१९ मे, दिवस १३९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ३०१ ते ३२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १६५७ ते १६६८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१९ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण



हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १९ May
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १९ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १६५७ ते १६६८ चे पारायण आपण करणार आहोत.
१९ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ३०१ ते ३२५,

301-11
हो का महातेजाचिया महार्णवी । बुडोनि गेली सृष्टी आघवी । की युगांतविजूंच्या पालवी । झाकले गगन ॥301॥
असे वाटते जणू काय या तुझ्या महा तेजाच्या समुद्रांत सर्व सृष्टि बुडून गेली आहे किंवा कल्पांतसमयीच्या विजांच्या वस्रांनी सर्व आकाश झांकून टाकले आहे
302-11.
नातरी संहारतेजाचिया ज्वाळा । तोडोनि माचू बांधला अंतराळा । आता दिव्य ज्ञानाचिया डोळा । पाहवेना । 302
किंवा सर्व सृष्टिचा प्रलयकारी संहार करणार्‍या ज्वाळा तोडून जणू काय आकाशात माळाच बांधला; म्हणूनच आता ह्या माझ्या दिव्यदृष्टिनेहि ते तेज पाहवत नाही.
303-11
उजाळु अधिकाधिक बहुवसु । धडाडीत आहे अतिदाहसु । पडत दिव्यचक्षुंसही त्रासु । न्याहाळिता ॥303॥
ते तेज अधिकाधिक फार वाढून अत्यंत दाहक होत आहे व ते पाहतांना माझ्या दिव्यचक्षुलाहि त्रास होत आहे.
304-11
हो का जे महाप्रळयींचा भडाडु । होता काळाग्निरुद्राचिया ठायी गूढु । तो तृतीयनयनाचा मढू । फुटला जैसा ॥304॥
असे वाटते की महाप्रलयातील महातेजाचा भडका, काळाग्निरूद्राच्या ठिकाणी जो गुप्त होता, तो तृतीय नेत्ररूप तेजाचा सांठाच जणु काय बाहेर पडला.
305-11
तैसे पसरलेनि प्रकाशे । सैंघ पांचवनिया ज्वाळाचे वळसे । पडता ब्रह्मकटाह कोळिसे । होत आहाती ॥305॥
अशा त्या सर्वत्र पसरलेल्या तेजाने संपूर्ण पांचही अग्नीच्या (गार्हपत्य, आहवनीय, दाक्षिणाग्नि, सम्य आणि आवसथ्य असे पांच अग्नि) ज्वाळाचे वेढे पडल्यामुळे सर्व ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत.

306-11
ऐसा अद्भुत तेजोराशी । जन्मा नवल म्या देखिलासी । नाही व्याप्ती आणि कांतीसी । पारु जी तुझिये ॥306॥
याप्रमाणे जणु काय तेजाची राशीच असा अत्यंत आश्चर्यकारक, जन्मापासून आजच पाहत आहे. या तुझ्या व्याप्तीला व कान्तीला मर्यादाच नाही.
त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।
त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ॥11. 8॥

अर्थ वेदांकडून जाणण्याला योग्य असे अविनाशी ब्रह्म तू आहेस. या विश्वाचा अखेरचा आश्रय तू आहेस. अव्यय व शाश्वत अशा धर्माचा रक्षण करणारा आणि सनातन असा पुरुष तू आहेस असे मला वाटते. ॥11-18॥
307-11
देवा तू अक्षर । औटाविये मात्रेसि पर । श्रुती जयाचे घर । गिंवसीत आहाती ॥307॥
देवा ! वेद ज्या तुझ्या ठिकाणाचा शोध करीत आहे, तो तू अविनाशी असून ओंकाराच्या साडेतीन मात्रेच्या पलीकडे आहेस – म्हणजे ॐ कारालाहि तू अगम्य आहेस.
308-11
जे आकाराचे आयतन । जे विश्वनिक्षेपैकनिधान । ते अव्यय तू गहन । अविनाश जी ॥308॥
तू सर्व आकारांचा आश्रय आहेस म्हणजे सर्व नामरूपे तुझ्यावरच भासतात. संपूर्ण विश्व सांठविण्याचे एकमेव, नाश न पावणारे असे अविनाशी व अपार असे स्थान तूच आहेस.
309-11
तू धर्माचा वोलावा । अनादिसिद्ध तू नित्य नवा । जाणे मी सदतिसावा । पुरुष विशेष तू ॥309॥
तू धर्माचे जीवन असून, तू अनादि, स्वतःसिध्द व नित्य नूतन आहेस. प्रकृतिजन्य छत्तीस तत्वांच्या पलीकडे सदतिसावा विशेष पुरुष म्हणून जो सांगितला आहे, तो तू आहेस, हे मी आता जाणलें.
(सांख्यशास्राच्या मते पुरूष सोडून, कार्यप्रपंच म्हणून जी चोविस तत्वे सांगितली आहेत, त्यांचा थोडा विस्तार करून, माउलिंनी छत्तीस तत्वे मानली आहेत. ती छत्तीस तत्वे पुढे तेराव्या अध्यायात क्षेत्रांचे वर्णन करतांना सांगितली आहेत. आणि सांख्यात जसा चोविस तत्वांव्यतिरिक्त पंचविसावा पुरूष मानला आहे, तसा येथे छत्तीस तत्वाव्यतिरिक्त सदतिसावा पुरूष म्हणून, विश्वरूपाला मानले आहे. या प्रतिपादनाने भगवंताची सगुण व निर्गुन ही दोन्ही रूपे छत्तीस तत्वांच्या पलिकडे असल्यामुळे ती त्रिगुणात्मक मायारहित किंवा अविद्यारहित आहेत, असे सुचविले आहे. )

अनादिमध्यान्तमनन्तवीर्यं अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् ।
पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् ॥11. 19॥

अर्थ ज्याला आदि नाही, मध्य नाही व अंत नाही, ज्याच्या पराक्रमाला अंत नाही, ज्याचे बाहु अनंत आहेत, चंद्र, सूर्य ज्याचे नेत्र आहेत, दीप्तिमान अग्नी ज्याचे मुख आहे व आपल्या तेजाने जो या विश्वाला जणुकाय गिळून टाकत आहे असा तुला मी पहात आहे. ॥11=19॥
310-11
तू आदिमध्यातरहितु । स्वसामर्थ्ये तू अनंतु । विश्वबाहु अपरिमितु । विश्वचरण तू ॥310॥
तुला आदि, मध्य, अंत नाहीत. स्वतःच्या सामर्थ्याच्या दृष्टीने तू अनंत आहेस – म्हणजे तुझे सामर्थ्य अपरिमित आहे. सर्वत्र अपरिमित असे तुझे बाहु व चरण आहेत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

311-11
पै चंद्र चंडांशु डोळा । दावितासि कोपप्रसाद लीळा । एका रुससी तमाचिया डोळा । एका पाळितोसि कृपादृष्टी 311॥
तू आपल्या सूर्य व चंद्र या डोळ्यांनी कोप व अनुग्रह अशी लिला दाखवतोस. सूर्यरूपी क्रुध्द (तीक्ष्ण) डोळ्यांने रूसून नाश करतोस, तर चंद्ररूपी डोळ्याने कोणावर कृपा करून त्यांचे संरक्षण करतोस.
312-11
जी एवंविधा तूते । मी देखतसे हे निरुते । पेटले प्रळयाग्नीचे उजिते । तैसे वक्त्र हे तुझे ॥312॥
भगवंता ! याप्रमाणेच खरोखर मी तुला पाहत आहे. जणु काय प्रलयातील पेटलेल्या अग्नीचा लखलखाटच, असे हे तुझे मुख दिसत आहे.
313-11
वणिवेनि पेटले पर्वत । कवळूनि ज्वाळाचे उभड उठत । तैसी चाटीत दाढा दात । जीभ लोळे ॥313॥
जंगलांत लागलेल्या अग्नीने पर्वत पेटून जशा सर्व ज्वाळा मिळून त्यांचा एकच भडका उठावा, त्याप्रमाणे दात व दाढा चाटीत जीभ तोंडात सारखी फिरत आहे.
314-11
इये वदनींचिया उबा । आणि जी सर्वागकांतीचिया प्रभा । विश्व तातले अति क्षोभा । जात आहे ॥314॥
या तुझ्या मुखातील ज्वाळांच्या उष्णतेने आणि तुझ्या सर्वागाच्या अद्भूत तेजाने संपूर्ण विश्व होरपळून गेले असून अत्यंत व्याकूळ होत आहे.
द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः ।
दृष्ट्वाऽद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् ॥11. 20

अर्थ स्वर्ग व पृथ्वी यांच्यामधील हा सर्व प्रदेश तू एकट्याने व्यापला आहेस. सर्व दिशाही तू एकट्याने व्यापल्या आहेस. हे विश्वरूपा, हे तुझे अद्भुत व उग्र रूप पाहून त्रैलोक्य भयाने व्याकुळ झाले आहे. ॥11-20॥
(विश्वरूपाची भीती व ती वाटण्याचे अर्जुनानाच्या मते कारण =)
315-11
का जे द्यौर्लोक आणि पाताळ । पृथिवी आणि अंतराळ । अथवा दशदिशा समाकुळ । दिशाचक्र ॥315॥
कारण स्वर्ग, पाताळ पृथ्वी आणि अंतराळ अथवा दशदिशासहित संपूर्ण दिङ्मंडळ,

316-11
हे आघवेचि तुवा एके । भरले देखत आहे कौतुके । परि गगनाहीसट भयानके । आप्लविजे जेवी ॥316॥
आकाशासहित हे संपूर्ण विश्व बुडवून टाकावे, त्याप्रमाणे तू आपल्या एका भयंकर मुखात सहज भरले आहेस असे मी आश्चर्यचकित होऊन पाहत आहे.
317-11
नातरी अद्भुतरसाचिया कल्लोळी । जाहली चवदाही भुवनांसि कडियाळी । तैसे आश्चर्यचि मग मी आकळी । काय एक ? ॥317॥
किंवा अद्भुतरसाच्या कल्लोळांनी चवदाहि भुवनाला जसा वेढा दिला तसेच मीहि एक काय ते आश्चर्यच अनुभवित आहे. (एका आश्चर्याशिवाय मला काही दिसत नाही असा अर्थ).
318-11
नावरे व्याप्ती हे असाधारण । न साहवे रूपाचे उग्रपण । सुख दूरी गेले परि प्राण । विपाये धरीजे ॥318॥
कि️ तुझा हा असामान्य व्यापकपणा आकलन होत नाही व तुझ्या रूपाचे उग्रपणहि सहन करवत नाही. सुख होणे तर दूरच राहिलें; पण जगाला प्राण धारण करणे देखील कठीण झाले आहे.
319-11
देवा ऐसे देखोनि तूते । नेणो कैसे आले भयाचे भरिते । आता दुःखकल्लोळी झळंबते । तिन्ही भुवने ॥319॥
देवा ! ! तुझ्या अशा विश्वस्वरूपाला पाहून अशी भयंकर भीति का वाटत आहे हे सांगवत नाही; पण हे संपूर्ण त्रिभुवन या दुःखाच्या लाटांमध्ये गटांगळ्या खात आहे.
320-11
एऱ्हवी तुज महात्मयाचे देखणे । तरि भयदुःखासि का मेळवणे ? । परि हे सुख नव्हेचि जेणे गुणे । ते जाणवत आहे मज ॥320॥
खरोखर पाहता, तुज महात्म्याच्या दर्शनाने भीतिरूप दुःखाची प्राप्ति का व्हावी ? पण ज्या गुणामुळे याविश्वरूपदर्शनाचे सुख होत नाही, तो गुण मलाहि कळून येत आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

321-11
जव तुझे रूप नोहे दिठे । तव जगासि संसारिक गोमटे । आता देखिलासि तरी विषयविटे । उपनला त्रासु ॥321॥
जोपर्यंत तुझे हे विश्वरूप दृष्टीस पडत नाही, तोपर्यंत जीवांना संसारसुखच गोड वाटते आणि आता तुझ्या विश्वरूपदर्शनाने विषयसुखाचा वीट येऊन विषयांचा कंटाळा उत्पन्न झाला आहे.
322-11
तेवीचि तुज देखिलियासाठी । काय सहसा तुज देवो येईल मिठी । आणि नेदी तरी शोकसंकटी । राहो केवी ? ॥322॥
त्याचप्रमाणे तुझ्या भयंकर रूपाला पाहिल्यानंतर एकदम तुला प्रेमाने मिठी मारता येईल काय ? आणि प्रेमाने मिठी मारता येणार नाही, तर त्यावाचून विरहशोकसंकटात तरी कसे राहायचे !
323-11
म्हणौनि मागा सरो तव संसारु । आडवीत येतसे अनिवारु । आणि पुढा तू तव अनावरु । न येसि घेवो ॥323
म्हणून तुजपासून मागे सरावे, तर हा अनिवार संसार मागे फिरू देत नाही आणि समोर तुझे अनिवार स्वरूप आकलन करतिं येत नाही.
324-11
ऐसा माझारलिया सांकडा । बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा । हा ध्वनि जी फुडा । चोजवला मज । 324॥
याप्रमाणे संसारांचे भय आणि विश्वरूपाचे भय या दोन संकटाच्या कात्रींत सांपडलेल्या बिचार्‍या त्रैलोक्याचा होरपळा होत आहे, असा आशय स्पष्ट मला कळला आहे.
325-11
जैसा आरंबळला आगी । तो समुद्रा ये निवावयालागी । तव कल्लोळपाणियाचिया तरंगी । आगळा बिहे ॥325॥
ज्याप्रमाणे अग्नीने होरपळलेला मनुष्य, शरीराचा दाह नाहीसा करण्याकरिता, समुद्रावर जातो आणि त्या समुद्रावर उठणार्‍या भयंकर लाटांना पाहून, तो अत्यंत भितो,

दिवस १३९ वा, १९, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १६५७ ते १६६८
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. १६५७
ब्रम्हरसगोडी तयांसी फावली । वासना निमाली समूळ ज्यांची ॥१॥
नाही त्या विटाळ अखंड सोंवळी । उपाधीवेगळी जाणिवेच्या ॥धृपद॥
मन हे निश्चळ जाले एके ठायी । तया उणे काई निजसुखा ॥२॥
तेचि पुण्यवंत परउपकारी । प्रबोधी त्या नारीनरलोका ॥३॥
तुका म्हणे त्यांचे पायी पायपोस । होऊनिया वास करिन तेथे ॥४॥
अर्थ

ज्याची वासना समुळ नष्ट झाली त्याला ब्रम्‍ह रसाच्या गोष्टीचा अनुभव येतो. त्याला कोणत्याही प्रकारचे विटाळ नसते व तो नेहमी सोहळ्यात असतो तो सर्वापेक्षा वेगळा असतो शुद्ध असतो एवढेच नाही तर मी ब्रम्‍ह आहे ही जाणीव देखील त्याच्या ठिकाणी नसते. त्याचे मन स्थिर असते, चंचल नसते स्वरूपस्थितीच्या ठिकाणी त्याचे मन स्थिर असल्यामुळे त्याला स्वरूपाची जाणीव तरी कशी असणार ? जो शरण आलेल्या नरनारी ला प्रबोध करतो म्हणजे उपदेश करतो तो खरा परोपकारी आहे असे समजा. तुकाराम महाराज म्हणतात अशा ब्रम्‍ह रसाच्या ठिकाणी तल्लीन असलेल्या ब्रम्‍हज्ञान्याच्याजवळ त्याचे पाय होऊन मी राहील व ब्रम्‍ह रस सेवन करीन.

अभंग क्र. १६५८
जैसे तैसे राहे देवाचे हे देणे । यत्न करिता तेणे काय नव्हे ॥१॥
दासा कृपासिंधु नुपेक्षी सर्वथा । अंतरींची व्यथा कळे त्यासी ॥धृपद॥
मागो नेणे परी माय जाणे वर्म । बाळा नेदी श्रम पावो काही ॥२॥
तुका म्हणे मज अनुभव अंगे । वचन वाउगे मानेना हे ॥३॥
अर्थ

आपण जशा प्रकारची भक्ती करू तशा प्रकारचे देणे देव देत असतो परंतु आपण जर सात्विक मनाने भक्ती केली तर काय असाध्य आहे ? जो अनन्य भक्तीने हरीचा दास झालेला असतो त्याची कृपासिंधू हरी सर्व प्रकारची अंतरंगातील व्यथा जाणतो व त्याची कधीही उपेक्षा करत नाही. लहान बाळाला कोणत्या वेळी काय मागावे हे समजत नाही परंतु त्या बाळाला कोणत्या वेळी काय द्यावे, काय करावे लागते याचे वर्म हे कोणालाही समजणार नाही ते केवळ त्याच्या आईलाच समजते आणि ती आई त्या बालकाला काहीच कष्ट होऊ देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या बाबतीत हा अनुभव माझ्या अंगी भिनलेला आहे देव भक्तांची उपेक्षा करतो हे मी मानत नाही.

अभंग क्र. १६५९
परद्रव्यपरनारीचा अभिलास । तेथूनि ऱ्हास सर्वभाग्य ॥१॥
घटिका दिवस मास वरुषे लागेतीन । बांधले पतन गांठोडीस ॥धृपद॥
पुढे घात त्याचा रोकडा शकुन । पुढे करी गुण निश्चयेंसी ॥२॥
तुका म्हणे एका थडता थवड । काळ लागे नाड परी खरा ॥३॥
अर्थ

जो मनुष्य परद्रव्य आणि परनारी यांचा भोग घेतो तिथून पुढे त्याच्या भाग्याचा ऱ्हास होतो अशा मनुष्याच्या गाठी म्हणजे पदरात अधःपतन बांधले जाते ते काही दिवसानंतर किंवा काही वेळानंतर किंवा काही महिन्यानंतर किंवा तीन वर्षांनंतर तरी त्याचे अधःपतन होतेच. पुढे आपला घात होणार आहे याची जाणीवही त्याला होते आणि त्याचा परिणामही त्याला निश्चिंत होतो. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या दगडाला धडक दिली तर आपलेच डोके फुटते तसे परतद्रव्य आणि परनारीचा भोग घेतला तर काळ त्याच्या मागे लागतो आणि त्याचा ऱ्हास लवकरच होतो होतो.

अभंग क्र. १६६०
आम्हा हरीच्या दासा काही । भय नाही त्रयलोकी ॥१॥
देव उभा मागेपुढे । उगवी कोडे संकट ॥धृपद॥
जैसा केला तैसा होय । धावे सोय धरोनि ॥२॥
तुका म्हणे असो सुखे । गाऊ मुखे विठोबा ॥३॥
अर्थ

आम्हा हरिदासांना त्रेलोक्या मध्ये कोणत्याही प्रकारचे भय नाही कारण आमच्या मागे पुढे प्रत्यक्ष देव उभा आहे. आणि सर्व संकटापासून तो आमचे रक्षण करतो. भक्त ज्या स्वरूपाचे चिंतन करतो देव ते स्वरूप धारण करतो व त्यांच्या मदतीला नेहमी सज्ज असतो आणि भक्तांचे कार्य करण्यासाठी तो नेहमी तत्पर असतो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही नेहमी आमच्या मुखाने हरीचे नामचिंतन करू व सुखाने राहू.

अभंग क्र. १६६१
समर्थाचे केले । मोडिले कोणा जाईल ॥१॥
वाया करावी ते उरे । खटपट सोस पुरे ॥धृपद॥
ठेवा जो ठेविला । आपुलाला तैसा खावा ॥२॥
ज्याचे त्याचे हाती । भुके तयाची फजिती ॥३॥
तुका म्हणे कोटी । वाळे जाले शूळ पोटी ॥४॥
अर्थ

प्रत्यक्ष जे समर्थाने तयार केले आहे ते कोणाकडुन मोडले जाईल ? त्याने तयार केलेली कोणतीही गोष्ट मोडण्याचा प्रयत्न केला तर ती व्यर्थ खटपट होऊन शेवटी श्रम होतील. जसे आपले संचित आहे त्याप्रमाणे ते भोगावे. जो समर्थांच्या विरुद्ध व्यर्थ बडबड करतो त्याची शेवटी फजिती होते. तुकाराम महाराज म्हणतात असे कोटी अभक्त आहेत की जे भगवंताला विरोधात गेले परंतु शेवटी त्यांच्या पोटात शुळच बसला व्यर्थ श्रम झाला.

अभंग क्र. १६६२
नेणे गति काय कवण अधोगति । मानिली निश्चिंती तुझ्या पायी ॥१॥
कर्म धर्म कोण नेणे हा उपाव । तुझ्या पायी भाव ठेवियेला ॥धृपद॥
नेणे निरसं पाप पुण्य नेणे काय । म्हणऊनि पाय धरिले तुझे ॥२॥
वेडा मी अविचारी न कळे विचार । तुज माझा भार पांडुरंगा ॥३॥
तुका म्हणे तुज करिता नव्हे काय । माझा तो उपाय कवण तेथे ॥४॥
अर्थ

हे देवा उत्तम गती कोणती व अधोगती कोणती हे काही मला माहीत नाही परंतु तुझ्या पायी अवीट आनंद आहे त्यामुळे मी तुझ्या पायी निश्चिंत होऊन राहिलो आहे. कर्म आणि धर्म म्हणजे काय यासाठी उपाय काय करावा लागेल हे मला काही माहीत नाही परंतु मी तुझ्या ठिकाणी एकनिष्ठ भक्ती भाव ठेवला आहे. हे देवा पापाचे निवारण कसे करावे पुण्य कसे करावे हे मला काही कळत नाही त्यामुळेच मी तुझे पाय धरले आहे देवा. देवा मी वेडा अविचारी आहे विचार कसा करावा हे मला कळत नाही त्यामुळे मी माझा सर्व भार तुझ्यावर टाकला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुला काय करता येणार नाही, तुला काय अशक्य आहे आणि माझ्यासारख्या दिन र्दुबाळाचे तुझ्यासमोर काय चालणार आहे ?

अभंग क्र. १६६३
देवा हे माझी मिराशी । ठाव तुझ्या पायापाशी ॥१॥
याचा धरीन अभिमान । करीन आपुले जतन ॥धृपद॥
देऊनिया जीव । वडिली साधिला हा ठाव ॥२॥
तुका म्हणे देवा । जुन्हाट हे माझी सेवा ॥३॥
अर्थ

देवा ही माझी वतनदारी आहे की, मी तुझ्या पायाच्या ठिकाणी नेहमी रहावे. देवा मी या वतनदारीचा अभिमान धरीन व याचे जतन करिन. या वतनदारी जागा माझ्या वडिलांनी जीव देऊन साध्य केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा ही माझी सेवा वंशपरंपरागत म्हणजे जुनी आहे.

अभंग क्र. १६६४
तुझा म्हणऊनि जालो उतराई । त्याचे वर्म काई ते मी नेणे ॥१॥
हाती धरोनिया दावी मज वाट । पुढे कोण नीट तेची देवा ॥धृपद॥
देवभक्तपण करावे जतन । दोही पक्षी जाण तूचि बळी ॥२॥
अभिमाने तुज लागली हे लाज । शरणागता काज करावया ॥३॥
तुका म्हणे बहु नेणता मी फार । म्हणऊनि विचार जाणविला ॥४॥
अर्थ

देवा तू मला मनुष्य जन्म दिला हे तुझे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत आणि त्यासाठी तुझा उतराइ होण्याकरता मी तुझा दास झालो आहे. परंतु केवळ तुझा दास झालो असे म्हटल्यावर मी तुझा उतराइ कसा झालो हे वर्म मला काही कळाले नाही, जो मार्ग पुढे नीट आहे तोच मार्ग मला दाखव. भक्त पणाचे रक्षण तुम्हीच करा आणि दोन्ही पक्ष तुम्हीच चालवत आहात असे तुम्ही समजा. अहो देवा तुम्हाला शरण आलेल्या भक्तांचा तुम्ही अभिमान धरता कारण तुम्हाला तुमचे दीनानाथ, पतित-पावन हे ब्रीद सांभाळायचे आहे व त्याचे तुम्हाला रक्षण करायचे आहे म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी फार काही जाणत नाही पण माझ्या उद्धारा संबंधीचा विचार तुम्हाला मी स्पष्ट करून सांगितलेला आहे.

अभंग क्र. १६६५
मारगी चालता पाउलापाउली । चिंतावी माउली पांडुरंग ॥१॥
सर्व सुख लागे घेउनिया पाठी । आवडींचा कंठी रस ओती ॥धृपद॥
पीतांबरे छाया करी लोभपर । पाहे ते उत्तर आवडीचे ॥२॥
तुका म्हणे हेचि करावे जीवन । वाचे नारायण तहान भूक ॥३॥
अर्थ

मार्गाने चालताना पावला पावली पांडुरंग माऊलीचे चिंतन करत जावे. जगातील सर्व सुख तो तुम्हाला वेळोवेळी देतो आणि त्याच्या आवडीचा रस तो तुमच्या कंठा मध्ये ओतत असतो. देव भक्तांचे रक्षण करण्याकरता आपल्या पीतांबरा ची छाया त्यांच्यावर धरतो व भक्तांच्या मुखातून आपल्या विषयी कोणते कौतुकाचे बोल निघत आहे ते ऐकण्यासाठी तो उत्कंठित असतो. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या वाचेने नारायणाचे नाम गात रहावे असेच करावे त्यामुळे आपल्याला तहान भूकेचे भान राहणार नाही.

अभंग क्र. १६६६
जालो आता दास । माझे तोडोनिया पाश ॥१॥
ठाव द्यावा पायापाशी । मी तो पातकाची राशी ॥धृपद॥
सकळ ही गोवा । माझा उगवूनि देवा ॥२॥
तुका म्हणे भय । करा जवळी ते नये ॥३॥
अर्थ

देवा मी आता तुमचा दास झालो आहे तरी आता तुम्ही माझे सर्व संसार पाशा तोडून टाका. देवा मी तर पातकांची राशीच हे पण असे असले तरी माझ्यावर दया करून तुम्ही तुमच्या पायाशी मला आश्रय द्यावा. देवा माझ्या माझे सर्व प्रकारचे बंधन तुम्ही नाहीसे करा. तुकाराम महाराज म्हणतात देवा जन्ममरणाचे भय माझ्याजवळ कधीच येणार नाही असे तुम्ही करा.

अभंग क्र. १६६७
अंतरीचे जाणा । तरि का येऊ दिले मना ॥१॥
तुमची करावी म्या सेवा । आता अव्हेरिता देवा ॥धृपद॥
नव्हती मोडामोडी । केली मागे तेचि घडी ॥२॥
तुका म्हणे दिला ठाव । पायी लागो दिला भाव ॥३॥
अर्थ

देवा सर्वाच्या अंतःकरणातील तुम्ही जाणाणारे आहात मग माझ्याविषयी असा वेगळेपणा तुम्ही तुमच्या मनामध्ये का येऊ दिला ? मी तुमची सेवा करावी आणि माझा तुम्ही अव्हेर का बरे करता ? देवा आपल्या दोघामध्ये सेवक व स्वामी असा भाव आहे आणि जर तुम्हाला हा भाव आवडलाच नव्हता तर तुम्ही मागेच याची मोडामोड का बरे केले नाही ? तुकाराम महाराज म्हणतात देवा मी माझा भक्तिभाव तुमच्या पायाशी एक रूप केला आणि आता तुम्ही माझा अव्हेर करतात ते तुम्हाला चांगले दिसत नाही.

अभंग क्र. १६६८
पवित्र होईन चरित्र उच्चारे । रूपाच्या आधारे गोजिरिया ॥१॥
आपुरती बुद्धि पुण्य नाही गाठी । पायी घाली मिठी पाहे डोळा ॥धृपद॥
गाईन ओविया शिष्टांच्या आधारे । सारीन विचारे आयुष्या या ॥२॥
तुका म्हणे तुझे नाम नारायणा । ठेवीन मी मना आपुलिया ॥३॥
अर्थ

देवा मी तुमचे चरित्र उच्चार करीन आणि तुझ्या गोजिऱ्या रूपात च्या आधारे पवित्र होईन. देवा माझी बुद्धी अपुरी आहे आणि म्हणावे एवढे पुण्यही माझ्याकडे नाही त्यामुळे मी तुझ्या पायाला सारखी सारखी मिठी मारत आहे आणि तुझे रूप माझ्या डोळ्याने पाहात आहे. हरीचे गुणगान श्रेष्ठ संतांच्या आधारेनच गायिन आणि माझे पुढील आयुष्य त्यांच्या विचारानेच व्यतीत करीन. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा मी तुझे नाम माझ्या मनामध्ये सतत ठेवीन.

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading