुदाय सर्व विस्मययुक्त झालेले तुझ्याकडे पहात आहेत. ॥11-22॥
332-11
हे रुद्रादित्यांचे मेळावे । वसु हन साध्य आघवे । अश्विनौ देव विश्वेदेव विभवे । वायुही हे जी ॥332॥
अकरा रुद्रांचा समूह, बारा सूर्याचा समूह, आठ वसू, सर्वसाध्य, अश्विनुकुमार, वैभवाने युक्त असे विश्वदेव, तसेच वायु
333-11
अवधारा पितर हन गंधर्व । पैल यक्षरक्षोगण सर्व । जी महेंद्रमुख्य देव । का सिद्धादिक ॥333॥
पहा ! पितर, गंधर्व, पलीकडे असलेले यक्षराक्षसगण, इंद्रादिदेव आणि सिध्दादिक
334-11
हे आघवेचि आपुलालिया लोकी । सोत्कंठित अवलोकी । हे महामूर्ती दैविकी । पाहात आहाती ॥334॥
हे सर्वच आपआपल्या लोकांमध्ये अंत उत्कंठित होऊन तुझ्या या दैवी महामूर्तीकडे पाहात आहेत, हे पहा.
335-11
मग पाहात पाहात प्रतिक्षणी । विस्मित होऊनि अंतःकरणी । करित निजमुकटी वोवाळणी । प्रभुजी तुज ॥335॥
मग पाहत पाहत क्षणोक्षणी अंतःकरणात आश्चर्यचकित होऊन, आपल्या शिरावर असलेल्या मुकुटांची तुझ्यावरून ओवाळणी करीत आहेत.
336-11
ते जय जय घोष कलरवे । स्वर्ग गाजविताती आघवे । ठेवित ललाटावरी बरवे । करसंपुट ॥336॥
ते मंजुळ शब्दांनी तुझा जयघोष करून, संपूर्ण स्वर्ग दुमदुमून टाकीत आहेत आणि सुंदर जोडलेले हात ते मस्तकावर ठेवित आहेत.
337-11
तियेविनयद्रुमाचिये आरवी । सुरवाडे सात्त्विकांची माधवी । म्हणौनि करसंपुटपल्लवी । तू होतासिफळ ॥337॥
त्या अत्यंत नम्रतारूप वृक्षाच्या अरण्यात सात्विक गुणांच्या वसंतऋतूंचे ऐश्वर्य प्रगट झालें; म्हणून त्यांच्या जोडलेल्या हस्तरूपी पदरांत फळरूपाने तू प्राप्त होतोस.
रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं
महाबाहो बहुबाहूरुपादम् ।
बहूदरं बहुदंष्ट्राकरालं
दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाऽहम् ॥11. 23॥
अर्थ हे महाबाहो, अनंत मुखे व नेत्र असलेले अनंत बाहू, मांड्या व पाय असलेले, अनंत उदरे असलेले, अनंत दाढांच्या योगे भीषण असलेले तुझे प्रचंड रूप पाहून तसाच मी देखील व्याकुळ झालो आहे. ॥11-23॥
338-11
जी लोचना भाग्य उदेले । मना सुखाचे सुयाणे पाहले । जे अगाध तुझे देखिले । विश्वरूप इही ॥338॥
अहो जी भगवंता ! मन व डोळे यांनी जे तुझे अगाध विश्वरूप पाहिले, ते डोळ्यांचे भाग्य उदयाला आले व मनाने सुखाचा सुकाळ पाहिला.
339-11
हे लोकत्रयव्यापक रूपडे । पाहता देवांही वचक पडे । याचे सन्मुखपण जोडे । भलतयाकडुनी ॥339॥
हे तिन्ही लोकांना व्यापून असणारे तुझे विश्वरूप पाहतांना देवांनाहिं धाक उत्पन्न होतो आणि कोणालाहि ते सन्मुखच वाटते.
340-11
ऐसे एकचि परी विचित्रे । आणि भयानके वक्त्रे । बहुलोचन हे सशस्त्रे । अनंतभुजा ॥340॥
याप्रमाणे हे तुझे विश्वरूप एकच पण विचित्र आणि भयानक अशा भयानक अशा असंख्य मुखांनी नेत्रांनी व शस्रयुक्त अनंत भुजांनी युक्त आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
341-11
अनंत चारु बाहु चरण । बहूदर आणि नानावर्ण । कैसे प्रतिवदनी मातलेपण । आवेशाचे ॥341॥
या विश्वरूपाचे ठिकाणी असंख्य उर, बाहू व चरण असून बहु उदरे आणि नाना वर्ण आहेत आणि प्रत्येक मुखाचे ठिकाणी खाण्याच्या आवेशाचा माज कसा दिसून येतो, पहा !
342-11
हो का महाकल्पाचिया अंती । तवकलेनि यमे जेउततेउती । प्रळयाग्नीची उजिती । आंबुखिली जैसी भीम ॥342॥
जणु काय महाकल्पाच्या शेवटी क्रुध्द झालेल्या यमाने जिकडे तिकडे प्रलयकालच्या अग्नीच्या होळ्याच पहरल्या आहेत.
343-11
नातरी संहारत्रिपुरारीची यंत्रे । की प्रळयभैरवाची क्षेत्रे । नाना युगांतशक्तीची पात्रे । भूतखिचा वोढविली ॥343॥
किंवा सृष्टि संहार करणार्या शंकराची शस्रास्रेंच. की प्रलयकालच्या भैरवाची शरीरेंच आणि युगाचा अंत करणार्या शक्तीची सोंगे भूतांचा नाश करण्याकरिता प्राप्त झाली.
344-11
तैसी जियेतियेकडे । तुझी वक्त्रे जी प्रचंडे । न समाती दरीमाजी सिंव्हाडे । तैसे दशन दिसती रागीट ॥344॥
त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुझी असलेली भयंकर मुखे मावत नाहीत आणि तसेंच त्यातील दात दरीतील क्रुध्द सिंहाप्रमाणे रागीट दिसतात.
345-11
जैसे काळरात्रीचेनि अंधारे । उल्हासत निघती संहारखेंचरे । तैसिया वदनी प्रळयरुधिरे । काटलिया दाढा ॥345॥
ज्याप्रमाणे प्रलयकाळाच्या गडद अंधाराचा आश्रय करून प्राण्यांचा नाश करणारी पिशाच्चे अत्यंत उल्हासाने वावरतात, त्याप्रमाणे तुमच्या मुखातील दाढा, जणू काय प्रलयकाली संहार पावणार्या प्राण्यांच्या रक्ताने माखलेल्या आहेत.
346-11
हे असो काळे अवंतिले रण । का सर्व संहारे मातले मरण । तैसे अतिभिंगुळवाणेंपण । वदनी तुझिये ॥346॥
हे असो, काळानेच युध्दाला आमंत्रण दिल्याप्रमाणे किंवा सर्व प्राण्यांचा संहार करून मरणाने माजावे, त्याप्रमाणे तुझ्या या मुखांचा देखावा अत्यंत भयंकर दिसत आहे.
347-11
हे बापुडी लोकसृष्टी । मोटकीये विपाइली दिठी । आणि दुःखकालिंदीचिया तटी । झाड होऊनि ठेली ॥347॥
ही बिचारी सृष्टि, तू सहज दृष्टिने पाहिलीस आणि ती दुःखरूपी यमुनानदीच्या तीरावरील कालियासर्पाच्या विषाने करपलेल्या वृक्षाप्रमाणे होऊन राहिली आहे.
348-11
तुज महामृत्यूचिया सागरी । आता हे त्रैलोक्य जीविताची तरी । शोकदुर्वातलहरी आंदोळत असे ॥348॥
तुझ्या या महामृत्युच्या सागरांत, त्रैलोक्याच्या आयुष्याची नौका, दुःखरूपी वादळांतील लाटांनी हेलकावे खात आहे.
349-11
एथ कोपोनि जरी वैकुंठे । ऐसे हन म्हणिपैल अवचटे । जे तुज लोकांचे काई वाटे ? । तू ध्यानसुख हे भोगी ॥349॥
या माझ्या म्हणण्याचा राग येऊन, भगवंता ! आपण जर कदाचित असे म्हणाल की, तुलाया लोकांचे काय उगीच वाईट वाटत आहे ! तू माझ्या विश्वरूप ध्यानाचे सुख भोग.
350-11
तरी जी लोकांचे कीर साधारण । वाया आड सूतसे वोडण । केवी सहसा म्हणे प्राण । माझेचि कापती ॥350॥
पण खरोखरदेवा ! भीतीने माझ्या जीवाचा थरकाप झाला आहे, असेमी एकदम कसे म्हणूं ?म्हणूनच मी, व्यर्थ लोकांच्या दुःखांचे सामान्य निमित्त पुढे करीत आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १४० वा, २०, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १६६९ ते १६८०
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. १६६९
काय ऐसा जन्म जावा वायाविण । काही तरी ॠण असो माथा ॥१॥
कोणे तरी काळे होईल आठव । नाही जरी भाव भार खरा ॥धृपद॥
शता एकातरी जन्माच्या शेवटी । कृपाळुवा पोटी येईल दया ॥२॥
तुका म्हणे तरी नाही फांको देत । सर्वाचे उचित सापडले ॥३॥
अर्थ
आपल्याला चांगला मनुष्य देह मिळाला आहे तो असाच वाया जाऊ देणे चांगले आहे काय. आपल्याजवळ देवाच्या सेवेचे काहीतरी ऋण असू द्यावे. असे केल्याने केव्हातरी हरी आपल्याला भेट देईल कारण आपल्या माथ्यावर त्याच्या सेवेचा भार आहे त्या देवाची नितांत सेवा केल्याने शंभर जन्माच्या शेवटी का होईना पण कृपाळू देवाला आपल्या विषयी दया येईलच. तुकाराम महाराज म्हणतात सर्वात उत्कृष्ट साधन म्हणजे देवाची सेवा आहे त्यामुळे देवाच्या सेवेवाचून मी माझे मन इतर कोठेही फेकून देत नाही.
अभंग क्र. १६७०
नाही कोणी दिस जात वायाविण । साध्य नाही सीण लटिकाचि ॥१॥
एकाचिये माथा असावे निमित्त । नसो नाही हित कपाळी ते ॥धृपद॥
काही एक तरी बोलायाचा जागा । नेदिती वाउगा उभा ठाको ॥२॥
तुका म्हणे वर्मे कळो येती काही । ओळखी जे ठायी होईल ते ॥३॥
अर्थ
माझा एकही दिवस हरी सेवेवाचून जात नाही परंतु साध्य काहीच होत नसल्याने व्यर्थच शिणच होत आहे असेच मला वाटत आहे देवा. देवाच्या किंवा माझ्या माथ्यावर कर्तव्याचा दोष असला पाहिजे, पण तसे म्हणावे तर मी माझे कर्तव्य व्यवस्थित करत आहे, ठीक आहे जर माझ्या नशिबातच काही फल नसेल तर काय करावे, आणि असेल तर भेटेलच. आपल्या सेवेचे काही ऋण त्याच्यावर असेल तर तो आपल्याला त्याच्याशी बोलू देईल नाही तर तो आपल्याला त्याच्याजवळ उभा करणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात आपण जसजशी सेवा करू तसतशी देवाची व आपले अधिकच ओळख होत चालते व हरीचे नीजस्वरूप कसे आहे हे समजते.
अभंग क्र. १६७१
करील ते काय नव्हे विश्वंभर । सेवका दरिद्र लाज नाही ॥१॥
मजपासूनि हे पडिले अंतर । काय तो अव्हेर करू जाणे ॥धृपद॥
नामाच्या चिंतने नासी गर्भवास । नेदी करू आस आणिकाची ॥२॥
तुका म्हणे नेणो किती वाया गेले । तया उद्धरिले पांडुरंगे ॥३॥
अर्थ
विश्वंभराने ठाणले तर काय करणे त्याच्यासाठी अशक्य आहे तो सर्व काही करू शकतो असे असले तरी आपल्या सेवकाची सेवा किती दिन म्हणजे सेवकाने जी सेवा केली पाहिजे त्या मानाने आपण केलेली सेवा अतिशय कमी आहे तरीदेखील याविषयी तो लाज बाळगत नाही. असेच प्रत्येक सेवकाने आपल्या मनाशी म्हटले पाहिजे आणि आपल्याकडूनच हरीच्या सेवेत काहीतरी कमी पडले असेल, नाही तर हरीने आपला अव्हेर केला असता काय असा विचार केला पाहिजे. हरीचे नाम चिंतन केले कि, हरी आपल्याला जन्म मरण घेऊ देत नाही विश्वंभर इतर कोणत्याही गोष्टीची अपेक्षा आपल्याला करू देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात असे कितीतरी पापी होते की त्यांची गणती ही करणे अवघड होते परंतु केवळ नामचिंतने त्यांचा उद्धार देवाने केला.
अभंग क्र. १६७२
संध्या करितोसी केशवाच्या नावे । आरंभी ते ठावे नाही कैसे ॥१॥
किती या सांगावे करूनि फजित । खळ नेणे हित जवळी ते ॥धृपद॥
माजल्या न कळे उचित ते काय । न द्यावे ते खाय द्यावे सांडी ॥२॥
तुका म्हणे घेती भिंती सवे डोके । वावसी ते एके अंधारली ॥३॥
अर्थ
अरे तू संध्या केशवाच्या नामाने करतो परंतु सर्व गोष्टींचा आरंभ तो केशव आहे त्याचे तुला काहीच ज्ञान नाही, अशा मूर्खांना किती सांगावे किती यांची फजिती तरी किती करावी कारण यांच्या जवळ त्यांचे हित आहे तरीदेखील त्यांना कळत नाही. सत्तेच्या जिवावर असे मूर्ख लोक माजल्यासारखे करतात त्यांना जे खाऊ नको सांगितले तर ते लोक तेच खाणार आणि आपण जे खायला देऊ त्याचा ते स्वीकार करत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात असे अनेक मूर्ख लोक आहेत की ते अंधारामध्ये घराचा दरवाजा समजून भिंतीला डोके आदळत असतात.
अभंग क्र. १६७३
दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद । पडिलिया शुद्ध नव्हे मग ॥१॥
तैसे खळा मुखे न करावे श्रवण । अहंकारे मन विटाळले ॥धृपद॥
काय करावी ती बत्तीस लक्षणे । नाक नाही तेणे वाया गेली ॥२॥
तुका म्हणे अन्न जिरो नेदी माशी । आपुलिया जैसी संसर्गे ॥३॥
अर्थ
दुधाने भरलेल्या घागरी मध्ये दारूचा एक थेंब जरी पडला तरी ते दूध शुद्ध राहत नाही. त्याप्रमाणे जे स्वतःला खूप हुशार व शहाणे समजतात अशा मूर्ख लोकांच्या तोंडून हरिकथा केव्हाच श्रवण करू नये कारण त्यांचे मन अहंकाराने टाळलेले आहे. एखाद्या मुलीच्या ठिकाणी सौंदर्याचे बत्तीस लक्षणे आहेत परंतु तिला नाकच नाही तर मात्र ते सर्व लक्षण वाया जातात. तुकाराम महाराज म्हणतात अन्नामध्ये जर माशी पडली तर ती माशी पोटांमध्ये जाऊन तिचा संसर्ग करते व तिच्या संसर्गाने आपल्याला वांती होते त्याप्रमाणे अहंकारी व मूर्ख लोकांच्या मुखाने हरी कथा ऐकू नये कारण ती आपल्याला पचनी पडत नाही.
अभंग क्र. १६७४
सांगावे हे बरे असते हे पोटी । दुःख देते खोटी बुद्धि मग ॥१॥
आपला आपण करावा वेव्हार । जिंकोनि अंतर मन ग्वाही ॥धृपद॥
नाही मागे येत बोलिले वचन । पावावा तो सीण बरा मग ॥२॥
तुका म्हणे बहु भ्यालो खटपटे । आता देवा खोटे शब्द पुरे ॥३॥
अर्थ
जे आपल्याला पोटात मुझे ज्या चांगल्या गोष्टी आपल्या बुद्धीमध्ये आहेत ते इतरांना सांगावे जर सांगू नये असे वाटत असेल तर त्याची बुद्धी खोटी आहे आणि परिणामी ती बुद्धी आपल्याला दुःख देते. आपले मन जिंकून कोणताही व्यवहार हा धर्मनितीने करावा मग प्रत्येक व्यवहाराला आपले मनच साक्षी राहते. कोणाशीही बोलताना चांगले बोलावे बोलताना वाईट शब्द वापरू नयेत आणि जर वाईट शब्द वापरले तर त्याचा व्यर्थ शिणच होतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी आता संसाराच्या खटपटीला खूप भिलो आहे आणि आता हे संसारिक खोटे शब्दही मला नकोसे झाले आहेत.
अभंग क्र. १६७५
परिसे वो माते माझी विनवणी । मस्तक चरणी ठेवीतसे ॥१॥
भागीरथी महादोष निवारणी । सकळा स्वामिणी तीर्थांचिये ॥धृपद॥
जीता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तिरी । अहिक्यपरत्री सुखरूप ॥२॥
तुका विष्णुदास संतांचे पोसने । वागपुष्प तेणे पाठविले ॥३॥
अर्थ
हे गंगा माते मी जे काही बोलत आहे ती विनंती तू ऐक मी तुझ्या चरणी मस्तक ठेवत आहे. हे भागीरथी तू महा दोषाचे निवारण करणारी आहे आणि सर्व तीर्थांचे ही तू स्वामिनी आहेस. तुझ्या तीरी राहणाऱ्या सर्व लोकांना, जीवना मुक्ती, मोक्ष आणि सर्व प्रकारचे ऐहिक सुख मिळतात. तुकाराम महाराज म्हणतात हे गंगे माता मी संतांचा पोसणा दास आहे आणि संत हे विष्णुदास आहेत आणि मी जे काही शब्दरूपी पुष्प बोललो आहे ते शब्द त्यांनीच तुझ्यासाठी पाठविले आहे.
अभंग क्र. १६७६
तुम्ही विश्वनाथ । दीनरंक मी अनाथ ॥१॥
कृपा कराल ते थोडी । पाया पडिलो बराडी ॥धृपद॥
काय उणे तुम्हापाशी । मी तो अल्प चि संतोषी ॥२॥
तुका म्हणे देवा । काही भातुके पाठवा ॥३॥
अर्थ
हे देवा तुम्ही विश्वनाथ आहात आणि मी तर दिन रंक अनाथ आहे. हे विश्वनाथ मी तुमचा भक्त आहे तुम्ही थोडी का होईना पण माझ्यावर दया करा. देवा तुमच्याजवळ भक्तांना देण्यासाठी काय उणे आहे आणि मी तर अल्प संतोषी आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मला तुम्ही काहीतरी प्रेमरूपी भातुके म्हणजे खाऊ पाठवा.
अभंग क्र. १६७७
पिंड पदावरी । दिला आपुलिया करी ॥१॥
माझे जाले गयावर्जन । फिटले पितरांचे ॠण ॥धृपद॥
केले कर्मांतर । बोंब मारिली हरीहर ॥२॥
तुका म्हणे माझे । भार उतरले ओझे ॥३॥
अर्थ
मी माझ्या हाताने माझा पिंड विष्णू पदावर ठेवला आहे. त्यामुळे गया या तीर्थ ठिकाणी जाऊन पिंडदान करण्याची मला गरज नाही व त्यामुळेच पित्रांचे देखिल ऋण फिटले आहे. सर्व कर्म करून मी हरी आणि हर या नामाचे बोंब मारली आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता माझ्या वरील सर्व पितरांचे जे काही ऋण ओझे होते ते उतरले आहे.
अभंग क्र. १६७८
मथुरेच्या राया । माझे दंडवत पाया ॥१॥
तुमचे कृपेचे पोसने । माझा समाचार घेणे ॥धृपद॥
नाम धरिले कंठी । असे आर्तभूत पोटी ॥२॥
जीवीचे ते जाणा । तुका म्हणे नारायणा ॥३॥
अर्थ
हे मथुरेच्या राजा श्रीकृष्ण तुझ्या पायी माझे दंडवत आहे. मी तुमच्या कृपेने पोहोचला जाणारा भक्त आहे त्यामुळे तुम्ही माझा समाचार घ्यावा. आणि हीच माझी अर्त भूत इच्छा माझ्या पोटी आहे त्यामुळे मी तुमचे नाम माझ्या कंठात धारण केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा तुम्ही माझ्या मनातील सर्व ओळखा.
अभंग क्र. १६७९
जाय तिकडे लागे पाठी । नाही तुटी आठवाची ॥१॥
हिरोनिया नेले चित्त । माझे थीत भांडवल ॥धृपद॥
दावूनिया रूप डोळा । मन चाळा लावियेले ॥२॥
आणीक तोंडा पडिली मिठी । कान गोठी नाइकती ॥३॥
बोलिल्याचा आठव न घडे । वाणी ओढे ते सोई ॥४॥
तुका म्हणे प्रेमधगी । भरली अंगी अखंड ॥५॥
अर्थ
जिकडे जावे तिकडे देव माझ्या पाठीशी लागलेला असतो म्हणून त्याच्या स्मरणला तर तुटतच नाही. माझे सर्व भांडवल म्हणजे माझे चित्त आहे आणि तेच देवाने हिरावून नेले आहे. याने तर माझे रूप मला दाखवले आणि ते रूप मी माझ्या डोळ्याने पाहिले त्यामुळे मला तोच छंद लागलेला आहे. माझ्या तोंडाने असे ठरविले आहे की हरी वाचून कोणाचेही नाम घ्यायचे नाही आणि कानाने तर हरीच्या कथे वाचून कोणाच्याही गोष्टी ऐकायचं नाही व ते मला आवडतही नाही व इतर कथा मी ऐकत देखील नाही. हरीच्या छंदात मी काय बोललो आहे याची देखील मला आठवण राहत नाही आणि माझ्या वाणीला तर हरिनामाची इतकी आवड लागली आहे की त्या आवडीने त्याच्याकडेच मी ओढ घेत आहे. तुकाराम महाराज म्हणतात हरी विषयी माझ्या मनामध्ये अखंड आवड राहिली आहे.
अभंग क्र. १६८०
नको ऐसे जाले अन्न । भूक तहान ते गेली ॥१॥
गोविंदाची आवडी जीवा । करीन सेवा धणीवरी ॥धृपद॥
राहिले ते राहो काम । सकळ धर्म देहीचे ॥२॥
देह घरिला त्याचे फळ । आणीक काळ धन्य हा ॥३॥
जाऊ नेदी करिता सोस । क्षमा दोष करवीन ॥४॥
तुका म्हणे याचे पाठी । आता साटी जीवाची ॥५॥
अर्थ
मला अन्न नकोसे झाले आहे आणि तहान भूक तर कोठे गेली समजत नाही. कारण माझ्या जीवाला गोविंदाची आवड लागली आहे आणि त्याची सेवा मी तृप्त होईपर्यंत करणार आहे. या गोविंदाच्या सेवेपुढे मी माझ्या देहाचे सर्व धर्म सर्व कर्म ते बाजूला राहिले तर खुशाल राहू देत. हा देह धारण केल्याचे फळ म्हणजे नारायणाची सेवा आहे आणि त्याच्या सेवेत जाणारा देखील सर्वकाळ धन्य आहे. या गोविंदाची सेवा करताना मला कितीही कष्ट झाले तरी मला त्याची पर्वा नाही आणि माझ्याकडून जे दोष घडतील त्याची क्षमाही मी त्याच्याकडून करुन घेईन. तुकाराम महाराज म्हणतात, “मी माझा जीवच या गोविंदाला अर्पण केला आहे आता त्याची पाठ कधीही मी सोडणार नाही. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















