आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१६ मे, दिवस १३६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी २२६ ते २५० सार्थ तुकाराम गाथा अभंग १६२१ ते १६३२
“१६ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १६ May
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १६ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १६२१ ते १६३२ चे पारायण आपण करणार आहोत.
१६ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी २२६ ते २५०,
226-11
ऐसी एकैक शृंगारशोभा । पाहता अर्जुन जातसे क्षोभा । तेवीचि देवो बैसला की उभा । का शयालु हे नेणवे ॥226॥
अशा रीतीने विश्वरूपाची एक एक सौंदर्य शोभा पाहतं असता, अर्जुन अगदी भांबावून गेला. तसेच देव बसले आहेत, उभे आहेत, की निजले आहेत हे त्याला काहीच कळेना.
227-11
बाहेर दिठी उघडोनि पाहे । तव आघवे मूर्तिमय देखत आहे । मग आता न पाहे म्हणौनि उगा राहे । तरी आंतुही तैसेचि ॥227॥
अर्जुन दृष्टि उघडून बाहेर पाहू लागला, तेव्हा त्याला सर्व मूर्तीमय दिसू लागले आणि आता बाहेर दृष्टि उघडून पाहत नाही असे म्हणून तो डोळे मिटून स्तब्ध राहिला, तर आतहि त्याला तसेच मूर्तीमय दिसू लागले.
228-11
अनावरे मुखे समोर देखे । तयाभेणे पाठीमोरा जव ठाके । तव तयाहीकडे श्रीमुखे । करचरण तैसेचि ॥228॥
दृष्टिसमोर विश्वरूपाची असंख्य विशाल मुखे पाहून, भीतीने अर्जुन विश्वरूपाकडे पाठ करून उभा राहिला असता, तिकडेहि त्याला तशीच विश्वरूपाची असंख्य व विशाल मुखे व करचरणादिक दिसू लागले.
229-11
अहो पाहता कीर प्रतिभासे । एथ नवलावो काय असे ? । परि न पाहतांही दिसे । चोज आइका ॥229॥
अहो ! दृष्टीने पाहत असतांना अर्जुनाला विश्वरूप दिसावे यात आश्चर्य काय आहे, पण तो पाहत नसतांना देखील त्याला विश्वरूप दिसत होते, हे नवल ऐका !
230-11
कैसे अनुग्रहाचे करणे । पार्थाचे पाहणे आणि न पाहणे । तयाही सकट नारायणे । व्यापूनि घेतले ॥230॥
भगवंताच्या कृपेचे करणे कसे आहे, पहा ! अर्जुनाचे पाहणे व न पाहणे या दोहोलाहि भगवंतांनी व्यापून घेतले.
(जेवढे काही पांचभौतिक जडविनाशी पदार्थ आहेत, ते सर्व देश, काल, वस्तु या तिन्ही मर्यादेने मर्यादित असल्यामुळे ते ज्ञानाने, आहेत असे करतात, तेव्हाच ते असतात. जेव्हा त्यांचे ज्ञान होत नाही — म्हणजे ते आहेत असे कळत नाही – तेव्हा ते नसतात; पण परब्रह्म, अद्वैत, एक जिनसी व त्याच्याहून दुसर्या वस्तूंचे अस्तित्वच मानता येत नाही, इतके व्यापक असल्यामुळे व त्याची ज्ञानदृष्टिहि तशीच नित्य अविनाशी असल्यामुळे, ज्याप्रमाणे त्या परब्रह्माचे अस्तित्व व निस्तित्व पाहण्यावर किंवा न पाहण्यावर अबलंबून नसते; त्याप्रमाणेच श्री ज्ञानेश्वर माऊलींनी येथील विश्वरूपाचे अस्तित्व व नास्तित्व अर्जुनाचे पाहण्यावर किंवा न पाहण्यावर अवलंबून नव्हते, असे विधान करून, परमेश्वराचे नामरूपरहित असणारे साकारस्वरूपदेखील, परमेश्वराच्या नामरूपरहित निराकार स्वरूपाप्रमाणेंच शुध्द व नित्य असते, असे दाखविले आहे. )
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
231-11
म्हणौनि आश्चर्याच्या पुरी एकी । पडिला ठायेठाव थडी ठाकी । तव चमत्काराचिया आणिकी । महार्णवी पडे ॥231॥
म्हणून एका आश्चर्याच्या पुरांत पडलेला अर्जुन, त्या आश्चर्याच्या पुरांतून बाहेर पडून थडीला लागतो तोंच, तो तेथल्या तेथे दुसर्या चमत्काराच्या समुद्रांत पडत असे.
232-11
तैसा अर्जुनु असाधारणे । आपुलिया दर्शनाचेनि विंदाणे । कवळूनि घेतला तेणे । अनंतरूपे ॥232॥
याप्रमाणे अलौकिक अशी अनंत रूपे धारण करणार्या विश्वरूप परमेश्वराने आपल्या विश्वरूपाची लीला दाखवून, अर्जुनाला संपूर्ण व्यापून टाकले.
233-11
तो विश्वतोमुख स्वभावे । आणि तेचि दावावयालागी पांडवे । प्रार्थिला आता आघवे । होऊनि ठेला ॥233॥
भगवान श्रीकृष्ण स्वभावतःच सर्वव्यापी व सर्वतोमुख आहे आणि अर्जुनाने तो स्वभावतःच सर्वतोमुख सर्वव्यापी कसा आहे, हेच पाहण्याची इच्छा करून, तसे विश्वरूप दाखविण्याची भगवंताला प्रार्थना केली व भगवान तात्काळ त्याच्या समोर विश्वरूप होऊन राहिले.
234-11
आणि दीपे का सूर्ये प्रगटे । अथवा निमुटलिया देखावेचि खुंटे । तैसी दिठी नव्हे जे वैकुंठे । दिधली आहे ॥234॥
भगवंतांनी विश्वरूप पाहण्याकरिता अर्जुनाला जी दृष्टि दिली ती दिव्याच्या किंवा सूर्याच्या सहाय्याने पाहू शकणारी किंवा ती ” मिटली असता पाहणेच होणार नाही ” अशी नव्हती.
235-11
म्हणौनि किरीटीसि दोही परी । ते देखणे देखे अंधारी । हे संजयो हस्तिनापुरी । सांगतसे राया ॥235॥
म्हणून अर्जुन, डोळे मिटून व डोळे उघडे ठेवून, अशा दोन्ही प्रकाराने आंधारी म्हणजे दिव्याच्या किंवा सूर्याच्या प्रकाशावाचून विश्वरूप पाहात होता; असे हस्तिनापुरी संजय धृतराष्ट्राला सांगु लागला.
236-11
म्हणे किंबहुना अवधारिले । पार्थे विश्वरूप देखिले । नाना आभरणी भरले । विश्वतोमुख ॥236॥
संजय म्हणतो, किंबहुना नाना अलंकाराने अलंकृत झालेले व सर्वत्र मुखे असलेले, असे विश्वरूप अर्जुनाने पाहिले, हे आपण ऐकले ना ?
दिवि सूर्य सहस्रस्यभवेद्युगपदुत्थिता ।
यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥11. 12॥
अर्थ आकशामधे सहस्रावधी सूर्यांची प्रभा जर एकदम उत्पन्न झाली तर ती त्या महात्म्या श्रीहरीच्या प्रभे सारखी होईल ॥11-12॥
237-11
तिये अंगप्रभेचा देवा । नवलावो काइसया ऐसा सांगावा । कल्पांती एकुचि मेळावा । द्वादशादित्यांचा होय ॥237॥
महाराजा धृतराष्ट्रा ! विश्वरूपाच्या अंगाचे तेज कशासारखे होते ते सांगू गेल्यास, कल्पांतसमयी बारा आदित्यांचा समुदाय एकत्र होतो.
238-11
तैसे ते दिव्यसूर्य सहस्रवरी । जरी उदयजती का एकेचि अवसरी । तऱ्ही तया तेजाची थोरी । उपमू नये ॥238॥
असे ते हजारो दिव्यसूर्य जरी एकाचवेळी उदय पावले, तरी त्यांच्या त्या एकत्रित झालेल्या तेजांच्या थोरवीचीदेखील विश्वरूपाच्या तेजाला उपमा देता येणार नाही.
239-11
आघवयाचि विजूंचा मेळावा कीजे । आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे । तेवीचि दशकुही मेळविजे । महातेजांचा ॥239॥
त्यातच संपूर्ण विजांचा प्रकाश एकत्र करून आणि प्रलयातील अग्नीची संपूर्ण सामग्री बरोबरी करू शकेल; पण ते तंतोतंत विश्वरूपाच्या तेजासारखे कधीच होणार नाही.
240-11
तऱ्ही तिये अंगप्रभेचेनि पाडे । हे तेज काही काही होईल थोडे । आणि तया ऐसे कीर चोखडे । त्रिशुद्धी नोहे ॥240॥
असे महात्म्या विश्वरूप श्रीहरीच्या सर्वागाच्या ठिकाणी असणारे साहजिक तेज होते, ते भगवान व्यासमुनींच्या कृपेने मीही पाहू शकलो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
241-11
ऐसे महात्म्य या श्रीहरीचे सहज फांकतसे सर्वागीचे तेज । ते मुनिकृपा जी मज । दृष्ट जाहले ॥241॥
असे महात्म्या विश्वरूप श्रीहरीच्या सर्वागाच्या ठिकाणी असणारे साहजिक तेज होते, ते भगवान व्यासमुनींच्या कृपेने मीही पाहू शकलो.
(भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन झाले व संजयला श्रीगुरु व्यासांच्या कृपेने त्याच विश्वरूपाचे दर्शन झाले. यावरून श्रीगुरूच्या कृपेनेही विश्वरूपाचे दर्शन होते, असे स्पष्ट दिसते. )
तत्रैकस्थं जगत्कृत्स्नम् प्रविभक्तमनेकधा॥
अपश्यद्देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा ॥11. 13॥
अर्थ देव, पितर, मनुष्य इत्यादि) अनेक भिन्न) रूपांनी विभाग पावलेले हे सर्व जग त्यावेळी देवाधिदेवाच्या त्या शरीरामधे (एका बाजूला) एका ठिकाणी स्थित असे अर्जुनाने पाहिले. ॥11-13॥
242-11
आणि तिये विश्वरूपी एकीकडे । जग आघवे आपुलेनि पवाडे । जैसे महोदधीमाजी बुडबुडे । सिनाने दिसती ॥242॥
आणि महासमुद्राच्या ठिकाणी, जसे निरनिराळे बुडबुडे दिसतात, तसे त्या विश्वरूपात एका बाजूशा संपूर्ण जग आपल्या विस्ताराने भासत होते.
(येथून आपल्या विश्वरूपाच्या ठिकाणीच जगाची उत्पत्ती, स्थिती, लय कसे होतात, हे भगवंतांनी अर्जुनाला दाखवावयास सुरुवात केली आहे.
सर्व नामरूपाने एक भगवान नटला आहे, असे ज्ञान नसलेल्या अज्ञानी जीवांना, सर्व नामरूपाचा पसारा, भ्रमाने जगद्रूप व सत्य भासत असतो; पण भगवंताच्या अद्वैतस्वरूपाचे ज्ञान झाल्यावर मात्र, तो संपूर्ण जगत्पसारा भ्रमजन्य भास आहे, असा अनुभव येतो. )
243-11
का आकाशी गंधर्वनगर । भूतळी पिपीलिका बांधे घर । नाना मेरुवरी सपूर । परमाणु बैसले ॥243॥
आकाशात गंधर्वनगर दिसावे किंवा जमिनीवर मुंग्यांनी वारूळ उभारावे अथवा मेरू पर्वतावर सूक्ष्म परमाणू पसरले असावेत,
244-11
विश्व आघवेचि तयापरी । तया देवचक्रवर्तीचिया शरीरी । अर्जुन तिये अवसरी । देखता जाहला ॥244॥
त्याप्रमाणे त्यावेळी भगवंताच्या विश्वरूप शरीराच्या ठिकाणी, अर्जुन संपूर्ण जगदाभास पाहता झाला.
ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः ।
प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जिलिरभाषित ॥11. 14॥
अर्थ तेव्हा तो आश्चर्ययुक्त व रोमांचयुक्त झालेला अर्जुन आपल्या मस्तकाने देवाला वंदन करून हात जोडून म्हणाला – ॥11-14॥
(संजयकृत अर्जुनाचे वर्णन = 246)
245-11
तेथ एक विश्व एक आपण । ऐसे अळुमाळ होते जे दुजेपण । तेही आटोनि गेले अंतःकरण । विराले सहसा ॥245॥
तेथे जग ही एक वस्तू असून तिला पाहणारा तिच्याहून निराळा मीही एक आहे, असे जे थोडेसे द्वैत सत्य वाटत होते, ते नाहीसे होऊन अंतःकरण एकाएकी विरून गेले.
246-11
आंतु आनंदा चेइरे जाहले । बाहेरि गात्रांचे बळ हारपोनि गेले । आपाद पा गुंतले । पुलकांचले ॥246॥
आतील महानंद प्रगट झाला, बाहेर शरीराच्या अवयवाचे ठिकाणी जे बळ होते, ते नाहीसे झाले व पायापासून मस्तकापर्यंत सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले.
247-11
वार्षिये प्रथमदशे । वोहळलया शैलांचे सर्वाग जैसे । विरूढे कोमलांकुरी तैसे । रोमांच जाहले ॥247॥
वर्षाऋतूच्या आरंभीं, ज्याप्रमाणे पर्वताच्या अंगावरून पावसाचे पाणी वाहून गेल्यानंतर, गवताचे कोवळे अंकुर फुटतात, त्याप्रमाणे अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
248-11
शिवतला चंद्रकरी । सोमकांतु द्रावो धरी । तैसिया स्वेदकणिका शरीरी । दाटलिया ॥248॥
सोमकांतमण्याशी चंद्राच्या किरणांचा स्पर्श झाला असता, तो सोमकांत मणी जसा पाझरतो, तसे अर्जुनाच्या सर्व शरीरावर धर्मबिंदु दाटून आले.
249-11
माजी सापडलेनि अलिकुळे । जळावरी कमळकळिका जेवी आंदोळे । तेवी आंतुलिया सुखोर्मीचेनि बळे । बाहेरि कांपे ॥249॥
पाण्यावरील कमळाच्या कळींत सापडलेल्या भ्रमराच्या समुदायाने, ज्याप्रमाणे कमळाची कळी हालू लागते, त्याप्रमाणे आत उठणार्या सखाच्या उमाळ्यामुळे बाहेर अर्जुनाचे अंग कापूं लागले.
250-11
कर्पूरकर्दळीची गर्भपुटे । उकलता कापुराचेनि कोंदाटे । पुलिका गळती तेवी थेंबुटे । नेत्रौनि पडती ॥250॥
कापूर उत्पन्न करणार्या कापूरकेळीत कापूर दाटला असता ज्याप्रमाणे त्या कापूरकेळीची सोपटे उकलली जाऊन, त्यातून कापराचे कण गळू लागतात, त्याप्रमाणे अर्जुनाच्या नेत्रांतून जलबिंदु पडू लागले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १३६ वा, १६, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १६२१ ते १६३२
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. १६२१
जा रे तुम्ही पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा ॥१॥
गुण दोष नाणी मना । करी आपणासारिखे ॥धृपद॥
उभारोनि उभा कर । भवपार उतराया ॥२॥
तुका म्हणे तांतड मोठी । जाली भेटी उदंड ॥३॥
अर्थ
आहो तुम्ही पंढरपूरला जा कारण तेथे दिनाचा सोयरा पांडुरंग आहे. पांडुरंगाला जे भक्त अनन्य भक्तीने शरण जातात त्या भक्तांचे कोणत्याच प्रकारचे दोष न पाहता त्यांना पांडुरंग आपल्याप्रमाणेच उच्चपदावर बसवितो. पांडुरंग भक्तांना या भवसागरातून पार पाडण्याकरता आपले दोन्ही कर कटेवर ठेवून वीटेवर उभा आहे. तुकाराम महाराज म्हणतात या पांडुरंगाला आपल्या भक्तांच्या भेटीसाठी फार तातडी असते तो फार उतावीळ झालेला असतो आणि त्याच्या भेटीने भक्तांना फार मोठा लाभ होतो.
अभंग क्र. १६२२
या रे हरीदासानो जिंको कळिकाळा । आमुचिया बळा पुढे किती बापुडे ॥१॥
रंग सुरंग घमंडी नाना छंदे । हास्यविनोदे नामाचि आवडी ॥धृपद॥
येणे तेणे प्रकारे बहुता सुख जोडे । पूजन ते घडे नारायणा अंतरी ॥२॥
वांकुडीया माना बोल बोलावे आरुष । येईल तो त्यास छंद पढीये गोविंदा ॥३॥
आपुलाले आनंदे एकापुढे एक नटा । नाही थोर मोठा लहान या प्रसंगी ॥४॥
तुका म्हणे येथे प्रेम भंगू नये कोणी । देव भक्त दोन्ही निवडिता पातक ॥५॥
अर्थ
हे हरिदासांनो तुम्ही सर्व या आपण सर्व एकत्र येऊन कळीकाळाला जिंकू आणि आपल्या बाळा पुढे त्याचे काय चालेल ? अध्यात्माला विविध रंगाने रंगवून टाकू अध्यात्मा विषयी घमेंड म्हणजे अभिमान धरा आणि तसेच विविध प्रकारचे छंद परमार्थामध्ये धरा व परमार्थ करताना हास्यविनोद करून हरिनामा विषयी आवड वाढवा अशाप्रकारे परमार्थ केल्याने सर्वाना सुख होते. आणि नारायणाची प्राप्ती होते व नारायणाचे ही पूजन अंतकरणात घडते. आनंदाने हरीनाम घ्यावे आणि त्या छंदात माना डोलाव्यात ज्याला ज्या प्रकारच्या भक्तीचा छंद असेल त्या प्रकारची भक्ती नारायणाला आवडते, गोविंदाला आवडते. प्रत्येकाने आपल्या आनंदाने एकापेक्षा एक अधिकार संपन्न होऊन नटावे परमार्थामध्ये कोणीही लहान-मोठा, उच्च-नीच असा भेद नाही. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ मध्ये कोणीही भक्ती आणि प्रेमाचा भंग करू नये. देव आणि भक्त यांच्या मध्ये जर कोणी भेद केला तर त्याला मोठे पातक लागते.
अभंग क्र. १६२३
देव जाणता देव जाणता । आपुलिया सत्ता एकाएकी ॥१॥
देव चतुर देव चतुर । जाणोनी अंतर वर्ततसे ॥धृपद॥
देव निराळा देव निराळा । अलिप्त विटाळ तुका म्हणे ॥२॥
अर्थ
देव सर्वज्ञ आहे आणि तो त्याच्या सत्तेने सर्वत्र व्यापलेला आहे. तो फार चतुर आहे फार चतुर आहे तो सर्वाचे अंतकरण जाणूण भक्ताच्या अंतकरणात वास करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात देव सर्वापासून निराळा आहे आणि त्याच्या ठिकाणी कोणताही विटाळा नाही तो विटाळा पासून अलिप्त आहे.
अभंग क्र. १६२४
माझ्या मुखे मज बोलवितो हरी । सकळांच्या अंतरी नारायण ॥१॥
न करावा द्वेष भूतांचा मत्सर । हा तव विचार जाणो आम्ही ॥२॥
तुका म्हणे दोष नाही या विचारे । हिताची उत्तरे शिकविता ॥३॥
अर्थ
जो नारायण सर्वाच्या अंतकरणात वास करतो तोच नारायण मला बोलवितो आहे. कोणत्याही प्राणी मात्रांचा द्वेष करू नये कारण सर्व प्राण्यांमध्ये हरी वास्तव्य करतो आहे हे मी जाणतो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही हिताचा उपदेश करताना जर कठोर शब्दांमध्ये बोलत असलो तरी तो उपदेश द्वेष किंवा मत्सर या भावनेने नसून तो त्यांच्या उद्धारासाठी आहे त्यामुळे आम्ही जरी बोललो तरी त्याचा कोणताच दोष आम्हाला लागत नाही.
अभंग क्र. १६२५
मांस खाता हाउस करी । जोडुनि वैरी ठेवियेला ॥१॥
कोण त्याची करिल कीव । जीवे जीव नेणती ॥धृपद॥
पुढिलांसाठी पाजवी सुरी । आपुली चोरी अंगुळी ॥२॥
तुका म्हणे कुटती हाडे । आपुल्या नाडे रडती ॥३॥
अर्थ
पशुहत्या करून जो मांस खातो त्याने वैरीच जोडून ठेवला आहे. आपल्यासारखाच पशुचाही जीव आहे असे जाणत नाहीत त्यांची यमलोकी कोन किव करील. पुढे असलेल्या पशूची मान कापण्यास हा मनुष्य सुरी परजून ठेवतो आणि मान कापत असताना आपले बोट कापले जाईल म्हणून बोट बाजूला ठेवतो. तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांना यमदूत पुढे त्यांची हाडे कुठून कुठून मारतात मग आपल्या कर्माची फळे भोगतांना हे लोक रडतात असतात.
अभंग क्र. १६२६
तुज जाणे तान्हे नाही पांडुरंगा । का जी मज सांगा उपेक्षिले ॥१॥
तुज ठावे होते पातकी मी खरा । आधीच का थार दिधली पायी ॥धृपद॥
अंक तो पाडिला हरीचा मी दास । भेद पंगतीस करू नये ॥२॥
तुका म्हणे आम्ही जिंतिले ते खरे । आता उणे पुरे तुम्हा लागी ॥३॥
अर्थ
हे पांडुरंगा मी तुमचे तान्हे बाळ आहे मी तुमच्या मूळ स्वरूपाला जाणू शकत नाही तरीही तुम्ही माझी उपेक्षा का केली हे तुम्ही मला सांगा ? तुला माहित आहे की मी पतकी आहे तर मग तू आधी मला का थारा दिला, का तुझ्या पाया जवळ मला आश्रय दिला ? देवा मी हरी भक्तांमध्ये जरी पहिल्या क्रमांकावर नसेल परंतु मी हरी भक्तांचे पंक्तीत तर बसलेलो आहे, त्यामुळे माझ्या मध्ये तुम्ही पंक्ती भेद करू नका. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही तुला खरोखर जिंकले आहे आणि आमच्या मध्ये काही उणेपुरे जर असेल तर त्याची जबाबदारी तुमची असेल.
अभंग क्र. १६२७
आम्हा घरी धन शब्दाचींच रत्ने । शब्दाचींच शस्त्रे यत्न करू ॥१॥
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन । शब्द वाटू धन जनलोका ॥२॥
तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव । शब्देचि गौरव पूजा करू ॥३॥
अर्थ
आमच्या घरी अभंग रुपी शब्दाचे धन आहे व तेच आमचे शस्त्रे आहेत आणि त्याचाच आम्ही अभ्यास करू. अभंग रुपी शब्द हेच आमच्या जीवाचे जीवन आहे व ते अभंग रुपी धन रत्न आम्हा लोकांमध्ये वाटु. तुकाराम महाराज म्हणतात हे अभंगरुपी शब्द आमचा देव आहे आणि त्याचाच म्हणजे अभंग रुपी शब्दाचाच आम्ही गौरव करू.
अभंग क्र. १६२८
ब्रम्हज्ञान दारी येते काकुलती । अव्हेरिले संती विष्णुदासी ॥१॥
रिघो पाहे माजी बळेचि त्याचे घर । दवडिती दूर म्हणोनिया ॥२॥
तुका म्हणे येथे न चाले सायास । पडिले उदास त्यांच्या गळा ॥३॥
अर्थ
संत आणि विष्णुदास यांच्या घरी ब्रम्हज्ञान काकुळतीला येऊन म्हणते की, तुम्ही मला स्वीकारा परंतु संत आणि विष्णुदास त्यांचा अव्हेर करतात. ब्रम्हज्ञान संत आणि विष्णुदास यांच्या घरी बळेच प्रवेश करू पाहतात परंतु विष्णुदास व संत त्याला हाकलून लावतात. तुकाराम महाराज म्हणतात संत आणि विष्णुदास यांच्यापुढे कोणत्याही प्रकारचे प्रयत्न चालत नाहीत पण असे असले तरी देहा विषय उदास असलेल्या संतांच्या आणि विष्णुदास यांच्या गळ्यात ब्रम्हज्ञान बळेच पडते.
अभंग क्र. १६२९
कासया लागला यासी चौघाचार । मुक्तीचा वेव्हार निवडिला ॥१॥
ग्वाही भक्तांची घालूनिया वरी । महजर करी आहे माझ्या ॥धृपद॥
तुम्हा वेगळ्या आपुल्या ठायी । होते करुनि ते ही माझे माझे ॥२॥
भांडण सेवटी जाले एकवट । आता कटकट करू नये ॥३॥
ठेविला ठेवा तो आला माझ्या हाता । आता नसे सत्ता तुज देवा ॥४॥
तुका म्हणे वायाविण खटपटा । राहिलो मी वाटा घेऊनिया ॥५॥
अर्थ
देवा आम्हीही तुमच्याप्रमाणे मुक्त झालो आहोत, तरी हा निवाडा चारचौघांमध्ये नेण्याचे काय कारण ? देवा आपल्यामध्ये जो करार झाला आहे त्याचे निकाल पत्र माझ्याकडे आहे आणि त्याच्यावर भक्तांच्या स्वाक्षऱ्या देखील साक्ष म्हणून आपण घेतल्या आहेत. देवा या भव सागरातील सर्व ” मी माझे माझेच ” म्हणत होतो त्यामुळे मी व तुम्ही वेगवेगळे आहोत असेच मला भासत होते. देवा आता तुम्ही आणि आम्ही एकच आहोत याचा निकाल पूर्वी लागलेला आहे, तुम्ही आम्ही मुक्त आहोत याचा निकाल पूर्वीच लागलेला आहे त्यामुळे व्यर्थ कटकट आता नको आहे. आम्ही तुमच्या जवळच सेवारूपी ठेवा ठेवला होता तो आता आमच्या हाती लागला आहे त्यामुळे आता त्यावर तुमची सत्ता नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता तुम्ही कितीही खटपट करा त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण मी माझा वाटा घेऊन मोकळा झालो आहे.
अभंग क्र. १६३०
जाती पंढरीस । म्हणे जाईन तयास ॥१॥
तया आहे संवसार । ऐसे बोले तो माहार ॥धृपद॥
असो नसो भाव । जो हा देखे पंढरिराव ॥२॥
चंद्रभागे न्हाती । तुका म्हणे भलते याती ॥३॥
अर्थ
पंढरिला जाणर्याला जे म्हणतात मी पुढे नंतर केव्हातरी पंढरपूरला जाईन किंवा जातो, आम्हाला संसार आहे असे जे कोणी म्हणतात ते महारा प्रमाणेच आहेत. जे कोणी पंढरी रायाचे दर्शन घेतात त्यांच्या मनात भक्तीभाव असो किंवा नसो. तुकाराम महाराज म्हणतात आणि जे चंद्रभागेच्या पाण्यात स्नान करतात ते कोणत्याही जातीचे जरी असले तरी काही हरकत नाही ते धन्य आहेत, श्रेष्ठ आहेत, पवित्र आहेत.
अभंग क्र. १६३१
धरियेली सोंगे । येणे अवघी पांडुरंगे ॥१॥
ते हे ब्रम्ह विटेवरी । उभे चंद्रभागे तिरी ॥धृपद॥
अंतर्व्यापी बाही । धांडोळिता कोठे नोहे ॥२॥
योग याग तपे । ज्याकारणे दानजपे ॥३॥
दिले नेदी जति । भोग सकळ ज्या होती ॥४॥
अवघी लीळा पाहे । तुका म्हणे दासा साहे ॥५॥
अर्थ
पांडुरंगाने अनेक प्रकारचे सोंगे संपादन केले आहेत आणि तेच ब्रम्ह चंद्रभागेच्या तिरी विटेवर उभे आहे. आणि तेच ब्रम्ह सर्वाच्या अंतरंगात व बाह्य रंगात व्यापलेले आहे आणि त्याचा शोध घ्यायला गेले तर तो सापडत नाही. ज्याच्यासाठी योग, याग, तप, दान, जप इत्यादी साधने केली जातात व कोणी त्याला कोणत्याही प्रकारचे भोग दिले किंवा नाही दिले तरी ते भोग तो भोगत असतो. तुकाराम महाराज म्हणतात जगाची प्रलय, उत्पत्ती आणि स्थिती ही ज्याची लीला आहे तोच भक्तांनाही सहाय्य करतो हीच त्याची लीला आहे.
अभंग क्र. १६३२
ज्याचे गर्जता पवाडे । कळिकाळ पाया पडे ॥१॥
तो हा पंढरीचा राणा । पुसा सहा चौं अठरा जणा ॥धृपद॥
चिंतिता जयासी । भुक्तीमुक्ती कामारी दासी ॥२॥
वैकुंठासी जावे । तुका म्हणे ज्याच्या नावे ॥३॥
अर्थ
ज्याचे पोवाडे गर्जुन केले असता कळिकाळ देखील शांत बसतो, तो दुसरा तिसरा कोणीही नसून पंढरीराया आहे. आणि याच्यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर सहा शास्त्र, चार वेद, आठरा पुराणांना तुम्ही विचारून पहा. त्याचे चिंतन केल्यावर भक्ती व मुक्ती या काम करणाऱ्या दासी होतात. तुकाराम महाराज म्हणतात असा हा पांडुरंग आहे त्याचे नांव जरी घेतले तरी वैकुंठ प्राप्त होते.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















