आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१५ मे, दिवस १३५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी २०१ ते २२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १६०९ ते १६२०
“१५ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १५ May
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १५ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १६०९ ते १६२० चे पारायण आपण करणार आहोत.
१५ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी २०१ ते २२५,
201-11
तैसी अद्भुते भयासुरे । तेथ वदने देखिली वीरे । आणिके असाधारणे साळंकारे । सौम्ये बहुते ॥201॥
त्याप्रमाणे भगवंताची अत्यंत भ्यासुर मुखे अर्जुनाने पाहिली आणखी काही अप्रतिम अलंकारांनी अलंकृत केलेली व सौम्य अशी पुष्कळशी तोंडे पाहिली,
202-11
पै ज्ञानदृष्टीचेनि अवलोके । परी वदनांचा शेवटु न टके । मग लोचन ते कवतिके । लागला पाहो ॥202॥
परंतु (अर्जुन) ज्ञानदृष्टीने पाहत होता, तरी त्या मुखांचा शेवट व अंत त्याला लागत नव्हता; भगवंताचे डोळे कोणीकडे आहेत, हे तो कौतुकाने पाहू लागला.
(अर्जुन ज्ञानदृष्टिने पाहत होता, तरी तोंडाचा अंत त्याला लागला नाही, या माऊलिंच्या वचनावरून विश्वरूप हा अमर्याद अशा सच्चिदानंद परब्रह्माचाच नामरूपात्मक अविष्कार असल्यामुळे, परब्रह्माप्रमाणेच त्याचा व त्याच्या एका एका अवयवाचा देखील शेवट दिसत नव्हता, हे साहजिकच आहे. )
203-11
तव नानावर्णे कमळवने । विकासिली तैसे अर्जुने । डोळे देखिले पालिंगने । आदित्यांची ॥203॥
तेव्हा अनेक रंगांच्या कमळाची वने प्रफुल्लित झालेली दिसावी व सूर्यांच्या रांगा लागाव्या, त्याप्रमाणे अर्जुनाने देवांच्या डोळ्यांच्या रांगा पाहिल्या,
204-11
तेथेचि कृष्णमेघांचिया दाटी- । माजी कल्पांत विजूंचिया स्फुटी । तैसिया वन्हि पिंगळा दिठी । भ्रूभंगातळी ॥204
तेथेच ज्याप्रमाणे प्रलयकाली पाण्याने भरलेल्या काळ्या मेघांच्या गर्दीत विजा चमकाव्या, त्याप्रमाणे भुवयाखाली भगवंताची अग्निसारखी पिंगटदृष्टि अर्जुन पाहू लागला.
205-11
हे एकैक आश्चर्य पाहता । तिये एकेचि रूपी पंडुसुता । दर्शनाची अनेकता । प्रतिफळली ॥205॥
असे एक एक अश्चर्य पाहता पाहता, एका विश्वरूपाचे ठिकाणीच अर्जुनाला अनेक प्रकारचे अनेक प्रकारचे दर्शन होऊ लागले.
206-11
मग म्हणे चरण ते कवणेकडे । केउते मुकुट के दोर्दंडे । ऐसी वाढविताहे कोडे । चाड देखावयाची ॥206॥
मग अर्जुन म्हणतो, देवाचे चरण कोठे आहेत ? देवाचा मुकुट कोठे आहे व बाहूकोठे आहेत ? अशाप्रमाणे भगवंताचे निरनिराळे अवयव पाहण्याची, अर्जुन इच्छा वाढवू लागला.
207-11
तेथ भाग्यनिधि पार्था । का विफलत्व होईल मनोरथा । काय पिनाकपाणीचिया भाता । वायकांडी आहाती ? ॥207॥
संपूर्ण भाग्याचा सांठा अशा अर्जुनाचे मनोरथ कसे व्यर्थ जातील ? पिनाक धनुष्य धारण करणार्या शंकराच्या भात्यात निष्फळ होणारे बाण राहतील काय ?
208-11
ना तरी चतुराननाचिये वाचे । काय आहाती लटिकिया अक्षरांचे साचे ? म्हणौनि साद्यंतपण अपारांचे । देखिले तेणे ॥208॥
किंवा ब्रह्मदेवाच्या वाणीत अर्थहीन अक्षरांचे सांचे राहू शकतात काय ? म्हणूनच त्या भाग्यवान अर्जुनाने अपार अशा विश्वरूपालाहि संपूर्ण पाहिले.
