१७ मे, दिवस १३७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी २५१ ते २७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १६३३ ते १६४४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१७ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १७ May
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १७ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १६३३ ते १६४४ चे पारायण आपण करणार आहोत.
१७ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी २५१ ते २७५,

251-11
उदयलेनि सुधाकरे । जैसा भरलाचि समुद्र भरे । तैसा वेळोवेळा उर्मिभरे । उचंबळत असे ॥251॥
पौर्णिमेला पूर्णचंद्राचा उदय झाला असता, ज्याप्रमाणे भरलेल्या समुद्राला भरती येते, त्याप्रमाणे आत वेळोवेळी उठत असलेल्या आनंदाच्या उर्मीमुळे अर्जुन वारंवार उचंबळू लागला.
252-11
ऐसा सात्त्विकाही आठा भावा । परस्परे वर्ततसे हेवा । तेथ ब्रह्मानंदाची जीवा । राणीव फावली ॥252॥
याप्रमाणे अर्जुनाचे ठिकाणी प्रगट झालेल्या आष्टसात्विकभावांत परस्पर स्पर्धा होऊ लागली असता, अर्जुनाच्या जीवाला ब्रह्मानंदाचे राज्य प्राप्त झाले.
253-11
तैसाचि तया सुखानुभवापाठी । केला द्वैताचा सांभाळु दिठी । मग उसासौनि किरीटी । वास पाहिली ॥253॥
तसेंच त्या ब्रह्मसुखानुभवानंतर पुनः देहावर येऊन व द्वैतसृष्टीचा अंगीकार करून, अर्जुनाने एक उसासा टाकला व विश्वरूपाकडे दृष्टि केली.
254-11
तेथ बैसला होता जिया सवा तियाचिया कडे मस्तक खालविला देवा । जोडूनि करसंपुट बरवा । बोलतु असे ॥254॥
तेथे अर्जुन जिकडे बसला होता, तिकडेच अर्जुनाने आपले मस्तक वाकवून देवाला नमस्कार केला व दोन्ही हात जोडून देवाशी प्रेमाने बोलू लागला.

अर्जुन उवाच ।
पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वास्तथा भूतविशेषसंघान् ।
ब्रह्माणमीशं कमलासनस्थमृषींश्चसर्वानुरगांश्च दिव्यान् ॥11. 15॥

अर्थ हे देवा, तुझ्या देहामधे (सर्व) देव, (स्थावरजंगमादि) भूतविशेषांचे सर्व समुदाय, ब्रह्मदेव, विष्णु, शंकर, सर्व ऋषि व दिव्य नाग मी पहात आहे. ॥11-15॥(अर्जुनाने केलेले विश्वरूपाचे वर्णन = 255)
255-11
म्हणे जयजयाजी स्वामी । नवल कृपा केली तुम्ही । जे हे विश्वरूप की आम्ही । प्राकृत देखो ॥255॥
अर्जुन म्हणतो, देवा ! तुमचा जयजयकार असो. आपण माझ्यावर विलक्षण कृपा केली, त्यामुळे मी सामान्यपुरुष देखील तुमचे हे विश्वरूप पाहात आहे.

156-11
परि साचचि भले केले गोसाविया । मज परितोषु जाहला साविया । जी देखलासि जो इया । सृष्टीसी तू आश्रयो ॥256॥
हे स्वामी भगवंता ! खरोखरच त्वां माझ्या इच्छेप्रमाणे केलेस आणि मला त्यामुळे अत्यंत संतोष झाला. या संपूर्ण सृष्टीला तूच आश्रय आहेस, हे मी आज पाहिले.
257-11
देवा मंदराचेनि अंगलगे । ठायी ठायी श्वापदांची दांगे । तैसी इये तुझ्या देही अनेगे । देखतसे भुवने ॥257॥
देवा ! ज्याप्रमाणे मंदार पर्वताचे अंगावर श्वापदांचे कळप असावे, त्याप्रमाणे या तुझ्या विश्वरूपाचे ठिकाणी अनेक भुवने मी पाहत आहे.
258-11
अहो आकाशचिये खोळे । दिसती ग्रहगणांची कुळे । का महावृक्षी अविसाळे । पक्षिजातीची ॥258॥
अहो देवा आकाशाच्या पोटात ज्याप्रमाणे ग्रहांचे समुदाय दिसावे किंवा एखाद्या मोठ्या वृक्षाचे ठिकाणी पक्षांची घरटी असावींत.
259-11
तयापरी श्रीहरी । तुझिया विश्वात्मकी इये शरीरी । स्वर्गु देखतसे अवधारी । सुरगणेंसी ॥259॥
त्याप्रमाणे भगवंता ! या तुझ्या विश्वरूप शरीराचे ठिकाणी सर्व देवसमुदायासह मी स्वर्गलोक पाहत आहे.
260-11
प्रभु महाभूतांचे पंचक । येथ देखत आहे अनेक । आणि भूतग्राम एकेक । भूतसृष्टीचे ॥260॥
प्रभो ! येथे पंचमहाभूतांचे अनेक समुदाय मी पाहत असून, एक एक सृष्टीचे जारज अंडजादि प्राणीसमुदायहि पाहत आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

261-11
जी सत्यलोकु तुजमाजी आहे । देखिला चतुराननु हा नोहे ? । आणि येरीकडे जव पाहे । तव कैलासुही दिसे ॥261॥
भगवंता ! तुझ्याठिकाणीच सत्यलोक आहे. पाहिलेला हा ब्रह्मदेव नव्हे काय ! आणि दुसरीकडे जो मी पाहतो तो तुझ्याठिकाणी कैलासहि दिसू लागला.
262-11
श्रीमहादेव भवानियेशी । तुझ्या दिसतसे एके अंशी । आणि तूतेही गा हृषीकेशी । तुजमाजी देखे ॥262॥
पार्वतीसहवर्तमान भगवान शंकर तुझ्या एका अंशावर दिसत असून, भगवंता ! तुझे चतुर्भुजरूपहि मी तुझ्या विश्वरूपाचे ठिकाणी पाहत आहे.
263-11
पै कश्यपादि ऋषिकुळे । इये तुझिया स्वरूपी सकळे । देखतसे पाताळे । पन्नगेशी ॥263॥
त्याचप्रमाणे कश्यपादि संपूर्ण ऋषींची कुळें, या तुझ्या विश्वरूपाचे ठिकाणी मी पाहत असून, नागासहवर्तमान अनेक पाताळलोकहि तुझ्या ठिकाणी पाहत आहे.
264-11
किंबहुना त्रैलोक्यपती । तुझिया एकेकाचि अवयवाचिये भिंती । इये चतुर्दशभुवने चित्राकृती । अंकुरली जाणो ॥264॥
हे त्र्यैलोक्यनाथा ! किंबहुना तुझ्या एक एक अवयवरूप भितीचे ठिकाणी चवदा लोकांच्या चित्रांची आकृति चितारलेली दिसत आहे.
265-11
आणि तेथिचे जे जे लोक । ते चित्ररचना जी अनेक । ऐसे देखतसे अलोकिक । गांभीर्य तुझे ॥265॥
आणि त्या चवदा लोकातील संपूर्ण प्राणी म्हणजे अनेक चित्रांची रचनाच होय. अशी तुझी असामान्य थोरवी पाहत आहे.

अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनंतरूपम् ।
नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम् ॥11. 16॥

अर्थ मी तुला अनेक हात, उदरे, मुखे व नेत्र असलेला व सर्वत्र अंतरहित रूपे धारण करणारा व विश्वरूप असा पहात आहे. हे विश्वेश्वरा, तुझा आरंभ, मध्य अथवा अंत यापैकी मला काहीच दिसत नाही. ॥11-16॥

266-11
त्या दिव्यचक्षूंचेनि पैसे । चहुकडे जव पाहात असे । तव दोर्दंडी का जैसे । आकाश कोंभैले ॥266॥
हे देवा ! तुवा दिलेल्या ज्ञानदृष्टीचा संपूर्ण विकास करून चोहोंबाजूला मी जो पाहू लागलों, तो जणू काय कोंभ फुटावे असे तुझे दोन बाहु दिसत आहेत.
267-11
तैसे एकचि निरंतर । देवा देखत असे तुझे कर । करीत आघवेचि व्यापार । एकेचि काळी ॥267॥
त्याचप्रमाणे तुझा एक एक हात एकाचवेळी अखंड सर्व व्यापार करीत आहे असे मी पाहात आहे.
(जीवाच्या मर्यादित स्वरूपामुळे व अल्पशक्ति मुळें, जीवाच्या ठिकाणी कर्माचा किंवा व्यापाराचा आरंभादि क्रम दिसून पडतो आणि त्याच्या अल्पज्ञतेमुळे त्याचे ज्ञान भूत, भविष्य वर्तमान असे तिन्ही कलांनी विभागले जातें. पण परमेश्वर सर्वज्ञ, सर्वशक्तिमान व सर्वव्यापक असल्यामुळे त्याचे ठिकाणी सर्व व्यापार व सर्व ज्ञाने एकदम एका वर्तमानकालीच असतात. परमेश्वराच्या शक्तिव्यापाराला व ज्ञानाला भूत, भविष्य, वर्तमान अशी कलांची मर्यादा नसते. )
268-11
मग महाशून्याचेनि पैसारे । उघडली ब्रह्मकटाहाची भांडारे । तैसी देखतसे अपारे । उदरे तुझी ॥268॥
परब्रह्म जेवढे अमर्याद आहे, तेवढेच त्याच्यावर भासणार्‍या तुझ्या विश्वरूपाची उदरे, जणू काय अपार ब्रम्हांडाची भांडारे उघडल्याप्रमाणे दिसत आहेत.
269-11
जी सहस्रशीर्षयाचे देखिले । कोडीवरी होताति एकीवेळे । की परब्रह्मचि वदनफळे । मोडोनि आले ॥269॥
आहो जी देवा ! तुम्ही सहस्रशीर्ष आहांत, याची एकाचवेळी कोट्यावधी प्रत्यंतरे येत आहेत किंवा जणु काय परब्रह्मच मुखरूपी फळाने भरभरारून आले.
270-11
तैसी वक्त्रे जी जेउती तेउती । तुझी देखितसे विश्वमूर्ती । आणि तयाचिपरी नेत्रपंक्ती । अनेका सैंघ ॥270॥
अशीं, ही विश्वरूपा ! तुझी मुखे मी जिकडे तिकडे पाहांत आहे; त्याप्रमाणे डोळ्यांच्याही अनेक रांगा मी सर्वत्र पाहात आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

271-11
हे असो स्वर्ग पाताळ । की भूमी दिशा अंतराळ । हे विवक्षा ठेली सकळ । मूर्तिमय देखतसे ॥271॥
हे असू दे, पण हा सर्व स्वर्ग, हे पाताळ किंवा ही भूमी, ह्या दिशा, हे आकाश, ही निरनिराळी भाषा वापरण्याची देखील सोय राहीली नाही. तुला संपूर्ण मूर्तीरूप मी पाहात आहे.
(मूढ मृगांना, मृगजळ हे पाणीच वाटते; म्हणून मनुष्य त्याला मृगजळ म्हणत असला, तरी त्याला ते जसे सूर्य प्रकाशाचे कंपन वाटते, त्याप्रमाणे अज्ञानी जीवांना, भगवंताचे विश्वरूप अनेक प्रकारच्या वस्तूंनी भरलेले जगत वाटत असले, तरी ज्ञानभक्ताला एक भगवानच सर्व वस्तुरूपाने दिसतो. )
272-11
हे तुजवीण एकादियाकडे । परमाणूहि एतुला कोडे । अवकाशु पाहतसे परि न सापडे । ऐसे व्यापिले तुवा ॥272॥
तू नाहीस अशी परमाणु इतकी सूक्ष्म तरी पोकळी कोठे आहे काय, हे मी कौतुकाने पाहत आहे, पण ती कोठे सापडत नाही असे तुवा व्यापिले आहे.
273-11
इये नानापरी अपरिमिते । जेतुली साठविली होती महाभूते । तेतुलाहि पवाडु तुवा अनंते । कोंदला देखतसे ॥273
ही नानाप्रकारची. जेवढी अपरिमीत महाभूते ब्रह्मांडांत सांठविली दिसत होती, तेवढाहि संपूर्ण विस्तार, अनंता ! एका तुझ्यानेच भरलेला आहे असे मी पाहत आहे.
274-11
ऐसा कवणे ठायाहूनि तू आलासी । एथ बैसलासि की उभा आहासि । आणि कवणिये मायेचिये पोटी होतासी । तुझे ठाण केवढे ॥274॥
असा तू विश्वव्यापक कोणत्या ठिकाणाहून आलास ? येथे तू बसला आहेस की उभा आहेस ? तू कोणत्या मातेच्या पोटी होतिस ? तुझे ते स्थान केवढे आहे ?
275-11
तुझे रूप वय कैसे । तुजपैलीकडे काय असे । तू काइसयावरी आहासि ऐसे । पाहिले मिया ॥275॥
तुझे रूप व वय कसे आहे ? तुझे पलीकडे काय आहे ? तू कशावर आहेस ? हे मी संपूर्ण निरखून पाहिले.

दिवस १३७ वा, १७, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १६३३ ते १६४४
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. १६३३
ज्याचे गर्जता पवाडे । श्रुतिशास्त्रा मौन पडे ॥१॥
तेथे माझी वाचा किती । पुरे करावया स्तुती ॥धृपद॥
शिणला सहस्त्र तोंडे । शेष फणी ऐसे धेडे ॥२॥
तुका म्हणे मही । पत्र सिंधु न पुरे शाई ॥३॥
अर्थ

या हरीचे किर्तीचे वर्णन करीत असताना श्रृती आणि शास्त्र देखील मुक्या झाल्या. मग तुमची किर्ती वर्णन करण्याकरता मग माझी वाचा किती पुरी पडणार आहे देवा ? हजारो तोंड असणारा शेष देखील या हरीची किर्ती वर्णन करता करता थकून गेला. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा या हरीची किर्ती लिहावयास जरी गेलो तरी पृथ्वीएवढा कागद घेतला आणि समुद्राएवढी शाई जरी घेतली तरी ती कमी पडते. ”
अभंग क्र. १६३४
देव राखे तया मारील कोण । न मोडे काटा हिंडता वन ॥१॥
न जळे न बुडे नव्हे काही । विष तेही अमृत पाही ॥धृपद॥
न चुके वाट न पडे फंदी । नव्हे कधी यम बाधा ॥२॥
तुका म्हणे नारायणा । येता गोळ्या वारी बाण ॥३॥
अर्थ

ज्याचे रक्षण साक्षात देव करतो त्याला कोण मारू शकेल एवढेच नाही तर तो रानावनात अनवाणी जरी फिरला तरी त्याला एक काटा देखिल मोडणार नाही. त्याला अग्नीत जरी जाळले तरी जळणार नाही, पाण्यात बुडवले तरी बुडणार नाही त्याला काहीच होत नाही. एवढेच काय पण त्याला वीष जरी दिले तर त्या विषाचे अमृत होते. तो कधीही परमार्थाची वाट चुकत नाही तो कधीही अडचणीत सापडत नाही आणि यम बाधा तर त्याला कधीच बाधत नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्यावर कितीही गोळ्या किंवा बाणांचा वर्षाव झाला तरी नारायण त्याचे रक्षा करतोच.
अभंग क्र. १६३५
कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया । वेळ का सखया लावियेला ॥१॥
दिनानाथ ब्रीद संभाळी आपुले । नको पाहो केले पापपुण्य ॥धृपद॥
पतितपावन ब्रीदे चराचर । पातकी अपार उद्धारिले ॥२॥
तुकयाबंधु म्हणे द्रौपदीचा धावा । केला तैसा मला पावे आता ॥३॥
अर्थ

हे द्वारकेच्या राया माझ्या सखया तू कोठे गुंतला आहेस मला भेट देण्यासाठी तू इतका वेळ का लावला आहेस ? देवा तुझे ब्रीद म्हणजे दिनानाथा आहे म्हणजे दिनांचा नाथ आहे दिनांचा तू उद्धार करतोस तुझ्या दीनानाथ या ब्रिदाचा तूच सांभाळ कर हे ब्रीद तुझेच आहे त्यामुळे मला भेट देण्यासाठी माझे पाप आणि पुण्य पाहू नकोस. देवा सारे चराचरामध्ये तुझे पतितपावन हे ब्रीद प्रसिद्ध आहे आणि तू अनेक पातकी लोकाचा आज पर्यंत उद्धार केला आहेस. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा म्हणतात देवा द्रोपती च्या धावेला तु जसा धावून गेलास त्याप्रमाणेच माझ्या मदतीला तू धावून यावे.
अभंग क्र. १६३६
कोठे गुंतलासी कोणांच्या धावया । आली देवराया निद्रा तुज ॥१॥
कोठे गुंतलासी भक्तीप्रेमसुखे । न सुटेती मुखे गोपिकांची ॥धृपद॥
काय पडिले तुज कोणाचे संकट । दुरी पंथ वाट न चलवे ॥२॥
काय माझे तुज गुण दोष दिसती । म्हणोनि श्रीपती कोपलासी ॥३॥
काय जाले सांग माझिया कपाळा । उरला जीव डोळा तुका म्हणे ॥४॥
अर्थ

हे देवराया तू कोठे गुंतला आहेस कोणाच्या मदतीला तर तू धावून गेला नाहीस किंवा तुला निद्रा तर आलेली नाही ना ? अरे देवा तू नक्की कोठे गुंतलेला आहे, तू गोपी सुखात गुंतला नाही ना कारण गोपींचे मुख तू का एकदा पाहिले तर ते तुला काही सुटतच नाही. अरे देवा तुझ्या कोणत्या भक्तावर संकट आले नाही ना कारण मग तू त्याचे संकट निवारण करण्यास गेला असशील किंवा माझ्याकडे येण्याचा मार्ग दूर आहे त्यामुळे तु मला भेट देण्यात येत नाहीस ? हे लक्ष्मीपते माझे काही अपराध तुला दिसून आले आहे काय म्हणून तू असा माझ्यावर रागावला आहेस ? तुकाराम महाराज म्हणतात अहो देवा माझ्या जे भाग्यात आहे ते सांगा मी तुमची भेट केव्हा होईल ते सांगा मी तुमची वाट डोळ्यात प्राण ओतून पाहत आहे देवा.
अभंग क्र. १६३७
परस्त्रीते म्हणता माता । चित्त लाजविते चित्ता ॥१॥
काय बोलोनिया तोंडे । मनामाजी कानकोंडे ॥धृपद॥
धर्मधारिष्टगोष्टी सांगे । उष्ट्या हाते नुडवी काग ॥२॥
जे जे कर्म वसे अंगी । ते ते आठवे प्रसंगी ॥३॥
बोले तैसा चाले । तुका म्हणे तो अमोल ॥४॥
अर्थ

काही पापी लोक असे आहेत की परस्त्रीला माता म्हणताना त्यांचे चित्त लाजते. परस्त्रीला माता मातेप्रमाणे समजा असे तो त्याच्या तोंडाने सांगतो परंतु सांगताना मात्र त्याच्या अंतःकरणातील कानावर हात असतो. धर्म आणि धारिष्ट लोकांना सांगत असतो पण स्वतःच्या उष्ट्या हाताने देखील तो कावळ्याला उडवीत नाही. जो जसे कर्म करत असतो तसे प्रसंगानुसार त्याला ते कर्म आठवत असते. तुकाराम महाराज म्हणतात जो जसे बोलतो त्याप्रमाणे आचरण करतो तो मनुष्य अमोल आहे तसेच अनमोल ही आहे.
अभंग क्र. १६३८
असत्य वचन होता सर्व जोडी । जरी लग्नघडी परउपकार ॥१॥
जाईल पतना यासि संदेह नाही । साक्ष आहे काही सांगतो ते ॥धृपद॥
वदविले मुखे नारायणे धर्मा । अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला ॥२॥
तुका म्हणे आता सांभळा रे पुढे । अंतरिचे कुडे देईल दुःख ॥३॥
अर्थ

असत्य वचन केव्हाही बोलू नये त्याचा दुसऱ्याला लाभ होत असेल तरीही बोलू नये. एवढेच काय लग्न जुळवून आणण्याचा परोपकार घडत असेल तरीही खोटे बोलू नये. जो कोणी खोटे बोलेल तो पतनास जाईल हे सत्य आहे व याला साक्ष देखील आहे मागे झालेली एक कथा मी सांगत आहे ती तुम्ही ऐका. एकदा असे झाले की युद्ध चालू होते त्यावेळेला ” अश्वत्थामा मेला असे जोरात म्हण असे म्हण व तो मनुष्य आहे की हत्ती आहे असे हळू हळू बोल ” असे स्वतः भगवंत श्रीकृष्ण श्रीकृष्णाने धर्मराजाला सांगितले व धर्मराजाने देखील तसेच केले पण ज्यावेळी धर्मराजा स्वर्गात जात होता त्यावेळी त्याच्या पायाचा अंगठा गळून पडला. तुकाराम महाराज म्हणतात हे लोकांनो तुम्ही आता तरी सावध व्हा खोटे बोलू नका तुम्ही जर खोट बोलला तर तुम्हाला तुम्ही खोटे बोलण्याची भावना शेवटी दुःख देईल.
अभंग क्र. १६३९
जळो त्याचे तोंड । ऐसी का ते व्याली रांड ॥१॥
सदा भोवयासी गाठी । क्रोध धडधडीत पोटी ॥धृपद॥
फोडिली गोंवरी । ऐसी दिसे तोंडावरी ॥२॥
तुका म्हणे नाही । चित्ता समाधान काही ॥३॥
अर्थ

वाईट व्रुत्ति च्या मनुष्याच्या तोंडाला आग लागो त्याच्यासारख्या पापीला तिच्या रांडा आईने तिला जन्म का दिला असेल. की त्याच्या भुवया वर नेहमीच आठ्या पडलेल्या असतात आणि पोटात कामक्रोध भडकलेला असतो त्यांच्या तोंडावर नेहमीच गोवरी फुटलेली आहे असेच वाटते. तुकाराम महाराज म्हणतात अशांच्या चित्तामध्ये कधी कोणत्याही प्रकारचे समाधान नसते.
अभंग क्र. १६४०
तोंडे खाये फार । पादे बोचा करी मार ॥१॥
एक ऐसे ते शाहाणे । आपुले अधीन ते नेणे ॥धृपद॥
कुले घालूनि उघडे । रागे पाहे लोकांकडे ॥२॥
खेळे दयूतकर्म । मग बोंबली जुलूम ॥३॥
निजता आला मोहो । वीता म्हणे मेला गोहो ॥४॥
तुका म्हणे त्यांनी । मनुष्यपणा केली हानी ॥५॥
अर्थ

काही माणसे असे आहेत की ते फार खातात ढुंगणाने सारखे पादण्याचा मारा चालूच ठेवतात. जगामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांना आपले इंद्रिय आपल्या आधीन कसे ठेवावे हेच समजत नाही. असे हे मूर्ख लोक आपले कुले म्हणजे ढुंगण उघडे ठेवून खाली पडतात आणि त्यांना लोक हसले की मग त्यांच्याकडे हे मूर्ख लोक रागाने पाहतात. असे लोक द्यूत खेळून सर्व पैसा हरल्यानंतर माझ्यावर जुलूम झाला असे बोंबलत फिरतात द्यूत खेळून वाईट कर्म करतात. एखादी स्त्री आपल्या पतीबरोबर झोपली निजली तर त्यावेळी तिला संभोग करताना मोह आवरत नाही आणि नंतर बाळंतपणाच्या वेळी त्रास झाला की म्हणते माझा नवरा संभोगाच्या वेळी मेला का बरे नाही त्याने काय मला हा वैताग करून ठेवला आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशा मनुष्याने आपल्याला मनुष्य पण मिळाले असूनही मनुष्य पणाची मोठी हानी करून घेतलेली आहे.
अभंग क्र. १६४१
पतिव्रता नेणे आणिकाची स्तुती । सर्वभावे पति ध्यानी मनी ॥१॥
तैसे माझे मन एकविध जाले । नावडे विठ्ठलेंविण दुजे ॥धृपद॥
सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा । गाय ते कोकिळा वसंतेंसी ॥२॥
तुका म्हणे बाळ मातेपुढे नाचे । बोल आणिकाचे नावडती ॥३॥
अर्थ

पतिव्रता स्त्रीला इतर कोणत्याही पुरुषाची स्तुती ऐकणे आवडत नाही कारण ती त्या पतीशी एकनिष्ठ भावनेने एकरूप झालेली असते तिच्या ध्यानी मनी नेहमी तिचा पती असतो. अगदी त्याप्रमाणे माझे मन विठ्ठलाच्या ठिकाणी एकरूप झाले आहे. एका विठ्ठला वाचून मला दुसरे काही आवडत नाही. सूर्य किरणांमध्ये उमलणारे कमळ केवळ सूर्यकिरण पडल्यावरच उमलते ते रात्री चंद्रप्रकाशात उमलत नाही आणि कोकिळा फक्त वसंत ऋतु मध्येच गायन काम करते. तुकाराम महाराज म्हणतात कोणत्याही मातेचे बाळ असो ते बाळ केवळ त्याच्या स्वतःच्या माते पुढे नाचते त्याच मातेचे बोल बालकाला आवडत असते इतर कोणाचेही बोल त्याला आवडत नाही.
अभंग क्र. १६४२
पंडित म्हणता थोर सुख । परि तो पाहाता अवघा मूर्ख ॥१॥
काय करावे घोकिले । वेदपाठ वाया गेले ॥धृपद॥
वेदी सांगितले न करी । सम ब्रम्ह नेणे दुराचारी ॥२॥
हा वेदीचा अनुभव । तुका देखे जीवशिव ॥३॥
अर्थ

वेदात शिकलेल्या मनुष्याला पंडित म्हटले की फार बरे वाटते. परंतु तसे पाहिले तर तो मूर्ख आहे. कारण त्याने केलेले अक्षर पठण वाया गेलेले आहे व ते वेद पठण करून काय करायचे आहे ? सर्व भूत मात्र मध्ये ब्रम्ह एकच आहे मग तो पंडित या अनुभवाप्रमाणे वागतही नाही आणि मग वेद पठणा चा काय उपयोग आहे ? तुकाराम महाराज म्हणतात वेदाचा मला अनुभव आहे आणि तसे मी वागत ही आहे आणि सर्वत्र मी जीव शिवब्रम्ह ऐक्य ही पाहत आहे.
अभंग क्र. १६४३
पंडित तोचि एक भला । नित्य भजे जो विठ्ठला ॥१॥
अवघे सम ब्रम्ह पाहे । सर्वा भूती विठ्ठल आहे ॥धृपद॥
रिता नाही कोणी ठाव । सर्वा भूती वासुदेव ॥२॥
तुका म्हणे तोचि दास । त्या देखिल्या जाती दोष ॥३॥
अर्थ

जो विठ्ठलाला नित्य भजतो त्यालाच खरे पंडित म्हणावे. सर्वत्र ब्रम्‍ह समान आहे आणि सर्व काही विठ्ठल आहे असे तो नेहमी पाहतो. विश्वातील कोणतीही जागा रिकामी नसून तेथे विठ्ठल आहे आणि सर्व भूतमात्रा मध्ये वासुदेव आहे असे त्याला वाटत असते. तुकाराम महाराज म्हणतात तोच खरा हरीचा दास आहे आणि त्याला नुसते पाहिले तरी सर्व दोषाची निवृत्ती होते.
अभंग क्र. १६४४
ऐका पंडितजन । तुमचे वंदितो चरण ॥१॥
नका करू नरस्तुति । माझी परिसा हे विनंती ॥धृपद॥
अन्न आच्छादन । हे तो प्रारब्धा अधीन ॥२॥
तुका म्हणे वाणी । सुखे वेचा नारायणी ॥३॥
अर्थ

हे पंडित जनहो मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते तुम्ही ऐका. आहो तुम्ही धनासाठी किंवा मान पानासाठी नरस्तुती करू नका एवढी विनंती माझी तुम्ही ऐका. अन्न आणि वस्त्र हे प्रारब्धाच्या अधीन आहे. तुकाराम महाराज म्हणतात अहो तुम्ही तुमची वाणी नारायणाची स्तुती करण्याकरिता करा, त्याने तुम्हाला सुख प्राप्त होईल.

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading