१८ मे, दिवस १३८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी २७६ ते ३०० सार्थ तुकाराम गाथा अभंग १६४५ ते १६५६

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१८ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण



हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १८ May
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १८ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १६४५ ते १६५६ चे पारायण आपण करणार आहोत.
१८ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी २७६ ते ३००,

276-11
तव देखिले जी आघवेचि । तरि आता तुज ठावो तूचि । तू कुणाचा नव्हेसि ऐसाचि । अनादि आयता ॥276॥
हे संपूर्ण मी पाहिले, तेव्हा कळून आले की तुझे स्थान तूच आहेस — म्हणजे तुझ्याहून स्थान निराळे नाही. तू कोणाचाहि नव्हेस – म्हणजे तू कोणापासून उत्पन्न झालेला नाहीस असा तू अनादि व सिध्द आहेस.
(विश्वरूपाचे ठिकाणी विश्वरूपाहून दुसर्‍या पदार्थाचा अनुभवच नाही, म्हणून दुसर्‍या कोणापासून त्याची उत्पत्ती मानता येत नाही. अर्थात् ” अनादि आयता ” म्हणजे विश्वरूप हे उत्पत्तीरहित स्वतःसिध्द वस्तुस्वरूप आहे असा अर्थ. )
277-11
तू उभा ना बैठा । दिघडु ना खुजटा । तुज तळी वरी वैकुंठा । तूचि आहासी ॥277॥
तू उभा नाहीस किंवा बसला नाहीस. तू उंच नाहीस, ठेंगणा नाहीस. भगवंता ! तुझ्या खाली वर सर्वत्र एक तूच भरला आहेस.
278-11
तू रूपे आपणयांचि ऐसा । देवा तुझी तूचि वयसा । पाठी पोट परेशा । तुझे तू गा ॥278॥
देवा ! तू रूपाने आपल्यासारखाच आहेस – म्हणजे तू जसा अपरिमित तसे तुझे रूपहि अपरिमित आहे. तूच तुझे वय आहेस – म्हणजे तुला जशी मर्यादा नाही व तुझे पाठ पोट तूच आहेस तुझे पाठ पोटयुक्त इत्यादि अवयवयुक्त शरीर तूच आहेस.
279-11
किंबहुना आता । तुझे तूचि आघवे अनंता । हे पुढत पुढती पाहता । देखिले मिया ॥279॥
किंबहुना आता सर्व तूच आहेस म्हणजे तू जसा सच्चिदानंद स्वरूप तसे तुझे अवयवयुक्त शरीर सच्चिदानंदस्वरूप आहे असेच मी वारंवार पाहिले आहे.
280-11
परि या तुझिया रूपाआंतु । जी उणीव एक असे देखतु । जे आदि मध्य अंतु । तिन्ही नाही ॥280॥
पण या विश्वरूपात एकच मला उणीव दिसत आहे, ती म्हणजे तुझ्या विश्वरूपाचे ठिकाणी आदि, मध्य, अंत हे तिन्ही नाहीत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