209-11
जयाची सोय वेदा नाकळे । तयाचे सकळावयव एकेचि वेळे । अर्जुनाचे दोन्ही डोळे । भोगिते जाहले ॥209॥
ज्या विश्वरूपाची स्थिती वेदालाही अगम्य आहे, त्या विश्वरूपाचे सर्व अवयव अर्जुन दोन्ही डोळ्यांनी एकदमच पाहू लागला.
210-11
चरणौनि मुकुटवरी । देखत विश्वरूपाची थोरी । जे नाना रत्न अळंकारी । मिरवत असे ॥210॥
नाना प्रकारच्या रत्नालंकारांनी सुशोभित झालेले विश्वरूपचे वैभव, अर्जुन पायापासून मस्तकापर्यंत पाहू लागला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
211-11
परब्रह्म आपुलेनि आंगे । ल्यावया आपणचि जाहला अनेगे । तिये लेणी मी सांगे । काइसयासारिखी ॥211॥
परमात्मा आपल्या अनेक अंगावर घालण्याकरिता आपणच अनेक अलंकाररूप झाला होता. ते अलंकार कशासारखे होते, ते मी सांगतो.
212-11
जिये प्रभेचिये झळाळा । उजाळु चंद्रादित्यमंडळा । जे महातेजाचा जिव्हाळा । जेणे विश्व प्रगटे ॥212॥
ज्याच्या प्रभेच्या कांतीने चंद्रमंडळ व सूर्यमंडळ यांना तेज प्राप्त झाले आहे आणि जे महातेजाचाही जिव्हाळा असून, ज्यामुळे हे विश्व म्हणजे हा नामरूपाचा पसारा प्रगट होतो,
213-11
तो दिव्यतेज शृंगारु । कोणाचिये मतीसी होय गोचरु । देव पापियाचा आपणपेचि लेइले ऐसे वीरु । देखत असे ॥213॥
त्या दिव्यतेजरूप श्रृंगाराचे कोणाच्या बुध्दीला आकलन होऊ शकेल ? देवाने आपणच अलंकाररूप होऊन, आपणच ते अलंकार घातले आहेत, असे वीर अर्जुन पाहात होता.
214-11
मग तेथेचि ज्ञानाचिया डोळा । पहात करपल्लवा जव सरळा । तव तोडित कल्पांतीचिया ज्वाळा । तैसी शस्त्रे झळकत देखे ॥214॥
पुनः तेथेच अर्जुन ज्ञानदृष्टीने, सरळ अशा हिताकडे पाहात असता, त्या हाताच्या ठिकाणी कल्पांतीच्या अग्नीच्या ज्वाळा तोडणारी तेजस्वी शस्रे झळकत असलेली तो पाहू लागला.
215-11
आपण आंग आपण अलंकार । आपण हात आपण हतियार । आपण जीव आपण शरीर । देखे चराचर कोंदले देवे ॥215॥
भगवान आपणच अंग व आपणच अलंकार झाले. आपणच हात असून, आपणच हातातील हत्यारही झाले. आपणच जीव असून, आपणच शरीर झाले. अशी संपूर्ण चराचरसृष्टी देवानेच व्यापली आहे, असे अर्जुन पाहू लागला.
216-11
जयाचिया किरणांचे निखरपणे । नक्षत्रांचे होत फुटाणे । तेजे खिरडला वन्हि म्हणे । समुद्री रिघो ॥216॥
ज्या शस्रांच्या तेजस्वी किरणांच्या प्रखरतेमुळे नक्षत्रांचेदेखील फुटाणे फुटत होते आणि ज्या तेजाने संतप्त झालेला अग्नीदेखील, दाह शमविण्याकरिता समुद्रात शिरण्याची इच्छा करीत होता.
217-11
मग कालकूटकल्लोळी कवळिले । नाना महाविजूंचे दांग उमटले । तैसे अपार कर देखिले । दितायुधी ॥217॥
मग जणू काय समुद्राच्या लाटांनी संपूर्ण काळकूट विषच भरून घ्यावे किंवा प्रलयसमयीच्या विजांचे समुदाय प्रगट व्हावेत, त्याप्रमाणे नानाप्रकारची आयुधे धारण केलेले भगवंतांचे अनंत हात अर्जुन पाहू लागला.
दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् ।
सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् ॥11. 11॥
अर्थ दिव्य पुष्पे व वस्त्रे धारण केलेले, दिव्य गंधांची ज्यास उटी केली होती, सर्व आश्चर्यांनी युक्त अनंत सर्वतोमुख व दिव्य असे ते रूप होते. ॥11-11॥
218-11
की भेणे तेथूनि काढिली दिठी । मग कंठमुगुट पहातसे किरीटी । तव सुरतरूची सृष्टी । जयांपासोनि का जाहली ॥218॥
अर्जुनाने भीतीने आपली दृष्टी तेथून काढली व भगवंताच्या कंठाकडे व मुकुटाकडे अर्जुन पाहू लागला, तेव्हा इंद्राच्या नंदनवनातील सर्व पुष्पवृक्षांची ज्यापासून उत्पत्ती झाली असे म्हणता येईल,
219-11
जिये महासिद्धींची मूळपीठें । शिणली कमळा जेथ वावटे । तैसी कुसुमे अति चोखटे । तुरंबिली देखिली ॥219॥
ज्यापासून महासिध्दि प्राप्त होतात व लक्ष्मीलाही आपला शीण भागविण्याकरिता विश्रांती घेता येईल, अशी सुंदर व सुगंधित फुले, ज्याच्या कंठातील माळांत व मुकुटाच्या ठिकाणी खोवलेली दिसत होती.
220-11
मुगुटावरी स्तबक । ठायी ठायी पूजाबंध अनेक । कंठी रुळताति अलौकिक । माळादंड ॥220॥
मुकुटावर फुलांचे गुच्छ खोवले आहेत, ठिकठिकाणी अनेक प्रकारच्या पूजा बांधल्या आहेत, गळ्यात अनेक दिव्य फुलांचे हार रुळतांना दिसत आहेत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
221-11
स्वर्गे सूर्यतेज वेढिले । जैसे पंधरेने मेरूते मढिले । तैसे नितंबावरी गाढिले । पीतांबरु झळके ॥221॥
जणू स्वर्गाने सूर्याचे तेज वेढल्याप्रमाणे किंवा सोन्याने मेरु पर्वताला मढविल्याप्रमाणे भगवंताच्या कमरेभोवंती घट्ट नेसलेला पिवळा पीतांबर झळकत होता.
222-11
श्रीमहादेवो कापुरे उटिला । का कैलासु पारजे डवरिला । नाना क्षीरोदके पांघरविला । क्षीरार्णवो जैसा 222॥
धवलवर्ण महादेवाला कापराची उटी लावावी किंवा कैलास पर्वताला पार्याचा लेप लावावा अथवा क्षीरसमुद्राला दुग्धरूपी उदकाचेच पांघरूण घालावे.
223-11
जैसी चंद्रमयाची घडी उपलविली । मग गगनाकरवी बुंथी घेवविली । तैसी चंदनपिंजरी देखिली । सर्वांगी तेणे 223॥
किंवा ज्याप्रमाणे चंद्राची घडी उकलून त्याचे पांघरूण आकाशाकडून घेववावे, त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सर्वागावर शुभ्रचंदनाची उटी लावलेली पाहिली.
224-11
जेणे स्वप्रकाशा कांती चढे । ब्रह्मानंदाचा निदाघु मोडे । जयाचेनि सौरभ्ये जीवित जोडे । वेदवतीये ॥224॥
ज्या दिव्य सुगंधयुक्त चंदनाच्या उटीने सच्चिदानंदरूप भगवंताच्या स्वप्रकाशरूप चिन्मय देहालाहि विशेष कांति प्राप्त होऊन शोभा येते व ब्रह्मानंदाचाच विग्रह अशा भगवंताचा ग्रीष्मऋतूंतील तापहि नाहीसा होतो व ज्याच्या दिव्य सुगंधामुळे चित्तवेधक गुणालाहि आयुष्य लाभतें.
225-11
जयाचे निर्लेप अनुलेपु करी । जे अनंगुही सर्वांगी धरी । तया सुगंधाची थोरी । कवण वानी ? ॥225॥
अलिप्त परमात्मा, ज्या चंदनाच्या उटीचा आपल्या अंगाला लेप करतो, स्वतः सर्वागसुंदर असा मदनहिं आपल्या सर्वागावर धारण करतो, त्या चंदनाच्या सुगंधाचे वर्णन कोण करू शकेल.
दिवस १३५ वा, १५, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १६०९ ते १६२०
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. १६०९
देवे देऊळ सेविले । उदक कोरडेचि ठेविले ॥१॥
नव्हे मत गूढ उमाने काही । तू आपणापे पाही ॥धृपद॥
पाठे पूर वोसंडला । सरिता सागर तुंबोनि ठेला ॥२॥
वांजेघरी बाळ तान्हा । एक बाळी दो काना ॥३॥
तुका म्हणे पैस । अनुभविया ठावा गोडीरस ॥४॥
अर्थ
हा देव आपल्या देहरूपी देवळामध्ये राहतो व आपल्या स्वस्वरूपाचे पाणी कोरडे करून ठेवतो. अरे हा माझा स्वःताचा विचार किंवा अभिप्राय नाही तर तू याचा विचार स्वतःचीच करून पहा. अविद्या रूप पाटाला मी देह आहे असा भ्रमाचा पूर आला आणि त्या पुराने संपूर्ण नद्या आणि समुद्र तुडुंब भरले आहे. मायारूपी वांजेच्या घरी जीवरूपी तान्हे बाळ आहे आणि त्याचे दोन कान म्हणजे मी आणि माझे यांच्यात भ्रमाची बाळी घातली आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला काय म्हणायचे आहे ते तुम्ही समजून घ्या आणि माझ्या बोलण्याचा गोडपणा त्याला समजेल ज्याला खरंच अनुभव आहे.
अभंग क्र. १६१०
अशक्य तो तुम्हा नाही नारायणा । निर्जीवा चेतना आणावया ॥१॥
मागे काय जाणो स्वामीचे पवाडे । आता का रोकडे दावू नये ॥धृपद॥
थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे । म्हणवितो दास काय थोडे ॥२॥
तुका म्हणे माझे निववावे डोळे । दावूनि सोहळे समर्थाचे ॥३॥
अर्थ
हे नारायणा निर्जीवामध्ये चेतन आणणे हे तुम्हाला अशक्य नाही तुम्ही हे सहज करु शकता. माझ्या स्वामीने मागे एक गुरुपुत्रला परत आणले आहे असे पोवाडे आम्ही ऐकले आहे. परंतु देवाने आता अशा गोष्टी प्रत्यक्ष का दाखवू नये ? आम्ही थोर भाग्यवंत आहोत की आम्ही स्वतःला त्यांचे दास म्हणून घेतो आहे आणि आम्ही स्वतःला त्यांचे दास म्हणून घेतो हे काय थोडे आहे काय. तुकाराम महाराजांचा नारायणा तुम्ही तुमच्या सामर्थ्याचे सोहळे आम्हाला दाखवा आणि माझे डोळे निववा म्हणजेच शांत करा.
अभंग क्र. १६११
दाता तो एक जाणा । नारायणा स्मरवी ॥१॥
आणीक नासिवंते काय । न सरे आय ज्यांच्याने ॥धृपद॥
यावे तया काकुलती । जे दाविती सुपंथ ॥२॥
तुका म्हणे उरी नुरे । त्याचे खरे उपकार ॥३॥
अर्थ
खरा दाता तोच जो नारायणाचे स्मरण करणे घडवितो. जो दाता दान देतो पण त्या दानाने भूक भागत नाही अशा नाशवंत दानाचे काही उपयोग आहे काय ? संत आपल्याला सन्मार्ग दाखवितात त्यांनाच काकुळतीला येऊन शरण जावे. तुकाराम महाराज म्हणतात ज्या दात्याच्या दानाने कोणतेच कर्तव्य उरत नाही, राहत नाही त्याचेच खरे उपकार मानावेत.
अभंग क्र. १६१२
लाडकी लेक मी संताची । मजवरी कृपा बहुतांची ॥१॥
अखई चुडा हाती आला । आंकण मोती नाकाला ॥धृपद॥
बोध मुराळी शृंगारीला । चवऱ्यांयशीचा सिक्का केला ॥२॥
तुका तुकी उतरला । साहानकेचा कौल दिला ॥३॥
अर्थ
मी संतांची लाडकी लेक आहे त्यामुळे माझ्यावर सर्व देवांची व लोकांची कृपा आहे खूप जणांची कृपा माझ्यावर आहे. संतांनी माझ्या हाती अक्षय चुडा म्हणजे अबाधित सत्यरुपी कंकण घातले आहेत आणि नाकामध्ये मुक्ती रुपी मोत्याची नथ घातली आहे. मी बोध रुपी शृंगार केला आणि चौऱ्यांशी योनीचा शिक्का ज्याच्यावर आहे अशी माळ घातली आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी संतांच्या कृपेच्या कसाला उतरलो त्यामुळे संतांनी मला सहानुभूतीचा कौल दिला आहे.
अभंग क्र. १६१३
संता नाही मान । देव मानी मुसलमान ॥१॥
ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ॥धृपद॥
घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ॥२॥
तुका म्हणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम ॥३॥
अर्थ
काही लोक संतांना मान देत नाहीत त्यांचा सन्मान करीत नाहीत परंतु मुसलमान लोकांना ते देव समजतात. हे देवा असे लोक पोटासाठी गुलाम झालेले असतात परंतु आशे मुळे वासनेमुळे त्यांची विटंबना होते. असे लोक नीच लोकांच्या पायाला लोटांगण घालतात आणि त्यांचे चरण वंदन करतात. तुकाराम महाराज म्हणतात अशा माजलेल्या लोकांना धर्म आणि अधर्म काहीच कळत नाही कारण ते अज्ञानामध्ये जगत असतात.
अभंग क्र. १६१४
अहो कृपावंता । होय बुद्धीचा ये दाता ॥१॥
जेणे पाविजे उद्धार । होय तुझा पायी थार ॥धृपद॥
वदवी हे वाचा । भाव पांडुरंगी साचा ॥२॥
तुका म्हणे देवा । माझे अंतर वसावा ॥३॥
अर्थ
हे कृपावंत दाता तूच मला चांगली बुद्धी देणारा हो म्हणजे त्यामुळे माझा उद्धार होईल व तुझ्यापायी मला आश्रय मिळेल. माझी वाणी माझ्याकडून पांडुरंगाचे नाम वदवून घेईन आणि त्याच ठिकाणी खरी भक्ती भाव ठेवीन. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुम्ही माझ्या अंतःकरणात येऊन रहा.
अभंग क्र. १६१५
नाही म्या वंचिला मंत्र कोणापाशी । राहिलो जीवासी धरूनि तो ॥१॥
विटेवरी भावे ठेवियेले मन । पाउले समान चिंतीतसे ॥धृपद॥
पावविला पार धरिला विश्वास । घालूनिया कास बळकट ॥२॥
तुका म्हणे मागे पावले उद्धार । तिही हा आधार ठेविलासे ॥३॥
अर्थ
मला जो मंत्र माहित आहे तो मंत्र मी सर्वाना सांगितला आहे आणि कोणालाही मी त्या मंत्रापासून वंचित ठेवले नाही. आणि तोच मंत्र मी माझ्या जीवाशी घट्ट धरून ठेवला आहे. विटेवर असलेल्या समचरणाच्या ठिकाणीच मी माझा भक्तिभाव ठेवला आहे व त्याच ठिकाणी माझी दृढ भक्ती, विश्वास ठेवून मी माझी कंबर कसली त्यामुळे मी संसारातून पार पडलो. तुकाराम महाराज म्हणतात पूर्वी जे भक्त उद्धार पावले त्या भक्तांनी हा मार्ग मोकळा करून ठेवला आहे.
अभंग क्र. १६१६
चंचळी चंचळ निश्चळी निश्चळ । वाजवी खळाळ उदकासी ॥१॥
सोपे वर्म परि मन नाही हाती । हा हा भूत चित्ती भ्रम गाढा ॥धृपद॥
रविबिंब नाही तुटत उदका । छायेची ते नका सरी धरू ॥२॥
तुका म्हणे भय धरी रज्जूसाठी । नाही साच पोटी कळले तो ॥३॥
अर्थ
पाणी उतारावर गतीने तर सारख्या जमिनीवर स्थिर पणाने आणि खाचखळग्यांच्या ठिकाणी खळखळ करत वाहते. ब्रम्हज्ञान प्राप्त होण्याचे वर्म सोपे आहे परंतु मन स्वाधीन नसल्यामुळे ते प्राप्त होत नाही आणि माणसाच्या चित्तात गाढा भ्रम आहे की ” मी देह ” आहे त्यामुळे ब्रम्हज्ञान होण्यास कठीण जाते. पाण्यात सुर्याचे प्रतिबिंब पडते ते प्रतिबिंब म्हणजे तुम्ही सूर्य समजू नका. तुकाराम महाराज म्हणतात रस्त्यात दोरी पडली की दोरी सर्पा सारखी दिसते मग माणसे त्या दोरी चे भाय मनात धरतात परंतु ते भय कोठपर्यंत असते जोपर्यंत आपल्याला दोरीचे ज्ञान होत नाही तोपर्यंतच.
अभंग क्र. १६१७
आवडी येते गुणे । कळो चिन्हे उमटती ॥१॥
पोटीचे ओठी उभे राहे । चित्त साहे मनासी ॥धृपद॥
डोहोळेयाची भूक गर्भा । ताटी प्रभा प्रतिबिंबे ॥२॥
तुका म्हणे मागून घ्यावे । मना खावे वाटे ते ॥३॥
अर्थ
आवडीचा व्यक्ती समोर आला मग आपण त्याच्याबरोबर कसे वागतो यावरूनच त्याच्याविषयी आपले किती प्रेम आहे ते समजून येते. त्या व्यक्तीविषयी असलेले पोटातील प्रेम ओठा द्वारे बाहेर पडते कारण मन चित्ताला ग्वाही असते. गर्भवती स्त्रीला हे खायचे, ते खायचे असे डोहाळे लागते पण खरेतर ती भूक गर्भाची असते परंतु डोहळ्याच्या रूपाने ते बाहेर पडते, ताट एकदम चकाचक धुतले की त्यामध्ये कशाचेही प्रतिबंध ऊमटते अगदी त्याप्रमाणे. तुकाराम महाराज म्हणतात एकदा मनुष्य पंक्तीत जेवण्यास बसला तर तो त्याला जे वाटेल ते मागून घेतो व खात असतो.
अभंग क्र. १६१८
काय ऐसी वेळ । वोढवली अमंगळ ॥१॥
आजि दुखवले मन । कथाकाळी जाला सीण ॥धृपद॥
पापाचिया गुणे । त्यांचिया वेळे दर्षणे ॥२॥
तुका म्हणे कानी । घालू आले दुष्टवाणी ॥३॥
अर्थ
देवा आज अशी वाईट वेळ माझ्यावर का बरे ओढवली असेल ? आज माझे मन दुखावले गेले आहे आणि कथे काळी मला कष्ट झाले आहे. माझे पूर्व जन्माचे काहीतरी पापच आहे त्यामुळे मला कथेच्या वेळी या वाईट दुष्ट लोकांचे दर्शन झाले. तुकाराम महाराज म्हणतात हे दुष्ट लोक कथेला आलेले नसून त्यांचे काहितरी म्हणणे मला सांगण्या करिता ते इथे आलेले आहेत.
अभंग क्र. १६१९
किती वेळा जन्मा यावे । नित्य व्हावे फजीत ॥१॥
म्हणऊनि जीव भ्याला । शरण गेला विठोबासी ॥धृपद॥
प्रारब्ध हे पाठी गाढे । न सरे पुढे चालत ॥२॥
तुका म्हणे रोकडी हे । होती पाहे फजीती ॥३॥
अर्थ
किती वेळा जन्माला यावे आणि किती वेळा या संसार दुखाने फजित व्हावे ? म्हणून माझा जीव भ्याला आणि विठोबाला शरण गेला. माझे प्रारब्ध कर्म बलवान आहेत त्यामुळे मी कितीही पुढे गेलो तरी ते संपतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा माझी अशी रोकडी फजिती होत आहे ते तुम्ही जाणून घ्यावे.
अभंग क्र. १६२०
होतो सापडलो वेठी । जाता भेटी संसारा ॥१॥
तो या वाटे कृपा केली । भेटी जाली विठोबासी ॥धृपद॥
होता भार माथा माझे । बहु ओझे अमुप ॥२॥
तुका म्हणे केली चिंता । कोण दाता भेटेल ॥३॥
अर्थ
मी संसाराच्या भेटीला जात असताना सर्वाची सेवा करण्याच्या मोठ्या अडचणीत सापडलो होतो. पण भक्ती मार्गानेच माझ्यावर मोठी कृपा केली त्यामुळे मला विठ्ठलाची भेट झाली. माझ्या माथ्यावर संसाराची खूप मोठे ओझे होते. तुकाराम महाराज म्हणतात मला आता सद्गुरु कोण भेटेल याविषयी चिंता लागली आहे ?
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