281-11
एऱ्हवी गिंवसिले आघवा ठायी । परि सोय न लाहेचि कही । म्हणौनि त्रिशुद्धी हे नाही । तिन्ही एथ ॥281॥
तुला आदि, मध्य, अंत कोठे आहेत, हे सर्व ठिकाणी निरखून पाहिले, परंतु कोठे थांग लागत नाही; म्हणून हे तिन्ही तुझ्या ठिकाणी नाहीत हे त्रिवार सत्य आहे.
282-11
एवं आदिमध्यातरहिता । तू विश्वेश्वरा अपरिमिता । देखिलासि जी तत्त्वता । विश्वरूपा ॥282॥
हे आदिमध्यान्तरहिता ! हे सर्व ब्रह्मांडाच्या नियंत्या ! हे अमर्यादरूपा ! हे विश्वरूपा ! याप्रमाणे तू खरोखर आहेस, हे मी पाहिले.
283-11
तुज महामूर्तीचिया आंगी । उमटलिया पृथक् मूर्ती अनेगी । लेइलासी वानेपरींची आंगी । ऐसा आवडतु आहासी ॥283॥
तुझ्या विश्वरूप महामूर्तीच्या अंगावर ज्या अनेक निरनिराळ्या मूर्ती प्रगट झाल्या आहेत त्या पाहता, तू नाना प्रकारची आंगडी घातली आहेस, असा वाटतोस.
284-11
नाना पृथक् मूर्ती तिया द्रुमवल्ली । तुझिया स्वरूपमहाचळी । दिव्यालंकार फुली फळी । सासिन्नलिया ॥284॥
किंवा नाना प्रकारच्या निरनिराळ्या मूर्ती ह्याच कोणी निरनिराळ वृक्षे वेली असून, त्या तुझ्या विश्वरूपी महापर्वताचे ठिकाणी दिव्य अलंकाररूपी फळा फुलांनी भरास आल्या आहेत.
285-11
हो का जे महोदधी तू देवा । जाहलासि तरंगमूर्ती हेलावा । की तू एक वृक्षु बरवा । मूर्तिफळी फळलासी ॥285॥
किंवा देवा ! असेहि वाटते की तू महासमुद्र असून, मूर्ती ह्या तुझे तरंगरूप हेलकावे आहेत किंवा तू एक सुंदर वृक्ष असून मूर्तीरूप फळांनी फलद्रूप झाला आहेस.

286-11
जी भूती भूतळ मांडिले । जैसे नक्षत्री गगन गुढले । तैसे मूर्तिमय भरले । देखतसे तुझे रूप ॥286॥
अहो जी देवा ! जशी पृथ्वी भूतांनी व्यापिली आहे किंवा आकाश नक्षत्रांनी भरले आहे, त्याप्रमाणे तुझे विश्वरूप मूर्तीने भरलेले मी पाहात आहे.
287-11
जी एकेकीच्या अंगप्रांती । होय जाय हे त्रिजगती । एवढियाही तुझ्या आंगी मूर्ती । की रोमा जालिया ॥287॥
देवा ! काय सांगू ! तुझ्या अंगावर दिसणार्‍या एका एका मूर्तीच्या एका एका अवयवावर हे त्रैलोक्य, उत्पन्न व नष्ट होत असून, एवढ्याहि मूर्ती तुझ्या अंगाचे ठिकाणी रोमाप्रमाणे दिसत आहेत.
288-11
ऐसा पवाडु मांडूनि विश्वाचा । तू कवण पा एथ कोणाचा । हे पाहिले तव आमुचा । सारथी तोचि तू ॥288॥
असा हा विश्वरूपाचा विस्तार मांडून राहिलेला तू कोण व कोणाचा हे मी पाहिले, तेव्हा आमचा जो सारथी श्रीकृष्ण, तोच तू आहेस, असे दिसून आले.
(आपल्या सारथी श्रीकृष्णाच्या एकदेशीयस्वरूपाचे ठिकाणीच अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होत होते, असे माऊलिंचे म्हणणे आहे, अर्थात श्रीकृष्णस्वरूप व विश्वरूप असा या दोन्ही स्वरूपांचा प्रत्यय अर्जुनाला विश्वरूप दर्शनांत येत होता असे स्पष्ट दिसतें. यावरून भगवंताच्या एकदेशीय श्रीकृष्णस्वरूपाचा व विश्वरूपाचा केव्हाच विरोध नसतो व बीजवृक्षाप्रमाणे एकदेशीय श्रीकृष्णस्वरूपाचे ठिकाणी संपूर्ण विश्वरूप व विश्वरूपात श्रीकृष्णस्वरूप समाविष्ट असते, असेच सिध्द होतें, )
289-11
तरी मज पाहता मुकुंदा । तू ऐसाचि व्यापकु सर्वदा । मग भक्तानुग्रहे तया मुग्धा । रूपाते धरिसी ॥289॥
भगवंता ! मला असे वाटते की तू असाच सदासर्वदा व्यापक आहेस, पण भक्तांवर प्रेमवृध्दिरूप अनुग्रह करण्याकरिता तू सुंदर गोजिरवाणे एकदेशीय श्रीकृष्णस्वरूप धारण करतोस.
(समुद्राचे कांठी उभे राहून समुद्राकडे पाहिले असता, जसा तो विस्तीर्ण समुद्र मनुष्याच्या मर्यादित दृष्टीने मर्यादित पाहिला जातो, तरीपण, समुद्र विस्तीर्ण आहे, हे तो विसरत नसतो, त्याप्रमाणे भगवान सदा सर्वदा व्यापक असतो तरी भक्ताच्या प्रेमवृत्तीच्या मर्यादेमुळे, तो भक्ताकडून एकदेशीय घेतला जातो, तरीपण भक्त भगवंताची व्यापकता विसरत नसतो, ” प्रेम गली अती साकली तामे दो न समाये ” प्रेमाची गल्ली अत्यंत अरूंद असल्यामुळे भगवंताचे सगुणसाकारस्वरूपच, प्रेमाचा विषय होऊ शकते, व्यापकस्वरूप होऊ शकत नाही; हेच माउलिंनी या ओवीत सांगितले आहे. )
290-11
कैसे चहू भुजांचे सांवळे । पाहता वोल्हावती मन डोळे । खेंव देऊ जाइजे तरी आकळे । दोहीचि बाही ॥290॥
तुझे ते चतुर्भुजरूप कसे सुंदर व गोजिरवाणे आहे की जे पाहतांक्षणी मनाची व डोळ्यांची तृप्ति होते आणि प्रेमाणे आलिंगन देऊ म्हटल्यास आम्हाला आपल्या दोन हातांनी ते कवटाळता येते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

291-11
ऐसी मूर्ति कोडिसवाणी कृपा । करूनि होसी ना विश्वरूपा । अमुचियाचि दिठी सलेपा । जे सामान्यत्वे देखिती ॥291॥
हे विश्वरूप भगवंता ! याप्रकारे आम्हा भक्तांवर कृपा करून, अशी ही गोजिरवाणी सगुण सांवळी मूर्ति धारण करतोस, पण आमची दृष्टिच अविद्येने दूषित असल्यामुळे आम्ही त्या तुझ्या सगुणरूपाला सामान्य मनुष्याप्रमाणेच पांचभौतिक लेखतो.
(भगवंताच्या सगुण श्रीकृष्णस्वरूपाला सामान्यत्वाने – म्हणजे इतर अज्ञानी जीवाच्या शरीराप्रमाणे पांचभौतिक जडविनाशी समजणार्‍यांची दृष्टि अविद्यादोषाने दूषितच असते असे माउलिंचे स्पष्ट म्हणणे आहे. )
292-11
तरी आता दिठीचा विटाळु गेला । तुवा सहजे दिव्यचक्षू केला । म्हणौनि यथारूपे देखवला । महिमा तुझा ॥292॥
परंतु देवा ! तुम्ही सहज माझ्यावर कृपा करून जी ज्ञानदृष्टि दिली, त्या ज्ञानदृष्टिने माझ्या पूर्वदृष्टींतील अविद्येचा दोष नाहीसा झाल्यामुळे तुझ्या सगुणसाकारस्वरूपाचे यथार्थ ज्ञान होऊन, त्या सगुणस्वरूपाचा खरा महिमा आता मला कळून आला.
293-11
परी मकरतुंडामागिलेकडे । तोचि होतासि तू एवढे । रूप जाहलासि हे फुडे । वोळखिले मिया ॥293॥
आणि मकराच्या तोंडाच्या आकाराप्रमाणे असलेल्या जुवांच्या मागच्या बाजूला जे तुम्ही बसलां होता, त्याच तुम्ही एवढे विश्वरूप धारण केले, हे मी पक्के ओळखलें.
किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम् ।
पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ताद्दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम्11. 17॥

अर्थ मुकुट, गदा व सुदर्शन चक्र धारण करणारा, तेजाची राशी, सर्वत्र प्रभायुक्त, ज्याच्याकडे एकसारखे पहाणे देखील अशक्य आहे असा दीप्तिमान् अग्नी, सूर्य यांच्या प्रभेसारखी ज्याची प्रभा समन्ताद्भागी पसरलेली आहे असा व अमर्याद असा तुला मी पहात आहे. ॥11-17॥
294-11
नोहे तोचि हा शिरी ? । मुकुट लेइलासि श्रीहरी । परी आताचे तेज आणि थोरी । नवल की बहु हे ॥294॥
श्रीहरी भगवंता ! तुझ्या चतुर्भुजमूर्तीच्या मस्तकावर जो मुकुट घातला जात असे, तोच हा आता घातलेला मुकुट नव्हे काय ? पण आता त्या मुकुटाचे तेज थोरवी काही अपूर्व आहे, हे नवल आहे.
295-11
तेचि हे वरिलियेचि हाती । चक्र परिजितया आयती । सांवरितासि विश्वमूर्ती । ते न मोडे खूण ॥295॥
(हे विश्वरूप भगवंता ! ) शत्रूच्या वधार्थ फिरविण्याकरिता जे चक्र तुझ्या वरच्या हातात सज्ज असते, तेच तू सांवरून धरीत आहेस, ती खूण नाहीशी झाली नाही.

296-11
येरीकडे तेचि हे नोहे गदा । आणि तळिलिया दोनी भुजा निरायुधा । वागोरे सांवरावया गोविंदा । संसरिलिया ॥296
हे गोविंदा ! दुसरीकडे जी गदा आहे ती, तीच नव्हे काय ? आणि शस्ररहित असलेल्या खालच्या दोन्ही भुजा घोड्याचा लगाम धरण्याकरिता पुढे सरसाविल्या आहेत.
297-11
आणि तेणेचि वेगे सहसा । माझिया मनोरथासरिसा । जाहलासि विश्वरूपा विश्वेशा । म्हणौनि जाणे ॥297॥
आणि माझ्या इच्छेबरोबर हे विश्वेशा ! आपण ” तेणेचि ” म्हणजे त्याच सगुण श्रीकृष्णस्वरूपाने एकदम विश्वरूप झालांत, हे मलां कळून आले.
298-11
परी कायसे बा हे चोज । विस्मयो करावयाहि पाडू नाही मज । चित्त होऊनि जातसे निर्बुज । आश्चर्ये येणे ॥298॥
पण कसे आश्चर्य आहे पहा की या विश्वरूपाच्या दर्शनाने माझे चित्त दिङ्मूढ होऊन गेले आहे आणि मला आश्चर्य करण्यापुरतीहि योग्यता राहिली नाही.
299-11
हे एथ आथि का येथ नाही । ऐसे श्वसोही नये काही । नवल अंगप्रभेची नवाई । कैसी कोंदली सैंघ ॥299॥
हे विश्वरूप येथे आहे किंवा नाही, याचा माझे मन विचार करू शकत नाही, तुझ्या अंगप्रभेचे विलक्षण अपूर्वत्व असून, ती कशी सर्वत्र भरली आहे, पहा.
300-11
एथ अग्नीचीही दिठी करपत । सूर्य खद्योतु तैसा हारपत । ऐसे तीव्रपण अद्भुत । तेजाचे यया ॥300॥
या प्रभेपुढे अग्नीची दृष्टि देखील होरपळून जाईल, सूर्याचे तेज देखील काजव्याच्या तेजाप्रमाणे या तेजात लोपून जाईल, असे या तुझ्या अद्भुत तेजाचे तीव्रपण आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस १३८ वा, १८, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १६४५ ते १६५६
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. १६४५
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडी उच्चारा ॥१॥
विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥धृपद॥
विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ॥२॥
विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा । तुकया मुखा विठ्ठल ॥३॥
अर्थ

लोकांनो तुम्ही टाळ आणि विणा हे विठ्ठल स्वरूप माना आणि तोंडाने विठ्ठल असे म्हणा तसाच उच्चार करा. विठ्ठल सर्व प्रकारचे भांडवल आहे त्यामुळे तोंडाने विठ्ठल विठ्ठल असे बोला. सर्व प्रकारचा नाद भेद हे विठ्ठलच आहे त्यामुळे तुम्हाला विठ्ठल विठ्ठल असा छंद लागू द्यावा. तुकाराम महाराज म्हणतात सुख आणि दुखः यावेळी नेहमी विठ्ठल विठ्ठल असा छंद लागू द्यावा त्यामुळे माझ्या मुखा मध्ये नेहमी विठ्ठला हेच नाम आहे.
अभंग क्र. १६४६
काय तुझे वेचे मज भेटी देता । वचन बोलता एक दोन ॥१॥
काय तुझे रूप घेतो मी चोरोनि । त्या भेणे लपोनि राहिलासी ॥धृपद॥
काय तुझे आम्हा करावे वैकुंठ । भेवो नको भेट आता मज ॥२॥
तुका म्हणे तुझी नलगे दसोडी । परि आहे आवडी दर्शनाची ॥३॥
अर्थ

देवा तू मला भेट दिली आणि दोन शब्द माझ्याशी बोलला तर तुझे काही खर्च होणार आहे काय. मी तुझे रूप चोरून घेतो की काय या भीतीने तर तू लपून राहत नाहीस ना देवा ? आम्हाला माहित आहे कि तुझे राहण्याचे स्थान हे वैकुंठ आहे मग आम्ही तुला ते वैकुंठ मागू अशी भीती तुला वाटते आहे की काय देवा, आम्हाला तुझ्या वैकुंठाची काय करायचे आहे आम्हाला केवळ तुझी भेट व्हावी एवढेच. तुकाराम महाराज म्हणतात अरे देवा आम्हाला तुझ्याकडून शित भर दशी सुद्धा नको आम्हाला तुझ्या दर्शनाची आवड आहे आम्हाला तू दर्शन द्यावे म्हणजे झाले.
अभंग क्र. १६४७
संतनिंदा ज्याचे घरी । नव्हे घर ते यमपुरी ॥१॥
त्याच्या पापा नाही जोडा । संगे जना होय पीडा ॥धृपद॥
संतनिंदा आवडे ज्यासी । तो जिता चि नर्कवासी ॥२॥
तुका म्हणे तो नष्ट । जाणा गाढव तो स्पष्ट ॥३॥
अर्थ

संत निंदा ज्या घरी होते ते घर, घर नसून साक्षात यमपुरीच आहे. त्याच्या पापाला दुसरा कोणताही जोड नाही आणि त्याच्याबरोबर इतर जे लोक राहतात त्याच्यामुळे त्यांनादेखील पीडा प्राप्त होते. ज्याला संत निंदा फार आवडते तो जातीचाच नरकवासी आहे म्हणजे तो नेहमी नरकवास भोगत असतो. तुकाराम महाराज म्हणतात असा मनुष्य दुष्ट आहे व तो स्पष्ट गाढव आहे असेच जाणावे.
अभंग क्र. १६४८
आले देवाचिया मना । तेथे कोणाचे चालेना ॥१॥
हरीश्चंद्र ताराराणी । वाहे डोंबा घरी पाणी ॥धृपद॥
पांडवाचा साहाकारी । राज्याहुनि केले दुरी ॥२॥
तुका म्हणे उगेचि राहा । होईल ते सहज पाहा ॥३॥
अर्थ

देवाच्या मनात जे आले आहे ते केल्याशिवाय देव थांबत नाही आणि तेथे कोणाचे काही चालत नाही. राजा हरिश्चंद्र आणि ताराराणी हे दोघेही राजाराणी असूनही डोंबाच्या घरी त्यांनी पाणी वाहिले. प्रत्यक्ष देवच पांडवाचा सहाय्यकारी होतात तरीदेखील देवाने त्यांना राज्यापासून वेगळे ठेवून वनात पाठविले. तुकाराम महाराज म्हणतात याकरिता शांत राहून जे काही होईल ते फक्त साक्षी रूपाने पहा.
अभंग क्र. १६४९
निजल्याने गाता उभा नारायण । बैसल्या कीर्तन करिता डोले ॥१॥
उभा राहोनिया मुखी नाम वदे । नाचे हा गोविंद नाना छंदे ॥धृपद॥
मारगी चालता मुखी नाम वाणी । उभा चक्रपाणी मागे पुढे ॥२॥
तुका म्हणे यासी कीर्तनाची गोडी । प्रेमे घाली उडी नामासाठी ॥३॥
अर्थ

निजल्यावर जर नामस्मरण केले तर देव आपल्या शेजारी उभा राहतो आणि बसल्यावर किंवा कीर्तन करत असताना जर हरिनाम गाईले तर देव डोलत असतो. जो उभा राहून आपल्या मुखाने नारायणाचे नाम गात असतो त्याच्यापुढे गोविंद नाना छंदाने नाचत असतो. मार्गाने चालत असताना जर हरीचे नाम घेतले तर हा चक्रपाणी त्याचे रक्षण करण्याकरिता त्याच्या मागे पुढे उभा असतो. तुकाराम महाराज म्हणतात नारायणाला नामाची अवीट गोडी आहे आणि एका नामा करिता हा देवा प्रेमाने अगदी कोठेही त्वरेने धावत येतो.
अभंग क्र. १६५०
काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली । आवडी धरिली पायासवे ॥१॥
आता कोण पाहे मागे परतोनि । गेले हारपोनि देहभाव ॥धृपद॥
रिद्धिसिद्धी सुखे हाणितल्या लाता । तेथे या प्राकृता कोण मानी ॥२॥
तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास । करूनि ठेलो ग्रास ब्रम्हांडाचा ॥३॥
अर्थ

मी माझा काम क्रोध विठ्ठलाला वाहिला असून त्याचीच म्हणजे विठ्ठलाची आवड मनात धरली आहे. आता संसाराकडे पाठीमागे वळून कोण पाहतो कारण माझा देह भावच नाहीसा झाला आहे. अरे मी तर सुखाने रिद्धी सिद्धी ला लाथा मारल्या आहेत मग नश्वर धनाला कोण किंमत देतो ? तुकाराम महाराज म्हणतात आम्ही विठोबाचेच दास आहोत व त्या कारणामुळेच सर्व ब्रम्हांडाचा ग्रास करून आम्ही स्वस्त आहोत.
अभंग क्र. १६५१
उठाउठी अभिमान । जाय ऐसे स्थळ कोण ॥१॥
ते या पंढरीस घडे । खळा पाझर रोकडे ॥धृपद॥
नेत्री अश्रूचिया धारा । कोठे रोमांच शरीरा ॥२॥
तुका म्हणे काला । कोठे अभेद देखिला ॥३॥
अर्थ

तात्काळ अभिमान जाईल असे स्थळ कोठे आहे काय, होय आहे ते स्थळ म्हणजे पंढरपूर आहे आणि अभिमान तेथे तात्काळ जातो आणि दुर्जनांचा हृदयालादेखील दयेचा पाझर फुटतो. येथे नेत्राला आनंदाश्रूच्या धारा लागतात आणि संपूर्ण शरीरावर रोमांच उभे राहतात. तुकाराम महाराज म्हणतात हे जन हो तुम्ही जीव ब्रम्‍ह ऐक्याचा अभेद्य रूपकला पंढरी वाचून कोठे पाहिला आहे काय ?
अभंग क्र. १६५२
पंढरी पंढरी । म्हणता पापाची बोहोरी ॥१॥
धन्य धन्य जगी ठाव । होतो नामाचा उत्सव ॥धृपद॥
रिद्धिसिद्धी लोटांगणी । प्रेम सुखाचिया खाणी ॥२॥
अधिक अक्षराने एका । भूवैकुंठ म्हणे तुका ॥३॥
अर्थ

पंढरी पंढरी असा उच्चार केला तरी सर्व पापाचे दहन होते. त्यामुळे जगामध्ये पंढरी धन्य धन्य आहे की जेथे नामाचा महोत्सव नेहमी होतो. हे क्षेत्र असे आहे की तिथे नेहमी प्रेम सुखाचा वर्षाव होतो आणि जे भक्त तेथे वास्तव्य करतात त्यांच्या ठिकाणी रिद्दिसिद्धी लोटांगण घालते. तुकाराम महाराज म्हणतात वैकुंठापेक्षाही पंढरी एक अक्षराने म्हणजे भूवैकुंठ या नावाने मोठे आहे त्यामुळे पंढरी एक क्षेत्र वैकुंठा पेक्षाही श्रेष्ठ आहे.
अभंग क्र. १६५३
घाली भार देवा । न लगे देश डोई घ्यावा ॥१॥
देह प्रारब्धा अधीन । सोसे अधिक वाढे सीण ॥धृपद॥
व्यवसाय निमित्त । फळ देतसे संचित ॥२॥
तुका म्हणे फिरे । भोंवडीने दम जिरे ॥३॥
अर्थ

आपल्या योगक्षेमाचा भार देवावर घालावा त्याकरिता संपूर्ण देश आपल्या डोक्यावर घेण्याची गरज नाही. हा नरदेह प्रारब्धाच्या आधीन आहे त्यामुळे त्याचा तुम्ही जेवढा हव्यास धराल तेवढा तुम्हाला त्रास होईल. व्यवसायामध्ये किंवा कोणतेही कर्म करताना तुम्हाला जो काही लाभ होतो किंवा जे काही फळ मिळते ते केवळ निमित्त आहे परंतु त्यामागे खरे कारण संचित आहे. तुकाराम महाराज म्हणतात स्वतःभोवती गोल गोल फिरल्याने भोवंड म्हणजे चक्कर येते व तेथेच दम जिरतो.

अभंग क्र. १६५४
भोग भोगावरी द्यावा । संचिताचा करुनी ठेवा ॥१॥
शांती धरणे जिवासाठी । दशा उत्तम गोमटी ॥धृपद॥
देह लेखावा असार । सत्य परउपकार ॥२॥
तुका म्हणे हे मिरासी । बुडी द्यावी ब्रम्हरसी ॥३॥
अर्थ

पूर्वसंचित कर्मामुळे अनेक प्रकारचे भोग भोगण्यास येते त्यामुळे ते सर्व भोग प्रारब्धाच्या स्वाधीन करून आनंदाने राहावे. आपल्या जीवासाठी शांत स्वरूप धारण करणे हे चांगले आहे आणि उत्तम दशा हीच आहे. देहाला असत्य समजून सतत परोपकार करणे हेच सत्य मानावे. तुकाराम महाराज म्हणतात आपली खरी वतनदारी म्हणजे ब्रम्‍ह रसात उडी घ्यावी हीच आहे.

अभंग क्र. १६५५
येथे बोलोनिया काय । व्हावा गुरू तरि जाय ॥१॥
मज न साहे वाकडे । ये विठ्ठलकथेपुढे ॥धृपद॥
ऐकोनि मरसी वृथा । जव आहेसि तु जीता ॥२॥
हुरमतीची चाड । तेणे न करावी बडबड ॥३॥
पुसेल कोणी त्यास । जा रे करी उपदेश ॥४॥
आम्ही विठ्ठलाचे वीर । फोडू कळिकाळाचे शीर ॥५॥
घेऊ पुढती जन्म । वाणू कीर्ती मुखे नाम ॥६॥
तुका म्हणे मुक्ती । नाही आसचि ये चित्ती ॥७॥
अर्थ

महाराज हरिकथा करत असताना मध्येच येऊन त्यांना एका मनुष्याने विचारले महाराज मला ब्रम्हरस हवे आहे तेव्हा आपण मला उपदेश करावा आणि त्यावर महाराज त्याला म्हणतात, अरे हरिकथा चालू असताना असे मध्ये बोलणे हे चांगले आहे काय आणि तुला जर गुरु करायचा असेल तर येथे बसू नको चालता हो. अरे येथे विठ्ठल कथा चालू आहे आणि या कथेच्या पुढे वेडेवाकडे बोललेले मला सहन होणार नाही. अरे तू जोपर्यंत आहेस तोपर्यंत हरिकथा ऐक आणि ते तू करत नसशील तर तुझा जिवंत असूनही काहीच उपयोग नाही. ज्यांना आपल्या आब्रुतीची आवड आहे त्यांनी हरिकथा चालू असताना माझ्यापुढे असे वेडेवाकडे बडबड करू नये. जर मला कोणी ब्रम्‍हज्ञान विषयी काही विचारीत असेल तर मी त्याला असे उत्तर देईल की हरिकथा आवडीने ऐकताना हरिकथाच तुला ब्रम्‍ह ज्ञानाचा उपदेश करील. आम्ही विठ्ठलाचे शूरवीर भक्त आहोत. कळिकाळ देखील आमच्या पुढे आला तरी आम्ही त्याचे शिर फोडू. आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ आणि हरीचे गीत व कीर्ती गात राहू. तुकाराम महाराज म्हणतात मुक्तीची इच्छा देखील आमच्या चित्तात येत नाही.

अभंग क्र. १६५६
आनुहाती गुंतला नेणे बाह्य रंग । वृत्ति येता मग बळ लागे ॥१॥
मदे माते तया नाही देहभाव । आपुले अवयव आवरीता ॥धृपद॥
आणिकाची वाणी वेद तेणे मुखे । उपचारदुःखे नाठवती ॥२॥
ते सुख बोलता आश्चर्य या जना । विपरीत मना भासतसे ॥३॥
तुका म्हणे बाह्य रंग जो विटला । अंतर निवाला ब्रम्हरसे ॥४॥
अर्थ

एकदा की वृत्ती अंतर्मुख झाली तर तिला बाह्य अवस्था समजत नाही आणि वृत्तीला बहिर्मुख करण्यास फार कष्ट लागतात. मद्यधुंद व्यक्तीला ज्याप्रमाणे आपले अवयव आवरता येत नाही आपले इंद्रिये त्याच्या स्वाधीन नसतात अगदी त्याप्रमाणे ज्याची वृत्ती अंतर्मुख झालेली असते त्याची अवस्थाही अशीच असते. त्याचे इंद्रीय त्याच्या स्वाधीन नसतात आणि त्याची वृत्ती अंतर्मुख झालेली असते तो कधीही कोणाशी काहीही बोलत नाही आणि जरी तो बोलला तरी दुसऱ्याच्या हितासाठीच बोलतो आणि त्याला सुख-दुःख याची जाणीवही राहत नाही. अंतर्मुख वृत्ती विषयी त्याने जर लोकांना अनुभव सांगितला तर लोकांना त्याचे आश्चर्य वाटते एवढेच नाही तर, हे काहीतरी विपरीत तच आहे असे लोकांना वाटते. तुकाराम महाराज म्हणतात जो बाहेर अंगाला पूर्णपणे विटला तो अंतर्मुख होऊन ब्रम्हरसामध्ये स्थिर झाला आहे.

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading